रॉकेट्री - द नंबी इफेक्ट

रॉकेट्री - द नंबी इफेक्ट

आर. माधवन दिग्दर्शित रॉकेट्री चित्रपट नव्या युगात वैज्ञानिक राष्ट्रवादाची मुहूर्तमेढ ठरेल असा बनवला आहे. आजवर ऐतिहासिक राष्ट्रवाद ऊतू जाईल एवढे सिनेमे आलेले आहेत. अशा प्रत्येक चित्रपटात कोणाला कोणीतरी आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करतात. किंवा शत्रू पक्ष म्हणून ठरवून चित्रपटाची बांधणी आणि मांडणी करतात. रॉकेट्री चित्रपट मात्र भलेही राष्ट्रवाद, वैज्ञानिक क्षेत्रातील घडामोडी यावर आधारित असेल तरीही भडक आणि भंपक वाटत नाही. यात कोणीही कोणाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करून कसलेही आडाखे तडाखे दिलेले नाहीत. काही शक्यता असू शकतात, प्रशासन शासन आणि यंत्रणा यातील त्रुटींवर तिखट भाष्ये केली आहेत. वैज्ञानिक क्षेत्रातील संस्था कशा काटकसरीने कारभार करतात हे यात व्यवस्थित योजनाबद्ध पद्धतीने दाखवले आहे. अर्थातच नंबी नारायण यांच्या आयुष्यातील आलेले आणि आणलेले चढ उतार आर. माधवनने काही फिल्मी तर काही रोमांचक पद्धतीने दाखवले आहेत. आर. माधवन तसा जबरदस्त टॅलेंट असलेला अभिनेता. या सिनेमात अभिनयाच्या बाबतीत तर तो उजवाच ठरलाय. दिग्दर्शक म्हणून पहिल्यांदा समोर येतोय. सिनेमा मेकिंग चे बारकावे टिपण्यात तो कमालीचा यशस्वी ठरलाय. मध्यंतरापूर्वी चित्रपट मनाची पकड तर घेतोच. शिवाय स्वातंत्र्योत्तर काळात कशाप्रकारे वैज्ञानिक क्षेत्रात भारतीय वैज्ञानिक, तंत्रज्ञ आणि संस्था उभ्या राहत हे पण काही संदर्भातून समजतं. मध्यंतरानंतर सिनेमा थोडासा रेंगाळलेला वाटला मला. कदाचित ते दिग्दर्शकाने नंबी नारायण यांचा संघर्ष एस्टॅब्लिश करण्यासाठी सिनेमॅटिक लिबर्टी घेतली असावी. 

सिनेमा दोन पातळ्यांवर समांतरपणे घडतो एक नंबी नारायण यांची कारकीर्द कशी घडत गेली, कशा पद्धतीने त्यांच्या विरोधात आरोपांची चौकशी झाली आणि त्याचा लढा. दुसरी पातळी म्हणजे भारतीय अंतराळ क्षेत्रात कार्यरत असलेल्या वैज्ञानिक, तंत्रज्ञ आणि त्यांच्या प्रयत्नांना मिळणारे यशापयश. हे दाखवताना दिग्दर्शकाने कोणालाही लार्जर दॅन लाईफ दाखवले नाही की मेडिया ट्रायल करतात त्याप्रमाणे अमुकतमुक आरोपी ठरवून भाषणबाजी दाखवली नाही. नंबी नारायण यांचा लढा हा फार वेगळा आहे. त्यामुळे उपग्रहाचे प्रक्षेपण करण्याची स्वयंपूर्ण यंत्रणा सहज उभी न राहता अडखळली. अर्थात यात बऱ्याच कॉन्स्पीरेन्सी थिअरीज आहेत. हॉलिवूडमध्ये अशा एकेका थिअरीच्या एकेका थ्रेडवर किमान एक सिनेमाची सिरिज होऊ शकते. माधवन ने मात्र त्याचा हात आवरता घेतलाय. टू द पॉईंट गोष्ट सांगून सगळ्या सरकारी यंत्रणा, प्रशासकीय करभार पाहणारे मंडळी यांच्या मर्यादा किमान सिन्स मध्ये कमाल दाखवल्या आहेत. मुळातच स्वातंत्र्योत्तर भारतात कोणत्याही क्षेत्रात जे जे काही घडले ते पायोनियर असेच होते. टीम वर्क तसेच होते. इथे कोणी हिरो नाही व्हीलन नाही. फक्त विज्ञान क्षेत्रातील परिवर्तनाचा बदलांचा वेग प्रचंड मंदावलेला होता. त्यातही भारतीय वैज्ञानिकांनी किमान उपलब्ध असलेल्या स्रोतांचा वापर करून बऱ्यापैकी यशस्वी प्रयोग केले. या आशयाचे अनेक चित्रपट, ओटीटी वरील निवडक सिरिजेस पाहिल्यावर तशी कल्पना येते. मात्र या रॉकेट्री सिनेमात लाईफ ऑफ नंबी नारायण कसलेही आढेवेढे न घेता दिग्दर्शकाने दाखवली आहे. शेवटचं खरेखुरे नंबी नारायण यांचं वक्तव्य विचार करण्याजोगे आहे. त्यांच्या एकूण लढ्याला मिळालेला पाठिंबा त्यांच्या वर झालेले आरोप हल्ले पाहून असे कितीतरी वैज्ञानिक क्षेत्रातील शापित गंधर्व आज आपल्या देशात राहतात असे जाणवते. देशासाठी काहीतरी करण्याचा संघर्ष फक्त सामाजिक, राजकीय, आर्थिक असतो असं नव्हे. वैज्ञानिक क्षेत्रात जेवढे अमुलाग्र बदल होतील त्यासाठी लागणारा राजकीय आणि आर्थिक पाठींबा जर कणखर असेल तर देश महासत्ता, स्वयंपूर्ण वगैरे नक्कीच होऊ शकेल. त्यासाठी सोडवाव्या लागणाऱ्या समस्या ह्या अंतर्गत गुंतागुंतीच्या असतात. हल्लीच्या भाषेत देशाचा जीडीपी वाढवायचा असेल किंवा अमुकतमुक ट्रिलियन वगैरे अर्थव्यवस्था करायची असेल तर मूलभूत वैज्ञानिक संशोधन आणि त्याचे प्रभावीरीत्या उपयोजन करणे खूप गरजेचे आहे. वैज्ञानिक क्षेत्रातील संशोधन जेवढे स्वावलंबी तेवढे राष्ट्री स्वयंभू. मात्र आपल्याकडे असणारी वैज्ञानिक क्षेत्रातील, संशोधन क्षेत्रातील आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनास्था ह्या कधीही राजकीय पटलावर आल्या नाहीत. जातपातधर्म आणि सोकॉल्ड विचारधारा यावरच सगळ्या राजकीय कुस्त्या झाल्या. त्यामुळे वैज्ञानिक अधोगतीला राजकीय इच्छाशक्ती, वैज्ञानिक दृष्ट्या मागासलेल्या विचारधारा, शैक्षणिक उदासीनता आणि ढिसाळ कारभारी ह्याच कारणीभूत आहेत. भारतीय लोक बुद्धीमान आहेतच यात वाद नाही मात्र त्यांचं टॅलेंट देशासाठी वापरण्यासाठी आवश्यक असलेला सामाजिक आणि राजकीय प्रगल्भता कोणाकडे नाही. तशी व्यवस्था पण या देशात बळकट नाही.

सिनेमात बऱ्याच वैज्ञानिक संकल्पना आणि मूलभूत नियमानुसार केल्या जाणाऱ्या वैज्ञानिक चाचण्या यांच्याबद्दल बरेच उल्लेख आहेत. जे लोक विज्ञानाच्या किंवा इंजिनिअरिंग क्षेत्रात असतील त्यांना ते ओळखीचे नक्कीच वाटतील. इंटरनल कंबशन इंजिन आणि त्याचे कार्य वगैरे कधीकाळी अभ्यासताना द्रवरूप आणि स्थायूरूप इंधन, दाब आणि हीट, मास ट्रान्सफर वगैरे संदर्भ उगाचंच आठवत होते. औद्योगिक क्रांती झाली आणि अशी सगळी कारणीभूत ठरलेली आयुधं, साधनं आणि यंत्रे सार्वजनिक जीवनात कमालीची परिचयाची झाली. त्यामुळे अनेक विद्याशाखा तयार झाल्या प्रशिक्षित मनुष्यबळ तयार करण्यासाठी त्यातून बऱ्याच राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर उलाढाली झाल्या वगैरेचा सालंकृत इतिहास हा सिनेमात कुठेन् कुठेतरी डोकावतो. त्या वैज्ञानिक पद्धतीने जास्त विस्तृतपणे जर सिनेमात दाखवल्या असत्या तर अजून मजा आली असती. कदाचित दिग्दर्शकाने सिनेमा माहितीपट होऊ नये म्हणून जागोजागी हात आवरता घेतलाय की काय असे जाणवते. 

एकूण पहिलाच प्रयत्न आहे माधवनचा दिग्दर्शक म्हणून असे जाणवत नाही सिनेमा बघताना. सिनेमात दाखवलेल्या इतर पात्रांनी पण साजेसा अभिनय केला आहे. उगाचंच मेलोड्रामा कटाक्षाने टाळलेला जाणवतो. फिल्मी टेकिंग आहे बऱ्याचशा सीन्समध्ये. भारतीय सिनेमा म्हटलं की चालायचंच. मात्र अभिनय उत्तम. बॉडी लँग्वेज आर. माधवनने भारी पेललीय. टेक्निकल आस्पेक्ट्स सिनेमात येत राहतात. सरतेशेवटी संघर्षाची कहाणी ही मानवी पातळीवर आणायची असेल तर कौटुंबिक ससेहोलपट दाखवली की निम्म काम सोपं होतं कोणत्याही घटनेचं. त्यात सिनेमात हे येतंच येतं. एवढं सगळं सहन करून लढण्याची जिद्द शेवटपर्यंत ठेवणं हे फार जिकिरीचे असते. ते प्रत्यक्षात नंबी नारायण यांची याची देही याची डोळा अनुभवलं आहे. शेवट कटू गोड व्हावा तसा नंबी नारायण यांना मिळालेला पद्मभूषण पुरस्कार, त्यांचा निर्दोषत्वाचा कोर्टाने दिलेला निकाल आणि त्यांना मिळालेल्या भरपाया याचे धावते संदर्भ सिनेमात शेवटी येतात. मोदींच्या भाषणाचा एक व्हॉईस ओव्हर शेवटी येतो. तो ऐकून नेहरू भक्त दुखावतात बहुतेक असे वाटते. उद्या ते अशी ही मागणी करतील की नेहरुंनी वैज्ञानिक क्षेत्रातील ज्या ज्या संस्थांची पायाभरणी केली त्याचे पण संदर्भ सिनेमात असायला पाहिजेत. चालायचंच ही भक्तमंडळी भारतीयांना मनोरंजनासाठी मिळालेली सर्वात डोकीदुखीयुक्त मेजवानी आहे. असो. पण हा रॉकेट्री सिनेमा एकदा का होईना बघितलाच पाहिजे. विज्ञानविषयक विद्याशाखेच्या लोकांना हा सिनेमा पाहताना लढा, संघर्ष करण्यासाठी कशा आणि किती खस्ता खाव्या लागतात हे समजेल. 

©भूषण वर्धेकर
१० जूलै २०२२
पुणे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मराठा आरक्षण आणि वास्तव

मोदीस्तोमाची दशकपूर्ती

विवेकवादी हतबलता - पूर्वार्ध