जय सियाराम

सामुहिक ध्येय जनमानसात रुजविण्यासाठी नेतृत्व पण तेवढेच प्रभावशाली पाहिजे. एकदा का ध्येयपूर्ती झाली की राबत असलेली संघटीत व्यवस्था जनसामान्यांत अधिक बळकट होते. हीच व्यवस्था प्रभावशाली नेतृत्वाचा चपखलपणे वापर करते जनसामान्यांच्या मनात आपापली मूळं बळकट करण्यासाठी. 

कधीकाळी अशी जनसामान्यांच्या सहभागातून उभी राहीलेली चळवळ कॉंग्रेसच्या पथ्यावर पडली. आता श्रीरामाच्या मूर्तीची मंदिरात होणारी स्थापना आणि त्यामुळे देशभरात लोकसहभागातून साजरे होणारे उत्सव याचा भाजपाला फायदा होणार हे निश्चित.

स्वातंत्र्य मिळवण्यासाठी तत्कालीन समाजात वेगवेगळ्या घटकांचे जसे योगदान होते. अर्थातच इंग्रजांसोबत वाटाघाटी करायला कॉंग्रेस अग्रभागी होती कारण व्यवस्था तशी उभी राहिली होती. त्यावेळी कॉंग्रेसची व्यवस्था आघाडीवर होती कारण तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी तसा कार्यकर्त्यांनी त्याग केला होता. स्वातंत्र्यपूर्व काळात टिळकांनी अशी प्रभावशाली सुरुवात धुमधडाक्यात केली. सार्वजनिकरित्या गणेशोत्सव आणि शिवजयंती साजरी करून. मखरातल्या गणपतीची प्रतिष्ठापना जनसामान्यांच्या समुहात गल्लोगल्ली उत्सव साजरे केले. विविध कार्यक्रमांच्या आयोजनात उस्फुर्त लोकसहभाग वाढला. तर महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करुन खूप मोठ्या जनसमुदायाला आकर्षित करता आले. टिळक निवर्तले आणि स्वातंत्र्यलढ्याची सूत्रे कॉंग्रेस कडे सर्वार्थाने गांधींजी यांच्याकडे आली. गांधीजींचा फार मोठा प्रभाव जनसामान्यांवर होता. त्याचा सर्वाधिक फायदा कॉंग्रेसलाच झाला. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर कॉंग्रेसकडे आपसूकच सगळी व्यवस्था तयार होती तीचा वापर चपखलपणे राजकारणात तत्कालीन नेतृत्वाने यथासांग केला. त्यातूनच पुढे संस्थानिकांच्या आणि घराण्याचा राजकीय वारशांचा उदय झाला. पर्याय नसल्याने जनतेने तो स्वीकारला. मग पुढं जे घडलं त्याचा इतिहास सर्वज्ञात आहे. 

तसेच रामजन्मभूमी आंदोलनात अनेक सर्वसामान्य (धार्मिक, हिंदूत्ववादी आणि देवभोळ्या) लोकांचा सहभाग होता. अनेक संघटनांचे योगदान होते. तीस वर्षांपूर्वी अयोध्या प्रकरणात देशाचं राजकारण, समाजकारण ढवळून निघाले होते. तेव्हा भाजपाची संघटना बाळसं धरत होती. आज मात्र भाजपा आघाडीवर आहे कारण त्यांच कार्यकर्त्यांचं जाळं गावागावांत पोचले आहे. या घटनेमुळे भाजपाच्या गावपातळीवरील संघटनेचा फायदाच होणार आहे. स्वातंत्र्यलढ्याची चळवळ आणि रामजन्मभूमी आंदोलन ह्या खूप वेगळ्या घटना आहेत. ह्या दोन्ही मध्ये एकच सामाईक बाब आहे ती म्हणजे जनसामान्यांच्या उस्फुर्त सहभाग. गावागावांत रामरक्षा पठण करणारे किंवा अक्षता कलशाची शोभायात्रा करणारे लोक कोणत्याही एका पक्षाचे कार्यकर्ते नाहीत. हिंदुत्ववादी जरी फ्रंटवर असतील तर धार्मिक आणि देवभोळ्या जनतेचा सहभाग हा अभूतपूर्व आहे. जातपात विसरून असं एकत्र येणं खूप सूचक आहे. हा लोकसहभाग वाढतोय. 

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संघाचे, भाजपाचे कार्यकर्ते जरी आघाडीवर असले तरी सर्वपक्षीय कार्यकर्ते एकत्र येऊन महोत्सवात सहभागी होत आहेत. जी मंडळी सहसा कुठल्याही कार्यक्रमाला हजेरी लावत नाहीत ती मंडळीही केशरी टोप्या भगवी पताका घेऊन कार्यक्रमांना हजेरी लावत आहेत. संध्याकाळी हरिपाठ, भजन, किर्तन, भक्तीगीते, गीतरामायणाचे आयोजन केले जात आहे. अनेक सोसायटीच्या आवारात क्लबहाऊस मध्ये किंवा तात्पुरते स्टेज उभारून गाण्याच्या कार्यक्रमात हवशे नवशे गवशे मंडळी गाण्याच्या नावाखाली घसे साफ करत आहेत. गणेशोत्सवात चालणारा डीजेचा दणदणाट, गोंगाट आणि धांगडधिंगा विशेषतः टाळला जातोय हे महत्त्वाचे. कदाचित येत्या रामनवमी , हनुमान जयंती निमित्त डीजे, लेझर लायटीचे आगमन होऊ शकते काही सांगता येत नाही. पण वातावरणात सुरुवातीला जी कृत्रिम निर्मिती होतीय असं जाणवत होतं तसं न राहता गावपातळीवरील मंदीरांपासून ते टाऊनशिप मधल्या उच्चशिक्षित लोकांपर्यंत हे एकत्र जुलूस, शोभायात्रा वगैरे मध्ये जनतेचा सहभाग वाढतोय. असं प्रचंड प्रमाणात लोकांनी एकत्र येणं माझ्या पिढीनं पहिल्यांदा अनुभवलं आहे याची देही याची डोळा. भविष्यात काय होणार हे पाहणं इंटरेस्टिंग असेल.

|| जय सियाराम ||

©भूषण वर्धेकर 
१६ जानेवारी २०२४
पुणे 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मराठा आरक्षण आणि वास्तव

मोदीस्तोमाची दशकपूर्ती

विवेकवादी हतबलता - पूर्वार्ध