शनिवार, २५ एप्रिल, २०२६

छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य हिंदवी की विद्रोही?

 छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य हिंदवी की विद्रोही?


छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनी हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यात आले असा दावा करण्यात येतो. कारण ६ जून १६७४ रोजी राज्याभिषेक सोहळा रायगडावर पार पडला होता. याचे सांस्कृतिक महत्त्व आहे आणि तसे सर्वमान्य ऐतिहासिक पुरावे देखील उपलब्ध आहेत. आजपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात ज्या ज्या घटना घडल्या होत्या त्यातील ठरावीक घटना ऐतिहासिक पुराव्यानिशी इतिहासकारांनी मांडल्या आहेत. साहित्य नाटक आणि चित्रपट या माध्यमाने आपापल्या परीने शिवाजी महाराजांची कारकीर्द कशी होती हे दाखवून दिले. चरित्रकार, समीक्षक आणि विचारवंत म्हणून जी जी रथी महारथी मंडळी होती आणि आहेत त्यांनी पण महाराजांच्या आयुष्यातातील घटनांचे दाखले देऊन किंवा प्रेरणा घेऊन आपल्या विचारांचा प्रसार प्रचार केला. व्यक्तीशः मला एक सर्वसामान्य व्यक्ती म्हणून छत्रपती शिवराय वेगवेगळ्या पद्धतीने समजत गेले वेगवेगळ्या टप्प्यांवर.सर्वात आधी शाळेत अभ्यासक्रमातून भेटलेले शिवबा वेगळे होते. कॉलेजमध्ये गेल्यावर अवांतर वाचनात आलेले शिवराय वेगवेगळ्या दृष्टीनं समजत गेले. वय जसं जसं वाढत गेलं तसं तसं आजूबाजूच्या राजकीय सामाजिक घडामोडी घडत असताना शिवकालीन इतिहासाची परिस्थिती कशी काय हाताळली असेल शिवाजी महाराजांनी हे अनेकार्थाने उमजत गेलं. आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची ओळख ज्या पद्धतीने करून दिली जातेय यावरून नेमके छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य हे हिंदवी होते की विद्रोही होते याचा विचार मांडणे प्रकर्षाने जाणवते. अर्थात ह्या लिखाणाने आमुलाग्र बदल वगैरे होतील असे मला अजिबात वाटत नाही. मात्र मराठी माणसाच्या मनातल्या शिवबा ते छत्रपती ह्या प्रवासात एक उद्बोधक वैचारिक रंजकता ही कालांतराने परिपक्व होत जाते. तसाच शिवबा ते छत्रपती या माझ्या मनातील शिवाजी महाराजांच्या विचारांचा दृष्टिकोन विस्तारत गेला. असाच प्रवास कित्येक मराठी माणसांनी पाहिला असेल. त्यामुळेच छत्रपती शिवराय हे कित्येक पिढ्यांना नेहमीच प्रेरणा देतात.


सुरुवातीला मराठा साम्राज्याचा कालरेषा पट थोडक्यात पाहू. 

१६२७ शिवाजी महाराजांच्या जन्मापासून ते १८१८ मध्ये ब्रिटिश सैन्याने केलेला पेशव्यांचा पराभव. हा प्रामुख्याने महत्वाचा काळ मानला जातो. १६८० साली शिवाजी महाराजांच्या निधनानंतर मराठा साम्राज्याचा कालखंड हा प्रामुख्याने कौटुंबिक कलह आणि साम्राज्य विस्तार या दोन भागांत विभागला जातो. १८१८ नंतरच्या काळातील ब्रिटिशांनी केलेल्या ट्रिटीज् आणि उत्तर भारतात असलेल्या संस्थानांसोबतचा व्यवहार आणि महाराष्ट्रातील संस्थानांसोबतचा व्यवहार यात बऱ्यापैकी तफावत दिसून येते. याव्यतिरिक्त मराठा साम्राज्याच्या समकालीन असलेल्या राजकीय व्यवस्थेला दुर्लक्षित करून चालणार नाही. तत्कालीन सामाजिक व्यवस्था आणि जगरहाटी फार महत्त्वाची आहे. परदेशी प्रवासी आले आणि त्यांनी तत्कालीन मराठा साम्राज्याच्या काळात दिसणाऱ्या नोंदी केल्या त्या पण लक्षात ठेवल्या पाहिजेत.  निजामशाही, आदिलशाही, कुतुबशाही, बरीदशाही आणि मुघल सल्तनत या साम्राज्याच्या काळात ज्यांनी राजकीय प्रशासकीय आणि सामाजिक व्यवहार केले त्याच्या नोंदी आहेत त्या पण महत्त्वाच्या आहेत. थोडक्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य समजून घेणे जेवढे गरजेचे तेवढेच त्याकाळात आजूबाजूला घडणाऱ्या घटना समजून घेतल्या पाहिजेत. यामुळे शिवाजी महाराजांचे दूरदृष्टी आणि हिंदवी स्वराज्याची पायाभरणी याकडे डोळस पद्धतीने पाहता येईल.


मराठा साम्राज्याचा शुभारंभ हा विस्तारवादी आक्रमणातून झालेला नाही तो झाला विद्रोहातून. हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यात विद्रोह आणि रयतेचे राज्य या दोन बाबी अत्यंत महत्वाच्या आहेत. शिवाजी महाराजांना परकीय राज्यकर्त्यांशी लढाया जेवढ्या ताकदीने लढल्या त्याच ताकदीने स्वकीयांशी पण लढाया लढाव्या लागल्या. याकडे बघताना त्या त्या विचारधारेच्या संशोधक, अभ्यासक, इतिहासकार आणि लेखक यांनी आपापल्या पद्धतीने शिवाजी महाराजांची कारकीर्द रेखाटली. डाव्या विचारसरणीच्या कंपूत शिवाजी महाराजांच्या कारकिर्द वेगळ्या दृष्टीने मांडली. उजव्या विचारसरणीच्या कंपूत शिवाजी महाराजांची प्रतिमा वेगळी आहे. राजकीय फायद्यासाठी कालांतराने नवीन विचारकंपू जन्माला आला पुरोगामी म्हणून. त्यात शिवाजी महाराजांचा इतिहास मनाला वाटेल तसा लिहिला आहे. लेखक लोकांनी साहित्यात रंजकता आणण्यासाठी क्रिएटिव्ह लिबर्टी घेऊन शिवाजी महाराजांच्या आयुष्यात आलेले प्रसंग फार वेगळ्या पद्धतीने मांडले आहेत. या सगळ्या नंतर प्रकट झालेले माध्यमे म्हणजे चित्रपट, दृश्य कला माध्यम आणि कथाकथन-व्याख्याने यांचे. यातून शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित कित्येक बऱ्या वाईट चांगल्या उत्तम आणि दर्जेदार कलाकृती निर्माण झाल्या आणि जनतेला प्रभावित करून त्यांनी शिवाजी महाराजांची ठशीव प्रतिमा तयार केली. अशा सगळ्या गोष्टी ध्यानात घेऊन एक गोष्ट स्पष्ट होते की ज्याला त्याला आपापल्या वैचारिक विश्वात छत्रपती शिवाजी महाराज वेगळे भावलेले आहेत. 


ऐतिहासिक संदर्भ घेऊन तत्कालीन परकीय राज्यकर्त्यांची माहिती पाहू. इस्लामिक आक्रमणं सातव्या- आठव्या शतकापासून भारताच्या भूमीवर होत राहिली. काही अयशस्वी तर काही यशस्वीरीत्या. या दरम्यानच्या काळात गझनीच्या महमूदने भारतावर सतरावेळा आक्रमणं केली लुटालूट करण्यासाठी. बाराव्या शतकाच्या शेवटच्या दशकात मोहम्मद घोरीने तराईनच्या युद्धात पृथ्वीराज चौहानचा पराभव करून भारतात कायमस्वरूपी मुस्लिम राजवट म्हणजे दिल्ली सल्तनत स्थापन केली. भारताच्या मध्ययुगीन काळातील एक महत्त्वाचे परकीय आक्रमण आणि साम्राज्य होते ते म्हणजे तेराव्या शतकापासून ते सोळाव्या शतकाची सुरवातीची दशके. दिल्ली सल्तनत ची तीनशेपेक्षा जास्त वर्षे सत्ता होती. या त्रिशतकात गुलामवंश, खिलजीवंश, तुघलक, सय्यद आणि लोधी वंशावळी दिल्लीचा तख्त संभाळत होती. पानिपताच्या पहिल्या युद्धात दिल्ली सल्तनतचा पराभव झाला आणि बाबरने मुघल साम्राज्याची सुरुवात केली. मुघल साम्राज्याचा पाडाव १८५७ च्या सुमारास झाला. शेवटचा मुघल सम्राट बहादूर जाफर शहा होता. यासोबतच दख्खनच्या पठारावरील सल्तनती म्हणजे विजापूरची आदिलशाही, अहमदनगरची निजामशाही, विदर्भाची बेरारची इमादशाही, गोवळकोंड्याची कुतूबशाही आणि बीदरची बरीदशाही अस्तित्वात होती. याच काळात १६७४ ते १८१८ हा कालखंड मराठ्यांनी गाजवला. इस्लामिक शासकांचा इतिहास भूगोल समजला तर मराठ्यांनी दिलेला चिवट लढा कसा तुटपुंज्या साधनांवर अवलंबून होता हे समजते. अशा काळात हिंदवी स्वराज्य हेच साध्य होते आणि तीनही बाजूंनी इस्लामिक राजवट एका बाजूला पसरलेल्या अथांग सागरात हिंदवी स्वराज्याचा भगवा ध्वज फडकत होता. भौगोलिकदृष्ट्या बघितले असता एकास पाच असे प्रमाण होते मराठा आणि मुघल साम्राज्याचे. एवढ्या मोठ्या भूभागावर अनभिषिक्त सत्ता होती तरी मुघलांना मराठ्यांनी चिवटपणे झुंजवले होते. औरंगजेबाचा इतिहास वाचल्यानंतर मराठा कसा लढवय्या होता हे समजते. 


वरील पार्श्वभूमी थोडक्यात सांगितली कारण हा बॅकड्रॉप लक्षात आला तर हिंदवी स्वराज्याची संकल्पना कशी अस्तित्वात आली विद्रोह कसा तयार झाला आणि मावळ प्रांतांत रूजला, स्फुरला आणि धगधगत मराठा साम्राज्याचा उदय कसा झाला ते अटकेपार जाऊन मराठ्यांनी साम्राज्य विस्तारित केले याचा आढावा सहजपणे घेता येईल. विद्रोह हा ब्राह्मणांच्या विरोधात असतो हा एक गोड गैरसमज आजच्या काळातील एक राजकीय ढोंगीपणाचा कळस आहे. ब्राह्मणी व्यवस्थे विरोधात लढा म्हणजे विद्रोह. मग ब्राह्मणी व्यवही बिरूदावली आहे. ठाण मांडून बसलेल्या व्यवस्थेत शोषक आणि शोषित वर्ग विभागला जातो वाढत जातो आणि शोषकांच्या पिढ्या मांड ठोकून बसतात ती व्यवस्था ब्राह्मणी म्हणून ओळखली जाते. अशा व्यवस्थेला विरोध करणाऱ्या बंडखोरी करणाऱ्या लोकांना विद्रोही म्हणून संबोधले जाते. अशी शोषकांची पिढी शोषित समाजाला गुलामगिरीत ढकलत असते. अशा कधीही न बदलाणाऱ्या व्यवस्थेला छेद देणारी आणि पर्यायी स्वतंत्र व्यवस्था निर्माण करण्याची ताकद असलेल्या लोकांना विद्रोह हाच सुरूवातीचा आधार असतो.  इस्लामिक शासकांकडे जहागीरदार, वतनदार, सरंजाम, संस्थाने आणि सरदार जुळवून घेत आपापली मक्तेदारी राखून होते. काही नाईलाजाने गुलामी करत होते. काही आपापल्या पद्धतीने बंडखोरी करत होते. असे अनेक सरदार होते. त्यापैकीच एक पराक्रमी आणि मुत्सद्दी शहाजीराजे भोसले. त्यांच्याकडे पुणे आणि सुपे यांची जहागिरी आदिलशाहीत होती. याच कालखंडात शिवाजी महाराजांना राजमाता जिजाऊ आणि स्वराज्य संकल्पक शहाजीराजे यांनी स्वतंत्र राज्य स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन, संस्कार आणि मार्गदर्शन केले. हिंदवी स्वराज्याची मूल्ये इथे रुजवली गेली. त्यासाठी विद्रोह कसा तयार झाला आणि नुसत्या विद्रोहाने संघटन होणार नाही म्हणून विद्रोहाला हिंदवी स्वराज्याची जोड मिळाली. रयतेचे राज्य कसे असावे याचे बाळकडू लहानपणापासून शिवरायांना पाजले होते. परकीय राजवटीत जुलमी व्यवस्था आणि शोषक कसे रयतेची लूट करतात हे दिसत होते. त्यामुळे आपण आपल्या व्यवस्था उभ्या करू. रयतेचे रक्षण करण्यासाठी पालन पोषण करण्यासाठी स्वायत्त व्यवस्था असावी असे वाटणे सहाजिकच होते. अशी व्यवस्था निर्माण करण्यासाठी विद्रोह आवश्यक होता. हा विद्रोह व्यवस्थेविरोधात होता. कोणत्या? गुलामीच्या! कोणाची गुलामी? तर परकीय सत्ताधिशांची. परकीय राजवटीत त्यांच्याच विरोधात बंडखोरी करून विद्रोह करून स्वकीयांचा विश्वास संपादन करून एक लौकिकार्थाने रयतेचे राज्य म्हणून स्वराज्य स्थापन केले पाहिजे ही भावना निर्माण झाली. मग जे स्वकीय सोबत येतील ते सवंगडी म्हणून त्यांना शुद्ध व प्रामाणिक हेतूने स्वायत्तता कशी गरजेची आहे आणि भूमिपुत्र म्हणून आपला हक्क आहे हे पटवून देणे किती कमालीचे कौशल्य असेल? ही व्यवस्था सगेसोयरे म्हणून जे आपल्याला साथ देतील त्यांना सोबत घेऊन उभी करणे. त्यांना तत्वाशी बांधून ठेवणे हे सोपे काम नाही. जे सोबत नाहीत परकीयांना मदत करतात त्यांच्या विरोधात लढणे मग ते स्वकीय का असेनात! अशा वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी सांभाळून घेणे आणि स्वराज्य निर्माण करणे ही फार मोठी जोखीम होती. यात समोरच्या व्यक्तीचा विश्वास संपादन करायचा नंतर त्यांना आपल्या सोबत कोणत्याही परिस्थितीत राहण्यासाठी आश्वासक वातावरण निर्माण करणे हेच हिंदवी स्वराज्याची पायाभरणी करणारे होते. यातूनच पुढे प्रेरणा संवेदना भावना जागृत करून लढवय्या तयार करणे किती मोठे आव्हान असेल? अल्प साधने अत्यल्प रसद आणि काही शे किलोमीटर वर पसरलेली सह्याद्री पर्वतरांग हीच जमेची बाजू. वडिलांनी दिलेला गनिमाविरोधात लढायचा संस्कार. 


आपल्या रयतेसाठी आपलं शासन प्रशासन राज्यकारभार आणि व्यवहार उभा करण सोपी गोष्ट नव्हतीच. यातून समाजातील सर्व घटकांना एका छत्री खाली आणून केवळ स्वप्न न दाखवता ते साकार करून एक भक्कम पर्यायी व्यवस्था उभी करणं हेच हिंदवी स्वराज्याचे कोअर प्रिन्सीपल होते. शिवरायांनी ही मुहुर्तवेढ रचली किशोरवयीन सवंगडी घेऊन. एखादा किल्ला सर करून तो ताब्यात घेऊन तिथली व्यवस्था उभी करून तिथे राहणाऱ्या रयतेचे रक्षण पालन पोषण करणे ही छोटी सुरुवात. असे तीनशेहून अधिक किल्ले आहेत. मग अशा किल्ले परिसरात किती गावे असतील त्या गावातील शेतकऱ्यांना काय हवं काय नको हे बघून त्यांना राजकोषातून मदत करण. रयत कृषीक्षेत्रात स्वयंपूर्ण झाली तर गावातील सगळे आर्थिक सामाजिक व्यवहार सुरळीत होतात. अशी राज्यकारभाराची रचना त्याकाळी तयार होती. प्रशासकीय यंत्रणा मजबूत होती देखरेख ठेवण्यासाठी. अष्टप्रधान मंडळ स्थापन करून त्या त्या क्षेत्रात तज्ञ असणाऱ्या लोकांना नियुक्त केले होते. राज्यात अंतर्गत आणि बाह्य सुरक्षेसाठी गुप्तहेरांची व्यवस्था होती. ही गुप्तचर यंत्रणा हिंदवी स्वराज्याचा ताठ कणा होता. स्वराज्य स्वयंपूर्ण आणि स्वावलंबी होण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सगळ्या सोयी केल्या गेल्या होत्या. परकीय राजवटीत तत्कालीन संस्थानिक हिंदवी स्वराज्याच्या विरोधात नव्हते का? होतेच. काही अल्पसंतुष्ट जहागिरदार वतनदार होते आत्मघातकी. अशांवर वचक ठेवून वेळ पडली तर त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी उचलून त्यांना विश्वासात घेऊन स्वराज्यात सामील करून वा भागीदार करून विस्तार करण्यासाठी प्रयत्न करणे ही एक यंत्रणा होती. या सोबतच आजची लोकप्रिय संज्ञा इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट या कडे बारकाईने लक्ष दिले होते. प्रसंगी पैसा उभा करण्यासाठी सुरतेची लूट केली होती. अर्थात ही लूटमार स्वराज्य बांधण्यासाठी होती. डाव्या विचारसरणीच्या लोकांनी सोयीनुसार संदर्भ घेऊन मराठा लूटमार करत वगैरे नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला होता. पण वेळोवेळी इतिहासकार अभ्यासक लोकांनी तो हाणून पाडला. औरंगजेब मेल्यावर मराठा साम्राज्यात असे कितीतरी भौगोलिक प्रदेश मुघलांनी बळकावले तिथली डागडुजी करून एक टिकणारी व्यवस्था तयार केली. मग असा रेडीमेड किल्ला वा प्रदेश मराठ्यांनी पुन्हा जिंकून स्वराज्यात सामील करून घेतला होता. त्यामुळे मुघल साम्राज्यातील कैक राजे महाराजांना मराठ्यांचा वचक होता भीती होती. हीच स्वराज्य बांधणीची नीती होती. तत्कालीन मराठ्यांनी वेळप्रसंगी नमतं घेतलं तह केले काही जिंकलेले प्रदेश तहात घालवले काही वर्षांनी परत मिळवले. हा रंजक इतिहास आहे. 


छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा वारसा पुढे कैक मावळ्यांनी पुढे नेला. चिवट लढवय्या आणि मुत्सद्दी नेतृत्व म्हणून मराठा साम्राज्याच्या काळात बरेच थोर सरदार, सेनापती आणि राजे साम्राज्याचे वाहक बनले. भले कौटुंबिक कलहाचे पडसाद उमटले. वारणेचा तह करून साताऱ्यात कोल्हापूरात गादी विभागली गेली पण मराठ्यांचा गड भलेभले शासक हलवू शकले नाहीत. अंतर्गत संघर्ष बंडखोरी सत्तालालसा आणि इर्ष्या कपट कारस्थाने याने पुरेपूर ओतप्रोत भरलेला सत्तापिसासूंचा वरचष्मा यामुळे भले १८१८ साली ब्रिटिश सरकारने मराठा साम्राज्याचा अश्वमेधाचा वारू रोखला. मात्र स्वराज्याची धग तेवढीच प्रखरतेने पेटत होती. याची प्रेरणा पुढं कैक महापुरुष आणि थोर विचारवंत यांना पण कमालीचे बळ देऊन गेली. याचं एक कारण म्हणजे शिवरायांना वेळोवेळी वेगवेगळ्या कालावधीत अनेक वेळा वेगवेगळ्या विचारसरणीच्या लोकांनी त्यांच्या आकलनानुसार लोकांसमोर मांडले. मग तशी प्रेरणा घेऊन त्या त्या विचारांचा अनुयायी असलेल्या लोकांना पाठबळ मिळाले. मुळातच शिवाजी महाराजांच्या इतिहासाची साधने कोणती यावर चर्चा झाली पाहिजे. त्याकाळात झालेल्या पत्रव्यवहारातून शिवाजी महाराजांच्या विचारांची ओळख होते. तत्कालीन परदेशी प्रवासी लोकांनी लिहिलेल्या नोंदीचा संदर्भ घेऊन एक वेगळा इतिहास वाचायला मिळतो. इस्लामिक शासकांच्या काळात लिखित स्वरूपात असलेला ग्रंथभांडारातून हिंदवी स्वराज्य कसे होते हे समजते. नंतर येतात बखरकार ज्यांची अतिशयोक्ती करून लिहिण्याची पद्धत होती. यावर संशोधन करून निष्पक्षपणे मांडलेला इतिहास. या भौगोलिक परिस्थितीत परकीय अभ्यासकांनी मांडलेली निरिक्षणे वाचली की एक कालपट समोर येतो. यातून ज्याने त्याने समजतील उमजतील असे शिवराय लोकांसमोर आणले. यापुढे हे प्रयत्न असेच सुरू राहतील. महाराष्ट्रातील प्रत्येक भौगोलिक प्रदेशावर मराठा साम्राज्याच्या काही ना काही ठळक खुणा आढळणार. त्यामुळे गेल्या साडेतीनशेपेक्षा जास्त वर्षांत महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार प्रत्येकाला प्रेरणा देणारा होता. आजही आहे आणि भविष्यातही असेल. कारण प्रत्येक माणसाला संघर्ष करावा लागतो. मग तो मानसिक असो वा सामाजिक. राजकीय असो वा आर्थिक. आयुष्यात प्रत्येक टप्प्यावर वेगवेगळे प्रसंग येतात त्यातून धीटपणे तावून सुलाखून बाहेर पडणाऱ्या (मराठी) माणसाला छत्रपती शिवराय नेहमीच बळ दे राहणार. मग हे नेमके कोणते शिवराय असतील? अमक्याने सांगितलेले खरे की तमक्याने सांगितलेले खोटे? किंवा फलाना म्हणतो तसे कपोलकल्पित की टिमका सांगतो तसे शिवराय? प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने शिवराय आणि त्यांचा काळ व्यक्त करतात. त्यामुळे ह्यांनीच लिहिलेले खरे बाकीचे खोटे असे म्हणता येणार नाही. आपल्याला राजकीय फायदा झाला पाहिजे आणि त्यासाठी अमुक असाच इतिहास खपवण्याचे काम अव्याहतपणे चाल राहणारे आहे. त्यामुळे गोष्टींतले शिवराय असो वा व्याख्यानांमधील! साहित्य चित्रपट नाटकातून दिसणारे शिवराय असो वा विचारवंत लोकांच्या मनातील शिवराय! शैक्षणिक पाठ्यपुस्तकातून भेटणारे शिवराय असो वा अवांतर वाचनातून मनात रूंजी घालणारे शिवराय असो. ह्या सगळ्यात व्यापक अर्थाने प्रत्येकाला प्रभावित करणारे शिवराय वेगवेगळे असू शकतात. कसलीही न जुमानणारी परिस्थिती असताना बंडखोरी करून विद्रोह करून तत्व सत्व आणि स्वत्व टिकवून संघर्ष करण्याची ताकद देणारा अक्षय्य प्रेरणास्रोत म्हणजे माझा शिवबा ते सकलजनांचे छत्रपती शिवाजी महाराज. एका विचाराने पेटून उठलेले वादळ हिंदवी स्वराज्य स्थापन करत हजारो पिढ्यांना विद्रोहाचा मूलमंत्र देऊन लढण्यासाठी मानसिक शक्ती देणारा मेरूमणी म्हणजे हिंदवी स्वराज्याचा विचार. महाराष्ट्रातील मातीच्या कणाकणांत रूजलेले कणखर बीज म्हणजे विद्रोह. त्याच विचारांतून संकल्पित समाज निर्माण करणारा स्वराज्याचा हिंदवी संस्कार. सर्व स्तरातील तळागाळातील लोकांना एका घोषणेने पेटवणारा विचार छत्रपती शिवाजी महाराज. शोषकांच्या व्यवस्थेला झुगारणारा शोषितांसाठी विद्रोह करणारा चिवटपणे लढणारा रयतेच्या एकछत्री स्वराज्याची संकल्पना सिद्धीस नेणारा एकमेव आदर्श म्हणजे हिंदवी विचार. छत्रपती शिवाजी महाराजांची विद्रोही नीतिमत्ता हीच हिंदवी स्वराज्याची पायाभरणी होती.


©️ भूषण वर्धेकर, पुणे.

२२ फेब्रुवारी २०२६


शनिवार, ११ एप्रिल, २०२६

मातृभू इस्रायल पितृभू भारत

 ज्यू लोकांचा आणि भारताचे नाते ऐतिहासिक आहे. विशेषतः १९४० च्यादशकात बरेचसे ज्यू लोक भारतात शरणार्थी म्हणून आले होते. महाराष्ट्रात कोकणात होते कोल्हापूरात होते. उत्कृष्ट मराठी बोलणारे इस्रायली लोक आहेत. आंध्रात आणि नॉर्थ ईस्ट स्टेटस मध्ये पण इस्रायली लोक आहेत खूप वर्षांपासून. भले ते वेगवेगळ्या नावाने ओळखले जातात. कित्येक ज्यू लोकांना भारतीय सरकार मध्ये किंवा आर्मी मध्ये देशसेवा करायला संधी मिळाली. इस्रायल देश स्थापन झाल्यावर बरेचसे लोक भारतातून तिकडे गेले. त्यांच्या साठी भारतदेश पितृभू म्हणजेच फादरलॅंड तर इस्रायल मातृभू म्हणजे मातृभूमी मदरलॅंड.  हा संदर्भ खूप ऐतिहासिक आहे. कित्येक ज्यू इतिहासकार किंवा संशोधक, इस्रायली नेते नागरिक भारताच्या बाबतीत असणारी ही भावनिक नाती अभिमानाने जपतात. हा संदर्भ लक्षात घेऊन मोदींनी फादरलॅंड मदरलॅंड वगैरे भाषणबाजी केली होती हे लक्षात ठेवावे. 


