मंगळवार, २१ मे, २०१९

एका भारतीय नागरिकाचे मनोगत...

एका भारतीय नागरिकाचे मनोगत...

मी एक भारतीय आहे. फक्त आणि फक्त भारतीय. आज मला फक्त भारतीय म्हणून व्यक्त व्हायचंय. सांप्रत काळात उगाचच आघात करणारे काही विचार/कुविचार आगंतुकपण आदळत आहेत. पुर्वी ज्यांच्यावर विश्वास होता तोही आता डळमळीत झालाय. खऱ्याखुऱ्या माहितीचा स्रोत नक्की कोणता हाच यक्षप्रश्न उभा ठाकलाय. कोण कीती खरं बोलतोय आणि कोणी किती पाण्यात आहे हे मला चांगलंच कळतंय. अनेक वर्षांपासून इंग्रजांनी आपल्याला गुलाम बनवून आपल्यावर राज्य केले आणि आपल्या देशाची समृद्धी संपवली. जाता जाता भारताची फाळणी केली. त्यानंतर लोकशाहीचा स्वीकारून संघराज्य पद्धत आस्तित्वात आणली. एवढा सोपा सहज समजणारा गेल्या दिड दोनशे वर्षांचा इतिहास मला ठाउक आहे. मी वर्तमानपत्र सोडून काहीही वाचत नाही. हल्ली ते व्हॉट्सऍप वरचं वाचायचा एक नाद लागलाय. पण त्यात पण राम नाही राहिला. मी अभ्यासक वगैरे तर मुळीच नाही. माझा अभ्यासाचा संबंध केवळ परिक्षेपुरताच शाळेमध्ये. कॉलेजात काय गेलो नाही. मँट्रिक होता होता हातभर फाटली होती. आर्ट, सायन्स कॉमर्स वगैरे स्कॉलर लोकांचे चोचले. मी चाळीस टक्क्यावाला आयटीआय करून लेबर कॉट्रँक्टरच्या हाताखाली काम करायला सुरुवात केली. एवढीच ती काय माझी सध्याची ओळख. सहा जणांच्या कुटुंबकबिला कसाबसा सांभाळतोय. लिहिण्यास कारण की फारच अपेक्षाभंग झालाय सरकारकडून आणि विरोधकांकडून पण! उगाचच जातपातधर्माचे प्रश्न प्रखर केले जातायत. भूतकाळात कोणी काय चुका केल्या हे सांगण्यात वर्तमानकाळ खर्च होतोय. सध्याच्या गदारोळात माझी भूमिका नेमकी काय?  विचार काय? याचा उहापोह करण्यासाठी हे मनोगत.
देशात घडलेल्या चांगल्या, वाईट किंवा विकृत अशा कोणत्याही घटनांसंबंधी जो माणूस रँशनल पद्धतीने अभिव्यक्त होतो तोच खरा भारतीय. सार्वभौम भारतीय नागरिक कोणत्याही घटनेकडे माणूस म्हणून पाहतो. कोणत्याही धर्माच्या चष्म्यातून तो पाहत नाही.
खरा लोकशाही मानणारा नागरिक हा सुशिक्षित असतो आणि सद्सद्विवेकबुद्धीचा वापर करणारा असतो. मग माझा व्यवस्थेवरचा राग कसा व्यक्त करु?
जर केला तर तो व्यवस्थेवर असेल की विद्यमान सरकार वा पुर्वाश्रमीच्या सरकारांवर का नेभळट विरोधकांवर? मुळात आताची सगळीच मंडळी कोणीतरी ठरवून दिल्याप्रमाणे बोलत आहेत. सव्वाशे कोटींच्या लोकसंख्येच्या देशाला सांभाळणे काही येरागबाळ्याचे काम नाय काय? सध्याच्या काळात काही ठिकाणी हत्या झाली की त्याचा जात, धर्म वगैरे पाहून निषेध करणारी गँग नव्याने उदयास आलेली आहे. याचा सर्वाधिक उपयोग सरकार समर्थक ध्रुवीकरण करण्यासाठी करतात. सोयीनुसार निषेध करणारे उघडे पडतात. सध्याच्या राजकारणात व्यक्तीस्तोमाचा जो बडजाव सुरु झालाय त्याला विरोधकांसोबत सरकार समर्थक जबाबदार आहेत. कोणावरही वाट्टेल ते आरोप करायचे यात व्यक्ती , संस्था सरसकट सगळेच आले. कोर्टात जाउन केस टाकली आणि निकाल जर आपल्या मनाप्रमाणे नाही आला तर न्यायव्यवस्था विकली गेल्याच्या बोंबा मारायच्या आणि मनासारखा निकाल आला रे आला त्याच न्यायव्यवस्थेचे गोडवे गायचे असा सगळा माहौल तयार केला आहे जाणूनबुजून. धर्माचा वापर सरकारने जेवढा केला नसेल त्यापेक्षा विरोधकांनी करून येनकेनप्रकारेण सरकारला ध्रुवीकरणासाठी मदतच केलीय. लोकांच्या रोजच्या जगण्याचे प्रश्न वाऱ्यावर सोडून सगळा देश भरकटला आहे. मध्यमवर्गीय माणूस जास्तीत जास्त रोजच्या गरजा भागवण्यासाठी मरमर करतो , दारिद्रयरेषेखालील लोकांना काय तर गेली कित्येक वर्षे तसेच राहून दिले मतपेढी तयार करण्यासाठी. श्रीमंत वर्गातील लोक नेहमीप्रमाणे जगत असतात सरकार कोणाचेपण येवो त्यांच्या दैनंदिन उलाढाली राजरोसपणे चालूच असतात. व्हॉटअबाउटिझम नावाचा ट्रेंड सध्या धमाल चालूय सगळ्यांकडूनच. कायमस्वरूपी बंदोबस्त करता येउ शकेल अशा गरजा म्हणजे वीज, रस्ते, पाणी आणि शेतीविषयक योजना याविषयीचे ज्वलंत प्रश्न वर्षानुवर्षे भिजत ठेउन कित्येकांची पिढीजात दुकानदारी चालूच आहे. टक्केवारी, ठेकेदार, कंत्राटे आणि जाहिर निधी यावर एक समांतर कर्मदरिद्री साखळी सदैव कार्यरत आहे जे सरकार आणि विरोधकांना वेळोवेळी योग्य तो अर्थपुरवठा करत असतो. सध्याची माध्यमं आणि कुंटणखाना हा एक सारखेच आहे. ज्याचा भाव चांगला तो आपला. असा सगळा विचारकृत गोंधळ चालूय. काही नवोदित पक्ष, राजकारणी, विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते यांच्यावर विश्वास ठेवला होता ही मंडळी काहीतरी करतीलच म्हणून ती तर सरसकट बोली लावून विकली गेलीएत. त्यामुळे आता कोणावर विश्वास ठेवावा तेच कळेनासे झालेय. दारुण, भीषण, दयनीय आणि वेदनादायक आहे हे सगळं. कलुषित झालंय. संविधानावर देश चालतो तो कोणत्या धर्मग्रंथानुसार नाही चालत हे एवढंपण लोकांना कळत नाही. मात्र देशात काही घटकांना आपापल्या धर्माची काळजी. देश गेला बाराच्या भावात अशी मानसिकता सरसकट धर्मवेड्या लोकांची आहे. या विश्वातील चराचर सत्य आहे जो धर्मग्रंथाला कवटाळून बसतो तो दुसऱ्याच्या भल्यासाठी कधीच विचार करू शकत नाही. इथे प्रत्येकाला स्वतःच्या सोयीनुसार देश चालवायला पाहिजे. सरकारच्या कोणत्याही निर्णयामुळे माझी दुकानदारीबंद झाली तर सरकार वाईट. माझं मस्त चालूय तोपर्यंत सरकार चांगलं अशी सगळ्यांचीच मानसिकता आहे. कोणी हुकुमशाही येईल म्हणून भीती दाखवतोय तर कोणी आपला धर्म संकटात आहे म्हणून भीती दाखवतोय. कृषीप्रधान देश म्हणून जगात मिरवायचं आणि कमकुवत शेतकऱ्यांच्या जमीनी लाटून स्वतःचे उद्योग, संस्था, कारखाने उभे करायचे असा एक धूर्त राजकारणी लोकांचा कुटुंबकल्लोळ या देशात दिवसाढवळ्या चालूय. सरकार कोणाचेही येउदेत फक्त दोनवेळची जेवणं देशातील जनतेला सुरक्षितपणे मिळावीत हीच माफक अपेक्षा आहे.
-----------------
भूषण वर्धेकर
हडपसर
२१ मे २०१९
-----------------

गुरुवार, २८ मार्च, २०१९

हम हिंदू

हम हिंदू, हम हिंदू
बिखरे हुए अनेक बिंदू
किसकिसको हम पुजे
खोखले बंधनो मे है सजे

भव्यदिव्य कल्पित कथाए
पुराणोकी दाहक व्यथाए
स्वयंघोषित महानुभावोकी आस्थाए
शांती से यह माथा कहाँ टिकाए

भौचक्का हुई संस्कृती के पथ
नकली इन्सानियत के गंदे हाथ
छाएँ हुए जलसोके भटके रथ
भक्त का श्रद्धा से टुटा हुआ साथ

गरजो जयजयकार उन्हीका
गाव जहाँ सम्राट इन्हीका
दिखावा है धनवानो का
खुला बाजार बिछा है धर्म का

ऐक्य और नेकी का अद्भुत समीकरण
अकेलापन का वास्तव भीषण
झुठे जात-पात का अखंड ग्रहण
जाए कहा कहा हम शरण

चारो और फैलीहुई है अराजकता
भटके आस्तित्व को हर घर ढुंढता
कडी निगरानी मे ईश्वर सदैव रहता
कमजोर हालात प्रभू के हवाले है करता
---------------------------------------------
© भूषण वर्धेकर
हैद्राबाद

सोमवार, १८ मार्च, २०१९

समाजस्वास्थ्य

समाजस्वास्थ्य

यूट्यूबवर उपलब्ध असलेले समाजस्वास्थ्य नाटक नुकतेच पाहिले. अजित दळवी लिखित आणि अतुल पेठे दिग्दर्शित "समाजस्वास्थ्य" नाटक हे केवळ र. धो. कर्वे यांच्या कारकिर्दीतील तत्कालीन काळात त्यांच्यावर दाखल केलेल्या महत्वाच्या खटल्यांवर प्रकाश टाकणारे आहे. नाटकाची संहिता ही केवळ रधोंवर दाखल केलेले खटले आणि त्या काळातले लढवले गेलेले कोर्टातील युक्तिवाद यावर आधारित असल्याने रधोंची सामाजिक प्रश्नांवर असलेली तळमळ दिसून येते. सुधारककार आगरकरांनी बुद्धिप्रामाण्यवादी, विवेकवादी, विज्ञाननिष्ठ दृष्टीकोनातूनसमाज परिवर्तनाची जी मुहूर्तमेढ रोवली त्याचीच कास रधोंनी सच्चेपणाने शेवटपर्यंत धरली. स्वखर्चाने समाजस्वास्थ्य सारखे आरोग्य विषयक नियतकालिक चालवत असताना त्यात छापून येणाऱ्या लेखांवर, वाचकांनी विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तरावर, जाहिरातीतील मजकुरांवर आक्षेप घेऊन तत्कालीन रूढी-परंपरावादी लोकांनी त्यांच्यावर खटले भरले. अश्लीलतेचा ठपका ठेवला गेला. लैंगिक स्वातंत्र्याबद्दल त्यांचे विचार काळाच्या खूप पुढचे होते ह्याची जाणीव  नाटक पाहताना पदोपदी होते.

महत्वाचे म्हणजे त्यांच्यावर दाखल झालेल्या दुसऱ्या खटल्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी वकिली करून रधोंची बाजू सार्थपणे कोर्टात मांडली. ह्या घटनेशी कालसुसंगत नाटकातील प्रसंगामुळे आंबेडकरांचा सामाजिक सुधारण्यासाठी विचारस्वातंत्र्य आणि लैंगिकस्वातंत्र्याबद्दल असलेला प्रगल्भ दृष्टिकोन प्रेक्षकांना नक्कीच सुखावून जातो. आंबेडकर आणि रधोंच्या भेटीचा आणि त्यांच्यांतील चर्चेचा एक प्रसंग फारच तात्विक आणि समर्पक आहे. डॉ. बाबासाहेबांनी चर्चेत मांडलेला विचार हा खूप महत्वाचा संदेश देतो. त्यांची वैचारिक बैठक किती प्रगल्भ होती आणि सध्याच्या काळातही लागू होते हे समजते. या चर्चेत बाबासाहेबांनी आणि रधोंनी व्यक्त केलेले विचार हे प्रेक्षकांना तर्कशुद्ध विचारांची समाजाला गरज का आहे याची जाणीव करुन देतात. रधोंवर दाखल झालेला दुसरा खटला डॉ. बाबासाहेब लढले. हा केवळ एक प्रसंग जरी असला तरी बाबासाहेबांची ठाशीव वैचारिक भूमिका ही स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळात किती अग्रक्रमी होती याची जाणीव नाटक पाहिल्यावर होतेच होते. बहुआयामी बाबासाहेब हे नेहमी जुनाट आणि परंपरागत पाळल्या जाणाऱ्या बेगडी प्रथांना तार्किकतेने कसा विरोध करायचे आणि आधुनिक विचारांच्या प्रवाहांना, व्यक्तींना खंबीरपणे कसा पाठींबा द्यायचे हे या नाट्यप्रसंगातून प्रतित होते. मुळात विचारवंतांनी मांडलेले तत्कालीन विचार आजही तंतोतंत लागू आहेत व त्यातील कंगोरे  वेगवेगळ्या पातळीवर किती महत्त्वाचे असतात याची पारख या नाटकामुळे नक्कीच होते.

लैंगिकशिक्षणाबाबतची रधोंची दूरदृष्टी आणि वैचारिक भूमिका आजच्या काळातही लागू पडते याचे समाजभान प्रेक्षकांना नक्कीच होते.  स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्यानंतरचा काळ या नाटकात दाखवल्याने तत्कालीन समाजातील वैचारिक आणि आरोग्यविषयक अवस्था स्पष्टपणे अधोरेखित होते. लैंगिकस्वातंत्र्य, मुक्त समागम, स्त्रीपुरुष नातेसंबंध, संततीनियमन व सामाजिक आरोग्य या ज्वलंत प्रश्नांवर रधोंची असलेली सडेतोड भूमिका नक्कीच कालातीत आहे. या नाटकामुळे रधोंचे आयुष्य हे एकूणच सामाजिक, वैचारिक संघर्षाचे होते याची जाणीव प्रेक्षकांना नक्कीच होते. अजित दळवींनी नाटकातील प्रसंग लिहिताना सामाजिक, ऐतिहासिक संदर्भ कालानुक्रमे येतील याची पुरेपूर काळजी घेतलीय. शिवाय पेठेंनी ते सादर केलेले कोर्टकचेऱ्यातील संवाद प्रेक्षकांना खिळवून ठेवतात. विचारप्रधान नाटक सादर करताना ते रटाळ होउ नये आणि रधोंची वैचारिक भूमिका प्रेक्षकांसमोर रोखठोकपणे मांडताना 'समाजस्वास्थ्य'मध्ये अतुल पेठेंच्या दिग्दर्शक आणि अभिनेता ह्या दोन्ही भूमिका आत्मभान जागृत करणाऱ्या आहेत. त्याकाळी रधोंनी मांडलेले विचार आजच्या काळातही तंतोतंत लागू पडतात. याची साक्ष हे नाटक नक्कीच देते. लेखकाने लिखाण करताना पठडीच्या बाहेर जाउन, काळाच्या पुढे जाउन लिहिले तरच ते लिखाण वा विचार कालातीत होतात. समाजसुधारण्याचा वसा घेतल्यावर सांप्रत समाजमान्यता असलेल्या चौकटीत लिहून विवेकवादी विचारप्रवाह तयार होत नाही. त्यासाठी बुरसटलेल्या रुढींना, प्रथांना, पिचलेल्या संस्कृती-सभ्यतेच्या अस्मितांना प्रखर विरोध तर्कशुद्ध पद्धतीनेच करावा लागतो. हेच यज्ञकर्म रधो समाजस्वास्थ्य या नियतकालिकाच्या माध्यमातून जनजागृतीसाठी करत होते. प्रभुत्ववादी सत्तास्थाने नेहमीच अशा सुधारणा करणाऱ्या व्यक्तींना, समुहांना, चळवळींना लक्ष्य करत असतात. प्रसंगी आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करून दबावाखाली आणण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करतात. बहुसंख्य वेळा भाबड्या लोकांना असे विचारवंत हे आपली पुर्वापार चालत आलेली संस्कृती, वंश नाश करायला निघालेत, असे भासवून कुंभाड रचून वैचारिक खलनायक म्हणून ठसवले जातात. हे त्याकाळातही होत होते या काळातही तेच होते. मात्र रधो त्यावेळी आपल्या विचारांशी, तत्वांशी ठामपणे उभे राहिले. स्वतःचा तार्किक विचार प्रखरपणे मांडत राहिले. स्वातंत्र्याआधी आणि नंतर अढळपणे. कसल्याही राजमान्य, राजाश्रय पाठींब्याची अपेक्षा न करता. अगदी गांधीजींच्या ब्रम्हचर्य विषयक विचारांशी देखील रधो असहमत होते. यावरून गांधीवादी कार्यकर्त्यांचा रोष देखील त्यांनी पत्कारला होता. समाजस्वास्थ्य ह्या नियतकालिकाच्या माध्यामातून सामाजिक, मानसिक आरोग्य  वैद्यकशास्त्राच्या दृष्टीकोनातून सुधारले पाहीजे ही तळमळ त्यांची शेवटपर्यंत होती. पेठेंनी ही भूमिका फार ताकदीने वठवलीय. रंगमंचावरील नेपथ्य (प्रदिप मुळ्ये),  प्रकाशयोजना(प्रदिप वैद्य), वेशभूषा (माधुरी पुरंदरे), पार्श्वसंगीत (नरेंद्र भिडे) आणि येणाऱ्या जाणाऱ्या पात्रांचा वावर हा नक्कीच काही दशके मागे घेउन जातो. दृश्यस्वरुपात नाटक ज्यापद्धतीने नटले गेलेय त्यात नेपथ्य, प्रकाशयोजना आणि वेशभूषा फार मोलाचा वाटा आहे. नाटकाच्या पहिल्या फ्रेम पासून घराचा दिवाणखाना तर कधी कोर्टकचेरी  जिवंतपणे उभा करण्यात पडद्यामागचे सर्व कलाकार -तंत्रज्ञ यशस्वी झालेत.

नाटकात व्यक्त झालेले रूढी-परंपरावादी लोकांचे बुरसटलेले विचार आजच्याच काळातील आहेत की काय असा विचार करायला लावणारे हे नाटक आहे. एकूणच अश्लीलतेची अशी कोणतीच प्रमाण व्याख्या नसल्याने वाचकांना उमगलेल्या अर्थामुळे 'सो कॉल्ड' कमकुवत मनावर विपरित परिणाम होतात व संस्कृती, सभ्यता वगैरे धोक्यात येतात अशी बुळचट धारणा असणारे विचारप्रवाह त्याकाळतही आस्तित्वात होते आणि या काळातही आस्तित्वात आहेत याची जाणीव नाटक पाहताना चाणाक्ष प्रेक्षकांना काटेकोरपणे होते. मुळात लैंगिक शिक्षण म्हणजे लैंगिक स्वैराचाराला प्रोत्साहन देणे ही दुधखुळी संकल्पना तेव्हाही अस्तित्वात होती आणि आजही आहे. राजमान्यता असलेला परंपरावादी समाज प्रभावशाली असतो तेव्हा मुक्त विचार मांडणाऱ्या विचारवंतांना, कलावंतांना नेहमीच आरोपीच्या पिंजऱ्यात पाहत असतो. असे काळाच्या पुढचे विचार मांडल्याने हजारो वर्षे चालत आलेली परंपरा, पुर्वापार सभ्यता-संस्कृती नाश होते असा पळपुटा समज कोणत्याही समाजासाठी हानिकारक आहे. अशाने भोळीभाबडी जनता कळीच्या प्रश्नांवर, समस्यांवर वैज्ञानिक दृष्टीकोनातून न पाहता धार्मिक, अस्मितेच्या आणि संस्कृतीच्या अंगाने पाहू लागते. त्यामुळे अज्ञान वाढते व त्याचा पुरेपुर फायदा विवेकवादाचा लवलेश नसणाऱ्या सामाजिक, राजकिय संघटना सत्ता गाजवण्यासाठी करतात. नवविचारांचा पुरस्कार करणे, पुढारलेला दृष्टिकोनातून वैचारिक समाजसुधारणा करणे, विवेकाच्या चळवळींतून प्रबोधन करणे याला तत्कालीन सामाजात मान्यताही नव्हती आणि आजही नाही. असा प्रयत्न करणाऱ्या व्यक्ती, संस्था आणि चळवळींना बंडखोर म्हणून दूर्लक्षित केले जाते आणि नको त्या बाबींचा उदोउदो केला जातो. याचा फटका या देशात कार्यरत असलेल्या विवेकावर आधारित चळवळींना त्याकाळतही बसला आणि आजच्या काळतही बसतो. समाजस्वास्थ्य नाटकात या अशा वैचारिक बाबींवर प्रामुख्याने प्रकाश टाकण्यात आला आहे. लैंगिकशिक्षणामुळे स्त्रीपुरुष संबंधात प्रगल्भता येते त्यामुळे कौटुंबिक आरोग्यात उद्भवणाऱ्या प्रश्नांकडे वैद्यकीय, वैज्ञानिक दृष्टीने पाहिले जाते. याचा परिपाक म्हणजे सामाजिक, मानसिक आरोग्यविषयक जाणिवा, चेतना जागरूक राहतात. काय चूक काय बरोबर याची जाणीव समाजातील प्रत्येक घटकाला होते. लैंगिकतेवर काही भाष्य केले की 'याला भलताच चळ लागलाय' अशी विकृत भावना समाजात आहे व होती. आजच्या काळात या नाटकाची गरज आहे कारण आजही अश्लीलतेची व्याख्या कोर्ट जे प्रमाण मानेल तीच आहे. त्यामुळेच कसल्याही भावना भडकून लागलीच व्यक्तीस्वातंत्र्य, विचारस्वातंत्र्यांचा पुरस्कार करणाऱ्यांना आरोपींच्या पिंजऱ्यात उभे करुन गुन्हेगार ठरवण्याची लादली जाणारी व्यवस्था बळकट होतेय. संस्कृती, सभ्यता, अस्मिता, धार्मिक आणि रुढी-परंपरावादी दृष्टिकोनातून कोणत्याही समस्येकडे पाहणाऱ्या विचारप्रवाहांना सुरंग लावणारी विचारवंतांची भूमिका ही कोणत्याही काळात बहुसंख्यवर्चस्वतावादाला अडसर ठरत असते. अशावेळी अशा व्यक्ती-संघटना-चळवळींना  बहिष्कृत करुन, दुय्यम वागणूक देऊन भोळ्याभाबड्या जनतेला सत्यापासून दूर नेउन अंधारात ठेवणे हा एककल्ली कार्यक्रम राबवला जातो. जनाधार नसलेली भूमिका ही विकृत आणि नैतिकतेशी फारकत घेणारी आहे असं ठसवण्यात येतं. त्यासाठी राजकीय, सामाजिक, आर्थिक, प्रशासकीय आणि प्रभुत्ववादी दबाव आणला जातो. इथे अस्सल सोन्यासारख्या विचारांचा, भूमिकांचा बळी दिला जातो. सद्सद्विवेक गहाण टाकून सगळ्याच समस्यांकडे बुळचट गोष्टींचा आधार घेऊन पाहिले जाते. अशावेळी हार त्या समाजाची असते जो समाज प्रगल्भ विचारांची मशागत करू शकला नाही म्हणून. समाजस्वास्थ्य हे नाटक तत्कालीन आणि आजचा समाज हा कसा तोकड्या वैचारिक बैठकींवर आधारलेला होता आणि आहे याचा गर्भित अर्थ प्रेक्षकांना समजावून सांगते.

-----------------------------
© भूषण वर्धेकर
हैद्राबाद
-----------------------------

परवा, आमचा पोपट वारला!

परवा, आमचा पोपट वारला!
- एक दृष्टिकोन

डॉ. चंद्रशेखर फणसळकर यांनी लिहिलेल्या 'परवा, आमचा पोपट वारला' या उपहासात्मक कथेचे अभिवाचन अतुल पेठे यांनी केले आहे. हा नाट्य-अभिवाचन प्रयोग म्हणजे प्रेक्षकाला अंतर्मुख करायला लावणारा आहे. भावनिकदृष्ट्या जोडला गेलेला सजीव (पोपट पक्षी) आणि त्याच्या मृत्यूआधी व नंतर आलेल्या अनुभवांची हलकी- फुलकी गोष्ट म्हणजे 'परवा, आमचा पोपट वारला'.
फणसळकरी नाट्यशैलीतील 'ब्लॅक कॉमेडी' प्रकारात लिहिलेल्या कथेचे अतुल पेठेंनी तितक्याच दमदारपणे मिश्कीलशैलीत अभिवाचन केले आहे. अभिवाचनाला एक सांगितिक मैफलीसारखी बैठक आहे. मुख्य आकर्षण म्हणजे अतुल पेठेंनी वाचनादरम्यान वाजवलेली शीळ ! ही एक नकळतपणे नाट्यवाचनाचा अविभाज्य भाग होऊन जाते. लेखकानं लिहिलेल्या 'बिटवीन दी लाईन्स' मधला नर्मविनोद प्रेक्षकाला विचार करायला भाग पाडतो. मध्यमवर्गीय मानसिकतेची अध्यात्मिक आंधळी ओढ आणि त्यातील रितेपणा यावरचा समर्पक विनोद लेखकाने गोष्ट स्वरुपात मांडलाय. मात्र तोच विनोद बेरकीपणे हेरून अतुल पेठेंनी निरनिराळ्या पात्रांची चपखल व्यक्तीमत्वे वाचिक अभिनयाद्वारे जिवंत केली आहेत. वैचारिक पातळीवरचे समज, भाबडेपणा आणि विसंगती मधून निरनिराळ्या पात्रांची उकल होते. गोष्ट सांगणाऱ्या मध्यमवर्गीय निवेदकाचा पाळलेला पोपट मरतो मग पोपट जीवंत असताना, आजारी असताना आणि मेल्यानंतर आलेले नानाविध व्यक्तींचे अनुभव निवेदक सांगत जातो अन् एक एक प्रसंग हसवताना प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडतो. फणसळकरांनी ज्या ताकदीने हलका फुलका विषय जगण्याच्या वेगवेगळ्या पातळीवर घडणाऱ्या घटनांना हेरुन लिहिला आहे तितक्याच ताकदीने पेठेंनी नाट्यवाचनातून जिवंत केलाय. हे करताना अभिवाचन कुठेही रटाळ होणार नाही याची खबरदारी पेठेंनी जातीने घेतलीय. मुळात अतुल पेठेंचा पिंड हा नाटकाचा. त्यामुळे हे अभिवाचन करताना पेठेंनी विविध पात्रे खुमासदार पद्धतीने उभी केली आहेत. विशेषकरून निवेदकाला पडणारे प्रश्न आणि त्या प्रश्नांची इतरांकडून मिळणारी उत्तरे असे प्रसंग पेठेंनी मोठ्या खुबीने सादर केले आहेत. सोबत शीळ आणि गाणी याची सादरीकरणाला असलेल्या संगतीमुळे अभिवाचनाला नाद, लय प्राप्त होते. असे सादरीकरण करताना लेखकाला नेमकेपणे जे सांगायचे आहे ते सडेतोड पण तितक्याच मिश्कीलपणे पेठेंनी प्रेक्षकांसमोर मांडले आहे. वर वर पाहता ही एक हलकी फुलकी कथा वाटत असली तरी लेखकाने व्यवस्थेला जे प्रश्न विचारले आहेत ते प्रश्न प्रेक्षकाला अंतर्मुख करतात. आयुष्यात घडणारी कोणतीही घटना असो त्या घटनेशी निगडीत असलेले सामाजिक, राजकिय, वैज्ञानिक, अध्यात्मिक आणि व्यवहारी प्रश्न एकमेकांशी सुसंगत असले तरी मध्यमवर्गीय मानसिकता त्यातील विसंगतीत अडकते. सारासार विचार, विवेक न करता रुढ अर्थाने अस्मितेच्या दृष्टीने, भावनिकदृष्ट्या वा ढोंगी परंपरेच्या परिप्रेक्ष्यातून हल्लीचा मध्यमवर्ग गुरफटला गेलाय. कथा लिहिताना लेखकाने शब्दबंबाळ विनोद, वर्णने होणार नाहीत याची पुरेपूर काळजी घेतली आहे. काही प्रसंगनिष्ठ विनोद  हे केवळ हसण्यासाठी न राहता बुरसटलेल्या व्यवस्था या जुनाट कपोलकल्पित आस्थांना जखडून कशा राहतात आणि त्यांचे अंधानुकरण करणारी सुमार मानसिकता कशी असते याचे प्रत्यय देतात. एकूण भावनिक पातळीवर सर्वसामान्य माणूस परिस्थितीला बळी पडतो आणि मग या परिस्थितीचा वापर करून पैसे कमावणारे बाजारबुणगे जेष्ठ-श्रेष्ठ नकळत सर्वसामान्य माणसाच्या जगण्यात येतात आणि नाहकपणे खर्चिक होऊन जातात. सहवासाने जवळीक झालेला सजीव पक्षी आपल्या डोळ्यासमोर मरतोय ही भावना निश्चितपणे व्याकूळ करणारी आहे. मग या भावनेच्या भरात सद्सद्विवेकबुद्धी गहाण टाकून शरण जाणारी मध्यमवर्गीय मानसिकता आणि त्यातून उकलत जाणारी वैचारिक विसंगती हा मूळ गाभा या कथेचा आहे. यात विशेषतः मनाला भिडणारे वेगवेगळ्या व्यक्तींचे अजब तर्कट आपलं रोजचं आयुष्य किती आणि कैक वेडगळ वा भाबड्या समजुतीने व्यापलेलं आहे याची झटकन जाणीव करून देतात.  कोणत्याही विचारसरणीच्या जुनाट टाकाऊ आस्था, अस्मिता उगाच नको त्या ठिकाणी डोके वर काढू लागल्या की कसं हसं होतं याचं समर्पक विश्लेषण कथेत फणसळकरांनी व्यक्त केले आहे. हे तितक्याच खुबीने पेठेंनी प्रेक्षकांसमोर ठसवले आहे. सध्याच्या काळात मध्यमवर्ग आदळणाऱ्या चलचित्र माध्यमांनी वेढलेला आहे. मग त्यात गुरफटून स्वतःचे आस्तित्व शोधणारा सुख-दुःख-नैराश्याच्या बंदिस्त चौकटीत अडकलेला भावनाविवश निवेदक आणि त्याचा वारलेला पोपट प्रेक्षकांना नक्कीच भानावर आणतो. कळत-नकळतपणे आपण सगळेच विचार- विवेकाचा कसलाही मागमूस न घेता नॉस्टॅल्जिक बंधनात गुंतत जातो. हे सर्व उभं करताना पेठेंनी अभिवाचन हे माध्यम निवडले. तसं पाहता या कथेचं नाट्यरुपांतर करता येऊ शकतं पण अभिवाचनातून जो परिणाम साधला जातोय तो परिणाम कदाचित नाटकात  विस्कटून जाईल. अभिवाचन करताना केवळ पोपटाची शीळ संगीत म्हणून तर निरनिराळ्या पात्रांचे आवाज हा वाचिक अभिनय एवढेच काय ती साधनं पेठे वापरतात. त्यामुळे प्रेक्षकाचे संपूर्ण लक्ष केंद्रीत होते ते गोष्टीचा विषय, त्यातला आशय व वेगवेगळ्या स्तरांवरील कमकुवत श्रद्धा आणि यातून निर्माण होणारा निखळ विनोद या बाबींवर. रुपककथेचा जसा एक छुपा ध्वन्यर्थ असतो तसाच या कथेच्या सादरीकरणाचा एक विचार प्रवर्तक लौकिकार्थ आहे. साधं एक पोपट आख्यान रोजच्या जगण्यातले नानाविध पातळीवरचे किर्द अनुभव लोकांच्या समोर मांडतं तर अशा असंख्य गोष्टींनी माणसाचं आयुष्य कमी अधिक प्रमाणात व्यापलेलं असतं. विवेकी माणसाला हा विचार नक्कीच शिवून जातो की माणसाचं भूत, वर्तमान आणि भविष्य हे कितीतरी ढोंगी, बाजारू रुढींनी व्यापलेलं आहे कारण शास्त्रशुद्ध आणि तर्कशुद्ध विज्ञानविषयक विचार आपण पचवू शकत नाही पटत असला तरी चिकटलेल्या जाणीवा त्या विचारांकडे कानाडोळा करायला भाग पाडतात. सर्वार्थाने 'परवा, आमचा पोपट वारला' ही एक गुंतवून ठेवणारी मिश्कील मैफल किमान एकदा तरी अनुभवावीच अशी आहे.

© भूषण वर्धेकर, हैद्राबाद
१४ अॉगष्ट २०१८
रात्रौ ११:३०

नास्तिकतेची वल्कलं

घेऊन निधर्मीवादाचा झेंडा पेटवून इहवादाचा डंका झालाय एकजण नवखा नास्तिक बिथरला पाहून बहुसंख्य आस्तिक कोणता सच्चा धार्मिक यावर करू लागला गहन वि...