प्रत्येकाचं बरं चाललंय

प्रत्येकाचं बरं चाललंय
आपापलं राखून ठेवलंय
काहींनी वाटून घेतलंय
उरलेल्यांनी हेरून ठेवलंय

कोण कोणाला जीवे मारतो
कोण कोणावर हल्ले करतो
कोण कोणाची कोंडी करतो
त्यावर प्रत्येकाचा निषेध ठरतो

साम्राज्याचा विस्तारवाद युद्ध करते
स्वराज्याचे सीमोल्लंघन क्रांती करते
इतिहासकारांची ढोंगी लेखणी चाचरते
कुठे सशस्त्र लढा, कुठे युध्दाची खुमखुमी ठरते 

हल्ल्यांच्या भीतीपोटी शस्त्रे घ्यावी
संरक्षणासाठी दिखाऊ अस्त्रे दाखवावी
पत नसेल तर आर्थिक मदत घ्यावी
श्रीमंत तिजोरीत भर पडावी

असेल अभेद्य राष्ट्रवाद जर
अंतर्गत ऐक्य करावे जर्जर
लक्ष वेधून जातपातधर्मावर
वार करा सामाजिक सलोख्यावर

राष्ट्राच्या इतिहासाची करावी तोडमोड
संस्कृती, सभ्येतेची करून पडझड
फुस लावून असंतुष्टांची रडारड
राष्ट्रविघातक अंतर्गत वरचढ

शांततावादी भूमिका घेऊन तत्पर
दुसऱ्यांच्या माथी फोडावे खापर
महाशक्तीचे कौतुक गोडवे जोरदार
नफेखोरीचे शस्त्रास्त्र व्यवहार

© भूषण वर्धेकर
४ मार्च २०२२, पुणे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मराठा आरक्षण आणि वास्तव

मोदीस्तोमाची दशकपूर्ती

विवेकवादी हतबलता - पूर्वार्ध