जय भीम - एक सुन्न करणारं वास्तव

जय भीम - एक सुन्न करणारं वास्तव

दिवाळीत अमेझॉन प्राईमवर प्रदर्शित झालेला जय भीम चित्रपट म्हणजे व्यवस्थेत बऱ्याचशा ठिकाणी होणाऱ्या अमानुष छळाचं प्रातिनिधीक  भयाण वास्तव आहे. चित्रपटासारखे प्रभावशाली माध्यम संवेदनशील घटना लोकांसमोर मांडण्याचा एक यशस्वी प्रयोग आणि पायंडा कैक वर्षापासून चालत आलेला. सध्याच्या समाजमाध्यमांच्या जगात असे चित्रपट आले की चर्चा होतात, वेगवेगळे लेखनप्रपंच केले जातात व्यवस्थेतील त्रुटींवर. मग नवा काहीतरी मुद्दा येतो आणि पुन्हा ज्या विषयांवर घटनेनुसार बदल व्हायला हवेत त्या गोष्टी बासनात गुंडाळल्या जातात. समस्या जैसे थे राहतात आणि बिनकामी चर्चा, आरोप, प्रत्यारोप, तर्क, वितर्क आणि राजकीय लबाड आश्वासने निरंतर चालूच राहतात. समस्येवर तोडगा काढण्यापेक्षा इतर गोष्टी व्यवस्थेत रेंगाळत राहतात. जय भीम मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तामिळनाडूतील तत्कालीन दुर्लक्षित आदिवासींच्या होणाऱ्या छळाची गोष्ट सांगितली आहे. चित्रपट बघितल्यावर मन सुन्न होते. निष्पाप लोकांचा झालेला हिंसक छळ कोणालाही सुन्न करतोच. मात्र तेच निष्पाप लोक जातपातधर्माच्या चौकटीत अडकवले की व्यवस्थेचे खरे स्वरूप उघडकीस येते. या चित्रपटात दाखवला गेलेला मानवाधिकाराचा लढा फारच प्रामाणिकपणे दाखवलाय. जो आजच्या सोकॉल्ड सोशलमेडियाच्या जमान्यात सर्वसामान्य लोकांपर्यंत जाणे गरजेचा आहे. ढोंगी मानवतावादी लोकांमुळे जनसामान्यांना अस्सल खराखुरा मानवतावाद काय आहे कशासाठी हे समजणे गरजेचे आहे. कित्येक उच्चभ्रू लोकांना मुळात शोषितांचे रोजच्या जगण्याचे प्रश्न कसे आहेत हे समजत नाहीत. अशा लोकांच्या हातात जेव्हा सत्तेची आणि प्रशासनाची सुत्रे जातात तेव्हा हीच मंडळी व्यवस्थेला स्वार्थापोटी हवे तसे वाकवतात. कारण बहुतांश सुखवस्तू उच्चभ्रू लोकांमध्ये शोषित वंचित लोकांबद्दल एक वेगळाच तिटकारा असतो. हा चित्रपट व्यवस्था कशी मोडून तोडून राबवली जाते याच्यावर फार तीव्रतेने भाष्य करतो. मानवी पातळीवर रुक्ष करणारा अनुभव आहे.


मानवाधिकाराचा लढा हा नेहमीच राग-लोभ-रोषाच्या खाचखळग्यातून जातो. सध्याच्या काळात मानवाधिकाराचा पुरस्कार करणाऱ्या लोकांना, कार्यकर्त्यांना एका बाधित नजरेने बघीतले जाते. कारण एकांगी पद्धतीने मानवधिकार प्रोजेक्ट केला जातो. वंचित, शोषित समुहाला व्यवस्था ही नेहमीच दुय्यम नजरेने बघत आली आहे. त्यांच्यासाठी लढणारे आणि धडपडणारे पारदर्शकपणे समाजात नेहमी चुकीच्या पद्धतीने पोट्रेट केले जातात. उदाहरणार्थ अतिरेक्यांना फाशी नको म्हणून लढणारे मानवाधिकार कार्यकर्ते दाखवले जातात.  कैक चित्रपटात मानवाधिकार कार्यकर्ते लोकांना सराईत गुन्हेगार वगैरेंचा पुळका असतो हे दाखवले जाते. चकमकीत जखमी होणाऱ्या पोलिसांच्या बाबतीत त्यांची भूमिका ही नेहमीच कुचकामी दाखवली गेली. निष्पाप लोकांच्या होणाऱ्या छळाला कैक मानवाधिकार चळवळींमुळे वाचा फोडली आहे. कितीतरी अमानुष छळाची प्रकरणे अशा कार्यकर्त्यांमुळे उघडकीस आली. निरपराध लोकांना न्याय मिळाला. मात्र अशी प्रकरणे ही खूप कमी लोकांना माहिती असतात. मेडिया, चित्रपट वगैरे माध्यामातून एखाद्याच्या प्रतिमेचे रेखाटन बरबटलेले झाले की झाले. त्याची शहानिशा सहसा कोणी करत नाही. वा तशी एक नवी व्यवस्था उदयास आली जी कायदा सुव्यवस्था, न्यायव्यवस्था वगैरेंच्या आधीच एखाद्या वर शिक्कामोर्तब करते. आजकाल अशा ठशीव भूमिका घेणे अगदी व्यक्तीगत पातळीपर्यंत पोहोचल्या आहेत. जय भीम मधला मानवी हक्काचा लढा फार अप्रतिम दाखवलाय. सगळ्याच कलाकारांनी अभिनय उत्तम केलाय. सिनेमातील काही दृश्ये हिंसक जरी असली तरी ते एक सिंबॉलिक रिप्रेझेंटेशन आहे. तसंही दक्षिणेत तमिळनाडूतील चित्रपटात जातिव्यवस्था विरुद्धच्या लढ्याची तीव्रता भडकपणे रंगवली जाते. त्या त्या दिग्दर्शकाची आणि सिनेमाची ती भाषा असते. धनुषच्या असूरन या तमिळ आणि व्यंकटेशच्या नारप्पा या तेलगु चित्रपटात पण अशीच लढाई रक्तरंजित दाखवली गेलीय. तिकडच्या पब्लिकला अशा सिनेमांचे टेकिंग अपील करत असावे. जसा कोरियन सिनेमात रक्तपात दाखवून एखाद्या व्यवस्थेविरुद्ध असलेली चीड सिंबॉलिक पद्धतीने दाखवलेली असते. तशीच ही एक सिनेमाची भाषा आहे. बेधडकपणे दाखवलेली हिंसा ह्यूमन लेवल वरच्या इमोशन्स जास्त रिक्रियेट करते वगैरे नव्या सिनेमाची नवी भाषा असावी. हृदयद्रावक, मन पिळवटून टाकणारे वगैरे दृश्ये ही अशा सिनेमाची परमोच्च बिंदू असतात. त्यात जय भीम अव्वल आहे. एखादा सिनेमा पाहून वा पुस्तक वाचून जर तुमचे मन खूप आनंदी होत असेल वा दुःखी होत असेल तर ते त्या दिग्दर्शकाचे वा लेखकाचे खरेखुरे कौशल्य आहे. त्याचा विचार, आशय आणि विषय लोकांपर्यंत पोचवण्याचे मोटिव्ह सिध्द झाले असे आपण म्हणू शकतो. अर्थातच संवेदनशील विषय हाताळताना फार बारकाईने मांडणी करावी लागते. कोणाच्यातरी प्रभावाखाली येउन केवळ अतिरंजित मेलोड्रामा करून काहीही उपयोग नसतो. 


जय भीम वर कौतुकाचा वर्षाव करणारे पण आहेत आणि आक्षेप घेणारे पण. मुळात चित्रपटाच्या नायकाला कम्युनिस्ट चळवळींशी निगडित दाखवलेय. मग आंबेडकर, पेरियार, मार्क्सच्या प्रतिमा कर्मधर्मसंयोगाने चित्रपटात डोकावतात. विळ्या-कोयत्याचा लाल झेंडा दिसला की उगाचंच काही लोकांना कसनुसं होतं. मग आक्षेप घेतले जातात. कारण लाल झेंडा हा नक्सली लोकांना सहानुभूती वगैरेसाठी आहे असा भलताच नवा प्रवाह सुरु झालाय. मग अर्बन नक्सल वगैरे बिरूदावली रुढ व्हायला लागली. मुळात आजचे साम्यवादी कार्यकर्ते आणि खरेखुरे साम्यवादी कार्यकर्ते यात बराच फरक आहे. तसंही लाल, निळा, हिरवा आणि भगव्या रंगाच्या झेंड्याखाली ज्याची त्याची मतपेढी बांधून ठेवलेली आहे. मुळात शोषित, वंचित आणि दलितांच्या चळवळी ह्या लाखो असंघटित लोकांच्या मूलभूत गरजा, हक्कासाठी उभ्या राहिल्या त्या त्या वेळी. जय भीम म्हणजे आंबेडकरी चळवळीचा आवाज असा काहीसा समज काही दशके चालू आहे. तसे खरे पाहता, अस्सल आंबेडकरी विचारधारा ही नेहमीच डाव्यांच्या, उजव्यांच्या आणि वर्चस्वतावादी विचारांच्या विरोधात असते. ज्यांनी आंबेडकरांचे साहित्य वाचलेय त्यांना नक्कीच माहिती आहे आंबेडकर यांचे कम्युनिस्ट लोकांबाबतचे प्रामाणिक मत काय आहे ते. हे कम्युनिस्ट फार चाणाक्ष दक्षिणेकडे पेरियार यांना जवळ करतात आति इतरत्र आंबेडकरांना अंतर देतात. आंबेडकर आणि पेरियार तसे समकालीन सुधारणावादी. शोषितांसाठी त्यांनी आयुष्य वेचले. मात्र व्यवस्थेतील धुरणींनी सगळे महापुरुष आणि समाजसुधारक जातपातधर्माच्या चौकटीत अडकवले. दलित चळवळींशी निगडीत कार्यकर्ते कमी आणि गट-तट जास्त असतात. अशा गटातटातील नेत्यांची इच्छाधारी तऱ्हा निराळ्या. कम्युनिस्ट पक्षात जमिनीवर उतरून लोकांच्या प्रश्नांवर, समस्यांवर आंदोलने करणारे अभ्यासू कार्यकर्ते आहेत. मात्र व्यवस्था बदलण्यासाठी लढतात आणि व्यवस्थेचाच भाग होऊन जातात. जय भीम चित्रपटाच्या नायकाची पार्श्वभूमी ही अशीच लढवय्याची आहे. जो प्रतिभावान, स्वाभिमानी आणि प्रामाणिक दाखवलाय. जय भीम चित्रपटातून लोकांच्या जगण्या, मरण्याचा प्रश्न कीती दाहक असू शकतो याची जाणीव प्रेक्षकांना होते. अशा चित्रपटातून व्यवस्थेवर एखादे स्टेटमेंट करण्यासाठी किंवा त्रुटी दाखवण्यासाठी फार समतोल राखावा लागतो. तकलादू भूमिका घेऊन चालत नाही. भेदक सत्य आणि दाहक वास्तव लोकांपर्यंत कसे पोहोचते त्यावर अशा चित्रपटाचे यशापयश अवलंबून असते. संवेदनशील मनाला नक्कीच प्रक्षुब्ध करणारा आणि व्यवस्थेबद्दल डोक्यात तिडिक जाणारा हा चित्रपट आहे.


जय भीम वर आक्षेप घेऊन किंवा कौतुक करुन अमुक-तमुक वर ओरखाडे काढणारे किंवा गोडवे गाणारे हे काही राजकीय पक्षाशी निगडीत खऱ्या अर्थाने चमकोगिरी टाईप लोक आहेत. भूतकाळातील मानवी हिंसक घटना धुंडाळून आणि जी घटना सेलेबल वाटेल तिला उचलून अत्यंत प्रोफेशनल पद्धतीने नव्या चित्रपटाच्या माध्यमातून लोकांसमोर मांडून जर कोणी करत असेल तर हे इथल्या दुभंगलेल्या समाजव्यवस्थेत फार घातक ठरेल. उदाहरणार्थ तीन दशकांपूर्वी घडलेल्या काश्मीरमधील पंडीत लोकांवर झालेल्या अन्यायावर किंवा गांधीहत्येनंतर ब्राह्मणांनी भोगलेल्या छळावर जर अशा प्रकारचा चित्रपट दाखवला गेला तर लागलीच आक्षेप घेणारे आणि कौतुक करणारे आपापल्या भुमिका बदलतील. वर उल्लेखलेल्या घटना सध्याच्या सत्ताधारी समर्थकांना आपल्याश्या वाटतात. तसाच प्रकार २००२ साली झालेल्या गुजरात दंगली किंवा गोध्रा हत्याकांड यांच्यावरही अशा पद्धतीने सिनेमे बनवले जाऊ शकतात. कारण निष्पाप लोकांच्या जगण्या मरण्याच्या घटना आपल्या देशात कैक वेळा घडलेल्या आहेत. वरील उदाहरणे केवळ प्रातिनिधिक म्हणून घेतलेली आहेत. कारण प्रत्येक हिंसक घटनेतील पिडित समाजाच्या मागे एक नवी अप्पलपोटी व्यवस्था उभी राहिली आहे. महाराष्ट्रात तर दलितांच्या छळाच्या घटना बघितल्या तर कीतीतरी आहेत. यावर महाराष्ट्रातले स्वयंघोषित नवसंविधानवादी ब्रिगेडी काही बोलत नाहीत. कारण पोटजिविकेसाठी त्यांना ब्राह्मणांनी बहुजणांवर खूप शतके अत्याचार केला वगैरे शिकवलेले असते. त्यामुळे महाराष्ट्रातील राजकारणी लोक जे कोणी आक्षेप वा कौतुक करणारे आहेत ते ढोंगी आहेत. भविष्यात जो तो ज्याला हवी ती घटना घेऊन कोणी प्रेक्षकांच्या काळजाला भिडणारा वगैरे सिनेमा करेल. तेव्हा आताचे कौतुक करणारे आणि आक्षेप घेणारे बुजगावणे काय करतील? एक देश एक संविधान म्हणायचे आणि सरंजामशाही अबाधित ठेवायची असा परिपाठ कित्येक दशके देशात चालत आलेला आहे. जय भीम हा चित्रपट ज्या घटनेवर बेतलेला आहे ती केवळ प्रातिनिधिक गोष्ट आहे. बिघडलेली आणि सोयीनुसार वाकवलेल्या व्यवस्थेबद्दल हा सिनेमा आहे. आजवर भारतात कैक समाजसुधारकांनी शोषितांसाठी जे जे केले ते अत्यंत अडचणींना तोंड देऊन. व्यवस्था बदलणे साधीसुधी गोष्ट नाही. त्यासाठी सोशल अवेअरनेस फार महत्त्वाचा. केवळ प्रतिमापुजन व प्रतिमाहनन करून समस्या सुटत नाहीत. त्यासाठी तडीस नेण्याची समर्पित प्रवृत्ती गरजेची. अशी प्रवृत्ती असलेले कार्यकर्ते आपल्या देशात नेहमीच दुर्लक्षित राहतात. कोणी कोणाला मोठे करावे कोणाला लहान ठरवावे हा ज्याच्या त्याच्या श्रद्धेच्या विषय. मात्र जय भीम सारखे संवेदनशील चित्रपट जेव्हा येतात तेव्हा व्यवस्थेतील त्रुटी कायमच वाकुल्या दाखवत राहतात. 


आजच्या काळात अनेक वेळा एखाद्या जातीतील लोकांना हॅबिच्युअल चोरी करणारे असतात असे बोलले जाते. किंवा अमुक तमुक जातीतल्या लोकांचा जन्मच तमुक अमुक कारणांसाठी झालाय अशी ठशीव समजुत कित्येक पढतमुर्खांची असते. सोशलमेडियाच्या माध्यमातून जे राजकीय पार्श्वभूमी असलेले लोक जेव्हा जय भीम सिनेमाबद्दल कौतुक करताना संविधानाच्या बाता मारतात तेव्हा हसू येते. कारण आजपर्यंत आपल्या देशात प्रत्येक विरोधकांना सत्ताधारी हे संविधानाचा खूण करणारेच दिसतात. प्रत्यक्षात वेळोवेळी ज्याने त्याने सत्तेत येऊन संविधानाची मोडतोड केलेली आहे. कारण अशी गळचेपी केल्याशिवाय सत्ता राबवता येत नाही. मग ही प्रवृत्ती देशातल्या प्रत्येक प्रशासकीय व्यवस्थेत मुरलेली आहे. न्यायव्यवस्था आणि पोलिस प्रशासन ही दोन प्रमुख टार्गेट जय भीमच्या निमित्ताने लोकांसमोर येतात. प्रत्येकाला आपापली प्रतिमा, पत जपण्यासाठी काय काय करावे लागते मग ते कसे जस्टीफायेबल आहे हे दाखवायचे असते असे सगळे या सिनेमात चित्रित केलेले आहे. असा एखाददुसरा सिनेमा सामाजिक क्रांती करू शकत नाही मात्र लोकांपर्यंत प्रामाणिक विषय पोचवू शकतो. असे सिनेमे करताना तोल ढासळू नये हे दिग्दर्शकाने पहिल्यापासूनच ठरवलेले आहे असे समजते. कारण सिनेमात व्यवस्था कशी कचकड्यासारखी वापरता येते हे स्पष्ट पणे कसलीही भीडभाड न बाळगता दाखवले आहे. सिनेमाची स्टोरी टेलिंग मेथड अजिबात कंटाळवाणी वाटत नाही. यासाठी पात्रांचा अभिनय मेलोड्रामा न होता संयत वगैरे आपसूकच झाला. बरेचसे संवाद बोल्ड आणि विचार करायला लावणारे आहेत. तंत्रज्ञानाच्या मदतीने बॅकग्राऊंड स्कोअर चा प्रभावी वापर करून प्रेक्षकांना खिळवून ठेवायला सिनेमा यशस्वी ठरलाय.


या सिनेमाच्या निमित्ताने हल्ली समाजमाध्यमांच्या वॉलवर बरेच चांगले वाईट सिनेमाबद्दल लिहिले गेलेय. काहींना जय भीम हा ट्रेडमार्क आहे अमुकतमुक चळवळींचा वगैरे असा साक्षात्कार झालाय. एक दोन महाभागांनी तर असे चित्रपट सहानुभूती दाखवण्यासाठी केलेले खटाटोप असतात असे अप्रत्यक्षपणे जाहिर केलेय. मुळात जे लोक असे विषय रिलेट करू शकतात अशांनाच हा सिनेमा थेट भिडतो. कित्येकांचे आयुष्य बोरातल्या आळीसारखे असते. बाहेरच्या जगाची कसलीही जाणीव नसते. अशा दिवट्यांनी जय भीम सिनेमा अवश्य बघावा. त्यामुळे शोषित, वंचितांच्या सामाजिक समस्यांचे गांभीर्य समजेल. 

- भूषण वर्धेकर, पुणे
नोव्हेंबर २०२१

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मराठा आरक्षण आणि वास्तव

मोदीस्तोमाची दशकपूर्ती

विवेकवादी हतबलता - पूर्वार्ध