म्हणूनच तेलही गेलं अन् तूपही गेलं . . .
म्हणूनच तेलही गेलं अन् तूपही गेलं . . .
त्याचं असं झालं…..
त्याने तिच्यासाठी खूप केलं
नको एवढं करून शेवटी मातीत गेलं
तरीपण ह्याचं कसंबसं निभावलं
सरतेशेवटी ह्याला कळून चुकलं
कोणाचातरी पर्याय असण्यापेक्षा
कोणीतरी आपली निवड करून व्हावं चांगभलं
नाहीच कुठे जमलं तर आपण एकटंच बरं
म्हणूनच तेलही गेलं अन् तूपही गेलं . . .
काही दिवस असेच जातात रुक्ष रुक्ष
तरीपण नजर मात्र सदैव दक्ष
नवीन जुगाड जुळलं तर लागलीच व्हावा सोक्षमोक्ष
हळुवार सुरु होतात तिरपे कटाक्ष
मग रचले जातात नवी ध्येयं नवे लक्ष्य
सर्रास सुरु होतात बारकावे टिपणं अन् निरीक्षणं सूक्ष्म
सगळं कुंभाड फिक्स केलं जातं अन् नेहमीप्रमाणे अस पाखरू उच्चभ्रूंकडेच उडून जातं
शेवटी कण्हतंच म्हणायचं असतं
म्हणूनच तेलही गेलं अन् तूपही गेलं . . .
अखेरीस वैतागून गावाकडची बस गाठली
बसस्टॅडवर उतरताच मित्राने बोंब ठोकली
गावातल्या लांबच्या मामाने पोटच्या लेकीसाठी ह्याच्या घरी लग्नाची बोलणी केली
वाढत्या वयासोबत जबाबदारीही आली
तरीपण ह्याची नाही जिरली
इतक्यात लग्न नको म्हणून भांडणं केली
आता मात्र हद्द झाली, नितीमत्ता चुलीत घातली, रातोरात शहराकडं धूम ठोकली
लग्नाआधी एक तरी झेंगट करायचंच याची त्याने तळीच उचलली
तशी एक सुबक ठेंगणी बेरकीपणे हेरली
घरच्यांची ओळखीतली नसावी याची खात्री करून घेतली
मदनाचे सगळे बाण मारले तरी ती काही घायाळ नाही झाली
अमुक बाबा तमुक बुवा यांच्यापुढे लोटांगणे घातली
गंडे, धागे, दोरे, अंगठ्या यांनी हात,बोटे भरली
उरली सुरली हुशारी उपासतापास करून निकाली लावली
जिथं तिथं घोड नडतय म्हणत अक्कल पाझळली
गावाकडचीच चांगली म्हणून लग्नासाठी शेखी मिरवली
बोलाचालीच्या दिवशी ह्याची ऐट वाढली
मामाच्या घरी मोटारगाडीतून सवारी गेली
मामाच्या पोरीसोबत ती सुबक ठेंगणी पाहून ह्याची बोबडी वळाली
गुप्तपणे माहिती काढली तर ती मामाच्या पोरीची दूरची कुठलीतरी बहीण निघाली
पसंतीचा होकार देण्याआधिच तिकडून नकाराची पोचपावती आली
एकट्याकडून दुकटेपणाची निकराची लढाई गारठली
म्हणूनच तेलही गेलं अन् तूपही गेलं . . .
-----------
-- भूषण वर्धेकर
1 जानेवारी 2016
रात्रौ 11:00
हडपसर
------------
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा