असंख्य प्रश्नांचा बोजवारा
मनात कोंडून प्रत्येकजण
घुसमटताना दिसतो
ज्याचा त्याचा पिंड वेगळा
कोणी जगण्यसाठी तर
कोणी जगवण्यासाठी....
मी मात्र अजागळ
सर्व दु:खेही केवळ माझ्याशीच...
असा बाऊ करत भैसटतो..बिथरतो...
शोधत कारणं
धगधगतं सत्य...ग्रोन अप काळ
असुरक्षितता भविष्याची
असो... सध्यातरी माझा
फुल टाईम स्ट्रगल चालू आहे....
भूषण वर्धेकर
७/९/२००९
पहाटे ३.१५
समाज
शुक्रवार, २५ मार्च, २०१६
असंख्य प्रश्नांचा बोजवारा
बघण्याची insight
बघण्याची insight
पाहण्याची foresight
अस्तित्वाचीfight
सकलांचा right
कलेचा artist
मृत्यूचा fascists
तरुणाई frustrate
व्याकुळ dramatist
रयतेचा rule
संदिग्ध fool
स्वातंत्र्याचा feel
उपेक्षिताचे meal
मोठ्यांचे flex
जगण्याचे complex
विकृतीचा sex
स्वीकृतीचा stress
भूषण वर्धेकर
8 June 2009
3:59 PM जळगांव
हल्ली फारच
हल्ली फारच
विदारक चाल्लय...
बोथट झालेल्या
हत्याराची नामुष्की
शत्रू माणसांमधला
मुखवटा झालाय
मारणार कोणाला
सगळेच आपले- तुपले
सगळं कसं सुरळीत
शांतीत क्रांती झाल्यासारखं
उगाच कुठेतरी निषेध
व्यावसायिक उपोषण
मात्र त्यालाही आता
नाही राहिली धार
उगाच संवेदनाहीन
असह्यतेचा फुत्कार
नाममात्र शोक, चिंतन बैठका
नंतर मात्र उरका
पुढच्या निषेधाच्या
तयारीच्या, जुलूसाच्या
बंडखोरीची हत्यारे
झाली कालबाह्य
जनता मात्र आसुसलेली
युगपुरुषाच्या प्रतिक्षेत
स्वत:चं पुरुषत्व गहाण टाकून...
२५-०७-२०११
उरूळीकांचन स्टेशन
रोजदांजी कथोकल्पित
रोजदांजी कथोकल्पित
पोटासाठी वणवण
हस्तरेषा
ज्योतिषासाठी
देशोधडीचे राजकुमार
दिवास्वप्ने कलुषित
झगमगाट
कृत्रिम व्यस्ततेचा
दरवळी गंध
फुलातून मध
चित्रांची कोष्टके
बंदिस्त वर्गात
आस्तित्व जमतींचे
पुढाकारांची भ्रांत
लोणी खाणारे
ऐटीतस बसती
अराजकाची कॊंडी
स्वत:ची धुंदी
जमीनजुमला
गुंडांच्या दावणीला
भव्य दिव्य आश्वासने
ऊंच ऊंच कारखाने
सदनिकांच्या राशी
मूळ मालक कुंपणाशी
सरले आयुष्य
चळवळीसंग
नवा प्रश्न येती
जुनाट जाती
वेचूनी विस्कटलेली
अंगे भंगलेली कुटुंबे
आशादायी
लहानगे
कोमेजली तरुणाई
झिंदाबादच्या गर्तेत
पाठीराख्यांची नवी पिढी
उपोषणांसाठी
ज्याचे त्याचे जगणे
सुखासाठी झुरणे
थापांना भुलणे
रोटीसाठी
भूषण वर्धेकर
६/३/२००९
सकाळ ११.०६
शनिवार पेठ
ज्याचा त्याचा महापुरूष
ज्याचा त्याचा महापुरूष
ज्याचा त्याचा पंथ
राजरोस अविवेकी ऊरुस
हीच सार्वत्रिक खंत
विचारांची पायमल्ली
दिमाखदार गाठीभेटी
समारंभ गल्लोगल्ली
कार्यकर्ता अर्धपोटी
योजनांचा महापूर
महापुरूषांच्या नावे
सत्तेसाठी वेगळे सूर
जातीपातीत हेवेदावे
विचारवंत स्वयंघोषित
फ्लेक्ससाठी फोटो ऐटीत
नितीमत्ता गेली मातीत
समाजकल्याण लालफितीत
सरकारी टक्केवारी
कागदोपत्री जमवलेली
मंत्र्यांची हमरीतुमरी
कमिशनसाठी आसुसलेली
भाबडी जनता आशाळभूत
सकल ऊद्धाराच्या प्रतिक्षेत
महापुरुषांचे पुतळे सुशोभित
विखुरलेल्या चौकाचौकात
भूषण वर्धेकर
9-11-2010
उरुळीकांचन
म्हणूनच तेलही गेलं अन् तूपही गेलं . . .
म्हणूनच तेलही गेलं अन् तूपही गेलं . . .
त्याचं असं झालं…..
त्याने तिच्यासाठी खूप केलं
नको एवढं करून शेवटी मातीत गेलं
तरीपण ह्याचं कसंबसं निभावलं
सरतेशेवटी ह्याला कळून चुकलं
कोणाचातरी पर्याय असण्यापेक्षा
कोणीतरी आपली निवड करून व्हावं चांगभलं
नाहीच कुठे जमलं तर आपण एकटंच बरं
म्हणूनच तेलही गेलं अन् तूपही गेलं . . .
काही दिवस असेच जातात रुक्ष रुक्ष
तरीपण नजर मात्र सदैव दक्ष
नवीन जुगाड जुळलं तर लागलीच व्हावा सोक्षमोक्ष
हळुवार सुरु होतात तिरपे कटाक्ष
मग रचले जातात नवी ध्येयं नवे लक्ष्य
सर्रास सुरु होतात बारकावे टिपणं अन् निरीक्षणं सूक्ष्म
सगळं कुंभाड फिक्स केलं जातं अन् नेहमीप्रमाणे अस पाखरू उच्चभ्रूंकडेच उडून जातं
शेवटी कण्हतंच म्हणायचं असतं
म्हणूनच तेलही गेलं अन् तूपही गेलं . . .
अखेरीस वैतागून गावाकडची बस गाठली
बसस्टॅडवर उतरताच मित्राने बोंब ठोकली
गावातल्या लांबच्या मामाने पोटच्या लेकीसाठी ह्याच्या घरी लग्नाची बोलणी केली
वाढत्या वयासोबत जबाबदारीही आली
तरीपण ह्याची नाही जिरली
इतक्यात लग्न नको म्हणून भांडणं केली
आता मात्र हद्द झाली, नितीमत्ता चुलीत घातली, रातोरात शहराकडं धूम ठोकली
लग्नाआधी एक तरी झेंगट करायचंच याची त्याने तळीच उचलली
तशी एक सुबक ठेंगणी बेरकीपणे हेरली
घरच्यांची ओळखीतली नसावी याची खात्री करून घेतली
मदनाचे सगळे बाण मारले तरी ती काही घायाळ नाही झाली
अमुक बाबा तमुक बुवा यांच्यापुढे लोटांगणे घातली
गंडे, धागे, दोरे, अंगठ्या यांनी हात,बोटे भरली
उरली सुरली हुशारी उपासतापास करून निकाली लावली
जिथं तिथं घोड नडतय म्हणत अक्कल पाझळली
गावाकडचीच चांगली म्हणून लग्नासाठी शेखी मिरवली
बोलाचालीच्या दिवशी ह्याची ऐट वाढली
मामाच्या घरी मोटारगाडीतून सवारी गेली
मामाच्या पोरीसोबत ती सुबक ठेंगणी पाहून ह्याची बोबडी वळाली
गुप्तपणे माहिती काढली तर ती मामाच्या पोरीची दूरची कुठलीतरी बहीण निघाली
पसंतीचा होकार देण्याआधिच तिकडून नकाराची पोचपावती आली
एकट्याकडून दुकटेपणाची निकराची लढाई गारठली
म्हणूनच तेलही गेलं अन् तूपही गेलं . . .
