झुंड
झुंड
झुंड मध्यंतरानंतर मनावरील पकड कमी करतो. बरेच ठिकाणी प्रेडिक्टेबल होतो. नागरजचे फँड्री आणि सैराट जसे मनावर गारूड करतात तसा झुंड करत नाही. सिनेमा संपल्यानंतर नागराज स्पेशल होल्ड झुंड बघितल्यावर राहत नाही. झोपडपट्टी मधल्या पोराटोरांचे मानसशास्त्र, सामाजशास्त्र, अर्थशास्त्र आणि मानवतावाद सगळं एकाच सिनेमातून का दिलं गेलं असा प्रश्न पडतो. कलरफुल सिनेमा, प्रत्येक नॉन एक्टर कडून करवून घेतलेली कामे, संवाद, सिम्बॉलिक फ्रेम्स आणि सिनेमॅटोग्राफी आशयाला अनुसरून शोभत असली तरी शेवटपर्यंत खिळवून ठेवत नाही. धक्कातंत्र देण्याचे नागराजचे कसब इथे फिके पडते. मला व्यक्तीगत सिनेमा पाहताना नामदेव ढसाळ आणि जयंत पवार यांच लिखाण वाचल्यावर जे दृश्यं उभे राहिले होते तसा भास झाला. झोपडपट्टी मधल्या तरुणांना एकत्र घेऊन फुटबॉलच्या माध्यमातून मुख्य प्रवाहात आणणं लोकांना अपील होईल असं वाटत नाही. कारण स्पोर्ट्स फिल्म्स बनवण्यासाठी जे तंत्र लागते लोकांना शेवटपर्यंत गुंतवून ठेवण्याचे ते तंत्र इथे नाही. केवळ फुटबॉल खेळात गुंतून राहिल्याने त्यांचे प्रश्न सुटणार का? नाही सुटणार. कारण ते दुर्लक्षित राहिले म्हणून मुख्य प्रवाहात आले नाहीत. बच्चन साहेबांच्या खांद्यावर मुख्य पात्र देऊन सगळा स्ट्रगल इतर लोकांचा दाखवलाय. मग बच्चन नसते तर तीच झोपडपट्टी गँग हिरो म्हणून स्ट्रगल करताना दाखवली असती तर वेगळाच इम्पॅक्ट तयार करता आला असता. आजवरचे सगळे हिंदी सिनेमे संवादातून व्यथा मांडतात. मग झुंडमध्ये शेवटच्या सीनमध्ये कोर्टात अमिताभ बच्चन चे भारदस्त आवाजातील संवाद त्याच पठडीतील वाटतो. फँड्री आणि सैराट मध्ये संवादापेक्षा पात्रांनी केलेली कृती लोकांवर प्रभाव टाकत होती. संवादातून टाकलेला प्रभाव हा कृतीतून टाकलेल्या प्रभावासमोर तकलादू असतो. झोपडपट्टीत राहतात म्हटल्यावर दाखवण्यात आलेले सगळे कॅरॅक्टर्स हे लोकांपर्यंत आजवर सगळ्याच माध्यमातून बरेचदा आलेले आहेत. मग नागराज कडून वेगळ्या अपेक्षा आहेत आणि त्याने टिपिकल छापखान्यातील टेकनिक्स वापरून झुंड बनवला आहे असं जाणवत राहतं. ह्या विषयावर सगळं एकाच सिनेमात बसवण्याचा प्रयत्न केलाय असं दिसतं. कित्येक आजूबाजूचे कॅरॅक्टर्स तेवढ्यापुरते येतात जातात. ही सगळी कॅरॅक्टर्स वेगवेगळ्या कॅनव्हासवर आणून किमान एक सिजन होईल अशी ओटीटी सिरिज सहज होऊ शकेल. त्यात प्रत्येक एपिसोड मध्ये एक एक प्रश्न हाताळता येतील आणि वेगवेगळ्या सिच्युएशन वर भाष्य करता येईल.
हिंदी सिनेमाच्या एक ठरलेल्या चौकटीत नागराज मंजुळेचा सिनेमा पाहणं अवघड जातं. अपेक्षा उंचावल्या होत्या फँड्री आणि सैराट ने त्यामुळे झुंड तशा अपेक्षा पुर्ण करत नाही. मध्यंतरापर्यंत जे जे हॅपनिंग आहे ते ते चांगलं खिळवून ठेवतं. नंतर फुटबॉलच्या संदर्भातील सामने, टुर्नामेंट्स, होमलेस सॉकर साठी प्रत्येक खेळाडूचा चाललेला संघर्ष एकाच सिनेमात पचनी पडत नाही. फक्त अमिताभ बच्चन लक्षात राहतो नागराज मंजुळे कुठेतरी हरवतो सिनेमा संपल्यानंतर. झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांची कामे ज्यांनी केली ते लक्षात राहतात. सिनेमात जे सामाजिक भाष्य केले आहे ते पण लक्षात राहते मात्र मंजुळे काय वेगळं दाखवणार ह्या अपेक्षेने गेलेला प्रेक्षक हिरमुसतो. नागराजचे सिनेमे सामाजिक भाष्य करतात. राजकीय भाष्य आणि सामाजिक भाष्य यात पुसटशी रेषा आहे. समाजाच्या व्यथा, प्रश्न, समस्या भेदकपणे मांडणे हे सामाजिक भाष्य आणि त्याचे खापर कोण्या एका वर्गावर तरी फोडणे हे झाले राजकीय भाष्य. सगळ्याच समाजात दाहक, ज्वलंत वगैरे भेडसावणाऱ्या समस्या असतात. काहींना त्या जाणीवेतून तर काहींना नेणिवेतून समजतात. ते जगणं ज्या माध्यामातून लोकांसमोर येते ते महत्त्वाचे. ते माध्यम किती लोकांना अपील होते किंवा तुमची जगण्यासाठी चालणारी धडपड किती लोकांपर्यंत जाते हे त्या माध्यमाच्या लोकप्रियतेवर ठरते. साहित्य, नाटक, चित्रपट ही महत्त्वाची माध्यमे ज्याने त्याने वापरली. एखाद्यावर झालेला अत्याचार जर साधन म्हणून बाजारात मांडला तर तो राजकीय किंवा सामाजिक बस्तान पक्कं करण्याचा खटाटोप असतो. असा खटाटोप सगळ्या माध्यमातून ज्या त्या सामाजिक आणि राजकीय आस्थांनी बरेचदा केला. काहींना यश आलं तर काही अपयशी ठरले. अशा सगळ्या बाबींवर जर मंजुळे काहीतरी मांडण्याचा प्रयत्न करतोय तर ते फँड्री किंवा सैराट सारखे असेल अशी अपेक्षा उंचावणे सहाजिकच आहे. कारण नागराज ज्या भेदकपणे प्रश्न मांडतो ते लाजवाब. मग ती चीड झुंड मध्ये मध्यंतरानंतर दिसत नाही. विस्कटले आहे काहीतरी असं मनोमन जाणवतं. कॉलेजमध्ये खेळणाऱ्या पोरांना फुटबॉलमध्ये गड्डी गोदामची पोरं हरवतात हे सिनेमॅटिक वाटतं. मात्र नंतरचा होमलेस सॉकरचा प्रत्येकाचा लढा मनाला रुचत नाही. मग चावून चोथा झालेले घिसेपिटे डायलॉग इनकी दुनिया उनकी दुनिया यात अडकल्यासारखा वाटतो सिनेमा.
जब्याचा मारलेला दगड जेवढा जोरात लागला किंवा आर्ची परश्याच्या रक्तात माखलेली लहानग्याची पावले जेवढी मनात रुतली तेवढे वार डॉनच्या कटर ने झाले नाहीत. तरीही आपल्या मराठी माणसाने केलाय सिनेमा एकदा अवश्य बघा. आवडो न आवडो.
© भूषण वर्धेकर
५ मार्च २०२२, पुणे
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा