रविवार, २१ जुलै, २०२४

साधना साप्ताहिक लेख प्रतिसाद

साधना साप्ताहिक १३ जूलै २०२४

मराठा आरक्षण: युक्तिवादांचा सुकाळ, तर्काचा दुष्काळ हा प्रतिक कोसके यांचा लेख वाचला.

त्या लेखावरचा माझा प्रतिसाद:

आरक्षण मिळाल्याने समाजाचा विकास होतो ही एक सामाजिक अंधश्रद्धा आहे. आरक्षण हे साधन आहे संधी न मिळालेल्या वंचितांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी. पण राजकीयदृष्ट्या वापर करून लोकांनी आरक्षण हेच साध्य बनवलं आहे. कागदोपत्री आकडेवारी दिली की काहीतरी पुराव्यानिशी आपण युक्तिवाद करतोय असं वाटतं. प्रत्यक्षात मात्र आकडेवारी देऊन जेव्हा तुलना केली जाते तेव्हा लोकसंख्येच्या प्रमाण ही बाब फार महत्त्वाची. दुसरं तुलनेत कोणकोणत्या घटकांना प्राधान्य दिले आहे याचं. त्यामुळे आकडेवारी देऊन सांगितले की कोर्टात आपली बाजू भक्कमपणे उभी होईल आणि वेळ पडली तर संविधानाच्या चौकटीत राहून तरतूद करण्यासाठी दुरूस्ती विधेयक वगैरे आणण्यासाठी परत आंदोलनं, चर्चा, चिखलफेक हे निर्विवादपणे चालत राहणार आहे. समजा माणसाला आजार झाला असेल आणि त्यावर एखाद्या औषधाची मात्रा लागू होत नसेल तर औषध बदलायला हवं. किंवा आजार होऊ नये म्हणून जीवनशैली बदलणं गरजेची आहे. औषध तेच ठेवायचं आणि डॉक्टर बदलायचे. हेच तर कैक वर्षे चालू आहे. मुळातच संधी उपलब्ध करून देणे आणि संधी मिळवण्यासाठी आवश्यक असलेली अर्हता, कौशल्ये विकसित करण्यासाठी सेवा, सोयीसुविधा उपलब्ध करून देणे हे गरजेचे आहे. घटनात्मक आरक्षण हे मागासलेल्या लोकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी उत्कृष्ट 'मॉडेल' आहे. पण इम्प्लिमेंटेशन गंडवले गेले आहे. त्याला जबाबदार सामाजिक आणि राजकीय व्यवस्था.

गेल्या सात दशकांपासून आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या किती पिढ्या भारतात घडल्या? ज्यांनी आरक्षण घेऊन मुख्य प्रवाहात येऊन सक्षम होऊन आरक्षणाचे लाभ नको  किती घटकांनी सरकार दरबारी नोंद केली आहे? क्रिमी लेअर नॉन क्रिमी लेअर वगैरे नोंदणी फक्त जात प्रमाणपत्राची गरज आहे. प्रत्यक्षात आरक्षणाचे हत्यार म्हणून वापर सर्रासपणे सुरू आहे. आता तर संख्यात्मक बळ वाढतेय समजल्यावर हिंसक उग्र आंदोलने आणि व्यवस्थेला धाब्यावर बसवून वाट्टेल त्या मागण्यांसाठी लोकांना भडकावणं सुरू आहे. आरक्षण हे गरीबी दूर करण्यासाठी आणलेलं नाही. वंचित, शोषित आणि पिढ्यानपिढ्या मागासलेला वर्ग आणि मुख्य प्रवाहातील वर्ग यांच्यातील दरी कमी करण्यासाठी आणलेला उत्तम पर्याय म्हणजे घटनात्मक आरक्षण. ठराविक कालावधीनंतर ह्या पर्यायाने खरंच तळागाळापर्यंत लोकांना लाभ मिळत आहे का? ह्याच सिंहावलोकन करणं गरजेचं. म्हणजे व्यवस्था अजून सुदृढ कशी करता येईल याची चाचपणी करता येईल. मात्र हे करण्यासाठी धजावणार कोण? आरक्षणाचा प्रश्न राजकीय झाला आहे. राजकीय समस्या सुटत नसतात त्याचा वापर सत्ताकारणात कुटील डाव खेळण्यासाठी होतो.

मराठा आरक्षणावर खूप बोलून झाले, लिहून झाले, चर्चा वादविवाद होत राहतील. याचं समाजाभिमुख निरसन व्हावं असं कोणत्याही राजकीय सामाजिक क्षेत्रातील धुरिणांना वाटत नाही. ज्यांना पोटतिडकीने काही तरी करायचे आहे अशांना सार्वजनिक जीवनात व्यापकपणे पाठींबा मिळत नाही. कारण राजकीय धोरणलकवे. मराठा समाजातील लोकांचे प्रबोधन करणे गरजेचे आहे. ते करण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती हवी. आपल्याकडे सत्ता मिळवण्यासाठी मराठा समाजाला वापरून दुर्लक्षित केले आहे. मराठा समाजाला संख्यात्मक पाठबळ जास्त आहे म्हणून त्यांचा राजकीय उपद्रव कोणत्याही राजकीय पक्षांना महागात पडतो. खरी गरज महाराष्ट्र स्थापन झाल्यापासून मराठा नेतृत्व राजकीय, आर्थिक क्षेत्रात आघाडीवर होते. मग सामाजिक शैक्षणिक दृष्ट्या मराठा समाजाला आरक्षण हवे असं का वाटू लागले? मराठा टक्केवारी जास्त असल्याने त्याच प्रमाणात राजकीय प्रतिनिधित्व पण जास्त असणार सहाजिकच आहे. मग एवढं सगळं सोशोइकोपॉलिटिकल प्रिव्हिलेजेस मिळून देखील मराठा समाजाला आरक्षणाची गरज भासते म्हणजे. खरी मेख व्यवस्थेतील त्रुटींची आहे. त्यानंतर सत्ताधारी लोकांची अनास्था. त्यामुळे सत्तेवर कोणीही असले तरी मराठा आरक्षणाचा प्रश्न तसाच लोंबकळत राहील.

ज्या आंदोलनाचे उपद्रवमूल्य जास्त ती आंदोलन आपल्याला कशी फायदेशीर ठरतील हे बघणं विरोधकांचे पहिलं काम आहे. कारण सत्तेवर यायचं असेल तर सरकार विरोधात वातावरण निर्माण झाले पाहिजे तरच आपल्याला सत्तेवर येण्याची संधी उपलब्ध होईल हे राजकीय शहाणपण विरोधकांना असते. सत्ताधारी वेळकाढूपणा करत आपल्या पथ्यावर कसं पडेल याची काळजी घेत असतात. त्यामुळे आरक्षणाचा प्रश्न सोडविण्यासाठी ना सत्ताधारी लोकांना इंटरेस्ट असतो ना विरोधकांना. आंदोलनं हायजॅक होणं काही नवीन नाही. गेल्या दोन दशकांत अशी कितीतरी आंदोलनं फसलेली आहेत किंवा भरकटवलेली गेली आहेत. मराठा समाज कधीकाळी क्षत्रिय, लढवय्या म्हणून नावाजलेला होता तोच आज आरक्षणासाठी मागासलेला हे सिद्ध करण्यासाठी धडपडतोय. यावरून लक्षात घेतलं पाहिजे की, हीच पद्धत जर अंगवळणी पडली तर संख्यात्मक बळाच्या जोरावर व्यवस्थेला वेठीस धरेल. वेळ पडली तर संविधानाच्या दुरुस्तीसाठी दबावतंत्राचा वापर होईल. यावर उपाय म्हणून मूळ प्रश्न ज्यामुळे उद्भवले ते सोडवले पाहिजेत. खेडोपाड्यात मराठा समाजाला शेतीसाठी अतिरिक्त सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. आत्महत्याग्रस्त शेतकरी हा बहुतांश मराठा समाजातील आहे. खेडोपाड्यात शेतकऱ्यांची पिळवणूक कोणामुळे कशासाठी होते हे वेगळे सांगायला नको. शिक्षणासाठी मराठा तरुणांना तेवढ्याच संधी उपलब्ध आहेत जेवढ्या इतर समाजातील लोकांना असतात. फक्त आरक्षण मिळाल्याने सरकारी नोकरीत मराठा टक्का वाढेल. शिक्षणासाठी फीया कमी भराव्या लागतील हा बाळबोध समज आधी दूर केला पाहिजे. सरकारमध्ये नोकरीच्या संधी लोकसंख्येच्या प्रमाणात खूपच कमी होणार आहेत उत्तरोत्तर. मराठा समाजाला आरक्षण सामाजिक आणि शैक्षणिक हवे आहे. राजकीय नको. त्यात ओबीसींच्या आरक्षणातच मराठा समाजाला सामावून घेण्यासाठी धडपडत चालू आहे. कारण काय तर गेल्या दोन तीन दशकांत ओबीसी समाज सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील मुख्य प्रवाहात स्थिरस्थावर झाला म्हणून मराठा समाजाला पण आरक्षण हवं. अशी त्रेधातिरपीट होणारी गुंतागुंतीची अवस्था झाली आहे. स्वतःला कधीकाळी सरंजाम, जहागिरदार, वतनदार समजणारा समाज आज आरक्षणासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करतो हे सामाजिक ऱ्हासाचे द्योतक आहे. भविष्यात आरक्षण मिळाले आणि समाजाचा अपेक्षित विकास झाला नाही तर एससी, एसटी, व्हीजेएनटी वगैरे मध्ये सामील करा म्हणून मागणी करणार का? कारण ओपन मधून ओबीसींच्या कोट्यात जाण्यासाठी आज आंदोलन होतंय. याचा अर्थ आंदोलन भरकटलेली आहे. आरक्षण मिळाल्याने जर खरंच समाजाचा चौफेर विकास होत असता तर गेली सात दशके किमान एक तरी मागास समाज आरक्षण नको मुख्य प्रवाहात स्थिरस्थावर झालो म्हणून पुढे आला असता. तसे झाले नाही आणि दोन चार पिढ्या मुख्य प्रवाहात येऊन सधन झाल्यानंतरही आरक्षण सोडणार नाहीत. अशा बरबटलेल्या वातावरणात कोणीही विवेकी पद्धतीने प्रबोधन करणार नाही. याचं कारण आरक्षण हे हत्यार झाले आहे. व्यवस्थेला जेरीस आणून हवं ते साध्य करता येते ह्याचा पायंडा पडत आहे.

सरतेशेवटी शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांचा उल्लेख करणाऱ्या, पुरोगामी म्हणवून घेणाऱ्या लोकांना सत्य परिस्थिती काय आहे आणि घटनात्मक मर्यादा कशा आहेत हे समजले आहे. यात भरडला जातोय तो सर्वसामान्य गरीब कुटुंबातील मराठा तरुण. यावर एक उपाय म्हणजे सामुहिक पद्धतीने संविधानाचे पारायण व्हावे आणि संविधानाच्या चौकटीत राहून देश कसा चालतो ह्याचे प्रबोधन करणे गरजेचे आहे.

लेखन विश्रांती.

धन्यवाद

तळटीप: याचं विषयावर मी लोकसत्तामध्ये नोव्हेंबर २०२३ रोजी लेख लिहिला होता. त्यातील मुद्दे रिपीट होऊ नये म्हणून प्रतिसाद आवरतं घेतोय.

खालील लिंकवर लोकसत्ताचा लेख वाचता येईल
https://www.loksatta.com/sampadkiya/features/in-maratha-reservation-issue-the-real-struggle-is-between-the-established-marathas-and-economically-poor-marathas-asj-82-4072184/

लोकसत्ता विशेष लेख प्रतिसाद

ऐसी अक्षरे लेख 

https://www.loksatta.com/sampadkiya/features/husain-dalwai-article-about-muslims-need-to-get-adequate-representation-and-opportunities-zws-70-4487601/

हुसेन दलवाई यांचा लोकसत्तामध्ये आलेला लेख वाचून खालीलप्रमाणे प्रतिसाद लिहिला होता.

'मुस्लिमांना संधी हव्यात आणि प्रतिनिधित्वही...' १८/७/२०२४ रोजीच्या लोकसत्ता मध्ये छापून आलेला विशेष लेख वाचला.

लेखात मांडलेले सगळे मुद्दे वाचल्यावर समजतं की लेखकाचा आग्रह प्रतिनिधित्व देणं कसं गरजेचं आहे आणि ते न मिळाल्याने मुस्लिम समाज राजकीय, सामाजिक मागासलेपणा सहन करतोय हे अधोरेखित करतोय. मुळातच महत्वाचा प्रश्न हा आहे की प्रतिनिधित्व मिळाल्यानंतर समाज सुधारणा होते का? ताजं उदाहरण आहे मराठा आरक्षणाचा मुद्दा. महाराष्ट्रात सर्वाधिक प्रतिनिधित्व मराठा समाजाला सामाजिक, राजकीय आणि आर्थिक आघाडीवर आहे. तरीही आरक्षणाची मागणी होते. याचा अर्थ फक्त राजकीय प्रतिनिधित्व किंवा संधी मिळाल्या की समाज सुधारणा होते ही सामाजिक अंधश्रद्धा आहे. मुळातच समाजातील तळागाळापर्यंत दिल्या जाणाऱ्या सोयीसुविधा आणि सेवा का मिळत नाहीत याचा विचार केला पाहिजे. सामाजिक मागासलेल्या अवस्थेचे प्रश्न फक्त आणि फक्त राजकीय प्रतिनिधित्व मिळाल्यानंतर सुटणार आहेत का? ह्यावर चर्चा करायला हवी. 

प्रस्तुत लेखात शैक्षणिक मुद्दा फार पोटतिडकीने मांडला आहे. हेच खूप महत्त्वाचे आहे. सरकार केवळ सेवा सुविधा पुरविण्यासाठी प्रयत्न करत असते. मुस्लिमांचा सामाजिक आणि शैक्षणिक विकास व्हावा यासाठी ग्राउंड लेव्हल वर सुधारक, विचारवंत आणि सामाजिक कार्यकर्ते लोकांनी पुढाकार घ्यावा. धार्मिक शिक्षण जेवढ्या पोटतिडकीने दिले जाते तेवढं आधुनिक शिक्षण का नाही दिले जात? धर्माच्या नावाखाली एकत्र येणं चांगलं. पण त्या एकीचा कोणीतरी दुरुपयोग करतोय हे समजणार कधी? हे एक प्रचलित सत्य आहे की खेडोपाडी मुल्ला मौलवी यांची मुस्लिम समाजावर पकड असते. गावपातळीवरील निवडणुकीत हे सर्रासपणे दिसून येते. शैक्षणिक मागासलेपण सर्वात मूलभूत कारण आहे मुस्लिम समाज मागे राहिल्याचे. याविषयी लेखकाने लेखात व्यवस्थितपणे विवेचन केले आहे. ही शैक्षणिक दरी एकाएकी भरून निघणार नाही हे मान्य. मात्र त्यासाठी राजकीय हस्तक्षेप झालाच पाहिजे हे चूक आहे. राजकीय हस्तक्षेप केला की मुस्लिम समाजाचा वापर होतो हे कैक वेळा सिद्ध झाले आहे. अल्पसंख्याक हे कोंदण मिळालं आणि आपल्याला विशेष अधिकार हवेत हे बिंबविलं गेले आहे. त्यात बहुसंख्य मुस्लिम महिला या शिक्षणापासून वंचित राहतात. जर इतर समाजातील महिलांची शैक्षणिक प्रगती बघितली तर मुस्लिम समाजातील महिलांची तेवढी शैक्षणिक प्रगती झाली नाही हे ढळढळीत दिसते. एक महिला शिक्षित झाली की ती कुटुंब सुशिक्षित करण्यासाठी धडपडते. भारतीय जनमानसात स्त्री कुटुंबातील केंद्रस्थानी असते. भले पुरुषप्रधान संस्कृती वगैरे मिरवतो आपण पण संकटसमयी स्त्री पुढाकाराने एकोपा वाढतो. एका उच्चभ्रू वर्गातील मुस्लिम समाज हा खूप पुढारलेला आहे. मात्र बहुतेक बहुसंख्य लोक पिछाडीवर आहेत. लेखात लेखकाने यावर यथासांग सगळं मांडलेले आहे. यातून सगळ्यात आधी मुस्लिम समाजाला शिक्षणाचं महत्त्व तळागाळापर्यंत पोचवावं लागेल. कारण धर्म आणि जात यासाठी जे एकत्र येतात, शक्ती प्रदर्शन करतात ते राजकीय व्यवस्थेत वापरून फेकले जातात. आपल्या संविधानाच्या चौकटीत लोकशाही ही संख्यात्मक बळावर सत्ता स्थापन करण्यासाठी या अशा एकत्र येणाऱ्या समाजाचा सर्वात आधी वापर होतो. उदाहरणार्थ दलित. राजकीय प्रतिनिधित्व मिळाले की सामाजिक मागासलेली अवस्था जाते का? फक्त शासन दरबारी नोकऱ्या, शिक्षणाचा हक्क मिळाला म्हणजे पिछाडलेला समाज पुढारतो असं नाही. समाजातील जुन्या चालीरीती, रूढी, प्रथा आणि परंपरा बाजूला सारून नवा विचार मांडणारे सुधारक तयार होणं गरजेचं. असे सुधारक या काळात खूप कमी तयार झाले. कधीकाळी भारतात खूप मोठे समाजसुधारक होऊन गेले वगैरे सांगून, लिहून, भाषणात बोलून खूप काळ लोटला. प्रत्यक्षात त्यांनी सांगितलेल्या किती गोष्टी आपण आचरणात आणतो ते महत्त्वाचे. असे सुधारक होते तेव्हा त्यांना राजकीय प्रतिनिधित्व होते का? नव्हतेच. तरीही हाल अपेष्टा सोसून कितीतरी जणांनी आपापले विचार मांडले. खऱ्या अर्थाने हे पुरोगामी विचार होते. तसंही सध्याच्या काळात पुरोगामी ही संज्ञा सध्या फारच बरबटलेली आहे. त्यामुळे विवेकी, अज्ञेयवादी, आस्तिक, नास्तिक अशी विभागणी योग्य ठरेल. अशी सुधारक मंडळी मुस्लिम समाजाचा कायापालट करण्यासाठी का कमी पडली हा विचार करणं गरजेचं आहे. कारण सर्वश्रुतच आहे. धर्माचा बडगा. विशेषतः लहानपणापासून दिली जाणारी धर्माची शिकवण. नंतर येणारी असुरक्षितता. ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवल्यास दिसून येते की शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी किती दिव्यं पार करावी लागतील मुस्लिम समाजाला. लेखकाने प्रस्तुत लेखात एक खूप महत्वाची बाब अधोरेखित केली आहे. एस.एस.सी पर्यंत शिक्षण न झालेल्या कैक मुस्लिम तरुणांना फुटकळ कामं करून पोटं भरावी लागतात. यात दोष कोणाचा? सरकारचा? की कुटुंबाचा? शिक्षण व्यवस्था तर कोणाला शिक्षण नाकारत नाही! मग जर मुस्लिम तरुण कमी शिक्षण घेत आहेत तर दोष कोणाला देणार? त्यांचं समुपदेशन करणं महत्त्वाचं. याच्या उलट त्यांना धार्मिक आस्थांना कवटाळून राजकीयदृष्ट्या एकत्र करून वापरणं चालूच सध्या. हे कुठपर्यंत चालणार? ह्यावर मुस्लिम समाजातील विचारवंत आणि सामाजिक राजकीय चळवळीतील कार्यकर्ते लोकांनी पुढाकार घेतला पाहिजे. कारण ग्रास रूट लेव्हल वर अशी मंडळी कामं करत असतात. 

सरकारमध्ये केवळ प्रतिनिधित्व मिळाले नाही म्हणून मुस्लिम समाजाचा विकास झाला नाही हे खोटं आहे. मुस्लिम समाजातील एक उच्चभ्रू वर्ग नेहमीच अलिप्त होऊन सुधारणा करू पाहतो हे आश्वासक आहे. पण दुसरीकडे एक वर्ग नेहमीच कट्टर मुस्लिम पंथांचे अनुनय करण्यासाठी तयार असतो. ह्या कट्टर पंथी लोकांमुळेच इतर सर्वसामान्य मुस्लिमांना नाना तऱ्हेच्या समस्यांना तोंड द्यावे लागते. उदाहरणार्थ काही गोरगरीब छोट्या व्यावसायिकांना अघोषित बहिष्काराची झळ सोसावी लागते. याला जबाबदार असे बहिष्कार घालणारे जेवढे दोषी आहेत तेवढाच दोष मुस्लिम कट्टर पंथीयांच्या अनुयायांचा. यामुळे कितीतरी चांगले सामाजिक कार्यकर्ते लोकांना समाजात सार्वजनिक व्यापक पाठिंबा मिळत नाही. चांगल्या हेतूने एकत्र येऊन शक्ती प्रदर्शन करणं योग्य. मात्र याकूब मेमनच्या प्रेतयात्रेत मुंबईत गर्दी नेमकी कशामुळे झाली? याचा जाहिर विरोध किती इस्लामी संघटना, विचारवंत लोकांनी केला? बिल्किस बानोच्या बाबतीत गुन्हेगारांचा जेलमधून सुटल्यावर सत्कार चमत्कारावर कैक संघटनांनी , विचारवंतांनी, सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते लोकांनी निषेध केला. धर्माच्या नावाखाली गर्दी झाली की राजकीयदृष्ट्या वापर होतो. हे माहिती असूनही व्होट बँक तयार होते. लांगूलचालन वगैरे नंतरचे मुद्दे. सीएए पारित झाला तेव्हा भारतीय मुस्लिम समाजाला कसलाही त्रास होणार नव्हता. नेमकं असं काय कारण होतं की लाखोंच्या संख्येने मुस्लिम घराबाहेर पडून आंदोलन करू लागले? रलीव, सलीव, गलीव चे नारे देऊन पंडितांवर काश्मीर सोडण्याची वेळ आणली तेव्हा नक्की भारतीय मुस्लिमांची नेमकी काय भुमिका होती? काश्मीर प्रश्न हा फक्त आणि फक्त स्वायत्त मुस्लिम राष्ट्र हवं यासाठी चिघळलवला गेला. भारतीय मुस्लिम काश्मिरी पंडितांना जे सहन करावे लागले त्यावर जाहीरपणे कधीच टेररिस्ट लोकांना दोष देणार नाही. 'भारतीय मुस्लिमांना काश्मीर प्रश्नावर नेमकं काय वाटतं' यावर थोर विचारवंत हमीद दलवाई यांनी एके ठिकाणी छान आणि समर्पक लिहिले आहे. हमीद दलवाई यांचे सारखे विचारवंत परत झाले नाहीत ही सामाजिक खंत आहे.

आजवर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदू आणि मुस्लिम धर्माची परखडपणे आणि सडेतोड चिकित्सा, समीक्षा केली आहे. मात्र पुरोगामी म्हणून मिरवणाऱ्यांना हिंदू धर्माबद्दल केलेली चिकित्सा, समीक्षा मिरवायला आवडते. कारण ती त्यांची सोशोईकोपॉलिटिकल नेसेसिटी असते. किती पुरोगामी मंडळी इस्लाम बद्दल आंबेडकर यांनी मांडलेल्या विचारांचा प्रचार, प्रसार करतात? का करत नाहीत? महाराष्ट्रात असा कोणता सध्याच्या काळात पुरोगामी वा नास्तिक वा विवेकी विचारवंत आहे ज्यांनी परखडपणे इस्लाम धर्मातील सुधारणांवर सडेतोड भाष्य केले आहे? का नाही? कुराण, हदीस आणि शरीया बद्दल चिकित्सा केली आहे का कोणी? का केली नाही? का फक्त मनुस्मृती दहन केले आणि मनुस्मृती वर परखडपणे बोलणे, टिका करणे एवढंच लिबरल होण्यासाठी आवश्यक आहे का? सर्वधर्मसमभावाचे कंबरडेच मोडले आहे आपल्या राजकारणी लोकांनी सेक्युलॅरिझमच्या नावाखाली. सत्ता टिकवण्यासाठी जातीच्या आणि धर्माच्या नावाखाली लोकांना भडकावणं सहजसाध्य असतं. कोणी धर्माच्या आधारावर तर कोणी जातीच्या आधारावर ध्रुवीकरण करतात. ही व्यवस्था तशीच वापरली गेली. सेक्युलॅरिझमच्या नावाखाली मतपेटीसाठी राजकारण होत असल्याने हिंदू मुस्लिम वगैरे गोष्टी होत आहेत. ह्यावर वेगळी चर्चा होऊ शकेल. किमान एक दोन प्रबंध लिहिले जातील एवढे मोठे सामाजिक, राजकीय आणि आर्थिक बदल गेल्या दोन तीन दशकांत झाले आहेत. जागतिकीकरण सुरू झाले आणि विस्थापित होऊन लोकांना रोजगाराच्या अमाप संधी उपलब्ध झाल्या. जागतिकीकरण येण्याआधी विस्थापितांना संधी होत्याच पण त्याचे प्रमाण केवळ व्यवसाय, व्यापार यासाठी मर्यादित होते. भारतातून परदेशात नोकरीसाठी विस्थापन केलेल्यांची संख्या १९९० च्या आधी अत्यल्प प्रमाणात होती. विशेषतः गेल्या तीन दशकांत युरोपात आणि अमेरिकेत स्थलांतरित झालेल्या लोकांची संख्या प्रचंड वाढली आहे. याच स्थलांतरित लोकांमध्ये हिंदूंचे प्रमाण बरेच आहे. हे प्रमाण हिंदूमधील जातिनिहाय किती वगैरे करत बसायची सध्या तरी गरज नाही. कोणत्या जातीतील लोक जास्त स्थलांतरित झाले यावर वेगळा लेखप्रपंच होईल. हिंदू म्हणून जेव्हा भारतीय माणूस स्थलांतरित करतो तेव्हा तो प्रदेशात भारतीय हीच ओळख दाखवतो. ज्या ज्या ठिकाणी स्थायिक होईल तिथे मिसळून जातो. तिथल्या संस्कृती सोबत मिसळून सामाजिक, प्रांतिक आणि भाषिक सभ्यतेच्या वातावरणात मिळून जातो. भले तिथे भारतीय कम्युनिटी करून राहत असेल सुरक्षिततेसाठी. मात्र तिथल्या स्थानिक पातळीवर कधीही हिंदू धर्माचा आक्रमकतेने प्रचार, प्रसार केला गेला नाही. की कट्टरवादी तत्त्वांचा अंगीकार झाला नाही. याच्या उलट मुस्लिम समाज युरोपात विशेषतः स्थलांतरित झाला. तिथे धर्माच्या नावाखाली एक झाला. त्यातूनच इस्लामिक कट्टरपंथीय तत्वांचा त्यात शिरकाव झाला. त्याचे पडसाद फ्रान्स मध्ये झालेल्या जाळपोळीच्या घटनांमध्ये दिसतात. मानवतेच्या नावाखाली स्थलांतरित लोकांना सोयीसुविधांचा पुरवठा करणं गरजेचं. पण त्याच पुरवठ्याच्या जोरावर कट्टरपंथीय तत्वे जर धुडगूस घालत असतील तर चूक कोणाची? सोयीसुविधा पुरवणाऱ्यांची की कट्टरपंथीयांची? यावर कधी साधकबाधक चर्चा करायला पाहिजे. हे प्रश्न जसे परदेशात स्थलांतरित लोकांमुळे तयार झाले. तसेच भारतातील सीमेलगतच्या राज्यात बांगलादेश, पाकिस्तान, म्यानमार मधून आलेल्या अनधिकृत निर्वासित मुस्लिम समाजाचे पण आहेत. मानवतावादी दृष्टिकोन ठेवून काही सवलती, सोयीसुविधा उपलब्ध करून देणं गरजेचं. पण संख्यात्मक बळ मिळाले की धार्मिक कट्टरता का वाढीस लागते. भारतात हिंदू बहुसंख्य आहे म्हणून सेक्युलर म्हणून मिरवतो आपण. मुस्लिम बहुसंख्य असल्यानंतर असेच सेक्युलर राहू शकू का? हा कडवट सवाल आहे.

इस्लामिक दहशतवाद, जिहाद वगैरेंच्या विरोधात खरी लढत आणि प्रतिकार हा सुशिक्षित मुस्लिम समाजाने सर्वप्रथम करायला पाहिजे. त्यासाठी राजकीय प्रतिनिधित्व असण्याची काय गरज? त्यासाठी भारतातील विवेकी, नास्तिक, अज्ञेयवादी आणि खरेखुरे पुरोगामी लोकांनी ह्यासाठी विशेष पुढाकार घ्यायला हवा. पण तसे होणार नाही. कारणं अनेक आहेत. त्यापैकी महत्त्वाचे राजकीय परिप्रेक्ष्यात इस्लाम समाज नेहमीच वापरला गेला. धर्माच्या नावाखाली सहज एकत्र येतो म्हणजे कोणाच्या तरी राजकीय स्वार्थापोटी वापरला जातो हे उघड सत्य आहे. मुस्लिम समाजातील चालीरिती, रुढी, परंपरा आणि बुरसटलेल्या विचारांचे आजपर्यंत भारतात खूपच कमी सुधारणावादी विचारवंतांनी परखडपणे भाष्य केले आहे. हमीद दलवाई यांचे किती विचार मुस्लिम समाज फॉलो करतात. का करत नाहीत? सध्याच्या काळात पुरोगामी म्हणवून घेणाऱ्या मंडळींनी कितीवेळा हमीद दलवाई यांच्या विचारांवर मुस्लिम समाजात जनजागृती केली आहे? केवळ हमीद दलवाई यांचा स्मृतिदिन किंवा जयंती वगैरे असेल तेव्हा कुठेतरी छोटेखानी कार्यक्रम होतात किंवा कुठल्यातरी नियतकालिकात काही वैचारिक संस्मरणे छापून येतात. ह्याच्या उलट सनातनी हिंदू धर्मातील चालीरीती, परंपरा आणि रुढी यांच्या बाबतीत टिका, समीक्षा किंवा परखड भाष्यं ज्यांनी ज्यांनी आजवर केली त्यांचा राजकीय परिप्रेक्ष्यातून खूप वेळा वापर केला गेला. सलमान रश्दी यांनी लिहिलेल्या साहित्यावर कोणता मुस्लिम स्कॉलर जाहीरपणे समर्थनार्थ भाष्य करतो? नेमकी अडचण कोणाची? इस्लाम धर्मातील बाबींवर तस्लिमा नसरीन यांच्या लिखाणात सडेतोडपणे विचार मांडलेले आहेत. सलमान रश्दी, तस्लिमा नसरीन यांच्या साहित्याचे किती मुस्लिम स्कॉलर समर्थक आहेत? का नाहीत? तसंही बऱ्याच वलयांकित विचारवंत आणि समीक्षकांनी नसरीन यांच्या साहित्याची फारशी दखल घेतली नाही. कदाचित त्यांना हवा तसा साहित्यिक अवकाश आणि सामाजिकदृष्ट्या प्रगल्भता जाणवली नसेल. कारणं काहीही असतील. मात्र एक तर इस्लामिक चालीरीती, परंपरा आणि बुरसटलेल्या विचारांविरुद्ध खूप कमी लोकांनी तात्विक विवेचन केले आहे. यावर सर्वात आधी जागरूकपणे चळवळ उभी राहिली पाहिजे. यातूनच खरं तावूनसुलाखून नेतृत्व उभं राहील. तेव्हा अशा नेतृत्वाला राजकीय प्रतिनिधित्व किंवा संधी आपसूकच चालून येईल. मुस्लिम बहुसंख्येने धर्मासाठी एक होतात हीच एकी शिक्षणाचा प्रचार प्रसार तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी व्हायला हवी. असुरक्षितता आहे म्हणून आम्हाला विशेष सवलती पाहिजे अशी मागणी करण्याऐवजी सर्वधर्मसमभाव अंगिकारून सुरक्षित होऊ अन् सामाजिक औदासिन्य दूर करू हा आश्वासक विचार तयार झाला पाहिजे. भेडसावणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी राजकीय हस्तक्षेप झाला की त्याचं समस्या भिजत घालून राजकीय डावपेच आखले जातात. कारण सत्ताकारणात कुटील कारस्थान करण्यासाठी जातपातधर्माची एकी करणारी मंडळी बळी पडते. 

एकगठ्ठा मतदान करण्यासाठी जसं हिरीरिने पुढाकार घेतला होता तसाच पुढाकार सामाजिक मागासलेपणा घालवण्यासाठी मुस्लिम समाजाने घ्यावा. त्यासाठी सरकारतर्फे सर्वांना मिळणाऱ्या सोयीसुविधा, सेवा आणि योजना यांचा वापर साधन म्हणून व्हावा. राजकीय प्रतिनिधित्व मिळाले नाही म्हणून मुस्लिम समाजाचा विकास झाला नाही हे तार्किक पातळीवर सिद्ध होत नाही तसेच मुस्लिमांना असुरक्षितता वाटते म्हणून मुस्लिमांना सरकारने अल्पसंख्याक म्हणून जास्त सेवा, सोयीसुविधा दिल्या पाहिजेत हे पण तर्काला धरून नाही. लेखकाने लेखात संघाच्या बाबतीत जे विचार मांडले त्यावर वेगळी चर्चा, युक्तिवाद, वादविवाद होईल. संघाला हिंदुत्व फक्त साधन होतं तळागाळापर्यंत पोचण्यासाठी. कैक दशकं संघ हा राजकीय पटलावर येण्यासाठी संघर्ष करत होता. गोळवलकर गुरुजींमुळे संघाला जेवढा फायदा झाला तेवढाच तोटाही सहन करावा लागला. याची चिकित्सा वेगळी होईल. म्हणजे १९९० नंतर संघाचे राजकीय पातळीवर येणं सुकर झाले. त्या आधी संघाला सार्वजनिक जीवनात व्यापक पाठिंबा कधीच नव्हता. १९९० आधी मुस्लिम समाजाला संधी उपलब्ध नव्हत्या का सुधारणा करण्यासाठी? जागतिकीकरण सुरू झाले आणि हिंदू समाजातील सर्वच जातीपातीच्या लोकांना त्याचा फायदा करून घेता आला. मुस्लिम समाज कुठे मागे पडला? संघाने द्वेष केला म्हणून मुस्लिम समाजाबद्दल विषमता वाढत गेली वा भारतीय लोकांमध्ये मुस्लिमांबद्दल संशय बळावला हे साफ खोटं आहे. कारण सर्वच हिंदू काही संघाच्या कचाट्यात सापडलेला नाही. कैक हिंदू संघाचे कट्टर विरोधक आहेत. वेळोवेळी ते संघाच्या विरोधात आक्रमक होतात. मग संघामुळे हिंदू लोकांमध्ये मुस्लिम द्वेष वाढू लागला हे तर्काला धरून नाही. सर्वात आधी नावाखाली एकत्र येणं कमी झालं पाहिजे मुस्लिमांचं. तेच वापरले गेले आहे राजकीयदृष्ट्या. 

हिंदू धर्माचा प्रसार झाला तसा त्याची चिकित्सा केली गेली वेळोवेळी. तशी इस्लाम चिकित्सा भारतात तरी झाली नाही किंवा कोणाकडूनही आताच्या काळात केली गेली नाही. त्यामुळे धर्म, आस्था, कर्मकांड , दैवतं, प्रथा, रूढी, परंपरा ह्या बाबी नाकारणं आणि समाजात वावरणं हे हिंदू लोकांना सहजगत्या जमलं. त्यामुळे बहुतांश हिंदू नास्तिक, विवेकी आणि पुढारलेली भूमिका घेऊ लागला. त्याचा परिणाम हिंदू धर्माच्या नावाखाली एकत्र कधीच आला नाही. हिंदू व्होट बँक तयार झाली नाही. ती कधीच या देशात होणार नाही. मुस्लिमांचा तसा व्होट बँक म्हणून वापर झाला. तो भविष्यात नेहमीच होणार. बहुतांश हिंदू जनता बाबतीत धार्मिक हिंसेचा पुरस्कार करणाऱ्यांना पाठीशी घालत नाहीत. उदाहरणार्थ गुजरात दंगलीचा उल्लेख केला पाहिजे. एक लक्षात ठेवा या दंगलीमुळे २००४ ला बहुसंख्य हिंदू समाजाने भाजपाला नाकारले. त्यामुळे वाजपेयींचे 'फिल गुड' चे वातावरण फसले. २००२ ला गुजरात मध्ये झालेल्या दंगलीचे समर्थन फक्त आणि फक्त कट्टर हिंदुत्ववादी संघटना करतात. कारण काश्मीर प्रश्नावर हिंदू पंडितांना छळ सहन करावा लागला. त्यावर उतारा म्हणून गुजरात दंगलीची भलामण कट्टर हिंदुत्ववादी करतात. तसंही सकल हिंदू समाजात मोदींना, शहांना व्यापकपणे पाठींबा मिळाला नाही. कोणताही नेता हिंदू मसिहा होऊ शकत नाही. कारण हिंदू धर्माला बाजूला सारून सारासार विचार करतो. २०१४ साली कॉंग्रेसच्या नेत्यांना नाकारले जनतेने आणि भाजपा वा मोदींना संधी दिली. २०१९ ला कामं बघून पुन्हा एकदा संधी मिळाली. २०२४ ला ज्या पद्धतीनं मोदी भाषणबाजी करत होते त्यामुळे त्यांच्या जागा कमी झाल्या. ते व्हायला हवेच होते. फारच उडत होते अंधभक्त. म्हणजे बहुसंख्य पुढारलेल्या हिंदू लोकांनी भाजपाला नाकारले. हीच गोष्ट कट्टर हिंदुत्ववादी लोकांच्या पचनी पडत नाही.

राजकीय प्रतिनिधित्व, राजकीय सोयीसुविधा, सरकारी योजनांचा उपयोग नंतर होईल समाज सुधारणा करण्यासाठी. सर्वात आधी धर्माच्या नावाखाली मूलतत्ववादी कट्टर लोकांना आश्रय दिला जातो मुस्लिम बहुल वसाहतीत त्याबद्दल चर्चा व्हायला हवी. केरळमध्ये सगळ्यात जास्त साक्षरता आहे. तिकडं ना भाजपा सत्तेवर आहे ना संघाचा प्रभाव आहे. तरी देखील आयसीस संघटनेचे कित्येक धागेदोरे तिकडे मिळाले. का बरं मिळाले असतील? तिकडं कसली असुरक्षितता आहे मुस्लिमांना? नेमकं असं कारण काय आहे आयसिसच्या संपर्कात येण्याचा? ते एक वेळ बाजूला ठेवा. आयसिस सारख्या संघटनेशी महाराष्ट्रातील मुस्लिम लोकांचा काय संबंध? का बरं पुण्यातील कोंढवा परिसरातील मुस्लिम बहुल वसाहतीत आयसीसच्या संबंधित अतिरेक्यांना मदत करणारे सापडतात? मुंबई सारख्या शहरात अनेक झोपडपट्टीत सगळ्या समाजातील लोकांचे वास्तव्य आहे. मुंबईत आजपर्यंत जे बॉम्बस्फोट झाले त्या संबंधित अतिरेक्यांना आश्रय मुस्लिम बहुल वसाहतीत मिळाला? का कशासाठी? म्हणजे धर्माच्या नावाखाली कोणीतरी वापर करतोय. भारतात हिंदू दहशतवाद संकल्पना तथाकथित राजकारणासाठी रुळली. मग जगभरात दहशतवादी कारवाया झाल्या त्या नेमक्या कोणत्या धर्मासाठी होत्या? हिंदू की मुस्लिम? जगभरात हिंदू कित्येक देशात स्थलांतरित झाले. जिकडे स्थलांतरित झाले तिकडे तिथे त्यांनी हिंदू दहशतवादी लोकांना धर्माच्या नावाखाली आश्रय दिला का? जगभरात इस्लामिक फंडामेंडलिस्ट टेररिझम वाढला. तो नेमकं कशामुळे वाढला. इस्राएल ने गाझा पट्टीत हल्ले केले की इकडं भारतीय मुस्लिम निषेध करण्यासाठी एकत्र येतात. मग चीनमध्ये उईगिर प्रांतात मुस्लिमांना जो छळ सहन करावा लागला त्यासाठी कोण्या भारतीय मुस्लिमांनी निषेध नोंदवला आहे का?

धर्माच्या बाबतीत भारतात मुस्लिमांना असुरक्षितता का वाटते? भारतीय जनता बहुसंख्य हिंदू आहे म्हणून सेक्युलर म्हणवून घेते तसे मुस्लिम सेक्युलर म्हणवून घेतील का भारतात? असे कैक प्रश्न, समस्या आहेत. त्यावर साधकबाधक विचार परामर्श व्हावे. भारतात अशा विसंगतीचा परिणाम म्हणून शिकल्या सावरलेल्या सुशिक्षित मुस्लिम तरुणांना बऱ्याच ठिकाणी राहण्यासाठी अडचणी येतात. संशयित नजरेने बघितले जाते बाहेरच्या शहरात. हे कशामुळे? नमाज अदा करण्यासाठी जसे एकत्र येतात तसेच अशी कट्टर पंथीयांच्या अनुयायांना आम्ही मदत करणार नाही पोलिसांना याची माहिती देउ. धर्माच्या नावाखाली कोणालाही पाठीशी घालणार नाही ही भूमिका का घेत नाहीत? विषय खूप खोल आहे. सरकारी बाह्य यंत्रणा, योजना, सोयीसुविधा, सेवा केवळ सुरक्षित वातावरण तयार करतील सुधारणा करण्यासाठी. मुळातच मला व्यक्तिशः धर्माच्या बाबतीत अडकायचे नाही ही अंतःप्रेरणा खूप महत्त्वाची आहे. जातपात धर्म घरात ठेवावा तो रस्त्यावर आणला की धुडगूस घातला जातो. त्याचा राजकीय परिप्रेक्ष्यात वापरच होतो. सामाजिक न्याय्य हक्कांसाठी लढणारे वेगळे आणि धर्माच्या बाबतीत लढणारे वेगळे असे चित्र तयार होते. यावर चर्चा होत राहतील न संपणाऱ्या. पण धर्मापेक्षा सामाजिक समरसता महत्वाची ही बाब हिंदू समाजाने ज्या पद्धतीने अंगिकारली तशी मुस्लिम समाज अंगिकारून पुढाकार घेणार नाही. हिंदू मुस्लिम व्यवहारात सगळे भारतीय म्हणून सहवेदनेने वावरताना दिसतात. एकत्र येतात. राजकीय संख्यात्मक शक्ती मिळवण्यासाठी धर्माचा वापर फक्त मुस्लिम समाजाचा होतो हिंदूंचा होत नाही हे सत्य स्विकारावे लागेल.

सगळ्यात शेवटचा मुद्दा. हिंदू समाज हा कोणत्याही धार्मिक ग्रंथांना, पोथ्या पुरणांना, वेद, उपनिषदे, वा तत्सम पवित्र उपदेशांना जखडून बसला नाही. चिकित्सकपणे सगळ्या धार्मिक मुद्द्यांवर चर्चा करून पुढे आला. एखाद्या धार्मिक गोष्टीला नाकारण्याचा अधिकार वापरला. विचारवंतांनी जाहीरपणे केलेली हिंदू धर्माची टिका, चिकित्सा स्विकारली. बंडखोरी केली. हिंदू सभ्यता, संस्कृती, आचार विचार कित्येक धार्मिक बाबी सगळ्या कसोट्यांवर वेळोवेळी तावूनसुलाखून निघाल्या. ह्यामुळे हिंदू समाज सर्वधर्मसमभाव अंगिकारून सर्व धर्मीयांचा सहसोबतीत राहू लागला. तशी सुधारणा भारतीय मुस्लिमांमध्ये होईल का हा यक्षप्रश्न आहे. असो. लेखन विश्रांती.

© भूषण वर्धेकर 
पुणे


शनिवार, ६ जुलै, २०२४

आरक्षणाच्या बैलाला ऽ ऽ ऽ

त्याचं असं झालं, समाजाचं एकदमच बिनसलं
जातीपाती एकवटल्या, आरक्षणाला कंटाळून
संगनमताने सर्वांनी एकच ठराव केला संमत
आम्हाला करा ब्राह्मण, तरच सोडू आरक्षण

एकीकडे प्रत्येकाला पाहिजे होती ब्राह्मण जात
आरक्षणाच्या ठेकेदारांना पटत नव्हते अजिबात
जातीपातीच्या राजकारणाचे नेते झाले उदास
सगळेच झाले ब्राह्मण तर चालणार कसे दुकान

वाटलं होतं सुटेल पेच, पुढ्यात होती खरी मेख
ब्राह्मणात नक्की कोण, होत्या डझनभर शाखा
सगळे ब्राम्हण एकदम, आंदोलनात आले थेट
आधी सांगा कोणते ब्राह्मण, मग ठरवा कोटा

चित्पावन, देशस्थ, कऱ्हाडे की कायस्थ 
सारस्वत चिडले, का आम्हाला वगळता!
सर्वात आधी ठरवा, गौड की द्राविडी 
लगेचच यजुर्वेदींनी मांडल्या पोटजाती 

तेवढ्यात आले देवरुखे, खोत आणि खिस्ती 
सोबतीला होते कनौजी, दैवज्ञ आणि कानडी
अय्यर सरसावले तोच, नंबुद्रींचा वेगळा नारा
कोकणस्थ झाले सावध, देशस्थ उठले भराभरा

शेवटी कोटा ठरवण्यासाठी ठरली बैठक
उत्तरेतील पंचगौड, की दक्षिणेचे पंचद्रविड
नंतर मांडून पोटजाती ठरवा क्रीमी लेअर 
शिक्कामोर्तब होऊन कोटा झाला सूकर

लिखित पाहिजे म्हणून ठरले एकछत्री सूत्र 
तेवढ्यात आला प्रश्न, कोणतं घ्यायचं गोत्र
तयार होत्या वंशावळी, मात्र अडले सगेसोयरे 
बैठक झाली सैरभैर, त्यात काही कावरेबावरे 

नुसत्याच झाल्या चर्चा, वाद थोडी हमरीतुमरी
कागदोपत्री प्रत्यक्षात मात्र दिखावा एकसूरी
कोकणस्थांनी कानोसा घेऊन साधला निशाणा
आम्ही आहोत तुमच्यासोबत सांगून देशस्थांना

अय्यर लढून तीस टक्क्यांत झाले होते मातब्बर 
नंबुद्रींना होता कमी वाटा तरी झाले धीरगंभीर 
कनौजींचा प्रश्न मैथिल उत्कल ब्राह्मणांचं काय?
ठरलं होतं खरं, सगळे एकच ज्याला पवित्र गाय

एवढं सगळं बघत बघत आंदोलक झाले त्रस्त 
जातीपातीच्या प्रश्न समस्या ह्या पेक्षा अस्तव्यस्त
म्होरक्या होता बेरकी, सोबत अनुभवी प्रशासन
आली हळूच मागणी, होऊ दे बहुजन ब्राम्हण

सगळे झाले खूष बघून नवीन होणारी शाखा
वाचल्या आपापल्या पोटजाती अन् उपशाखा 
बहुजन ब्राम्हणी कुळाचार अन् रूढी, परंपरा
यांचेही झाले पाहिजे शासन नोंदणी गोषवारा 

सरतेशेवटी ठरलं काढा घटनात्मक श्वेतपत्रिका 
सगळ्या गोतावळ्यांनी घेतल्या आणाभाका
जे सांगू ते खरं सांगू कागदी पुराव्यानिशी नोंदवू
तडीपार करा कोणी सापडला आमच्यात भोंदू

शासकीय हस्तक्षेप होताच उभा नवीन पेचप्रसंग
घटना कलम, परिशिष्टे पारायणे झाली यथासांग 
बहुजन ब्राम्हण साठी नोंदणीकृत नव्हती तरतूद
आणा दुरुस्ती विधेयक किंवा काढून वटहुकूम

पाच वर्षे सरली, अर्धवट ठेवून श्वेतपत्रिका
सर्वपक्षीय लोकांना दिसू लागल्या निवडणुका
एकाएकी घटना बदलणार,  ठोकली आरोळी
चाणाक्षांनी घेतली भरून आपापली झोळी

येत्या अधिवेशनात येऊन सत्तेत दिले आश्वासन 
करू नोंदणीकृत घटनात्मक बहुजन ब्राम्हण
तोवर जातीपातीच्या नेत्यांनी गाजवली भाषणं
'तरच सोडू आरक्षण' चं वाजत राहिलं तुणतुणं 

© भूषण वर्धेकर 
५ जूलै २०२४
पुणे 

२ नोव्हेंबर २०२३ रोजी सुरू केले लिहिणं 
५ जूलै २०२४ रोजी पूर्ण केले 

मंगळवार, २१ मे, २०२४

मोदीस्तोमाची दशकपूर्ती


सप्टेंबर २०१३ मध्ये तत्कालीन भाजपाध्यक्ष राजनाथसिंह यांनी मोदी यांची पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून घोषणा केली होती. त्यानंतरच्या सगळ्या घडामोडी राजकारणात हळूहळू मोदीकेंद्रीत होऊ लागल्या. याचा फायदा भाजपाला झालाच पण तोटाही भाजपालाच झाला. कारण भाजपाप्रणित मोदी की मोदीप्रणित भाजपा याचे द्वंद्व निर्माण झाले. भाजपाला आजपर्यंत हुकुमी एक्का मिळाला नव्हता सत्तेवर येण्यासाठी. तो मोदींच्या रुपाने मिळाला. कालांतराने मोदींनी आपली पक्षावरची पकड अजून मजबूत केली. राजनाथसिंह यांच्यानंतर अमित शहा यांच्याकडे भाजपाची सूत्रे आल्यानंतर एका वेगळ्या धाटणीचे मॉडेल भाजपाने डेव्हलप केले. साम दाम दंड भेद याचा पुरेपूर वापर पक्षबांधणी आणि सत्ता समीकरणात झाला. राजकीय पक्ष व्यावसायिक पद्धतीने कसा चालवायचा हे मोदी शहा जोडगोळीने दाखवून दिले. याचा परिपाक म्हणजे मोदीकेंद्रीत राजकारण खूप भक्कम झाले. त्यात टिनपाट विरोधकांनीही कोणत्याही समस्येसाठी मोदींच्या नावाने शंख करणे सुरू केले. त्याचा फायदा भाजपा का नाही करणार? यामुळे गेल्या दहा वर्षांत मोदींच्या प्रभावाचा ग्राफ वाढत गेला आणि भाजपाला राष्ट्रीय राजकारणात व्यक्तीकेंद्रित अवकाश मिळाला. आजपर्यंत असा व्यक्तीकेंद्रित अवकाश फक्त कॉंग्रेसच्या काळात गांधी कुटुंबातील सदस्यांना मिळाला होता. प्रादेशिक पक्षांचे तसे राजकारण व्यक्तीकेंद्रित असते पण त्याची भौगोलिक मर्यादा असते. आपण भारतीय लोक एकाप्रकारे व्यक्ती किंवा चेहऱ्यावर भाळणारी गुलामाची फौज आहोत. लोकशाहीचा प्रचार प्रसार प्रसिध्दी करण्यासाठी अशाच चेहऱ्यांची भारतात नितांत गरज असते. भाजपाच्या चाणाक्ष लोकांना हे चांगलेच समजलं होते. पण वाजपेयी अडवाणी वगैरे नेत्यांना तसं ग्लॅमर मिळाले नाही. भाजपाचे नेटवर्क वाढवण्यासाठी वाजपेयी अडवाणी यांच्या काळात जे प्रयत्न झाले त्याचे सर्वात मोठा लाभार्थी म्हणजे मोदी. मोदींच्या राजकारणाची सुरुवात गुजरात मध्ये झाली असली तरीही त्यांचा लोकसंपर्क ठेवण्याची सुरूवात (सार्वजनिक जीवनात हा शब्द जाणीवपूर्वक टाळला आहे) ही संघाचे प्रचारक म्हणून सुरू झाली. संघ प्रचारक नेमकं काय करतात जनसंपर्क कसा करतात याचा थोडा अभ्यास केला तर समविचारी लोकांना एकत्र आणून संघटनेचे कार्यकर्ते कसे तयार होतात हे समजतं. मोदी ज्या काळात प्रचारक होते तो काळ कॉंग्रेसप्रणित सरकारांचा होता. त्यावेळी जनतेमध्ये एक प्रकारची चीड सरकारबद्दल होती. ती चीड आणि नाराजी लोकांना विद्यमान सरकारच्या विरोधात कशी मतांमध्ये रूपांतरीत करायची यासाठी लोकसंपर्क असणं खूप गरजेचं. तो काळ मोदींनी जवळून बघितला. त्याचा फायदा मोदींना दिल्लीत प्रवक्ते झाल्यावर झाला. नंतरच्या काळात गुजरात मध्ये मुख्यमंत्री म्हणून दमदार कामगिरी करण्यासाठी हाच लोकसंपर्क उपयोगी पडला.


मोदींना डिझास्टर मॅनेजमेंटचा एक वेगळाच अनुभव आहे. गुजरातमध्ये झालेल्या दंगली किंवा भूकंपाचा तडाखा बसल्याने झालेली वाताहत या प्रसंगी मोदींमध्ये असलेले संघटन कौशल्य आणि लोकसंपर्क उपयोगी पडले. १९७९ साली मोरबी येथे पूर आला होता मच्छू नदीत तेव्हा मोदी ऐन तीशीत धडपडणारे कार्यकर्ते होते. त्यावेळी त्यांनी केलेल्या कामाची खूप कमी लोकांना माहिती आहे. त्यामुळे मोठा जनसमुदाय बाधित झालेल्या परिस्थितीची हाताळणी कशी करावी हे मोदींना व्यवस्थितपणे समजते. त्यात चुका होतात त्या भरून काढल्या जातात. ही रीतच आहे नेतृत्व घडण्याची. मोदींच्या राजकारणाची खरी मेख ही आहे की 'हे फक्त मोदीच करु शकतो' असे नॅरेटिव्ह सेट होणं. त्या बळावर ३७० कलम, राममंदिर आणि नोटबंदी सारखे धाडसी निर्णय घेतले गेले. बऱ्याच वेळा मोदींना महत्त्वाच्या निर्णयांची यशस्वीपणे अंमलबजावणी करणे हे काही प्रमाणात जमलं नाही कारण तसा केंद्रीय राजकारभाराचा अनुभव कमी पडला. पण या सगळ्यात मोदींची क्रेडिबिलिटी ही कमिटमेंट डिलीव्हरी करणारा प्रधानसेवक ही उभी करण्यात भाजपाला जमलं. कदाचित जनतेला त्याची भूरळ पडली असावी. मोदींच्या बाबतीत अजून एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे विरोधकांमध्ये जे हुकुमी एक्के आहेत,  निवडून येण्याची क्षमता असलेले नेते आहेत त्यांना गोड बोलून, प्रसंगी धमकावून पक्षात घेऊन पक्षबांधणी मजबूत करणे आणि संख्यात्मक बळ वाढवणं ही कॉंग्रेसच्या काळातील आउटडेटेड खेळी मोदी देशसेवेसाठी कटिबद्ध वगैरे म्हणत सहजपणे करतात. आपल्या संविधानाच्या चौकटीत राहून ज्या खाचाखोचा पळवाटा आहेत त्या बरोबर वापरण्यात भाजपाला मिळालेली संधी मोदींसाठी फायद्याची पण आहे. तशीच डोकेदुखी ठरणारी पण आहे.


स्वातंत्र्यप्राप्तीनंतर १९५० ते १९७० , १९७० ते १९९० हे कालखंड कॉंग्रेसच्या बाबतीत फार महत्त्वाचे आहेत. पहिल्या कालखंडातील दोन दशकांत कॉंग्रेस मजबूत होती. दुसऱ्या कालखंडातील दोन दशकांत कॉंग्रेस ढासळू लागली. १९९० ते २०२४ या पंचवीस वर्षांत कॉंग्रेसच्या एकूणच संघटनेचे कुटुंबकबिल्यामुळे जे नुकसान झाले ते पुढच्या काळात लवकर भरून येईल अशी कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. याच्या उलट आताचा भाजपा किंवा तत्कालीन जनसंघ, जनता पार्टी वगैरेचा कालखंड जर बघितला तर लक्षात येईल की १९५० ते १९७०, १९७० ते १९९० आणि १९९० ते २०२४ भाजपा हा मजबूत होत गेला. पहिल्या कालखंडातील दोन दशकांत जनसंघ हा सनातन हिंदु धर्म वगैरे या जंजाळात अडकला होता. जनाधार तर अजिबातच नव्हता. १९७० ते १९९० हा काळ खऱ्या अर्थाने भाजपाच्या जडणघडणीचा. कार्यकर्ते तयार करणं, लोकसंपर्क वाढवणं, लोकांपर्यंत जाऊन त्यांच्या ज्वलंत प्रश्नांवर विचार करायला भाग पाडणं. सत्ताधाऱ्यांच्या ऐवजी आम्ही कसे सक्षम आणि भक्कम पर्याय आहोत हे पटवून देणं ही महत्वाची संघटनेची पायाभरणी त्या काळात झाली. १९९० ते २०२४ मध्ये भाजपाने कधी नव्हे ते न भूतो न भविष्याति असे यश संपादन केले. हा भाग झाला संघटनेच्या संघटन कौशल्य उभारण्याचा. मात्र संघटनेच्या माध्यमातून जेव्हा व्यक्तीकेंद्रित राजकारण आणि व्यवहार सुरू होतात तेव्हा मात्र पक्ष हा संपू लागतो. वैयक्तिक विचारधारा बिंबवली जाते. कॉंग्रेसच्या बाबतीत गांधी कुटुंबातील सदस्य हेच सर्वस्व होते. तसे भाजपात मोदी शहा ही जोडगोळी संघटनेला सापडली. भारतीय जनमानसात व्यक्तीपूजा अग्रभागी आहे. यामुळेच भारतात महापुरुष झाले भरपूर पण अनुयायांनी केलेल्या व्यक्तीपूजेच्या हव्यासापोटी महापुरुषांचे महत्त्व कमी झाले. भाजपाने या बाबतीत वेगळे धोरण अवलंबिले. मोदी हे हुकुमी एक्का झाले की भाजपातील संघटनेचे चाणाक्ष सत्ता कशी टिकेल यावर काथ्याकूट करू लागले. त्यासाठी साम दाम दंड भेद होते आणि अमर्यादित सत्ता. वाजपेयी अडवाणी यांना सत्ता टिकवण्यासाठी वाढवण्यासाठी जमलं नाही. मात्र मोदी, शहा या द्वयींनी ते करून दाखवलं. 


गेल्या दशकात भारतात बऱ्यापैकी महत्वाचे बदल झाले. त्यात कोरोनामुळे अडथळा निर्माण झाला पण त्यावर मात करण्यात आली. लोकसंख्येच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे प्रश्न निर्माण तयार झाले असले तरी हीच लोकसंख्या भौगोलिकदृष्ट्या, सांस्कृतिकदृष्ट्या आणि सामाजिकदृष्ट्या विभागलेली असल्याने त्या प्रश्नांची, समस्यांची तीव्रता जाणवत नाही. हे भाजपाला चांगले समजले म्हणून उत्तर भारतात भाजपाने या दशकात मजबूत बस्तान बसवलं. आता त्यांचा मोर्चा दक्षिण भारतात वळाला आहे. यामध्ये मोदी प्रतिमेचा सर्वाधिक उपयोग होणार हे निश्चित. भारतात संविधानाच्या चौकटीत राहून देश जसा मजबूत करता येतो तसा सत्ताधारी पक्ष ही मजबूत होतो. भाजपाने या दोन टर्ममध्ये पक्ष संघटना वाढीसाठी जेवढे प्रयत्न केले त्यापेक्षा जास्त प्रयत्न देश चालवण्यासाठी भाजपा कसा खमका आहे हे दाखवण्यासाठी प्रयत्न केले. याचं सर्वात मोठं उदाहरण म्हणजे पाकीस्तानात केलेले सर्जिकल स्ट्राईक. पाकिस्तान दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ कडी निंदा, तीखी निंदा वगैरे करण्याच्या पार्श्वभूमीवर सर्जिकल स्ट्राईक होणं हा अनुभव देशवासीयांसाठी खूप वेगळा आहे. त्यांचं क्रेडिट खरंतर सैन्याला दिलं पाहिजे पण भाव खाऊन गेले ते मोदी. २०१९ ला या सर्जिकल स्ट्राईक चा मतदानावर प्रभाव पडला ते निकालानंतर समजलं. त्यातही विरोधकांनी नेहमीप्रमाणे पुरावे दाखवा कार्यक्रम सुरू केला नंतर मोदींनी विरोधकांचा कार्यक्रम केला. २००४ ते २०१४ या दशकांत भारतात दहशतवादी हल्ले भरपूर प्रमाणात झाले. २००८ चा हल्ला सर्वात मोठा होता. त्याला प्रत्युत्तर म्हणून सर्वात नामी संधी देशाला मिळाली होती पण ती गमावली. एवढं सगळं होऊनही जनतेने कॉंग्रेसच्या पारड्यात २००९ ला सर्वाधिक खासदार निवडून दिले. म्हणजे जनता सक्षम कारभार करण्यासाठी सरकार देते हे सिद्ध झाले. त्याची पुनरावृत्ती २०१९ ला जनतेने भाजपाला पुन्हा सत्तेवर आणून केली. 


२०२४ च्या निवडणुकित खूप महत्त्वाचे प्रश्न जनतेला भेडसावत आहेत. पण त्याची व्याप्ती जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी विरोधक कमी पडले. याचं कारण म्हणजे विरोधकांना अजूनही विरोधक म्हणून कामं कशी करायची हे समजलं नाही. जे जे विरोध करतील ते ते इडी सीबीआयने दडपले म्हणून कोल्हेकुई सुरू होते. मात्र विरोधकांना एकही नेता असा मिळू नये जो कोणत्याही भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अडकणार नाही हे विरोधकांचे दूर्दैव. दुसरं म्हणजे सलगपणे १० वर्ष जर सत्तेबाहेर राहिलो तर आपापली संस्थानं सांभाळायची कशी या विवंचनेत कित्येक जहागिरदार विरोधक सरळसोट सत्तेत सहभागी होण्यासाठी आतुरतेने भाजपाला जाऊन मिळाले. यात भाजपाने सगळ्या भ्रष्ट राजकारण्यांना पवित्र केले. काहींना मंत्री बनवून निवडणुकीत संख्या कशी वाढेल याची तजवीज केली. कारण जनता भ्रष्टाचार होतोय म्हणून रोष व्यक्त करते पण निवडणुकीत मात्र परंपरागत चालत आलेल्या नेत्यांना भरभरून मतदान करते हे भाजपाला ठाउक आहे. त्यामुळे वॉशिंग मशीन भाजपाचा उदय झाला. यामध्ये सर्वाधिक डोकेदुखी वाढली ती विकल्या जाणाऱ्या आमदारांची. जनतेची सेवा करण्यासाठी आम्ही पक्ष सोडला वगैरे बाता मारायचा काळ संपला. जनतेला समजतं कोण कीती पाण्यात आहे ते. मात्र सत्ता सगळी पापं पवित्र करते म्हणून असे चुकार प्रयोग खपतात. नंतर जम बसवला की सत्तेतील पक्षच अशा नेत्यांना खपवतात. जनतेवर अजूनही स्थानिक पातळीवर राजकीय कुटुंबातील सदस्यांचे गारुड आहे. पणजोबा आजोबा पोरगा नातू वगैरे पिढ्यानपिढ्या मतदारसंघात निवडणूक लढतात दरवेळी तीच तीच आश्वासने तेच तेच मुद्दे हे बदलण्याची शक्यता कमीच असते. त्यामुळे भाजपाने तालुक्यातील वजनदार नेते मंडळी पक्षात घेऊन पक्षबांधणी मजबूत करण्यासाठी प्रयत्न केले. याचा तोटा कार्यकर्ते लोकांना झाला. वर्षानुवर्षे ज्यांच्या विरोधात लढलो त्यांच्यासाठी लढण्याची नामुष्की ओढवली. ही मोदींच्या भाजपाला भविष्यात डोकेदुखी ठरणारी आहे. कारण भाजपाचा मतदार बांधील नाही. कॉंग्रेसचा एक मतदार वर्ग कायमस्वरूपी बांधील असतो. तसा भाजपाचा होऊ शकत नाही. कारण कॉंग्रेसकडे एक ऐतिहासिक लीगसी इको सिस्टिम, तयार केलेली व्यवस्था आहे. तीच गावपातळीवर कॉंग्रेसच्या लोकांना बांधून ठेवते. भाजपाची सुरूवात भट बामण शेठजींचा पक्ष म्हणून झाली असली तरी ओबीसींच्या कल्याणासाठी काम करणारा पक्ष म्हणून उदयास आला. याला कारणीभूत आहेत दोन गोष्टी एक मंडल आयोग दुसरा बहुजनांचे हिंदुत्व. बहुजनांना पुरोगामी छत्राखाली आणणं सहज शक्य होते पण अल्पसंख्याकांचे लांगूनचालन नडलं. तेच भाजपाने हेरलं आणि सर्वसामावेशक हिंदुत्व म्हणून हातपाय पसरायला सुरुवात झाली. 


कॉंग्रेसच्या काळात सुरुवातीला बलाढ्य असणारी पक्षसंघटना हळूहळू कमकुवत होत गेली ती प्रादेशिक गटबाजीमुळे. कॉंग्रेसमधून फुटून प्रांतीय अस्मिता, सत्तातुर नेत्यांच्या प्रकट इच्छा यामुळे प्रादेशिक पक्षांचे वजन त्या त्या भौगोलिक प्रदेशात वाढले. बांडगुळासारखे जगणारे हे पक्षच कॉंग्रेसला कमकुवत करू लागले. शेवटी राज्यातील राजकारणातून ह्याच प्रादेशिक पक्षांची मक्तेदारी एवढी वाढली की कॉंग्रेस नेस्तनाबूत झाला. उदाहरणार्थ पश्चिम बंगाल, दक्षिणेकडील राज्ये. हा सर्वंकष इतिहास माहित असल्याने भाजपाने सेफ गेम सुरू केला पक्षवाढीचा. सुरुवातीला छोट्या छोट्या पक्षांसोबत युती करून जनतेच्या मनाचा कानोसा घेऊन त्या त्या राज्यात हात पाय पसरले. विरोधी पक्षांची पोकळी भरून काढणे, प्रादेशिक पक्षांतील अंतर्गत गटबाजीचा फायदा घेऊन पक्षफुटीला संविधानिक संरक्षण देणं, आमदारांची खरेदीविक्री सारखे पुचाट प्रकार चाणक्यनीतीच्या नावाखाली खपवणे वगैरे हे मोदींच्या भाजपाचे प्रताप. यामुळेच भाजपाचा पारंपारिक मतदार दुखावला. २००४ ला इंडिया शायनिंग मुळं भाजपाचे पानिपत झाले होते हे माहिती असूनही इतर पक्षातील गटबाजी उफाळून आल्यानंतर भाजपाने त्याचा सत्ता समीकरणे तयार करण्यासाठी वापर केला. याचं कारण म्हणजे. दिल्ली पासून गल्ली पर्यंत फक्त आणि फक्त शतप्रतिशत भाजपा झाली पाहिजे हे ब्रीद. हे असे प्रकार संविधानाच्या पळवाटा शोधून काढून त्यात बसवणं हे भाजपाने केले. हे सर्वात मोठे व्यवस्थेचे वाभाडे काढण्यासारखे आहे. हे सर्व कशासाठी तर सत्ता मिळवण्यासाठी आणि टिकवण्यासाठी. नीती, कृती आणि करणी याचा पायपोस नसलेली संस्कृती भाजपाने जन्माला घातली. यास जबाबदार मोदी आणि शहा ही जोडगोळी. भाजपाच्या एक फळीतील बऱ्याच नेत्यांना हे आवडले नसणार हे सर्वश्रुतच. पण जो जिंकेल तोच टिकेल यासाठी केला अट्टाहास. जनतेला असले राजकारणात डाव टाकणारे नेते आवडतात‌. डोक्यावर घेऊन मिरवण्यासाठी असेच नेते समर्थकांना भावतात. चाणक्य वगैरे संबोधून पत्रकार संपादक मंडळी बेडकाला फुगवून बैल करतात. बऱ्याचदा ठराविक जनतेला हे मनापासून आवडतं. ह्याची कशी जिरवली त्याची कशी जिरवली वगैरे. आमच्या नेत्याला कसे इकडे मानतात. तिकडे कसा भारी दबदबा आहे. अमुक याच्यावर पकड आहे. तमुकला बेकार पॅक केलाय. फलाना लॉबी नेत्यांच्या पाठीशी आहे. टिमका जातीच्या लोकांना हेच पाहिजे. असे सोपस्कार भारतात सर्रास चालतात. सामाजिक, शैक्षणिक, राजकीय आणि सांस्कृतिक क्षेत्रातील विचारवंत, कार्यकर्ते आणि माननीय मंडळी तर अमुक एक नेता आपल्या विचारधारेला मानणारा आहे म्हणून त्याची सगळी कुकर्मे दुर्लक्षित करतात. अर्थातच त्यांच्या इको सिस्टिमचे ते सर्वाधिक लाभार्थी असावेत म्हणून नौटंकी खपते. बाकी अशी नौटंकी जाहीरपणे सार्वजनिक जीवनात वाखाणली गेली ती मोदींच्या भाजपामुळे.


गेल्या काही महिन्यांत महत्वाची प्रकरणं सुप्रीम कोर्टाने ताशेरे ओढले म्हणून जनतेसमोर आली. त्यापैकी निवडणूक रोखे. इलेक्टोरल बॉंडस्. हे काय नवीन नाही. अरूण जेटली हयात असताना त्यांच्या पुढाकाराने इलेक्टोरल बॉंडस् कायदेशीररीत्या अस्तित्वात आले. या बॉंडस् मुळं एक गोष्ट महत्त्वाची घडली ती म्हणजे राजकीय पक्षांना मिळणाऱ्या निधीचे ऑन रेकॉर्ड दिसणं. हे या आधी होत नव्हतं. जो काही व्यवहार चालायचा तो सगळा रोख आणि टेबलाखालून. ऑन रेकॉर्ड दिसेल असे बॅंकेचे व्यवहार जे राजकीय पक्ष दाखवतील तेच होते. या एसबीआयच्या बॉंडस् मार्फत सर्वात जास्त निधी हा सत्ताधाऱ्यांनाच मिळणार हे सर्वश्रुत. या योजनेत सगळेच राजकीय पक्ष लाभार्थी. जे पक्ष सत्तेवर त्यांना मोठा निधी. बाकीच्या पक्षांना कमी निधी. यात मेख अशी आहे की भाजपा नंतर सर्वात जास्त निधी तृणमूल काँग्रेस कडे आला. कारण कोलकाता येथे असणारे उद्योग आणि राज्य सरकारच्या मर्जी सांभाळूनच होणारे व्यवहार. यावर बराच उहापोह करता येईल. मात्र करप्शन लीगल पद्धतीने कसे करावे याचा सर्वोत्कृष्ट नमुना म्हणजे इलेक्टोरल बॉंडस्.  एक विचार करा की जर हे प्करण कॉंग्रेसच्या काळात उघडकीस आले असते आणि विरोधक भाजपावाले असते तर भाजपाने सत्ताधाऱ्यांना सळो की पळो करून सोडले असते. मग नेमकं आताचा विरोधक एवढा का ढिसाळ आहे हाच खरा प्रश्न आहे. कदाचित सर्वच पक्ष लाभार्थी असल्याने हे गांभीर्याने घेत नसावेत. आडवाटेच्या घटना संविधानाच्या पळवाटा शोधून चौकटीत बसवून  लोकांना डायजेस्ट होतील अशा पद्धतीने हाताळणे हीच मोदींच्या काळातील ही सर्वात मोठी समस्या आहे. जनतेला ह्याचे गांभीर्य लक्षात येत नाही. कारण लोकांनी एवढं मोठं प्रकरण बाहेर येऊन सुद्धा लाईटली घेतलं आहे. कारण राजकीय पक्षांना पैसा लागतोच तो अशा लीगल पद्धतीने बॅंकेमार्फत मिळतोय एवढीच समज लोकांमध्ये पसरली आहे. व्यवस्थेतील पळवाटा कशा हातळाव्यात याचं सर्वात समर्पक उदाहरण आहे हे. असे मुद्दे निवडणुकीच्या तोंडावर आल्याने सहसा काही फरक पडत नाही. मात्र हाच मुद्दा घेऊन पुढे येणाऱ्या निवडणुकीत माहौल तयार केला तर सत्ताधाऱ्यांना पळता भुई थोडी होईल. पण जनतेची स्मरणशक्ती क्षीण असते. आजच्या आढळणाऱ्या समाज माध्यमातून रोज नवनवीन प्रकरणं बाहेर येत असल्याने केवळ इंटरनेट वर ऑनलाईन असलेला समाज या बाबतीत जागरूक आहे. बराच मोठा वर्ग अनभिज्ञ असतो अशा मुद्यांवर. एकूणच भारतीय राजकारण हे एका रिऍलिटी शो सारखं चालू आहे की काय असं वाटतं कधीकधी. सगळं स्क्रिप्टेड असल्यासारखे कधी सत्ताधारी तर कधी विरोधक तर कधी सन्माननीय मंडळी वागत बोलत असतात. ह्या हेतूपुरस्सर केलेल्या व्यवस्थेचे सर्वात मोठे पाईक कोण असा प्रश्न भेडसावू लागतो.


जनतेला कोणत्याही राष्ट्रीय पक्षांना डावलता येत नाही. निवडणुकीत एकदा दोनदा संधी दिली जाते. त्याचं कारण शीर्ष नेतृत्वाच्या प्रभावामुळे. हा प्रभाव हळूहळू ओसरला की मग नवीन नेतृत्व उदयाला आले पाहिजे. जर पक्षांना असे नेतृत्व लादावे लागले तर मग पक्षांतर्गत त्या व्यक्तीची मक्तेदारी वाढली आहे हे समजावे. अशावेळी जनताच त्यांना बाहेर फेकून देते. १९७५ साली इंदिरा गांधी यांच्या आणीबाणीच्या काळात विरोधकांनी जनतेमध्ये जाऊन जागृती निर्माण केली त्यामुळे जनतेनेच कॉंग्रेसचे सरकार पाडले. नंतर आलेल्या अनेक पक्षांचे कडबोळे सत्ता टिकवू शकले नाही की पुन्हा एकत्रितपणे मिळवू शकले नाही. हा धडा लक्षात घेऊन भाजपाने भविष्यात जरी स्वपक्षातील खासदार कमी झाले तरीही सत्ता कशी मिळेल, टिकेल याबाबत नक्कीच रणनीती आखलेली असेल. कारण मोदी त्याबाबतीत फार पुढचा विचार करणारे आहेत. मोदींनी भाजपातील अंतर्गत विरोधक बेमालूमपणे बाजूला सारून गुजरातमध्ये मुख्यमंत्री पद टिकवले. ती एक रंगीत तालीम म्हणून बघायला हरकत नाही. जर भविष्यात २०२४ च्या निवडणुकित भाजपाला बहुमताचा आकडा गाठता आला नाही तर पुढची बेजमी म्हणून भाजपाने जय्यत तयारी केली असणार हे वेगळे सांगायला नको. हा सगळा विचका त्या त्या राज्यात विधानसभा निवडणुकीत खूप गोंधळ उडवणारा आहे. त्याआधी सगळ्यात मोठा लोकशाहीचा महोत्सव म्हणजे २४ च्या लोकसभेच्या निवडणुका. त्याच्या निकालानंतर खरे प्रश्न उभे राहतील. जर जनतेने सगळं पचवून मोदींना मतदान केले तर ही शेवटची संधी असेल मोदींना. भविष्यात मोदी पंच्याहत्तरीत असतील आणि ठरेल अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांना ज्या आधारावर पक्ष संघटनेत मार्गदर्शकाची भूमिका घ्यायला भाग पाडलं तसं मोदींना भाग पाडतात का बघणं महत्त्वाचं आहे.


सरतेशेवटी या दशकांत सबकुछ मोदी असल्याने जे फायदे भाजपाला झाले भविष्यात त्याचेच तोटेही होऊ शकतात. लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर जनतेला नेमकं काय मुद्दे भावतात हे समजेल.


© भूषण वर्धेकर 
पुणे 

शुक्रवार, ३ मे, २०२४

बाबाजी की जय हो

बाबाजी की जय हो|


बाबाजी बहोत ज्ञानी थे, 
बस्स उनके अनुयायी बिलकुल हरामी थे|

बाबाजी तो धर्म का प्रचार करते थे,
अनुयायी तो संप्रदाय बनाकर उस का प्रसार करते थे|
बाबाजी तो सभ्यता और संस्कृति के आग्रही थे,
अनुयायी तो रूढ़ि परंपरा लोगों मे थोंपना चाहते थे|
बाबाजी सत्य के पथपर चलने का आदर्श रखते थे, 
अनुयायी झूठ फैलाकर जुमलेबाजी किया करते थे|
बाबाजी के आशीर्वाद के लिये लोक दिवाने थे,
अनुयायी लोगो को चुनकर पंथ बनवाने मे लगे हुएँ थे|

बाबाजी बहोत ज्ञानी थे, 
बस्स उनके अनुयायी बिलकुल हरामी थे|

बाबाजी गांधीवादी होकर सत्य, अहिंसा के पुजारी बने थे, 
अनुयायी तो नथुरामायण का खेल चलाकर हिंसा को चमकाते थे|
बाबाजी तो दिनभर पुजा अर्चा, किर्तन पाठ कर के दिन गुजारते थे, 
अनुयायी तो उसी की सिस्टिम बनाकर घर बसाते थे|
बाबाजी वसुधैव कुटुंबकम् बोलकर तल्लीन हो जाते थे, 
अनुयायी तो बाबाजी को विश्व की सैर करवाते थे|
बाबाजी का संवाद हर सजीव, निर्जीव से होता था, 
अलग अलग देशो मे बाबाजी की प्रतिमा बढाकर अनुयायी का दुकान चलता था|

बाबाजी बहोत ज्ञानी थे, 
बस्स उनके अनुयायी बिलकुल हरामी थे|

बाबाजी का ध्येय तो विश्व कल्याण का था, 
अनुयायी तो कल्याणकारी होकर विश्वभर फैल चुके थे|
बाबाजी सब जनता के प्यारे थे, 
अनुयायी को लेकर सब महिलाए हैरान थी|
बाबाजी का संकल्प बहोत ही दृढ था, 
अनुयायी तो चुनिंदा सरकारों की विकल्प थी|
बाबाजी महान ज्ञानी पंडित बनना चाहते थे, 
अनुयायी तो उनको सर्वज्ञानी महात्मा बना चुके थे|

बाबाजी बहोत ज्ञानी थे, 
बस्स उनके अनुयायी बिलकुल हरामी थे|

बाबाजी हर एक से प्रेम से वार्तालाप किया करते थे, 
अनुयायी की ऑंखे लाल देखकर भक्त लोग परेशान थे|
बाबाजी को सेवाभावी शिष्यो की प्रतिक्षा थी, 
अनुयायी ने तो अंधभक्तोकी फौज बनाकर रखी थी|
बाबाजी हर साल जन्मदिन पर दानधर्म का पुण्य कर्म करते थे, 
अनुयायी तो उसी के लिए सालभर जोर जबरदस्ती चंदा जमा करते थे|
बाबाजी की मुस्कुराहट बहोत ही प्यारी हुआ करती थी, 
अनुयायी तो वही छबी बनाकर मुर्तीया, तसबीर बेचा करते थे|

बाबाजी बहोत ज्ञानी थे, 
बस्स उनके अनुयायी बिलकुल हरामी थे|

बाबाजी दुनिया के सब देशो में विश्वशांती की प्रेरणा बन चुके थे, 
अनुयायी तब अशांतता के स्रोत पैदा करने मे लगे थे|
बाबाजी की इच्छा थी की पुरे विश्व मे सिर्फ मानवता का ही धर्म हो, 
अनुयायी ने तो सब धर्म से मानवता हटाने की ठान ली थी|
बाबाजी कहते, मोक्ष ही अंतिम सत्य है,
अनुयायी जो पसंद नहीं उनको मौत के घाट उतारके मोक्ष दिलवाते थे|
बाबाजी सब जानते थे, अनुयायी से डरकर मौन हो जाते थे,
क्या पता उनको ही मारकर चिरंजीव समाधी बताकर अनुयायी नया संप्रदाय बना सकते थे|

बाबाजी बहोत ज्ञानी थे, 
बस्स उनके अनुयायी बिलकुल हरामी थे|

अंत मे हुआ वही जो अनुयायी चाहते थे,
बाबाजी का देहांत हो गया महानिर्वाण और जन्मदिन बनाया गया जन्मोत्सव|

बाबाजी की जय हो|



© भूषण वर्धेकर 
३० एप्रिल २०२४
तिरुपती, आंध्रप्रदेश 

गुरुवार, १८ एप्रिल, २०२४

भुरा - एका संघर्षाची यशस्वी ध्येयपुर्ती

भुरा - एका संघर्षाची यशस्वी ध्येयपुर्ती

शरद बाविस्कर यांच 'भुरा' वर वर पाहता एका खान्देशी तरूणाची संघर्षमय जगण्याची गोष्ट न राहता गेल्या दोन दशकातील तरुणाईची प्रातिनिधिक स्वरूपात व्यक्त केलेली मनस्वी चिंतनशील आणि प्रेरणादायी गोष्ट झाली आहे. लेखनाचा काळ हा लेखकाची दहावी ते जेएनयू मधील शिक्षकी जीवन एवढाच रेखाटला आहे. हा प्रवास सरासरी वीस वर्षातील संघर्ष आणि यशस्वी घोडदौड यापुरता मर्यादित आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे हाच प्रवास छोटेखानी वाटत असला तरी उर्वरित पुढच्या आयुष्याबद्दल आश्वासक असा वैचारिक पाया यातून साकारला गेला आहे. यात लेखकाने प्रांजळपणे आणि पारदर्शक पद्धतीने काल सुसंगत घडलेल्या घटना त्यावरची मूलभूत मतं लिहिली आहेत. लिखाण अगदी साधं सरळ सोपं आहे. संघर्ष करताना केलेली वर्णने शब्दबंबाळ होणार नाही याची विशेष काळजी घेतली आहे. बरेचशे प्रसंग लिखाणात आटोपते घेतले आहेत. त्यामुळे लेखक आत्मप्रौढी मिरवतोय असं अजिबात वाटत नाही. कारण आत्मवृत्त वगैरे लिहिताना आत्मप्रौढी कधी लिहिली जाते कळतंच नाही. लेखकाने शिक्षण घेण्यासाठी केलेले प्रयत्न प्रामाणिक पद्धतीने वर्णिले आहेत. मोटिव्हेशनल स्पीकर्स आणि इन्स्पीरेशनल लीडर्स टाईप वातावरण निर्माण करून स्टिरिओटाईप गोष्टी सांगण्याच्या हल्लीच्या काळात हे पुस्तक फार महत्त्वाचे आहे. कसलेही प्रिव्हिलेजेस नसलेला तरुण मुलगा शिक्षणासाठी धडपडत असतो आणि त्यात यशस्वी होतो ही एवढीच गोष्ट ह्या पुस्तकात आहे. मात्र हा प्रवास खरंतर एक प्रातिनिधिक उदाहरण आहे गेल्या दोन दशकातील तरुणाईचं. विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थ्याचं. शिक्षणासाठी आवश्यक सुविधा आणि सेवा ग्रामीण भागात सहजगत्या उपलब्ध नसतात. हे कारण कायमस्वरूपी एक्स्युजेस देण्यासाठी ठरलेली असतात. मात्र भुरा या सेवा सुविधा जशा मिळतील तशा संधीचे सोनं करून परदेशी जातो. कला शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी हा खूप मोठा आश्वासक पायंडा पडेल. कारण गेल्या दोन दशकांत इंजिनिअर आणि मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश नाही मिळिला तर आयुष्यभर खर्डेघाशी करावी लागेल. पैसे कमावण्यासाठी चांगल्या करिअरच्या दृष्टीने हीच दोन क्षेत्रे खूप महत्त्वाची आहेत आणि त्यासाठी बाजारपेठेची इकोसिस्टम तयार झाली आहे. दुसरीकडे युपीएससी किंवा एमपीएससी वगैरे सेवा आयोगाच्या परिक्षेसाठी करिअर म्हणून धडपडणाऱ्या युवकाची तऱ्हा. या सगळ्या गोष्टींचा जोरकस मारा सतत होत असताना इंग्रजी मध्ये ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन हे वेगवेगळ्या विद्यापीठात करणं. याशिवाय कसलीही यंत्रणा पाठीशी नसताना फ्रेंच भाषा शिस्तीने शिकणं आणि तत्वज्ञान विषयावर आधारित वैचारिक मंथन करणं हे खूपच आशादायक आहे. याचं कारण गेल्या दोन दशकांपासून एकूण शिक्षणव्यवस्थेत जे जे बाजारपेठेत खपतं तेच विकलं जातं अशा वातावरणात कोणीतरी धुळ्याच्या तरुणाने अशी धक्के टोणपे खात केलेली यशस्वी घोडदौड फार महत्त्वाची शिकवण देते. मोटीव्हेशन, इन्सपीरेशन असे बुळबुळीत शब्द न वापरता विचार करायला लावणारी गोष्ट म्हणजे भुरा. शिक्षण घेण्यासाठी अमुकच वातावरण असावं असा काही भ्रम पाळला गेला आहे. एखाद्या पुस्तकाच्या वाचनाने हा दृष्टीकोन बदलला जाईल एवढं ठाम स्टेटमेंट भुरा करतं. हे सर्व वाचताना केवळ शैक्षणिक आणि वैचारिक विकासाची रंजक कथा आहे असं वाटत. वैचारिक विकास खूप महत्त्वाचा. तो कायमस्वरूपी होत असावा लागतो. नाहीतर डबक्यातील पाण्यासारखी वैचारिक डबकं तयार होतात. 

जेएनयू मधील विद्यार्थी म्हणून वास्तव्य आणि शिक्षक म्हणून आत्मविश्वासाने सिद्ध होणं हे या पुस्तकातील परमोच्च बिंदू आहे. ह्या प्रवासाबद्दल लिहिताना लेखकाने रडगाणे गायलं नाही. नाहीतर बहुतेक आत्मचरित्रात्मक पुस्तकात मी इथवर येण्यासाठी किती खस्ता खाल्ल्या, कसे कष्ट उपसले वगैरे पाल्हाळ रटले जाते. लेखकाने त्याच्या प्रवासाची हकीगत सरळ स्पष्टपणे सांगितली आहे. अर्थात ह्या प्रवासात ते त्यांच्या वैचारिक गोष्टी मांडतात ज्या आजच्या काळात फार महत्त्वाच्या आहेत. कारण ते जेएनयू मधील त्याकाळी घडलेली सगळी हकिगत त्रयस्थपणे बघतात आणि लिहितात. त्यामुळे त्यांच्या लिखाणात एक प्रकारची बंडखोरी दिसते बुरसटलेल्या विचारांच्या विरोधात. ही गोष्ट मला भावली. त्यांचे सगळे विचार व्यक्तीशः मला पटत नाहीत. पण त्यांच्या वैचारिक मंथनातून जे मत प्रदर्शित होते त्याचा मी आदर करतो. लोकशाहीचा हाच सर्वात मोठा फायदा आहे की एखाद्याला त्याचे मत विरोधात मांडता येते. त्यावर मतमतांतरे असली तरीही व्यक्त होणं महत्त्वाचं. त्यातून समोरच्या व्यक्तीला नेमकं काय मांडायचे आहे हे समजते. अनेक विचारांची प्रवाही शिक्षणव्यवस्था गरजेची आहे. तीच खऱ्याखुऱ्या अर्थाने माणसाला सजग आणि सर्जनशील बनवते. जेएनयू मधील मध्यंतरीच्या काळात जे काही घडलं वा घडवलं गेलं यावर किमान लेखमाला लिहिली जाईल. त्याबद्दल भुरा पुस्तकात महत्वाची निरिक्षणे नोनदवली आहेत. ती समजून घेणे आवश्यक आहे. त्यावर चर्चा खंडन मंडन होत राहील. त्या विषयाची व्याप्ती खूप मोठी आहे. त्याबद्दल भुरामध्ये थोडक्यात पण प्रांजळपणे लिहिले गेले आहे. जेएनयू ही एक वैचारिक क्रांती करण्यासाठी, विद्यार्थी दशेत एक हाडाचा कार्यकर्ता बनवण्यासाठी आणि राजकीयदृष्ट्या जागृत असा समाज घडविण्यासाठी खूप ऐतिहासिक शैक्षणिक संस्था आहे. तीत वेगवेगळ्या विचारांचे प्रवाहांचे शीतयुद्ध होणारच. कारण आजवर डाव्यांच्या वैचारिक सिस्टिम चा बोलबाला असलेला दिल्ली मधील कम्युनिस्ट विचारसरणीची प्रभावी पेरणी करणारू विद्यापीठ म्हणून नावाजलेले होते. उजव्या विचारसरणीचे सरकार सत्तेवर आले आणि तिथे मक्तेदारी मोडून काढण्यासाठी साम दाम दंड भेद सर्वच बाबतीत वापरले गेले. कधीकाळी अशी रणनीती कम्युनिस्ट आयडॉलॉजी चे सर्वेसर्वा वापरत असत. आता सत्ता हाताशी आल्यानंतर उजव्या विचारसरणीच्या विद्यार्थी संघटना जेएनयू मधील राजकारणात जम बसवण्यासाठी तीच रणनीती वापरत आहेत. भारतातील शैक्षणिक संस्था ह्या खूप वर्षांपासून अमुक एका विचारांच्या ताब्यात आहेत हा समज एकदा का प्रबळ केला की लोकांच्या गैरसमजुती वाढू लागतात आणि त्याचा राजकीय महत्त्वाकांक्षा असणाऱ्यांना फायदा होतो. कारण नॅरेटिव्ह सेट करण्यासाठी इन्स्टिट्यूशनल सेटअप असणं खूप गरजेचं आहे. मानवी जीवनात वैचारिक स्थित्यंतरे आपोआपच येत जातात मात्र त्या साठी राजकीयदृष्ट्या वातावरणची जोड असेल तर एक इको सिस्टिम तयार करता येते. ही आजच्या बरबटलेल्या व्यवस्थेचे भीषण वास्तव आहे. असो. यावर भरपूर लिहिण्यासारखे आहे चर्चा करण्यासारखे आहे. मात भुरा पुस्तकात या संघर्षाकडे बघण्याचा नवा आयाम मिळतो जो समाजमान्यता प्राप्त माध्यमांतून मिळत नाही.


व्यक्तिशः मला लेखकाची काही मतं पटलेली नाहीत. पुरोगामी कोंदणात बसल्यासारखी त्यांची मते मला वाटतात. कदाचित त्यांना जी अनुभूती झाली असावी तशी मला झाली नसेल म्हणून असेल कदाचित. पण त्यांच्या चिकाटी आणि मेहनतीसाठी सलाम. तसंही पुरोगामी ही संज्ञा सध्या फारच बरबटलेली आहे. त्यामुळे विवेकी, अज्ञेयवादी, आस्तिक, नास्तिक अशी विभागणी योग्य ठरेल. लेखक स्वतः एखाद्या गोष्टीची मांडणी विवेकी पद्धतीने निरिक्षण करतात. त्यांचा तत्वज्ञानाचा अभ्यास असल्याने त्या सगळ्या विचारांचा, मतांचा एक परिपाक म्हणून त्यांनी मांडलेली निरिक्षणे महत्वाची. या पुस्तकाचे वाचन करत असताना एक नकळतपणे उर्जा निर्माण होते. हीच उर्जा किंवा दृष्टी खूप महत्वाचा ऐवज आहे. यातूनच वैचारिक मशागत होत असते. माझं म्हणणं प्रमाण म्हणजे प्रमाण. आणि तेच सगळ्यांनी स्विकारले पाहिजे. ह्या हट्टापायी भल्याभल्या वैचारिक चळवळी जमीनदोस्त झाल्या. वैचारिक मंथन निरंतर होत राहणारी गोष्ट आहे. या पुस्तकात लेखकाने त्याच्या वैचारिक प्रवासाचा समांतरपणे उल्लेख केला आहे. त्यांची भाष्ये फार महत्त्वाची आहेत. ती तुम्हाला पटो वा ना पटो पण एका चिकित्सक वृत्तीने ती भाष्ये तयार झाली आहेत. त्यामुळे त्याज्य होत नाहीत. द्वेषमूलक मांडणी झाली की भाष्ये त्याज्य होतात. लेखकाने जगताना आलेले अनुभव प्रांजळपणे कबूल केले. कुठेही मी कसा सोसून तावून सुलाखून तळपून वगैरे या मतावर आलो हे ठशीवपणे सांगितले नाही. आपण आपल्या परिघाबाहेर जेव्हा पडतो आणि वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या लोकांना भेटल्यावर जे अनुभव येतात त्यातून येणारी परिपक्वता खूप महत्त्वाची असते आयुष्यात पुढे जाण्यासाठी. हीच बेजमी असते आपलं कॅरेक्टर इस्टॅब्लिशमेंट होण्यासाठी. वैचारिक कल्लोळ आणि कोलाहलात अशी पुस्तके नक्कीच नवीन दृष्टी देतात. त्यातून नव्या विचारांची देवाणघेवाण होते. त्यामुळे का होईना आजवर जे जे अध्याहृत होतं त्याला आपण प्रश्न विचारू शकतो. यातूनच बंडखोरी किंवा विद्रोह होण्याची पार्श्वभूमी तयार होते. बंड होणं, विद्रोह होणं हे सुसंस्कृत समाज म्हणून सर्जनशीलतेचं लक्षण आहे. फक्त अशा बंडाची किंवा विद्रोहाची पाळंमुळं जर द्वेषातून आली तर त्याला सार्वजनिक जीवनात प्रतिष्ठा प्राप्त होत नाही. नेहमीच अडगळीत फेकली जाते. भुरा वाचताना ही अशी वैचारिक प्रगल्भता लेखकाची होत गेली हे आश्वासक आहे. ह्यातील लेखकाची मते प्रस्थापित लोकांना पटणार नाहीत. कारण प्रस्थापित लोकांना आलेले अनुभव वेगळे आणि लेखकाचे अनुभव वेगळे आहेत. जबाबदारीची जाणीव आणि जडणघडण होत असताना येणारी नेणीव विद्यार्थी दशेत खूप घबाड मिळवून देते. त्याच पुंजीवर पुढचं आयुष्य व्यतीत करावे लागते. अशी पुंजी लेखकाला धुळे, लखनौ, दिल्ली आणि युरोपीय देशात शिक्षणानिमित्त वास्तव्यात मिळाली. ह्या शहरातील आलेल्या अनुभवांवर लेखकाचे वैचारिक विश्व समृद्ध झाले. ह्या मनस्वी प्रवासाचा अनुभव घ्यायचा असेल तर भुरा हे पुस्तक वाचलंच पाहिजे.


© भूषण वर्धेकर 
३१ जानेवारी २०२४
भुकूम, पुणे 

गुरुवार, २८ मार्च, २०२४

ए हान की बडीव

ए हान की बडीव
दिसला की अडीव
ऐकत कसं न्हाई
डोस्क फोडून रडीव

लय उडायलाय त्यो
उतरव मारुन माज
करुन थोबाड काळं
ताकद आपली दाखीव

हाय आपली सत्ता
हुडकून काढू पत्ता
टग्यांची फौज आन
घुसून घरात हान

अडवून एसट्या फोड
टायर, पुतळे जाळून
युवा नेत्यांची घोडदौड
निषेधाची भाषणं झाडून

कर उपोषण मंडप टाकून
काढ मोर्चा ताफा काढून
विस्कटून चौकट गावगाड्याची
वेसण बांधून जातीपातीची

घाल शिव्या इन कॅमेरा
फुगवून छाती वाढीव दरारा
गुपचुप निसटुन हो बेपत्ता
होऊ दे मेडियात जांगडगुत्ता

कर गावबंदी लावून फ्लेक्स
सोम्यागोम्यांचे राखून स्टेक्स
जेसीबी चालवून बनीव मैदान
घेऊन सभा उडीव दाणादाण

हो सैरभैर ठिय्या मांडून
आदेश घेऊन पडद्यामागून
उठीव रान आरोप करून
होऊदे बबाल सगळीकडून

लपून छपून निरोप धाडून 
आण पोती दगडं भरून
कर हल्ला धोंडे फेकून
पोलिसांचं टकूर फोडून

टाकून पेट्रोल बाटली फोड
पेटवून टायर चौकात सोड
बोलव मेडिया काढ फोटो
बघून घेऊ आला तर स्यू मोटो

हायती आपलं सायेब खंबीर
म्हणलेत घेईल मी सांभाळून
विषयच करायचा लय गंभीर 
सगळे राह्यले पायजेल टरकून 


© भूषण वर्धेकर
१० फेब्रुवारी २०२४
पुणे 

नास्तिकतेची वल्कलं

घेऊन निधर्मीवादाचा झेंडा पेटवून इहवादाचा डंका झालाय एकजण नवखा नास्तिक बिथरला पाहून बहुसंख्य आस्तिक कोणता सच्चा धार्मिक यावर करू लागला गहन वि...