एकविसाव्या शतकाची गद्धेपंचवीशी!

एकविसाव्या शतकाची गद्धेपंचवीशी!

एकविसाव्या शतकाची अडीच दशकं सरली. गेल्या पंचवीस वर्षात साहित्य, चित्रपट, नाटक, सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक क्षेत्रात नेमका काय बदल घडला याचा धांडोळा घेण्यासाठी हा लेख. खरंतर राजकीय बाबींवर धांडोळा घ्यायची इच्छा आहे मात्र राजकीय क्षेत्र गेल्या अडीच दशकांत इतकं चिखलाने बरबटलेले आहे की त्यावर कितीही चर्चा करा, कितीही लिहा, कितीही वाद घाला, कितीही रवंथ केले तरी 'परिस्थिती जैसे थे' राहणार आहे. त्यामुळे शक्यतो राजकीय परिप्रेक्ष्यात न पाहता विशेषतः मराठी साहित्य, चित्रपट, नाटक वगैरे या अनुषंगाने लिखाण करायची इच्छा आहे. गेल्या पंचवीस वर्षात मराठी चित्रपट, नाटक आणि साहित्य याविषयी खूप वेगवेगळ्या स्तरातून वेगवेगळ्या टोकाच्या प्रतिक्रिया आलेल्या आहेत. विशेषतः समाज माध्यमातून आपली मते ठोकून देणे हे एक राष्ट्रीय आद्य कर्तव्य आहे आणि हे बजावलंच पाहिजे असा सामाजिक प्रवाह सध्या मजबूत झाला आहे. 


लेखाची सुरुवात करण्यापूर्वी काही गोष्टी नमूद कराव्याशा वाटतात. २००० नंतरच्या काळात जे काही बदलत गेले ते बघणं सगळ्यात जास्त इंटरेस्टिंग आहे. २००० आधी चित्रपट, नाटक, साहित्य वगैरे क्षेत्रात स्वातंत्र्यपूर्व, स्वातंत्र्योत्तर, साठोत्तरी, नव्वदी वगैरे शेलक्या शब्दांत वर्णन करण्यासाठी काहीतरी ऐवज होता. त्यातही पंचवीस वर्षापूर्वी अशी शाब्दिक बिरुदावली बऱ्यापैकी साहित्यात वावरत होती. आज २०२५ सुरू झाले आणि प्री कोरोना आणि पोस्ट कोरोना ही बिरुदावली वाढली. या लेखात गेल्या पंचवीस वर्षांत विशेषतः सिनेमात बरेच बदल झाले. एक पडदा चित्रपटगृह ते मल्टिप्लेक्स. नंतर मोबाईल मध्ये आलेले ओटीटी प्लॅटफॉर्म. त्यामुळे या तीनही माध्यमातून सिनेमानं खूप वेगवेगळे प्रेक्षकवर्ग तयार केले. नाटकाची जी काटकसर करायची सवय होती ती तशीच आहे कारण व्यवसायिक आणि प्रायोगिक रंगभूमी ही अजूनही मध्यमवर्गीय संसार करतात तसाच नाट्यसंसार करत आहेत. ठराविक साच्यातील विषयावर कधीकाळी नाटकं होत असत. गेल्या पंचवीस वर्षांत जूनीच नावाजलेली नाटक नवीन संचात रंगभूमीवर आणली. प्रायोगिक नवनव्या प्रयोगांना गवसणी घालत शहरं, तालुके, गावपातळीवर तगून आहेत. गेल्या पंचवीस वर्षांत मात्र कलाकारांना टिव्ही सिरियल्स, सांस्कृतिक कार्यक्रम, युट्यूबवर, फेसबुकवर रील्स,व्हिडिओ वगैरे मुळं भरपूर एक्स्पोजर मिळाले आहे. ज्यामुळे गुणी कलावंत तर पुढे आलेच. सोबत टाकाऊ माल पण घाऊक प्रमाणावर बाजारात उपलब्ध झाला. चित्रपट क्षेत्रात कधीकाळी फक्त मुंबई, पुणे, कोल्हापूर वगैरे भागांत असणाऱ्या मंडळींना बघायची सवय होती. नंतर मात्र महाराष्ट्रातील खेडोपाड्यातून आलेल्या नट, कलाकार, दिग्दर्शक लोकांनी मराठी भाषेत अस्सल मातीतील विषय, आशय आणि उत्तम मनोरंजन होईल असे प्रयोग केले. गेल्या काही दशकांत केवळ सिनेमाच्या कंपू पुरता मर्यादित असलेले फिल्म्स फेस्टिवल बऱ्याच ठिकाणी सुरू झाले आणि वेगवेगळ्या प्रकारच्या सिनेमांची मेजवानी वगैरे म्हणतात तशी सोय कित्येक ठिकाणच्या लोकांची झाली. जगभरातील सिनेमे कधीकाळी फक्त आणि फक्त अभ्यासक, कलाप्रेमी लोकांना सहजासहजी उपलब्ध होत असत. मात्र सोशल मीडिया मुळं किंवा ओटीटी प्लॅटफॉर्म मुळं सर्वसामान्य जनतेला टिचकीवर उपलब्ध झाले. अर्थातच प्रेक्षकांना नवनवीन प्रयोग, तंत्रज्ञान आणि विषय वगैरेचे पर्याय इतके उपलब्ध आहेत की सिनेमाला प्रेक्षकांपर्यंत पोचावे लागत आहे. भरपूर प्रमाणात पर्याय उपलब्ध असल्याने प्रेक्षकही चुझी झाले आहेत. अर्थातच कंटेंट चांगला असेल तर प्रेक्षक सिनेमा उचलून घेतातच. तसंच साहित्याचे झाले आहे. 


कधीकाळी लायब्ररीत जाऊन पुस्तक वाचणारी एक तरुण पिढी होती. वाचकप्रेमी कुटुंबात पण लायब्ररी सदस्य असायचे. मात्र ऑनलाईन ब्लॉग, पोर्टल, ईबुक्स चा पर्याय उपलब्ध झाल्याने फार नवनवीन विषयावर लिहिले गेले. सोशल मीडियावर चर्चा, वादविवाद झाले. साहित्यात गेल्या दोन दशकभरात सेल्फ हेल्प वरची पुस्तके मराठीत प्रकाशित करण्याची जी टूम आली ती थांबायचं नाव घेईना. तसंही पुस्तके छापायचे प्रमाण पूर्वीपेक्षा अधिक वाढले. कारण तशा संधी मिळत गेल्या नवनवीन प्रकाशन संस्था गावोगावी झाल्याने. कधीकाळी सरकारी सवलती ने छपाईचा कागद मिळाले की बरीचशी पुस्तके प्रकाशित केली जायची. नंतर पुस्तक छपाई हाच व्यवसाय सुरू करण्यासाठी अनेक तरुण, लेखक, तज्ञ नवं तंत्रज्ञान घेऊन पुढे आले. त्याचा नवीन चकचकीत पुस्तकं हाताळण्याचा अनुभव वाढला. कॉफी टेबल बुक सारखी चकचकीत पुस्तकं कधीतरी बघणाऱ्या लोकांना अशा नवीन दमाच्या मंडळींनी नवनवीन प्रयोग करून वेगवेगळ्या विषयांवर पुस्तके उपलब्ध करून दिली. अर्थातच यात साहित्य किती आणि माहितीपर पुस्तके किती हा वादाचा विषय आहे. 


नाटकाची निर्मिती ही पदरमोड करून समाजासाठी काहीतरी देणं लागतो वगैरे म्हणून करणारी मंडळी पुर्वीच्या काळात होतीच होती. सध्या पण आहेतच. मराठी व्यवसायिक नाटकं ही म्हणजे फक्त विनोदी नाटके हे एक उगाचंच ठसवले गेलेले नॅरेटिव्ह कोलमडून पडले. नवनवीन आशय, विषय घेऊन प्रायोगिक असो वा व्यवसायिक नाटकं वाढली. प्रेक्षकांना भावली. मात्र नागरीकरण जसे वाढले तसे उपलब्ध नाट्यगृह वाढली नाहीत. जी होती, आहेत आणि नवीन झालेली केवळ सरकारी बजेट मध्ये तरतूद केली म्हणून झाली. याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रात जिल्हा पातळीवर जी नाट्यगृह आहेत तिथल्याच लोकांपर्यंत नवनवी प्रयोग पोचले. तालुका पातळीवर नाटक केवळ स्पर्धा, संमेलने, सांस्कृतिक कार्यक्रम आणि इव्हेंटबाजी याचाच आधार घ्यावा लागला. व्यावसायिक नाटकांनी मात्र गेल्या पंचवीस वर्षात नवीन प्रेक्षकवर्ग तयार केला. शिवाय नाट्य, चित्रपट आणि माध्यमांशी निगडित शैक्षणिक व्यवस्था, वेगवेगळ्या संस्था आणि वर्कशॉप्स वाढल्याने प्रोफेशनल ऍटिट्यूड वाढला. ही खूप जमेची बाजू. प्रशिक्षण घेऊन आलेल्या नव्या दमाच्या मंडळींनी नाटक असो वा सिनेमा करताना फक्त स्वतःचं जगणं मांडले नाही तर नवनवीन ग्रहण केलेले सादर केले. उदाहरणार्थ परदेशी चित्रपटाचे विषय आपल्या मातीत कसे होतील याचा विचार केला. असे प्रयोग प्रेक्षकांना आकर्षित करतात. एकेकाळी परदेशी चित्रपट बघणं म्हणजे ठराविक वर्गातील लोकांना सहज शक्य होते. त्याची व्याप्ती वाढल्याने प्रेक्षक सिनेमा केवळ निखळ मनोरंजनासाठी न बघता चिकित्सा करण्यासाठी बघू लागला. त्यात जातीपातीच्या चष्म्यातून बघणाऱ्या लोकांना जास्त संधी मिळाली. तसंही तिकडचं साहित्य, सिनेमा कसा कसदार, कलात्मक वगैरे असतात अन् इकडचं सगळंच भोंगळ अन् रटाळ बोलणारे त्याकाळी पण होते. आताशा त्यांना मतं ठोकून द्यायला रान मोकळं मिळाले आहे. आम्ही कसे अभिरुची संपन्न वगैरे आहोत याचा टेंभा मिरवणारे असतातच. 


बायोपिक सिनेमा विषयी मात्र बरीच उलथापालथ झाली आहे. २००१ साली आलेल्या अमोल पालेकर यांच्या ध्यासपर्व ने चरित्रविषयक चित्रपटाची एक उत्कृष्ट सुरुवात केली होती. नंतर मराठी भाषेत कलात्मक वगैरे फक्त फेस्टिव्हलमध्ये जाणारे सिनेमे लोकांना विशेष आवडू लागले. तसा हुकुमी प्रेक्षकवर्ग तयार होऊ लागला. एकूणच व्यावसायिक गणिते आणि सिनेमाच्या बजेटचा वाढता आलेख पाहता नवनवीन प्रयोग होऊ लागले. हे स्वागतार्ह. सर्वात जबरदस्त बदलली ती मराठी सिनेमाची दृश्यप्रतिमा. सिनेमॅटिक फ्रेम म्हणूया! उंची निर्मितीमुल्ये, आधुनिक कॅमेरा आणि इतर बदललेल्या तांत्रिक गोष्टींमुळं सिनेमा देखणा झाला. तीच गत सिरियल्स ची. कमी प्रमाणात होणाऱ्या मराठी सिरियल्स नंतर नवनवीन चॅनल आल्यानंतर धोधो वाहू लागल्या. उत्तम कथानक, दिग्दर्शन आणि लगेच संपणाऱ्या सिरियल्सचा प्रेक्षकवर्ग वाढला. मात्र टीआरपी मिळतो म्हणून चॅनल वालेच ठरवू लागले की काय अन् कसं दाखवायचे तेव्हा या सिरियल्स वगैरे या फक्त रतीब टाकण्याचा धंदा झाला. पालीला ओढूनताणून मगर दाखवायचा हा प्रकार! कथानक म्हणजे कळशीभर पाणी टाकून वाढवलेली पाचकळ आमटी. अशा एकसे बढकर एक डेली सोप ने गेली दोन दशकं घुसळून निघाली. मात्र या सिरियल्स वगैरे मुळं गावागावांतील कलाकार मंडळींना फुटेज मिळाले हे पथ्यावर पडलं. त्यामुळे घरातल्या टिव्हीवर चकाचक गावं दिसू लागली. यातच गावोगावच्या लोकांना आकर्षित करण्यासाठी देवदेवतांच्या कथा, संत, स्वामी, अध्यात्मिक बाबा-बुवा, ऐतिहासिक पात्रे वगैरे मान्यवरांच्या गोष्टी सिरियल्सच्या माध्यमातून घरोघरी पोचल्या. त्यामुळे एक वेगळीच धंदेवाईक इंडस्ट्री तयार झाली. अशा सगळ्या गोष्टींचा प्रभाव नकळतपणे महाराष्ट्रात बहुसंख्य असणाऱ्या बहुजनांवर पडला. कारण एक उगाचंच पसरवलेलं मिथक होतं कलाक्षेत्रात फक्त आणि फक्त भटबामणांचा बोलबाला आहे म्हणून. त्याला फाटा मिळाला गेल्या दोन दशकांत बदललेल्या टिव्ही इंडस्ट्रीमुळे.


सांस्कृतिक क्षेत्रात गेल्या दशकभरात बदललेले समाजजीवन हे इव्हेंटबाजी मुळं सुटल्या सारखं झालं आहे. या इव्हेंट मॅनेजमेंट ने संमेलनं, भाषणं, व्याख्यानं, नाचगाणी वगैरेचे करमणुकीचे कार्यक्रम आणि हुल्लडबाजीचे बरबटलेले महोत्सव वगैरे गावागावांत पोचविले. त्यात राजकीय हस्तक्षेप झाल्याने सामाजिक जाणिवा रुंद होण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रम सादर होतात वगैरे हे ब्रीद धुळीस मिळाले. शहरातील मोकाट वाढलेल्या युवा नेत्यांनी शहराचे विद्रुपीकरण तर केलंच. शिवाय गावोगावच्या माननीय पुढाऱ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात जो थिल्लरपणा सुरू केला त्याला आता आवर घातला जावू शकत नाही. भारतात सणासुदीचा एक वेगळाच बारमाही माहौल असतो. त्यात भरकटलेल्या उत्सवी, महोत्सवी उन्मादाला पारावर उरला नाही. ना सामाजिक जाणीव राहिली ना सणांचं पावित्र्य. त्यामुळे एक बटबटीत नकोशी संस्कृती आली. ती लादली गेली का हा चर्चेचा विषय आहे. कधीकाळी असे सांस्कृतिक कार्यक्रम वगैरे लोकवर्गणीतून होत असत. राजकीय आकांक्षा वाढल्याने पैसा ओतला जाऊ लागला आणि लोकांना नकोशी वाटणारी सांस्कृतिक मुस्कटदाबी वाढली. यावर आता जनजागृती वगैरे करणं दुरापास्त झाले आहे. अशा सांस्कृतिक क्षेत्रात बोकाळलेल्या अनिष्ट प्रथा जरी असल्या तरी लोकसहभागातून बरीच दुर्लक्षित राहिलेल्या उत्तम कार्यक्रमांना मेन स्ट्रीट मध्ये म्हणावं तसं फुटेज मिळाले नाही. राजकीय हस्तक्षेप झाला की माती होते तर लोकसहभागातून जर कार्यक्रम झाला तर त्याचा किमान पातळीवर मर्यादित प्रभाव दिसतो.


सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात गेल्या दोन दशकांत एक हायली प्रोफेशनल इव्हेंट संस्कृती आली. पूर्वी एखाद्या कार्यक्रमाचे आयोजन, नियोजन केले जात असे. आताशा इव्हेंट सेलेब्रेट होतो. अर्थातच धंदेवाईक आणि व्यावसायिक यात जमीन अस्मानी फरक आहे. 
कारण एखादा इव्हेंट कमर्शियली सक्सेसफुल झाला तर त्यावर बऱ्याच लोकांची उपजीविका चालते. एका बाबतीत नव्या पिढीला प्रोफेशनल अवेअरनेस खूप आहे हे जाणवतं. विशेषतः आर्थिक बाबतीत बरेच नवनवीन पर्याय उपलब्ध असल्याने चोखंदळ पणा जाणवतो. त्याचाच परिपाक म्हणून हा प्रोफेशनल अवेअरनेस वाढलेला असावा. तशीच कट थ्रोट स्पर्धा पण आहे टिकून राहण्यासाठी हे ही कारण असावे. कलाक्षेत्रातील संधी मिळणं आणि मिळालेली संधी वापरून स्वतःचं मार्केटिंग करणे हे जबरदस्त फॅक्सिनेटिंग आहे. याचा एकत्रित गोळीबंद परिणाम सुरुवातीला फक्त शहरी भागात जाणवत होता. आताशा तो गावपातळीवर पोचला आहे असं जाणवतं. कारण सांस्कृतिक वगैरे वगैरे छत्राखाली आज गावपातळीवरील कित्येक कलाकार, गट-तट बऱ्यापैकी आत्मविश्वासाने वावरताना दिसतात. कधीकाळी सिल्व्हर स्क्रीन किंवा टेलिव्हिजन ही प्रमुख दोन माध्यमातून जनतेपर्यंत पोचता येत होतं. मात्र सोशल मीडिया साधनं मुबलक प्रमाणात उपलब्ध झाल्या मुळे कित्येक नवनवीन रोजगाराच्या संधी सांस्कृतिक क्षेत्रात तयार झाला. अर्थातच दुसरी काळी बाजू शोषणाची वाढली हे खेदाने म्हणावे लागते. त्यात कंपू संस्कृती जी केवळ ठराविक लोकांपर्यंत मर्यादित होती ती आता सर्वसामान्य जनतेला पण दिसू लागली आहे. 


गेल्या पंचवीस वर्षात रिऍलिटी शो ने एकूणच सांस्कृतिक क्षेत्रातील कलाविषयक अभिरुची बथ्थड झाली आहे. कारण जे विकलं जातं ते खपवलं जातं. या आधीही हवशे नवशे गवशे वगैरे मंडळी होती. पण रिऍलिटी शोमधून त्यांना नको इतका मोठा कॅनव्हास मिळाला. त्यामुळे हेच खरं सांस्कृतिक कलासक्त जग आहे हे बिंबविलं गेले. काला क्षेत्रात सिद्ध होण्यासाठी आवश्यक असलेली किंवा मेहनतीने मिळवलेली पात्रता, कलेबद्दल असलेली आत्मीयता, रियाज, तपश्चर्या आणि सर्जनशील जाणीवा ह्या बरबटल्या. याचं कारण म्हणजे रिऍलिटी शो सारख्या कार्यक्रमामुळे स्पॉन्सर्ड, प्रॉक्टर्ड, स्क्रिप्टेड मालमसाला युक्त बारमाही रतीब टाकला जाऊ लागला. ह्या रिऍलिटी शोमुळे जे जे होतकरू तरुण होते ते तर भरडले गेलेच. पण नवनिर्मिती करण्याची प्राज्ञा असणारी मंडळी खपाऊ माल विकू लागल्या. त्यामुळे क्रिएटिव्हिटी वगैरे फक्त उत्कृष्ट कॉपी पेस्ट जो करेल त्याची ही संकुचित वृत्ती उदयास आली. कलाक्षेत्रातील संधी विस्तारल्या खऱ्या अर्थाने. पण अंधानुकरण करणाऱ्या लोकांचा बोलबाला झाला. जे काही वेगळं करू पाहतात त्यांना फुटेज मर्यादित मिळाले. याचा परिपाक म्हणजे पीआर एजंट संस्कृती तयार झाली. त्यामुळे कलाक्षेत्रात जे जे तयार होत होतं त्याचा भडीमार केला जाऊ लागला. त्यात भर पडली सोशल मीडिया साधनांची. मग कहर झाला. लोकांच्या अटेंशन स्पॅन मध्ये काहीही करून आपण आलो पाहीजेत. हाच इथल्या बाजाराचा नवा नियम झाला. कधीकाळी कलेसाठी जनता आसुसलेली असायची. नवीन सिनेमा,नाटक, गाणं बजावणं वगैरे गोष्टींची आतुरतेने वाट बघणारी एक पिढी होती. कलेचे साधक जसे होते तसे कलेविषयी आपुलकी असणारे कलाप्रेमी होते. कारण तुरळकच अशा सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल होत असे. आता मात्र भव्यदिव्य इव्हेंट सेलेब्रेट करण्यात येत असल्याने तादात्म्य हरवलं आहे. एवढ्या गदारोळात खऱ्या अर्थाने कलेसाठी धडपडतात ते जशी संधी मिळेल तशी कला जोपासतात. चांगला प्लॅटफॉर्म मिळाला तर प्रेक्षकांची वाहवा मिळवतात. 


सामाजिक बदल काय झाले त्याविषयी बोलू. सर्वात महत्त्वाचे बदल झाले ते मोठ्या प्रमाणावर स्थलांतर झाले म्हणून. ते नोकरी, शिक्षणासाठी सर्वाधिक झाले. अर्थातच जागतिकीकरणाचे सगळे फायदे तोटे आपल्याला या पंचवीस वर्षात समजले. या काळात सर्वात स्वागतार्ह बाब लक्षात घेता येईल ती म्हणजे स्त्री घराबाहेर पडली. नोकरीसाठी, शिक्षणासाठी. त्यामुळे ती पुढारली. पंचवीस वर्षापूर्वी तर नोकरदार स्त्रिया बाबतीत आकडेवारी बघितली तर लक्षात येईल की सरकारी नोकरी मध्ये आणि पारंपरिक शिक्षणासाठी घराबाहेर पडणारी स्त्रीयांची संख्या तुलनेने कमी होती. मात्र गेल्या दोन दशकांत खूप मोठ्या ग्रामीण भागातील स्त्रिया नोकरी निमित्ताने, शिक्षणासाठी घराबाहेर पडल्या. स्वावलंबी झाल्या. एक प्रकारे सो कॉल्ड पुरुषप्रधान संस्कृतीला फाट्यावर मारत कित्येकींनी घरादाराची जबाबदारी संपूर्णपणे पेलली. वेगवेगळ्या स्तरातून येत अनेक क्षेत्रांत दखल घेण्याजोगी कामगिरी बजावली. स्वतःचं म्हणणं आत्मविश्वासाने मांडले. कित्येक सामाजिक पुचाट रुढी, प्रथा, परंपरा झिडकारल्या. बंडखोर स्त्री ही समाजाला समजली. अर्थातच अशाने अनेक संस्कृती रक्षकांना लागलीच कुटुंबव्यवस्था बाधित होण्यामागे पुढारलेली स्त्रीच दिसू लागली. कारण त्यांना संकुचित विचार सिद्ध करण्यासाठी हेच आयतं कोलित मिळते. मात्र स्त्री घराबाहेर पडली आणि विचाराने, शिक्षणाने पुढारली की नकळतपणे कुटुंब आणि समाज वेगळ्या दृष्टिकोनातून बदलतो. परंपरागत साचलेपण झिडकारता येतो. याचा परिणाम हा पुढच्या पिढ्यांना झाला. कारण शिकलेल्या स्त्रीच्या कुटुंबात एक प्रकारची आधुनिकता असते. निर्णय घेण्याची, कारभार चालवण्यासाठी आवश्यक असलेली सदसद्विवेकबुद्धी आणि आत्मनिर्भरता नकळतपणे स्त्री पुढच्या पिढीला हस्तांतरित करते. पुरुषप्रधान संस्कृतीत ही दुर्लक्षित राहिलेली गोष्ट होती. गेल्या दोन दशकांत मात्र स्त्री ही स्वतःच्या पायावर उभी राहिली आणि स्वतःच्या विचारांना प्राधान्य देऊ लागली. अजूनही एक भाबडा समज पसरवला गेला की स्त्री घराबाहेर पडली की स्वैराचार वाढतो. मुळातच पुरुषी स्वैराचाराला झाकण्यासाठी आधुनिक स्त्रीला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. एखाद्या कुटुंबात निर्णय घेण्याची कधीकाळी पुरुषांच्या मक्तेदारीला आव्हान या पंचवीस वर्षात मिळाले. हाच सामाजिक महत्वाचा बदल नव्या पिढीने स्विकारला. अर्थातच ह्याच काळात अनेक स्त्रियांनी व्हिक्टीम कार्डचा वापर केला हे नाकारता येणार नाही. त्यामुळे ढासळलेल्या लग्नसंस्था, कुटुंबसंस्था असो वा नातेसंबंध याला जबाबदार फक्त आणि फक्त पुढारलेली स्त्रीच असते असे नालायक अनुमान काढणे विकृतीचे लक्षण आहे. मुळातच लग्नसंस्था, कुटुंबसंस्था वा परस्पर नातेसंबंध ह्या गोष्टी वेगळ्या दृष्टिकोनातून बघितल्या पाहिजेत. विश्वास, गरजा, अवास्तव अपेक्षा आणि भावनिक आधार या बाबींवर खंडन मंडन झाले पाहिजे. प्रमाण वाढले म्हणून स्त्री ला जबाबदार धरणं कृतघ्नपणा आहे. लोकसंख्या वाढली की त्याचं प्रमाणात इतर गोष्टी वाढणारच. संस्कृती वाहक पुरुषामुळे आणि खराब झाली तर स्त्रीमुळे हे बैल बुद्धी लॉजिक आहे. अर्थातच नवीन तरुण पिढी ह्या सगळ्या संस्कृती विषयक सक्तीच्या बंधनांना फाट्यावर मारते. बंडखोरी करते हे खूप महत्त्वाचे. संस्कृती बंडखोरीमुळे बहरते. वाढते. डबक्यात साठलेले पाणी आणि वाहणारे पाणी तशीच संस्कृती, सभ्यता बघायला हवी. नवनवीन गोष्टी स्विकारण्याची, जोपासण्याची सुपीकता जर समाजात नसेल संस्कृतीत नसेल तर सामाजिक पतन ठरलेले असते.


सध्या मिलेनियल म्हणून जी पिढी आहे, क्रयशक्ती वाढलेली ती फार प्रिव्हिलेज्ड आहे. त्यामुळे त्यांची मानसिकता ही बुरसटलेली नाही. नवं स्विकारण्याची आणि बोथट रूढी परंपरा झिडकारून पुढे जाण्याची त्यांची मानसिक तयारी फार महत्त्वाची. कारण सर्वात जास्त व्यक्त होण्याची साधनं ह्यांना उपलब्ध आहेत. जगण्याकडे बघायचा वेगळा दृष्टिकोन आहे. त्यामुळे ही एकविसाव्या शतकातील स्वागतार्ह बाब आहे. शिवाय हल्ली नातेसंबंधात डेटिंग, लिव्ह-इन, डिंक्स (डबल इन्कम नो किड्स) सिच्युएशनशिप, बेंचिंग आणि नॅनोशिप सारखे तत्सम प्रवाह अंगवळणी पडले आहेत. त्यामुळे काय चूक काय बरोबर यावर काथ्याकूट न करता नवीन सामाजिक बदल म्हणून बऱ्यापैकी अंगवळणी पडले आहेत. अर्थातच हे जास्त जाणवतं शहरी भागात. कारण अस्ताव्यस्त नागरीकरणामुळे तुटले पणा जास्त जाणवतो. त्यात व्यसनं, सवयी वगैरे कवटाळल्या जातात. ह्या नव्या बदलांना ही तरुण पिढी गेल्या दशकभरात रुळली आहे. नवीन पिढीला जे काही जागतिक पातळीवर घडतं त्याचे अपडेट्स लागलीच समजतात. त्यामुळे त्यावर रिस्पॉन्स कमी रिऍक्शन्स जास्त येतात. तसंही सोशल मीडियामुळे इम्पलसिव्ह रिऍक्टिव्ह ऍग्रेशन ग्रस्त पिढी वाढू लागली. असंतुलित गोष्टी इतक्या वेगाने आदळत असल्याने शांतपणे विचार करून एखाद्या गोष्टीची शहानिशा न करता मत ठोकून देणे म्हणजे आद्य राष्ट्रीय कर्तव्य झाले आहे. त्यात फेक न्यूज, अफवा, सिलेक्टिव्ह पावित्रा आणि स्युडो नॅरेटिव्ह ने वातावरण दुषित झाले आहे. अशा सगळ्या कसोट्यांवर सामाजिक जाणीव कमी आक्रस्ताळेपणा वाढला आहे.


आर्थिक बाबतीत मात्र या पंचवीस वर्षात न भूतो न भविष्याति बदलांचा सुकाळ आला आहे. पारंपारिक रोजगाराच्या आधारावर पैसा कमावणे हे या दोन दशकांत मागं पडलं आहे. नवनवीन प्रयोग करून तंत्रज्ञान वापरून नवी पिढी अर्थ साक्षर झाली आहे. पैसा , वेळ आणि उत्पादकता वगैरे मुलभूत गोष्टींचं इकॉनॉमिक्स चांगले समजू लागले आहे. पैसा कमावण्यासाठी, पॅशन पूर्ण करण्यासाठी धडपड, नवनवीन रोजगाराच्या संधी, व्यवसाय, स्टार्ट अप, प्रोफेशनल कन्सल्टिंग वगैरे सारख्या नवनव्या चोखंदळ वाटा शोधून पुढं जाणारी पिढी आहे ही. त्यामुळे प्राथमिक, कौटुंबिक गरजा पूर्ण करण्यासाठी पैसा कमावणारी एक पिढी होती. ती जूनी पिढी गुलामी पत्करुन राबणारी होती. बॉसिंग सहन करणारी होती. बहुतेक ही पिढी एक्सटर्नली ड्रिव्हन होती. नवीन पिढी इंटरनली ड्रिव्हन आहे. तरुण पिढीला पैसा कमावणे हे स्कील बेस्ड आहे हे समजलंय. त्यामुळे वयाची किमान काही दशकं नोकरी करून गुलामी पत्करुन जगणं मान्य नसलेली ही पिढी आहे. त्यामुळे स्थलांतर करून नवनवे मार्ग शोधणारी, धडपडणारी, आवडलं नाही तर मन मारत न कुढता नवीन पर्याय अंगिकारणारी नवीन पिढी आहे. आर्थिक बाबतीत सर्वात जास्त हुशार असलेली ही पिढी. पैसा फक्त जगण्यासाठी न कमावता वेल्थ, ऍसेट तयार करण्यासाठी कसा वापरता येईल ह्याचा प्रामुख्याने विचार करणारी पिढी आहे. त्यामुळे रोजगार म्हणजे तीस पस्तीस वर्षे नोकरी ही रुळलेली संस्कृती या दोन दशकांत नव्या दमाच्या तरुणांनी हाणून पाडली आहे. हा बदल सर्वस्वी महत्त्वाचा. हीच परिस्थिती ग्रामीण भागातील शेती क्षेत्रातील आहे. नवनवीन प्रयोग करणारी नवीन पिढी नवं तंत्रज्ञान विकसित करत वापरत काहीतरी करु पाहत आहे. ग्रामीण भागातून शहरी कनेक्ट वाढवत आहेत. तरीही शेती क्षेत्रात अजून बरेचसे बदल सरकारी कृपेमुळे होत आहेत. खाजगीकरण उदारीकरण जसं झाले उद्योगधंद्यात, कारखानदारी मध्ये, तसे कृषी क्षेत्रात कमी झाले. राजकीय आशिर्वादाने गुलाम असलेली एक शेतकऱ्यांची पिढी होती. जिने खूप मोठा अन्याय सहन केला. मात्र नवी पिढी नवनवीन बदल स्विकारत काहीतरी करु पाहत आहे. उद्यमी होत आहे. शेतीच्या कामासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे. सरकार दरबारी असलेल्या मदतीशिवाय खाजगी मदत घेऊन उत्पादकता वाढविण्यासाठी प्रयत्न करत आहे. बदलांचे प्रमाण कमी असले तरी बदल होत आहेत. पारंपारिक शेती उद्योग काय टाकत आहेत हे महत्त्वाचे. हेच बदल देशातील अर्थव्यवस्थेत अमुलाग्र घडामोडीसाठी आवश्यक आहेत. कारण कृषीप्रधान देश म्हणून आपण ओळखले जातो.


सरतेशेवटी एवढं सगळं मांडल्यानंतर लक्षात येतं की, आज २०२५ मध्ये जी काही उरलीसुरली वय वर्षे ८० पार केलेली जागरूक मंडळी आहेत (कोरोनाच्या तडाख्यातून वाचलेली) त्यांनी खूप मोठी स्थित्यंतरे बघितली आहेत. स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळात जे घडलं ते अनुभवलं आहे. त्याच पिढीने नव्वदच्या दशकात ऐन चाळीशीत वेगाने होणारे बदल रिचवले आहेत. आज २०२५ मध्ये अतिशय वेगाने आणि आक्रस्ताळेपणा असलेल्या बदलांना पण सहन केले आहे. मुळातच वयाच्या या टप्प्यावर ह्या मंडळींनी जेवढा बदलणाऱ्या काळाचा पट अनुभवला आहे तो फारच मजेशीर आहे. संख्यात्मक आकडेवारी खूप कमी असेल या पिढीतल्या लोकांची. मात्र साहित्य, चित्रपट आणि नाटक या क्षेत्रात घडलेल्या बदलांचा आवाका मोठा आहे. थोडक्यात यांनी पचवलं खूप काही पण जे योगदान दिले ते लोकांपर्यंत पोचण्यासाठी खूप मोठा कालावधी लागला. तसा कालावधी नंतरच्या पिढीला कमी मिळत गेला. उदाहरणार्थ २०२५ मध्ये साठी पार केलेली एक पिढी जी बहुसंख्य सरकारी किंवा निमसरकारी नोकरी मध्ये जोपासली तर चाळीशीत असणारी पिढी बहुतेक खाजगीकरण उदारीकरण वगैरे मुळं मिळालेल्या संधी जोपासणारी आहे. जी पिढी विशीत आहे तीला मात्र एक नवं कल्चर लाभलं आहे. त्यामुळे साठी पार केलेली एक पिढी हळूहळू युझ्ड टू झाली नवनवीन बदलांना. त्यापेक्षा जास्त पर्याय नसल्याने चाळीशीत वावरणाऱ्या पिढीला नवे बदल आत्मसात करण्याशिवाय गत्यंतर नव्हते. आता विशीतील्या पिढीला गायडेड मिसाईल प्रमाणे पुढे जावं लागणार आहे. अनगायडेड मिसाईल अनकंट्रोल होते त्याच पद्धतीने विशीतल्या पिढीला वापरण्यासाठी अनेक सुप्त धष्टपुष्ट व्यवस्था टपून बसलेल्या आहेत. भविष्यात ही गद्धेपंचवीशी (गद्देपंचवीशी?) संपल्यावर काय होणार हे बघणं औत्सुक्याचे आहे.

तूर्तास एवढेच.

लेखन विश्रांती!


©भूषण वर्धेकर 
५ जानेवारी २०२५
पुणे - ४१२११५

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बदलत जाणारे जनमानस

मराठा आरक्षण आणि वास्तव

'छावा'च्या निमित्ताने...