ज्याने त्याने फक्त झेंडेच गाडले

जे जे शोषितांसाठी लढले 
कामगारांसाठी हाल सोसले
लाल बावट्यांनी त्यांना उचलून धरले
विळा हातोड्याचे पताके फडकवले
ज्याने त्याने फक्त झेंडेच गाडले

जे जे वंचितांसाठी लढले
दुर्लक्षितांसाठी अतोनात झुरले
निळ्या पावट्यांनी त्यांना उचलून धरले
अशोक चक्रांचे पताके फडकवले
ज्याने त्याने फक्त झेंडेच गाडले

जे जे वर्चस्वासाठी लढले
फुटीरवाद्यांना घेऊन एकवटले
क्रांती धुरीणांनी त्यांना उचलून धरले
विजयी उत्सवाचे पताके फडकवले
ज्याने त्याने फक्त झेंडेच गाडले

जे जे स्वराज्यासाठी लढले
गुलामांना धर्माखाली बांधले
सत्तातुरांनी त्यांना डोक्यावर उचलून धरले
सुखवस्तूंनी स्वातंत्र्याचे पताके फडकवले
ज्याने त्याने फक्त झेंडेच गाडले

जे जे समाजासाठी लढले
ऐहिक कल्याणासाठी टिकले
चाणाक्षांनी बेरकीपणे त्यांना उचलून धरले
स्वतःच्या विचारांचे मुकुटमणी बनवले
ज्याने त्याने फक्त झेंडेच गाडले

जे सर्वांगीण विकासासाठी लढले
संधीसाधूंनी त्यांना मिरवले
ढोंगी क्रांतीचे बेमालूम प्रणेते बनवले
सत्ताधीश बनून सरंजामीत रमले
ज्याने त्याने फक्त झेंडेच गाडले

जे जे उपेक्षितांसाठी लढले
रोजीरोटीसाठी रक्त आटवले
समाजसेवेच्या आड धर्मांतरीत गुलाम केले
अल्पसंख्यांक म्हणून राजाश्रित झाले
ज्याने त्याने फक्त झेंडेच गाडले

जे जे ऐक्यासाठी लढले
एकात्मकेच्या हक्कासाठी घुसमटले
मुलभूत गरजांसाठी अखेरच्या श्वासापर्यंत भिडले
ते जयंती, पुण्यतिथीतच अडकले
ज्याने त्याने फक्त झेंडेच गाडले
____________________
भूषण वर्धेकर
२८ नोव्हेंबर २०२१
पुणे
____________________


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गडबडलेलं राजकारण

विवेकवादी हतबलता - पूर्वार्ध

उठ भक्ता जागा हो