समाजमाध्यांकित विचारवंत होण्याची दशसुत्री


१. सर्वसामान्य जनतेला ठाऊकच नसलेल्या परकीय लेखकांच्या पुस्तकांची यादी तयार करून त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांबद्दल माहिती वाचावी
२. ही माहीती मराठीत अशा पद्धतीनं लिहायची की वाचणाऱ्याला मूळ लेखकाचे सगळं प्रकाशित अप्रकाशित साहित्य कोळून प्यायला की काय असं वाटावं! ही लिहिलेली माहिती सोप्या आणि जड भाषेत लिहून समाज माध्यमातून पोहोचवावी. सोपी भाषा सर्वसाधारण वाचक तर जड भाषा प्रगल्भ वाचक.
३. प्रगल्भ वाचकांचा अपेक्षित प्रतिसाद न आल्यास असे वाचक कसे फक्त लोकप्रिय आणि रसिकप्रिय लेखकाची पुस्तके वाचतात यावर काथ्याकूट करायचा. अशी मंडळी कशी प्रतिगामी अवैज्ञानिक आणि बुरसटलेल्या मानसिकतेची असतात यावर पोष्टी पाडायच्या. 
४. सर्वसाधारण वाचकांचा अपेक्षित प्रतिसाद न आल्यास अशा वाचकांना साहित्यिक जाणच नाही यावर प्रदीर्घ पोस्ट लिहायची. त्यात त्यांच्यावर ब्राह्मणवादी संस्कृती आणि सनातन विचारांचा प्रभाव कीती खोलवर आहे असे टिकात्मक लिखाणातून ठोसपणे लिहायचे.
५. जर दोघांकडूनही अपेक्षित प्रतिसाद मिळाला तर. तर भांबावून न जाता क्रमांक १,२ आणि ३ ची च्या कृती पुन्हा करायच्या. फक्त प्रगल्भ वाचकांना ठाऊक असलेल्या परकीय लेखकांच्या साहित्याबद्दल सोप्या भाषेत लिहावे सर्वसाधारण वाचकांसाठी. इथे वैचारिक प्रमोशनसाठी आणि आत्मप्रौढी मिरवण्यासाठी नामी संधी मिळते. त्यात सामान्य वाचन करणारे लोक मिळाले तरीही बेहत्तर. अशी सुवर्ण संधी सोडायची नाही. आत्मप्रौढी मिरवताना लिखाणातून सेल्फ ऍपिझमेंट करणं महत्वाचं. मी कशाप्रकारे कसलीही सामाजिक राजकीय आर्थिक आणि परंपरागत पार्श्वभूमी नसताना इथपर्यंत आलो आणि टिकलो हे दाखवून द्यावे. इथे स्वतःच्या सामाजिक, साहित्यिक, वैचारिक आणि पुढारलेल्या मानसिकतेचा अवाका दाखवून देण्यासाठी जगप्रसिद्ध पाश्चिमात्य देशांमधील विचारवंतांची पुस्तकं वाचून स्वतःला बदलत गेलो हे ठशीवपणे लिखाणातून मांडावे.
६. एवढं सगळं कशाचीही अपेक्षा न ठेवता जोपर्यत करावे तोपर्यंत तुमचे समाजमाध्यमात फॉलोअर्स वाढत नाहीत. जर फॉलोअर्स वाढले तर त्यांच्यापैकी आर्थिक क्षेत्रात सधन लोकांच्या सानिध्यात राहून वैचारिक मंथन करावे. फॉलोअर्स पैकी कोणी राजकीयदृष्ट्या फायद्याच्या दृष्टीने समक्ष असेल तर संमेलने, चर्चासत्र वा साहित्यिक मेळावे यासाठी आग्रही असावे. या सगळ्यात आपण फक्त मार्गदर्शक म्हणून वावरावे. एक्टीव्ह पार्टिसिपेशन टाळावे आणि दिवसभर जरी घरी रिकामे असलो तरी आगामी मोठ्या प्रोजेक्ट्स बद्दल तयारी चालूय म्हणून वायरी सोडाव्यात. त्यात एखादा शिष्यवृत्ती योजना देण्यासाठी प्रयत्न करत असेल तर मुद्दामहून बहुजन होतकरू लेखकाची नावे पुढे करावीत जेणेकरुन त्यांना वैचारिक व्यासपीठावर फुटेज मिळेल व त्यांच्या लेखी तुम्ही ऋषितुल्य व्हाल.
७. इथपर्यंत जर सगळं सहज शक्य नाही झालं तर आजूबाजूला घडणाऱ्या घटनांचे आपण लिखाणातून अशाप्रकारे अवलोकन आणि सिंहावलोकन करावे की सभोवतालच्या समाजातील लोकांचा आयक्यू हा अश्मयुगीन आहे. आणि जग खूप पुढे गेले तरीही ही मंडळी नॉस्टॅल्जिक चिखलात लोळणारी आहेत असे तिखट शब्दांत सांगावे. 
८. जर कोणी तुमची दखल घेतलीच तर आजूबाजूच्या वातावरणात कल्लोळ माजला असून तुम्ही माझ्यासारख्या पामराची दखल घेतल्याने समाजात अजूनही सुधारणा होण्यासाठी खूप वाव आहे असे छातीठोकपणे सांगावे. त्यासाठी स्वखर्चाने छोटेखानी कार्यक्रम आयोजित करावेत.
९. एवढे प्रयत्न करूनही हाती काहीच लागले नाही तरी नकारात्मक आणि नैराश्याच्या वाटेवर जाऊ नये. जर तशीच अवस्था जाणवली तर त्यातून बाहेर पडण्यासाठी शोषितांच्या, वंचितांच्या, दुर्लक्षित बहुजनांच्या, विस्थापित विस्कटलेल्या जनजाती, आदिवासी लोकांच्या बद्दल तळमळीने लिखाण करावे. त्यांच्यावर सांस्कृतिक दहशतवादाचे सावट आणि आव्हान कसे वाढतेय यावर लिखाण करावे. अशी मंडळीचे ब्राह्मणीकरण होण्यासाठी वर्चस्वतावादी संघटना, नेते कसे कारणीभूत आहेत यावर धाय मोकलून क्रंदन करावे.
१०. ही शेवटची कृती. एवढे सगळे खटाटोप करूनही कोणी म्हणजेच कोणीही तुमची दखल घेतली नाही तर कृती क्रमांक १, २ आणि ३ पुनः एकदा करावी. फरक एकच. आता लोकप्रिय, रसिकप्रिय, सर्वसामान्य लोकांना परिचित असलेल्या लेखकांचं साहित्य उपयोगात आणावे.

® भूषण वर्धेकर
पुणे- ४१२११५
३० सप्टेंबर २०२२
वेळ - वामकुक्षी घेण्यापूर्वी

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गडबडलेलं राजकारण

विवेकवादी हतबलता - पूर्वार्ध

उठ भक्ता जागा हो