डावे चष्मे उजवे चष्मे
डावे चष्मे उजवे चष्मे
गोल गोल चष्मे
अभिनय करतो चांगला पण
जेव्हा समजले आहे डावा
रटाळ अभिनेता नकोसा वाटला
तिचा आवाज किती छान!
जशी समजली डावीकडची
ऐकण्यात बेसूरपणा वाढला
लिहितो अगदी मनापासून
पण तो ही निघाला डावाच
मग काय? बकवास म्हणून
जागोजागी भासू लागला
डावे चष्मे उजवे चष्मे
फ्रेमलेस चष्मे
अभिनयात आणा सुसंस्कृतपणा
डाव्यांना खटकणार पुन्हा पुन्हा
गायकी झाली जरी लोकप्रिय
डाव्यांच्या कानी घुमे चिरका स्वर
लिहित्या हाती अखंड देशप्रेम
डाव्यांना खटके सेमसेम
सिनेमात वाढली भावनिक
कौटुंबिक नात्यांची गुंतागुंत
तोच तो रटाळ तऱ्हेवाईक
सुमारपणा हीच डाव्यांची खंत
डावे चष्मे उजवे चष्मे
रंगीबेरंगी चष्मे
उजव्यांची पण दीन तऱ्हा
सदैव संस्कारी टेंभा मिरवा
भक्तबापुड्यांची सुसाट पळापळ
गुलामांची बौद्धिकं शब्दबंबाळ
अचानक पसरलेले इंद्रधनु प्राइड
ऑल लाइन क्लिअर बोथ साईड
बेसुमार अभिव्यक्तीचा आगडोंब
आळोखेपिळोखे देत सभ्यतेचे सोंग
सोबत समविचारी राष्ट्रवादी कॉम्बो
दुखावले बिचारे पुरोगामी बोगॅम्बो
डावे चष्मे उजवे चष्मे
भंगलेले चष्मे
सत्याची आस तडकून फुटली
विचारधारेला किंमत नाही उरली
कलेच्या बाजारात झुंडशाही थिजली
विवेकाची आग दीर्घकाळ विझली
सोशल मीडियात पेटतोय रोज
अल्गोरिदमचा नवनवीन डोस
सुष्ट दृष्टीच झाली आधू
दिशाभूल करून संधीसाधू
तयार करतात हुजुरी हुजरे
व्हायरलजीवींचे अनंत सुस्कारे
डावे चष्मे उजवे चष्मे
ढोंगी चष्मे
त्यांना हवय सगळीकडे
फक्त ब्लॅक आणि व्हाईट
तुम्ही असाल आमचे
तरच यू आर ऑलवेज राईट
डाव्यांना शिव्या, उजव्यांना शाप
त्रेधातिरपीट अन् वैचारिक संताप
आमचा आहे तो बाब्या
तुमचा आहे तो ठोंब्या
ब्रेनलेस होपलेस टाळकी
उगाचच एकमेकांवर धडकी
डावे चष्मे उजवे चष्मे
कळकट्ट चष्मे
कलाकार आमचाच पाहिजे
आणि असे लेखकाचा आमचा
सिनेमाचे आशय असतील पटणारे
तरच तुमचा सैद्धांतिक वसा
नाहीतर लावून राजकीय लेबले
फुलवून विचारांचा शिरजोर कसानुसा
उभ्या-आडव्या रेषा ओढून ताणून
ठेवलंय एकेकाला चौकटीत कोंडून
डाव्यांचा बुरखा, उजव्यांचा झेंडा
नव्य काळाचा कुजलेला फंडा
डावे चष्मे उजवे चष्मे
पारदर्शी चष्मे
फेकून द्या ती कलुषित भिंगे
दृष्टीला होऊ द्या निखळ
कलेत पाहू कलाच निर्मळ
त्यागून कट्टर दुराग्रह
डाव्या-उजव्यांच्या पलीकडे
चष्म्याविनाच डोळे उघडून
कर्दमलेली मने सताड उघडे
माणुसकीचा सांधा साधून
भरू द्या जखमा भाव हळहळ
सदैव वाहू देत सुफळ वर्दळ
©️भूषण वर्धेकर
४ नोव्हेंबर २०२६
पुणे