वैचारिक विवेकी नास्तिक अज्ञेयवादी आस्तिक लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
वैचारिक विवेकी नास्तिक अज्ञेयवादी आस्तिक लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, १ ऑक्टोबर, २०२५

तुम्ही नास्तिक की सुधारक?

तुम्ही नास्तिक की सुधारक?

नास्तिक म्हणजे कोण तर जो कसल्याही ईश्वरीय, परमेश्वरी संकल्पना, आस्था आणि दैवतांना नाकारणारा. रुढी, परंपरा, प्रथा आणि पूर्वापार चालत आलेल्या चालीरीती याकडे तर्काधारित, वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहणारा. दैवी वगैरे घडणाऱ्या सगळ्या गोष्टींचा शास्त्रीय पद्धतीने अवलोकन करणारा. धर्म, जातपात, पंथ आणि संप्रदाय यांना न मानणारा. नास्तिक होण्यासाठी किमान तर्कशुद्ध पद्धतीने विचार करण्याची क्षमता असावी. काहींना ती उपजत असते काहींना मरेपर्यंत लाभत नाही. एकदा का विचार सुदृढ झाला की प्रश्न विचारून उत्तरं शोधून काही निष्कर्ष काढणं सोपं असतं. नास्तिक मनुष्य अशी उत्तरे वैज्ञानिक दृष्टिकोनातून मिळवतात. तर अज्ञेयवादी व्यवहारिक दृष्टीकोनातून. याचा अर्थ नास्तिक व्यवहारिक दृष्टीकोनातून पाहतच नाही असा होत नाही. नास्तिक मनुष्य एक भूमिका घेत प्रत्येक प्रश्नाला, समस्येला आणि आदळणाऱ्या घटनांना सामोरा जातो. तर आस्तिक शरण जाऊन पापभीरू होतो. त्यामुळे आस्तिक, नास्तिक, अज्ञेयवादी आणि विवेकी मनुष्य हे प्रकार उपप्रकार करणं सोप आहे. खूप लोकांचा गोड गैरसमज असतो की नास्तिक आहेस तर अमुक प्रबोधन कर, तमुक वर भाष्य कर, फलाना टिमका वर प्रतिक्रिया दे वगैरे... पण हे बैल बुद्धीचं लक्षण आहे. प्रबोधन करणे हे सुधारकांच्या भात्यातील धारदार अस्त्र. नास्तिक हा वैयक्तिक पातळीवर आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक घटनांची उकल करत घडतो. सुधारक त्यापुढील आवृत्ती. कारण सुधारकांनी नास्तिक होऊन इतरांना प्रबोधन करण्यासाठी तयारी केलेली असते. सुधारक हा विवेकीच असावा. नाहीतर झुंडीच्या जोरावर स्वतः ही फसतो झुंडीला पण फसवतो.

नास्तिक होण्यासाठी आयुष्यातला कोणताही टप्पा चालतो. आस्तिक असो वा अज्ञेयवादी आजूबाजूच्या वातावरणात जडणघडणीत घडत जातो. नंतर मग पापभीरू, दैववादी, श्रद्धाळू, अंधश्रद्धाळू वगैरे टप्पे नंतर येतात. कारण जन्मतः विचार स्वातंत्र्य खुंटलं की अशी फौज तयार होते. लहानपणापासून जर जडणघडणीत प्रश्न विचारला तर आहे हे असंच आहे ते असेच करावे लागते ही आसक्ती ओढवली की कळपातील मेंढ्या सारखं आयुष्य होतं. नास्तिक यातून सुटू शकतो. तो स्वतः सुटला सोबतच्या जवळच्या लोकांना परावृत्त केले तर विवेकी म्हणायला हरकत नाही. नंतर सुधारणा करण्यासाठी, प्रबोधन करण्यासाठी सुधारकांच्या पावलांवर पाऊल टाकले तरी नैराश्य आलं तरी समाधान लाभेल. आपण काहीतरी वेगळं झालो झुंडीतून सुटून यासाठी. सुधारक होणं सोपं नाही. कारण शतकानुशतके चालत आलेल्या परंपरा, प्रथा, रुढी आणि समज यांना समर्थपणे भिडून, प्रश्न विचारून प्रसंगी वैचारिक भूमिका घेत सर्वसामान्य जनतेला कन्व्हीन्स करणं परम अवघड काम आहे. नास्तिक असताना हे सोपे आहे कारण वैयक्तिक पातळीवर खूप मोठा समुदाय आजूबाजूला नसतो. सुधारकांना मात्र भव्य समुदायाच्या सुपीक डोक्यात वैचारिक पेरणी करावी लागते. यातून सर्वप्रथम अनुनायी घडतात. विवेकी अनुनायी तयार होणं फार जिकिरीचे आहे. अनुनय करणारा अनुनायी मात्र विवेकी अनुनायी होण्यासाठी सुधारक अस्सल मातीतला असावा लागतो. फेक विचार, दे भाषणं, छाप लेख की झाला सुधारक. ही सोपी गोष्ट नाही. स्वतः तावून सुलाखून बाधित समाजाला बाहेर काढून आपल्या विचारांचा बनवणं खूप मोठं दिव्य आहे. नास्तिक विचारांचा आहे म्हणून अमुकतमुक गोष्टींवर द्वेषमूलक टिप्पणी करणं जर मूलभूत हक्क वाटत असेल तर तीच ठाम भूमिका तोच भक्कम तर्क फलानाटिमका गोष्टींवर पण असू द्यावा. नाहीतर तुमच्या नास्तिकतेची कसोटी लागते. कारण अशा प्रसंगी जर तुमच्या भूमिका संशयास्पद वाटल्यास तुमच्या मौलिक विचारांची राखरांगोळी झाल्याशिवाय राहत नाही. कारण अति संहत माध्यमं टपलेली असतात चिरफाड करण्यासाठी. तुमच्या जाहीर भूमिकांमध्ये जर कद्रुपणा आढळला तर तुमची किंमत शून्य. एकदा का सुधारक होण्यासाठी जय्यत तयारी केली आहे तर मग स्वार होऊन लढाईत उतरल्यशिवाय रंग चढत नाही विचारांना. समोर जातपात धर्म वगैरे शुल्लक वाटणारे अडथळे सुद्धा निर्णायक ठरतात जर तयारी कमी पडली तर. जगाच्या पाठीवर कुठेही राहो पण आपण आपला विचार भक्कम आणि प्रवाही ठेवला पाहिजे. नाहीतर परिस्थितीनुरुप समोरच्या व्यक्तीनुसार जर विचार, तर्क, मांडणी आणि म्हणणं बदलत असेल तर रंग बदलणारी सरड्याची जमात आणि आपण काय तो फरक राहिला?

जगभरात किमान काही हजार धर्म, त्यांचे संप्रदाय आहेत. त्यातील जातीपाती आणि त्यांच्या वैचारिक मांडण्या भरपूर आहेत. लौकिकार्थाने सगळे धर्म मानवजातीच्या कल्याणासाठी तयार झाले असले तरी त्याचा प्रचार प्रसार करणारे विवेकी नसतात म्हणून सगळा बोऱ्या वाजतो. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे नंदीबैलासारखे मान डोलावणारे धर्मवाहक तयार झाले तर क्लिष्टता वाढणारे संप्रदायाचे जाळे वाढते. गुंतागुंत होते ती इथे. सुधारककांना धर्माचा जिर्णोद्धार करायचा नसतो तर मानवतेचा उद्धार करायचा असतो. होतं उलटं. धर्माचा उद्धार आणि मानवतेचा जिर्णोद्धार. मग समाज स्विकारण्याऐवजी झिडकारतो. सुधारक हे झिडकारण्यासाठीच असतात त्या त्या धर्माच्या ठेकेदारांसाठी. सुधारकांचा लढा ठेकेदारांशी नसतो. प्रबोधनाची आयुधे ही वहावत गेलेल्या जनतेसाठी असतात. नास्तिक मनुष्य सहजपणे प्रभावीत होईल. पापभीरू दैववादी श्रद्धाळू व अंधश्रद्धाळू जनता फार भावनिक असते. तिला सोदाहरण पटवून देण्यासाठी जंगजंग पछाडावा लागतो. समाजातील एका खूप मोठ्या गटाचा समज असतो की आमच्या मनासारखे बोलत-वागत असाल, आमच्या विचारांशी तुमचे विचार जुळले तरच तुम्ही आमचे. तरच डोक्यावर मिरवू तुम्हाला. नाहीतर तुम्ही कोण आम्हाला शिकवणारे? ह्या प्रमादाला पदोपदी तोंड द्यावे लागते. 

अज्ञेयवादी लोकांना माहिती सगळं असतं. पण सुधारक होण्याची खाज नसते. तुझं तू माझं मी. ही मनोवृत्ती मुरलेली असते. कोणाला शहाणं करायला जात नाहीत की सुधारकांच्या गळ्यातील हार पण होत नाहीत. ही मंडळी साधी भोळी भाबडी नसतात की धूर्त कावेबाज पण नसतात. ह्यांची एक वेगळीच दुनियादारी चालू असते. त्यामुळे यांची जीवनशैली प्रमाण मानून यांच्या सारखे आयुष्य जगलं पाहिजे मानणारी मंडळी नेहमीच उदयास येत असते. अर्थातच ही संक्रमणाची अवस्था असते. आर्थिक सुबत्ता आली की सुखवस्तू जीवनशैली उपभोगली जाते. अशी मंडळी सुशेगाद जगत असतात तिन्ही त्रिकाळ. रोजच्या जगण्याशी संघर्ष नसतो की मूलभूत गरजांसाठी झगडावे लागत नाही. मात्र ही अवस्था येण्यासाठी बऱ्याच वेळा खस्ता खाल्ल्या जातात. त्यामुळे अशा लोकांचं प्रबोधन करणे सोपे नसते. कदाचित त्यांनी खूप मोठा कालावधी बघितलेला असतो ज्यात राजकीय आणि सामाजिक बांधिलकीची फसवेगिरी अनुभवली असते. हेच कारण असतं की ज्या ज्या वर्गातील पिढ्यानपिढ्या संघर्ष करून स्थिरस्थावर झाल्यावर त्या त्या वर्गातील पिछाडीवर असलेल्या समाजाकडे सहसा दुर्लक्ष केले जाते. कारण त्यांना ठाऊक असतं की व्यवस्था कशी कुचकामी आहे आणि आपल्या संघर्षाचा फायदा कोणी कसा घेतला आहे ते. त्यामुळे अशी मंडळी चार हात लांब राहतात एकदा स्थैर्य प्राप्त झाले की. मूळ मुद्दा येतो प्रवाहात येण्यासाठी, सुधारणा, प्रबोधन करण्यासाठी नवनवीन पिढीला समाजात पुन्हा झगडावे का लागते? याचं कारण म्हणजे जनतेला कन्व्हीन्स करण्यासाठी ज्या अनुयायांनी राजकीय विचारसरणी अंगिकारली आहे तिला असलेला स्वार्थी राजकीय टेकू. हा टेकूच सर्वात घातक वैचारिक लढ्यासाठी. विचारधारेचा प्रसार, प्रचार जर राजकीय आशीर्वादाने होत असेल तर तोच राजकीय आदर्श वैचारिक अधोगतीला कारणीभूत ठरतो. विचारधारेचा आणि राजकीय प्रस्थापितांचा संसार सुखाचा होत नाही. कारण विचारधारेत तडजोडी करायची गरजच उरत नाही. तर राजकीयदृष्ट्या तडजोडीचे केविलवाणे स्वरूप दयनीय असते. अशावेळी सुधारकांच्या पावलांवर लोटांगण घालणारे धटिंगण कधी पायाला धरुन तोंडावर पाडतील याचा नेम नाही. त्यामुळे विचारसरणी आणि राजकीय प्रवाह हे वेगळेच असावेत. राजकीयदृष्ट्या जागरूक असणे आवश्यक आहे पण विचारांच्या खांद्यावरून अनुयायांनी समर्थकांमध्ये तेवढा गाढा विश्वास निर्माण केला पाहिजे. तसं झालं तरच वैचारिक आणि सामाजिक राजकीय ऋणानुबंध चिरकाल टिकतात. कुरबुरी चालू असतातच. पण त्याची व्याप्ती शेवटच्या स्तरापर्यंत येऊ लागली की पतन होणं स्वाभाविक आहे.

विचारसरणीला देदीप्यमान इतिहास असणं आणि तो तसाच पुढील पिढ्यांना मार्गदर्शक ठरणं यात खूप मोठी पोकळी असते. पूर्वजांनी भोगलेल्या यातना पुढच्या पिढीला सांगितल्या तरी त्याची जाणीव आणि नेणिव होत नाही. तिची व्यथा, व्याप्ती माहिती असणं वेगळं आणि ती दुर्दशा अनुभवणं वेगळं. त्यामुळे प्रत्येक पिढीत संक्रमित होणारी मूल्ये रुजली पाहिजेत. एकच औषध सगळ्यांनाच लागू होत नाही. त्यामुळे एकच अभ्यासक्रम सर्वाना शिकवून सुधारणा, प्रबोधन करणे कालांतराने रटाळ वाटते. परिस्थितीचे वास्तव आणि विचारसरणीची वास्तविकता नव्या पिढीला आपोआपच दिसते. त्यामुळे वैचारिक मंथन झाले पाहिजे. नवनवीन प्रयोग केले पाहिजेत. नवीन बदल स्वीकारले पाहिजेत. जुन्या कळकट्ट समजूतींना फाटा दिला पाहिजे. हे जर वेळोवेळी नाही झाले तर वैचारिक प्रवाह भरकटतो. एवढं सगळं व्यवस्थित पार पाडून जर संघटनेचे नेतृत्व जर कचखाऊ असेल तल अनुयायांना दोष देऊन काय होणार? नेतृत्व प्रामाणिक, अनुयायी निष्ठावंत आणि संघटन व्यापक ही त्रिसूत्री राबवली तरच नवीन येणाऱ्या लोकांना विचारांचे झेंडे मिरवावेसे वाटेल. अन्यथा पुरस्कार प्राप्त करण्यासाठी किंवा व्याख्यानांचा रतीब टाकण्यासाठी नेते उपनेते तयार होणारी मुर्दाड संघटना स्थापन होईल. तीची पाळंमुळं खोलवर रुजणारच नाहीत. त्यामुळे विचारांचे मूल्य आणि कृती करणे याची सांगड चालता येत नसेल तर सुधारकांची फौज सुद्धा निकामी होईल. युद्धभूमीवर जाताना जशी तयारी करावी लागते तशीच सखोल तयारी वैचारिक बैठक पक्की करण्यासाठी लागते. क्रिस्टल क्लिअर विचार आणि सुस्पष्ट भाष्यं फार महत्त्वाची. लिसनिंग स्किल पण तेवढंच जिकिरीचे. कारण समोरचा कोणत्या अडचणींतून जात आहे किंवा गेला आहे याची पुरेपूर समज असणं गरजेचं आहे. मी म्हणतो तेच खरं तेच झालं पाहिजे. ही हुकुमशाही झाली. आपलं म्हणणं मान्य नसेल, पटलं नसेल पण सगळ्या विचारांचे प्रवाह टिकेल ती लोकशाही.

विवेकी म्हणजे कोण? आस्तिक नास्तिक अज्ञेयवादी सगळे विवेकी असायला हवेत. मात्र अंधानुकरण करण्यामुळे विवेक शून्य होतो. अंधानुकरण कोणाचेही नको. मग ते आधीच्या पिढीतील सुधारणावादी धोरणी नेतृत्वाचे पण अंधानुकरण घातक. त्यांचा काळ, त्यांच्यावेळची परिस्थिती आणि तत्कालीन साधनं ही नक्कीच बदललेली असणार मग त्यांचेच आंधळे अनुकरण कशासाठी? विचारांच्या पालख्या वाहण्यासाठी आपण तेवढे पाईक आहोत का याची शहानिशा कोण करणार? केवळ पूर्व पुण्याई म्हणून लाभले म्हणून मिरवले असे चालत नाही की नवीन पिढी स्विकारतही नाही. नवीन पिढीला जुन्याच वैचारिक चळवळीत बळजबरीने आणणं आणि नवीन पिढीला वैचारिक चळवळीत जाण आपसुकच वाटण यात फरक आहे. कारण एखाद्या सुविधा उपलब्ध होण्यासाठी एका पिढीला घर्डेघाशी करावी लागते त्याच सुविधा नव्या दमाची पिढी जन्मजात उपभोगते. मग चळवळीत येण्यासाठी अशा नव्या पिढीला आश्वासक वातावरण निर्माण झाले तरच फायदा. नाहीतर तीच जूनी जीर्ण पीढी त्या समस्येसाठी कित्येक दशकं चळवळीत झगडत असेल तर चळवळीचा फायदा कोणाला झाला? जनतेला की प्रस्थापितांना? अशी सगळ्या बाबींचा उहापोह वेळोवेळी झाला पाहिजे. तरच विचारांची उत्पादकता वाढते. नाहीतर नीरसवाणं रहाटगाडगे चालू राहतं चर्चा, मोर्चे, निदर्शने, संघटना, नेते, उपनेते, उपक्रम आणि बैठका. यातून सुटणं शक्य होत नाही. वैचारिक बांधिलकी टिकावी म्हणून नेहमी नवीन पीढीचे प्रश्न, समस्या आणि त्यावर काथ्याकूट करून त्यांच्यासाठी आश्वासक किमान समान कार्यक्रम राबवले गेले पाहिजे. तरच सेंद्रिय संक्रमण होत राहील. नवनवीन विचारप्रवाह नांदतील. 

संघटना स्थापन करणं आणि ती यथार्थपणे चालवणं हे महाकठीण काम आहे. त्यासाठी उर्जावान मनुष्यबळाची गरज असते. ते मनुष्यबळ तरुण रक्ताचं असेल तर संघटन बहरते, व्यापक होते. सकस, चौरस आणि चिकित्सक प्रवाही विचारांची शिकवण मुरते. त्यातून संघटनेचे अंतिम ध्येय, लक्ष्य ठरवणं सोप होतं त्यानंतर त्यासाठी योजनाबद्ध मार्गाक्रमण करणं सहजसाध्य होते. आमची प्रबोधनाची परंपरा फार जुनी आहे वगैरे इतिहासात रममाण होऊन संघटना वाढत नाही. तसा कार्यकर्ता घडवावा लागतो. सुधारकांचा अनुयायी आणि संघटनेचा कार्यकर्ता ह्या दोन वेगळ्या व्यक्ती आहेत. अनुयायी आचरणातून तयार होतो कार्यकर्ते कुशल संघटनेतून. कार्यकर्त्यांसाठी संघटनेचा शिस्तीचा उपक्रम असावा तर अनुयायासाठी सुधारणावाद्यांचा वैचारिक गाभा. ह्या दोन्ही गोष्टी समांतर पणे पुढे जात असतील तरच विचारधारेचा प्रभाव वाढत जातो. अशा परिस्थितीत चळवळ, संघटना, कार्यकर्ते, अनुयायी आणि सामाजिक बांधिलकी ह्या बाबींचा जर पारदर्शकपणे जनतेशी संबंध राहिला तरच सार्वजनिक जीवनात व्यापक प्रभाव राहतो. जेव्हा जनतेमध्ये विचारधारा स्विकारली जाते तेव्हा तीची व्यापकता एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे नकळतपणे संक्रमित होते. त्यासाठी फारसे कष्ट करावे लागत नाहीत ना संघटनेला ना कार्यकर्ते लोकांना ना सुधारणावादी नेतृत्वाला. अशा विचारांना वाहिलेल्या चळवळी मग त्या समतेच्या असो वा अध्यात्मिक, धार्मिक विचारांच्या. त्यांना मिळणारा अवकाश हा उत्तरोत्तर वाढत जातो. अशा संघटना स्थापन झाल्यानंतर त्याची कुशलतेने आखणी, मांडणी आणि प्रभावीपणे प्रसार करणारे समाजाभिमुख अनुयायी फार मोलाचे असतात. त्यांना राजकीय परिप्रेक्षात आणलं तर संघटनेचा वापर राजकीय स्थैर्यासाठी केला जातो. एकदा का राजकीय स्थैर्य प्राप्त झाले की संघटनेत येणारे राजकीय स्वार्थ साधण्यासाठी येतात. अशा लोकांची वैचारिक बांधिलकी तितकीशी तात्विक पातळीवर भक्कम राहत नाही. तर्क आणि कृती ह्या विचारधारेच्या प्रमुख बाजू असतात. राजकीय गंध दरवळला की कृती स्वार्थी अन् तर्क सोयीनुसार होत जातात.

सरतेशेवटी एकच महत्वाचे आहे की सुधारक म्हणून तुम्ही व्यक्तीगत आचरण जर विवेकी ठेवलं अन् संघटनेत राजकीयदृष्ट्या लवचिक वैचारिक पाया घडवला तर प्रभावाची व्याप्ती कालानुरुप आकुंचन पावते. अशा वेळी समविचारी लोकांचं कोंडाळे करून स्वतःच्या उदोउदो चा जाहीर कार्यक्रम साजरा केला जातो. प्रत्यक्षात सार्वजनिक जीवनात दुर्लक्षित राहतात. अशाप्रकारे कित्येक विवेकी चळवळीचा ऱ्हास झाला. काही तगून आहेत तर काही गटांगळ्या खात आहेत. अखेरीस एवढंच नमूद करावेसे वाटते की व्यक्तीगत पातळीवर नास्तिक विवेकी भूमिका घेत इतरांसमोर आदर्श वैचारिक बांधिलकी ठेवावी. भक्कम संघटना नसेल इतरांना आपल्यासारखे बनवण्यासाठी आटापिटा करण्यात काही हशील नाही. संघटनेचे पाठबळ असेल तर मग निष्ठावंत विवेकी अनुयायी तयार करणं आद्यकर्तव्य व्हावे.

लेखनविश्रांती!

© भूषण वर्धेकर 
४ एप्रिल २०२५
पुणे 


नास्तिकतेची वल्कलं

घेऊन निधर्मीवादाचा झेंडा पेटवून इहवादाचा डंका झालाय एकजण नवखा नास्तिक बिथरला पाहून बहुसंख्य आस्तिक कोणता सच्चा धार्मिक यावर करू लागला गहन वि...