बुधवार, १९ एप्रिल, २०२३

पुरस्कार

पुरस्कार - विडंबन (मूळ कविता केशवसुतांची - तुतारी)

एक पुरस्कार द्या मज आणुनि
मिरवीन मी जो मुक्तकंठाने
भडकूनी टाकिन सगळी माध्यमे
प्रदीर्घ ज्याच्या त्या चित्काराने
असा पुरस्कार द्या मजलागुनी

शासनाच्या परीटघडीचे
व्यवहार असे जे आजवरी
होतील ते मला सत्वरी
भाषणे देता त्या समयी
कोण पुरस्कार तो मज देईल?

इकोसिस्टिम त्यांची खंबीर
प्रशासन आंदण तुम्हाला
हळूच ढापती लीलया
महामेळावा जनसागराला
पुरस्काराचे समालोचन हवे तर?

सत्कार! ते बक्षिसे घेऊनी
सुंदर, सोज्ज्वळ मोठी शिल्पे
अलिकडले टीकाकार ते
ओरडती धरुनी आपटूनी बोटे
चित्कार करुद्या सर्वांना

निषेध जाऊ द्या वाऱ्यावरती
फेकुनी किंवा दुर्लक्ष करा
न कळता प्रतिमा उंचवा
हळूच! ठरवा पुढचे पुरस्कार
कंपूत चला डोकं बुडवूनी

सांप्रत काळ हा मिरवण्याचा
सोशल मेडिया आहे साथीला
गर्जूनी त्यावर फॉरवर्ड करा
बसल्या जागी व्हायरल करा
दिखाऊ पणा करु चला तर!

लाळ घुटमळूनी सैल संचार
गावोगावी हिंडून मैलभर
गत इतिहासाची मढी उकरुन
रक्तरंजित वसा उगाळून
पाहिजेत रे! पुरस्कारांची रीघ

जातपातधर्माचे भांडणं लावून
जनसेवेला आणिती अडथळे
एकामागोमाग सैरभैर मुद्दे
अनैतिकता पदसिद्ध भले
पुरस्कारार्थी होतसे इथे

©भूषण वर्धेकर
१९ एप्रिल २०२३

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

खरा तो एकची धर्म - विडंबन

खरा तो एकची धर्म - विडंबन  (साने गुरुजी यांची क्षमा मागून) खरा तो एकचि धर्म जगाला जिहादी अर्पावे जगी जे हीन अति धर्मभोळे जगी जे दीन लुळे पां...