शुक्रवार, ९ ऑक्टोबर, २०२६

आदगावचा मस्कऱ्या

 आदगावचा मस्कऱ्या


आदगाव म्हणून आटपाट नगर सारखे समृद्ध गाव होते पुस्तकातील गोष्टी प्रमाणे. तसं लोकशाहीवादी गाव पण उद्योगपती ठरवायचे लोकशाहीत कोण आदगावचा कारभार चालवणार ते! कारण कारभारी नामधारीप्रमुख फक्त. बाकीचे उद्योगपती कारखानदार व्यवसायिक आणि धंदेवाईक लोकांची जंत्री आदगावचा कारभार चालवायची. आदगावच्या या पडद्यामागच्या कारभारी लोकांच्या पार्श्वभागात लय मोठा किडा वळवळत होता कुठल्याही आजूबाजूच्या गावातील भांडणतंट्यात नाक खुपसून आपापली दुकानदारी चालू ठेवायची. अशा पडद्यामागे राहून सगळ्यांच्या गुंतवणूकीवर वाढलेला वाढीव नवा उमदा व्यवसायिक धंदेवाईक कारखानदार भांडवलदार म्हणजे मस्कऱ्या. 


या मस्कऱ्याला कायबी करून दूरवरच्या गावात काड्या करण्यासाठी एन्ट्री घ्यायची होती. या दूरवरच्या गावचा नवा सरपंच नरूशेठ लय तालेवार माणूस. लय जणांच्या पुंग्या टाईट करून सलगपणे पंचवीस वर्षे वाड्या वस्त्या पासून ते गावचा सगळा कारभार पाहत होता. दिसलं पब्लिक की ठोक भाषण आला कॅमेरा की देऊन पोझ काढ फोटो हे लय भारी जमायचे गड्याला. त्यागावच्या लोकांना पण लय अप्रूप होते की कसलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना एकमाणूस सलगपणे पन्नास वर्ष सामाजिक आणि राजकीय जीवनात काम करतो त्यापैकी पंचवीस वर्षे प्रमुख म्हणून कारभार बघतो. गावघराण्याच्या राजकीय लोकांना पण कालांतराने जनता झिडकरते. पण नरूशेठ लय जबरी रसायन होतं. जनतेचे आशीर्वाद आणि प्रचंड राजकीय इच्छाशक्ती लागते. काही लोकांना प्रचंड अतिप्रचंड राजकीय इच्छाशक्ती असते पण जनाधार मिळत नाही तर काही लोकांना प्रचंड जनाधार मिळतो पण पदे मिळत नाहीत चालायचंच नशीब असतं एकेकाचे! 


लोकशाही मार्गाने गावातील कारभार सुरू होता पण काही सामाजिक सांस्कृतिक राजकीय लोकांना मात्र नरूशेठ लय खुपायचा डोळ्यात! आदगावच्या मस्कऱ्याने एकदा दोनदा नरूशेठची भेट घेतली होती आणि हवाबाजी पण केली होती. त्याचं काय झालं की मस्कऱ्याला दिडशेपेक्षा जास्त गावांमध्ये पसरलेल्या व्यवसाय धंद्याचा पसारा नरूशेठच्या गावात मांडायचा होता. पण गावातील पिढ्यानपिढ्या धंदा व्यवसाय करणाऱ्या लोकांना तो गावातच नको होता. गावातील लोकांना अन्न वस्त्र निवारा वगैरे प्राथमिक गरजा पूर्ण करण्यासाठी आजूबाजूच्या गावावर अवलंबून राहावं लागत होतं. गावकीकरण झालेल्या काळात तशी तडजोड करून ठेवली होती आधीच्या कारभाऱ्यांनी. गावकीकरण झाल्यानंतर गावात तशी समृद्धी पण आली होती तशीच बरबादी पण झाली होती. कोण बरबादी दाखवतो तर कोणी समृद्धी! गावकीकरणाचा मिड एज क्रायसिस सुरु झाला होता. त्यामुळे यावेळी नरूशेठचा फोकस एकच होता गावातीलच व्यवसायिक धंदेवाईक कारखानदार उद्योगपती लोकांच्या हातात गावातील कारभार सोपवायचा. यामध्ये नरूशेठचे लाडके दोडके सगळे होते. लाडका अदुभाऊ तर दिसला धंदा की टाक भांडवल येतोय व्यवसाय की टाक कंपनी करत सगळीकडे धुमाकूळ घातला होता. आधीपासूनच गावात टाटियाशेठ , बज्याभाऊ, बरल्याभाऊ, मह्याभाऊ, वड्याभाऊ, अबुभाऊ तगडे लोक मैदानात पाय रोवून बसले होते. अदुभाऊ वर सगळेच जळत होते बिचारे! जळकुकडे! 


आता खरंच लय भारी गॅटमॅट होणार होतं. मस्कऱ्याला गावात जर व्यवसाय धंदा बिंदा करायला लायसन परमिशन जर मिळाली तर! अबुभाऊ ला टसल होणार होती. अबुभाऊ ने गावाच्या पूर्वाश्रमीच्या कारभाऱ्यासोबत आधीच झांगडगुत्ता करून लय लय बेकार घुसखोरी केली होती सगळीकडे. तसा अबुभाऊ ला काही फरक पडत नव्हता गावकारभार कोण चालवणार ते. येऊ द्या कुणीबी हाय तगडे आमीबी! असा सगळा देऊन-घेऊन, खाऊन-पिऊन कारभार करायची नवी संस्कृती कधीचीच जन्माला घातली होती. असा गावात पाया घातला अबुभाऊ ने आता कळस चढवत होता अदुभाऊ! गावाच्या भल्यासाठी सगळे मस्कऱ्याला गावात येऊन बस्तान मांडून देऊ नका म्हणून सगळे जाणकार मनोमन सांगत होते. कारण मस्कऱ्याने दिडशेपेक्षा जास्त गावांत व्यवसाय धंदा जरी वाढवला असला तरी बांध वाढवून शेत आत घेण्याऱ्या काही गावांमध्ये टपून बसलेल्या गावढापी लोकांची मस्कऱ्याची चांगली गट्टी भट्टी जमली होती. तुमघ्या बांध वाढवून शेती आत करतो मी सातबाऱ्याचा कारभार तालुक्यात नेऊन. कारण तहसील कचेरीत सगळे बाबू आदगावच्या तुकड्यांवर जगत होते. तू वाढव तुझं गाव जो अडेल त्याला नडेल नायतर मी डायरेक्ट तोडेल असा साधा सोपा नियम होता मस्कऱ्याचा. सगळ्यांच्या गावकारभारात नाक खुपसून काड्या करायचा. तशी कागाळ्या करण्याची जातखोड मोडायची कठोर तपश्चर्या नरूशेठ आणि कंपनी करत होती लय दिवसांपासून. गावातील लोकांची पण मूकसंमती होती त्यामध्ये. कारण गावातील बांधावरून दोन तुकडे आधीच झाले होते ती भळभळती जखम नरूशेठ आणि कंपनीसाठी कायमस्वरूपी होती. तेव्हाच उग्र मवाळ जहाल मधाळ गटातटांना एकत्र बांधून नरूशेठ आणि कंपनी गावपातळीवर पाळमुळं घट्ट रोवून उभी होती. 


आदगावच्या मस्कऱ्याला समजून चुकले होते आदगावचा भुऱ्या केसाचा गावकारभाऱ्याला आदगावचेच गावकरी लय वैतागले आहेत ते. पुढच्या वेळी त्यो आणि त्याची पाटीलकी तोंडवर आपटणार म्हणून! यासाठी घायकुतीला येऊन कायबीकरून नरूशेठला बाटलीत उतरवून गावात व्यवसाय धंदा सुरू करायचा आणि निवांत दाणा, पाणी, चारा, कडबा कुट्टी वाटत बसायचे हेच मस्कऱ्याला वाटत होते. झालं जे हाय मनात गचकन आलं तोंडात. आजूबाजूच्या गावांमध्ये पण बबाल केलं नरूशेठ मुद्दाम मला गावातल्या लोकांना सेवा करण्याची संधी देत नाही ते. ही संधीसेवा फक्त लाडक्या दोडक्यांसाठी राखून ठेवली आहे म्हणून. एकच बबाल झालं. याचा फायदा घेणारी मंडळी तरबेज होती पण साशंक होती. कारण मस्कऱ्याला संधी दिली तर आपल्याला नागडं करून पळवंल याची मनातून खात्री होती. एक नागडं उघडं बारकं पोरगं होतं गावागावत वाड्यावस्त्या जोडो म्हणत फिरत सोतं. गावपाटलाचा पणतू हीच त्याची खरी ओळख. त्याला काय कुठून अवदसा आठवली आणि मस्कऱ्याला रेड कार्पेट घालून बोलवायला आतूर झाला. जुने जाणकार गावपाटलाचे आदर करणारे पण मनापासून नको व्हायला असं म्हणत होते पण काय पण करायचं नरूशेठला घालवायचं हेच सगळ्यांना पायजे होतं. बाहेरगावच्या पावण्याकडून साप मेला तरी चालेल नंतर तीच काठी पावण्यानी सगळ्यांच्या ढुंगणात घालून ठेवली तरी चालेल पण नरूशेठ नको हीच मनोमन सदिच्छा होती गावातील असंतुष्ट लोकांची.


गावकरी मात्र निर्धास्त होते एकतर कमालीचा विश्वास किंवा अज्ञान! यावेळी मात्र नरूशेठ आणि कंपनी ची सत्व तत्व परिक्षा होती. यावेळी पडद्यामागचे काही कलाकार कागाळ्या करायला तयार होते रोजंदारी चालण्यासाठी. खरी परिस्थिती काय आहे आणि काय होईल हे समजण्यासाठी सगळेच उत्सुक होते. अबुभाऊ अदुभाऊ नरूशेठ आत्मनर्भर ते गावनिर्भर साठी काय करणार याकडे सगळयांचे लक्ष लागले होते.


©️भूषण वर्धेकर

९ ऑक्टोबर २०२६

पुणे 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आदगावचा मस्कऱ्या

  आदगावचा मस्कऱ्या आदगाव म्हणून आटपाट नगर सारखे समृद्ध गाव होते पुस्तकातील गोष्टी प्रमाणे. तसं लोकशाहीवादी गाव पण उद्योगपती ठरवायचे लोकशाहीत...