समाजस्वास्थ्य

समाजस्वास्थ्य

यूट्यूबवर उपलब्ध असलेले समाजस्वास्थ्य नाटक नुकतेच पाहिले. अजित दळवी लिखित आणि अतुल पेठे दिग्दर्शित "समाजस्वास्थ्य" नाटक हे केवळ र. धो. कर्वे यांच्या कारकिर्दीतील तत्कालीन काळात त्यांच्यावर दाखल केलेल्या महत्वाच्या खटल्यांवर प्रकाश टाकणारे आहे. नाटकाची संहिता ही केवळ रधोंवर दाखल केलेले खटले आणि त्या काळातले लढवले गेलेले कोर्टातील युक्तिवाद यावर आधारित असल्याने रधोंची सामाजिक प्रश्नांवर असलेली तळमळ दिसून येते. सुधारककार आगरकरांनी बुद्धिप्रामाण्यवादी, विवेकवादी, विज्ञाननिष्ठ दृष्टीकोनातूनसमाज परिवर्तनाची जी मुहूर्तमेढ रोवली त्याचीच कास रधोंनी सच्चेपणाने शेवटपर्यंत धरली. स्वखर्चाने समाजस्वास्थ्य सारखे आरोग्य विषयक नियतकालिक चालवत असताना त्यात छापून येणाऱ्या लेखांवर, वाचकांनी विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तरावर, जाहिरातीतील मजकुरांवर आक्षेप घेऊन तत्कालीन रूढी-परंपरावादी लोकांनी त्यांच्यावर खटले भरले. अश्लीलतेचा ठपका ठेवला गेला. लैंगिक स्वातंत्र्याबद्दल त्यांचे विचार काळाच्या खूप पुढचे होते ह्याची जाणीव  नाटक पाहताना पदोपदी होते.

महत्वाचे म्हणजे त्यांच्यावर दाखल झालेल्या दुसऱ्या खटल्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी वकिली करून रधोंची बाजू सार्थपणे कोर्टात मांडली. ह्या घटनेशी कालसुसंगत नाटकातील प्रसंगामुळे आंबेडकरांचा सामाजिक सुधारण्यासाठी विचारस्वातंत्र्य आणि लैंगिकस्वातंत्र्याबद्दल असलेला प्रगल्भ दृष्टिकोन प्रेक्षकांना नक्कीच सुखावून जातो. आंबेडकर आणि रधोंच्या भेटीचा आणि त्यांच्यांतील चर्चेचा एक प्रसंग फारच तात्विक आणि समर्पक आहे. डॉ. बाबासाहेबांनी चर्चेत मांडलेला विचार हा खूप महत्वाचा संदेश देतो. त्यांची वैचारिक बैठक किती प्रगल्भ होती आणि सध्याच्या काळातही लागू होते हे समजते. या चर्चेत बाबासाहेबांनी आणि रधोंनी व्यक्त केलेले विचार हे प्रेक्षकांना तर्कशुद्ध विचारांची समाजाला गरज का आहे याची जाणीव करुन देतात. रधोंवर दाखल झालेला दुसरा खटला डॉ. बाबासाहेब लढले. हा केवळ एक प्रसंग जरी असला तरी बाबासाहेबांची ठाशीव वैचारिक भूमिका ही स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळात किती अग्रक्रमी होती याची जाणीव नाटक पाहिल्यावर होतेच होते. बहुआयामी बाबासाहेब हे नेहमी जुनाट आणि परंपरागत पाळल्या जाणाऱ्या बेगडी प्रथांना तार्किकतेने कसा विरोध करायचे आणि आधुनिक विचारांच्या प्रवाहांना, व्यक्तींना खंबीरपणे कसा पाठींबा द्यायचे हे या नाट्यप्रसंगातून प्रतित होते. मुळात विचारवंतांनी मांडलेले तत्कालीन विचार आजही तंतोतंत लागू आहेत व त्यातील कंगोरे  वेगवेगळ्या पातळीवर किती महत्त्वाचे असतात याची पारख या नाटकामुळे नक्कीच होते.

लैंगिकशिक्षणाबाबतची रधोंची दूरदृष्टी आणि वैचारिक भूमिका आजच्या काळातही लागू पडते याचे समाजभान प्रेक्षकांना नक्कीच होते.  स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्यानंतरचा काळ या नाटकात दाखवल्याने तत्कालीन समाजातील वैचारिक आणि आरोग्यविषयक अवस्था स्पष्टपणे अधोरेखित होते. लैंगिकस्वातंत्र्य, मुक्त समागम, स्त्रीपुरुष नातेसंबंध, संततीनियमन व सामाजिक आरोग्य या ज्वलंत प्रश्नांवर रधोंची असलेली सडेतोड भूमिका नक्कीच कालातीत आहे. या नाटकामुळे रधोंचे आयुष्य हे एकूणच सामाजिक, वैचारिक संघर्षाचे होते याची जाणीव प्रेक्षकांना नक्कीच होते. अजित दळवींनी नाटकातील प्रसंग लिहिताना सामाजिक, ऐतिहासिक संदर्भ कालानुक्रमे येतील याची पुरेपूर काळजी घेतलीय. शिवाय पेठेंनी ते सादर केलेले कोर्टकचेऱ्यातील संवाद प्रेक्षकांना खिळवून ठेवतात. विचारप्रधान नाटक सादर करताना ते रटाळ होउ नये आणि रधोंची वैचारिक भूमिका प्रेक्षकांसमोर रोखठोकपणे मांडताना 'समाजस्वास्थ्य'मध्ये अतुल पेठेंच्या दिग्दर्शक आणि अभिनेता ह्या दोन्ही भूमिका आत्मभान जागृत करणाऱ्या आहेत. त्याकाळी रधोंनी मांडलेले विचार आजच्या काळातही तंतोतंत लागू पडतात. याची साक्ष हे नाटक नक्कीच देते. लेखकाने लिखाण करताना पठडीच्या बाहेर जाउन, काळाच्या पुढे जाउन लिहिले तरच ते लिखाण वा विचार कालातीत होतात. समाजसुधारण्याचा वसा घेतल्यावर सांप्रत समाजमान्यता असलेल्या चौकटीत लिहून विवेकवादी विचारप्रवाह तयार होत नाही. त्यासाठी बुरसटलेल्या रुढींना, प्रथांना, पिचलेल्या संस्कृती-सभ्यतेच्या अस्मितांना प्रखर विरोध तर्कशुद्ध पद्धतीनेच करावा लागतो. हेच यज्ञकर्म रधो समाजस्वास्थ्य या नियतकालिकाच्या माध्यमातून जनजागृतीसाठी करत होते. प्रभुत्ववादी सत्तास्थाने नेहमीच अशा सुधारणा करणाऱ्या व्यक्तींना, समुहांना, चळवळींना लक्ष्य करत असतात. प्रसंगी आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करून दबावाखाली आणण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करतात. बहुसंख्य वेळा भाबड्या लोकांना असे विचारवंत हे आपली पुर्वापार चालत आलेली संस्कृती, वंश नाश करायला निघालेत, असे भासवून कुंभाड रचून वैचारिक खलनायक म्हणून ठसवले जातात. हे त्याकाळातही होत होते या काळातही तेच होते. मात्र रधो त्यावेळी आपल्या विचारांशी, तत्वांशी ठामपणे उभे राहिले. स्वतःचा तार्किक विचार प्रखरपणे मांडत राहिले. स्वातंत्र्याआधी आणि नंतर अढळपणे. कसल्याही राजमान्य, राजाश्रय पाठींब्याची अपेक्षा न करता. अगदी गांधीजींच्या ब्रम्हचर्य विषयक विचारांशी देखील रधो असहमत होते. यावरून गांधीवादी कार्यकर्त्यांचा रोष देखील त्यांनी पत्कारला होता. समाजस्वास्थ्य ह्या नियतकालिकाच्या माध्यामातून सामाजिक, मानसिक आरोग्य  वैद्यकशास्त्राच्या दृष्टीकोनातून सुधारले पाहीजे ही तळमळ त्यांची शेवटपर्यंत होती. पेठेंनी ही भूमिका फार ताकदीने वठवलीय. रंगमंचावरील नेपथ्य (प्रदिप मुळ्ये),  प्रकाशयोजना(प्रदिप वैद्य), वेशभूषा (माधुरी पुरंदरे), पार्श्वसंगीत (नरेंद्र भिडे) आणि येणाऱ्या जाणाऱ्या पात्रांचा वावर हा नक्कीच काही दशके मागे घेउन जातो. दृश्यस्वरुपात नाटक ज्यापद्धतीने नटले गेलेय त्यात नेपथ्य, प्रकाशयोजना आणि वेशभूषा फार मोलाचा वाटा आहे. नाटकाच्या पहिल्या फ्रेम पासून घराचा दिवाणखाना तर कधी कोर्टकचेरी  जिवंतपणे उभा करण्यात पडद्यामागचे सर्व कलाकार -तंत्रज्ञ यशस्वी झालेत.

नाटकात व्यक्त झालेले रूढी-परंपरावादी लोकांचे बुरसटलेले विचार आजच्याच काळातील आहेत की काय असा विचार करायला लावणारे हे नाटक आहे. एकूणच अश्लीलतेची अशी कोणतीच प्रमाण व्याख्या नसल्याने वाचकांना उमगलेल्या अर्थामुळे 'सो कॉल्ड' कमकुवत मनावर विपरित परिणाम होतात व संस्कृती, सभ्यता वगैरे धोक्यात येतात अशी बुळचट धारणा असणारे विचारप्रवाह त्याकाळतही आस्तित्वात होते आणि या काळातही आस्तित्वात आहेत याची जाणीव नाटक पाहताना चाणाक्ष प्रेक्षकांना काटेकोरपणे होते. मुळात लैंगिक शिक्षण म्हणजे लैंगिक स्वैराचाराला प्रोत्साहन देणे ही दुधखुळी संकल्पना तेव्हाही अस्तित्वात होती आणि आजही आहे. राजमान्यता असलेला परंपरावादी समाज प्रभावशाली असतो तेव्हा मुक्त विचार मांडणाऱ्या विचारवंतांना, कलावंतांना नेहमीच आरोपीच्या पिंजऱ्यात पाहत असतो. असे काळाच्या पुढचे विचार मांडल्याने हजारो वर्षे चालत आलेली परंपरा, पुर्वापार सभ्यता-संस्कृती नाश होते असा पळपुटा समज कोणत्याही समाजासाठी हानिकारक आहे. अशाने भोळीभाबडी जनता कळीच्या प्रश्नांवर, समस्यांवर वैज्ञानिक दृष्टीकोनातून न पाहता धार्मिक, अस्मितेच्या आणि संस्कृतीच्या अंगाने पाहू लागते. त्यामुळे अज्ञान वाढते व त्याचा पुरेपुर फायदा विवेकवादाचा लवलेश नसणाऱ्या सामाजिक, राजकिय संघटना सत्ता गाजवण्यासाठी करतात. नवविचारांचा पुरस्कार करणे, पुढारलेला दृष्टिकोनातून वैचारिक समाजसुधारणा करणे, विवेकाच्या चळवळींतून प्रबोधन करणे याला तत्कालीन सामाजात मान्यताही नव्हती आणि आजही नाही. असा प्रयत्न करणाऱ्या व्यक्ती, संस्था आणि चळवळींना बंडखोर म्हणून दूर्लक्षित केले जाते आणि नको त्या बाबींचा उदोउदो केला जातो. याचा फटका या देशात कार्यरत असलेल्या विवेकावर आधारित चळवळींना त्याकाळतही बसला आणि आजच्या काळतही बसतो. समाजस्वास्थ्य नाटकात या अशा वैचारिक बाबींवर प्रामुख्याने प्रकाश टाकण्यात आला आहे. लैंगिकशिक्षणामुळे स्त्रीपुरुष संबंधात प्रगल्भता येते त्यामुळे कौटुंबिक आरोग्यात उद्भवणाऱ्या प्रश्नांकडे वैद्यकीय, वैज्ञानिक दृष्टीने पाहिले जाते. याचा परिपाक म्हणजे सामाजिक, मानसिक आरोग्यविषयक जाणिवा, चेतना जागरूक राहतात. काय चूक काय बरोबर याची जाणीव समाजातील प्रत्येक घटकाला होते. लैंगिकतेवर काही भाष्य केले की 'याला भलताच चळ लागलाय' अशी विकृत भावना समाजात आहे व होती. आजच्या काळात या नाटकाची गरज आहे कारण आजही अश्लीलतेची व्याख्या कोर्ट जे प्रमाण मानेल तीच आहे. त्यामुळेच कसल्याही भावना भडकून लागलीच व्यक्तीस्वातंत्र्य, विचारस्वातंत्र्यांचा पुरस्कार करणाऱ्यांना आरोपींच्या पिंजऱ्यात उभे करुन गुन्हेगार ठरवण्याची लादली जाणारी व्यवस्था बळकट होतेय. संस्कृती, सभ्यता, अस्मिता, धार्मिक आणि रुढी-परंपरावादी दृष्टिकोनातून कोणत्याही समस्येकडे पाहणाऱ्या विचारप्रवाहांना सुरंग लावणारी विचारवंतांची भूमिका ही कोणत्याही काळात बहुसंख्यवर्चस्वतावादाला अडसर ठरत असते. अशावेळी अशा व्यक्ती-संघटना-चळवळींना  बहिष्कृत करुन, दुय्यम वागणूक देऊन भोळ्याभाबड्या जनतेला सत्यापासून दूर नेउन अंधारात ठेवणे हा एककल्ली कार्यक्रम राबवला जातो. जनाधार नसलेली भूमिका ही विकृत आणि नैतिकतेशी फारकत घेणारी आहे असं ठसवण्यात येतं. त्यासाठी राजकीय, सामाजिक, आर्थिक, प्रशासकीय आणि प्रभुत्ववादी दबाव आणला जातो. इथे अस्सल सोन्यासारख्या विचारांचा, भूमिकांचा बळी दिला जातो. सद्सद्विवेक गहाण टाकून सगळ्याच समस्यांकडे बुळचट गोष्टींचा आधार घेऊन पाहिले जाते. अशावेळी हार त्या समाजाची असते जो समाज प्रगल्भ विचारांची मशागत करू शकला नाही म्हणून. समाजस्वास्थ्य हे नाटक तत्कालीन आणि आजचा समाज हा कसा तोकड्या वैचारिक बैठकींवर आधारलेला होता आणि आहे याचा गर्भित अर्थ प्रेक्षकांना समजावून सांगते.

-----------------------------
© भूषण वर्धेकर
हैद्राबाद
-----------------------------

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मराठा आरक्षण आणि वास्तव

मोदीस्तोमाची दशकपूर्ती

विवेकवादी हतबलता - पूर्वार्ध