अराजकीय सरकॅझम लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
अराजकीय सरकॅझम लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, ३ एप्रिल, २०२६

धुरंधर - एक पुरोगामी चिकित्सा

 धुरंधर - एक पुरोगामी चिकित्सा 


आदित्य धर लिखित-दिग्दर्शित-निर्मित धुरंधर चित्रपट ही अनेकार्थाने प्रोपागंडा फिल्म आहे. तब्बल अडीच दशकांचा कलावधी केवळ साडे सात, आठ तासात - दोन भागात खपवला आहे. ही निव्वळ भोळ्या भाबड्या जनतेची फसवणूक असून त्याकडे अल्पसंख्याक विरोधात असंतोषाचे वातावरण निर्माण करणारी कलाकृती म्हणून पाहिले पाहिजे. पवित्र इस्लाम धर्म हा शांततेचे प्रतिक आहे. त्यासाठी अतिपवित्र जिहाद आजपावेतो कार्यरत आहे. गेली कैक शतके पवित्र जिहादी शिकवण जनसामान्य जनतेत रूजवण्यासाठी प्रसंगी किरकोळ हिंसा, फिदाईन ॲटॅक वगैरे करणे अनिवार्य होते. पण चक्क धुरंधर सारख्या प्रोपागंडा फिल्म मध्ये हे जिहादी कार्य दुष्कृत्य म्हणून हिणवले जाते हे मानवतेला धरून नाही. पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाची बालवाडी, प्राथमिक शाळा आणि महाविद्यालये ही जगाला दिलेली देणगी आहे. यातून बाहेर पडणाऱ्या तडफदार तरुणांना जर ऑन जॉब ट्रेनिंग देण्यासाठी छोटे मोठे बॉम्बस्फोट घडवण्यासाठी भारतात पाठवले तर पोटशूळ दुखण्याचे कारणच काय? बिचारे बापुडे अतिरेकी कबाडकष्ट करून जीवाची पर्वा न करता प्रसंगी धारातीर्थी पडतात. त्यांची ही शहादत सामाजिक एकोप्यासाठी प्रेरणादायी आहे. कोण कुठला सळसळत्या रक्ताचा तरूण सत्तरावर दोन बहाहत्तर सुंदऱ्यांचा उपभोग घेण्यासाठी जंग जंग पछाडतो. काहीही करून वैश्विक एकात्मिक शांततेसाठी मृत्यूला भिडतो. याला टुकार हिंदुत्ववादी मानवतेविरोधी घटना सांगतात. निर्घृण हल्ला संबोधतात. दहशतवाद्यांच्या कार्याला देशद्रोही ठरवताना लाजा कशा वाटत नाहीत. धुरंधर पूर्वार्ध आणि उत्तरार्ध पाहून तळपायाची तिडिक मस्तकात जाते. कसाला हिंसक आणि प्रोपागंडा सिनेमा आहे हा. असे सिनेमे फक्त आणि फक्त पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या परमोच्च कृत्यांना जगभरात बदनाम करण्यासाठी काढले जातात. 


गेल्या वीस वर्षात ज्या गोष्टी किंवा बातम्या ऐकल्या/पाहिल्या असतील त्यामागचा माहिती नसलेला भाग सिनेमात आहे. पाकिस्तान कसे बकवास आहे आणि दहशतवादाला खतपाणी घालणारा आहे हे दाखवले आहे. हे करण्याची सिनेमॅटिक लिबर्टी दिली कुणी? हे संविधानाच्या विरोधात आहे. व्यक्तिस्वातंत्र्याचा कैवार घेऊन तुम्ही एखाद्या गरीब देशाच्या गरीब औद्योगिक क्षेत्राला बदनाम करण्याचा वैश्विक कट रचला आहे. याला सर्वस्वी जबाबदार समकालीन हिंदुत्ववादी संघटना आणि सरकार आहे. दहशतवादाची मोडस ऑपरेंडी सिल्व्हर स्क्रीनवर दाखवून काय साध्य होणार आहे? कैक वर्षे बॉलिवूड नामक चित्रपटसृष्टीत गंग जमुना तहजीबचे बाळकडू पाजले जात होते ते एकाएकी धुळीस मिळवले जातेय हा निव्वळ करंटेपणा आहे. (अवांतर- खरंतर गंगा जमुना तहजीब भारतातील तमाम पुरोगाम्यांनी शिया सुन्नी पंथीय बांधवांना शिकवायची गरज आहे. अहाहा! यात जर यशस्वी झाले तर मध्य पूर्वेतील अशांतता कायमस्वरूपी नष्ट होईल… असो…) अशात धुरंधर सारख्या चित्रपटात पाकिस्तान स्थित दहशतवाद्यांच्या, गुन्हेगारांच्या कारनाम्यांची मालिका दाखवली जाते. हे सेक्युलर समाजासाठी अत्यंत घातक आहे.  सिनेमॅटिक लिबर्टीचा किती तो अतिरेक! 


आजपर्यंत आजवर अनेक हिंदी चित्रपट भारतीय समाजमन घडवत होते. कैक सिनेमे मानवतेचे उपदेश देऊन सामाजिक बांधिलकी, जाणीवा वाढवत होते. कितीतरी राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त सिनेमांनी समतेच्या कक्षा रूंदावल्या. भारतीय जनमानसात विषमता वाढवण्यासाठी धुरंधर सारखे सिनेमे तयार केले जात आहेत. हा या लोकशाहीवादी देशाचा अपमान आहे. कोण कुठला पंजाबी मुंडा धडाधड गोळीबार करून कोण्या एका स्वच्छ चारित्र्याच्या आमदाराच्या कुटुंबातील पुरूषांना वेचून वेचून ठार करतो. कारण काय तर त्याच्या कुटुंबाला किरकोळ छळ सहन करावा लागला म्हणून. हे काही बरोबर नाही. गांधीच्या देशात अशी हिंसा! हे नितिमत्तेला धरुन नाही. यावरची कडी म्हणजे अंडरकव्हर एजंट म्हणून त्याला पवित्रभूमी पाकिस्तानात पाठवले जाते गुंड होण्यासाठी. मग गल्लीगुंड, गावगुंड शहरीगुंड ते सरकार पुरस्कृत राष्ट्रीय गुंड असा प्रवास करून अननोन मेन ला नेम धरून गोळ्या झाडण्यासाठी फ्री हॅंड मिळवतो. ही कसली दळभद्री कथा? या कथेत कुठेच समता बंधुता एकात्मता दिसत नाही. कोण तो सुक्काळीचा हमजा मारून गमजा “कराची की प्यारी ल्यारी” चा बाजार उठवतो हे सद्सद्विवेक बुद्धीला पटणारे तरी आहे काय? आपल्या देशात काय चालू आहे त्यावर चर्चा करायला नको म्हणून असे सरकारी आशीर्वादाने सिनेमे दाखवले जातात. बेरोजगारी, गरीबी असूनही असे सिनेमे हजारो करोड रुपयांची उलाढाल करतात म्हणजे काय? ही कसली नैतिकता? सामाजिक वीण टराटरा अन् फराफरा फाडली जाते असे सिनेमे पाहिल्यावर. कसला तो जल्लोष सुरु आहे धुरंधर वरून? अननोन मेन म्हणे! कोणत्याही भारतीय एजन्सी ने अननोन मेन आमचेच धुरंधर आहेत म्हणून अधिकृतपणे पुष्टी केलेली नाही. नरिंदर चा दलिंदर सिनेमा म्हणजे धुरंधर. एक नंबरचा वाह्यात सिनेमा आहे. कोण तो बिचारा आतिक अहमद युपीवाला आय एस आय चा हस्तक म्हणून दाखवलाय सिनेमात. मति भ्रष्ट झाली आहे की काय? सेक्युलर भारताचा कणा ताठ रहावा म्हणून धडपडणारा कुशल संघटक आतिक अहमद. गोरगरीब अशिक्षित कमी शिक्षित तरूणांना नशील्या पदार्थाच्या डिलिवरी बॉय म्हणून नोकऱ्या देणारा मसीहा म्हणजे आतिक अहमद. त्याला ऑन कॅमेरा मारल्याचे संदर्भ दाखवून धुरंधर ने नेमके काय साधले? नोव्हेंबर २००८ साली मुंबईतील हल्ला हा विश्वविद्यालयातून स्नातकोत्तर प्रमाणपत्र प्राप्त झाल्यावर शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेऊन अतिरेकी कारवायांच्या ॲपरेंटशीप साठी आलेले भटके हुए जवानांचा डिप्लॉयमेंट प्रोजेक्ट होता. बिचारी तरुण पोरंटोरं ड्रायफुट्स खाऊन एकेफोर्टी सेव्हन मधून गोळ्या झाडून भारतीयांवर टेस्टिंग करत होती. ते पाकिस्तानी प्रदीर्घ अनुभव असणारे प्रबंधक २४x७ डोळ्यात तेल घालून लक्षपूर्वक सगळ्या घडामोडींवर देखरेख ठेवत होते. गो लाईव्ह असा प्रशिक्षणार्थींच्या सी आय सी डी पाईप लाईन प्रोजेक्टला तुम्ही अतिरेकी कारवाई म्हणून पदाखवता? कुठे फेडाल ही पापे! असे पेरून ठेवलेले संदर्भ घेऊन धुरंधर अंगावर काटा येईल असा करण्याचा हेतू नक्कीच वाईट आहे.  मुळात अतिरेकी हे प्रेमळ असतात. जिहाद म्हणून ते समोरच्या व्यक्तीवर गोळ्या झाडतात, बॉम्बने उडवतात. प्राणाची आहुती देतात. अशा निरागस लोकांना निस्वार्थी सेवाकार्य करण्यासाठी मदत केली पाहिजे. आपली न्यायव्यवस्था फासावर लटकवते? हे कोणत्या गुडबुक मध्ये बसतं? 


नोटबंदी सारख्या तद्दन फसलेल्या निर्णयाला वाट्टेल ते संदर्भ देत भलामण करतात का कुठे? बिचारी गोरगरीब जनता नोटबंदीत होरपळून निघाली ते का नाही दाखवले? तासनतास रांगेत उभे राहून केवळ काही नोटांच्या पत्त्या मिळवण्यासाठी तळपत्या उन्हात कडाक्याच्या थंडीत मुसळधार पावसात सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले होते. ते नाही दाखवले धुरंधर मध्ये! दाखवतात काय की कोट्यवधीची बनावट नोटा छापून आलेल्या बाजारात येऊ नये म्हणून नोटबंदी केली ऑपरेशन ग्रीन लीफ. म्हणजे फसलेल्या निर्णयाचे कीती ते महिमामंडन करायचे?  मुळातच हिंदुत्ववादी लोक सत्तेत आहेत त्यामुळे हागलं-पादलं मास्टरस्ट्रोक म्हणून खपवतात गाजावाजा करत. परमपूज्य नेहरूचाचांनी हाती काहीही नसताना देश घडवला तर त्यो नरिंदर हातचं सगळं विकून देश बिघडवतोय. हे पण दाखवा की धुरंधरमध्ये. रणरागिणी इंदिरा गांधींनी तडाखेबाज गुप्तहेर लोकांची रॉ एजन्सी तयार केली होती हे पण लक्षात ठेवा. हा देश फक्त आणि फक्त सेक्युलरवादी लोकच यशस्वीरीत्या पुढे नेत होते. हिंदुत्ववादी पक्ष देश विकून व्यवसायिक लोकांना श्रीमंत करण्याचेच काम करत आहेत. चारपदरी चकाचक रस्ते देऊन विकास होत नसतो. मने जोडणारा रस्ता तयार करणे आवश्यक असते. ते काम सेक्युलर सत्ताधीशांनी केले होते. आताचे सत्ताधारी फक्त द्वेष पसरवत आहेत. अल्पसंख्यांक समाज सामाजिक विषमतेमुळे अडचणीत सापडला आहे. संविधानाची दिवसाढवळ्या हत्या केली जातेय. उरंधरमुळे ही भावना शतपटीने वाढत जाते. जनता पण पढतमूर्ख आहे. सहा दशकांपासून सर्वधर्मसमभाव संस्कार असलेला समाज गेल्या दिड दशकांत घट्ट सामाजिक बांधिलकीची शिवण उसवायला लागली आहे. हे या नाकर्ते सत्ताधीशांचे पाप आहे. 


धुरंधर मध्ये अजून एक ढळढळीत खोटा प्रचार केला आहे की पाकिस्तानच्या आशीर्वादाने भारतात नक्षलवादी आणि खलिस्तानवादी कारवाया चालू आहेत. हे सरळ सरळ डोळ्यात धूळ फेकण्याचे काम करत आहेत. नक्षलवादी चळवळ ही वैचारिक लढाई आहे. प्रसंगी तिचे उग्र स्वरूप जनतेसमोर येते ते हिंसक मार्गाने. त्याला बिचारे नक्षलवादी तरी काय करणार? एक तर कॅपिटालिस्ट लोकांनी जल जंगल जमीन खाजगी मालमत्ता करून टाकली. मग हिंसक उद्रेक होणारच ना? एकतर सरकारी अधिकारी आणि पोलीस प्रशासन प्रामुख्याने जबाबदार आहेत नक्षली तयार होण्यासाठी. नक्षलवादी चळवळींमुळे शोषित वर्गाचा आवाज सर्वसामान्यांच्या कानांवर आला. सुस्तावलेल्या सुस्थापित जनतेला जागं करण्यासाठी केले नक्षलींनी बॉम्बफेक तर बिघडले कुठे? एका डाव्या विचारसरणीचा एक ज्वलंत गाभा आहे नक्षलवाद माओवाद. त्याचे कनेक्शन तुम्ही पाकिस्तानातल्या लोकांशी दाखवून काय मिळवलं? कुजबुज गॅंगच्या कुजबुजी सरळ सरळ सत्तर एम एम पडद्यावर ठशीवपणे दाखवताना लाज नाही वाटत? वर्षानुवर्षे चालू असलेल्या दुकानदारीला धुरंधर नामक चित्रपटाने सुरूंग लावला आहे. विशेष म्हणजे जनतेने डोक्यावर घेतले आहे धुरंधर ला. ही गांविचारांची हाराकिरी आहे. गोडसेविचार बळावला आहे हे सिद्ध होते. 


धुरंधर हा धादांत विखारी सिनेमा आहे. याच्यावर कायमस्वरूपी बंदी घातली पाहिजे. 


एक सटकलेला उद्विग्न नवपुरोगामी 


©️भूषण वर्धेकर

शुक्रवार, १६ मे, २०२५

भैरु पैलवान की जय!


गावातील भैरु पैलवान पंचक्रोशीत लय फेमस व्हता. कुणाच्या अध्यातमध्यात नसतंय म्हणून. गपगुमान आपआपली कामं करायची, सकाळ संध्याकाळ कसरत करायची, तालमीत येणाऱ्या पोराटोरांची काळजी घ्यायची. त्यांची तयारी करून घ्यायची. पंचक्रोशीत तालमी पण भरपूर व्हत्या. भैरु पैलवानच्या तालमीत येणाऱ्या पोराटोरांची संख्या दिवसेंदिवस लय वाढत होती. हे काय इतर तालमीच्या पैलवानांना पचत नव्हतं. गावातील पक्या पैलवानाची तालीम आणि चिनाप्पा पैलवानाची तालीम तर नेहमीच भैरु पैलवानाच्या तालमी वर जळायचे. डूख धरुन ठिवायचे. पक्या पैलवानाची तालीम नुसती फुसका बारच. चिनाप्पाची तालीम लय हायटेक व्हती तशी. तालमीतलं पैलवान भी लय तयारीचे व्हते. पण कुस्ती खेळायचा अनुभव कमी पडत व्हता. चिनाप्पा पैलवानाच्या तालीममास्तर ला डायरेक भैरु पैलवानच्या तालमीतल्या पैलवानांशी लढायला जमत नव्हतं. त्याला ठाव व्हतं आपण कसं बी करून भैरूच्या पैलवानांना निपटून काढून पण आपलं लय म्हंजी लय नुकसान करतील भैरू गडी. दुसरं लय म्हंजी लय महत्वाचं कारण जर आपण भैरु पैलवानांवर डायरेक कुस्ती खेळलो तर पंचक्रोशीबाहेरील आमऱ्या पैलवानाची तालीम झापुक झुपुक करतच कुस्तीत शिरंल. आमऱ्या पैलवानाची तालीम लय म्हंजी लय म्हंजी मोक्कार फेमस. चिनाप्पा पैलवानाच्या तालीमीपेक्षा फेमस. हायटेक अन् पैलवान गडी लय पट्टीचे. पंचक्रोशीबाहेरील आमऱ्या पैलवानाची तालीम फकस्त चानस बघायची कधी चिनाप्पाचे गडी कुस्ती खेळतात कधी आपण त्यांना नडतू. पण चिनाप्पा अन् आमऱ्या पैलवानाची तालीम समोरासमोर येऊन कधीही कुस्त्या खेळत नव्हत्या. दोघांनाही माहिती व्हतं. आपण कुस्त्या खेळायला लागलो तर दोघांचं लय म्हंजी लय म्हंजी नुसकान व्हणार. जर का चिनाप्पा अन् आमऱ्या पैलवानांची जुंपली तर नुसता जाळ अन् धूर संगंटच व्हणार गावात अन् पंचक्रोशीत. याचा सर्वात जास्त फायदा व्हणार तो रीशाप्पा पैलवान तालमीला. आमऱ्या पैलवानांच्या तालमीनं कधीकाळी रीशाप्पाची तालीम फोडली व्हती. तवापासून रीशाप्पा पैलवान तालमीत नुसत्या कसरती करून घेऊन गडी तयार करत व्हता. तसंही रीशाप्पा अन् भैरु पैलवान तालमीचे लय म्हंजी लय म्हंजी लय जूने संबंध. जिगरी दोस्त. चिनाप्पा, आमऱ्या, पक्या पैलवानांच्या तालमीतल्या सगळ्या पैलवान गड्यांना ठाव व्हतं की रीशाप्पाचं पैलवान गडी कधीबी भैरु पैलवानाच्या तालमीला मदतीला धावून येतात. पुराना याराना है वह!

पक्या पैलवानांच्या तालमीतल्या गड्यांना कुरापती काढायला भैरु पैलवानाची तालीम आवडायची. उगाचंच येऊन दगडं मार, हळूच खोड्या कर, उकसवा-उकसवी कर. असली थेरं सारखी व्हायची. भैरु पैलवानच्या तालमीतले पैलवान गडी पण लय वैतागायचे. ते तर फक्त वाटच बघत व्हते कधी तालीममास्तर छूट देतो अन् आम्ही पक्या पैलवानांच्या गड्यांना धूळ चारतो ते. पण आजपतूर सगळे तालीममास्तर नुसत्या कसरती करून घे, गावातल्या तालमींना सांगून पक्या पैलवानांना समज दे, उगाचंच आपण आपलं बरं कसरती बऱ्या. कशाला कुस्त्या खेळायला जायच्या? हेच लक्षात व्हतं. नवीन तालीममास्तर नरिंदर जवापासून आला व्हता तवापासून भैरु पैलवानाच्या तालमीचा नादच खुळा झाला व्हता. नरिंदर ने पैलवान गडी लोकांना डायरेक धडक कुस्ती खेळायची म्हणून ऍटॅकिंग डाव शिकवले व्हते. पंचक्रोशीतील आमऱ्या, पक्या, चिनाप्पा, रीशाप्पा वगैरे वगैरे पैलवानांच्या तालमींना ठाव व्हतं. नरिंदर सुमडीत डाव टाकायला लय भारी हाय ते. 

सगळं कसं गपगुमान गावगाडा चालू व्हता. एकदमच पक्या पैलवानांच्या तालमीतल्या गड्यांनी लय मोठी खोड काढली. भैरुचं पैलवान गडी लय खवळलं. पंचक्रोशीत सगळ्यांना ठाव व्हतं आता काय खरं नाय पक्याच्या पैलवान तालमीचं. पक्याच्या मागं लपून छपून चिनाप्पाची फुस व्हती. सगळ्यांना ठाव व्हतं. चिनाप्पाचं पैलवान डायरेक कुस्त्या खेळत नसतात पण उगीच दुसऱ्यांच्या कुस्तीत रसद पुरवायची कामं करायची नवी सवय लागली होती. तशी ही रसद पुरवायचा पिढीजात धंदा तर आमऱ्या पैलवानांच्या तालमीतल्या गड्यांचा व्हता. कुठंबी कुस्ती असू दे गावात, पंचक्रोशीत, तालुक्यात, जिल्ह्यात. कुणी आवताण दिलं नाय तरी उगाचंच चमकोगिरी करायची सवय लय बेकार व्हती आमऱ्या पैलवानांची. तशीच गेम आजकाल चिनाप्पाचे पैलवान गडी करायला बघत व्हते. त्यात पक्या पैलवानांच्या तालमीतल्या गड्यांना वापरायचं भैरु पैलवानांना कुस्त्या खेळायला भाग पाडायचं हेच धंदे पुन्हा पुन्हा सुरू व्हते. यंदा मात्र नरिंदर ने जे काय आडवेतिडवे डाव टाकले. पक्या पैलवानांच्या तालमीतल्या गड्यांना सळो की पळो करून सोडलं व्हतं. दिसला की हाण. उठला की तुडीव. वरडला की बडीव. कुस्ती खेळायचा सराव एवढी वर्षे केला होता पैलवानांनी. सगळी तालीम पक्या पैलवानांना दाखवून धूळ चारून मुका मार देत व्हती. चिनाप्पा नुसता रसद पुरवण्याचं काम करत व्हता. चिनाप्पाचं गडी काय कुस्तीत डायरेक खेळणार नाय हे भैरुंच्या गड्यांना ठाव व्हतं. रीशाप्पाच्या गड्यांनी भैरु पैलवानांना सांगितलं व्हतं. भावांनो तुम्ही फकस्त भीडा. हाय मी हिकडं. कमी जास्त लागंल तसं सगळं देतू. तुमी फकस्त डाव टाका. तुमच्या कुस्तीत कुणी तिसरा भिडू आला तर घेतू बघून आम्ही. मग काय पक्या पैलवानाच्या तालमीतल्या गड्यांना काय सुजवलं व्हतं. नुसता जाळ अन् धूर संगंटच. पक्या पैलवानांच्या मदतीला ना चिनाप्पा येत नव्हता ना आमऱ्या. पक्या पैलवानाची तालीम म्हणजे खाज खाज खाजवणारी खरूज. गावात, पंचक्रोशीत, तालुक्यात आणि जिल्ह्यात सगळीकडे ठाव व्हतं ही खरूज पसरणारी हाये. कशाला उगाचंच खाजवण्यासाठी पुढं जायचं. खरूज खाजवली की वाढतं जाती. सगळे गपगुमान तमाशा बघत व्हते. इकडं भैरुच्या गड्यांनी दाणादाण उडविली होती पक्याच्या पैलवानांची. मार खाऊन बेजार झाले होते. सुरुवातीला कांगावा केला की आम्ही भैरु पैलवानांना कुस्त्यात पलटवलं, मग त्यांना माती चारली वगैरे. पण दिसत तर वेगळंच होतं. कारण यंदा भैरु पैलवान सगळीकडे नाकाबंदी करून चोप चोप चोपत होते. वरुन भैरु पैलवानाच्या तालमीकडून अधिकृतपणे जाहीर केले होते की आग्यामोहोळ मध्ये ज्या माशा आम्हाला चावल्या त्यांनाच आम्ही पकडून पकडून वेचून मरत आहोत. ज्या माशा चावतात त्यांचाच बंदोबस्त करतोय. परिस्थिती तशी चिघळत होती तेवढ्यात आमऱ्या पैलवानांच्या तालमीनं डाव साधला. भैरु आणि पक्या पैलवानांच्या तालमीतल्या गड्यांशी चर्चा करुन, मध्यस्थी करून कुस्त्या थांबवल्या. अशा तऱ्हेने पंचक्रोशी बाहेरच्या तालमींना गावातल्या कुस्तीत मध्यस्थी केली. मांडवली बादशहा होण्याचा मान मिळवला. इकडं गावातल्या चिनाप्पा पैलवानाच्या तालमीला पक्या पैलवानांच्या मदतीला धावून जाण्याशिवाय पर्याय नव्हता. आमऱ्या पैलवानांच्या तालमीतल्या तालीममास्तर तात्या लय दलिंदर. भैरुचा नरिंदर. दोघांनी काय खलबती केल्या रातोरात कुणालाबी झेपल्या नाहीत. एकदम कुस्त्या मध्येच थांबल्या. गावातल्या तालमींना काय समजना? नेमकं काय झालंय? ज्यानं त्यानं नरिंदरला शिव्या दिल्या. तालीममास्तर बकवासय म्हणून बोंबाबोंब सुरू केली. खरं कारण भैरु पैलवानाच्या तालमीतल्या गड्यांना पक्कं ठाव होतं ते. कारण कुस्त्या खेळल्यानंतर पक्या पैलवानांच्या तालमीतल्या गड्यांंचे कमकुवत डाव, चांगलेच माहीत झाले व्हते. तिकडं चिनाप्पा अन् आमऱ्या पैलवानांच्या तालमीचा वेगळाच कार्यक्रम चालू होता. आता फकस्त आमऱ्याला पंचक्रोशीत डायरेक एंट्री भेटली होती मांडवली करण्यासाठी. 

सगळ्या तालमी, पैलवान गडी आणि गावातल्या कुस्तीप्रेमींना एक समजलं व्हतं की ही शांतता भविष्यात येणाऱ्या वादळाची सुरवात आहे ते.

® भूषण वर्धेकर 
११ मे २०२५
पुणे 

धुरंधर - एक पुरोगामी चिकित्सा

  धुरंधर - एक पुरोगामी चिकित्सा   आदित्य धर लिखित-दिग्दर्शित-निर्मित धुरंधर चित्रपट ही अनेकार्थाने प्रोपागंडा फिल्म आहे. तब्बल अडीच दशकांचा ...