सरदार उधम: एकमेव संकीर्ण स्वातंत्र्यपूर्व एकाकी लढा
ऑक्टोबर महिन्याच्या उत्तरार्धात ओटीटी प्लॅटफॉर्म प्रदर्शित झालेला सरदार उधम हा चित्रपट नक्कीच न चुकवण्यासारखा आहे. शुजित सरकारचे दिग्दर्शन आणि विकी कौशलचा अभिनय अफाट आहे. एकूण स्वातंत्र्य मिळण्याआधीची पार्श्वभूमी ज्या पद्धतीने उभी केलीय त्याला तोड नाही. हा नसिनेमा आजच्या काळात महत्त्वाचे विधान करतो. सध्याचा काळ हा श्रेयवादासाठी आसुसलेल्या पक्षांचा, त्यांच्या बगलबच्च्यांचा आहे. हा सिनेमा भारतीय स्वातंत्र्य लढ्याची जी गोष्ट सांगतो ती फार महत्त्वाची आहे. सरदार उधम यांचा एकाकी लढा, सूडाची भावना आणि त्यामागची कारणमीमांसा जबरदस्त कन्व्हीक्शनने मांडलेली आहे. १९४७ पर्यंतचा स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास निरखून बघायचा असेल तर एलन ह्यूम ने जे कारनामे केलेत त्यापासून सुरुवात करायला पाहिजे. १८५७ चा लढा आणि नंतरचे झालेले लढे. १९४२ च्या लढ्याला असलेले वेगवेगळे कंगोरे समजून घेणे गरजेचं आहे. त्यासाठी त्याकाळच्या कम्युनिस्ट नेत्यांची भुमिका अभ्यासणे फार महत्त्वाचे आहे. समांतर पणे बाबासाहेब आंबेडकर यांचा संघर्ष पण महत्त्वाचा आहे. नंतर टिळकांच्या आधीचे लढे टिळकांच्या नंतरचे लढे फार महत्त्वाचे आहेत. आणि हो सोबत अमेरिकन आणि इंग्रज लोकांनी भारताबद्दल त्याकाळात जी निरिक्षणे नोंदवली आहेत ती पण विशेष उल्लेखनीय. नंतर तत्कालीन ठिकठिकाणच्या राजघराण्यातील लोकांनी काय काय उपद्व्याप केले ते पण तितकेच महत्त्वाचे. नंतर क्रांतिकारक लोकांची ठिकठिकाणी झालेली सशस्त्र आंदोलने आणि तत्कालीन कॉंग्रेसची आंदोलने यावर कटाक्ष टाकला की खरा इतिहास आणि लिहिला गेलेला कोणता आहे हे लक्षात येते.
क्रांतिकारक लढ्याचा उल्लेख केलाय मी, त्यात सरसकटपणे सगळेच क्रांतिकारक गृहित धरले आहेत. यापैकीच एक उधम सिंग यांचा एकाकी लढा म्हणजे सरदार उधम चित्रपट. आजवर आपला स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास हा शालेय अभ्यासक्रमात कॉंग्रेस प्रणित सरकारांनी नेंहरू गांधी या विचारावर आधारित लिहिला आहे. कारण कॉंग्रेसने तशी खंबीर व्यवस्था उभी केली होती. मुळात क्रांतिकारक लोकांच्या वेगवेगळ्या ठिकाणी संघटना कार्यरत होत्या. त्यात पंजाब, बंगाल आणि महाराष्ट्र आघाडीवर होते. दक्षिणेकडे पण तुरळक क्रांतिकारी घटना होत होत्या मात्र इतिहासात त्यांचा उल्लेख प्रचलित लढ्यासारखा नोंदवला गेला नाही. बंगाली बहुतेक डाव्या विचारसरणीचा पुरस्कार करणारे होते. कारण तत्कालीन दशकांत जागतिक घटना पण तशाच होत होत्या. पहिल्या महायुद्धानंतर, दुसऱ्या महायुद्धानंतर, रशियन क्रांतीनंतर, युरोपीय खंडातील बदल यांचा आपल्या देशात कसे परिणाम झाले याबद्दल इतिहास फारसा शिकवला नाही. मात्र स्वातंत्र्य लढ्यात तत्कालीन क्रांतिकारक लोकांनी ठिकठिकाणी जे जे उठाव केले मग ते देशात असोत वा परदेशात ते फार महत्त्वाचे आहेत. त्यांच्यामुळे स्वातंत्र्य प्राप्तीसाठी फक्त संघटनाच नाही तर कित्येक व्यक्ती अग्रभागी होत्या हे जाणवते. त्यापैकीच उधम सिंग यांची एकाकी लढत पाहून विशेषतः तत्कालीन कम्युनिस्ट चळवळी महत्त्वाच्या कशा होत्या हे समजते.
सशस्त्र क्रांतिकारकांचे पहिले पर्व, दुसरे पर्व वगैरे वाचण्यासारखे आहे. हे सगळे समांतरपणे चालू असताना परदेशात (प्रामुख्याने इंग्लंड, लंडन, जपान व रशिया) जाऊन तिथून जे जे कार्यरत होते त्यांना साईडलाईन केले गेले मुख्य ऐतिहासिक प्रवाहातून असे मला नेहमीच जाणवते. तसंही गेल्या काही वर्षांत सातत्याने सत्ताधारी मातृसंघटनेच्या भारताच्या स्वातंत्र्याच्या चळवळीतील योगदानाबद्दल बिनकामी चर्चा होत असते. त्यानंतर गांधी नेहरु वगैरेंची व्यवस्था होती म्हणूनच स्वातंत्र्य मिळाले हे वारंवार पटवून सांगितले जाते. या दोहोंच्या संघर्षात खऱ्याखुऱ्या लोकांच्या चळवळी म्हणजे तत्कालीन कम्युनिस्ट, तत्कालीन शोषित, दलित यांचा संघर्ष नेहमीच मागे राहिलाय असे वाटते.
माझ्या मते भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा जर खरा पारदर्शी कालखंड पडताळून पहायचे असेल तर १९४० नंतरचा लढा, १९२० ते ४० चा लढा, १९२० च्या आधीचे लढे आणि सर्वात महत्त्वाचे १८५७ चा लढा इत्यादी कालखंड खूप महत्त्वाचे आहेत. त्यातला सगळ्यात जास्त हॅपनिंग कालखंड म्हणजे टिळकांच्या मृत्यूनंतर ते स्वातंत्र्य बहाल करण्यापर्यंतचा. हे सगळे लिहिण्याचे मुख्य कारण सरदार उधम चित्रपट पाहताना कैक क्रांतिकारक लोकांना आणि त्यांच्या चळवळींना आपण इतिहासात कमी प्रमाणात प्रोजेक्ट केलेय असे दिसते. खरा इतिहास बायस्ड पद्धतीने कोणी लिहिला आहे कसा लिहिला आहे का लिहिला आहे वगैरेंची नंतर चिरफाड करता येईल. मात्र खराखुरा हार्डकोअर कम्युनिझम समजून घ्यायचा असेल तर हा सिनेमा फार महत्त्वाचे भाष्य करतो. शुजित सरकारने फार बारीकसारीक गोष्टी दाखवल्या आहेत. त्यामुळे चित्रपट कोठेही कंटाळवाणा वाटत नाही. उगाचंच शब्दबंबाळ संवाद, देशप्रेमाचे ओतप्रोत भरलेले तेजपुंज डोस वगैरे हा चित्रपट अजिबात देत नाही. एक संकीर्ण लढाई एकाकीपणे लढताना सरदार उधम सिंग जिवंत उभा राहतो. चित्रपटात तुरळक घटना १९१९ ते १९४० मधील अशा पद्धतीने दाखवल्या आहेत की चित्रपटाची पटकथा कुठेही सैल होत नाही. उधम सिंग यांनी जालियनवाला बाग हत्याकांडाचा बदला म्हणून मायकेल ओडवायरची हत्या लंडनमध्ये केली. या एका वाक्यात उधम सिंग यांचे कार्य मावणार नाही. त्यासाठी त्यांना किती दिव्यांतून जावे लागले. २१ वर्षे एकच गोष्ट करण्यासाठी जे जे केले ते या चित्रपटात पाहण्यासारखे आहे. मला विशेष कौतुक या गोष्टीचे वाटते की हा चित्रपट करताना दिग्दर्शकाने फारच मुद्देसूद आणि पाल्हाळ होणार नाही असे सिनेमॅटिक प्रसंग दाखवलेत. असे पिरियड फिल्म्स करताना थोडीशी जरी स्क्रिप्ट इकडेतिकडे झुकली की चित्रपट गडगडतो. तत्कालीन कम्युनिस्ट विचारधारा जबरदस्त साकारली आहे. तसंही कम्युनिस्ट विचारधारेचे गेल्या शतकात भारतीय भूखंडावर वेगवेगळे पल्ले आणि प्रवाह राहिलेले आहेत. हल्लीचे कम्युनिस्ट, लिबलर वगैरे मंडळी हे नक्षलप्रेमी असतात असा एक मोठा समज पसरवलेला आहे. १९४० पर्यंत भारतातील कम्युनिस्ट एक दिलाने लढणारा समुह आणि विचारधारा होती. १९४२ च्या लढ्याला तत्कालीन कम्युनिस्ट चळवळीचे आणि संघाचे समर्थन नव्हते. का नव्हते हा वेगळ्या लेखाचा विषय आहे. १९६२ नंतरचा कम्युनिस्ट विचारप्रवाह भारतात वेगळ्या खाचखळग्यातून जात होता. ८० नंतरचा एकूणच कम्युनिझम पतनाकडे वाटचालीस आगेकूच करत होता. ९० नंतर जागतिकीकरण आले आहे सगळ्या विचारप्रवाहांना उधळून लावले. सरदार उधम चित्रपटात जो कम्युनिस्ट लोकांचा कालावधी दाखवतो तो प्रखर राष्ट्रवादी, वैचारिक रित्या परिपक्व व जहाल पद्धतीत विश्वास असणारा होता.
पहिल्या महायुद्धानंतरचा, दुसऱ्या महायुद्धाच्या आधीचा काळ आणि भारतीय क्रांतिकारक लोकांच्या छुप्या पद्धतीने लढण्याच्या कृती या गोष्टींनी ह्या चित्रपटाचा गाभा तयार झालेला आहे. यात सरदार उधम सिंग यांची कृती आणि त्यानंतर त्यांच्यावर झालेला खटला, त्यांना सहन करावा लागलेला छळ, हत्या करण्यामागील जालियनवाला बाग हत्याकांडाचा त्यांच्या मनावर झालेला तीव्र आघात. हे सगळं जस्टीफायेबल आहे. या चित्रपटात भगतसिंगांशी निगडित काही प्रसंग ज्याप्रमाणे दाखवले गेले आहेत त्याला तोड नाही. साधा, सरळ आणि सुटसुटीत साम्यवादी विचार कसा असतो हे खूपच भारी दाखवलंय या सिनेमात. एखाद्या ग्राउंड रिएलिटीशी तडफेने जाऊन भिडण्याची तलफ काय असते हे हार्डकोअर कम्युनिस्टच समजू शकतो. तिथे जातपातधर्म याचा मागमूसही नसतो. विचार पक्का आणि धडक कृती ही साम्यवादी आकलनाची मुख्य शक्तीस्थळे आहेत. क्रांतिकारक आणि दहशतवादी यांच्यातला सडेतोड फरक चित्रपटात भगतसिंगांनी सांगितलेला आहे. तो सीन माझ्यामते अव्वल दर्जाचा आहे जो आजच्या काळातील तथाकथित भोंदू, स्वयंघोषित राष्ट्रभक्त आणि ढोंगी, लिबरल लोकांना दाखवण्या लायक आहे. आजचा काळ हा एकूण विस्कळीत वैचारिक कल्लोळाचा आहे. अशा काळात सरदार उधम सारखा चित्रपट येतो हेच खूप महत्त्वाचे आहे. कारण सध्याच्या काळात राष्ट्रभक्ती ही पाकिस्तान मुर्दाबाद आणि हिंदुस्थान झिंदाबाद भोवतीच फिरते. स्वातंत्र्यपूर्व काळात क्रांतिकारी जहाल व मवाळ गटात विभागलेले होते वगैरे पुस्तकी विधाने घोकंपट्टी साठी ठिक. मात्र जहाल गटाकडे जो मोटिव्ह होता तो किती क्रिस्टल क्लिअर होता आणि त्याचा जनजागृती साठी कसा वापर करायचा याचे 'टूलकीट' प्रबोधनात्मक होते. प्रक्षोभक नव्हते. नुसतं स्वातंत्र्य मिळवणे हा हेतू नसून लोकांना चांगले सुशासन, तळागाळापर्यंत विखुरलेल्या घटकांना सोबत घेऊन राष्ट्रबांधणी करणे हे फार महत्त्वाचे 'टास्क' जहाल गटाकडे होते. हा चित्रपट अशा घटकांचा जीवनपट उलगडतो.
मन सुन्न करणाऱ्या हिंसक घटना आपल्या देशात खूप घडल्या आहेत. त्यापैकीच जालियनवाला बाग हत्याकांड. चित्रपटातील शेवटची काही मिनिटे केवळ त्या रात्री काय घडले आणि त्याचा विशीतल्या तरूणावर -उधम सिंग- झालेला परिणाम यासाठीच राखीव. रक्तरंजित दाहकता जी दाखवलीय त्यावरून त्याकाळी काय काय सहन करावे लागले असेल त्याची प्रचिती येते. इंग्रज लोकांची प्रशासनावर असलेली मजबूत पकड आणि प्रशासकीय कर्तव्यदक्ष कामकाज रूटिन याचाही हलकासा कानोसा या चित्रपटाने घेतलाय. शेवटचा सीन चित्रपटातील 'वरचा सा' वगैरे म्हणतात तसा आहे. अभिनयापेक्षा दिग्दर्शकीय कसब चित्रपटात खूप आहे. तसही चित्रपट हे दिग्दर्शकाचे माध्यम अभिनेत्याचे नाटक हे माध्यम व साहित्यनिर्मिती हा लेखकाचा प्रांत. ह्या चित्रपटाची विशेषकरून महत्त्वाची उल्लेखनीय बाजू म्हणजे तत्कालीन काळ उभा करणं. ते लयभारी जमलंय. तंत्रज्ञ कलाकारांनी जे उभे केलेय त्याला दहा पैकी दहा मार्क. मोजकेच पण लक्षात राहणारे संवाद.
"... जंग बडी बेईमान चीज़ है। आपको लगता है आप जीतते हो । कोई नही जीतता, नोबडी विन्स, ओन्ली हेटरेड विन्स।" हा संवाद मला विशेष आवडला.
- भूषण वर्धेकर, पुणे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा