मंगळवार, १५ मार्च, २०२२

काश्मीर फाईल्स

दि काश्मीर फाईल्स - अस्वस्थ करणारा अनुभव

सिनेमा पाहताना जर अस्वस्थ वाटत असेल तर त्या सिनेमाचा कंटेंट आणि कंटेक्स्ट योग्य जागी प्रहार करतो. अर्थातच सगळेच मनाला भिडणारे सिनेमे ह्यूमन लेवल वर करूण वाटतात. ठणकावून आणि ओरबडून सत्य सांगणारे सिनेमे फार कमीच. त्यापैकी काश्मीर फाईल्स. काश्मिरी पंडितांच्या शिरकाणाबद्दल तिखट आणि तीव्र भाष्य करणारा सिनेमा. काही लोकांना हा सिनेमा प्रोपागंडा वाटतो कारण त्यांच्या डीप नॅरेटिव्हला धक्के बसतात म्हणून. सेट केलेलं नॅरेटिव्ह जर खोटं पडू लागलं की जळफळाट, तळमळ, खदखद बाहेर येणं सहाजिकच आहे. मात्र जे काही दाखवले आहे काश्मीर फाईल्स मध्ये ते सत्य घटनेवर आधारित आहे. कपोलकल्पित कथांवर तर नक्कीच नाही. कारण या सिनेमासाठी जो रिसर्च केलाय तो सिनेमा बघताना आतून हादरवतो. अतिरेक्यांनी पंडितांवर हल्लेच केले नाहीत असं जर कोणाचं म्हणणं असेल तर पंडित काश्मीरमध्ये का राहिले नाहीत? विस्थापित का व्हावे लागले पंडितांना? अर्थातच अतिरेक्यांनी गुलाबपुष्प देऊन पंडितांना काश्मीर सोडा म्हणून तर सांगितले नव्हते! 

आपल्याच देशात  मूळ रहिवाशांना आपापल्या घरादाराला सोडून त्रयस्थ ठिकाणी जीवाच्या भीतीपोटी विस्थापित व्हायला भाग पाडले हे त्रिकालाबाधित सत्य आहे. ताश्कंद फाईल्स साठी जसा रिसर्च केला होता तसाच खोलवर जाऊन रिसर्च या सिनेमासाठी केला हे स्क्रिप्ट मध्ये दिसून येते. कलाकारांचे परफॉर्मन्सेस पॉवरफुल झाले आहेत. सिनेमाची गोष्ट जसजशी पुढं सरकत जाते तसतसे काही संदर्भ मध्येच कसे काय आले असा प्रश्न पडतो. अशा किरकोळ त्रुटी वगळता सिनेमा बघण्यासारखा झालाय. उदाहरणार्थ बाळासाहेब ठाकरेंनी विस्थापित काश्मिरी पंडितांच्या मुलांना शिक्षणासाठी काही जागा वाढवून दिल्याचा उल्लेख आहे. मात्र महाराष्ट्रात युतीचे सरकार ९५ नंतर आले. ८९-९० सालातील हल्ले दाखवले गेले. मात्र डिरेक्टोरिअल लिबर्टी म्हणून असे संदर्भ खपून जातात. दुसरा प्रसंग म्हणजे रक्ताने माखलेले तांदूळ खाऊ घालणे. हा प्रसंग कधीकाळी बंगालमध्ये खराखुरा घडलेला आहे. तत्कालीन कॉंग्रेसच्या नेत्याला घरात घूसून असेच मारले होते कम्युनिस्ट लोकांनी. सैनबारी हत्याकांड म्हणून प्रसिद्ध आहे. त्या घटनेचा पंडितांचे हाल दाखवताना आधार का घ्यावा हे समजले नाही. सिनेमात पंडितांवर झालेले अनन्वित अत्याचार पाहून आतून उध्वस्त होतेच. मग समजते प्रत्यक्षात किती आणि कसे हाल त्यांनी सहन केले असावेत! त्याहूनही वाईट वाटते तथाकथित लोकांच्या डीप सिस्टिम्सचा अवाका आणि ब्रेनवॉश करण्यासाठी केली जाणारी हुकुमी पद्धत. सिनेमात हिंसक दृश्ये दाखवली आहेत कारण हिंसा हेच अस्त्र वापरलं गेलं पंडितांना हुसकावून लावण्यासाठी. 

स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जुनागढ, हैद्राबाद आणि काश्मीर या संस्थानाच्या इतिहासातील घडामोडींचा जर सिनेमात उल्लेख आला असता तर सिनेमात एक महत्त्वाचा टप्पा मांडला गेला असता. त्यानंतर सोव्हिएत रशियाच्या पाडावानंतर काश्मीरमधील कित्येकांना अचानक कसा काय इंटरेस्ट वाटू लागला याचेही धागेदोरे सिनेमात मांडता आले असते. कारण इस्लामिक स्टेटची मोडस ऑपरेंडी अचानक एकाकी वाढली नाही. तिचा शिरकाव खूप आधीपासूनच झाला. मग स्वतंत्र काश्मीर चे आळोखेपिळोखे नंतर भारताने बळकावल्याची भावना वगैरे सिनेमात यथोचित मांडली आहे. कारण काश्मीर स्वतंत्रपणे केवळ धर्माधारित हवा होते तत्कालीन अलगाववादी लोकांना. त्यांना छुपा पाठिंबा देणारे भारतातील तथाकथित विचारवंत आणि त्यांना रसद पुरवणारे पॉलिटिकल थिंकटँक समांतरपणे कार्यरत होते. साधा सोपा प्रश्न आहे जर स्वतंत्र काश्मीर हवा होता तर काश्मीरमधील पंडितांचे जिनोसाईड करण्याची काय गरज होती?

काश्मीरमधील प्रश्नांची उकल करण्यापेक्षा ते तसेच ठेवून कैक लोकांचे वेस्टेड इंटरेस्ट इनकॅश करायचे उद्योग काही नवे नाहीत. रलीव, सलीव, गलीव चे नारे देऊन पंडितांवर काश्मीर सोडण्याची वेळ आली याला जबाबदार कोण? इस्लामिक टेररिझमला पाठीशी घालणारे कोण? सत्य दाबून ठेऊन इन्फो वॉर चालवणारे कोण? याची उत्तरे सिनेमा पाहून समजतात. मुस्लिम ऑप्रेस्ड झाला म्हणून अतिरेकी कारवायांकडे वळाला हे भंपक लॉजिक कैक दशकांपासून लोकांच्या मनावर बिंबवलं जाते. मुळातच धार्मिक कट्टर शिक्षण लहाणपणापासून दिल्यावर मेंदूत सर्वधर्मसमभावाचा मागमूस तरी राहील का? अशा धार्मिक कट्टरपंथी अतिरेकी सोकॉल्ड फ्रीडम फायटर होऊच कसे शकतात. तसं त्यांना एखाद्या इकोसिस्टिमने जर प्रमोट केले तरच असे होऊ शकते. इकोसिस्टिम कोणी राबवली कशासाठी राबवली कोणाचे काय मनसुबे आहेत यावर काश्मीर फाईल्स सडेतोड भाष्य करतो. हे असं उघडंनागडं सत्य पचवायला तथाकथित पुरोगाम्यांना शक्य नाही. कारण त्यांना पंडितांबद्दलची सरकारने जाहीर केलेली आकडेवारी प्रिय आहे. हेच तर्कट गुजरात दंगलीवर पुरोगामी कदापिही मान्य करणार नाहीत. कारण गुजरात दंगल हा पुरोगाम्यांचा जीवाभावाचा विषय. मात्र गोध्रा हत्याकांडानंतर गुजरातमध्ये दंगली पेटल्या हे स्विकारणे पुरोगाम्यांना जमणार नाही. हा विषय खूप खोल आहे. तसेच दलितांवर झालेल्या अत्याचाराचे खापर जसे तथाकथित सवर्ण आणि प्रस्थापित वर्गावर फोडले जाते. तसे पंडितांवर झालेल्या अत्याचाराचे खापर इस्लामिक टेररिझमवर जाहीरपणे कोणी सोकॉल्ड स्कॉलर फोडत नाही. मुळातच पॉलिटिकल इस्लाम, मुल्लांचा इस्लाम की अल्लाह चा इस्लाम यातच खूप लोकांचे बेसिकमध्ये राडे आहेत. मुसलमान स्वतःच्या धार्मिक आस्थांना कवटाळून नक्की काय आणि कशी भूमिका घ्यायची याच्याच विवंचनेत असतो. तलवारीच्या टोकावर इस्लामिक प्रसार प्रचार झालाय हे सर्वश्रुत असून देखील जिहाद म्हणजे धार्मिक बाब म्हणून दुर्लक्षित केला जातो. मी मागे कोणत्यातरी वेच्यात लिहिले होते अल्पसंख्याक असू तेव्हा विशेषाधिकार आणि बहुसंख्य झालो की सर्वाधिकार हीच शिकवण लादली गेलीय धर्माच्या नावाखाली. मग शरीया, कुराण दिमतीला आहेच. सोबत समुदायावर असलेले मुल्ला मौलवींचे वर्चस्व. अशा त्रेधातिरपीट असलेल्या गुंतागुंतीची व्यवस्था असताना सोकॉल्ड मुस्लिम स्कॉलरांनी पुढे येऊन प्रबोधन करण्याची गरज असते. मात्र तसं होताना दिसत नाही. कोणताही पुरोगामी असे प्रबोधन करण्यास उत्सुक नसतो. हिंदुत्ववादी लोकांना हाच मुद्दा मिळतो ध्रुवीकरण करण्यासाठी. 

सर्वात महत्त्वाचं या सिनेमात भिडणारे आहे ते म्हणजे गोंधळलेल्या कृष्णा पंडितचे मानसिक द्वंद्व. त्यासाठी दिग्दर्शकाने जेएनयूस्टाईल इन्स्टीट्यूट ज्या पद्धतीने उभी केलीय त्याला तोड नाही. मग प्रेसिडेंट इलेक्शन, प्रचार, स्पीच वगैरेंची विषयसुचक पेरणी भारी केलीय. डाव्यांची बौद्धीकं ज्या पद्धतीने मेंदूत बिंबवली जातात त्याचा वापर स्वैरपणे स्क्रिप्ट आणि प्लॉटमध्ये केलाय. हे करताना सिनेमा कुठेही पकड सैल करत नाही कारण अभिनेत्यांनी केलेल्या चाबूक परफॉर्मन्समुळे. विशेष अनुपम खेर. सारांशमधला हतबल म्हातारा ज्या ताकदीने उभा केला होता त्याच ताकदीने पुष्करनाथ पंडित उभा केलाय. बाकीचे सोबतीचे तेवढेच ताकदीचे कलाकार. त्यांच्या त्या काळच्या आठवणी ज्या पद्धतीने मांडल्या आहेत त्यावरून प्रशासकीय कारभारात काही तरी करू पाहणाऱ्या लोकांची हतबलता लक्षात येते. डोळ्यासमोर जूलुस निघतात. आजूबाजूला हिंसक हल्ले होतात. वेचून वेचून पंडितांना ठार केले जाते अल् जिहादच्या नावाखाली. हे बघून सून्न होते. हे जे दाखवलंय ते काय मनघटीत कहाण्यांवर तर नक्कीच नाही. या वर वेगवेगळ्या वेळी खूप लोकांनी लिहिले आहे. मात्र सिनेमाच्या माध्यमातून लोकांसमोर पहिल्यांदाच येतंय. हे धाडस महत्त्वाचे. अर्थातच याला प्रोपागंडा म्हणणारे अट्टल आहेत. त्यांची सर्वात मोठी गोची अशी आहे की असे घडले होते जाहीरपणे बोलूही शकत नाहीत. मुळातच जसे काश्मीरमधील हिंदू होरपळले तसे काश्मिरी मुसलमान पण हकनाक बळी पडले. काश्मिरी पोलिसांना तर कोणीही वाली नाही. त्यांच्यावर पण असाच सिनेमा यायला पाहिजे. पण मेख तिथेच आहे बहुसंख्य काश्मिरी पोलीस हे मुस्लिम आणि इस्लामिक अतिरेक्यांनी त्यांच्यावर केलेले अमानुष हल्ले जर सिनेमात दाखवले तर त्यालापण प्रोपागंडा वगैरे लेबल लावून मोकळे होता येणार नाही. एरव्ही हिंदु दहशतवाद, भगवा आतंकवाद वगैरे बरळणारे काश्मीरमधील आतंकवादाला उभ्या आयुष्यात इस्लामिक टेररिझम बोलणार नाहीत. कारण कैक वर्षे सेट केलेले नॅरेटिव्हला तडा जाईल. काश्मीर बाबतीत सेपरेटिस्ट, फ्रीडम फायटर वगैरे बीरुदावलल्या जाणूनबुजून पेरल्या.

सिनेमा बघताना फक्त पंडितांवर झालेला अत्याचार दाखवला आहे असे वाटत नाही. एकमेकांच्या खोलवर पसरलेल्या गुंतागुंतीच्या सिस्टिम्स कशा वापरल्या जातात हे समजते. मग लढणारे वेगळ्या पातळीवर जातात आणि फिल्डवर होरपळून मरणारे बिचारे पंडित दिसतात. 'सियासत की लडाई' न राहता 'धर्म की नोंकपर लहराएँ परचम' पर्यंत सिक्वेन्सेस ढळढळीत दिसतात. ज्यांनी इतिहास भूगोल वाचलाय काश्मीर विषयी त्यांना फार काही हादरे बसत नाहीत. मात्र ज्या धाडसाने सिनेमात मांडलेय त्याचं कौतुक वाटतं. कारण अशा जेनोसाईडवर माहितीपट, न्यूज हिस्टॉरिकल सेगमेंट आले असते तर इम्पॅक्ट पडला नसता. सिनेमाने तो पडतो. सिनेमा बनवणे ही सर्वात महागडी कला. त्यात अशा विषयांवर एवढी जोखीम घेऊन सिनेमा बनवणे आणि कमर्शिअल पद्धतीने ऑडिअन्स ला सिनेमागृहात खेचून आणणे सहजसाध्य नाही. बॉलिवूड चौकटीच्या कसल्याही प्रमोशनल टेकनिक्स न वापरता सिनेमा चालतो लोकांना आवडतो हे या सिनेमाने दाखवून दिलेय. सिनेमाचं माध्यम लोकांपर्यंत न आणलेल्या गोष्टी दाखवू शकतो हे पुन्हा सिद्ध केलंय. काहींना हे प्रचारतंत्र वाटतेय. वाटणारच कारण त्यांनीही कधीकाळी असाच प्रचारासाठी प्रयत्न केलेला असावा. कारण ज्या ठामपणे सांगितले जातेय की काश्मीर फाईल्स हा असत्यावर आधारित आहे तर त्या ठामपणे ते सत्य नेमके काय हे सांगत नाहीत. 

सिनेमाची सर्वात मोठी बाब म्हणजे गोष्ट सांगणे. ती जर का फसली तर सिनेमा प्रेक्षकांना पकडून ठेवत नाही. नेहमीची गोष्ट सांगताना लोकांना नेमकं अमुकतमुकबद्दल काय घडलं याची उत्सुकता शेवटपर्यंत टिकते. हे दिग्दर्शकीय कसब. शेवट निराशा करणारा असला तरी विचार करायला प्रवृत्त करतो कोणत्याही संवेदनशील माणसाला. आपल्याच देशात आपल्याच नागरिकांना अशाही प्रकारे जगावं लागलं कसलीही चूक नसताना. हे भीषण वास्तव मनाला  हादरा देतं सिनेमा संपल्यानंतरही.

© भूषण वर्धेकर
१५ मार्च २०२२
पुणे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

एकविसाव्या शतकाची गद्धेपंचवीशी!

एकविसाव्या शतकाची गद्धेपंचवीशी! एकविसाव्या शतकाची अडीच दशकं सरली. गेल्या पंचवीस वर्षात साहित्य, चित्रपट, नाटक, सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थि...