एका स्त्रीवादी बाईचा महिला दिवस
सकाळी सकाळी मोबाईलवर आलेले प्रमोशनल मेसेजेस वाचून एक स्त्रीवादी बाई फारच वैतागली. मेसेज होता एका ऑनलाइन शॉपिंगच्या सेल संदर्भात. महिला दिनानिमित्त किचन एप्लायन्सेसवर भरघोस सूट. दुसरा मेसेज होता साड्यांच्या सेलबद्दल. त्यातील एक वाक्य होते. 'वुमेन इन सारीज् लूक्स मोअर ट्रेडिशनल. हॅप्पी शॉपिंग'
सकाळीच असे मेसेजेस वाचल्यावर बाईंचे पित्त खवळले. बातम्या बघण्यासाठी टिव्ही लावला तर स्त्रीया आता पुरुषांच्या बरोबरीने सगळ्या क्षेत्रात आघाडीवर वगैरे बाबतीत चर्चा चालू होत्या त्यात फक्त अँकर बाई होती आणि चर्चेसाठी बोलावलेल्या पॅनलवर पाचपैकी एकच स्त्री होती. बाकीचे चार म्हणे फेमिनिस्ट मेल होते. हे बघून बिचारी स्त्रीवादी एकदम फेमिनाझी झाली. 'फ' वर्गातील आंग्ल शिवी हासडून टिव्ही बंद करून मोबाईलवर स्क्रोल करू लागली. व्हॉट्सऍप ग्रुपवर वुमेन्स डे निमित्ताने येणाऱ्या पानाफुलांच्या, कवितांच्या, इमोजींच्या, सुविचारांच्या गराड्यात गोंधळून गेली. फेसबुकवर टॅग केलेल्या मैत्रिणींच्या नवऱ्यांच्या पोस्टींचा महापूर पाहून 'एक्स'च्या पोस्टवर थबकली.
आपल्या एक्सला बायको म्हणून काकूबाई घर सांभाळण्यासाठी पाहिजे होती आणि तशी त्याला भेटली होती हे पाहून मनातून कासावीस झाली. मग आवरून लाडक्या 'पेट' ला घेऊन मॉर्निंग वॉकला निघाली. बाईंनी मुद्दाम कुत्राच पाळला होता आणि नाव पण एक्सचेच दिले होते. खुन्नस. तसंही पोरं ब्रेकअप झाल्यावर कुत्री पाळून तिला आपल्या एक्सचे नाव देतात. मग महिलांनी का मागे रहायचे! कुत्र्याची रपेट झाल्यानंतर बाईंची व्हेजिटेबल स्मुदी आणि वर्क फ्रॉम होम सेटअप रेडी झाला. लॉगिन केल्यावर एच.आर. चे वुमेन्स डे स्पेशल व्हाउचर्स, ग्रिटींग आणि मिटिंग इन्व्हीटेशन्स धडधडायला सुरुवात झाली. मग दिवसभर आळोखेपिळोखे देत स्टँड अप, स्टेटस मिटिंग, सेशन्स, एक्सेल शीट्स, जीरा टिकिट्स, ब्रेन स्ट्रॉमिंग डिस्कशन्स, कॉफी ब्रेक, लंच ब्रेक, वामकुक्षी, घरच्यांसोबत बोलणं, लग्नासाठी तुणतुणे वादविवाद, दिवसभराची कामे वगैरे सगळे सोपस्कर झाले. राहत असलेल्या सोसायटीची आज खास महिला दिना निमित्त खास महिलांनी महिलांसाठीच पुरुषांच्या पुढाकाराने टेरेस डिनर इव्हेंट पार पडला. सभासदांनी नसती केली तरी चालली असती अशी भाषणे फेकून मारली. घिसेपिटे हास्य विनोद. गॉसिप करताना कोंडलेल्या एकमेकींच्या इच्छा, आकांशा आणि वेदनांना मोकळी वाट मिळाली. इथे स्त्रीवादी बाई थोड्या आयसोलेटच होत्या.
सोसायटीच्या इव्हेंटमध्ये नटूनथटून येणाऱ्यांचा बाईंना विशेष एलर्जी. बाई स्वतः टॉमबॉय प्रमाणे वावरतात. बुलेट वापरतात. विकेंडला हँगआऊटला जातात. महिन्यात किमान डझनभर ओटीटी प्लॅटफॉर्मवरच्या सिरिज संपवतात. घरच्यांचा आग्रहाखातर सणासुदीला गावी जातात. महिन्या दोन महिन्यांतून एकदा भावाच्या घरी जाऊन भाच्च्यांसोबत दंगामस्ती करतात. वर्षातून एकतरी लॉंग बाईक राईड फिनिश करतात. थोडक्यात मनाला हवं तसं जगतात म्हणून महिला दिनानिमित्त होणाऱ्या मच हायपर सेलेब्रेशन्स इव्हेंट्सचा तिटकारा करतात. पुर्वीसारखी आता नातलग, मित्रमैत्रिणींचे लग्न समारंभ उत्साहात साजरा करत नाहीत. स्वतःच्या स्पेसमध्ये गुरफटून जगाची निरिक्षणे नोंदवत बसतात. कधीतरी घरातून फारच पिच्छा पुरवला तर एखादे शनिवारी लग्नासाठी म्हणून पाहिलेल्या मुलासोबत कॉफी प्यायला जड मनाने पोचतात. मग इकडच्या तिकडच्या साचेबद्ध गप्पा. फ्युचर, पार्टनर, आवड निवड, नोकरी वगैरेंच्या चोथट चर्चा होतात. कधी इकडून नकार तर कधी तिकडून नकार यातच वयाची वर्षे वाढत जातात. मग पुन्हा तोच प्रपंच स्वतः स्वतःसाठी स्वतःपुरता केलेला रहाटगाडगे चालवण्यासाठी.
©भूषण वर्धेकर
८ मार्च २०२२, पुणे
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा