बुधवार, २९ एप्रिल, २०२६

भाषिक अस्मिता आणि महाराष्ट्र

 भाषिक अस्मिता आणि महाराष्ट्र 

महाराष्ट्रात जर राजकीय विचार मराठी अस्मिता घेऊन पुढे आला असता तर आपलं महाराष्ट्र म्हणून देशात भाषिक गुरुत्व बहरलं असतं. जशा दक्षिणेत भाषिक अस्मिता कट्टर आहेत तशा. तसेच सामाजिक विचारधारा म्हणून जर पुरोगामी विचार पुढे आणला गेला असता तर सामाजिक विषमता वाढली नसती. कारण सामाजिक विषमता वाढीस लावली जाते ती राजकीय फायद्यासाठी. महाराष्ट्रात झालं नेमके उलटे! आपण राजकीय भूमिका पुरोगामी म्हणून स्वीकारली आणि राजकारणी मंडळींना आयतं चरायला कुरण दिलं आणि सामाजिक भूमिका म्हणून मराठी भाषेच्या अस्मितेचा डोस दिला गेला. याचा परिणाम असा झाला की पुरोगामी महाराष्ट्रात जातीयवादी राजकारण गावपातळीपर्यंत मुरले. भाषा टिकली तर आपण टिकून राहू एकसंध राहू ही जाणीव भाषिक अस्मिता जर रुजली तर एकछत्राखाली सर्व जातपात धर्म येतात. कारण भाषा ही संस्कृतीचा कणा असतो त्यासाठी भरभक्कमपणे राजकीय आशीर्वाद असायलाच पाहिजे. याच्या उलट जर सामाजिक विचार पुरोगामी सर्वधर्मसमभाव म्हणून स्वीकारला तर सर्वसमावेशक समाज म्हणून आपण एकत्र राहू जातपातधर्म न बघता. कारण सामाजिक प्रश्न समस्या या सामाजिक पद्धतीने एकमेकांशी संवाद साधून सोडवता येतात. राजकीय प्रश्न समस्या सोडवण्यासाठी राजकीय दृष्टीने योग्य ते निर्णय घेतले जातात. यात जे सत्ताधारी आहेत त्यांचाच वरचष्मा असतो. महाराष्ट्रात सामाजिक प्रश्न समस्या राजकीय नेत्यांनी सोडवल्या पाहिजेत ही आपली अपेक्षा असते. राजकीय प्रश्न समस्या सोडवण्यासाठी आपण सामाजिक पद्धतीने सोडवण्यासाठी धडपड करतो. दोन्ही बाजूंनी आपणच आपल्या पायावर धोंडा पाडून घेतो. अशाप्रकारे महाराष्ट्रात ना भाषिक अस्मिता कणखर झाली ना पुरोगामी विचार टिकून राहिला. अशी त्रेधातिरपीट झाल्यानंतर ना पुरोगामी विचार जनसामान्य जनतेत मुरला ना भाषिक अस्मिता सर्वदूर पसरल्या. याला सर्वस्वी जबाबदार मराठी माणूस जसा आहे तसाच आपली राजकीय विचारधारा. 


भौगोलिक आणि ऐतिहासिक दृष्ट्या महाराष्ट्र हा देखील काही प्रमाणात कारणीभूत आहे मराठी अस्मिता टोकदार न होण्यासाठी. भौगोलिक परिस्थिती नुसार आपण हिंदी पट्ट्याच्या अगदी जवळ आहोत. त्यामुळे हिंदी भाषिक संस्कृती आपण लगेच आत्मसात केली. या उलट हिंदी भाषिक लोकांनी मराठी संस्कृती लगेच आत्मसात केली का? का नाही केली? आज कामचलाऊ मराठी बोलणारे लोक असो वा मराठी अजिबात न बोलणारी मंडळी आपले दैनंदिन व्यवहार सुरळीत पार पाडत असतात. मराठी हिंदी लिहिण्यासाठी देवनागरी लिपीचे साधर्म्य आहे. त्यामुळे वाचन लेखन आणि बोलणे यासाठी विशेष कष्ट घ्यावे लागत नाहीत. हिंदी मुळात अनेक बोलीभाषा एकत्र करून तयार झालेली आहे. लिखाणाची भाषा आजही प्रमाणित शुद्ध हिंदी वापरली जाते. संस्कृत प्रचुर हिंदी असो उर्दू मिश्रित हिंदी असो दोन्ही व्हर्जन महाराष्ट्रात वापरले जातात. या व्यतिरिक्त बम्बैया हिंदी जी बॉलीवूड मुळे अनेकांच्या तोंडी रूळली. हिंदी भाषिक कधीकाळी महाराष्ट्रात केवळ मोठ्या शहरापुरते मर्यादित होते. कालांतराने नोकरी धंदा उद्योग करण्यासाठी स्थलांतरित कैक हिंदी भाषिक उत्तरेतून महाराष्ट्रात स्थायिक झाले. किमान तीन चार पिढ्या महाराष्ट्रात राहिल्या. त्यामुळे हिंदी आणि मराठीचे सख्य वाढत गेले. विशेषतः मुंबईत मराठी माणूस घाटी म्हणून कधीकाळी ओळखला जायचा. कारकुनी कामं करणारा मराठी माणूस. हीच प्रतिमा साहित्य चित्रपट वगैरे माध्यमात प्रचलित झाली. मराठी माणूस कारकून बनला याला महत्त्वाचं कारण म्हणजे ब्रिटिश. ब्रिटिश काळात विशेषतः १७ वं आणि १८ वं शतक हे बॉम्बे प्रेसिडन्सी मधलं कारखाने उद्योगात आघाडीवर होतं. तशी कारखानदी कलकत्ता आणि मद्रास प्रेसिडन्सी मध्ये पण होती. मात्र मराठी माणूस कारकून म्हणून बॉम्बे प्रेसिडेन्सी मध्ये आला स्थिरावला. अगदी स्वातंत्र्य मिळेपर्यंत मराठी माणसाची मुंबईत टक्केवारी बरीच वाढली होती. कापड गिरणी, जहाज बांधणी आणि इतर उद्योग हे मराठी माणसाच्या रोजीरोटीचे प्रमुख साधन होते. त्यामुळे मराठी सत्ता ही आर्थिक होण्यासाठी जी एक उद्योजक, कारखानदार आणि व्यवसाय पिढी मराठी माणूस वाढायला पाहीजे होती ती कधीच जोमाने वाढली नाही. शिक्षणाचा प्रचार प्रसार झाला तसा मराठी माणसांचा व्यवसाय उद्योग वगैरे वाढला नाही. कदाचित रिस्क न घेण्याचा विचार आणि नोकरशाही हीच सेफ साईड म्हणून बघितली गेली असेल. याचा परिणाम असा झाला की मराठी माणसाव्यतिरिक्त अन्य दक्षिणी आणि उत्तर भारतीय लोकांना जशा संधी उपलब्ध झाल्या तशा त्यांनी उपयोगात आणल्या. त्यामुळे आर्थिक केंद्र म्हणून उदयास आलेली मुंबईची गोची अशी होती की महाराष्ट्रात मुंबई पण आर्थिक राजधानीत प्रस्त वाढले अमराठी लोकांचे! काही काळ मराठी अस्मिता म्हणून राजकारण तापलं. मात्र या राजकारणात मोठ्या मराठी भूभाग आकुंचन पावत गेला याच्या उलट अमराठी भूभाग अजून प्रसरण पावत गेला. आज एकविसाव्या शतकात अडीच दशके उलटून गेली आहेत आणि फक्त मूळ मराठी टक्केवारी बघितली तर लक्षात येईल मूळ मुंबईतून मराठी माणूस उपनगरात फेकला गेला. गेल्या शतकभरात कॉस्मोपॉलिटिन शहर म्हणून मुंबई मध्ये मराठी भाषिक अस्मिता फक्त निवडणूक प्रचारात आघाडीवर राहिली. तशी वेळ ना कलकत्ता ना मद्रास मध्ये गेल्या शतकापासून आली नाही. दक्षिण भारतात पाच राज्यांमध्ये कन्नड तेलगू तमिळ मल्याळम भाषिक अस्मिता ह्या राजकीय पटलावर अधिक टोकदार झालेल्या आहेत. महाराष्ट्रात फक्त मुंबईत मराठी अस्मिता बाकीच्या महाराष्ट्रात का बरं राजकीय पटलावर टोकदार झाल्या नाहीत? कारण आपण राजकीय भूमिका घेतली ती पुरोगामी. बरं पुरोगामी विचार महाराष्ट्रात रूजला का? जोवर सोकॉल्ड पुरोगामी पक्ष सत्तेवर होते तोपर्यंत पुरोगामी विचार पुढे जात होता. मग सत्ताबदल झाला आणि पुरोगामी विचार का खुंटला? उजव्या विचारसरणीचा प्रभाव का वाढला? थोडक्यात हिंदुत्व हा सामाजिक विचार महाराष्ट्रात आला उत्तरेकडून आणि स्थिर झाला. आता हिंदुत्ववादी महाराष्ट्र म्हणून उदयास आला. मग पुरोगामी विचारधारा ही राजकीय आश्रयाला असल्याने खंगत चालली का? याचा विचार केला पाहिजे.


भाषा ही राजकीय साधन आहे वर्चस्व टिकवून ठेवण्यासाठी. जगभरात जे जे काही कांड झाले आहेत त्यांचे मूळ हे भाषा भूमी भय याच्याशी येनकेन प्रकारे निगडित असते. संस्कृती वरील आक्रमण भाषेची गळचेपी करूनच होते. उत्तर भारतात किमान पन्नास बोलीभाषा बोलल्या जात होत्या रोजच्या व्यवहारात. त्यांची जवळीक हिंदीशी जशी झाली तशी बोलीचालीच्या भाषा म्हणून बोलीभाषा खुंटल्या गेल्या. लिखाणात वापरल्या जाणाऱ्या भाषेचा सर्व लोकांना फायदा होतो म्हणून प्रमाण भाषेचा उदय झाला. महाराष्ट्रात तर प्रत्येक जिल्ह्यात बोलली जाणारी बोलीभाषा वेगळी आहे. मग अशी मराठी भाषेची व्याप्ती असलेल्या महाराष्ट्रात मराठी अस्मिता सहजपणे रूळली असती रूजली असती आणि टोकदारपण पुढे आली असती. मात्र तसे झाले नाही कारणं अनेक आहेत. मुख्य कारण मराठी माध्यमात शिक्षणाचा प्रसार झाला नाही. आधुनिक शिक्षण हे इंग्रजी माध्यमात मिळते हा भेकड समज तालुका तालुक्यात पोचला आणि इंग्रजी माध्यमाची शैक्षणिक व्यवसायिक मॉल उभे राहिले. सीबीएसई आयसीएसई माध्यमांमुळे तर गावागावांत मराठी शाळा ओस पडू लागल्या. मराठी शाळेतून बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांना जगात खूप स्ट्रगल करावा लाजतो ह्या न्यूनगंडाने कैक पिढ्यांना पछाडलेले आहे. असा करंटेपणा असेल तर मराठी भाषिक अस्मिता खोलवर रूजेल काय?  शिक्षणाचा दर्जा कसा आहे याचाही विचार केला पाहिजे. सरकारी शाळांमध्ये शिक्षण चांगले नाही म्हणून आम्ही खाजगी शाळांना प्रोत्साहन देतो असा एक गैरसमज आहे. दुसरा सरकारी शाळा म्हणजे लो स्टॅंडर्ड वाटणारी एक पिढी आहे. गंमत म्हणजे याच पिढीतले कित्येक लोक मराठी शाळेत शिकलेले असतात. अशी त्रेधातिरपीट असेल शालेय शिक्षणात तर मराठी भाषिक अस्मिता निर्माण होईल का? घरापासून जर मराठी ऐवजी इतर भाषेला प्राधान्यक्रम दिला गेला तर अस्मिता जगेल का मरेल? मराठी साहित्य देखील आपल्या भाषेचा अस्मितेचा गौरव करण्यात कमी पडले आहे. मराठी साहित्यात एक दळभद्री गोष्ट जगमान्य आहे की सामाजिक जाणीव नेणीव वेदना संवेदना वगैरे भावना व्यक्त केल्या असतील तर उत्तम साहित्य. नसेल तर मागास? मुळातच साहित्य हे रंजक आणि विचार मांडणारे असावे. भडिमार करणारे किंवा रडारडी करणारे नसावे. मराठी साहित्यातील लेखन हे प्रामाणिकपणे सामाजिक जीवनात जाणीवा कशा रूंदावत गेल्या आणि आम्ही समाजाभामुख कसे बदललो वगैरे वैचारिक फुशारक्या मारणारे असते. थोडी जातकुळी बदलण्याची भूमिका घेतली तर लगेचच अभिजन बहुजन विद्रोही दलित साठोत्तरी नव्वदोत्तरी वगैरे शेलकी विशेषणे लावून बेदखल केले जाते. आचकप्रिय की रसिकप्रिय वगैरे शब्दच्छलात निर्ढावलेली किमान दोन तीन साहित्यिक लोकांच्या पिढ्या खपल्या. आमच्या मनाला पटणाऱ्या गोष्टी लिहिल्या तरच तुम्ही खरे सर्जनशील ही कुष्ठरोगी मानसिकता बदलायला हवी. यातून आपण बाहेर पडलो तरच मराठी अस्मितेचे बाळकडू मराठी साहित्यात रूजेल. गेलाबाजार आम्ही असू आधुनिक विचारांचे नवमतवादी वगैरे बंडखोरी मराठी साहित्य विश्वात पृथ्वीवर जीवसृष्टीच्या अंतापर्यंत चालत राहील यात शंका नाही.


