माझा देश खूप मोठाय...

माझा देश खूप मोठाय !

लोकसंख्येत आम्ही अब्जाधिश आहोत,
पण इथं माणसंच राहत नाही जी आहेत ती त्या त्या धर्माने बांधून ठेवलेली गिऱ्हाइकं !
इथं सगळ्या धर्मांचा बाजार आहे माणूसकी चा धर्म सोडून. तो आहे फक्त पाठ्यपुस्तकातच !
इथली गिऱ्हाईकं तशी साधीभोळी, रोजमर्राच्या जगण्यात पिचलेली.
मात्र गावोगावी विखूरलेले गिऱ्हाईकांचे पुरवठादार फार हुशार.
ज्याला त्याला आपापल्या धर्माचा बाजार वाढवायला हुरूप भारी !
काही धर्मांना सरकारदरबारी अनुदाने, सवलती यांची काही कमी नाही तर काहींना प्रसारासाठी परदेशी देणगी प्यारी.
काही धर्म अतिप्राचीन अस्तित्वाच्या भांडवलावर हेलकावे खात धडपडतायत. बिचाऱ्याला सुशिक्षितांकडून खस्ता खाव्या लागतात!
इथं कोणी मेला रे मेला कि त्याची धार्मिक चिरफाड होते.
ज्याची संख्या तुलनेने कमी त्याचा जागतिक उदो उदो !
इतर धर्मातले मेले काय अन जगले काय याचे कोणालाच देणेघेणे नाही! आताशा सहिष्णू आणि असहिष्णू असे दोन जुनेच पाहुणे नटून थटून आलेत.
यांचा वावर सध्या अतिउच्चशिक्षित लोकांकडे आहे. ते म्हणतील तसं वागतात. गेलाबाजार इतरही पाहुणे आहेतच !
सवर्ण, बहुजन, दलित, मागास, अतिमागास आणि उर्वरीत!
ज्याची त्याची सोय जो तो धर्म राखीव गोदामात करतच असतो.
गिऱ्हाईकांची कमी नसल्याने सगळी गोदामं तुडुंब भरलेली आहेत.
मागणी तसा पुरवठा तत्वावर बाजार तेजीत चालूय !
माणूसकीची मंदी मात्र दिवसेंदिवस वाढतंच चाललीय !!!

--------------------
भूषण वर्धेकर
19-01-2016
रात्रौ 11:20
हडपसर
----------------------

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मराठा आरक्षण आणि वास्तव

मोदीस्तोमाची दशकपूर्ती

विवेकवादी हतबलता - पूर्वार्ध