व्यक्तिस्तोमाचे डंके
व्यक्तिस्तोमाचे डंके वाजू लागले की समजून जायचे अनुयायांना करण्यासाठी काहीच राहिलेलं नाहिए. मुळात आपण भारतीयांना गुलाम होणे फार आवडते. सुरुवातीला अधीन होऊन दीनदुबळ्यासारखे शरण जातो. यामुळे लाचार होणे ठरलेलं असतं. भारतात सगळ्याच महापुरुषांच्या नावाने जो खेळखंडोबा करून ठेवलाय तो त्यांच्याच अनुयायांनी. एखादी व्यक्ती श्रद्धेय असेल तर तिच्या वाईट गोष्टी पोटात घालून उदो उदो करून अंधभक्तांच्या फौजेत सामील होणं हे भारतीयांचे राष्ट्रीय कर्तव्य आहे. यातून कोणीही सुटलेला नाही. नीर क्षीर विवेक हा केवळ पाठ्यपुस्तकापुरता. आवडत असलेली वा जवळ वाटणारी विचारसरणीचा नेता हाच तो चांगला बाकी सगळे वाईट याच एका मुद्यावर सुजाण नागरिकांचे गट तट पडलेले आहेत. सोयीस्कर भूमिका घेणे हे सध्याचे राष्ट्रीय कर्तव्य आहे. २०१९ मध्ये आहोत याचं कसलही भान नाही. केवळ भूतकाळात आमच्यावर अन्याय झालाय म्हणून अमुक एका गटाकडून तमुक एका गटाचा द्वेष करणं आणि त्याचं उदात्तीकरण करणं हेच दूर्दैव आहे देशाचं. आज अवतीभवती जो कल्लोळ माजलाय तो गेल्या चार पाच वर्षातला नसून गेल्या कित्येक वर्षांपासून लपूनछपून ज्या गोष्टी चालू होत्या. त्यातील बऱ्यापैकी बाबी सर्वसामान्य लोकांना माहितच नव्हत्या. सध्याच्या समाजमाध्यांच्या जाळ्यात घरोघरी मला जे हवंय किंवा पक्षाला जे हवंय ते पोचवण्यासाठी सगळे सुष्ट भ्रष्ट उपद्व्याप करून झाले. आवडणाऱ्या संघटनेने नीचवृत्तीने केलेले कपटकार्य मनापासून पटलं नसलं तरी सत्तेसाठी सगळेच करतात असं बुळचट भूमिका घेणारेही बहाद्दर आहेत. शिवाय असं केलं ते फार काही टिकणारं नाही असं म्हणून मोघम भूमिका घेणारे ही अस्ताव्यस्त आहेत. सगळीकडेच पदोपदी बरबटलेल्या त्या त्या क्षेत्रातील लोकांनी आपापल्या प्रभाव पाडता येतील अश्या संघटना किंवा फंडिंग देणाऱ्या लॉब्या मजबूत करून ठेवल्यात. पैशाने काहीही विकत घेता येत हीच एकमेव मानसिकता झालीय. ज्याच्याकडे मँन, मनी आणि मसल पॉवर आहे श्रेष्ठ. बाकीची सगळीच जनता ही महामुर्ख आहे. धर्म, जातपात आणि थुकरट अस्मितेच्या नावाने घाबरवून, हतबल करून बहुसंख्य लोकांच्या पाठिंब्यावर डोलारा संभाळणे हेच एकसुरी झाले आहे. या मुळे समाजस्वास्थ्य तर बिघडतेच पण स्वतंत्रपणे विचार करुन व्यक्त होणारी, मुल्ये जपणारी स्वायत्त संस्था, संघटना आणि व्यक्ती कृश झाल्या आहेत.
© भूषण वर्धेकर
२२ अॉगस्ट २०१९
पुणे
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा