'छावा'च्या निमित्ताने...
छावा सिनेमा प्रदर्शित होऊन दोन आठवडे झाले तरी एकूणच सिनेमाबद्दल परीक्षण, समीक्षण, समर्थन आणि विरोध वगैरे सोशल मीडियावर अविरतपणे चालू आहे. चित्रपट का बघावा?, की नको?, बघायला कसा आहे सिनेमा?, चांगला आहे का वाईट आहे? याच्याबद्दल बोलणं, लिहिणं हे होतच राहील. कारण सिनेमा प्रदर्शित झाला आणि प्रमोशन, मार्केटिंगमध्ये जोर आला. मूळ मुद्दा येतो इतिहासाकडे बघण्यासाठी आपल्याकडे ती दृष्टी आहे का? आत्ताच्या काळात सहाशे सातशे वर्षांपूर्वी काय घडलं होतं किंवा तीनशे चारशे वर्षांपूर्वी काय घडलं होतं? वगैरे वर आपण किती काथ्याकूट करायचा याचा विचार केला पाहिजे. इतिहास जो सांगितला जातोय तो मुळातच वेगवेगळ्या दृष्टिकोनातून बघितला गेला पाहिजे. कारण इतिहास लिहिताना कोण कोणत्या नजरेतून पाहतो त्यानुसारच नोंदविला जातो. प्रत्येक विचारसरणीच्या व्हर्जनमध्ये ऐतिहासिक प्रसंग रेखाटले जातात. उदाहरणार्थ मराठा किंवा हिंदवी साम्राज्याचा कालावधीचा १६३० ते १८१८ असा ऐतिहासिक उल्लेख आहे. त्याकाळी मुस्लिम शासक भारतात राज्य करत होते. त्याच काळात मुघल,आदिलशाही, निजामशाही वगैरे साम्राज्य अस्तित्वात होते. ऐतिहासिक प्रसंग रेखाटले जातात ते संशोधन करून. त्या त्या साम्राज्याचा विस्तार कसा झाला तो करताना काय काय घडलं ह्याची नोंद तत्कालीन ऐतिहासिक कागदपत्रांच्या सहाय्याने पडताळा येते. याचबरोबरीने पुर्वापार चालत असलेल्या मौखिक परंपरेने जे जे सांगितले जाते ते उदाहरणार्थ लोककथा, दंतकथा, लोककला किंवा बोलीभाषेतील गद्य पद्य रचना यामार्फत लोकांपर्यंत पोचतं. या सगळ्या गोष्टींचा उपयोग चित्रपट, साहित्यात, नाटकात आजपर्यंत अनेकदा झाला आहे. पण चित्रपट, साहित्य किंवा नाटक हे रंजकता आणल्याने वाचणाऱ्याला, बघणाऱ्या लोकांना आकर्षित करतात. संशोधन करून इतिहास लिहिताना रंजक व्हायला पाहिजे म्हणून लिहिला जात नाही. तो सत्यता पडताळून, उपलब्ध माहितीनुसार अधिकृत नोंदी अभ्यासून विचारपूर्वक लिहिला जातो. विवेकी पद्धतीने लिहिला जातो. आता मूळ मुद्दा येतो तो लिहिणारे नेमके कोणत्या मानसिकतेचे आहेत? विचारसरणीचे आहेत? कारण इतिहास जर डाव्या विचारसरणीच्या लोकांच्या दृष्टीने लिहिला तर ते त्यांच्या सद्सद्विवेक बुद्धीला जे पटेल तेच लिहिणार. तीच गोष्ट उजव्या विचारसरणीच्या लोकांची. तत्सम काही द्वेष मनात धरून लिहिणारे आणि संशोधन करणारे पण वाढले आहेत राजकीय फायद्यासाठी हे नाकारता येणार नाही. अशावेळी इतिहासात नेमकं काय खरं होतं नि काय खोटं हे तपासण्यासाठी कोणतीही यंत्रणा उपलब्ध नाही. कारण अशी यंत्रणा उभी करण्यासाठी निष्पक्षपाती राजकीय आणि विवेकी सामाजिक लोकांची गरज आहे. सध्यातरी ह्या दोन्ही प्रजाती दुर्मिळ. त्यामुळे इतिहासाचा अभ्यास करायचाच असेल तर जे जे उपलब्ध आहे ते ते म्हणाले बखरी, शकावली, तत्कालीन पत्रे, नोंदी, परदेशी प्रवासी येऊन गेले त्यांचं लिखाण आणि समकालीन साम्राज्यातील, संस्थानांतील जे कोणी इतिहासकार होते त्यांचं लिखाण पण महत्वाचे. भारतात तरी ऐतिहासिक उपलब्ध साधनांचे म्हणावे तसे संशोधन झाले नाही की जतनासाठी प्रयत्न झाले नाही. कारण इंग्रज येण्याआधी असलेली शैक्षणिक व्यवस्था आणि इंग्रजांच्या काळात लागू झालेली शिक्षणव्यवस्था यात जमीन अस्मानी फरक आहे. त्यामुळे अशा सगळ्या गोष्टींचा विचार केला तर संभाजी महाराज यांची खरीखुरी माहिती ही १९६० नंतर डॉ कमल गोखले यांच्या पुस्तकांतून सर्वसामान्य जनतेला समजली. त्याआधी वा. सी. बेंद्रे यांच्या योगदानाबद्दल चर्चा नाही झाली तर तो कृतघ्नपणा ठरेल. बखरी मध्ये आढळणाऱ्या नोंदी या इतिहासाची साक्ष वगैरे नसून तो केवळ लिखित दफ्तरदारी दस्तावेज एवढंच त्याच मूल्य. चिटणीस बखर मध्ये संभाजी महाराज यांच्या बद्दल बदनामीकारक मजकूर आहे. त्यामुळे विसाव्या शतकाच्या सुरुवातीस जे जे साहित्य वा नाटकं लिहिली त्यात संभाजी महाराज यांच्या बाबतीत असेच उल्लेख आढळतात. महत्त्वाचे ऐतिहासिक प्रसंग वा घटना डोळ्यासमोर ठेवून आजवर मराठीत अनेक कादंबऱ्या लिहिल्या आहेत. नाटकं रंगभूमीवर सादर केली आहेत. त्यात मनोरंजन हाच मुख्य हेतू आहे. तेच चित्रपटांचेही. मुळातच चित्रपट तयार करणं मोठं खर्चिक आणि त्यातून लोकांना दिग्दर्शकाचा 'पॉईंट ऑफ व्ह्यू ' सांगणं/ दाखवणं हे महत्त्वाचे. साहित्यात लेखकाचा पॉईंट ऑफ व्ह्यू महत्त्वाचा. नाटकात नटाने साकारलेल्या पात्राचा प्रभाव किती हे महत्त्वाचे. त्यामुळे माध्यमातून ऐतिहासिक प्रसंग दाखवले गेले म्हणजे सत्यप्रतिशत इतिहास सांगितला असं होतं नाही. चित्रपटातून दिग्दर्शकाला जे भावतं जे जाणवतं ते प्रेक्षकांच्या पुढ्यात ठेवलं जातं.
छावा चित्रपटात मध्यंतरापर्यंत चित्रपट रेंगाळलेला आहे असं जाणवलं मात्र नंतर युध्दाच्या प्रसंग, टॉर्चर सीन्स अंगावर येणारे आहेत. अभिनयाच्या बाबतीत अक्षय खन्ना, विकी कौशल ने बाजी मारलेली आहे. रश्मिका मंधांना फारच मिळमिळीत वाटते. सहकलाकार दमदार आहेत. संगीत अजून चांगले झाले असते. ऐतिहासिक युद्ध पडद्यावर दाखवणं कठीण. त्यातही जे दाखवलं जातं त्यात प्रेक्षकांना खिळवून ठेवले पाहिजे. दक्षिणेकडील चित्रपटांतून हे अनेकदा बघितले होते. हिंदी सिनेमात असे प्रसंग लार्जर दॅन लाईफ पद्धतीने दाखवून कित्येक चित्रपट हास्यास्पद झाले आहेत. छावातील युद्धं पडद्यावर बघितल्यावर काहीतरी मिसिंग असल्याचं वाटतं. कथा मधल्यामध्ये तुकड्या तुकड्यांनी लिहिल्या सारखी वाटते. कदाचित वेळेची मर्यादा असणं हेही कारण असावं. त्याचप्रमाणे किती लढाया दाखवणं, कशा पद्धतीने दाखवणं हे दिग्दर्शक ठरवतो. छावाची सिनेमॅटोग्राफी उत्तम आहे. व्हीएफएक्सचा वापर पण आताशा बघितल्या बघितल्या लगेच कळतो (थॅन्क्स टू राजमौली). शेवटच्या प्रसंगात डायलॉगबाजी, क्रूरतेने केलेला छळ, अभिनय वगैरे प्रभावित करतात. प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यात लक्ष्मण उत्तेकर १००% यशस्वी झाले आहेत. ऐतिहासिक चिकित्सा न करता सिनेमा पाहणं महत्त्वाचं. लोकांना आवडतो कारण लोकांपर्यंत ठराविकच गोष्टी जाणूनबुजून आणल्या जातात. मग एकदम असं झालं होतं का हे बघितल्यावर प्रेक्षकांना भावतं. लिहिले गेलेले काही हजार, लाख वाचकांपर्यंत पोचतं. चित्रपट बघाणाऱ्या लोकांची संख्या कोटींहून जास्त आहे. त्यामुळे नाटकं, कादंबरी वगैरेंची प्रभावक्षेत्र मर्यादित आहेत. मात्र सिनेमा हा तळागाळापर्यंत पोचतो. याचं कारण पाचशे रुपये खर्च करून कोणी पुस्तक विकत घेऊन वाचणारे असतील तर त्यापेक्षा जास्त पाचशे रुपये खर्च करून तिकिट खरेदी करून चित्रपट पाहणारे असतात. त्यामुळे शिवाजी सावंत यांच्या छावा कादंबरीत संभाजी महाराज यांना क्रूरतेने छळले आणि मारले. हे वर्णन आणि चित्रपटात दाखवण्यात आलेले दृश्य चित्रण यात नक्कीच फरक पडणार. दृश्ये पाहून आणि लेखन वाचून दाहकता उभी करणं ही वेगवेगळी आयुधे आहेत. सध्यातरी सिनेमा प्रदर्शित झाला आणि ज्यांना संभाजी महाराज यांच्या बद्दल फारशी माहिती नाही अशी बरीच भोळी भाबडी जनता आहे त्यांना छावा अपील झाला. त्यात प्रमोशन वगैरे धुवांधार झाले त्यामुळे मेडिया मार्फत अनेकांपर्यंत पोचला. जनतेला चित्रपट आवडल्या शिवाय डोक्यावर घेत नाहीत. नाही आवडला तर चित्रपट सपशेल आपटतात. छावा चालतोय, लोकांना आकर्षित करतोय कारण बऱ्यापैकी टू द पॉईंट गोष्टी दाखवल्या आहेत. संभाजी महाराजांच्या कारकिर्दीतील सगळ्याच महत्त्वाच्या घटना एकाच सिनेमात दाखवण्यासाठी अट्टाहास केला नाही. पहिल्या एक तासभरात शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर मराठ्यांच्या साम्राज्याचा विस्तार कसा झाला त्यासाठी संभाजी महाराज यांनी केलेल्या मोहिमा नंतर राज्याभिषेक नंतर अंतर्गत असंतोष, कौटुंबिक बंड वगैरे वगैरे करत तुकड्या तुकड्यांनी संभाजी महाराजांच्या कारकिर्दीतील घटनांचा आढावा घेतला आहे. मध्यंतरानंतर मात्र लढवय्ये आणि छळ सहन करणारे संभाजी महाराज यावर संपूर्ण फोकस आहे. त्यामुळे कित्येक ऐतिहासिक घटना, संदर्भ, प्रसंग माहितगार लोकांना राहून गेल्यासारखे वाटतात. दिग्दर्शक म्हणून उत्तेकरांनी चित्रपट प्रभावी होण्यासाठी महाराजांच्या शेवटच्या दिवसांचे चित्रणावर फोकस केला आहे. त्यामुळे इतिहासाचा कित्येक घटनांचा उल्लेख केला नाही. अर्थात ती कलाकारांची सिनेमॅटिक लिबर्टी आहे.
उण्यापुऱ्या बत्तीस वर्षांच्या कालावधीत आठ वर्षे छत्रपती म्हणून संभाजी महाराजांची कारकीर्द. अनेक भाषा त्यांना अवगत होत्या. त्यांनी लिहिलेल्या साहित्याची दखल घेणं गरजेचं. त्यांच्या कारकिर्दीत अनेक महत्त्वाच्या लढाया झाल्या. त्यात पोर्तुगीजांशी गोव्यातील लढाई, जंजिऱ्याच्या सिद्धी सोबतचा लढा, दक्षिणेकडील लढाया या महत्त्वाच्या आहेत. ह्या लढाया जरी सिनेमात दाखवल्या असत्या तरी सिनेमाची लांबी वाढली असती. संगमेश्वर येथे सरदेसाई वाड्यातील लढत सोडली तर बाकीच्या लढाया दाखवताना दिग्दर्शकाने हात आवरता घेतला असं दिसतं. स्वराज्य विस्ताराचा भीमपराक्रम करणाऱ्या संभाजी महाराजांच्या बाबतीत बखरीत ऐतिहासिक प्रसंग रेखाटले ते त्यांच्या बदनामीचे. हीच महाराष्ट्राची खूप मोठी शोकांतिका आहे. संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर मराठ्यांचे सत्तासंघर्ष जसे वाढले ते १७३१ च्या वारणेच्या तहा पर्यंत चालू होते. ह्या ऐतिहासिक घटनांची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर जी दुफळी निर्माण झाली होती त्याची कारणं अंतर्गत बंड, असंतोष, कौटुंबिक कलह वगैरे असावीत. त्यात तत्कालीन अल्पसंतुष्ट जे कोणी असतील त्यांना संभाजी महाराज हे निश्चितच खटकत असणार. दोषी अनाजी पंतला हत्तीच्या पायाखाली दिले होते महाराजांनी. असे तुरळकच संदर्भ दाखवून सिनेमा पुढं जातो. त्यामुळे सिनेमा बघताना इतिहास शोधून काही हाती लागत नाही. सध्या तरी छावाची हवा आहे. सिनेमा प्रदर्शित झाला आणि सोशल मीडिया मुळं पब्लिसिटी झाली त्याचा फायदा होतोय. असाच एक दोन आठवडा जाईल.
ऐतिहासिक चिकित्सा होणं आणि ऐतिहासिक प्रसंग साहित्यातून सांगितले जाणं यात फार फरक आहे. कादंबरी मधून एखाद्या महापुरुषाचं आयुष्य जेव्हा वाचकांसमोर मांडले जाते त्यात लेखकाची लेखनशैली महत्त्वाची. लेखन जेवढं प्रवाही तेवढा वाचक गुंतत जातो. मात्र संशोधन करून इतिहास लिहिताना ही रंजकता गरजेची नसते. तथ्य, पुरावे, संदर्भ आणि अनुमान यावर आधारित विवेकी मांडणी महत्वाची. मराठी भाषेत कैक कथा, कादंबरीत अशी ऐतिहासिक महापुरुषांची गाथा रंगवलेली आहे. लेखकाला जे वाचकांसमोर मांडावेसे वाटते तो ते लिहितो. वाचकाला आवडलं तर ते पुस्तकाची मागणी वाढते. वाचक वाढतात . तसाच प्रकार सिनेमाचा. त्यात दिग्दर्शकाचा 'पॉईंट ऑफ व्ह्यू' महत्वाचा. इतिहासात जे घडले त्याची मांडणी कोणी धर्माच्या आधारावर करतो. कोणी साम्राज्याचा विस्तार करण्यासाठी इतिहासात अमुक तमुक घडलं वगैरे मांडतो. ज्याची त्याची दृष्टी. काहींना द्वेषमूलक लिहायला आवडतं. लिहितात. त्यांचेच बगलबच्चे, सगेसोयरे तेच खरं मानून फुशारकी मारतात. मराठ्यांचा इतिहास लिहिताना काही ठोकताळे खूप महत्त्वाचे. विशेषतः तारखा सनावळ्या. ऐतिहासिक दस्तावेज शोधले तर तिथी, मराठी महिने यांच्या नोंदी. त्यात ग्रेगोरियन कॅलेंडर स्विकारले गेल्यामुळे तारखांचे आणि तत्कालीन तिथीचे घोळ. जे जे उपलब्ध आहे ते अस्सल आहे की नाही हे सिद्ध करण्यासाठी समकालीन साहित्य संदर्भ पण तपासावे लागतात. एवढे सगळे सव्य अपसव्य करून एखादी घटना प्रकाशित झाली तर तीच्या वर साधकबाधक चर्चा झाली पाहिजे. सप्रमाण सिद्ध झाले पाहिजे. अशा सगळ्या कसोट्यांवर आधारलेली असते वैचारिक मांडणी. जे संशोधक, अभ्यासक आहेत तेच हा उहापोह करतील. बाकीचे रसिक प्रिय, वाचकप्रिय लेखक, नवलेखक मंडळी एखाद्या घटनेचे गांभीर्य लक्षात न घेता मनातले विचार इतिहासात घुसडून मिरवतात. पायपोस राहिलेला नाही.
भारतात व्यापारासाठी किंवा लूटमार करण्यासाठी युरोपियन आले ते पंधराव्या शतकाच्या अखेरीस. त्याआधी परकीय आक्रमणे झाली. इस्लामिक शासक भारतात राज्य करत होते. तेव्हा तत्कालीन भारतात राजे, महाराजे होते. मुघल होते. वेगवेगळी राज्यं विखुरलेली होती. मात्र १६३० ते १८१८ हा कालखंड मराठा साम्राज्याचा इतिहासात मानला जातो. १८१८ नंतर ब्रिटिश सक्रिय झाले. दरम्यान युरोपियन वसाहतींच्या पण एकमेकांवर कुरघोड्या होत होत्या. तत्कालीन इस्लामिक शासक यांच्याविरोधात पण ब्रिटिश लढले. ते काही स्वातंत्र्य मिळवण्यासाठी नव्हते तर आपलं साम्राज्य टिकवण्यासाठी वाढवण्यासाठी लढले होते. तत्कालीन भारतीय भूखंडावरील लढाया ह्या अशा गुंतागुंतीच्या होत्या. ज्या त्या इतिहासकाराने त्या त्या दृष्टीने बघितल्या, लिहिल्या. असा हा समग्र समकालीन इतिहास बघितला पाहिजे. इतिहासाकडे बघताना नेहमी सजगदृष्टीने बघितलं पाहिजे. याचे मुख्य कारण असं की, इतिहास जेव्हा लिहिला जातो किंवा इतिहासावर जेव्हा संशोधन केलं जातं तेव्हा उपलब्ध कागदपत्रे जी असतात त्याचा आधार घेऊन काहीतरी नमूद केलं जातं आणि ते केलेले लिखाण हे आधार मानलं जातं. अशावेळी परकीय इतिहासकारांनी नोंदवलेली माहिती पुष्टीसाठी गरजेची असते. ह्या सर्व गोष्टी सर्वसामान्य जनतेला शैक्षणिक पाठ्यपुस्तकातून जेवढ्या परिचयाच्या असतात त्यातच त्यांची ऐतिहासिक समज असते. शैक्षणिक पाठ्यपुस्तकातून नेमकं काय द्यायचे ह्याचे सर्वाधिकार हे सत्ताधाऱ्यांना असतात. त्यामुळे जे शिकलो नाही किंवा शिकवलं नाही ते जर साहित्य, सिनेमा नाटक वगैरे माध्यमातून जनतेसमोर आले तर त्यावर चर्चा, वादविवाद होणारच. सर्वसामान्य जनतेला सिनेमा म्हणजे जनजागृती साठी आहे असे वाटतं अशावेळी. अशा प्रकारे लिहिलेले, दाखवलेले आणि भूतकाळात घडलेले प्रसंग हे नेहमी पडताळणी करून घेणं गरजेचं. तेवढा वकूब सर्वसामान्य जनतेचा नसतोच म्हणा! शैक्षणिक व्यवस्था ज्याप्रकारे उभी केली जाते किंवा लादली जाते त्याचीच ही फळं. सिनेमाची तीच खासियत आहे की कन्व्हिक्शन स्ट्रॉंग असेल तर लोकांवर मोठ्या प्रमाणात प्रभाव पडतो. त्यामुळे सिनेमात दाखवली जाणारी हिंसा, मारधाड कधी पोएटिक जस्टीस वाटते किंवा शोकांतिका वाटते. महाराजांची हत्या भयानक छळले म्हणून झाली हे लिखाणातून एवढं भिडत नाही जेवढं दाखवण्यातून भिडतं. हीच तर दृश्यकला माध्यमाची मर्मस्थळे आहेत. याआधीही यांचा वापर खुबीने केला. आता होतोय आणि भविष्यात पण होईल. उदाहरणार्थ आपण एक उदाहरण घेऊ. गुजरात राज्यातील २००२ सालात ज्या दंगली झाल्या त्यात मुस्लिम समाजावर जे हल्ले झाले त्यावर रक्तरंजित प्रसंग जर एखाद्या सिनेमात दाखवले की कसे तत्कालीन हिंसक घोळके निष्पाप मुस्लिमांना टार्गेट करून मारत होते. तर आज छावा वर आज जे आक्षेप घेत आहेत तीच मंडळी ह्या सिनेमाला डोक्यावर घेतील. काश्मीर फाईल्स सिनेमा प्रदर्शित झाला तेव्हा शेवटी जो प्रसंग दाखवला त्यावेळेस असाच प्रभाव प्रेक्षकांवर पडला. गिरीजा टिक्कू यांना ज्या क्रूरतेने ठार मारले होते त्याच्या बातम्या, माहिती किंवा पुस्तकातून आधीच वाचकांना उपलब्ध होती. सिनेमाचा प्रभाव पडला आणि एकूणच त्याकाळी जे काही भयंकर घडलं यांची पुन्हा एकदा शोकात्म जाणीव सर्वसामान्य जनतेला झाली. भविष्यात समजा आजवरच्या दलितांवर जे हल्ले झाले किंवा सवर्णांच्या छळाच्या गोष्टी सिनेमातून कन्व्हिक्शनने दाखवल्या तर जनतेला अपील होणारच.