मराठी अस्मिता हीच राजकीय भूमिका घेऊन जर सर्व प्रादेशिक राजकीय पक्ष वावरले असते तर महाराष्ट्रात आज जो वैचारिक आणि सामाजिक विचका झालेला आहे तसा तरी निश्चितपणे झाला नसता. दुसरा मुद्दा म्हणजे महाराष्ट्रेतर पक्ष महाराष्ट्रात टिकू शकले नसते. कारण मराठी अस्मिता ही बाहेरच्या पक्षांना मानवली नसती. आज राष्ट्रीय पक्ष जसे दक्षिणेत संघर्ष करीत आहेत तसेच महाराष्ट्रात खर्डेघाशी करत बसले असते. महाराष्ट्रात पुरोगामी हिंदुत्व आणि मराठी अस्मिता खोखो चालू आहे. सत्ताधारी आणि विरोधक हे मराठी अस्मितेसाठी एकत्र येत नाहीत. आर्थिक नाड्या अमराठी लोकांकडे आहेत आणि मराठी माणसाला आर्थिक पाठबळ वाढवण्याऐवजी जातीय पाठबळ वाढवण्यासाठी विशेष रस असतो. मराठी चित्रपट निर्मिती मध्ये आर्थिक पाठबळ अमराठी लोकांचे मिळावे मराठी चित्रपट मराठी अस्मिता निर्माण करण्यासाठी कधीही धडपडणार नाहीत. गंमत म्हणजे दादासाहेब फाळके हे भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक म्हणून ओळखले जातात. यातही दादासाहेब तोरणे की दादासाहेब फाळके यावर वाद घालत असतात . वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्रभावशाली घटक आहे गावपातळीवर पोचलेला. भव्य अशी संत परंपरा लाभलेल्या महाराष्ट्रात संत देखील जातीपातीच्या चौकटीत अडकवले गेले आहेत. थोडक्यात मराठी अस्मिता बळकट करण्यासाठी ज्या ज्या धष्टपुष्ट बाबी महाराष्ट्रात आहेत त्यांचा वापर करून जातीय अस्मिता बळकट झाल्या. भविष्यात धार्मिक अस्मिता मजबूत होतील. मराठी अस्मिता बिचारी वाऱ्यावर फडफडत बसणार! याउलट जर महाराष्ट्रात सामाजिक विचार म्हणून पुरोगामी विचार मुरला असता तर सामाजिक चळवळींची शकलं झाली नसती. गटतट पडून विषमता वाढली नसती. जरी जातीय भावना दुखावल्या गेल्या तरी मराठी अस्मितेच्या छायाछत्राखाली सगळे सामाजिक प्रवाह एकवटले असते. आज महाराष्ट्रात हिंदुत्वाखाली सगळे प्रवाह एकवटले जात आहेत. 



©️भूषण वर्धेकर

२७ एप्रिल २०२६

पुणे - ४१२११५

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

भाषिक अस्मिता आणि महाराष्ट्र

  भाषिक अस्मिता आणि महाराष्ट्र   महाराष्ट्रात जर राजकीय विचार मराठी अस्मिता घेऊन पुढे आला असता तर आपलं महाराष्ट्र म्हणून देशात भाषिक गुरुत्व...