असिफा, निर्भया आणि कोपर्डीची सुकन्या

असिफा, निर्भया आणि कोपर्डीची सुकन्या
होय तुम्ही तिघी फार भाग्यवान आहात
तुमच्यावर झालेल्या पाशवी अत्याचाराला वाचा फुटली
सगळी माध्यमं तुमच्या अत्याचाराच्या निषेधार्थ रस्त्यावर उतरलेत,
भारतातील प्रत्येक सर्वसामान्य नागरिक या घटनेचा निषेध करतोय पण,
स्वार्थी, भांड मेडिया तुमच्या घटनांचा तपशील टिरापीसाठी रवंथ करतोय
हुकलेले बिनडोक राजकारणी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करून संधी साधून घेताहेत
संधीसाधू विचारवंत, कलावंत आपापली सोशल सेन्सेस जागरूक ठेवण्यासाठी सिलेक्टिव्ह निषेधाची नौटंकी करत आहेत
सद्सद्विवेक बुद्धी बाजूला ठेवून बरबटलेले ज्ञानी महात्मे जातपातधर्माच्या कुंठीत अस्मिता धारदार करतायत
एक माणूस म्हणून सध्याचा समाज गाभडत चाललाय
सत्तापिसासू परमपूज्य थुकरट माननीय सत्ताधारी आणि विरोधक दोघेही एकमेकांच्या उखळ-पाखळ काढण्यात व्यस्त आहेत
ज्याला त्याला आपापली दुकानदारी चालवून प्रतिमा स्वच्छ करायचीय
घृणास्पद आणि निर्घृण हे शब्द पण रुसलेत
स्वयंघोषित संस्कृतीरक्षक अजूनही आदेशाची वाट पाहत बसलेत निषेधासाठी
षष्प झाल्या संवेदना अन् विकृतीचे उदात्तीकरण
इथे सगळ्यांनाच न्यायालयाने आपापल्या सोयीनुसार निकाल द्यावा असे वाटते
कहर करतात मनासारखा निकाल नाही लागला तर
सोयीनुसार संविधान बचाव अन् निषेध यांच्या मोर्च्याचे पेड इव्हेंट होतात
तरीदेखील
असिफा, निर्भया आणि कोपर्डीची सुकन्या
होय तुम्ही तिघी फार भाग्यवान आहात
मी मात्र नाही....
मी कोण ?
मी एक अशीच पिडीत दूर्दैवी, हवालदिल स्त्री, अल्पवयीन मुलगी अन् म्हातारी
मी एक कधी शोषित तर कधी सो कॉल्ड उच्चभ्रू परंतू कायमस्वरुपी दुर्लक्षितच माध्यमांपासून, विचारवंतापासून, असंतुष्ट राजकिय गटातटापासून
मी एक अशीच सार्वभौम भारतातील प्रत्येक ठिकाणी होणाऱ्या अत्याचारातील एकमेव अमुक तमुक प्रधान संस्कृतीतील अभागी अबला
मी एक अशीच सोयीस्कररित्या जातपातधर्मात वाटली गेलेली कुटुंबवत्सल
मी एक अशीच भोगासाठी आसुसलेल्या नामर्द नजरा सहन करणारी
मी एक अशीच समाजाने लादलेल्या चालीरितीत रूतल्याने स्वत्व हरवलेली
------------------------------------
©भूषण वर्धेकर
१५ एप्रिल २०१८
हैद्राबाद
------------------------------------

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गडबडलेलं राजकारण

विवेकवादी हतबलता - पूर्वार्ध

उठ भक्ता जागा हो