शुक्रवार, २५ मार्च, २०१६

सल सलते मनात

सल सलते मनात
रणरणत्या उन्हात
पाऊले वळतात
दुःखी भूतकाळात

नको त्या आठवणी
रूक्ष भेटीच्या ठिकाणी
कृश मने केविलवाणी
क्रंदती विरह गाणी

उज्वल भविष्यात
आंतरिक होरपळतात
एकमेव निरव एकांतात
षष्प संवाद साधतात

भरकटलेल्या स्वप्नांची
गर्भगळीत मनांची
सांगड एकोप्याची
होळी भावविश्वाची

क्रमिक घटना
बुजलेल्या वेदना
परतीचा पाहुणा
भ्रमाच्या धारणा

मागमूस जगण्याची
वर्दळीत जाणीवांची
एक तिरीप प्रकाशाची
मांदियाळी दिवास्वप्नांची

भूषण वर्धेकर
28-09-2015
हडपसर
रात्रौ 9:55

माणूसपण हरवलेली

माणूसपण हरवलेली
डेकोरएटीव्ह वस्ती
ऊंच इमारतींची
दुतर्फा गर्दी

टाऊनशिप अंतर्गत
राखलेली हिरवाई
डेव्हलप करताना
कापलेली वनराई

वणवण करणाऱ्यांची
अनंत भटकंती
हिंडोऱ्यांचे सोबती
आकंठ डुंबती

रखरखणाऱ्या ऊन्हात
गारव्याच्या शोधात
मजूर विसावतात
दगड धोंड्यात

नंतर अवतरतो
डोलरा मुजोरांचा
दुलईत लोळतो
दर्प श्रीमंतीचा

दिखाव्याचे देखावे
दिवाणखाण्यात सजले
चित्रातील घरे
माणसांविना भरे

भूषण वर्धेकर
१५/७/२००९
दुपार २.३५ फर्गसन

संदर्भ नसलेली संस्कृती

संदर्भ नसलेली संस्कृती
पत मिळवण्यासाठी धडपड
धर्माचं मुलभूत रोप
मुळासकट

ग्रहणे, पिधाने, युत्या, अंतरीक्षाचे संगती
सकल मानवसमाज प्रकटती
पंचागाच्या भिंती
खिडकीशिवाय

हरलेली मने शोधीत आधार
विळख्यात येती
कुटनीती

सदैव सहर्ष स्वागताच्या कमानी
गावोगावी , नावं मात्र
दगडी देवांची

पिसाटलेली माणसं, जत्रेचा उरुस
नवस, माळा, तोरणं, बळी
उगवता दिवस
मावळून जातो

शोधावी शांती प्रभू चरणी
म्हणती मने अशांतीची आरास,
बुवाबाजीचा डौल
फुंकण्यासाठी

नालस्ती धर्माची, दंगली पाठीराख्या
मरिती दरिद्री, निष्पापी आक्रंद
उच्चभ्रूचा शोक

आता मात्र सर्व बदलत आहे
धर्म हा नामधारी,जात-पात
कृतीशील कृत्रिम घटना
लिहिण्यासाठी

आता मात्र हद्द झाली
महापुरुषाची वाटणी
इतिहासाची नवनिर्मिती
स्वार्थासाठी

ऐहिक मानवकल्याणाच्या स्मृती
देशहित साधण्याला.

- भूषण वर्धेकर
24 July 2009

अब्जावधी

अब्जावधी हृदयाचा ठेका
चाले यांच्यासंगे
लेकरा तुही चाल, चालत रहा
वाट फुटेल तिथे

उगाच काही विचारू नको
कसली उत्तरे शोधू नको
आपणच इतरांची उत्तरे आहोत
असे समजून चालत रहा

तो पहा आपला नेता कुलपती
समाजाचा उद्धार करतोय
कळसासाठी आपल्याच
बांधवांचा रक्ताभिषेक

बाता मात्र क्रांतीच्या,
अभ्युदयाच्या व्याप्तीच्या
सकलांचा कर्दनकाळ
भ्रष्टाचार हाच शिष्टाचार

रक्तमासांचा चिखल करून
ज्याने घडवला हा देश
त्यांचेच वंशज सत्तेवर
सेवा मात्र स्वकीयांची

अखंड तेवणारी
कर्तृत्वाची वात
निर्वात पोकळीशी झुंजते...

२५/०७/२०११
उरूळीकांचन स्टेशन

यत्र तत्र सर्वत्र

यत्र तत्र सर्वत्र
बिनकामाचे मानपत्र
माध्यमांचे त्रिनेत्र
दिखाऊ विकासकामाचे शास्त्र

इव्हेंटचा बागूलबुवा
कृतीचा कांगावा
भाडोत्री गर्दीने पहावा
प्रशासकीय देखावा

झाकपाक टेक्नोसॅव्ही
पोकळ क्रांती ठरावी
गरजवंत असे निनावी
योजनांचे फ्लेक्स गावोगावी

निधीला नसे तोटा
उत्पन्नाचा फुगवटा
करवसुलीचा वरवंटा
विकासपर्वाच्या लाटा

विदेशी गुंतवणूकीला प्राधान्य
गाढवी कामे धन्य धन्य
सरकारी आकडेवारी सर्वमान्य
शेतकऱ्यांचे दारूण दैन्य

--भूषण वर्धेकर
4-10-2015
रात्रौ 11:30
दौंड


आम्ही हिंदू

आम्ही हिंदू, आम्ही हिंदू
विस्कटलेले अनेक बिंदू
कोणाकोणाला आम्ही वंदू
पोकळ सलोख्यातच नांदू

भव्य दिव्य कल्पक कथा
पुराणातील दाहक व्यथा
स्वयंघोषित परमपूज्य आस्था
शांतपणे कुठे टेकवू माथा

भेदरलेल्या संस्कृतीच्या वाटा
माणूसपणाला निव्वळ फाटा
भरकटलेल्या उत्सवांच्या लाटा
तुंबलेल्या दानपेटीतल्या नोटा

गर्जा जयजयकार तयांचा
गांव तेथे सम्राट ह्यांचा
अवडंबर मात्र धनिकांचा
विकलेल्या बाजारू धर्माचा

एकीचे नेकीचे दिव्य समीकरण
एकटेपणाचे वास्तव भीषण
बरबटलेल्या जातींचे ग्रहण
जावे कुठे कुठे शरण

अराजकतेच्या अखंड पसारा
अस्तित्वाच्या शोधात निवारा
निर्मिकाला चकचकीत गाभारा
दीनदुबळ्यांचा आशाळभूत सहारा

--- भूषण वर्धेकर
9-2-13
दौंड

माझा देश खूप मोठाय...

माझा देश खूप मोठाय !

लोकसंख्येत आम्ही अब्जाधिश आहोत,
पण इथं माणसंच राहत नाही जी आहेत ती त्या त्या धर्माने बांधून ठेवलेली गिऱ्हाइकं !
इथं सगळ्या धर्मांचा बाजार आहे माणूसकी चा धर्म सोडून. तो आहे फक्त पाठ्यपुस्तकातच !
इथली गिऱ्हाईकं तशी साधीभोळी, रोजमर्राच्या जगण्यात पिचलेली.
मात्र गावोगावी विखूरलेले गिऱ्हाईकांचे पुरवठादार फार हुशार.
ज्याला त्याला आपापल्या धर्माचा बाजार वाढवायला हुरूप भारी !
काही धर्मांना सरकारदरबारी अनुदाने, सवलती यांची काही कमी नाही तर काहींना प्रसारासाठी परदेशी देणगी प्यारी.
काही धर्म अतिप्राचीन अस्तित्वाच्या भांडवलावर हेलकावे खात धडपडतायत. बिचाऱ्याला सुशिक्षितांकडून खस्ता खाव्या लागतात!
इथं कोणी मेला रे मेला कि त्याची धार्मिक चिरफाड होते.
ज्याची संख्या तुलनेने कमी त्याचा जागतिक उदो उदो !
इतर धर्मातले मेले काय अन जगले काय याचे कोणालाच देणेघेणे नाही! आताशा सहिष्णू आणि असहिष्णू असे दोन जुनेच पाहुणे नटून थटून आलेत.
यांचा वावर सध्या अतिउच्चशिक्षित लोकांकडे आहे. ते म्हणतील तसं वागतात. गेलाबाजार इतरही पाहुणे आहेतच !
सवर्ण, बहुजन, दलित, मागास, अतिमागास आणि उर्वरीत!
ज्याची त्याची सोय जो तो धर्म राखीव गोदामात करतच असतो.
गिऱ्हाईकांची कमी नसल्याने सगळी गोदामं तुडुंब भरलेली आहेत.
मागणी तसा पुरवठा तत्वावर बाजार तेजीत चालूय !
माणूसकीची मंदी मात्र दिवसेंदिवस वाढतंच चाललीय !!!

--------------------
भूषण वर्धेकर
19-01-2016
रात्रौ 11:20
हडपसर
----------------------

खरा तो एकची धर्म - विडंबन

खरा तो एकची धर्म - विडंबन  (साने गुरुजी यांची क्षमा मागून) खरा तो एकचि धर्म जगाला जिहादी अर्पावे जगी जे हीन अति धर्मभोळे जगी जे दीन लुळे पां...