मी वसंतराव

मी वसंतराव - कलाकाराचा मनस्वी संघर्ष

एखाद्या कलाकाराला किती पातळीवर संघर्ष करावा लागतो ते केवळ तो कलाकार आणि त्याचे सखेसोबतीच जाणतात. त्यांच्या संघर्षाचे असे काय महत्त्व जे त्यांच्या कलेत उतरते? ते बघायचे असेल तर सध्याचा मी वसंतराव हा चित्रपट बघणे आवश्यक आहे. महाराष्ट्रात असे अनेक कलाकार लोकांपर्यंत उशिरा आले. पण जेव्हा आले तेव्हा कायमस्वरूपी आरूढ झाले. मी वसंतराव हा चित्रपट फक्त वसंतराव देशपांडे यांच्याबद्दल आहे का? नाही तो फक्त एक बायोपिक नसून महाराष्ट्रात नाटक, संगीत वगैरेवर घडामोडींचा एक कालपट आहे. ज्यात वसंतरावांचा एका पठडीबाहेरील गवय्याचा प्रवास आहे. वसंतराव रुढार्थाने कोण्या एका घराण्यातील नावाजलेले गायक नव्हते. त्यांनी गाण शिकण्यासाठी जो संघर्ष केला स्वतः मध्ये गाणं जीवंत ठेवून जगण्यासाठी जी धडपड केली त्याचा जातीवंत लढा चित्रपटात दाखवला आहे. चित्रपटात कुठेही अतिरिक्त आर्टिस्टिक लिबर्टी घेऊन उगाचंच काहीही घुसडलेलं नाही. वसंतरावांचा एकाकी प्रवास त्यात आपसूकच येणारे कुटुंबीय आणि जीवाभावाचे सखेसोबती याची सांगीतिक मैफल आहे. अभिनय, संगीत, दिग्दर्शन तोडीस तोड जमलंय. 

रसिकांना मंत्रमुग्ध करण्याचं कसब मैफिलीत जसं जमवावं लागतं अगदी तसंच चित्रपटात दिग्दर्शकाने जमवलंय. चित्रपटात कुठेही प्रेक्षक बाहेर पडत नाही. गाणी तर आत्म्यासारखी आहेत. कुठेही अमुक एक गाणं उगाचंच आलंय असं अजिबात वाटणार नाही. दिग्दर्शकाने घेतलेली मेहनत पदोपदी दिसते. अभिनेता म्हणून राहूल देशपांडे कुठेही अवघडल्यासारखे वाटत नाहीत. वसंतरावांचा एकाकी लढा आणि सांसारिक ओढाताण कुठेही मेलोड्रामा वाटत नाही हे दिग्दर्शक निपुणचे कौशल्य. गाण्याच्या वेगवेगळ्या शैली हाताळणे सहजसाध्य नाही. ते राहूलने जबरदस्त पेललंय. सर्वात ठशीव भूमिका लक्षात राहते ती राधिकाची. वसंतरावांची आई. वसंतरावांची आई ही भूमिका ज्यापद्धतीने तीने केलीय ते लाजवाब.  तिच्या वागण्यात नागपूरी हिसका आहे तो भारीय. छोट्या भुमिकेतून येणारे दिनानाथ मंगेशकर अमेयने ताकदीने उभे केलेत. वसंतरावांचे मामा थोड्याच वेळेसाठी येतात. आलोकने त्या तेवढ्याशा भुमिकेतून मजा आणलीय. नाट्यसंगीत, शास्त्रीय संगीत कलाकारांचे आयुष्य कसे वेगवेगळ्या परिस्थितीत व्यतीत होते हे प्रेक्षकांना समजते. गाणाऱ्याला रसिक प्रेक्षक काही मिनिटांसाठी ऐकतात मात्र ती काही मिनिटे गायक कसा घडलेला आहे हे समजत नाही. त्याचे चरित्र वाचल्यावर किंवा त्या गवय्याचे किस्से ऐकल्यावर समजतं. हा चित्रपट एकूण गयक व त्याची फुलत गेलेली गायकी यावर मार्मिक भाष्य करतो. दिग्दर्शक आणि टिमने चित्रपटासाठी घेतलेली मेहनत प्रत्येक सीनमध्ये दिसते. स्वातंत्र्योत्तर आणि स्वातंत्र्यपूर्व काळ उभा करणे अवघड काम. पण चित्रपटाच्या प्रॉडक्शन टिमने घेतलेली मेहनत अप्रतिमच. डिटेलिंगवर निपूण ने केलेले काम लगेचच दिसते. मला इथे आशुतोष गोवारीकरची आठवण येते. खूप कमी दिग्दर्शक आहेत जे सिनेमात बारीकसारीक गोष्टींवर फार डिटेलिंगमध्ये काम करतात. 

मी वसंतराव चित्रपट कोण्या एका पुण्या-मुंबई मध्ये स्ट्रगल करण्याऱ्या गायकाचा सिनेमा नसून एक गायनावर निस्सीम प्रेम करणारा, रसिकांना वेगवेगळे काही देण्याचा प्रयत्न करणाऱ्या अस्सल  बहुआयामी गवय्याचा प्रवास आहे. कितीतरी गवय्ये लोकांपर्यंत पोचण्यासाठी धडपडत असतात. काहींना यश लगेच लाभतं. काहींना उशीरा लाभतं. ज्याचं त्याचं प्राक्तन. वसंतरावांची गाणं शिकण्याची धडपड, त्यातलं नवनवीन शोधण्याचा प्रवास फार महत्वाचा आहे. गायन क्षेत्रात प्रचलित असलेली घराणी, त्यांच्या गायकीतल्या वैशिष्ट्यपूर्ण लकबी वगैरे जाणकारांचे अत्यंत जवळचे. मात्र वसंतरावांची शैली ही फार वेगळी. कोणत्याही अमुकतमुक घराण्याच्या नियमानुसार बांधलेली नाही. गायन हाच ध्यास आणि श्वास हे मूल्य जपणारे वसंतराव चित्रपटात पदोपदी दिसतात. याच्यासोबत जी जी पात्रे येतात ती अगदी सहजपणे. उगाचंच तत्कालीन व्यक्तीच्या काळातील संबंधीत प्रसिद्ध व्यक्तिमत्वे कुठेही घुसडलेली नाहीत. सगळेच संदर्भ आटोपशीर ठेवल्यामुळे सिनेमा गोळीबंद झालाय. वसंतरावांच्या जवळच्या खास दोस्तांपैकी पु.ल. होते. त्यांचे कालानुरूप संदर्भ फार महत्त्वाचे आहेत. पु.ल. च्या भूमिकेत पुष्करने घेतलेली मेहनत फार मोठी आहे. सहजसुंदर नैसर्गिक चालणं, वागणं, बोलणं फार भारी जमलंय पुष्करला. 'आता मी पु.ल. सादर करतो' म्हणून स्टिरिओटाईप अविर्भाव आणून अभिनय त्याने केला नाही. पुलंचे सगळेच विनोद उस्फुर्त होते. तसे पुष्करने सादर केले आहेत. चित्रपटात सगळ्यांचे अभिनय झकासच झाले आहेत. आलोक, अमेय, सारंग, अनिता, राहूल ही सगळी मंडळी एक वेगळीच दुनिया उभी करतात पडद्यावर. 

कोणत्याही गायनक्षेत्राशी संदर्भात चित्रपट करायचा म्हटल्यावर त्याचा प्रेक्षकवर्ग हा विभागला जातो. कारण प्रत्येक गायनाची स्वतःची अशी वेगळी ओळख आणि वेगळा बाज. प्रत्येक व्यक्तीच्या आवडीनिवडी वेगवेगळ्या. भावगीते, सुगम संगीत, ठुमरी, खयाल, नाट्यसंगीत वगैरे लोकांमध्ये लोकप्रिय. काही लोकांना अमुकतमुक संगीत आवडत नाहीत तमुकच आवडतात. जे आवडतं तेच खपलं जातं. तेच प्रसिद्ध होतं. अस्सल रसिकांना कोणतेही गायन वर्ज्य नसतं. मात्र प्रचलित गायनाशी निगडीत नसलेलं लोकांनी स्विकारणं थोडं अवघड असतं. मग ते सादर करणाऱ्या गायकाला तशी मान्यता मिळणं त्याहूनही अवघड. वसंतरावांचा अशा सगळ्या घटनांशी आलेला जवळचा संघर्ष हा या चित्रपटाचा मुख्य गाभा आहे. 'कट्यार'मुळे खऱ्या अर्थाने वसंतरावांची लोकप्रियता वाढू लागली. त्याआधी मित्रमंडळी, ठराविक गायनक्षेत्राशी निगडीत लोकांना वसंतराव माहिती होते. सांसारिक जबाबदाऱ्या आणि पुर्णवेळ गायन याचा सहजतेने चाललेला लढा चित्रपटात येतो. कशाचीही अतिशयोक्ती न करता हे फार महत्त्वाचे. हा चित्रपट बघताना आणि ऐकताना भारावून जातो. चित्रपटाची गाणी प्रासंगिक आहेत पण लाजवाब. राहूलने गायलेली लावणी आणि सहजसुंदर अभिनय हे फारच वेगळ्या लेव्हलवर जातं. शेवटचे 'कैवल्य' गाणं तर मनात दीर्घकाळ रुंजी घालते. 

हा सिनेमा गायक कसा घडतो आणि कशाप्रकारे गाणं घडतं हे दाखवणारा आणि ऐकवणारा आहे. एखाद्याला हा चित्रपट पाहून गायनाशी एकरूप होण्यासाठी साधना कशी करावी हे समजेल. चित्रपटातील अगदी छोटे छोटे प्रसंग तत्कालीन परिस्थिती कशी होते आणि प्रत्यक्ष त्याला सामोरे जाताना वसंतरावांनी कसे तोंड दिले हे खूप काही सांगून जातात. वसंतराव कसे घडले हे तर सिनेमा दाखवतोच पण पॅशन, पेशन्स, पर्सिस्टन्स किती महत्त्वाचा आहे ह्यावर भावनिक भाष्य करतो. सिनेमा पाहून बाहेर पडल्यानंतर मनात आणि कानात एक वेगळाच नाद रूळतो. 

एखाद्याला आवडणारी गोष्ट पूर्णवेळ करायची असल्यास अनेक अडचणी येतात. काही अर्धवट सोडतात. काही पुढे रेटतात. काहींना यश मिळतं. काहींना मिळत नाही. काहींच्या कला लोकांपर्यंत जातात. काहींच्या जात नाहीत. काहींना काय करावे कसे करावे हे समजत नाही. असं वैचारिक द्वंद्व असलेल्या लोकांनी हा चित्रपट तर जरुर बघावा. एखाद्या व्यक्तीचा प्रेरणादायी प्रवास नक्कीच लढण्यासाठी बळ देतो. हा चित्रपट असाच कलाकाराचा मनस्वी संघर्ष दाखवतो.

© भूषण वर्धेकर,
३ एप्रिल २०२२, पुणे.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मराठा आरक्षण आणि वास्तव

मोदीस्तोमाची दशकपूर्ती

विवेकवादी हतबलता - पूर्वार्ध