परवा, आमचा पोपट वारला!
परवा, आमचा पोपट वारला!
- एक दृष्टिकोन
डॉ. चंद्रशेखर फणसळकर यांनी लिहिलेल्या 'परवा, आमचा पोपट वारला' या उपहासात्मक कथेचे अभिवाचन अतुल पेठे यांनी केले आहे. हा नाट्य-अभिवाचन प्रयोग म्हणजे प्रेक्षकाला अंतर्मुख करायला लावणारा आहे. भावनिकदृष्ट्या जोडला गेलेला सजीव (पोपट पक्षी) आणि त्याच्या मृत्यूआधी व नंतर आलेल्या अनुभवांची हलकी- फुलकी गोष्ट म्हणजे 'परवा, आमचा पोपट वारला'.
फणसळकरी नाट्यशैलीतील 'ब्लॅक कॉमेडी' प्रकारात लिहिलेल्या कथेचे अतुल पेठेंनी तितक्याच दमदारपणे मिश्कीलशैलीत अभिवाचन केले आहे. अभिवाचनाला एक सांगितिक मैफलीसारखी बैठक आहे. मुख्य आकर्षण म्हणजे अतुल पेठेंनी वाचनादरम्यान वाजवलेली शीळ ! ही एक नकळतपणे नाट्यवाचनाचा अविभाज्य भाग होऊन जाते. लेखकानं लिहिलेल्या 'बिटवीन दी लाईन्स' मधला नर्मविनोद प्रेक्षकाला विचार करायला भाग पाडतो. मध्यमवर्गीय मानसिकतेची अध्यात्मिक आंधळी ओढ आणि त्यातील रितेपणा यावरचा समर्पक विनोद लेखकाने गोष्ट स्वरुपात मांडलाय. मात्र तोच विनोद बेरकीपणे हेरून अतुल पेठेंनी निरनिराळ्या पात्रांची चपखल व्यक्तीमत्वे वाचिक अभिनयाद्वारे जिवंत केली आहेत. वैचारिक पातळीवरचे समज, भाबडेपणा आणि विसंगती मधून निरनिराळ्या पात्रांची उकल होते. गोष्ट सांगणाऱ्या मध्यमवर्गीय निवेदकाचा पाळलेला पोपट मरतो मग पोपट जीवंत असताना, आजारी असताना आणि मेल्यानंतर आलेले नानाविध व्यक्तींचे अनुभव निवेदक सांगत जातो अन् एक एक प्रसंग हसवताना प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडतो. फणसळकरांनी ज्या ताकदीने हलका फुलका विषय जगण्याच्या वेगवेगळ्या पातळीवर घडणाऱ्या घटनांना हेरुन लिहिला आहे तितक्याच ताकदीने पेठेंनी नाट्यवाचनातून जिवंत केलाय. हे करताना अभिवाचन कुठेही रटाळ होणार नाही याची खबरदारी पेठेंनी जातीने घेतलीय. मुळात अतुल पेठेंचा पिंड हा नाटकाचा. त्यामुळे हे अभिवाचन करताना पेठेंनी विविध पात्रे खुमासदार पद्धतीने उभी केली आहेत. विशेषकरून निवेदकाला पडणारे प्रश्न आणि त्या प्रश्नांची इतरांकडून मिळणारी उत्तरे असे प्रसंग पेठेंनी मोठ्या खुबीने सादर केले आहेत. सोबत शीळ आणि गाणी याची सादरीकरणाला असलेल्या संगतीमुळे अभिवाचनाला नाद, लय प्राप्त होते. असे सादरीकरण करताना लेखकाला नेमकेपणे जे सांगायचे आहे ते सडेतोड पण तितक्याच मिश्कीलपणे पेठेंनी प्रेक्षकांसमोर मांडले आहे. वर वर पाहता ही एक हलकी फुलकी कथा वाटत असली तरी लेखकाने व्यवस्थेला जे प्रश्न विचारले आहेत ते प्रश्न प्रेक्षकाला अंतर्मुख करतात. आयुष्यात घडणारी कोणतीही घटना असो त्या घटनेशी निगडीत असलेले सामाजिक, राजकिय, वैज्ञानिक, अध्यात्मिक आणि व्यवहारी प्रश्न एकमेकांशी सुसंगत असले तरी मध्यमवर्गीय मानसिकता त्यातील विसंगतीत अडकते. सारासार विचार, विवेक न करता रुढ अर्थाने अस्मितेच्या दृष्टीने, भावनिकदृष्ट्या वा ढोंगी परंपरेच्या परिप्रेक्ष्यातून हल्लीचा मध्यमवर्ग गुरफटला गेलाय. कथा लिहिताना लेखकाने शब्दबंबाळ विनोद, वर्णने होणार नाहीत याची पुरेपूर काळजी घेतली आहे. काही प्रसंगनिष्ठ विनोद हे केवळ हसण्यासाठी न राहता बुरसटलेल्या व्यवस्था या जुनाट कपोलकल्पित आस्थांना जखडून कशा राहतात आणि त्यांचे अंधानुकरण करणारी सुमार मानसिकता कशी असते याचे प्रत्यय देतात. एकूण भावनिक पातळीवर सर्वसामान्य माणूस परिस्थितीला बळी पडतो आणि मग या परिस्थितीचा वापर करून पैसे कमावणारे बाजारबुणगे जेष्ठ-श्रेष्ठ नकळत सर्वसामान्य माणसाच्या जगण्यात येतात आणि नाहकपणे खर्चिक होऊन जातात. सहवासाने जवळीक झालेला सजीव पक्षी आपल्या डोळ्यासमोर मरतोय ही भावना निश्चितपणे व्याकूळ करणारी आहे. मग या भावनेच्या भरात सद्सद्विवेकबुद्धी गहाण टाकून शरण जाणारी मध्यमवर्गीय मानसिकता आणि त्यातून उकलत जाणारी वैचारिक विसंगती हा मूळ गाभा या कथेचा आहे. यात विशेषतः मनाला भिडणारे वेगवेगळ्या व्यक्तींचे अजब तर्कट आपलं रोजचं आयुष्य किती आणि कैक वेडगळ वा भाबड्या समजुतीने व्यापलेलं आहे याची झटकन जाणीव करून देतात. कोणत्याही विचारसरणीच्या जुनाट टाकाऊ आस्था, अस्मिता उगाच नको त्या ठिकाणी डोके वर काढू लागल्या की कसं हसं होतं याचं समर्पक विश्लेषण कथेत फणसळकरांनी व्यक्त केले आहे. हे तितक्याच खुबीने पेठेंनी प्रेक्षकांसमोर ठसवले आहे. सध्याच्या काळात मध्यमवर्ग आदळणाऱ्या चलचित्र माध्यमांनी वेढलेला आहे. मग त्यात गुरफटून स्वतःचे आस्तित्व शोधणारा सुख-दुःख-नैराश्याच्या बंदिस्त चौकटीत अडकलेला भावनाविवश निवेदक आणि त्याचा वारलेला पोपट प्रेक्षकांना नक्कीच भानावर आणतो. कळत-नकळतपणे आपण सगळेच विचार- विवेकाचा कसलाही मागमूस न घेता नॉस्टॅल्जिक बंधनात गुंतत जातो. हे सर्व उभं करताना पेठेंनी अभिवाचन हे माध्यम निवडले. तसं पाहता या कथेचं नाट्यरुपांतर करता येऊ शकतं पण अभिवाचनातून जो परिणाम साधला जातोय तो परिणाम कदाचित नाटकात विस्कटून जाईल. अभिवाचन करताना केवळ पोपटाची शीळ संगीत म्हणून तर निरनिराळ्या पात्रांचे आवाज हा वाचिक अभिनय एवढेच काय ती साधनं पेठे वापरतात. त्यामुळे प्रेक्षकाचे संपूर्ण लक्ष केंद्रीत होते ते गोष्टीचा विषय, त्यातला आशय व वेगवेगळ्या स्तरांवरील कमकुवत श्रद्धा आणि यातून निर्माण होणारा निखळ विनोद या बाबींवर. रुपककथेचा जसा एक छुपा ध्वन्यर्थ असतो तसाच या कथेच्या सादरीकरणाचा एक विचार प्रवर्तक लौकिकार्थ आहे. साधं एक पोपट आख्यान रोजच्या जगण्यातले नानाविध पातळीवरचे किर्द अनुभव लोकांच्या समोर मांडतं तर अशा असंख्य गोष्टींनी माणसाचं आयुष्य कमी अधिक प्रमाणात व्यापलेलं असतं. विवेकी माणसाला हा विचार नक्कीच शिवून जातो की माणसाचं भूत, वर्तमान आणि भविष्य हे कितीतरी ढोंगी, बाजारू रुढींनी व्यापलेलं आहे कारण शास्त्रशुद्ध आणि तर्कशुद्ध विज्ञानविषयक विचार आपण पचवू शकत नाही पटत असला तरी चिकटलेल्या जाणीवा त्या विचारांकडे कानाडोळा करायला भाग पाडतात. सर्वार्थाने 'परवा, आमचा पोपट वारला' ही एक गुंतवून ठेवणारी मिश्कील मैफल किमान एकदा तरी अनुभवावीच अशी आहे.
© भूषण वर्धेकर, हैद्राबाद
१४ अॉगष्ट २०१८
रात्रौ ११:३०
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा