माझ्या जंगलगोष्टी

एकदा जंगलात सिंहाने सगळ्या प्राण्यांना एकत्र बोलावून घेतले आणि सांगितले की आपल्याला वाढलेल्या जंगलाचा कारभार पाहण्यासाठी नेमणुका करायच्या आहेत. पण त्या नेमणुका मी राजा असलो तरीही माझ्या मर्जीने करणार नाही. कारण माझा लोकशाहीवर विश्वास आहे. त्यामुळे तुमचे मत विचारात घेतल्याशिवाय माझा निर्णय सांगणार नाही. मग प्रत्येक प्राणीवर्ग आपापले प्रतिनिधी कोण याबद्दल चर्चा करू लागले. एका माकडाने शंका उपस्थित केली की कारभार पाहणाऱ्या मंडळीत सगळ्या प्रकारच्या प्राण्यांना महत्त्वाचे स्थान मिळाले पाहिजे. सगळ्यांनी त्याची री ओढली. मग माकडांनी आघाडी घेऊन एक प्रतिनिधी माकड ठरवले सगळ्या प्राणी मात्रांचे प्रश्न मांडण्यासाठी. सगळे प्राणीमात्र भाबडे काहींनी लागलीच मान्यता दिली. काहींना असे समजावण्यात आले की तुमचे प्रश्न मांडण्यासाठी काही राखीव सदस्य प्रतिनिधी म्हणून आम्ही ठरवू जे तुमच्या प्राणीवर्गातील सगळे प्रश्न मांडतील. सगळे खुष झाले आम्हाला राखीव जागा मिळणार म्हणून. पण माकड मुळातच हुशार कोणाला निवडायचे हे तेच ठरवणार होते. सिंहाला हे सगळं माहिती होते, दिसत होते. पण त्याला जंगल एकत्र बांधायचे होते. कारभार करण्यासाठी सुसज्ज यंत्रणा उभी करायची होती जेणेकरून जंगल सर्वच बाबतीत सुरक्षित राहिले पाहिजे होते. मग सिंहाने सांगितले आपले जंगल डोंगर, तळे, नद्या, पठारी भूभाग, घनदाट वने या सगळ्यांनी व्यापलेले आहे. आपण आपल्या जंगलात एकात्म कारभार करण्यासाठी प्रशासकीय गरज म्हणून पाच विभाग करूया ज्यात सगळ्या वर्गातील प्राणी अधिवास करतात. सगळे प्राणी लागलीच तयार झाले. माकडे बेरकीपणे ऐकत होते. 

सिंहाने सांगितले आपल्या जंगलात सगळे प्राणीमात्र गुण्यागोविंदाने कैक शतके राहतात. मग पाण्यात राहणारे असोत, झाडांवर राहणारे असोत, जंगलात राहणारे असोत किंवा सरपटणारे, हवेत उडणारे, वारूळं, बिळं करून राहणारे, गुहेत राहणारे, कळप करून राहणारे असोत. आपण सगळ्या ठिकाणी राहणाऱ्या प्राण्यांना त्यांचे प्रश्न मांडून जंगलाचा कारभार उंचावण्यासाठी हक्क आणि अधिकार देणार आहोत. प्रत्येक प्राण्यांच्या प्रश्नावर आपण सगळे मिळून सामोपचाराने उत्तरे शोधू. आपला कारभार वाढवू. सुरक्षित राहू. जीवनमान उंचावू. आपल्या जंगलातील प्राण्यांच्या अन्नसाखळी मध्ये कोणत्याही बाहेरील शक्तींची लुडबूड होणार नाही हे प्रत्येकाने पाहिले पाहिजे. सिंह बोलत होता सगळे प्राणी कान देऊन ऐकत होते.

सगळ्यांनी एकमुखी मागणी केली तर प्रतिनिधी निवडला जाईल असा सिंहाचा कयास होता. सिंहाने पुढे सांगितले की हवेत उडणारे झाडावर राहणारे पक्षी यांचा एक प्रतिनिधी असणार, पाण्यात राहण्याऱ्या सगळ्या प्राण्यांचा एक प्रतिनिधी असणार, कष्टकरी किटक, किडे, मुंग्या यांचा तर राखीव प्रतिनिधी असणार कारण तो दुर्बल घटक आहेत. जमीनीवर सरपटणारे, बिळात राहणारे प्राणी पण त्यांचा एक प्रतिनिधी देणार. जंगलात कळपाने राहणाऱ्या प्राण्यांच्या पण एक प्रतिनिधी असणार. या सगळ्यावर शिक्कामोर्तब झाले. लागलीच माकडांनी एक प्रश्न उपस्थित केला जंगलाचे भौगोलिकदृष्ट्या विभाग करा म्हणजे प्रशासकीय कारभार अजूध सोपा जाईल. मग सिंहाने जमीन, डोंगर, पाणी, झाडे असे विभाग केले. आता सिंहाने सगळ्यांना सांगितले उद्या प्रत्येक प्राण्यांच्या प्रतिनिधीची निवड करण्यात येईल. आजची सभा संपली.

सगळे प्राणी आपापल्या विचारविश्वात रममाण होउन जाऊ लागले. माकडांना हीच ती योग्य वेळ आहे जाणवलं आणि त्यांनी सगळ्या जाणाऱ्या प्राण्यांना गाठलं. पहिल्यांदा किटक, किडे, मुंग्या या दुर्बल कष्टकरी वर्गाला समजावून सांगितले तुमचे कष्ट आम्ही खूप वर्षापासून पाहत आहोत. तुमचे दाहक प्रश्न शक्तिशाली राजसत्तेसमोर आम्हीच निर्भिडपणे मांडू शकतो. तुमच्या प्रश्नांना आम्हीच वाचा फोडू. तुम्हाला तुमचे जीवनमान उंच करायचे असेल तर आमच्यातील एका माकडाला प्रतिनिधित्व द्या. कारण आपण सगळे जमिनीवर राहतो. मग सगळ्या किटक, किडे, मुंग्यांनी माकडांना प्रतिनिधी ठरवले.

पुढे पक्ष्यांच्या समुहात एका माकडाने असेच समजावून सांगितले तुम्हाला खूप दूरवर भटकावे लागते रोजच्या जगण्यासाठी. तुमचे प्रश्न जर तुम्हीच मांडले तर त्याचा प्रभाव पडणार नाही. तुमच्या प्रश्नांची आम्हीच योग्यप्रकारे हाताळणी करू. तसंही आपण सगळे झाडावर राहणारे प्राणी आहोत. पक्षांना पण हे पटलं कारण आपल्याला सारखे स्थलांतरित व्हावे लागते. त्यापेक्षा जंगलात असणारे माकडे आपले प्रश्न मांडतील. म्हणून पक्ष्यांनी माकडांना प्रतिनिधी ठरवले.

असं करत करत सगळ्या प्राण्यांच्या वेगवेगळ्या समुहात जाऊन माकडे व्यवस्थित पोटतिडकीने पटवून देत होते आम्ही तुमचे प्रश्न व्यवस्थित मांडू. मग सगळ्या प्राण्यांना तेच पटलं आपलं रोजचं जगण एवढं जिकरीचे मग कोण प्रशासन आणि कारभारात लक्ष घालणार? त्यापेक्षा माकडे सगळीकडे संचार करत असतात त्यांना जंगलाची खडानखडा माहिती आहे. ते सगळीकडेच वावरत असल्याने तेच आपले प्रतिनिधित्व करू शकतील. म्हणून जंगलात राहणाऱ्या कळपातील प्राण्यांनी माकडांना प्रतिनिधी ठरवले.

पाण्यात राहणारे प्राण्यांच्या बाबतीत प्रश्न माकडांना सतावत होता. पण माकडांनी मगरीला तयार केले. मगर पाण्यात आणि जमिनीवर संचार करू शकते असे पटवून मगरीला पाण्यात पाठवले. मगर जेव्हा पाण्याबाहेर आली आणि सांगितले की सगळ्या जलचरांनी मला प्रतिनिधी म्हणून निवडलेय. मग माकडं बेरकीपणे मगरीला सांगू लागली तू एकमेव प्राणी आहेस जल आणि जमीनीवर राहणारा. म्हणजे तू तळ्यातला महाराजा आहेस. तू इथे असताना कोणीही तळ्याकाठी भटकत नाही हीच तूझी दहशत. मग तू राजा प्रमाणे वाग आम्ही तुझे पाईक सैनिक होऊन तुझ्यातर्फे प्रतिनिधी म्हणून जंगलात प्रश्न मांडू. तू तलावात राज्य कर. तळ्याच्या राज्यकारभारात फक्त तुझीच सत्ता. मगर खूष. माकडे सुस्साट. मग मगरीने पाण्यातील प्राण्यांचे माकडांना प्रतिनिधीत्व बहाल केले.

दुसऱ्या दिवशी सिंहाने बघितले तर सगळ्या जंगलातील प्राण्यांचे प्रतिनिधी सदस्य म्हणून फक्त माकडेच गोळा झाली होती त्या त्या प्राणीमात्रांच्या एकमुखी संमती घेऊन. कारण सगळे प्राणी त्यांच्या रोजमर्रा जगण्याचे प्रश्न सांगितले सोडवायला बाहेर पडले होते. सिंहाने हे ओळखले की माकडे चलाखपणे वागत आहेत. पण सिंहाचा मुख्य फोकस जंगलाचे संरक्षण, विकास यावर होता. यथोचित पणे सगळ्या कारभाराची मुहूर्तावर सुरुवात झाली. भाषणे झाली. आनंदोत्सव साजरे झाले. अशी कैक वर्षे लोटली पण जंगलातील प्राण्यांच्या आयुष्यात काहीही बदल झाले नाहीत. जसे आधीचे आयुष्य होते तसेच राहिले. यावर कोणी आवाज उठवला की माकडे त्याचा यथोचित बंदोबस्त करायचे. सिंहाला हे सगळं समजत होतं पण जंगल एकात्मिक होते हेच तो पाहत होता. माकडांना आता आपलीच सत्ता यायला पाहिजे म्हणून मनोमन वाटले. मग त्यांनी आपापल्या प्रतिनिधी माकडांना जमीन, डोंगर, पाणी, झाडे या विभागाचे स्वायत्तता कसे करता येईल ते बघायला सांगितले. मग युनियन ऑफ फॉरेस्ट म्हणजेच संघराज्य जंगलात प्रत्येक विभागाचे स्वतंत्रपणे आस्तित्व पाहिजे. जंगलाचे त्यावर हक्क अधिकार नकोत अशा फुसकुल्या सोडल्या. सिंह गणराज्य म्हणजे जंगल या भूमिकेतून एकात्मिक जंगल तयार करण्यात व्यस्त होता. माकडांना एवढी वर्षे प्रतिनिधित्व केल्याने प्रशासकीय कारभाराची खडानखडा माहिती होती. त्यावर मजबूत पकड होती. अखेरीस सिंहाचा प्रयत्न निष्फळ ठरला मोठ्या जंगलाची जमीन, डोंगर, पाणी, झाडे यात फाळणी झाली. प्रत्यक्षात प्राणी रोजच्या जगण्याचा मरणाच्या प्रश्नांना भिडत होते. त्यांच्या काहीही गावी नव्हते. मनोमन ते सिंहाला च आपला राजा मानत होते. कारण ते कैक शतक पुर्वापार परंपरागत चालत आलेले होते. सरतेशेवटी जमीन, डोंगर, पाणी, झाडे अशी फाळणीनंतर जंगलाची विभागणी झाली. काही कालावधी गेल्यानंतर आजूबाजूला पसरलेल्या एकात्म जंगलाने जमीन, डोंगर, पाणी, झाडे काबीज करायला सुरूवात केली. कारण त्यांना माहिती होते माकडांना माकडचाळे करण्यासाठी काय आणि कोणत्या उद्योगात अडकायचे. कारण लोकशाही टिकवण्यासाठी सिंहासारखेच धारिष्ट्य लागते. माकडांना ते जमणे शक्य नव्हते. दूर बसून हे सगळं सिंह पाहत आसवे गाळत बसला होता. कारण सिंह बंदिवान झाला होता आपल्या लाडक्या जंगलाची जमीन, डोंगर, पाणी, झाडे अशी झालेली शकले बघत.

©भूषण वर्धेकर
पुणे, ३ फेब्रुवारी २०२२

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गडबडलेलं राजकारण

विवेकवादी हतबलता - पूर्वार्ध

उठ भक्ता जागा हो