शुक्रवार, २५ मार्च, २०१६

इथे माणूस मरतो

इथे माणूस मरतो
नंतर त्याचा धर्म ठरतो
मग सादर होतो अहवाल
सुस्त शासन अन् माध्यमे मस्तवाल
मग येतात फुत्कार चंगळवादी
प्रखर होतात जाणीवा राष्ट्रवादी
काथ्याकूट होतो बाजारू मानवतेचा
एकच दिवस असतो बौद्धिक निषेधाचा
जोशात भरले जातात वृत्तपत्रीय रकाने
चर्चा झाडल्या जातात तावातावाने
नको त्यांचा वधारला जातो भाव
उगाच उकरून काढतात जुनाट घाव
काही काळ असाच जातो निघून
शांततेचा चित्कार चौफेर घुमून
फुकाचे विचारवंत अन् चौकटीतले जगणे
ज्याचे त्याचे कर्म स्वतःचे तुंबडे भरणे
दुटप्पी माणूसकीचे अवशेष भग्न
सकल प्राणीमात्र रोजच्या दिनचर्येत मग्न

--भूषण वर्धेकर
9-10-2015
8:30 रात्रौ
दौंड-पुणे शटल
------------------------------------------------

वैश्विक गराड्यातला

वैश्विक गराड्यातला
अढळ ध्रुव
सैन्धातिक ऋषीतुल्य
सूक्ष्म गर्भ

वैधानिक स्वत्व
कामुक मर्त्य
पुर्णत्वाची साक्ष
पौर्वात्य देशी

अडगळीची जगणी
इथल्या देशी
वैचारिकांना दुधखुळी
पाश्चिमात्य भीती

समृद्ध पंथांचा
एकेरी नारा
वैश्विकतेचा गर्भित
ज्ञानप्रसार

व्रतवैकल्यांची संस्कृती
वक्तव्यांची नांदी
धर्माची बांधणी
सकल माथी

दूर्दैवी रूढी
मांगल्याची शक्ती
विचारधारा मात्र
जुनाट अनाकलनीय

स्वाहाकार असे
स्वयंघोषित मान्य
भक्तबुळे मंद
पांडित्य धन्य

नियमित क्रंदन
मागास अनाहत
भपकेबाज बेधडक
ब्राह्मणी पौरोहित्य !

------------------------
भूषण वर्धेकर
3 मे 2012
पुणे
-------------------------

प्राकृतीच्या विकृती

प्राकृतीच्या विकृती
झुराण्याच्या विभूती
जगण्याच्या रंडी
अखंडीत

नैतिकतेच्या सुरनळया
गरिबांच्या गळया
मुजोऱ्यांची छंदी
अंतरंगी

विरुध्यतेच्या छटा
सामाईकतेच्या वाटा
आपलं-तुपलं करीत
मर्जीत

समृद्धीचा लकडा
वाममार्ग वाकडा
माणुसकीचा झरा
भोवरा

कृत्रिम क्रांती
गाडलेली भ्रांती
नामुष्कीच जगणं
भोगणं

चराचर अस्वस्थ
मानद विश्वस्त
पैशाची देव-घेव
सदैव

प्रगतीचा ध्यास
गरिबांचा श्वास
बाजारुची मिजास
भडास

- भूषण वर्धेकर
8 June 2009
3:47 PM
Jalgaon

मृत्युचं लेणं

मृत्युचं लेणं
समष्टीचं जगण
हौतात्म्याचा वारु
जिर्णोधारु
संकटाचं येणं
कसोटीचं पारणं
लढवय्ये निर्धारु
कैवारु
आस्तित्वाचं रुसणं
संदर्भ नसणं
भकास वाटसरु
सावरु
दिशाहिन उडणं
सांप्रत मागणं
मानवांचा उद्धारु
लेकरु
मातीचं नसणं
सचैल हसणं
वास्तवाच्या निखारु
लुटारु

भूषण वर्धेकर
१७/७/२००९
रात्रौ १०.०३
शनिवार पेठ

रित्या झाल्या भावना

रित्या झाल्या भावना
रित्या आत्मवंचना
पोरक्या करूणा
रुतलेल्या जीवना

मंद धुंद प्रेमाच्या
सैरभैर मनाच्या
स्तब्ध गतकाळच्या
खिन्न आयुष्याच्या

उद्विग्न मनोकामना
विखूरलेल्या धारणा
धूळीत गेल्या वल्गना
निर्विकार संवेदना

दूधखुळ्या मैत्रीला
प्रीतीचा बोलबाला
कमकुवत सुखाला
सदेह विखूरला

नित्य झपाटलेला
जीव काळवंडला
त्रास संपला
आत्मा निवर्तला

भूषण वर्धेकर
8-3-2007
पुणे

सल सलते मनात

सल सलते मनात
रणरणत्या उन्हात
पाऊले वळतात
दुःखी भूतकाळात

नको त्या आठवणी
रूक्ष भेटीच्या ठिकाणी
कृश मने केविलवाणी
क्रंदती विरह गाणी

उज्वल भविष्यात
आंतरिक होरपळतात
एकमेव निरव एकांतात
षष्प संवाद साधतात

भरकटलेल्या स्वप्नांची
गर्भगळीत मनांची
सांगड एकोप्याची
होळी भावविश्वाची

क्रमिक घटना
बुजलेल्या वेदना
परतीचा पाहुणा
भ्रमाच्या धारणा

मागमूस जगण्याची
वर्दळीत जाणीवांची
एक तिरीप प्रकाशाची
मांदियाळी दिवास्वप्नांची

भूषण वर्धेकर
28-09-2015
हडपसर
रात्रौ 9:55

माणूसपण हरवलेली

माणूसपण हरवलेली
डेकोरएटीव्ह वस्ती
ऊंच इमारतींची
दुतर्फा गर्दी

टाऊनशिप अंतर्गत
राखलेली हिरवाई
डेव्हलप करताना
कापलेली वनराई

वणवण करणाऱ्यांची
अनंत भटकंती
हिंडोऱ्यांचे सोबती
आकंठ डुंबती

रखरखणाऱ्या ऊन्हात
गारव्याच्या शोधात
मजूर विसावतात
दगड धोंड्यात

नंतर अवतरतो
डोलरा मुजोरांचा
दुलईत लोळतो
दर्प श्रीमंतीचा

दिखाव्याचे देखावे
दिवाणखाण्यात सजले
चित्रातील घरे
माणसांविना भरे

भूषण वर्धेकर
१५/७/२००९
दुपार २.३५ फर्गसन

नास्तिकतेची वल्कलं

घेऊन निधर्मीवादाचा झेंडा पेटवून इहवादाचा डंका झालाय एकजण नवखा नास्तिक बिथरला पाहून बहुसंख्य आस्तिक कोणता सच्चा धार्मिक यावर करू लागला गहन वि...