इथे हजारात एखादा निवडला जातो


इथे हजारात एखादा निवडला जातो
आणि हजारोतला एक होऊन जातो
कौशल्यावर आधारित गुणपत्रिकेच्या रद्दीत
भूलतो चकचकत्या गाढवी कामाच्या दुनियेत
पगाराच्या मगरमिठीसाठी राबतो रात्रंदिवस
पोटजीविकेची परिक्रमा आ वासून उभीच असते
वर्षांमागून वर्षे जातात हाडामांसाचा देह खुरडत
अखेरीस ठप्प जोडीदाराच्या नातेसंबंधात
पुन्हा तेच शोभतो लाखात एक जोडा अन्
होऊन जातो लाखोंमधला फडफडणारा कुटुंबवत्सल
नव्याचं नवंपण निघून जातं, जुनं जाणतं नातं विरून जातं
उरतो नंतर बेगड्या जबाबदाऱ्यांचा भडीमार
परिस्थितीचा बागुलबुवा आणि शुष्क स्थैर्याचा आशावाद
उमेदीची वर्षे निघून जातात, स्वप्नरंजनातील दावे उडून जातात
राहतो शिल्लक आमचा काळ अन आम्ही काय केलं त्याच्या बाता
नेमकं उमगतं जग बदलायला निघालो होतो….
होऊन बसलो बदललेल्या जगाचा पदसिद्ध सो कॉल्ड सेटल्ड बैल !!!

--------------
भूषण वर्धेकर
11 जुलै 2010
पुणे
-----------------

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मराठा आरक्षण आणि वास्तव

मोदीस्तोमाची दशकपूर्ती

विवेकवादी हतबलता - पूर्वार्ध