-----------
-- भूषण वर्धेकर
1 जानेवारी 2016
रात्रौ 11:00
हडपसर
------------
असा एकांत हा
असा एकांत हा
जणू आंतरिक ज्वाळा
मखमली आठवणींचा
सुकला पावसाळा
प्रेमात तुटलेल्या
भावनांचा लोळागोळा
व्यवहाराचे शल्य
जगण्याच्या अवतीभवती
विखुरलेल्या स्वप्नांची
संसारिक पोचपावती
दिग्मुढ शांततेत
दारिद्रयाची दशा
मर्दुमकीच्या ठिकऱ्या
सर्वदूर दाही दिशा
माझ्यातला मी
कधी संपत नाही
इतरांसोबत तुलना
सदैव त्राही त्राही
अहंपणाची कवचकुंडलं
सत्कर्माची मृगजळे
वल्गनांचे मनोरथ
गतकाळाची पाळेमुळे
जागेपणीचे भूकेले प्रश्न
भागवाभागवीचे अग्नीदिव्य
गद्यपंचवीशीचं वास्तव भग्न
समाजमान्यतेचे सव्य-अपसव्य
---------------------
--भूषण वर्धेकर
21 डिसेंबर 2009
पुणे
----------------------
इथे हजारात एखादा निवडला जातो
इथे हजारात एखादा निवडला जातो
आणि हजारोतला एक होऊन जातो
कौशल्यावर आधारित गुणपत्रिकेच्या रद्दीत
भूलतो चकचकत्या गाढवी कामाच्या दुनियेत
पगाराच्या मगरमिठीसाठी राबतो रात्रंदिवस
पोटजीविकेची परिक्रमा आ वासून उभीच असते
वर्षांमागून वर्षे जातात हाडामांसाचा देह खुरडत
अखेरीस ठप्प जोडीदाराच्या नातेसंबंधात
पुन्हा तेच शोभतो लाखात एक जोडा अन्
होऊन जातो लाखोंमधला फडफडणारा कुटुंबवत्सल
नव्याचं नवंपण निघून जातं, जुनं जाणतं नातं विरून जातं
उरतो नंतर बेगड्या जबाबदाऱ्यांचा भडीमार
परिस्थितीचा बागुलबुवा आणि शुष्क स्थैर्याचा आशावाद
उमेदीची वर्षे निघून जातात, स्वप्नरंजनातील दावे उडून जातात
राहतो शिल्लक आमचा काळ अन आम्ही काय केलं त्याच्या बाता
नेमकं उमगतं जग बदलायला निघालो होतो….
होऊन बसलो बदललेल्या जगाचा पदसिद्ध सो कॉल्ड सेटल्ड बैल !!!
--------------
भूषण वर्धेकर
11 जुलै 2010
पुणे
-----------------
सत्यासत्य
सत्यासत्य, नैतिक-अनैतिकेच्या जाळ्यात
अडकणारी, कुतरोड झालेली मने
असंतोष,उद्विग्न नैराश्याने ग्रासलेली
उद्रेकाची वाट पाहत
उध्वस्त, निडर मनुष्याचे पुतळे
होरपळली जाणारी पिढी
खंगली जाणारी स्वप्ने
नव्या किरणांची वाट पाहते
तरूणाईचा बळी
बालमने उपेक्षित
भूषण वर्धेकर
29-10-2008
10:40 रात्रौ
आम्ही देशप्रेमी
आम्ही देशप्रेमी, आधुनिक देशप्रेमी रे
कोणी मेला तर त्याचा धर्म ठरवू रे
संकुचित पद्धतीने निषेधाचे ढोंग करू रे
बजेट सँक्शन झाले की आम्ही सुटलो रे
विरोधाला विरोध हा आमचा बाणा रे
चांगल्या गोष्टीत आम्ही नाक खुपसू रे
जाऊ तिथे जुन्या गोष्टी उकरून काढू रे
खरी गरज जिथे तिथे अमुची पाठ रे
नवीन विकास धोरण जाहीर झाले रे
लगेच एनजीओद्वारे आडकाठी करू रे
नाही झेपले तर शोषणाचा आव आणू रे
काहीही करू बंद पाडू हाच हेका रे
आधुनिक बदलांना बाजूला सारू रे
जेथे फायदा तेथे पुढे पुढे करू रे
अन्याय झालेल्यांची वर्गवारी करू रे
ठरलेल्या पॅकेजनुसार आंदोलने छेडू रे
बुद्धी गहाण टाकून जगाला दाखवू रे
पोकळ जाणीवांची काही कमी नाही रे
असंतुष्ट लोक जमवून ईव्हेंट करू रे
दारिद्र्याचे ग्लॅमर करून पोटे भरू रे
आलेल्या निधीत कमिशन मारू रे
नंतर निवांत उच्चभ्रूंच्या पार्ट्या झोडू रे
ढेकरा देऊन उपोषणाच्या बैठका घेऊ रे
देश-रयत-सभ्यता चूलीत गेली रे
--भूषण वर्धेकर
17-10-2015
रात्रौ 11:55
हडपसर
--------------------
इथे माणूस मरतो
इथे माणूस मरतो
नंतर त्याचा धर्म ठरतो
मग सादर होतो अहवाल
सुस्त शासन अन् माध्यमे मस्तवाल
मग येतात फुत्कार चंगळवादी
प्रखर होतात जाणीवा राष्ट्रवादी
काथ्याकूट होतो बाजारू मानवतेचा
एकच दिवस असतो बौद्धिक निषेधाचा
जोशात भरले जातात वृत्तपत्रीय रकाने
चर्चा झाडल्या जातात तावातावाने
नको त्यांचा वधारला जातो भाव
उगाच उकरून काढतात जुनाट घाव
काही काळ असाच जातो निघून
शांततेचा चित्कार चौफेर घुमून
फुकाचे विचारवंत अन् चौकटीतले जगणे
ज्याचे त्याचे कर्म स्वतःचे तुंबडे भरणे
दुटप्पी माणूसकीचे अवशेष भग्न
सकल प्राणीमात्र रोजच्या दिनचर्येत मग्न
--भूषण वर्धेकर
9-10-2015
8:30 रात्रौ
दौंड-पुणे शटल
------------------------------------------------
वैश्विक गराड्यातला
वैश्विक गराड्यातला
अढळ ध्रुव
सैन्धातिक ऋषीतुल्य
सूक्ष्म गर्भ
वैधानिक स्वत्व
कामुक मर्त्य
पुर्णत्वाची साक्ष
पौर्वात्य देशी
अडगळीची जगणी
इथल्या देशी
वैचारिकांना दुधखुळी
पाश्चिमात्य भीती
समृद्ध पंथांचा
एकेरी नारा
वैश्विकतेचा गर्भित
ज्ञानप्रसार
व्रतवैकल्यांची संस्कृती
वक्तव्यांची नांदी
धर्माची बांधणी
सकल माथी
दूर्दैवी रूढी
मांगल्याची शक्ती
विचारधारा मात्र
जुनाट अनाकलनीय
स्वाहाकार असे
स्वयंघोषित मान्य
भक्तबुळे मंद
पांडित्य धन्य
नियमित क्रंदन
मागास अनाहत
भपकेबाज बेधडक
ब्राह्मणी पौरोहित्य !
------------------------
भूषण वर्धेकर
3 मे 2012
पुणे
-------------------------
प्राकृतीच्या विकृती
प्राकृतीच्या विकृती
झुराण्याच्या विभूती
जगण्याच्या रंडी
अखंडीत
नैतिकतेच्या सुरनळया
गरिबांच्या गळया
मुजोऱ्यांची छंदी
अंतरंगी
विरुध्यतेच्या छटा
सामाईकतेच्या वाटा
आपलं-तुपलं करीत
मर्जीत
समृद्धीचा लकडा
वाममार्ग वाकडा
माणुसकीचा झरा
भोवरा
कृत्रिम क्रांती
गाडलेली भ्रांती
नामुष्कीच जगणं
भोगणं
चराचर अस्वस्थ
मानद विश्वस्त
पैशाची देव-घेव
सदैव
प्रगतीचा ध्यास
गरिबांचा श्वास
बाजारुची मिजास
भडास
- भूषण वर्धेकर
8 June 2009
3:47 PM
Jalgaon
मृत्युचं लेणं
मृत्युचं लेणं
समष्टीचं जगण
हौतात्म्याचा वारु
जिर्णोधारु
संकटाचं येणं
कसोटीचं पारणं
लढवय्ये निर्धारु
कैवारु
आस्तित्वाचं रुसणं
संदर्भ नसणं
भकास वाटसरु
सावरु
दिशाहिन उडणं
सांप्रत मागणं
मानवांचा उद्धारु
लेकरु
मातीचं नसणं
सचैल हसणं
वास्तवाच्या निखारु
लुटारु
भूषण वर्धेकर
१७/७/२००९
रात्रौ १०.०३
शनिवार पेठ
रित्या झाल्या भावना
रित्या झाल्या भावना
रित्या आत्मवंचना
पोरक्या करूणा
रुतलेल्या जीवना
मंद धुंद प्रेमाच्या
सैरभैर मनाच्या
स्तब्ध गतकाळच्या
खिन्न आयुष्याच्या
उद्विग्न मनोकामना
विखूरलेल्या धारणा
धूळीत गेल्या वल्गना
निर्विकार संवेदना
दूधखुळ्या मैत्रीला
प्रीतीचा बोलबाला
कमकुवत सुखाला
सदेह विखूरला
नित्य झपाटलेला
जीव काळवंडला
त्रास संपला
आत्मा निवर्तला
भूषण वर्धेकर
8-3-2007
पुणे
सल सलते मनात
सल सलते मनात
रणरणत्या उन्हात
पाऊले वळतात
दुःखी भूतकाळात
नको त्या आठवणी
रूक्ष भेटीच्या ठिकाणी
कृश मने केविलवाणी
क्रंदती विरह गाणी
उज्वल भविष्यात
आंतरिक होरपळतात
एकमेव निरव एकांतात
षष्प संवाद साधतात
भरकटलेल्या स्वप्नांची
गर्भगळीत मनांची
सांगड एकोप्याची
होळी भावविश्वाची
क्रमिक घटना
बुजलेल्या वेदना
परतीचा पाहुणा
भ्रमाच्या धारणा
मागमूस जगण्याची
वर्दळीत जाणीवांची
एक तिरीप प्रकाशाची
मांदियाळी दिवास्वप्नांची
भूषण वर्धेकर
28-09-2015
हडपसर
रात्रौ 9:55
माणूसपण हरवलेली
माणूसपण हरवलेली
डेकोरएटीव्ह वस्ती
ऊंच इमारतींची
दुतर्फा गर्दी
टाऊनशिप अंतर्गत
राखलेली हिरवाई
डेव्हलप करताना
कापलेली वनराई
वणवण करणाऱ्यांची
अनंत भटकंती
हिंडोऱ्यांचे सोबती
आकंठ डुंबती
रखरखणाऱ्या ऊन्हात
गारव्याच्या शोधात
मजूर विसावतात
दगड धोंड्यात
नंतर अवतरतो
डोलरा मुजोरांचा
दुलईत लोळतो
दर्प श्रीमंतीचा
दिखाव्याचे देखावे
दिवाणखाण्यात सजले
चित्रातील घरे
माणसांविना भरे
भूषण वर्धेकर
१५/७/२००९
दुपार २.३५ फर्गसन
संदर्भ नसलेली संस्कृती
संदर्भ नसलेली संस्कृती
पत मिळवण्यासाठी धडपड
धर्माचं मुलभूत रोप
मुळासकट
ग्रहणे, पिधाने, युत्या, अंतरीक्षाचे संगती
सकल मानवसमाज प्रकटती
पंचागाच्या भिंती
खिडकीशिवाय
हरलेली मने शोधीत आधार
विळख्यात येती
कुटनीती
सदैव सहर्ष स्वागताच्या कमानी
गावोगावी , नावं मात्र
दगडी देवांची
पिसाटलेली माणसं, जत्रेचा उरुस
नवस, माळा, तोरणं, बळी
उगवता दिवस
मावळून जातो
शोधावी शांती प्रभू चरणी
म्हणती मने अशांतीची आरास,
बुवाबाजीचा डौल
फुंकण्यासाठी
नालस्ती धर्माची, दंगली पाठीराख्या
मरिती दरिद्री, निष्पापी आक्रंद
उच्चभ्रूचा शोक
आता मात्र सर्व बदलत आहे
धर्म हा नामधारी,जात-पात
कृतीशील कृत्रिम घटना
लिहिण्यासाठी
आता मात्र हद्द झाली
महापुरुषाची वाटणी
इतिहासाची नवनिर्मिती
स्वार्थासाठी
ऐहिक मानवकल्याणाच्या स्मृती
देशहित साधण्याला.
- भूषण वर्धेकर
24 July 2009
अब्जावधी
अब्जावधी हृदयाचा ठेका
चाले यांच्यासंगे
लेकरा तुही चाल, चालत रहा
वाट फुटेल तिथे
उगाच काही विचारू नको
कसली उत्तरे शोधू नको
आपणच इतरांची उत्तरे आहोत
असे समजून चालत रहा
तो पहा आपला नेता कुलपती
समाजाचा उद्धार करतोय
कळसासाठी आपल्याच
बांधवांचा रक्ताभिषेक
बाता मात्र क्रांतीच्या,
अभ्युदयाच्या व्याप्तीच्या
सकलांचा कर्दनकाळ
भ्रष्टाचार हाच शिष्टाचार
रक्तमासांचा चिखल करून
ज्याने घडवला हा देश
त्यांचेच वंशज सत्तेवर
सेवा मात्र स्वकीयांची
अखंड तेवणारी
कर्तृत्वाची वात
निर्वात पोकळीशी झुंजते...
२५/०७/२०११
उरूळीकांचन स्टेशन
यत्र तत्र सर्वत्र
यत्र तत्र सर्वत्र
बिनकामाचे मानपत्र
माध्यमांचे त्रिनेत्र
दिखाऊ विकासकामाचे शास्त्र
इव्हेंटचा बागूलबुवा
कृतीचा कांगावा
भाडोत्री गर्दीने पहावा
प्रशासकीय देखावा
झाकपाक टेक्नोसॅव्ही
पोकळ क्रांती ठरावी
गरजवंत असे निनावी
योजनांचे फ्लेक्स गावोगावी
निधीला नसे तोटा
उत्पन्नाचा फुगवटा
करवसुलीचा वरवंटा
विकासपर्वाच्या लाटा
विदेशी गुंतवणूकीला प्राधान्य
गाढवी कामे धन्य धन्य
सरकारी आकडेवारी सर्वमान्य
शेतकऱ्यांचे दारूण दैन्य
--भूषण वर्धेकर
4-10-2015
रात्रौ 11:30
दौंड
आम्ही हिंदू
आम्ही हिंदू, आम्ही हिंदू
विस्कटलेले अनेक बिंदू
कोणाकोणाला आम्ही वंदू
पोकळ सलोख्यातच नांदू
भव्य दिव्य कल्पक कथा
पुराणातील दाहक व्यथा
स्वयंघोषित परमपूज्य आस्था
शांतपणे कुठे टेकवू माथा
भेदरलेल्या संस्कृतीच्या वाटा
माणूसपणाला निव्वळ फाटा
भरकटलेल्या उत्सवांच्या लाटा
तुंबलेल्या दानपेटीतल्या नोटा
गर्जा जयजयकार तयांचा
गांव तेथे सम्राट ह्यांचा
अवडंबर मात्र धनिकांचा
विकलेल्या बाजारू धर्माचा
एकीचे नेकीचे दिव्य समीकरण
एकटेपणाचे वास्तव भीषण
बरबटलेल्या जातींचे ग्रहण
जावे कुठे कुठे शरण
अराजकतेच्या अखंड पसारा
अस्तित्वाच्या शोधात निवारा
निर्मिकाला चकचकीत गाभारा
दीनदुबळ्यांचा आशाळभूत सहारा
--- भूषण वर्धेकर
9-2-13
दौंड
माझा देश खूप मोठाय...
माझा देश खूप मोठाय !
लोकसंख्येत आम्ही अब्जाधिश आहोत,
पण इथं माणसंच राहत नाही जी आहेत ती त्या त्या धर्माने बांधून ठेवलेली गिऱ्हाइकं !
इथं सगळ्या धर्मांचा बाजार आहे माणूसकी चा धर्म सोडून. तो आहे फक्त पाठ्यपुस्तकातच !
इथली गिऱ्हाईकं तशी साधीभोळी, रोजमर्राच्या जगण्यात पिचलेली.
मात्र गावोगावी विखूरलेले गिऱ्हाईकांचे पुरवठादार फार हुशार.
ज्याला त्याला आपापल्या धर्माचा बाजार वाढवायला हुरूप भारी !
काही धर्मांना सरकारदरबारी अनुदाने, सवलती यांची काही कमी नाही तर काहींना प्रसारासाठी परदेशी देणगी प्यारी.
काही धर्म अतिप्राचीन अस्तित्वाच्या भांडवलावर हेलकावे खात धडपडतायत. बिचाऱ्याला सुशिक्षितांकडून खस्ता खाव्या लागतात!
इथं कोणी मेला रे मेला कि त्याची धार्मिक चिरफाड होते.
ज्याची संख्या तुलनेने कमी त्याचा जागतिक उदो उदो !
इतर धर्मातले मेले काय अन जगले काय याचे कोणालाच देणेघेणे नाही! आताशा सहिष्णू आणि असहिष्णू असे दोन जुनेच पाहुणे नटून थटून आलेत.
यांचा वावर सध्या अतिउच्चशिक्षित लोकांकडे आहे. ते म्हणतील तसं वागतात. गेलाबाजार इतरही पाहुणे आहेतच !
सवर्ण, बहुजन, दलित, मागास, अतिमागास आणि उर्वरीत!
ज्याची त्याची सोय जो तो धर्म राखीव गोदामात करतच असतो.
गिऱ्हाईकांची कमी नसल्याने सगळी गोदामं तुडुंब भरलेली आहेत.
मागणी तसा पुरवठा तत्वावर बाजार तेजीत चालूय !
माणूसकीची मंदी मात्र दिवसेंदिवस वाढतंच चाललीय !!!
--------------------
भूषण वर्धेकर
19-01-2016
रात्रौ 11:20
हडपसर
----------------------
सुन्या सुन्या
सुन्या सुन्या मैफिलीत तिच्या
रिकामे ग्लास रित्या बाटल्या
कोमेजली फुले गजरा उशाला
मैथुनाच्या राती ओशाळल्या
तीन्ही सांजच्या झगमगीत वस्त्या
निर्मनुष्यपणे सकाळी विखुरल्या
तुटपंजी कमाई भेसूर रात्रीला
दळभद्री भुकेल्या पोटाला
संसाराची क्षणिक स्वप्ने धुळीला
सुखद आठवणी काळवंडलेल्या
शल्य मनाचे भोगलेल्या शरीराला
तनाचे धन पुन्हा शृंगाराला
वेदना जगण्याच्या एकांतातल्या
दुर्लक्षित लिंगपिसाट समाजाला
संभोगाचा क्रुरकर्मा करपलेल्या
सधनतेच्या आर्जवा देव-दैवाला
भूषण वर्धेकर
15-4-2008
पुणे
गदारोळ
एके दिवशी गदरोळ झाला
धर्म, जात-पात, संस्कृती, सभ्यता, आचार-विचार आणि माणूसकी संसदेवर चाल करून गेले निषेधासाठी
अन् ह्यांचा म्होरक्या होता स्वातंत्र्य
स्वातंत्र्याने तर हिरिरीने सहभाग घेतला
सगळ्यांचा एकच नारा
अबाधित रखो आस्तित्व हमारा!
स्वातंत्र्याने पुढाकार घेतला कारण वर्षातला एक दिवस सोडून त्याला कोणी पुसतच नव्हतं
आज तर हुरूप एव्हढा होता की सगळ्यांना घेऊन संसदेवर जाऊ म्हणाला
धर्म तर त्वेषाने पेटला होता बेरंग होऊन बेछूट झाला होता कारण स्वतःचा असा त्याचा रंग शिल्लक नव्हता
जोर मात्र सगळ्यांपेक्षा जास्त होता
जात-पात तर सवयीनुसार लगेचच मोर्च्यात आले
एरवी कोणीतरी त्यांना ओढून आणत आज स्वतःहून सामील झाले
संस्कृती तर नटून थटून आली
मग चार-चौघात जास्त फुटेज मिळेल म्हणून
कारण बिचारी आजवर श्रेयवादालाच ती उरली होती
सभ्यतेचा जरा थाट वेगळा होता
ईतरांपेक्षा अंमळ पसरलेला होता
छान-छौकी उगाच लादली गेली होती तिच्यावर
मात्र स्वतःची आयडेंटिटी तिने सोडली नव्हती
आचार-विचार तर अगदी जय्यत तयारीने आले होते
सगळी साधनं, परिमाणं आणि संदर्भ घेऊन
आज तर त्यांना स्वतःच वेगळंपण सिद्ध करायचंच होतं
माणूसकी तर स्ट्रेचरवर आली होती डायरेक्ट आयसीयूमधून
तशी तज्ञ डॉक्टरांची टिम दिमतीला होतीच
उगाच माणूसकीवर काळाचा घाला येऊ नये म्हणून!
सगळे जमल्यावर स्वातंत्र्याने निषेधाच्या मोर्च्याची रूपरेषा समजावून सांगितली
संस्कृतीने तर लगेच अनुमोदन दिले आवरून सावरून
धर्म नाराजीनं म्हणालं अजेंडात मी दुय्यम का?
मग सभ्यता पुढं सरसावली अन् धर्माची समजूत काढली
आचार-विचार जरा साशंक होते पण त्यांच्या माथी मारले की ते राजी होतात हे धर्माने हेरलं होतं
जात-पात संदिग्ध होते नेहमीप्रमाणे
त्यांना एकच माहित होतं
जिसके पिछे सारी जनता
वही हमारा भारी नेता !
माणूसकीचं बिनसलं होतं पण दुःखण्यानं पिचलं होतं
डॉक्टरांची टिम टेस्ट अन् रिपोर्टमध्येच मश्गूल होती
अखेरीस एक कलमी कार्यक्रम जाहीर झाला
आचार-विचार तर तडाखेबंद लिखाणात माहिर
इकडे धर्म जाज्वल्य अन् वीररसयुक्त भाषणबाजीत तरबेज
संस्कृती प्रदर्शनासाठी आसुसलेलीच होती
मागाहून जात-पात मात्र फरफटत रेटलं जात होतं
सभ्यता मात्र दोहोंना सांभाळण्यात गर्क होती
माणूसकी सगळ्यांच्या शेवटी निपचितपणे आणली जात होती तज्ञांकडून !
संसदेचा आवार जसा आला
शुकशुकाट सुरू झाला
किर्र शांतता पसरली
स्वातंत्र्याला काहीच उमगेना!
मागे वळून पाहतो तर काय कोणीच उरलं नव्हतं
ज्याचे त्याचे कॉपीराईट होते ते बाकीच्यांना घेऊन गेले
स्वातंत्र्य एकटंच हिरमुसलं बंद संसदेपाशी कोलमडलं !!!!
भूषण वर्धेकर,
23-10-2015
दौंड
दुपारी 4:30
तू बोल मराठी
तू बोल मराठी, आवेशपूर्ण अस्मितेसाठी तू फोड डरकाळी, एकवटून शक्ती सगळी तू कर राडा, एकीचा शिकवू चांगलाच धडा तू हाण कानफटात, उमटू दे बोटं घराघर...
-
पवित्र कुराणातील निवडक आयातींची चिकित्सा कुराण हा इस्लाम धर्माचा पवित्र ग्रंथ आहे. याला "अल्लाहचे शब्द" मानले जाते आणि ते अपरिवर्त...
-
आशिया खंडातील ४८ देश आणि त्यापैकी सर्वात महत्त्वाचे चार देश म्हणजे भारत चीन रशिया आणि जापान. त्यापैकी जापान देशाबद्दल नंतर चर्चा होईल. पण भा...
-
Friendship is always best medicine to cure your inner wounds. Why do we need friends? Simple answer is friend is the only individual who can...