त्यामुळे ज्यू लोकांना भारताने फादरलॅंड म्हटलं आणि इस्रायल हा मदरलॅंड म्हटलं तर काहीही फरक पडत नाही. फरक पडतो तो फ्रस्ट्रेटेड झालेल्या पुरोगामी लोकांना. त्यांना सगळा इतिहास भूगोल माहीत असतो. मध्य पूर्वेत कैक दशकांपासून होणाऱ्या युद्धात भारत कधीच मध्यस्थी करत नव्हता हे पण माहीत आहे. पण काहीही करून भारतात कुठेही काही झाले की मोदींच्या नावाने टाहो फोडून काही उपयोग होत नाही हे समजल्यावर जगात काही झाले की मोदींच्या नावाने आकांडतांडव करून नवीन टुलकीट सुरू झाले आहे.


बिचारे मोदी विरोधी, मोदीद्वेष्टे आणि मोदीबिंदू व मोदीव्याध झालेले रूग्ण हेच खरेखुरे मोदींना मोठे करणारे आहेत!


(ता. क. मोदीबिंदू म्हणजे कोणत्याही गोष्टीत मोदींचीच चू आहे असे दिसणारी मंडळी आणि मोदीव्याध म्हणजे चांगली गोष्ट मोदींमुळेच झाली हे मान्य आहे पण अपचन झाल्यामुळे बुडाला आग होणारी मंडळी)


©️भूषण वर्धेकर

शुक्रवार, ३ एप्रिल, २०२६

धुरंधर - एक पुरोगामी चिकित्सा

 धुरंधर - एक पुरोगामी चिकित्सा 


आदित्य धर लिखित-दिग्दर्शित-निर्मित धुरंधर चित्रपट ही अनेकार्थाने प्रोपागंडा फिल्म आहे. तब्बल अडीच दशकांचा कलावधी केवळ साडे सात, आठ तासात - दोन भागात खपवला आहे. ही निव्वळ भोळ्या भाबड्या जनतेची फसवणूक असून त्याकडे अल्पसंख्याक विरोधात असंतोषाचे वातावरण निर्माण करणारी कलाकृती म्हणून पाहिले पाहिजे. पवित्र इस्लाम धर्म हा शांततेचे प्रतिक आहे. त्यासाठी अतिपवित्र जिहाद आजपावेतो कार्यरत आहे. गेली कैक शतके पवित्र जिहादी शिकवण जनसामान्य जनतेत रूजवण्यासाठी प्रसंगी किरकोळ हिंसा, फिदाईन ॲटॅक वगैरे करणे अनिवार्य होते. पण चक्क धुरंधर सारख्या प्रोपागंडा फिल्म मध्ये हे जिहादी कार्य दुष्कृत्य म्हणून हिणवले जाते हे मानवतेला धरून नाही. पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाची बालवाडी, प्राथमिक शाळा आणि महाविद्यालये ही जगाला दिलेली देणगी आहे. यातून बाहेर पडणाऱ्या तडफदार तरुणांना जर ऑन जॉब ट्रेनिंग देण्यासाठी छोटे मोठे बॉम्बस्फोट घडवण्यासाठी भारतात पाठवले तर पोटशूळ दुखण्याचे कारणच काय? बिचारे बापुडे अतिरेकी कबाडकष्ट करून जीवाची पर्वा न करता प्रसंगी धारातीर्थी पडतात. त्यांची ही शहादत सामाजिक एकोप्यासाठी प्रेरणादायी आहे. कोण कुठला सळसळत्या रक्ताचा तरूण सत्तरावर दोन बहाहत्तर सुंदऱ्यांचा उपभोग घेण्यासाठी जंग जंग पछाडतो. काहीही करून वैश्विक एकात्मिक शांततेसाठी मृत्यूला भिडतो. याला टुकार हिंदुत्ववादी मानवतेविरोधी घटना सांगतात. निर्घृण हल्ला संबोधतात. दहशतवाद्यांच्या कार्याला देशद्रोही ठरवताना लाजा कशा वाटत नाहीत. धुरंधर पूर्वार्ध आणि उत्तरार्ध पाहून तळपायाची तिडिक मस्तकात जाते. कसाला हिंसक आणि प्रोपागंडा सिनेमा आहे हा. असे सिनेमे फक्त आणि फक्त पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या परमोच्च कृत्यांना जगभरात बदनाम करण्यासाठी काढले जातात. 


गेल्या वीस वर्षात ज्या गोष्टी किंवा बातम्या ऐकल्या/पाहिल्या असतील त्यामागचा माहिती नसलेला भाग सिनेमात आहे. पाकिस्तान कसे बकवास आहे आणि दहशतवादाला खतपाणी घालणारा आहे हे दाखवले आहे. हे करण्याची सिनेमॅटिक लिबर्टी दिली कुणी? हे संविधानाच्या विरोधात आहे. व्यक्तिस्वातंत्र्याचा कैवार घेऊन तुम्ही एखाद्या गरीब देशाच्या गरीब औद्योगिक क्षेत्राला बदनाम करण्याचा वैश्विक कट रचला आहे. याला सर्वस्वी जबाबदार समकालीन हिंदुत्ववादी संघटना आणि सरकार आहे. दहशतवादाची मोडस ऑपरेंडी सिल्व्हर स्क्रीनवर दाखवून काय साध्य होणार आहे? कैक वर्षे बॉलिवूड नामक चित्रपटसृष्टीत गंग जमुना तहजीबचे बाळकडू पाजले जात होते ते एकाएकी धुळीस मिळवले जातेय हा निव्वळ करंटेपणा आहे. (अवांतर- खरंतर गंगा जमुना तहजीब भारतातील तमाम पुरोगाम्यांनी शिया सुन्नी पंथीय बांधवांना शिकवायची गरज आहे. अहाहा! यात जर यशस्वी झाले तर मध्य पूर्वेतील अशांतता कायमस्वरूपी नष्ट होईल… असो…) अशात धुरंधर सारख्या चित्रपटात पाकिस्तान स्थित दहशतवाद्यांच्या, गुन्हेगारांच्या कारनाम्यांची मालिका दाखवली जाते. हे सेक्युलर समाजासाठी अत्यंत घातक आहे.  सिनेमॅटिक लिबर्टीचा किती तो अतिरेक! 


आजपर्यंत आजवर अनेक हिंदी चित्रपट भारतीय समाजमन घडवत होते. कैक सिनेमे मानवतेचे उपदेश देऊन सामाजिक बांधिलकी, जाणीवा वाढवत होते. कितीतरी राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त सिनेमांनी समतेच्या कक्षा रूंदावल्या. भारतीय जनमानसात विषमता वाढवण्यासाठी धुरंधर सारखे सिनेमे तयार केले जात आहेत. हा या लोकशाहीवादी देशाचा अपमान आहे. कोण कुठला पंजाबी मुंडा धडाधड गोळीबार करून कोण्या एका स्वच्छ चारित्र्याच्या आमदाराच्या कुटुंबातील पुरूषांना वेचून वेचून ठार करतो. कारण काय तर त्याच्या कुटुंबाला किरकोळ छळ सहन करावा लागला म्हणून. हे काही बरोबर नाही. गांधीच्या देशात अशी हिंसा! हे नितिमत्तेला धरुन नाही. यावरची कडी म्हणजे अंडरकव्हर एजंट म्हणून त्याला पवित्रभूमी पाकिस्तानात पाठवले जाते गुंड होण्यासाठी. मग गल्लीगुंड, गावगुंड शहरीगुंड ते सरकार पुरस्कृत राष्ट्रीय गुंड असा प्रवास करून अननोन मेन ला नेम धरून गोळ्या झाडण्यासाठी फ्री हॅंड मिळवतो. ही कसली दळभद्री कथा? या कथेत कुठेच समता बंधुता एकात्मता दिसत नाही. कोण तो सुक्काळीचा हमजा मारून गमजा “कराची की प्यारी ल्यारी” चा बाजार उठवतो हे सद्सद्विवेक बुद्धीला पटणारे तरी आहे काय? आपल्या देशात काय चालू आहे त्यावर चर्चा करायला नको म्हणून असे सरकारी आशीर्वादाने सिनेमे दाखवले जातात. बेरोजगारी, गरीबी असूनही असे सिनेमे हजारो करोड रुपयांची उलाढाल करतात म्हणजे काय? ही कसली नैतिकता? सामाजिक वीण टराटरा अन् फराफरा फाडली जाते असे सिनेमे पाहिल्यावर. कसला तो जल्लोष सुरु आहे धुरंधर वरून? अननोन मेन म्हणे! कोणत्याही भारतीय एजन्सी ने अननोन मेन आमचेच धुरंधर आहेत म्हणून अधिकृतपणे पुष्टी केलेली नाही. नरिंदर चा दलिंदर सिनेमा म्हणजे धुरंधर. एक नंबरचा वाह्यात सिनेमा आहे. कोण तो बिचारा आतिक अहमद युपीवाला आय एस आय चा हस्तक म्हणून दाखवलाय सिनेमात. मति भ्रष्ट झाली आहे की काय? सेक्युलर भारताचा कणा ताठ रहावा म्हणून धडपडणारा कुशल संघटक आतिक अहमद. गोरगरीब अशिक्षित कमी शिक्षित तरूणांना नशील्या पदार्थाच्या डिलिवरी बॉय म्हणून नोकऱ्या देणारा मसीहा म्हणजे आतिक अहमद. त्याला ऑन कॅमेरा मारल्याचे संदर्भ दाखवून धुरंधर ने नेमके काय साधले? नोव्हेंबर २००८ साली मुंबईतील हल्ला हा विश्वविद्यालयातून स्नातकोत्तर प्रमाणपत्र प्राप्त झाल्यावर शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेऊन अतिरेकी कारवायांच्या ॲपरेंटशीप साठी आलेले भटके हुए जवानांचा डिप्लॉयमेंट प्रोजेक्ट होता. बिचारी तरुण पोरंटोरं ड्रायफुट्स खाऊन एकेफोर्टी सेव्हन मधून गोळ्या झाडून भारतीयांवर टेस्टिंग करत होती. ते पाकिस्तानी प्रदीर्घ अनुभव असणारे प्रबंधक २४x७ डोळ्यात तेल घालून लक्षपूर्वक सगळ्या घडामोडींवर देखरेख ठेवत होते. गो लाईव्ह असा प्रशिक्षणार्थींच्या सी आय सी डी पाईप लाईन प्रोजेक्टला तुम्ही अतिरेकी कारवाई म्हणून पदाखवता? कुठे फेडाल ही पापे! असे पेरून ठेवलेले संदर्भ घेऊन धुरंधर अंगावर काटा येईल असा करण्याचा हेतू नक्कीच वाईट आहे.  मुळात अतिरेकी हे प्रेमळ असतात. जिहाद म्हणून ते समोरच्या व्यक्तीवर गोळ्या झाडतात, बॉम्बने उडवतात. प्राणाची आहुती देतात. अशा निरागस लोकांना निस्वार्थी सेवाकार्य करण्यासाठी मदत केली पाहिजे. आपली न्यायव्यवस्था फासावर लटकवते? हे कोणत्या गुडबुक मध्ये बसतं? 


नोटबंदी सारख्या तद्दन फसलेल्या निर्णयाला वाट्टेल ते संदर्भ देत भलामण करतात का कुठे? बिचारी गोरगरीब जनता नोटबंदीत होरपळून निघाली ते का नाही दाखवले? तासनतास रांगेत उभे राहून केवळ काही नोटांच्या पत्त्या मिळवण्यासाठी तळपत्या उन्हात कडाक्याच्या थंडीत मुसळधार पावसात सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले होते. ते नाही दाखवले धुरंधर मध्ये! दाखवतात काय की कोट्यवधीची बनावट नोटा छापून आलेल्या बाजारात येऊ नये म्हणून नोटबंदी केली ऑपरेशन ग्रीन लीफ. म्हणजे फसलेल्या निर्णयाचे कीती ते महिमामंडन करायचे?  मुळातच हिंदुत्ववादी लोक सत्तेत आहेत त्यामुळे हागलं-पादलं मास्टरस्ट्रोक म्हणून खपवतात गाजावाजा करत. परमपूज्य नेहरूचाचांनी हाती काहीही नसताना देश घडवला तर त्यो नरिंदर हातचं सगळं विकून देश बिघडवतोय. हे पण दाखवा की धुरंधरमध्ये. रणरागिणी इंदिरा गांधींनी तडाखेबाज गुप्तहेर लोकांची रॉ एजन्सी तयार केली होती हे पण लक्षात ठेवा. हा देश फक्त आणि फक्त सेक्युलरवादी लोकच यशस्वीरीत्या पुढे नेत होते. हिंदुत्ववादी पक्ष देश विकून व्यवसायिक लोकांना श्रीमंत करण्याचेच काम करत आहेत. चारपदरी चकाचक रस्ते देऊन विकास होत नसतो. मने जोडणारा रस्ता तयार करणे आवश्यक असते. ते काम सेक्युलर सत्ताधीशांनी केले होते. आताचे सत्ताधारी फक्त द्वेष पसरवत आहेत. अल्पसंख्यांक समाज सामाजिक विषमतेमुळे अडचणीत सापडला आहे. संविधानाची दिवसाढवळ्या हत्या केली जातेय. उरंधरमुळे ही भावना शतपटीने वाढत जाते. जनता पण पढतमूर्ख आहे. सहा दशकांपासून सर्वधर्मसमभाव संस्कार असलेला समाज गेल्या दिड दशकांत घट्ट सामाजिक बांधिलकीची शिवण उसवायला लागली आहे. हे या नाकर्ते सत्ताधीशांचे पाप आहे. 


धुरंधर मध्ये अजून एक ढळढळीत खोटा प्रचार केला आहे की पाकिस्तानच्या आशीर्वादाने भारतात नक्षलवादी आणि खलिस्तानवादी कारवाया चालू आहेत. हे सरळ सरळ डोळ्यात धूळ फेकण्याचे काम करत आहेत. नक्षलवादी चळवळ ही वैचारिक लढाई आहे. प्रसंगी तिचे उग्र स्वरूप जनतेसमोर येते ते हिंसक मार्गाने. त्याला बिचारे नक्षलवादी तरी काय करणार? एक तर कॅपिटालिस्ट लोकांनी जल जंगल जमीन खाजगी मालमत्ता करून टाकली. मग हिंसक उद्रेक होणारच ना? एकतर सरकारी अधिकारी आणि पोलीस प्रशासन प्रामुख्याने जबाबदार आहेत नक्षली तयार होण्यासाठी. नक्षलवादी चळवळींमुळे शोषित वर्गाचा आवाज सर्वसामान्यांच्या कानांवर आला. सुस्तावलेल्या सुस्थापित जनतेला जागं करण्यासाठी केले नक्षलींनी बॉम्बफेक तर बिघडले कुठे? एका डाव्या विचारसरणीचा एक ज्वलंत गाभा आहे नक्षलवाद माओवाद. त्याचे कनेक्शन तुम्ही पाकिस्तानातल्या लोकांशी दाखवून काय मिळवलं? कुजबुज गॅंगच्या कुजबुजी सरळ सरळ सत्तर एम एम पडद्यावर ठशीवपणे दाखवताना लाज नाही वाटत? वर्षानुवर्षे चालू असलेल्या दुकानदारीला धुरंधर नामक चित्रपटाने सुरूंग लावला आहे. विशेष म्हणजे जनतेने डोक्यावर घेतले आहे धुरंधर ला. ही गांविचारांची हाराकिरी आहे. गोडसेविचार बळावला आहे हे सिद्ध होते. 


धुरंधर हा धादांत विखारी सिनेमा आहे. याच्यावर कायमस्वरूपी बंदी घातली पाहिजे. 


एक सटकलेला उद्विग्न नवपुरोगामी 


©️भूषण वर्धेकर

छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य हिंदवी की विद्रोही?

  छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य हिंदवी की विद्रोही? छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनी हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यात आले असा...