साधना साप्ताहिक संपादकीय - प्रतिसाद

साधना साप्ताहिक संपादकीय - प्रतिसाद 

आता भारतातील मुस्लिमांनी काय करावे? यावरील माझा प्रतिसाद 

https://www.weeklysadhana.in/view_article/editorial-ram-madir-and-indian-muslims


माझं व्यक्तिगत मत असे आहे की, पुरोगामी म्हणून मिरवणारे जोवर इस्लाम ची परखडपणे चिकित्सा करत नाहीत तोपर्यंत हे धार्मिक ध्रुवीकरण करण्यासाठी हिंदुत्ववादी लोकांना खूप मोठी स्पेस मिळत राहणार. सहिष्णू हिंदू हा सर्व प्रकार पाहून शांत आहे कारण त्याला सध्याच्या राजकीय चिखलफेकीत कसलाही इंटरेस्ट नाही.

एक महत्त्वाचे विधान करतोय. आजघडीला भारतात जर पुरोगामी म्हणून पुढारलेल्या विचारांचा प्रचार प्रसार करायचा असेल तर जन्मतः हिंदू असणे गरजेचे आहे. मुस्लिम, ख्रिस्ती, बौद्ध आणि उर्वरीत धर्माच्या लोकांना पुरोगामी विचारांचा प्रचार प्रसार करता येणं भारतात तरी त्रिवार शक्य नाही. कारण हे लोक स्वधर्मातील आस्था, अस्मिता वगैरे गोष्टींवर टिकाटिप्पणी, टिंगलटवाळी करू शकतात का? नाही करू शकत. त्यासाठी मुळातच तुम्हाला धर्म नाकारण्याचे स्वातंत्र्य असावे लागते. हिंदू धर्म कधीही कोणालाही सक्ती करत नाही. आजकाल प्रतिवाद केला जातो की अमेरिकेत वा युरोपात बहुसंख्य लोक ख्रिस्ती धर्माचे असून तिथे ख्रिस्ती धर्मावर, येशूवर वाट्टेल ते बोलले तरी चालते. तिकडचे लोक पुढारलेल्या विचारांचे आहेत. मग भारतात बहुसंख्य लोक हिंदू असूनही एवढे तात्काळ प्रतिक्रियावादी का झाले? याची कारणमीमांसा होणं गरजेचं आहे. 

कधीकाळी ख्रिश्चन धर्मात पण सनातनी म्हणाव्या अश्या चालीरिती होत्या. धर्माच्या नावाखाली सर्वाधिक जागतिक हिंसाचारात ख्रिश्चन धर्माचा पहिला क्रमांक आहे. मिशनरी चालवणारे, पोप, धर्मगुरू वगैरे लोकांनी धर्मप्रसार करण्यासाठी नृशंस हिंसा केली होती हे ऐतिहासिक सत्य आहे. कालांतराने दोन महायुद्धात होरपळून निघाल्यावर ख्रिस्ती धर्म बराच पुढारला. वैचारिक क्रांती वगैरे झाली असे म्हणता येईल. कारण येशूची टिंगलटवाळी करण्यात आज युरोप, अमेरिका आघाडीवर आहेत. कारण धार्मिक आक्रमणं युरोप अमेरिकेत इतिहासात कधीच झाली नव्हती. ते होणं शक्य पण नव्हतं. दरोडेखोरांच्या घरावर कोण दरोडा टाकणार? ख्रिस्ती धर्माचा इतिहास फार रंजक आहे. त्यांनी धर्म प्रसार, प्रचार करण्यासाठी केलेले कारनामे तर प्रचंड मोठे आहेत. त्यावर वेगळी चर्चा होईल. सध्यातरी बहुसंख्य ख्रिश्चन आणि बहुसंख्य हिंदू यांमध्ये ख्रिस्ती धर्मीय पुढारलेल्या विचारांचे आहेत वगैरे म्हणणे तर्काला धरून नाही. भारतीयांच्या परिप्रेक्ष्यात बऱ्यापैकी वेगवेगळ्या ऐतिहासिक घटनांचे संदर्भ फार महत्त्वाचे आहेत.

भारतात हिंदू बहुसंख्य आहे म्हणून हिंदू देव, देवता, आस्था आणि अस्मिता वगैरेंवर टिका, टिप्पणी, टिंगळ-टवाळी ,शिवीगाळ झाली वा प्रश्न विचारुच नयेत का? असा प्रश्न विचारण्या आधी सध्याची राजकीय व सामाजिक परिस्थिती आणि लोकमानस विचारात घेण गरजेचं आहे. जर आज हिंदूंच्या श्रद्धेय व्यक्तींची, देव दवतांची किंवा आस्था अस्मितांची खोचकपणे अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली टिंगलटवाळी करत असाल तर भारतीय सर्वसामान्य हिंदू हा चिडणारच! तो का चिडतो ह्याची वेगवेगळी कारणं आहेत. केवळ सर्वसामान्य हिंदू चिडतो म्हणजे तो हिंदुत्ववादी लोकांना शरण गेला आहे असं अजिबात नाही. कारण देवभोळ्या भारतीय जनतेवर आस्था आणि अस्मिता यांचा विशेष प्रभाव आहे. त्यांना जर का कोणत्याही माध्यमातून डिवचले गेले तर लोकांचा उद्रेक होणं साहजिकच आहे. उदाहरणार्थ जर कोणी पैगंबरांवर काही बोललं तर सर तन से जुदा वगैरे होऊ शकते. किंवा मदर तेरेसा यांच्या वर लोकसत्तामध्ये 'असंतांचे संत' अग्रलेख लिहिला म्हणून भावना दुखावल्या आणि मग अग्रलेख मागे घेतला वगैरे गोष्टी काही नव्या नाहीत. भारतात अल्पसंख्याक समाजातील लोकांना एका इकोसिस्टम चे कोंदण आहे. त्यावर भारतात तरी विशेषतः कोणताही कलाकार वा साहित्यिक टीकाटिप्पणी, टिंगलटवाळी वा खोचकपणे लिहित नाही वा व्यक्त होत नाही. अशा परिस्थितीत कट्टरपंथी उजव्या विचारसरणीच्या लोकांना आयतं कोलित मिळते. धार्मिक ध्रुवीकरण होण्यासाठी सध्याचं वातावरण प्रचंड ज्वलनशील झाले आहे. हे कोणामुळे झाले? कशामुळे झाले? कट्टर हिंदुत्ववाद्यांमुळे की सोयीस्कर पुरोगाम्यांमुळे? ह्यावर वेगळी चर्चा होऊ शकेल. बहुसंख्य भारतीय समाज हा धार्मिक, सहिष्णू आणि देवभोळा आहे. 

जागतिकीकरण सुरू झाले आणि विस्थापित होऊन लोकांना रोजगाराच्या अमाप संधी उपलब्ध झाल्या. जागतिकीकरण येण्याआधी विस्थापितांना संधी होत्याच पण त्याचे प्रमाण केवळ व्यवसाय, व्यापार यासाठी मर्यादित होते. भारतातून परदेशात नोकरीसाठी विस्थापन केलेल्यांची संख्या १९९० च्या आधी अत्यल्प प्रमाणात होती. विशेषतः गेल्या तीन दशकांत युरोपात आणि अमेरिकेत स्थलांतरित झालेल्या लोकांची संख्या प्रचंड वाढली आहे. याच स्थलांतरित लोकांमध्ये हिंदूंचे प्रमाण बरेच आहे. हे प्रमाण हिंदूमधील जातिनिहाय किती वगैरे करत बसायची सध्या तरी गरज नाही. कोणत्या जातीतील लोक जास्त स्थलांतरित झाले यावर वेगळा लेखप्रपंच होईल. हिंदू म्हणून जेव्हा भारतीय माणूस स्थलांतरित करतो तेव्हा तो प्रदेशात भारतीय हीच ओळख दाखवतो. ज्या ज्या ठिकाणी स्थायिक होईल तिथे मिसळून जातो. तिथल्या संस्कृती सोबत मिसळून सामाजिक, प्रांतिक आणि भाषिक सभ्यतेच्या वातावरणात मिळून जातो. भले तिथे भारतीय कम्युनिटी करून राहत असेल सुरक्षिततेसाठी. मात्र तिथल्या स्थानिक पातळीवर कधीही हिंदू धर्माचा आक्रमकतेने प्रचार, प्रसार करत नाही. की कट्टरवादी तत्त्वांचा अंगीकार करत नाही. याच्या उलट मुस्लिम समाज युरोपात विशेषतः स्थलांतरित झाला. तिथे धर्माच्या नावाखाली एक झाला. त्यातूनच इस्लामिक कट्टरपंथीय तत्वांचा त्यात शिरकाव झाला. त्याचे पडसाद फ्रान्स मध्ये झालेल्या जाळपोळीच्या घटनांमध्ये दिसते. मानवतेच्या नावाखाली स्थलांतरित लोकांना सोयीसुविधांचा पुरवठा करणं गरजेचं. पण त्याच पुरवठ्याच्या जोरावर कट्टरपंथीय तत्वे जर धुडगूस घालत असतील तर चूक कोणाची? सोयीसुविधा पुरवणाऱ्यांची की कट्टरपंथीयांची? यावर कधी साधकबाधक चर्चा करायला पाहिजे. हे प्रश्न जसे परदेशात स्थलांतरित लोकांमुळे तयार झाले. तसेच भारतातील सीमेलगतच्या राज्यात पण बांगलादेश, पाकिस्तान, म्यानमार मधून आलेल्या अनधिकृत निर्वासित मुस्लिम समाजाचे पण आहेत. मानवतावादी दृष्टिकोन ठेवून काही सवलती, सोयीसुविधा उपलब्ध करून देणं गरजेचं. पण त्याचा उपयोग अल्पसंख्य आहेत म्हणून लांगूलचालन करण्यासाठी होत असेल तर चूक व्यवस्थेची. 

इस्लामिक दहशतवाद, जिहाद वगैरेंच्या विरोधात खरी लढत आणि प्रतिकार हा सुशिक्षित मुस्लिम समाजाने सर्वप्रथम करायला पाहिजे. पण समाजावर मुल्ला मौलवी वगैरेंची पकड घट्ट असल्याने हे होत नाही. भारतातील विवेकी, नास्तिक, अज्ञेयवादी आणि खरेखुरे पुरोगामी लोकांनी ह्यासाठी विशेष पुढाकार घ्यायला हवा. पण तसे होणार नाही. कारणं अनेक आहेत. त्यापैकी महत्त्वाचे राजकीय परिप्रेक्ष्यात इस्लाम समाज नेहमीच वापरला गेला. धर्माच्या नावाखाली सहज एकत्र येतो म्हणजे कोणाच्या तरी राजकीय स्वार्थापोटी वापरला जातो हे उघड सत्य आहे. मुस्लिम समाजातील चालीरिती, रुढी, परंपरा आणि बुरसटलेल्या विचारांचे आजपर्यंत भारतात खूपच कमी सुधारणावादी विचारवंतांनी परखडपणे भाष्य केले आहे. हमीद दलवाई यांचे किती विचार मुस्लिम समाज फॉलो करतात. का करत नाहीत? सध्याच्या काळात पुरोगामी म्हणवून घेणाऱ्या मंडळींनी कितीवेळा हमीद दलवाई यांच्या विचारांवर मुस्लिम समाजात जनजागृती केली आहे? केवळ हमीद दलवाई यांचा स्मृतिदिन किंवा जयंती वगैरे असेल तेव्हा कुठेतरी छोटेखानी कार्यक्रम होतात किंवा कुठल्यातरी नियतकालिकात काही वैचारिक संस्मरणे छापून येतात. ह्याच्या उलट सनातनी हिंदू धर्मातील चालीरीती, परंपरा आणि रुढी यांच्या बाबतीत टिका, समीक्षा किंवा परखड भाष्यं ज्यांनी ज्यांनी आजवर केली त्यांचा राजकीय परिप्रेक्ष्यातून खूप वेळा वापर केला गेला.

इस्लाम धर्मातील बाबींवर तस्लिमा नसरीन यांच्या लिखाणात सडेतोडपणे विचार मांडलेले आहेत. तस्लिमा नसरीन यांच्या साहित्याचे किती मुस्लिम स्कॉलर समर्थक आहेत? का नाहीत? तसंही बऱ्याच वलयांकित विचारवंत आणि समीक्षकांनी नसरीन यांच्या साहित्याची फारशी दखल घेतली नाही. कदाचित त्यांना हवा तसा साहित्यिक अवकाश आणि सामाजिकदृष्ट्या प्रगल्भता जाणवली नसेल. कारणं काहीही असतील. मात्र एक तर इस्लामिक चालीरीती, परंपरा आणि बुरसटलेल्या विचारांविरुद्ध खूप कमी लोकांनी तात्विक विवेचन केले आहे. खूप वर्षांपूर्वी तस्लिमा नसरीन यांना महाराष्ट्रात विरोध करणारे काही तत्कालीन औरंगाबादच्या (आताचे छत्रपती संभाजीनगर) मुस्लिम संघटना आघाडीवर होत्या. कदाचित त्यावेळी सरकार पण कॉंग्रेस चे असावे त्यामुळे त्याचा बागुलबुवा झाला नाही. त्यावेळी अभिव्यक्ती स्वातंत्र्य वगैरे पण आज सारखं रुळलं नव्हतं. आज व्हॉटअबाउटिझमनं परमोच्च बिंदू गाठला आहे. त्यामुळे हिंदूंच्या अस्मिता, प्रतिकं कुठंही बाधित झाली की लागलीच मुस्लिम वगैरे धर्म चघळले जातात.

आजवर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदू आणि मुस्लिम धर्माची परखडपणे आणि सडेतोड चिकित्सा, समीक्षा केली आहे. मात्र पुरोगामी म्हणून मिरवणाऱ्यांना हिंदू धर्माबद्दल केलेली चिकित्सा, समीक्षा मिरवायला आवडते. कारण ती त्यांची सोशोईकोपॉलिटिकल नेसेसिटी असते. किती आंबेडकरवादी मंडळी इस्लाम बद्दल आंबेडकर यांनी मांडलेल्या विचारांचा प्रचार, प्रसार करतात? का करत नाहीत? महाराष्ट्रात असा कोणता सध्याच्या काळात पुरोगामी वा नास्तिक वा विवेकी विचारवंत आहे ज्यांनी परखडपणे इस्लाम धर्मातील सुधारणांवर सडेतोड भाष्य केले आहे? का नाही? कुराण, हदीस आणि शरीया बद्दल चिकित्सा केली आहे का कोणी? का केली नाही? का फक्त मनुस्मृती दहन केले आणि मनुस्मृती वर परखडपणे बोलणे, टिका करणे एवढंच लिबरल होण्यासाठी आवश्यक आहे का? 

सर्वधर्मसमभावाचे कंबरडेच मोडले आहे आपल्या राजकारणी लोकांनी सेक्युलॅरिझमच्या नावाखाली. सध्याच्या काळात खरी लढाई ही सहिष्णू हिंदू विरुद्ध सनातनी हिंदू आणि संयमी हिंदू विरूद्ध कट्टर हिंदुत्ववादी अशी आहे. सत्ता टिकवण्यासाठी जातीच्या आणि धर्माच्या नावाखाली लोकांना भडकावणं सहजसाध्य असतं. कोणी धर्माच्या आधारावर तर कोणी जातीच्या आधारावर ध्रुवीकरण करतात. ही व्यवस्था तशीच वापरली गेली. सेक्युलॅरिझमच्या नावाखाली मतपेटीसाठी राजकारण होत असल्याने हिदू मुस्लिम वगैरे गोष्टी होत आहेत. ह्या होतच राहणार कारण हिंदुत्ववादी लोकांचे सॉफ्ट टार्गेट हे मुस्लिमांचे होणारे लांगूलचालन असते. तेच त्यांच्या लढाईचे सर्वात मोठे इंधन असते. उदाहरणार्थ ब्राम्हणद्वेष हे असेच सॉफ्ट टार्गेट बहुजन दलितांच्या राजकीय फायद्यासाठी आजवर वापरले गेले आहे. ह्यावर वेगळी चर्चा होऊ शकेल. किमान एक दोन प्रबंध लिहिले जातील एवढे मोठे सामाजिक, राजकीय आणि आर्थिक बदल गेल्या दोन तीन दशकांत झाले आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मराठा आरक्षण आणि वास्तव

मोदीस्तोमाची दशकपूर्ती

विवेकवादी हतबलता - पूर्वार्ध