गांधीजयंतीच्या दिवशी गांधीजींची हत्या करणाऱ्याचा उल्लेख करून शिव्याशाप देऊन , आगपाखड करण्याचा अट्टाहास कशासाठी? ही वैचारिक हतबलता आहे की बौद्धिक दिवाळखोरी? किमान अस्सल गांधीवाद्यांनी तरी नथूरामाचा अनुल्लेख करून गांधीजींचे तत्त्वज्ञान कसे आज रिलेव्हंट आहे यावर काथ्याकूट करावा. गांधीवादी विचार आज जागतिक राजकारणात फक्त पाठ्यपुस्तकी आदर्श आहे. कारणं काय आहेत? अहिंसेचे तत्वज्ञान शिकवण्याची खरोखरच गरज आहे ती जिहाद्यांना. ज्यांनी जगभर हिंसा घडवून उत्पात माजवला आहे. हिंसेला चालना देणाऱ्यांना अहिंसेचे महत्व पटवून देण्याचे काम होत नाही ही राजकीय अपरिहार्यता आहे की मानसिक गुलामगिरी?
तुम्ही अहिंसात्मक विचार मांडा पण स्वसंरक्षणार्थ समोरच्याला चितपट करायचे सामर्थ्य पण गरजेचे आहे आजच्या जगात. थडाथड थोबाडीत खायच्या अन् मी कसा अहिंसक आहे हे दाखवणे म्हणजे गांधीवाद नव्हे. गांधीवाद म्हणजे सर्वसमावेशकता. अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रम्हचर्य, अपरिग्रह, शरीरश्रम, अस्वाद, निर्भय, सर्वधर्मसमभाव, स्वदेशी आणि अस्पृश्यता निर्मूलन ही आदर्शवादी मूल्ये. गंमतीचा भाग म्हणजे यातील बरीच मूल्ये आजच्या काळात कालबाह्य झालेली आहेत. ती का झाली कशाने झाली यावर चर्चा व्हायला पाहिजे. एखादे तत्त्व कालबाह्य होऊ नये म्हणून प्रयत्न करणे गरजेचे आहे की तत्वे निकालात काढली की रडारड करणे करजेचे?
गांधी केवळ एक व्यक्ती नाही तर एक इकोसिस्टम आहे. हे ज्यांनी जाणले आणि स्वार्थासाठी वापरले ते राजकीय धुरंधर आहेत. बाकीचे मानसिक गुलाम. अस्सल गांधीवादी जे कोणी आहेत त्यांना मनोमन मान्य असेल की अशा राजकीय धुरंधर लोकांनी गांधीजींच्या तत्त्वज्ञानाची विल्हेवाट लावली आहे. कसलाही राजकीय हेतू मनात न ठेवता अनेक सामाजिक संघटना आणि व्यक्ती यांनी खऱ्या अर्थाने गांधीवाद जोपासला आहे.
ढोंगी पुरोगामी लोकांची आगतिकता दिवसेंदिवस वाढत जाणार आहे. एकीकडे ज्यांना राजकीय पाठबळ दिले त्यांनी ढिगभर माती खाल्ली, दुसरीकडे सध्याच्या राजकीय परिस्थितीत जागतिक पातळीवर होणारे राईट विंग पॉलिटिकल इनक्लिनेशन! मग गांधींचा मुखवटा लावून जनतेची फसवणूक करणारे आणि जागतिक राजकारणात गांधी आमचे आदर्श आहेत असे म्हणत युद्धखोर अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामांनी गांधीजी हे आपले वैचारिक आदर्श असल्याचे उघडपणे सांगणारे यात काही फरक नाही. कोणी गावपातळीवर गांधी वापरतात तर कोणी जागतिक पातळीवर! वैचारिक विरोधाभास असा असतो. बऱ्याचदा लोकांना प्रशंसक आणि कट्टर यातील फरक माहीत नसतो. तुम्ही कट्टर असाल तरच आमच्यातील हा वैचारिक कर्करोग आहे. काही गांधीवादी लोकांना संपूर्ण जगाने गांधीवादी झाले पाहिजे अशी दिवास्वप्ने पडतात.
थोडे डार्क सायकॉलॉजीच्या अनुशंगाने विचार करू. बिहेविअरल मॅनिप्युलेशनमधील एक संकल्पना आहे, इंडॉक्ट्रिनेशन. याचा अर्थ एखाद्या व्यक्तीच्या मनात विशिष्ट विचार, तत्त्वे किंवा श्रद्धा म्हणजेच बिलीफ्स इतक्या पद्धतशीरपणे आणि खोलवर रुजवणे की, ती व्यक्ती त्या विचारांवर कोणतीही शंका न घेता, प्रश्न न विचारता विश्वास ठेवू लागते. एकदा का तो 'स्ट्रॉंग बिलिव्हर' तयार झाला, की मग त्या व्यक्तीकडून हवं तसं, हव्या त्या वेळी काम करवून घेणं किंवा तिला मॅनेज करणं अत्यंत सोपं जातं. हे जसं व्यक्ती बाबतीत होतं तसंच समुह किंवा समाजाच्या बाबतीत पण होतं. इन्स्टिट्यूशनल इंडॉक्ट्रिनेशन. यामध्ये इकोसिस्टमचा वापर करून समाजाच्या मनावर काही ठराविक मूल्ये, विचार बिंबवले जातात. ही 'बिलीफ सिस्टीम' इतकी भक्कम केली जाते की, पिढ्यानपिढ्या लोक त्यावर प्रश्न उपस्थित करण्याचे धाडस करत नाहीत. ही बिलीफ सिस्टीम राजकीय व्यक्तीकेंद्रित असेल तर हिरो वर्शिप केली जाते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी राजकारणातील हिरो वर्शिप लोकशाहीसाठी कशी घातक ठरू शकते याचा इशारा दिला होता. गांधीजींच्या काही धूर्त अनुयायांनी गांधींना देवत्व बहाल केलं आणि तुम्ही गांधीजींचे फक्त प्रशंसक न होता गांधीवादी असाल तर खरे गांधीविचाराचे पाईक असा दूधखुळा समज दृढ केला. गांधीजींची त्यांच्याच अनुयायांनी जी राजकीय परिप्रेक्ष्यात वैचारिक मांडणी बिघडवलेली आहे ती आता बदलता येणार नाही. तशी बदललेली राजकीय प्रस्थापितांना चालणार नाही. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे कॉंग्रेसमधील प्रस्थापित नेत्यांनी घराणेशाही मजबूत करण्यासाठी गांधींना वापरले. हे नाकारता येणार नाही. भले तुम्ही गांधीवादी असा किंवा नसा, या देशात राजकीय गरजा पुर्ण करण्यासाठी गांधीजींचा उल्लेख करावाच लागतो.
©️भूषण वर्धेकर
२ ऑक्टोबर २०२६
पुणे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा