शुक्रवार, २५ मार्च, २०१६

ज्याचा त्याचा महापुरूष

ज्याचा त्याचा महापुरूष
ज्याचा त्याचा पंथ
राजरोस अविवेकी ऊरुस
हीच सार्वत्रिक खंत

विचारांची पायमल्ली
दिमाखदार गाठीभेटी
समारंभ गल्लोगल्ली
कार्यकर्ता अर्धपोटी

योजनांचा महापूर
महापुरूषांच्या नावे
सत्तेसाठी वेगळे सूर
जातीपातीत हेवेदावे

विचारवंत स्वयंघोषित
फ्लेक्ससाठी फोटो ऐटीत
नितीमत्ता गेली मातीत
समाजकल्याण लालफितीत

सरकारी टक्केवारी
कागदोपत्री जमवलेली
मंत्र्यांची हमरीतुमरी
कमिशनसाठी आसुसलेली

भाबडी जनता आशाळभूत
सकल ऊद्धाराच्या प्रतिक्षेत
महापुरुषांचे पुतळे सुशोभित
विखुरलेल्या चौकाचौकात

भूषण वर्धेकर
9-11-2010
उरुळीकांचन

म्हणूनच तेलही गेलं अन् तूपही गेलं . . .

म्हणूनच तेलही गेलं अन् तूपही गेलं . . .
त्याचं असं झालं…..
त्याने तिच्यासाठी खूप केलं
नको एवढं करून शेवटी मातीत गेलं
तरीपण ह्याचं कसंबसं निभावलं
सरतेशेवटी ह्याला कळून चुकलं
कोणाचातरी पर्याय असण्यापेक्षा
कोणीतरी आपली निवड करून व्हावं चांगभलं
नाहीच कुठे जमलं तर आपण एकटंच बरं
म्हणूनच तेलही गेलं अन् तूपही गेलं . . .
काही दिवस असेच जातात रुक्ष रुक्ष
तरीपण नजर मात्र सदैव दक्ष
नवीन जुगाड जुळलं तर लागलीच व्हावा सोक्षमोक्ष
हळुवार सुरु होतात तिरपे कटाक्ष
मग रचले जातात नवी ध्येयं नवे लक्ष्य
सर्रास सुरु होतात बारकावे टिपणं अन् निरीक्षणं सूक्ष्म
सगळं कुंभाड फिक्स केलं जातं अन् नेहमीप्रमाणे अस पाखरू उच्चभ्रूंकडेच उडून जातं
शेवटी कण्हतंच म्हणायचं असतं
म्हणूनच तेलही गेलं अन् तूपही गेलं . . .
अखेरीस वैतागून गावाकडची बस गाठली
बसस्टॅडवर उतरताच मित्राने बोंब ठोकली
गावातल्या लांबच्या मामाने पोटच्या लेकीसाठी ह्याच्या घरी लग्नाची बोलणी केली
वाढत्या वयासोबत जबाबदारीही आली
तरीपण ह्याची नाही जिरली
इतक्यात लग्न नको म्हणून भांडणं केली
आता मात्र हद्द झाली, नितीमत्ता चुलीत घातली, रातोरात शहराकडं धूम ठोकली
लग्नाआधी एक तरी झेंगट करायचंच याची त्याने तळीच उचलली
तशी एक सुबक ठेंगणी बेरकीपणे हेरली
घरच्यांची ओळखीतली नसावी याची खात्री करून घेतली
मदनाचे सगळे बाण मारले तरी ती काही घायाळ नाही झाली
अमुक बाबा तमुक बुवा यांच्यापुढे लोटांगणे घातली
गंडे, धागे, दोरे, अंगठ्या यांनी हात,बोटे भरली
उरली सुरली हुशारी उपासतापास करून निकाली लावली
जिथं तिथं घोड नडतय म्हणत अक्कल पाझळली
गावाकडचीच चांगली म्हणून लग्नासाठी शेखी मिरवली
बोलाचालीच्या दिवशी ह्याची ऐट वाढली
मामाच्या घरी मोटारगाडीतून सवारी गेली
मामाच्या पोरीसोबत ती सुबक ठेंगणी पाहून ह्याची बोबडी वळाली
गुप्तपणे माहिती काढली तर ती मामाच्या पोरीची दूरची कुठलीतरी बहीण निघाली
पसंतीचा होकार देण्याआधिच तिकडून नकाराची पोचपावती आली
एकट्याकडून दुकटेपणाची निकराची लढाई गारठली
म्हणूनच तेलही गेलं अन् तूपही गेलं . . .

-----------
-- भूषण वर्धेकर
1 जानेवारी 2016
रात्रौ 11:00
हडपसर
------------

असा एकांत हा

असा एकांत हा
जणू आंतरिक ज्वाळा
मखमली आठवणींचा
सुकला पावसाळा
प्रेमात तुटलेल्या
भावनांचा लोळागोळा
व्यवहाराचे शल्य
जगण्याच्या अवतीभवती
विखुरलेल्या स्वप्नांची
संसारिक पोचपावती
दिग्मुढ शांततेत
दारिद्रयाची दशा
मर्दुमकीच्या ठिकऱ्या
सर्वदूर दाही दिशा
माझ्यातला मी
कधी संपत नाही
इतरांसोबत तुलना
सदैव त्राही त्राही
अहंपणाची कवचकुंडलं
सत्कर्माची मृगजळे
वल्गनांचे मनोरथ
गतकाळाची पाळेमुळे
जागेपणीचे भूकेले प्रश्न
भागवाभागवीचे अग्नीदिव्य
गद्यपंचवीशीचं वास्तव भग्न
समाजमान्यतेचे सव्य-अपसव्य

---------------------
--भूषण वर्धेकर
21 डिसेंबर 2009
पुणे
----------------------

इथे हजारात एखादा निवडला जातो


इथे हजारात एखादा निवडला जातो
आणि हजारोतला एक होऊन जातो
कौशल्यावर आधारित गुणपत्रिकेच्या रद्दीत
भूलतो चकचकत्या गाढवी कामाच्या दुनियेत
पगाराच्या मगरमिठीसाठी राबतो रात्रंदिवस
पोटजीविकेची परिक्रमा आ वासून उभीच असते
वर्षांमागून वर्षे जातात हाडामांसाचा देह खुरडत
अखेरीस ठप्प जोडीदाराच्या नातेसंबंधात
पुन्हा तेच शोभतो लाखात एक जोडा अन्
होऊन जातो लाखोंमधला फडफडणारा कुटुंबवत्सल
नव्याचं नवंपण निघून जातं, जुनं जाणतं नातं विरून जातं
उरतो नंतर बेगड्या जबाबदाऱ्यांचा भडीमार
परिस्थितीचा बागुलबुवा आणि शुष्क स्थैर्याचा आशावाद
उमेदीची वर्षे निघून जातात, स्वप्नरंजनातील दावे उडून जातात
राहतो शिल्लक आमचा काळ अन आम्ही काय केलं त्याच्या बाता
नेमकं उमगतं जग बदलायला निघालो होतो….
होऊन बसलो बदललेल्या जगाचा पदसिद्ध सो कॉल्ड सेटल्ड बैल !!!

--------------
भूषण वर्धेकर
11 जुलै 2010
पुणे
-----------------

सत्यासत्य

सत्यासत्य, नैतिक-अनैतिकेच्या जाळ्यात
अडकणारी, कुतरोड झालेली मने
असंतोष,उद्विग्न नैराश्याने ग्रासलेली
उद्रेकाची वाट पाहत
उध्वस्त, निडर मनुष्याचे पुतळे
होरपळली जाणारी पिढी
खंगली जाणारी स्वप्ने
नव्या किरणांची वाट पाहते
तरूणाईचा बळी
बालमने उपेक्षित

भूषण वर्धेकर
29-10-2008
10:40 रात्रौ

आम्ही देशप्रेमी

आम्ही देशप्रेमी, आधुनिक देशप्रेमी रे
कोणी मेला तर त्याचा धर्म ठरवू रे
संकुचित पद्धतीने निषेधाचे ढोंग करू रे
बजेट सँक्शन झाले की आम्ही सुटलो रे

विरोधाला विरोध हा आमचा बाणा रे
चांगल्या गोष्टीत आम्ही नाक खुपसू रे
जाऊ तिथे जुन्या गोष्टी उकरून काढू रे
खरी गरज जिथे तिथे अमुची पाठ रे

नवीन विकास धोरण जाहीर झाले रे
लगेच एनजीओद्वारे आडकाठी करू रे
नाही झेपले तर शोषणाचा आव आणू रे
काहीही करू बंद पाडू हाच हेका रे

आधुनिक बदलांना बाजूला सारू रे
जेथे फायदा तेथे पुढे पुढे करू रे
अन्याय झालेल्यांची वर्गवारी करू रे
ठरलेल्या पॅकेजनुसार आंदोलने छेडू रे

बुद्धी गहाण टाकून जगाला दाखवू रे
पोकळ जाणीवांची काही कमी नाही रे
असंतुष्ट लोक जमवून ईव्हेंट करू रे
दारिद्र्याचे ग्लॅमर करून पोटे भरू रे

आलेल्या निधीत कमिशन मारू रे
नंतर निवांत उच्चभ्रूंच्या पार्ट्या झोडू रे
ढेकरा देऊन उपोषणाच्या बैठका घेऊ रे
देश-रयत-सभ्यता चूलीत गेली रे

--भूषण वर्धेकर
17-10-2015
रात्रौ 11:55
हडपसर
--------------------

इथे माणूस मरतो

इथे माणूस मरतो
नंतर त्याचा धर्म ठरतो
मग सादर होतो अहवाल
सुस्त शासन अन् माध्यमे मस्तवाल
मग येतात फुत्कार चंगळवादी
प्रखर होतात जाणीवा राष्ट्रवादी
काथ्याकूट होतो बाजारू मानवतेचा
एकच दिवस असतो बौद्धिक निषेधाचा
जोशात भरले जातात वृत्तपत्रीय रकाने
चर्चा झाडल्या जातात तावातावाने
नको त्यांचा वधारला जातो भाव
उगाच उकरून काढतात जुनाट घाव
काही काळ असाच जातो निघून
शांततेचा चित्कार चौफेर घुमून
फुकाचे विचारवंत अन् चौकटीतले जगणे
ज्याचे त्याचे कर्म स्वतःचे तुंबडे भरणे
दुटप्पी माणूसकीचे अवशेष भग्न
सकल प्राणीमात्र रोजच्या दिनचर्येत मग्न

--भूषण वर्धेकर
9-10-2015
8:30 रात्रौ
दौंड-पुणे शटल
------------------------------------------------

खरा तो एकची धर्म - विडंबन

खरा तो एकची धर्म - विडंबन  (साने गुरुजी यांची क्षमा मागून) खरा तो एकचि धर्म जगाला जिहादी अर्पावे जगी जे हीन अति धर्मभोळे जगी जे दीन लुळे पां...