रविवार, २७ मार्च, २०२२

आरंआरंआरं

आरं आरं आरं

बाबाओ, काय बघितलं मी कायचं समजून न रहायलं.. आरं आरं आरं

एका आदीवाशी पोरीला इंग्रजाची बायको घेऊन जाते मग इंग्रज कश्शे निष्ठूर असत्याय ते बी पिक्चर मध्ये येतंय. मग आदीवाशी लोकांचा भीम नावाचा पयला  हिर्रो त्या मुलीला आणण्यासाठी दिल्लीत धडक मारतो. वेश बदलून अख्तार म्हणून राहतो. तोवर इकडे इंग्रजांची पोलीससेवा करणारा दुसरा हिर्रो राम हा लय भारी हजारो लोकांचा मार खाऊन तितक्याच लोकांशी मारधाड करून एका माणसाला अटक करतो. दोन्ही हिरोंची भेट व्हण्यासाठी एका गरीब बिचाऱ्या पोराला यमुना नदीत मासे पकडायला पाठवत्यात. मग मग नदीवरच्या पुलावरनं रेल्वे जखताना डायरेक्ट लोखंडी चाकाला आग लागते मग तीच आग पाण्यात पण लागते. मधोमध तो बिचारा पोरगा. नंतर हाय लय भारी स्टंट. एक हिरो इकडून घोड्यावर दुसरा हिरो तिकडून फटफटीवरुन कमरंला दोरी बांधून खाली पुलावरनं उड्या मारत्यात. घोड्यावरचा हिरो उडी मारताना 'वंदे मातरम' लिवलेला झेंडा घेतो. (हा झेंडा सावरकर, भिकाजी कामा व शामजी कृष्ण वर्मा यांनी डिझाइन केलेला आहे १९०७ साली. वाचकांच्या खास माहिती साठी. १९०४ ते १९३१ काळात झेंड्याच्या डिझाइन मध्ये वेगवेगळे बदल झाले. कारण सिनेमाचा काळ १९२० च्या आधीचा आहे. असो.) मग दोघंबी दोरीला लटकून  पयल्यांदा मासं पकडणाऱ्या पोराला वचिवतात. मग एकमेकांना वाचिवतात. मग नदिच्या तळाशी स्टंट करत्यात. मग जिग्री दोस्त व्हत्यात. तोवर आदिवाशी पोरगीला वाचवण्यासाठी एक हिरो जंगली प्राणी घेऊन हल्ला करतो. त्याला अटक करण्यासाठी दुसरा हिरो त्याच्या मागे लागतो. मग फुल इमोशनल ड्रामा, मेलोड्रामा, डायलागबाजी. 
मग परत भांडत्यात एकमेकांना लय मारत्यात. पहिल्या हिरोला अटक व्हते. त्याला शिक्षा होते. तोवर हिकडं दुसऱ्या हिरोची येगळीच श्टोरी सुरू होते. वडीलांची अर्धवट राह्यलेली ईच्छा पुरी करायला गडी पेशल आफिसर होतो इंग्रजांचा. तोवर इंग्रज दुसऱ्या हिरोला चाबकाचे फटके मारायला पयल्याला सांगत्यात. तो बी मारायला तयार व्हतो. मग भर चौकात सगळ्यांसमोर पयल्या दुसरा हिरो चाबकाचे फटके मारतो. पयला हिरो देशभक्तीपर गाणं बोलतो. त्याचं रक्त सांडणं मग त्यामुळे बघणारे लोक पेटून उठणं अगागागायायाया लय भारीच. मग ज्या पोरीला सोडवण्यासाठी पहिला हिरो आलेला असतो त्याला फाशी देण्यासाठी दूरवर नेतात. सोबत त्या पोरीला बी नेतात. मग दुसरा हिरो पहिल्याची मदत करतो पळून जाण्यासाठी. पयल्याला हे समजतंच नाय. मग इंग्रज दुसऱ्याला अटक करून लय बेक्कार शिक्षा करतात. तोवर त्याचीच फकस्त दाढी वाढलेली असते. इकडं पहिल्या हिरोला, छोट्या पोरीला आणि त्यांच्या लोकांना इंग्रज सगळीकडं लय शोधतात. एके ठिकाणी दुसऱ्या हिरोची बायको त्यांना मदत करते. मग ती कोणाची बायको हे समजतं. मग पयल्याला लय वाईट्ट वाटतं. मग तो दुसऱ्याला पोलीसांच्या तावडीतून लयभारी हाणामाऱ्या करून सोडवतो. दुसरा हिरो पयल्याच्या खांद्यावर बसून हिकडनं तिकडनं उड्या मारून सगळ्यांना मारून बंदुकीच्या गोळ्या चूकवून जंगलात जात्यात. मग जंगलात सगळे इंग्रज लोक बंदुका बॉम्ब घेऊन ह्यांच्या मागं लागतात. पहिल्या हिरोकडं काय बी नसतं मारामारी करायला म्हणून त्यो फटफटी उचलून मारतो एकेकाला. दुसरा हिरो भगव्या कापडाच्या धोतर उपरण्यात लय खतरनाक दिसतुया. जबराट. हवेत उडू उडू बाणाने मारतुया. बंदुकवाल्या एकेका इंग्रजाला धनुष्यबाणाने सुई सुई करत मारतो. मग पयला हिरो हवेत फटफटी उडवतंय दुसरा पेटलेल्या बाणाने फटफटीला आग लावतंय. ती फटफटी डायरेक्ट दारूगोळा ठेवलेल्या गोदामात जाती. दोन हिरो बी तिथंच मेन व्हीलन बी तिथंच. मोठ्ठा स्फोट होतो व्हीलन आणि दोन हिरो सोडून सगळे मरतात. व्हीलन इंग्रजाला एक बाणाने मारतो दुसरा बंदुकीच्या गोळीने मारतो. स्फोटात वाचलेल्या बंदुका घेऊन दुसरा हिरो गावी होडीतून येतो. मग दुसरा हिरो 'जल जंगल जमीन' झेंडा दावतो अन् पिक्चर संपतो.

(विशेष सूचना: सिनेमातील फायटिंग सीन्स भारी आहेत. राजमौली चे भव्य दिव्य सेट स्पेशल इफेक्ट दमदार. कोमारम भीम आणि सीताराम राजू हे दोघेजण दक्षिणेकडील खरेखुरे स्वातंत्र्यपूर्व काळातील लढवय्ये क्रांतिकारक होते. कोमारम भीम यांची जल जंगल जमीन आदीवासी लोकांसाठीची चळवळ खूप महत्वाची. आरआरआर सिनेमा फक्त राजमौली स्टाईल, पावरपँक्ड एक्शन, पॉवरफुल फुल्ल ऑफ स्पेशल इफेक्ट्स, क्लासिक फोटोग्राफी साठीच बघावा. स्वातंत्र्य चळवळीचे वगैरे संदर्भ शोधू नयेत.)
©भूषण वर्धेकर
२७ मार्च २०२२, पुणे.

मंगळवार, २२ मार्च, २०२२

विवेकवादी हतबलता - उत्तरार्ध

विवेकवादी हतबलता

एका राज्यात विवेकवादी लोकांच्या दिवसाढवळ्या निर्घृणपणे हत्या होऊ लागल्या होत्या. धर्माच्या नावाखाली एकत्र येऊन बरेच ठिकाणी हिंसक प्रदर्शने होऊ लागली. अचानकपणे राज्यात धर्माच्या नावाखाली अनागोंदी माजतेय की काय असा प्रश्न राजाला पडला. राजाने तात्काळ फर्मान सोडले आणि प्रधान आणि कायदा सुव्यवस्था मंत्र्यांची बैठक बोलावली. प्रधांनांनी जे काही घडतंय त्याची सगळी हकिगत, त्यामागील षडयंत्र करणारे यांची माहिती घेऊन लागलीच महाराजांना सांगितली. राजाने सगळं ऐकल्यावर गंभीर मुद्रेने प्रधांनाकडे मागणी केली की अशा धार्मिक उन्माद करणाऱ्यांना कायमचा जेरबंद करूच पण यांना छुप्या पद्धतीने पोसणाऱ्या लोकांना, संघटनांना पण ठेचून काढू. म्हणजे भविष्यात परत विवेकवादी लोकांच्या हत्या होणार नाहीत. त्यासाठी करावे लागेल ते निर्भिडपणे आपण करू. कायदा सुव्यवस्था पाहणाऱ्या मंत्र्यांना पण कडक कारवाई करा, कोणाचाही हस्तक्षेप झाला तर मला लागलीच कळवा, मी वैयक्तिक लक्ष ठेवून आहे असा आदेश दिला. प्रधानांनी महाराजांना सांगितले की सध्याच्या कायदा सुव्यवस्थेत अशा गुन्हेगारांना अजिबात कडक शिक्षा करता येत नाही. धार्मिक आस्थेच्या नावाखाली लोकांनी कायदा हवा तसा वाकवला आहे. आपण कायद्यानुसार प्रत्येकाला धार्मिक स्वातंत्र्य दिले आहे प्रचार प्रसार करण्यासाठी. त्यामुळे तथाकथित धर्माच्या आड येणाऱ्या लोकांना प्रचंड सहन करावे लागतेय. धर्मद्वेष वाढतोय. नवीन कायदा आणून अशा हिंसक कारवाया करणाऱ्या लोकांना जलदगतीने शिक्षा करण्यासाठी आपल्या कायदा सुव्यवस्थेत बदल करू. त्यासाठी मंत्रीमंडळाच्या सदस्यांशी सल्लामसलत करून निर्णय घेता येईल. 

येणाऱ्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत ह्याच विषयावर चर्चा करून विधेयक मांडून कायद्यात रूपांतर करू असे महाराजांकडून आश्वासन घेऊन प्रधान आणि कायदा सुव्यवस्था पाहणारे पुढच्या तयारीला लागले. महाराजांनी स्पष्ट सांगितले होते जी काही कारणं असतील धार्मिक उन्माद वाढण्यासाठी ती सगळी मंत्रीमंडळाच्या पटलावर आणा चर्चेसाठी. त्यामुळे प्रधानांनी आपली यंत्रणा कामाला लावली आणि धार्मिक द्वेषाची पाळंमुळं कुठपर्यंत आणि कशी पोचली याची साग्रसंगीत कारणमीमांसा लिहून काढली. सोबत कायदेविषयक सल्लागार घेऊन नवीन कायदा करण्यासाठी जय्यत तयारी सुरु झाली. तोपर्यंत राज्यभर दबक्या आवाजात चर्चा सुरु झाल्या. धर्माच्या नावाखाली दिवसाढवळ्या विवेकवादी लोकांना ठार मारणाऱ्या लोकांना जरब बसावी म्हणून राज्यात नवा कायदा येणार असल्याची कुजबुज सगळ्या पातळीवर सुरु झाली. धर्माच्या नावाखाली ज्यांनी बाजार मांडला होता त्यांची आता खैर नाही असं जो तो बोलू लागला. लोकमानस वळवण्यासाठी लागलीच धर्माच्या ठेकेदारांनी आपापले धर्म कसे मानवतावादी, शांतीप्रिय सर्वधर्मसमभावाचा पुरस्कार करणारे आहेत याचे शिबिरे, सार्वजनिक कार्यक्रम, उत्सव आणि शोभायात्रा सुरू केल्या. धर्माच्या नावाखाली लोकांना एकत्र करण्यात नेहमीचे यशस्वी तंत्र ज्याने त्याने वापरले. लोकांचा प्रतिसाद पण लक्षणीय वाढला. अखेरीस मंत्रीमंडळाच्या बैठकीला सुरूवात झाली. बैठकीत एक विशेष दिवस राखीव ठेवला फक्त आणि फक्त नव्या कायदेविषयक चर्चेसाठी. वाद, प्रतिवाद, प्रतिक्रिया, प्रतिसाद यांचा योग्य तो विचार करून नवीन कायदा सर्वानुमते संमत व्हावा यासाठी. 

विशेष दिवस उजाडला. प्रधानांनी प्रास्ताविक केल्यानंतर कायद्याच्या अनुषंगाने काही विचार मांडले. 'आपले राज्य धर्मनिरपेक्षतेचा पुरस्कार करणारे आहे. आपण सर्वधर्मसमभावाचा पुरस्कार करतो. पण सध्या विवेकवादी लोकांच्या दिवसाढवळ्या निर्घृणपणे हत्या होणं आपल्या संस्कृतीला शोभणारे नाही. आपण धर्माचा प्रसार, प्रचार करण्यासाठी, धर्म निवडीचे, धर्माचे शिक्षण देण्याचे, श्रद्धा व उपासना करण्याचे आणि सर्वात महत्वाचे विचार, अभिव्यक्ती व विश्वास यांचे स्वातंत्र्य घटनेप्रमाणे सर्वांना दिले आहे. मात्र त्याचा गैरवापर होत आहे. त्यामुळे धर्माच्या बाबतीत निगडित असलेले सगळे कायदे, नियम यांचे आपण एकत्रीकरण करून एक नवा अद्ययावत कायदा पटलावर मांडणार आहोत. आधीचे सगळे धार्मिक चालीरीतींशी असलेले कायदे, सोयी, सुविधा आणि सरकार दरबारी, गैरसरकारी मिळणारे फायदे यांचा एकात्मिक सुधारित दुरुस्ती कायदा तयार केला आहे. त्याचा प्राथमिक मसुदा प्रत्येकाला देण्यात आला आहे. त्यावर चर्चा करून अजून काही सूचना असतील त्यावर सर्वानुमते सहमती घेऊनच कार्यवाही होईल हे निश्चित.' आटोपशीर भाषण संपल्यावर प्रधानांनी कायदा सुव्यवस्था मंत्र्यांना सांगितले की कायद्याच्या मसुद्याचे वाचन करा आणि एकेका सदस्यांनी व्यक्त केलेल्या विचारांवर, आक्षेपांवर, सुचवलेल्या दुरुस्त्यांवर कार्यवाही सुरु करावी. कायदेविषयक सगळ्या बाबींची पुर्तता कशी करायची यावर सगळ्या मंत्रीमंडळातील सदस्यांनी मते मांडावीत.

कायदा सुव्यवस्था मंत्र्यांनी मसुदा वाचायला सुरुवात केली.
कलम क्रमांक १: धार्मिक कार्यासाठी जे जे अनुदान मिळते त्यांचा सगळा हिशेब, तपासणी, करणे अनिवार्य. मिळणारा निधी ज्या स्रोताकडून येतोय त्यांचे सर्व आर्थिक कागदपत्रांची हिशेब-तपासणी अनिवार्य करणे. या मध्ये ज्या संस्थापना, संघटना, खाजगी समुह कुचराई करतील किंवा दिरंगाई करतील त्यांच्या सगळ्या सरकार दरबारी मान्यता रद्दबातल होतील. सहभागी सभासदांना वा व्यवस्थापन मंडळांवर अजामीनपात्र फौजदारी गुन्हे दाखल होतील. याची कायदेशीर कारवाई जलदगती न्यायालयात होईल. सर्वात महत्त्वाचे हा सगळ्या धर्मांना एकच कडक कायदा असेल. 

कलम क्रमांक २: धार्मिक शिक्षण देणाऱ्या सगळ्या शाळा, पाठशाळा, सरकारी, बिगर सरकारी कायमस्वरूपी बंद करण्यात येतील. एक राज्य एकच शिक्षणप्रणाली सर्व धर्मियांना सक्तीने अंगिकारावी लागेल. कोणत्याही शालेय अभ्यासक्रमात कोणत्याही धर्माचे कसलेही शिक्षण कदापिही दिले जाणार नाही. जे काही धार्मिक शिक्षण द्यायचे असेल ते कुटुंबापुरते मर्यादित असेल. सार्वजनिक जीवनात कोणत्याही धार्मिक शिक्षणासाठी कायमस्वरूपी बंदी असेल.
एकात्मिक शिक्षण पद्धतीत कोणालाही जातपातधर्माचा कोणत्याही शैक्षणिक कागदपत्रांवर उल्लेख करता येणार नाही. हे नियम सर्वच धर्मांना लागू असतील.

कलम क्रमांक ३: कोणत्याही धार्मिक कार्यास सरकार दरबारी कसलीही मदत मिळणार नाही. मात्र कार्यक्रम करायचा असल्यास आगाऊ परवानगी घेणे अनिवार्य आहे. कोणताही सरकारी कर्मचारी, अधिकारी किंवा मंत्री अशा कार्यक्रमात सहभागी होणार नाही. सहभागी झाल्यास त्याची सरकारी सेवा कायमस्वरूपी रद्दबातल केली जाईल. सर्वात महत्त्वाचे अशा धार्मिक कार्यात जर समाजविघातक कृत्ये निदर्शनास आली तर आयोजन करणाऱ्या संघटनावर कायमस्वरूपी बंदी, सभासद आणि मंडळावर मनुष्यवधाचा गंभीर गुन्हा दाखल केला जाईल.

कलम क्रमांक ४: कायद्यासमोर सगळेच समान असल्याने सगळे धार्मिक कायदे रद्दबातल करून समान नागरी कायदा अंमलात आणला जाईल. त्यामुळे कोणत्याही धर्माला कसलीही विशेष वागणूक, सवलत कदापिही मिळणार नाही.

कलम क्रमांक ५: धर्माचा हवाला देत कोणत्याही अमानवी कृत्यासाठी सहभागी असलेल्या व्यक्ती आणि समुहावर अजामीनपात्र फौजदारी गुन्हा दाखल केला जाईल. जीवीतहानीस समर्थन करणाऱ्या सगळ्या समुहावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला जाईल. 

कलम क्रमांक ६: कोणत्याही नागरिकावर कोणत्याही प्रकारच्या धार्मिक चालीरीतींची बळजबरी करता येणार नाही. कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी कोणत्याही धर्माच्या नावाखाली कसलाही विक्षिप्त धूडगूस घालता येणार नाही. मिरवणूका, जलसे, शोभायात्रा, प्रभातफेऱ्या, सामुदायिक प्रार्थना, सार्वजनिक ठिकाणी करण्यास कायमस्वरूपी बंदी घातली आहे.

कलम क्रमांक ७: भूतकाळात आमच्या वर अन्याय झाला, आमच्या आस्थांवर आघात झाले, परकीयांच्या आक्रमणात अमुक उद्ध्वस्त झाले म्हणून तमुक पुनर्बांधणी करणे, तोडफोड करणे, आस्था म्हणून बळकावणे, अतिक्रमण करणे यास कायमस्वरूपी प्रतिबंध करण्यात आले आहेत. तसे करणारे कोणी आढळल्यास किंवा समर्थनार्थ उतरलेल्या लोकांवर किंवा समुहांवर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल.

सात कलमी मसुद्याचे वाचन झाल्यावर चर्चेसाठी मुद्दे उपस्थित केले गेले. महाराज प्रधान आणि कायदेपंडितांवर खुष होते. खरीखुरी धर्मनिरपेक्ष घटना अशीच असावी असे त्याला वाटे. मंत्रीमंडळाच्या एका सदस्याने सातही कलम नागरिकांच्या व्यक्तीगत जीवनावर आघात करणारे आहेत. ही हुकुमशाही आहे. असे सुनावले. तीव्र आक्षेप घेत सांगितले एका विवेकवादी माणसाच्या हत्येबद्दल सर्वच धर्माची अशी मुस्कटदाबी जनता अजिबात सहन करणार नाही. दुसऱ्या मंत्र्याने दुजोरा देत हत्या करणाऱ्या लोकांना सार्वजनिक ठिकाणी फासावर लटकवा असे सांगितले पण जनसामान्यांचे धर्माचे स्वातंत्र्य असे कलमानुसार घालवू नका. तिसऱ्या मंत्र्याने तर कहरच केला. आमचा धर्म अल्पसंख्याक आहे म्हणून या सातही कलमातून आम्हाला सूट द्यावी असा प्रस्ताव मांडला. अनेकांनी या प्रस्तावाला दुजोरा दिला. आता खरी लढाई अल्पसंख्य विरूद्ध बहुसंख्य अशी झाली. सगळ्याच मंत्र्यानी कुरबुरी सुरु केल्या. प्रधानांनी समजावण्याचा प्रयत्न केला की सार्वजनिक ठिकाणी सगळ्या धर्माच्या सगळ्या प्रकाराला पायबंद असेल. खाजगी ठिकाणी  कोणताही पायबंद नसेल. मात्र समाजातील शांतता बाधित होत असेल तर कायदेशीर कारवाई होणारच. सगळ्याच मंत्र्यांनी प्रत्येक मुद्द्यावर आक्षेप घेत आमच्या धार्मिक कर्तव्य, हक्क आणि अधिकारांची कुचंबणा होते असा दावा केला. महाराज सगळं पाहत होते, ऐकत होते. त्यांना मनोमन खूप वाईट वाटले. एकही विवेकवादी मंत्री या राजदरबारात नाही याचे शल्य महाराजांना बोचू लागले. काही मंत्री तर महाराजांना म्हणाले की आमच्या धर्मात लूडबूड करण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? हा कायदा जर लागू केला तर अराजक माजेल. जनता रस्त्यावर उतरेल. धर्माचे अनुसरण आम्ही कसे करावे हे ठरवणारे मंत्रीमंडळ कोण? मंत्रीमंडळाने राज्यकारभार करावा. धर्माच्या बाबतीत काय करायचे हे जनता ठरवेल. ना महाराज, ना प्रधान, ना कायदा सुव्यवस्था मंत्री ना कोण्या मंत्रीमंडळाच्या सदस्यांना धर्मामध्ये हस्तक्षेप करू शकत नाहीत. मंत्रीमंडळात गदारोळ माजल्याने दरबाराचे दिवसभराचे कामकाज तहकूब करावे लागले. दुसऱ्या दिवशी उर्वरित चर्चा आणि इतर गोष्टींवर विचारविनिमय केला जाईल असे ठरले. तोपर्यंत सातही कलमे राज्यातील नागरिकांना समजली. विवेकवादी लोकांनी महाराजांचे कौतुक केले. मात्र त्यांना जनाधार नसल्याने त्यांचे कोणतेही मुद्दे जनतेपर्यंत पोचत नव्हते. ज्यांना जनाधार होता त्यांनी त्यांची इकोसिस्टिम उभी केली होती. विवेकवादी हतबल झाले होते. सातही कलमातून धर्मांतराच्या बाबतीत कसलीही नियमावली नसल्याचे पाहून धर्मांतर करण्यात अग्रेसर असणाऱ्या संस्था, समुह कार्यान्वित झाले. युद्धपातळीवर लोकांना आमीषं दाखवली जाऊ लागली. दरबारातील, राज्यकारातील यंत्रणा काही अतिउत्साही लोकांनी कामाला लावली. प्रत्येक प्रार्थना स्थळांना टार्गेट आणि फंड दिला गेला. आपापल्या धर्मियांच्या लॉबीच्या मजबूतीसाठी जो तो झटू लागला.

जनतेला जसं समजलं आपले धार्मिक विधी, कार्यक्रम, उत्सव, मिरवणूका आणि शोभायात्रा आता कायमस्वरूपी बंद होणार तसं एकप्रकारचे निषेधाचे, आंदोलनाचे आणि मोर्चेबांधणीचे वारे वाहू लागले. समाजकंटकांनी याच संधीचा फायदा उचलून मोर्चे, आंदोलने यात सहभागी होऊन जाळपोळ, तोडफोड, लुटालूट आणि दंगली सुरू केल्या. सगळ्याच धर्मातल्या लोकांनी जिथे तिथे धूडगूस घालायला सुरूवात केली. आरपारची लढाई म्हणून बाहेरच्या शत्रू राज्यांनी आपापल्या हस्तकांमार्फत रसद पुरवायला सुरूवात केली. कोणत्याही मंत्र्यांना कोणीही जुमानत नव्हते. कायदा सुव्यवस्था मोडकळीला आली. हतबल प्रधान महाराजांना सगळ्या गोष्टी सांगू लागला. महाराज खजील झाले. महराजांनी शांततावादी समाज निर्माण होण्यासाठी धर्माच्या बाबतीत लूडबूड करू नये कसा सरळसरळ धमकीवजा आदेश प्रस्थापित धर्माच्या ठेकेदारांनी महाराजांना दिला. प्रधानांनी गुप्तचर विभागाकडून मिळालेली स्फोटक बातमी राजांच्या कानावर घातली. प्रधानांनी सांगितले जर योग्य वेळी आवर घातला नाही तर राज्याचे धर्माच्या बहुसंख्य लोकसंख्येच्या आधारावर तुकडे स्वतंत्र छोटीमोठी राज्ये तयार होतील. त्यासाठी आजूबाजूच्या शत्रू राज्यातील टोळ्या सक्रीय झाल्या आहेत. प्रधानांकडे राजांनी मनातील खदखद व्यक्त केली. आता काय करावे यासाठी विचारणा केली. प्रधानांनी सात कलमी कायदा लागू केला जाणार नाही याची घोषणा करायला सांगितले. तशी घोषणा महराजांनी केली. अंमलबजावणी झाली. विवेकवादी लोकांची हतबलता कशी असते याची जाणीव महाराजांना झाली.

© भूषण वर्धेकर,
२२ मार्च २०२२, पुणे

मंगळवार, १५ मार्च, २०२२

काश्मीर फाईल्स

दि काश्मीर फाईल्स - अस्वस्थ करणारा अनुभव

सिनेमा पाहताना जर अस्वस्थ वाटत असेल तर त्या सिनेमाचा कंटेंट आणि कंटेक्स्ट योग्य जागी प्रहार करतो. अर्थातच सगळेच मनाला भिडणारे सिनेमे ह्यूमन लेवल वर करूण वाटतात. ठणकावून आणि ओरबडून सत्य सांगणारे सिनेमे फार कमीच. त्यापैकी काश्मीर फाईल्स. काश्मिरी पंडितांच्या शिरकाणाबद्दल तिखट आणि तीव्र भाष्य करणारा सिनेमा. काही लोकांना हा सिनेमा प्रोपागंडा वाटतो कारण त्यांच्या डीप नॅरेटिव्हला धक्के बसतात म्हणून. सेट केलेलं नॅरेटिव्ह जर खोटं पडू लागलं की जळफळाट, तळमळ, खदखद बाहेर येणं सहाजिकच आहे. मात्र जे काही दाखवले आहे काश्मीर फाईल्स मध्ये ते सत्य घटनेवर आधारित आहे. कपोलकल्पित कथांवर तर नक्कीच नाही. कारण या सिनेमासाठी जो रिसर्च केलाय तो सिनेमा बघताना आतून हादरवतो. अतिरेक्यांनी पंडितांवर हल्लेच केले नाहीत असं जर कोणाचं म्हणणं असेल तर पंडित काश्मीरमध्ये का राहिले नाहीत? विस्थापित का व्हावे लागले पंडितांना? अर्थातच अतिरेक्यांनी गुलाबपुष्प देऊन पंडितांना काश्मीर सोडा म्हणून तर सांगितले नव्हते! 

आपल्याच देशात  मूळ रहिवाशांना आपापल्या घरादाराला सोडून त्रयस्थ ठिकाणी जीवाच्या भीतीपोटी विस्थापित व्हायला भाग पाडले हे त्रिकालाबाधित सत्य आहे. ताश्कंद फाईल्स साठी जसा रिसर्च केला होता तसाच खोलवर जाऊन रिसर्च या सिनेमासाठी केला हे स्क्रिप्ट मध्ये दिसून येते. कलाकारांचे परफॉर्मन्सेस पॉवरफुल झाले आहेत. सिनेमाची गोष्ट जसजशी पुढं सरकत जाते तसतसे काही संदर्भ मध्येच कसे काय आले असा प्रश्न पडतो. अशा किरकोळ त्रुटी वगळता सिनेमा बघण्यासारखा झालाय. उदाहरणार्थ बाळासाहेब ठाकरेंनी विस्थापित काश्मिरी पंडितांच्या मुलांना शिक्षणासाठी काही जागा वाढवून दिल्याचा उल्लेख आहे. मात्र महाराष्ट्रात युतीचे सरकार ९५ नंतर आले. ८९-९० सालातील हल्ले दाखवले गेले. मात्र डिरेक्टोरिअल लिबर्टी म्हणून असे संदर्भ खपून जातात. दुसरा प्रसंग म्हणजे रक्ताने माखलेले तांदूळ खाऊ घालणे. हा प्रसंग कधीकाळी बंगालमध्ये खराखुरा घडलेला आहे. तत्कालीन कॉंग्रेसच्या नेत्याला घरात घूसून असेच मारले होते कम्युनिस्ट लोकांनी. सैनबारी हत्याकांड म्हणून प्रसिद्ध आहे. त्या घटनेचा पंडितांचे हाल दाखवताना आधार का घ्यावा हे समजले नाही. सिनेमात पंडितांवर झालेले अनन्वित अत्याचार पाहून आतून उध्वस्त होतेच. मग समजते प्रत्यक्षात किती आणि कसे हाल त्यांनी सहन केले असावेत! त्याहूनही वाईट वाटते तथाकथित लोकांच्या डीप सिस्टिम्सचा अवाका आणि ब्रेनवॉश करण्यासाठी केली जाणारी हुकुमी पद्धत. सिनेमात हिंसक दृश्ये दाखवली आहेत कारण हिंसा हेच अस्त्र वापरलं गेलं पंडितांना हुसकावून लावण्यासाठी. 

स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जुनागढ, हैद्राबाद आणि काश्मीर या संस्थानाच्या इतिहासातील घडामोडींचा जर सिनेमात उल्लेख आला असता तर सिनेमात एक महत्त्वाचा टप्पा मांडला गेला असता. त्यानंतर सोव्हिएत रशियाच्या पाडावानंतर काश्मीरमधील कित्येकांना अचानक कसा काय इंटरेस्ट वाटू लागला याचेही धागेदोरे सिनेमात मांडता आले असते. कारण इस्लामिक स्टेटची मोडस ऑपरेंडी अचानक एकाकी वाढली नाही. तिचा शिरकाव खूप आधीपासूनच झाला. मग स्वतंत्र काश्मीर चे आळोखेपिळोखे नंतर भारताने बळकावल्याची भावना वगैरे सिनेमात यथोचित मांडली आहे. कारण काश्मीर स्वतंत्रपणे केवळ धर्माधारित हवा होते तत्कालीन अलगाववादी लोकांना. त्यांना छुपा पाठिंबा देणारे भारतातील तथाकथित विचारवंत आणि त्यांना रसद पुरवणारे पॉलिटिकल थिंकटँक समांतरपणे कार्यरत होते. साधा सोपा प्रश्न आहे जर स्वतंत्र काश्मीर हवा होता तर काश्मीरमधील पंडितांचे जिनोसाईड करण्याची काय गरज होती?

काश्मीरमधील प्रश्नांची उकल करण्यापेक्षा ते तसेच ठेवून कैक लोकांचे वेस्टेड इंटरेस्ट इनकॅश करायचे उद्योग काही नवे नाहीत. रलीव, सलीव, गलीव चे नारे देऊन पंडितांवर काश्मीर सोडण्याची वेळ आली याला जबाबदार कोण? इस्लामिक टेररिझमला पाठीशी घालणारे कोण? सत्य दाबून ठेऊन इन्फो वॉर चालवणारे कोण? याची उत्तरे सिनेमा पाहून समजतात. मुस्लिम ऑप्रेस्ड झाला म्हणून अतिरेकी कारवायांकडे वळाला हे भंपक लॉजिक कैक दशकांपासून लोकांच्या मनावर बिंबवलं जाते. मुळातच धार्मिक कट्टर शिक्षण लहाणपणापासून दिल्यावर मेंदूत सर्वधर्मसमभावाचा मागमूस तरी राहील का? अशा धार्मिक कट्टरपंथी अतिरेकी सोकॉल्ड फ्रीडम फायटर होऊच कसे शकतात. तसं त्यांना एखाद्या इकोसिस्टिमने जर प्रमोट केले तरच असे होऊ शकते. इकोसिस्टिम कोणी राबवली कशासाठी राबवली कोणाचे काय मनसुबे आहेत यावर काश्मीर फाईल्स सडेतोड भाष्य करतो. हे असं उघडंनागडं सत्य पचवायला तथाकथित पुरोगाम्यांना शक्य नाही. कारण त्यांना पंडितांबद्दलची सरकारने जाहीर केलेली आकडेवारी प्रिय आहे. हेच तर्कट गुजरात दंगलीवर पुरोगामी कदापिही मान्य करणार नाहीत. कारण गुजरात दंगल हा पुरोगाम्यांचा जीवाभावाचा विषय. मात्र गोध्रा हत्याकांडानंतर गुजरातमध्ये दंगली पेटल्या हे स्विकारणे पुरोगाम्यांना जमणार नाही. हा विषय खूप खोल आहे. तसेच दलितांवर झालेल्या अत्याचाराचे खापर जसे तथाकथित सवर्ण आणि प्रस्थापित वर्गावर फोडले जाते. तसे पंडितांवर झालेल्या अत्याचाराचे खापर इस्लामिक टेररिझमवर जाहीरपणे कोणी सोकॉल्ड स्कॉलर फोडत नाही. मुळातच पॉलिटिकल इस्लाम, मुल्लांचा इस्लाम की अल्लाह चा इस्लाम यातच खूप लोकांचे बेसिकमध्ये राडे आहेत. मुसलमान स्वतःच्या धार्मिक आस्थांना कवटाळून नक्की काय आणि कशी भूमिका घ्यायची याच्याच विवंचनेत असतो. तलवारीच्या टोकावर इस्लामिक प्रसार प्रचार झालाय हे सर्वश्रुत असून देखील जिहाद म्हणजे धार्मिक बाब म्हणून दुर्लक्षित केला जातो. मी मागे कोणत्यातरी वेच्यात लिहिले होते अल्पसंख्याक असू तेव्हा विशेषाधिकार आणि बहुसंख्य झालो की सर्वाधिकार हीच शिकवण लादली गेलीय धर्माच्या नावाखाली. मग शरीया, कुराण दिमतीला आहेच. सोबत समुदायावर असलेले मुल्ला मौलवींचे वर्चस्व. अशा त्रेधातिरपीट असलेल्या गुंतागुंतीची व्यवस्था असताना सोकॉल्ड मुस्लिम स्कॉलरांनी पुढे येऊन प्रबोधन करण्याची गरज असते. मात्र तसं होताना दिसत नाही. कोणताही पुरोगामी असे प्रबोधन करण्यास उत्सुक नसतो. हिंदुत्ववादी लोकांना हाच मुद्दा मिळतो ध्रुवीकरण करण्यासाठी. 

सर्वात महत्त्वाचं या सिनेमात भिडणारे आहे ते म्हणजे गोंधळलेल्या कृष्णा पंडितचे मानसिक द्वंद्व. त्यासाठी दिग्दर्शकाने जेएनयूस्टाईल इन्स्टीट्यूट ज्या पद्धतीने उभी केलीय त्याला तोड नाही. मग प्रेसिडेंट इलेक्शन, प्रचार, स्पीच वगैरेंची विषयसुचक पेरणी भारी केलीय. डाव्यांची बौद्धीकं ज्या पद्धतीने मेंदूत बिंबवली जातात त्याचा वापर स्वैरपणे स्क्रिप्ट आणि प्लॉटमध्ये केलाय. हे करताना सिनेमा कुठेही पकड सैल करत नाही कारण अभिनेत्यांनी केलेल्या चाबूक परफॉर्मन्समुळे. विशेष अनुपम खेर. सारांशमधला हतबल म्हातारा ज्या ताकदीने उभा केला होता त्याच ताकदीने पुष्करनाथ पंडित उभा केलाय. बाकीचे सोबतीचे तेवढेच ताकदीचे कलाकार. त्यांच्या त्या काळच्या आठवणी ज्या पद्धतीने मांडल्या आहेत त्यावरून प्रशासकीय कारभारात काही तरी करू पाहणाऱ्या लोकांची हतबलता लक्षात येते. डोळ्यासमोर जूलुस निघतात. आजूबाजूला हिंसक हल्ले होतात. वेचून वेचून पंडितांना ठार केले जाते अल् जिहादच्या नावाखाली. हे बघून सून्न होते. हे जे दाखवलंय ते काय मनघटीत कहाण्यांवर तर नक्कीच नाही. या वर वेगवेगळ्या वेळी खूप लोकांनी लिहिले आहे. मात्र सिनेमाच्या माध्यमातून लोकांसमोर पहिल्यांदाच येतंय. हे धाडस महत्त्वाचे. अर्थातच याला प्रोपागंडा म्हणणारे अट्टल आहेत. त्यांची सर्वात मोठी गोची अशी आहे की असे घडले होते जाहीरपणे बोलूही शकत नाहीत. मुळातच जसे काश्मीरमधील हिंदू होरपळले तसे काश्मिरी मुसलमान पण हकनाक बळी पडले. काश्मिरी पोलिसांना तर कोणीही वाली नाही. त्यांच्यावर पण असाच सिनेमा यायला पाहिजे. पण मेख तिथेच आहे बहुसंख्य काश्मिरी पोलीस हे मुस्लिम आणि इस्लामिक अतिरेक्यांनी त्यांच्यावर केलेले अमानुष हल्ले जर सिनेमात दाखवले तर त्यालापण प्रोपागंडा वगैरे लेबल लावून मोकळे होता येणार नाही. एरव्ही हिंदु दहशतवाद, भगवा आतंकवाद वगैरे बरळणारे काश्मीरमधील आतंकवादाला उभ्या आयुष्यात इस्लामिक टेररिझम बोलणार नाहीत. कारण कैक वर्षे सेट केलेले नॅरेटिव्हला तडा जाईल. काश्मीर बाबतीत सेपरेटिस्ट, फ्रीडम फायटर वगैरे बीरुदावलल्या जाणूनबुजून पेरल्या.

सिनेमा बघताना फक्त पंडितांवर झालेला अत्याचार दाखवला आहे असे वाटत नाही. एकमेकांच्या खोलवर पसरलेल्या गुंतागुंतीच्या सिस्टिम्स कशा वापरल्या जातात हे समजते. मग लढणारे वेगळ्या पातळीवर जातात आणि फिल्डवर होरपळून मरणारे बिचारे पंडित दिसतात. 'सियासत की लडाई' न राहता 'धर्म की नोंकपर लहराएँ परचम' पर्यंत सिक्वेन्सेस ढळढळीत दिसतात. ज्यांनी इतिहास भूगोल वाचलाय काश्मीर विषयी त्यांना फार काही हादरे बसत नाहीत. मात्र ज्या धाडसाने सिनेमात मांडलेय त्याचं कौतुक वाटतं. कारण अशा जेनोसाईडवर माहितीपट, न्यूज हिस्टॉरिकल सेगमेंट आले असते तर इम्पॅक्ट पडला नसता. सिनेमाने तो पडतो. सिनेमा बनवणे ही सर्वात महागडी कला. त्यात अशा विषयांवर एवढी जोखीम घेऊन सिनेमा बनवणे आणि कमर्शिअल पद्धतीने ऑडिअन्स ला सिनेमागृहात खेचून आणणे सहजसाध्य नाही. बॉलिवूड चौकटीच्या कसल्याही प्रमोशनल टेकनिक्स न वापरता सिनेमा चालतो लोकांना आवडतो हे या सिनेमाने दाखवून दिलेय. सिनेमाचं माध्यम लोकांपर्यंत न आणलेल्या गोष्टी दाखवू शकतो हे पुन्हा सिद्ध केलंय. काहींना हे प्रचारतंत्र वाटतेय. वाटणारच कारण त्यांनीही कधीकाळी असाच प्रचारासाठी प्रयत्न केलेला असावा. कारण ज्या ठामपणे सांगितले जातेय की काश्मीर फाईल्स हा असत्यावर आधारित आहे तर त्या ठामपणे ते सत्य नेमके काय हे सांगत नाहीत. 

सिनेमाची सर्वात मोठी बाब म्हणजे गोष्ट सांगणे. ती जर का फसली तर सिनेमा प्रेक्षकांना पकडून ठेवत नाही. नेहमीची गोष्ट सांगताना लोकांना नेमकं अमुकतमुकबद्दल काय घडलं याची उत्सुकता शेवटपर्यंत टिकते. हे दिग्दर्शकीय कसब. शेवट निराशा करणारा असला तरी विचार करायला प्रवृत्त करतो कोणत्याही संवेदनशील माणसाला. आपल्याच देशात आपल्याच नागरिकांना अशाही प्रकारे जगावं लागलं कसलीही चूक नसताना. हे भीषण वास्तव मनाला  हादरा देतं सिनेमा संपल्यानंतरही.

© भूषण वर्धेकर
१५ मार्च २०२२
पुणे

सोमवार, ७ मार्च, २०२२

एका स्त्रीवादी बाईचा महिला दिवस

सकाळी सकाळी मोबाईलवर आलेले प्रमोशनल मेसेजेस वाचून एक स्त्रीवादी बाई फारच वैतागली. मेसेज होता एका ऑनलाइन शॉपिंगच्या सेल संदर्भात. महिला दिनानिमित्त किचन एप्लायन्सेसवर भरघोस सूट. दुसरा मेसेज होता साड्यांच्या सेलबद्दल. त्यातील एक वाक्य होते.  'वुमेन इन सारीज् लूक्स मोअर ट्रेडिशनल. हॅप्पी शॉपिंग'

सकाळीच असे मेसेजेस वाचल्यावर बाईंचे पित्त खवळले. बातम्या बघण्यासाठी टिव्ही लावला तर स्त्रीया आता पुरुषांच्या बरोबरीने सगळ्या क्षेत्रात आघाडीवर वगैरे बाबतीत चर्चा चालू होत्या त्यात फक्त अँकर बाई होती आणि चर्चेसाठी बोलावलेल्या पॅनलवर पाचपैकी एकच स्त्री होती. बाकीचे चार म्हणे फेमिनिस्ट मेल होते. हे बघून बिचारी स्त्रीवादी एकदम फेमिनाझी झाली. 'फ' वर्गातील आंग्ल शिवी हासडून टिव्ही बंद करून मोबाईलवर स्क्रोल करू लागली. व्हॉट्सऍप ग्रुपवर वुमेन्स डे निमित्ताने येणाऱ्या पानाफुलांच्या, कवितांच्या, इमोजींच्या, सुविचारांच्या गराड्यात गोंधळून गेली. फेसबुकवर टॅग केलेल्या मैत्रिणींच्या नवऱ्यांच्या पोस्टींचा महापूर पाहून 'एक्स'च्या पोस्टवर थबकली.

आपल्या एक्सला बायको म्हणून काकूबाई घर सांभाळण्यासाठी पाहिजे होती आणि तशी त्याला भेटली होती हे पाहून मनातून कासावीस झाली. मग आवरून लाडक्या 'पेट'  ला घेऊन मॉर्निंग वॉकला निघाली. बाईंनी मुद्दाम कुत्राच पाळला होता आणि नाव पण एक्सचेच दिले होते. खुन्नस. तसंही पोरं ब्रेकअप झाल्यावर कुत्री पाळून तिला आपल्या एक्सचे नाव देतात. मग महिलांनी का मागे रहायचे! कुत्र्याची रपेट झाल्यानंतर बाईंची व्हेजिटेबल स्मुदी आणि वर्क फ्रॉम होम सेटअप रेडी झाला. लॉगिन केल्यावर एच.आर. चे वुमेन्स डे स्पेशल व्हाउचर्स, ग्रिटींग आणि मिटिंग इन्व्हीटेशन्स धडधडायला सुरुवात झाली. मग दिवसभर आळोखेपिळोखे देत स्टँड अप, स्टेटस मिटिंग, सेशन्स, एक्सेल शीट्स, जीरा टिकिट्स, ब्रेन स्ट्रॉमिंग डिस्कशन्स, कॉफी ब्रेक, लंच ब्रेक, वामकुक्षी, घरच्यांसोबत बोलणं, लग्नासाठी तुणतुणे वादविवाद, दिवसभराची कामे वगैरे सगळे सोपस्कर झाले. राहत असलेल्या सोसायटीची आज खास महिला दिना निमित्त खास महिलांनी महिलांसाठीच पुरुषांच्या पुढाकाराने टेरेस डिनर इव्हेंट पार पडला. सभासदांनी नसती केली तरी चालली असती अशी भाषणे फेकून मारली. घिसेपिटे हास्य विनोद. गॉसिप करताना कोंडलेल्या एकमेकींच्या इच्छा, आकांशा आणि वेदनांना मोकळी वाट मिळाली. इथे स्त्रीवादी बाई थोड्या आयसोलेटच होत्या.

सोसायटीच्या इव्हेंटमध्ये नटूनथटून येणाऱ्यांचा बाईंना विशेष एलर्जी. बाई स्वतः टॉमबॉय प्रमाणे वावरतात. बुलेट वापरतात. विकेंडला हँगआऊटला जातात. महिन्यात किमान डझनभर ओटीटी प्लॅटफॉर्मवरच्या सिरिज संपवतात. घरच्यांचा आग्रहाखातर सणासुदीला गावी जातात. महिन्या दोन महिन्यांतून एकदा भावाच्या घरी जाऊन भाच्च्यांसोबत दंगामस्ती करतात. वर्षातून एकतरी लॉंग बाईक राईड फिनिश करतात. थोडक्यात मनाला हवं तसं जगतात म्हणून महिला दिनानिमित्त होणाऱ्या मच हायपर सेलेब्रेशन्स इव्हेंट्सचा तिटकारा करतात. पुर्वीसारखी आता नातलग, मित्रमैत्रिणींचे लग्न समारंभ उत्साहात साजरा करत नाहीत. स्वतःच्या स्पेसमध्ये गुरफटून जगाची निरिक्षणे नोंदवत बसतात. कधीतरी घरातून फारच पिच्छा पुरवला तर एखादे शनिवारी लग्नासाठी म्हणून पाहिलेल्या मुलासोबत कॉफी प्यायला जड मनाने पोचतात. मग इकडच्या तिकडच्या साचेबद्ध गप्पा. फ्युचर, पार्टनर, आवड निवड, नोकरी वगैरेंच्या चोथट चर्चा होतात. कधी इकडून नकार तर कधी तिकडून नकार यातच वयाची वर्षे वाढत जातात. मग पुन्हा तोच प्रपंच स्वतः स्वतःसाठी स्वतःपुरता केलेला रहाटगाडगे चालवण्यासाठी.

©भूषण वर्धेकर
८ मार्च २०२२, पुणे

शनिवार, ५ मार्च, २०२२

झुंड

झुंड

झुंड मध्यंतरानंतर मनावरील पकड कमी करतो. बरेच ठिकाणी प्रेडिक्टेबल होतो. नागरजचे फँड्री आणि सैराट जसे मनावर गारूड करतात तसा झुंड करत नाही. सिनेमा संपल्यानंतर नागराज स्पेशल होल्ड झुंड बघितल्यावर राहत नाही. झोपडपट्टी मधल्या पोराटोरांचे मानसशास्त्र, सामाजशास्त्र, अर्थशास्त्र आणि मानवतावाद सगळं एकाच सिनेमातून का दिलं गेलं असा प्रश्न पडतो. कलरफुल सिनेमा, प्रत्येक नॉन एक्टर कडून करवून घेतलेली कामे, संवाद, सिम्बॉलिक फ्रेम्स आणि सिनेमॅटोग्राफी आशयाला अनुसरून शोभत असली तरी शेवटपर्यंत खिळवून ठेवत नाही. धक्कातंत्र देण्याचे नागराजचे कसब इथे फिके पडते. मला व्यक्तीगत सिनेमा पाहताना नामदेव ढसाळ आणि जयंत पवार यांच लिखाण वाचल्यावर जे दृश्यं उभे राहिले होते तसा भास झाला. झोपडपट्टी मधल्या तरुणांना एकत्र घेऊन फुटबॉलच्या माध्यमातून मुख्य प्रवाहात आणणं लोकांना अपील होईल असं वाटत नाही. कारण स्पोर्ट्स फिल्म्स बनवण्यासाठी जे तंत्र लागते लोकांना शेवटपर्यंत गुंतवून ठेवण्याचे ते तंत्र इथे नाही. केवळ फुटबॉल खेळात गुंतून राहिल्याने त्यांचे प्रश्न सुटणार का? नाही सुटणार. कारण ते दुर्लक्षित राहिले म्हणून मुख्य प्रवाहात आले नाहीत. बच्चन साहेबांच्या खांद्यावर मुख्य पात्र देऊन सगळा स्ट्रगल इतर लोकांचा दाखवलाय. मग बच्चन नसते तर तीच झोपडपट्टी गँग हिरो म्हणून स्ट्रगल करताना दाखवली असती तर वेगळाच इम्पॅक्ट तयार करता आला असता. आजवरचे सगळे हिंदी सिनेमे संवादातून व्यथा मांडतात. मग झुंडमध्ये शेवटच्या सीनमध्ये कोर्टात अमिताभ बच्चन चे भारदस्त आवाजातील संवाद त्याच पठडीतील वाटतो. फँड्री आणि सैराट मध्ये संवादापेक्षा पात्रांनी केलेली कृती लोकांवर प्रभाव टाकत होती. संवादातून टाकलेला प्रभाव हा कृतीतून टाकलेल्या प्रभावासमोर तकलादू असतो. झोपडपट्टीत राहतात म्हटल्यावर दाखवण्यात आलेले सगळे कॅरॅक्टर्स हे लोकांपर्यंत आजवर सगळ्याच माध्यमातून बरेचदा आलेले आहेत. मग नागराज कडून वेगळ्या अपेक्षा आहेत आणि त्याने टिपिकल छापखान्यातील टेकनिक्स वापरून झुंड बनवला आहे असं जाणवत राहतं. ह्या विषयावर सगळं एकाच सिनेमात बसवण्याचा प्रयत्न केलाय असं दिसतं. कित्येक आजूबाजूचे कॅरॅक्टर्स तेवढ्यापुरते येतात जातात.  ही सगळी कॅरॅक्टर्स वेगवेगळ्या कॅनव्हासवर आणून किमान एक सिजन होईल अशी ओटीटी सिरिज सहज होऊ शकेल. त्यात प्रत्येक एपिसोड  मध्ये एक एक प्रश्न हाताळता येतील आणि वेगवेगळ्या सिच्युएशन वर भाष्य करता येईल.  

हिंदी सिनेमाच्या एक ठरलेल्या चौकटीत नागराज मंजुळेचा सिनेमा पाहणं अवघड जातं. अपेक्षा उंचावल्या होत्या फँड्री आणि सैराट ने त्यामुळे झुंड तशा अपेक्षा पुर्ण करत नाही. मध्यंतरापर्यंत जे जे हॅपनिंग आहे ते ते चांगलं खिळवून ठेवतं. नंतर फुटबॉलच्या संदर्भातील सामने, टुर्नामेंट्स, होमलेस सॉकर साठी प्रत्येक खेळाडूचा चाललेला संघर्ष एकाच सिनेमात पचनी पडत नाही. फक्त अमिताभ बच्चन लक्षात राहतो नागराज मंजुळे कुठेतरी हरवतो सिनेमा संपल्यानंतर. झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांची कामे ज्यांनी केली ते लक्षात राहतात. सिनेमात जे सामाजिक भाष्य केले आहे ते पण लक्षात राहते मात्र मंजुळे काय वेगळं दाखवणार ह्या अपेक्षेने गेलेला प्रेक्षक हिरमुसतो. नागराजचे सिनेमे सामाजिक भाष्य करतात. राजकीय भाष्य आणि सामाजिक भाष्य यात पुसटशी रेषा आहे. समाजाच्या व्यथा, प्रश्न, समस्या भेदकपणे मांडणे हे सामाजिक भाष्य आणि त्याचे खापर कोण्या एका वर्गावर तरी फोडणे हे झाले राजकीय भाष्य. सगळ्याच समाजात दाहक, ज्वलंत वगैरे भेडसावणाऱ्या समस्या असतात. काहींना त्या जाणीवेतून तर काहींना नेणिवेतून समजतात. ते जगणं ज्या माध्यामातून लोकांसमोर येते ते महत्त्वाचे. ते माध्यम किती लोकांना अपील होते किंवा तुमची जगण्यासाठी चालणारी धडपड किती लोकांपर्यंत जाते हे त्या माध्यमाच्या लोकप्रियतेवर ठरते. साहित्य, नाटक, चित्रपट ही महत्त्वाची माध्यमे ज्याने त्याने वापरली. एखाद्यावर झालेला अत्याचार जर साधन म्हणून बाजारात मांडला तर तो राजकीय किंवा सामाजिक बस्तान पक्कं करण्याचा खटाटोप असतो. असा खटाटोप सगळ्या माध्यमातून ज्या त्या सामाजिक आणि राजकीय आस्थांनी बरेचदा केला. काहींना यश आलं तर काही अपयशी ठरले. अशा सगळ्या बाबींवर जर मंजुळे काहीतरी मांडण्याचा प्रयत्न करतोय तर ते फँड्री किंवा सैराट सारखे असेल अशी अपेक्षा उंचावणे सहाजिकच आहे. कारण नागराज ज्या भेदकपणे प्रश्न मांडतो ते लाजवाब. मग ती चीड झुंड मध्ये मध्यंतरानंतर दिसत नाही. विस्कटले आहे काहीतरी असं मनोमन जाणवतं. कॉलेजमध्ये खेळणाऱ्या पोरांना फुटबॉलमध्ये गड्डी गोदामची पोरं हरवतात हे सिनेमॅटिक वाटतं. मात्र नंतरचा होमलेस सॉकरचा प्रत्येकाचा लढा मनाला रुचत नाही. मग चावून चोथा झालेले घिसेपिटे डायलॉग इनकी दुनिया उनकी दुनिया यात अडकल्यासारखा वाटतो सिनेमा. 

जब्याचा मारलेला दगड जेवढा जोरात लागला किंवा आर्ची परश्याच्या रक्तात माखलेली लहानग्याची पावले जेवढी मनात रुतली तेवढे वार डॉनच्या कटर ने झाले नाहीत. तरीही आपल्या मराठी माणसाने केलाय सिनेमा एकदा अवश्य बघा. आवडो न आवडो. 

© भूषण वर्धेकर
५ मार्च २०२२, पुणे

गुरुवार, ३ मार्च, २०२२

प्रत्येकाचं बरं चाललंय

प्रत्येकाचं बरं चाललंय
आपापलं राखून ठेवलंय
काहींनी वाटून घेतलंय
उरलेल्यांनी हेरून ठेवलंय

कोण कोणाला जीवे मारतो
कोण कोणावर हल्ले करतो
कोण कोणाची कोंडी करतो
त्यावर प्रत्येकाचा निषेध ठरतो

साम्राज्याचा विस्तारवाद युद्ध करते
स्वराज्याचे सीमोल्लंघन क्रांती करते
इतिहासकारांची ढोंगी लेखणी चाचरते
कुठे सशस्त्र लढा, कुठे युध्दाची खुमखुमी ठरते 

हल्ल्यांच्या भीतीपोटी शस्त्रे घ्यावी
संरक्षणासाठी दिखाऊ अस्त्रे दाखवावी
पत नसेल तर आर्थिक मदत घ्यावी
श्रीमंत तिजोरीत भर पडावी

असेल अभेद्य राष्ट्रवाद जर
अंतर्गत ऐक्य करावे जर्जर
लक्ष वेधून जातपातधर्मावर
वार करा सामाजिक सलोख्यावर

राष्ट्राच्या इतिहासाची करावी तोडमोड
संस्कृती, सभ्येतेची करून पडझड
फुस लावून असंतुष्टांची रडारड
राष्ट्रविघातक अंतर्गत वरचढ

शांततावादी भूमिका घेऊन तत्पर
दुसऱ्यांच्या माथी फोडावे खापर
महाशक्तीचे कौतुक गोडवे जोरदार
नफेखोरीचे शस्त्रास्त्र व्यवहार

© भूषण वर्धेकर
४ मार्च २०२२, पुणे

तू बोल मराठी

तू बोल मराठी, आवेशपूर्ण अस्मितेसाठी  तू फोड डरकाळी, एकवटून शक्ती सगळी तू कर राडा, एकीचा शिकवू चांगलाच धडा तू हाण कानफटात, उमटू दे बोटं घराघर...