आरंआरंआरं

आरं आरं आरं

बाबाओ, काय बघितलं मी कायचं समजून न रहायलं.. आरं आरं आरं

एका आदीवाशी पोरीला इंग्रजाची बायको घेऊन जाते मग इंग्रज कश्शे निष्ठूर असत्याय ते बी पिक्चर मध्ये येतंय. मग आदीवाशी लोकांचा भीम नावाचा पयला  हिर्रो त्या मुलीला आणण्यासाठी दिल्लीत धडक मारतो. वेश बदलून अख्तार म्हणून राहतो. तोवर इकडे इंग्रजांची पोलीससेवा करणारा दुसरा हिर्रो राम हा लय भारी हजारो लोकांचा मार खाऊन तितक्याच लोकांशी मारधाड करून एका माणसाला अटक करतो. दोन्ही हिरोंची भेट व्हण्यासाठी एका गरीब बिचाऱ्या पोराला यमुना नदीत मासे पकडायला पाठवत्यात. मग मग नदीवरच्या पुलावरनं रेल्वे जखताना डायरेक्ट लोखंडी चाकाला आग लागते मग तीच आग पाण्यात पण लागते. मधोमध तो बिचारा पोरगा. नंतर हाय लय भारी स्टंट. एक हिरो इकडून घोड्यावर दुसरा हिरो तिकडून फटफटीवरुन कमरंला दोरी बांधून खाली पुलावरनं उड्या मारत्यात. घोड्यावरचा हिरो उडी मारताना 'वंदे मातरम' लिवलेला झेंडा घेतो. (हा झेंडा सावरकर, भिकाजी कामा व शामजी कृष्ण वर्मा यांनी डिझाइन केलेला आहे १९०७ साली. वाचकांच्या खास माहिती साठी. १९०४ ते १९३१ काळात झेंड्याच्या डिझाइन मध्ये वेगवेगळे बदल झाले. कारण सिनेमाचा काळ १९२० च्या आधीचा आहे. असो.) मग दोघंबी दोरीला लटकून  पयल्यांदा मासं पकडणाऱ्या पोराला वचिवतात. मग एकमेकांना वाचिवतात. मग नदिच्या तळाशी स्टंट करत्यात. मग जिग्री दोस्त व्हत्यात. तोवर आदिवाशी पोरगीला वाचवण्यासाठी एक हिरो जंगली प्राणी घेऊन हल्ला करतो. त्याला अटक करण्यासाठी दुसरा हिरो त्याच्या मागे लागतो. मग फुल इमोशनल ड्रामा, मेलोड्रामा, डायलागबाजी. 
मग परत भांडत्यात एकमेकांना लय मारत्यात. पहिल्या हिरोला अटक व्हते. त्याला शिक्षा होते. तोवर हिकडं दुसऱ्या हिरोची येगळीच श्टोरी सुरू होते. वडीलांची अर्धवट राह्यलेली ईच्छा पुरी करायला गडी पेशल आफिसर होतो इंग्रजांचा. तोवर इंग्रज दुसऱ्या हिरोला चाबकाचे फटके मारायला पयल्याला सांगत्यात. तो बी मारायला तयार व्हतो. मग भर चौकात सगळ्यांसमोर पयल्या दुसरा हिरो चाबकाचे फटके मारतो. पयला हिरो देशभक्तीपर गाणं बोलतो. त्याचं रक्त सांडणं मग त्यामुळे बघणारे लोक पेटून उठणं अगागागायायाया लय भारीच. मग ज्या पोरीला सोडवण्यासाठी पहिला हिरो आलेला असतो त्याला फाशी देण्यासाठी दूरवर नेतात. सोबत त्या पोरीला बी नेतात. मग दुसरा हिरो पहिल्याची मदत करतो पळून जाण्यासाठी. पयल्याला हे समजतंच नाय. मग इंग्रज दुसऱ्याला अटक करून लय बेक्कार शिक्षा करतात. तोवर त्याचीच फकस्त दाढी वाढलेली असते. इकडं पहिल्या हिरोला, छोट्या पोरीला आणि त्यांच्या लोकांना इंग्रज सगळीकडं लय शोधतात. एके ठिकाणी दुसऱ्या हिरोची बायको त्यांना मदत करते. मग ती कोणाची बायको हे समजतं. मग पयल्याला लय वाईट्ट वाटतं. मग तो दुसऱ्याला पोलीसांच्या तावडीतून लयभारी हाणामाऱ्या करून सोडवतो. दुसरा हिरो पयल्याच्या खांद्यावर बसून हिकडनं तिकडनं उड्या मारून सगळ्यांना मारून बंदुकीच्या गोळ्या चूकवून जंगलात जात्यात. मग जंगलात सगळे इंग्रज लोक बंदुका बॉम्ब घेऊन ह्यांच्या मागं लागतात. पहिल्या हिरोकडं काय बी नसतं मारामारी करायला म्हणून त्यो फटफटी उचलून मारतो एकेकाला. दुसरा हिरो भगव्या कापडाच्या धोतर उपरण्यात लय खतरनाक दिसतुया. जबराट. हवेत उडू उडू बाणाने मारतुया. बंदुकवाल्या एकेका इंग्रजाला धनुष्यबाणाने सुई सुई करत मारतो. मग पयला हिरो हवेत फटफटी उडवतंय दुसरा पेटलेल्या बाणाने फटफटीला आग लावतंय. ती फटफटी डायरेक्ट दारूगोळा ठेवलेल्या गोदामात जाती. दोन हिरो बी तिथंच मेन व्हीलन बी तिथंच. मोठ्ठा स्फोट होतो व्हीलन आणि दोन हिरो सोडून सगळे मरतात. व्हीलन इंग्रजाला एक बाणाने मारतो दुसरा बंदुकीच्या गोळीने मारतो. स्फोटात वाचलेल्या बंदुका घेऊन दुसरा हिरो गावी होडीतून येतो. मग दुसरा हिरो 'जल जंगल जमीन' झेंडा दावतो अन् पिक्चर संपतो.

(विशेष सूचना: सिनेमातील फायटिंग सीन्स भारी आहेत. राजमौली चे भव्य दिव्य सेट स्पेशल इफेक्ट दमदार. कोमारम भीम आणि सीताराम राजू हे दोघेजण दक्षिणेकडील खरेखुरे स्वातंत्र्यपूर्व काळातील लढवय्ये क्रांतिकारक होते. कोमारम भीम यांची जल जंगल जमीन आदीवासी लोकांसाठीची चळवळ खूप महत्वाची. आरआरआर सिनेमा फक्त राजमौली स्टाईल, पावरपँक्ड एक्शन, पॉवरफुल फुल्ल ऑफ स्पेशल इफेक्ट्स, क्लासिक फोटोग्राफी साठीच बघावा. स्वातंत्र्य चळवळीचे वगैरे संदर्भ शोधू नयेत.)
©भूषण वर्धेकर
२७ मार्च २०२२, पुणे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मराठा आरक्षण आणि वास्तव

मोदीस्तोमाची दशकपूर्ती

विवेकवादी हतबलता - पूर्वार्ध