सिनेमा संपतो आणि एक नैराश्य, हरल्याची भावना प्रेक्षक चित्रपटगृहातून बाहेर पडतो हे काही नवं नाही. २००५ सालच्या डोंबिवली फास्ट हा सिनेमात शेवटच्या फ्रेम मध्ये मेलेली घूस, घोंघावणाऱ्या माशा लोकांना आत्ममग्न करतात. २०१३ सालच्या फॅंन्ड्री सिनेमात शेवटचा मारलेल्या दगडाने कित्येक तास विचारमग्न होतात. सैराटचा शेवट पण तसाच सुन्न करणारा. असे कितीतरी कन्व्हिक्शन स्ट्रॉंग असणाऱ्या दिग्दर्शकांचे सिनेमे लोकांना आवडले. ते डोक्यावर घेतले. कैक चांगले सिनेमे लोकांना आवडले नाहीत. लोकांना काय आवडतं याच्यावर सगळं अवलंबून असते. दिग्दर्शक म्हणून मला काय सांगायचं आहे हे महत्त्वाचे. लक्ष्मण उत्तेकर सध्यातरी फस्ट क्लास मध्ये पास झाले आहेत. गंमत म्हणजे सिनेमात कुठंच हिंदू मुस्लिम असा धार्मिक उल्लेख नाही की अमुक एका जातीच्या लोकांना दोषी ठरवलं नाही. सिनेमात अभिनय, सिनेमॅटोग्राफी, दमदार डायलॉगबाजी लोकांना आकर्षित करते. सिनेमातून जनजागृती वगैरे म्हणजे गाव गप्पा मारल्या सारखं आहे. सिनेमातून जाणीव करून देऊन शकता. जनतेने त्यातून किती घ्यावं ते ठरवू शकत नाही. छावा सारख्या सिनेमा बघितल्यावर लोक थिएटरमधून तलवारी घेऊन बाहेर पडणार आहेत का संभाजी महाराजांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी? अर्थातच नाही! लोकांच्या डोक्यात इतिहास असतो त्याला जातपात धर्माची लेबलं नंतर लावली जातात. इतिहासात धर्माच्या नावाखाली, साम्राज्याचा विस्तार करण्यासाठी आणि लूटमार करण्यासाठी लढाया झाल्या, हिंसा झाली. हे त्रिकालाबाधित सत्य आहे. ते तरी कोणीही नाकारू शकत नाही. सध्याच्या काळात न आवडणाऱ्या लोकांची सत्ता आल्यानंतर खूप निराश झालेले लोक आहेत आणि भविष्यात बदल होईल असे वाटणारे पण खूप आशावादी लोक आहेत. सर्वसामान्य जनतेला ह्याच्याशी काहीएक देणंघेणं नाही. हीच ती सर्वसामान्य जनता आहे जी लोकशाही प्रक्रियेत सर्वात जास्त सहभागी होऊन जे जे सक्षम त्यांना संधी देते. त्यामुळे एखाद्या सिनेमामुळे सामाजिक सौहार्द बिघडणार नाही हे देखील लक्षात ठेवलं पाहिजे.
सरतेशेवटी छावा बघायचा असेल तर उत्तम अभिनयासाठी, संभाजी महाराज यांच्यातील लढवय्या बघण्यासाठी बघावा.
© भूषण वर्धेकर
२६ फेब्रुवारी २०२५
पुणे
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा