ए हान की बडीव

ए हान की बडीव
दिसला की अडीव
ऐकत कसं न्हाई
डोस्क फोडून रडीव

लय उडायलाय त्यो
उतरव मारुन माज
करुन थोबाड काळं
ताकद आपली दाखीव

हाय आपली सत्ता
हुडकून काढू पत्ता
टग्यांची फौज आन
घुसून घरात हान

अडवून एसट्या फोड
टायर, पुतळे जाळून
युवा नेत्यांची घोडदौड
निषेधाची भाषणं झाडून

कर उपोषण मंडप टाकून
काढ मोर्चा ताफा काढून
विस्कटून चौकट गावगाड्याची
वेसण बांधून जातीपातीची

घाल शिव्या इन कॅमेरा
फुगवून छाती वाढीव दरारा
गुपचुप निसटुन हो बेपत्ता
होऊ दे मेडियात जांगडगुत्ता

कर गावबंदी लावून फ्लेक्स
सोम्यागोम्यांचे राखून स्टेक्स
जेसीबी चालवून बनीव मैदान
घेऊन सभा उडीव दाणादाण

हो सैरभैर ठिय्या मांडून
आदेश घेऊन पडद्यामागून
उठीव रान आरोप करून
होऊदे बबाल सगळीकडून

लपून छपून निरोप धाडून 
आण पोती दगडं भरून
कर हल्ला धोंडे फेकून
पोलिसांचं टकूर फोडून

टाकून पेट्रोल बाटली फोड
पेटवून टायर चौकात सोड
बोलव मेडिया काढ फोटो
बघून घेऊ आला तर स्यू मोटो

हायती आपलं सायेब खंबीर
म्हणलेत घेईल मी सांभाळून
विषयच करायचा लय गंभीर 
सगळे राह्यले पायजेल टरकून 


© भूषण वर्धेकर
१० फेब्रुवारी २०२४
पुणे 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मराठा आरक्षण आणि वास्तव

मोदीस्तोमाची दशकपूर्ती

विवेकवादी हतबलता - पूर्वार्ध