भुरा - एका संघर्षाची यशस्वी ध्येयपुर्ती
भुरा - एका संघर्षाची यशस्वी ध्येयपुर्ती
शरद बाविस्कर यांच 'भुरा' वर वर पाहता एका खान्देशी तरूणाची संघर्षमय जगण्याची गोष्ट न राहता गेल्या दोन दशकातील तरुणाईची प्रातिनिधिक स्वरूपात व्यक्त केलेली मनस्वी चिंतनशील आणि प्रेरणादायी गोष्ट झाली आहे. लेखनाचा काळ हा लेखकाची दहावी ते जेएनयू मधील शिक्षकी जीवन एवढाच रेखाटला आहे. हा प्रवास सरासरी वीस वर्षातील संघर्ष आणि यशस्वी घोडदौड यापुरता मर्यादित आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे हाच प्रवास छोटेखानी वाटत असला तरी उर्वरित पुढच्या आयुष्याबद्दल आश्वासक असा वैचारिक पाया यातून साकारला गेला आहे. यात लेखकाने प्रांजळपणे आणि पारदर्शक पद्धतीने काल सुसंगत घडलेल्या घटना त्यावरची मूलभूत मतं लिहिली आहेत. लिखाण अगदी साधं सरळ सोपं आहे. संघर्ष करताना केलेली वर्णने शब्दबंबाळ होणार नाही याची विशेष काळजी घेतली आहे. बरेचशे प्रसंग लिखाणात आटोपते घेतले आहेत. त्यामुळे लेखक आत्मप्रौढी मिरवतोय असं अजिबात वाटत नाही. कारण आत्मवृत्त वगैरे लिहिताना आत्मप्रौढी कधी लिहिली जाते कळतंच नाही. लेखकाने शिक्षण घेण्यासाठी केलेले प्रयत्न प्रामाणिक पद्धतीने वर्णिले आहेत. मोटिव्हेशनल स्पीकर्स आणि इन्स्पीरेशनल लीडर्स टाईप वातावरण निर्माण करून स्टिरिओटाईप गोष्टी सांगण्याच्या हल्लीच्या काळात हे पुस्तक फार महत्त्वाचे आहे. कसलेही प्रिव्हिलेजेस नसलेला तरुण मुलगा शिक्षणासाठी धडपडत असतो आणि त्यात यशस्वी होतो ही एवढीच गोष्ट ह्या पुस्तकात आहे. मात्र हा प्रवास खरंतर एक प्रातिनिधिक उदाहरण आहे गेल्या दोन दशकातील तरुणाईचं. विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थ्याचं. शिक्षणासाठी आवश्यक सुविधा आणि सेवा ग्रामीण भागात सहजगत्या उपलब्ध नसतात. हे कारण कायमस्वरूपी एक्स्युजेस देण्यासाठी ठरलेली असतात. मात्र भुरा या सेवा सुविधा जशा मिळतील तशा संधीचे सोनं करून परदेशी जातो. कला शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी हा खूप मोठा आश्वासक पायंडा पडेल. कारण गेल्या दोन दशकांत इंजिनिअर आणि मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश नाही मिळिला तर आयुष्यभर खर्डेघाशी करावी लागेल. पैसे कमावण्यासाठी चांगल्या करिअरच्या दृष्टीने हीच दोन क्षेत्रे खूप महत्त्वाची आहेत आणि त्यासाठी बाजारपेठेची इकोसिस्टम तयार झाली आहे. दुसरीकडे युपीएससी किंवा एमपीएससी वगैरे सेवा आयोगाच्या परिक्षेसाठी करिअर म्हणून धडपडणाऱ्या युवकाची तऱ्हा. या सगळ्या गोष्टींचा जोरकस मारा सतत होत असताना इंग्रजी मध्ये ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन हे वेगवेगळ्या विद्यापीठात करणं. याशिवाय कसलीही यंत्रणा पाठीशी नसताना फ्रेंच भाषा शिस्तीने शिकणं आणि तत्वज्ञान विषयावर आधारित वैचारिक मंथन करणं हे खूपच आशादायक आहे. याचं कारण गेल्या दोन दशकांपासून एकूण शिक्षणव्यवस्थेत जे जे बाजारपेठेत खपतं तेच विकलं जातं अशा वातावरणात कोणीतरी धुळ्याच्या तरुणाने अशी धक्के टोणपे खात केलेली यशस्वी घोडदौड फार महत्त्वाची शिकवण देते. मोटीव्हेशन, इन्सपीरेशन असे बुळबुळीत शब्द न वापरता विचार करायला लावणारी गोष्ट म्हणजे भुरा. शिक्षण घेण्यासाठी अमुकच वातावरण असावं असा काही भ्रम पाळला गेला आहे. एखाद्या पुस्तकाच्या वाचनाने हा दृष्टीकोन बदलला जाईल एवढं ठाम स्टेटमेंट भुरा करतं. हे सर्व वाचताना केवळ शैक्षणिक आणि वैचारिक विकासाची रंजक कथा आहे असं वाटत. वैचारिक विकास खूप महत्त्वाचा. तो कायमस्वरूपी होत असावा लागतो. नाहीतर डबक्यातील पाण्यासारखी वैचारिक डबकं तयार होतात.
जेएनयू मधील विद्यार्थी म्हणून वास्तव्य आणि शिक्षक म्हणून आत्मविश्वासाने सिद्ध होणं हे या पुस्तकातील परमोच्च बिंदू आहे. ह्या प्रवासाबद्दल लिहिताना लेखकाने रडगाणे गायलं नाही. नाहीतर बहुतेक आत्मचरित्रात्मक पुस्तकात मी इथवर येण्यासाठी किती खस्ता खाल्ल्या, कसे कष्ट उपसले वगैरे पाल्हाळ रटले जाते. लेखकाने त्याच्या प्रवासाची हकीगत सरळ स्पष्टपणे सांगितली आहे. अर्थात ह्या प्रवासात ते त्यांच्या वैचारिक गोष्टी मांडतात ज्या आजच्या काळात फार महत्त्वाच्या आहेत. कारण ते जेएनयू मधील त्याकाळी घडलेली सगळी हकिगत त्रयस्थपणे बघतात आणि लिहितात. त्यामुळे त्यांच्या लिखाणात एक प्रकारची बंडखोरी दिसते बुरसटलेल्या विचारांच्या विरोधात. ही गोष्ट मला भावली. त्यांचे सगळे विचार व्यक्तीशः मला पटत नाहीत. पण त्यांच्या वैचारिक मंथनातून जे मत प्रदर्शित होते त्याचा मी आदर करतो. लोकशाहीचा हाच सर्वात मोठा फायदा आहे की एखाद्याला त्याचे मत विरोधात मांडता येते. त्यावर मतमतांतरे असली तरीही व्यक्त होणं महत्त्वाचं. त्यातून समोरच्या व्यक्तीला नेमकं काय मांडायचे आहे हे समजते. अनेक विचारांची प्रवाही शिक्षणव्यवस्था गरजेची आहे. तीच खऱ्याखुऱ्या अर्थाने माणसाला सजग आणि सर्जनशील बनवते. जेएनयू मधील मध्यंतरीच्या काळात जे काही घडलं वा घडवलं गेलं यावर किमान लेखमाला लिहिली जाईल. त्याबद्दल भुरा पुस्तकात महत्वाची निरिक्षणे नोनदवली आहेत. ती समजून घेणे आवश्यक आहे. त्यावर चर्चा खंडन मंडन होत राहील. त्या विषयाची व्याप्ती खूप मोठी आहे. त्याबद्दल भुरामध्ये थोडक्यात पण प्रांजळपणे लिहिले गेले आहे. जेएनयू ही एक वैचारिक क्रांती करण्यासाठी, विद्यार्थी दशेत एक हाडाचा कार्यकर्ता बनवण्यासाठी आणि राजकीयदृष्ट्या जागृत असा समाज घडविण्यासाठी खूप ऐतिहासिक शैक्षणिक संस्था आहे. तीत वेगवेगळ्या विचारांचे प्रवाहांचे शीतयुद्ध होणारच. कारण आजवर डाव्यांच्या वैचारिक सिस्टिम चा बोलबाला असलेला दिल्ली मधील कम्युनिस्ट विचारसरणीची प्रभावी पेरणी करणारू विद्यापीठ म्हणून नावाजलेले होते. उजव्या विचारसरणीचे सरकार सत्तेवर आले आणि तिथे मक्तेदारी मोडून काढण्यासाठी साम दाम दंड भेद सर्वच बाबतीत वापरले गेले. कधीकाळी अशी रणनीती कम्युनिस्ट आयडॉलॉजी चे सर्वेसर्वा वापरत असत. आता सत्ता हाताशी आल्यानंतर उजव्या विचारसरणीच्या विद्यार्थी संघटना जेएनयू मधील राजकारणात जम बसवण्यासाठी तीच रणनीती वापरत आहेत. भारतातील शैक्षणिक संस्था ह्या खूप वर्षांपासून अमुक एका विचारांच्या ताब्यात आहेत हा समज एकदा का प्रबळ केला की लोकांच्या गैरसमजुती वाढू लागतात आणि त्याचा राजकीय महत्त्वाकांक्षा असणाऱ्यांना फायदा होतो. कारण नॅरेटिव्ह सेट करण्यासाठी इन्स्टिट्यूशनल सेटअप असणं खूप गरजेचं आहे. मानवी जीवनात वैचारिक स्थित्यंतरे आपोआपच येत जातात मात्र त्या साठी राजकीयदृष्ट्या वातावरणची जोड असेल तर एक इको सिस्टिम तयार करता येते. ही आजच्या बरबटलेल्या व्यवस्थेचे भीषण वास्तव आहे. असो. यावर भरपूर लिहिण्यासारखे आहे चर्चा करण्यासारखे आहे. मात भुरा पुस्तकात या संघर्षाकडे बघण्याचा नवा आयाम मिळतो जो समाजमान्यता प्राप्त माध्यमांतून मिळत नाही.
व्यक्तिशः मला लेखकाची काही मतं पटलेली नाहीत. पुरोगामी कोंदणात बसल्यासारखी त्यांची मते मला वाटतात. कदाचित त्यांना जी अनुभूती झाली असावी तशी मला झाली नसेल म्हणून असेल कदाचित. पण त्यांच्या चिकाटी आणि मेहनतीसाठी सलाम. तसंही पुरोगामी ही संज्ञा सध्या फारच बरबटलेली आहे. त्यामुळे विवेकी, अज्ञेयवादी, आस्तिक, नास्तिक अशी विभागणी योग्य ठरेल. लेखक स्वतः एखाद्या गोष्टीची मांडणी विवेकी पद्धतीने निरिक्षण करतात. त्यांचा तत्वज्ञानाचा अभ्यास असल्याने त्या सगळ्या विचारांचा, मतांचा एक परिपाक म्हणून त्यांनी मांडलेली निरिक्षणे महत्वाची. या पुस्तकाचे वाचन करत असताना एक नकळतपणे उर्जा निर्माण होते. हीच उर्जा किंवा दृष्टी खूप महत्वाचा ऐवज आहे. यातूनच वैचारिक मशागत होत असते. माझं म्हणणं प्रमाण म्हणजे प्रमाण. आणि तेच सगळ्यांनी स्विकारले पाहिजे. ह्या हट्टापायी भल्याभल्या वैचारिक चळवळी जमीनदोस्त झाल्या. वैचारिक मंथन निरंतर होत राहणारी गोष्ट आहे. या पुस्तकात लेखकाने त्याच्या वैचारिक प्रवासाचा समांतरपणे उल्लेख केला आहे. त्यांची भाष्ये फार महत्त्वाची आहेत. ती तुम्हाला पटो वा ना पटो पण एका चिकित्सक वृत्तीने ती भाष्ये तयार झाली आहेत. त्यामुळे त्याज्य होत नाहीत. द्वेषमूलक मांडणी झाली की भाष्ये त्याज्य होतात. लेखकाने जगताना आलेले अनुभव प्रांजळपणे कबूल केले. कुठेही मी कसा सोसून तावून सुलाखून तळपून वगैरे या मतावर आलो हे ठशीवपणे सांगितले नाही. आपण आपल्या परिघाबाहेर जेव्हा पडतो आणि वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या लोकांना भेटल्यावर जे अनुभव येतात त्यातून येणारी परिपक्वता खूप महत्त्वाची असते आयुष्यात पुढे जाण्यासाठी. हीच बेजमी असते आपलं कॅरेक्टर इस्टॅब्लिशमेंट होण्यासाठी. वैचारिक कल्लोळ आणि कोलाहलात अशी पुस्तके नक्कीच नवीन दृष्टी देतात. त्यातून नव्या विचारांची देवाणघेवाण होते. त्यामुळे का होईना आजवर जे जे अध्याहृत होतं त्याला आपण प्रश्न विचारू शकतो. यातूनच बंडखोरी किंवा विद्रोह होण्याची पार्श्वभूमी तयार होते. बंड होणं, विद्रोह होणं हे सुसंस्कृत समाज म्हणून सर्जनशीलतेचं लक्षण आहे. फक्त अशा बंडाची किंवा विद्रोहाची पाळंमुळं जर द्वेषातून आली तर त्याला सार्वजनिक जीवनात प्रतिष्ठा प्राप्त होत नाही. नेहमीच अडगळीत फेकली जाते. भुरा वाचताना ही अशी वैचारिक प्रगल्भता लेखकाची होत गेली हे आश्वासक आहे. ह्यातील लेखकाची मते प्रस्थापित लोकांना पटणार नाहीत. कारण प्रस्थापित लोकांना आलेले अनुभव वेगळे आणि लेखकाचे अनुभव वेगळे आहेत. जबाबदारीची जाणीव आणि जडणघडण होत असताना येणारी नेणीव विद्यार्थी दशेत खूप घबाड मिळवून देते. त्याच पुंजीवर पुढचं आयुष्य व्यतीत करावे लागते. अशी पुंजी लेखकाला धुळे, लखनौ, दिल्ली आणि युरोपीय देशात शिक्षणानिमित्त वास्तव्यात मिळाली. ह्या शहरातील आलेल्या अनुभवांवर लेखकाचे वैचारिक विश्व समृद्ध झाले. ह्या मनस्वी प्रवासाचा अनुभव घ्यायचा असेल तर भुरा हे पुस्तक वाचलंच पाहिजे.
© भूषण वर्धेकर
३१ जानेवारी २०२४
भुकूम, पुणे
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा