धुरंधर - एक पुरोगामी चिकित्सा
आदित्य धर लिखित-दिग्दर्शित-निर्मित धुरंधर चित्रपट ही अनेकार्थाने प्रोपागंडा फिल्म आहे. तब्बल अडीच दशकांचा कलावधी केवळ साडे सात, आठ तासात - दोन भागात खपवला आहे. ही निव्वळ भोळ्या भाबड्या जनतेची फसवणूक असून त्याकडे अल्पसंख्याक विरोधात असंतोषाचे वातावरण निर्माण करणारी कलाकृती म्हणून पाहिले पाहिजे. पवित्र इस्लाम धर्म हा शांततेचे प्रतिक आहे. त्यासाठी अतिपवित्र जिहाद आजपावेतो कार्यरत आहे. गेली कैक शतके पवित्र जिहादी शिकवण जनसामान्य जनतेत रूजवण्यासाठी प्रसंगी किरकोळ हिंसा, फिदाईन ॲटॅक वगैरे करणे अनिवार्य होते. पण चक्क धुरंधर सारख्या प्रोपागंडा फिल्म मध्ये हे जिहादी कार्य दुष्कृत्य म्हणून हिणवले जाते हे मानवतेला धरून नाही. पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाची बालवाडी, प्राथमिक शाळा आणि महाविद्यालये ही जगाला दिलेली देणगी आहे. यातून बाहेर पडणाऱ्या तडफदार तरुणांना जर ऑन जॉब ट्रेनिंग देण्यासाठी छोटे मोठे बॉम्बस्फोट घडवण्यासाठी भारतात पाठवले तर पोटशूळ दुखण्याचे कारणच काय? बिचारे बापुडे अतिरेकी कबाडकष्ट करून जीवाची पर्वा न करता प्रसंगी धारातीर्थी पडतात. त्यांची ही शहादत सामाजिक एकोप्यासाठी प्रेरणादायी आहे. कोण कुठला सळसळत्या रक्ताचा तरूण सत्तरावर दोन बहाहत्तर सुंदऱ्यांचा उपभोग घेण्यासाठी जंग जंग पछाडतो. काहीही करून वैश्विक एकात्मिक शांततेसाठी मृत्यूला भिडतो. याला टुकार हिंदुत्ववादी मानवतेविरोधी घटना सांगतात. निर्घृण हल्ला संबोधतात. दहशतवाद्यांच्या कार्याला देशद्रोही ठरवताना लाजा कशा वाटत नाहीत. धुरंधर पूर्वार्ध आणि उत्तरार्ध पाहून तळपायाची तिडिक मस्तकात जाते. कसाला हिंसक आणि प्रोपागंडा सिनेमा आहे हा. असे सिनेमे फक्त आणि फक्त पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या परमोच्च कृत्यांना जगभरात बदनाम करण्यासाठी काढले जातात.
गेल्या वीस वर्षात ज्या गोष्टी किंवा बातम्या ऐकल्या/पाहिल्या असतील त्यामागचा माहिती नसलेला भाग सिनेमात आहे. पाकिस्तान कसे बकवास आहे आणि दहशतवादाला खतपाणी घालणारा आहे हे दाखवले आहे. हे करण्याची सिनेमॅटिक लिबर्टी दिली कुणी? हे संविधानाच्या विरोधात आहे. व्यक्तिस्वातंत्र्याचा कैवार घेऊन तुम्ही एखाद्या गरीब देशाच्या गरीब औद्योगिक क्षेत्राला बदनाम करण्याचा वैश्विक कट रचला आहे. याला सर्वस्वी जबाबदार समकालीन हिंदुत्ववादी संघटना आणि सरकार आहे. दहशतवादाची मोडस ऑपरेंडी सिल्व्हर स्क्रीनवर दाखवून काय साध्य होणार आहे? कैक वर्षे बॉलिवूड नामक चित्रपटसृष्टीत गंग जमुना तहजीबचे बाळकडू पाजले जात होते ते एकाएकी धुळीस मिळवले जातेय हा निव्वळ करंटेपणा आहे. (अवांतर- खरंतर गंगा जमुना तहजीब भारतातील तमाम पुरोगाम्यांनी शिया सुन्नी पंथीय बांधवांना शिकवायची गरज आहे. अहाहा! यात जर यशस्वी झाले तर मध्य पूर्वेतील अशांतता कायमस्वरूपी नष्ट होईल… असो…) अशात धुरंधर सारख्या चित्रपटात पाकिस्तान स्थित दहशतवाद्यांच्या, गुन्हेगारांच्या कारनाम्यांची मालिका दाखवली जाते. हे सेक्युलर समाजासाठी अत्यंत घातक आहे. सिनेमॅटिक लिबर्टीचा किती तो अतिरेक!
आजपर्यंत आजवर अनेक हिंदी चित्रपट भारतीय समाजमन घडवत होते. कैक सिनेमे मानवतेचे उपदेश देऊन सामाजिक बांधिलकी, जाणीवा वाढवत होते. कितीतरी राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त सिनेमांनी समतेच्या कक्षा रूंदावल्या. भारतीय जनमानसात विषमता वाढवण्यासाठी धुरंधर सारखे सिनेमे तयार केले जात आहेत. हा या लोकशाहीवादी देशाचा अपमान आहे. कोण कुठला पंजाबी मुंडा धडाधड गोळीबार करून कोण्या एका स्वच्छ चारित्र्याच्या आमदाराच्या कुटुंबातील पुरूषांना वेचून वेचून ठार करतो. कारण काय तर त्याच्या कुटुंबाला किरकोळ छळ सहन करावा लागला म्हणून. हे काही बरोबर नाही. गांधीच्या देशात अशी हिंसा! हे नितिमत्तेला धरुन नाही. यावरची कडी म्हणजे अंडरकव्हर एजंट म्हणून त्याला पवित्रभूमी पाकिस्तानात पाठवले जाते गुंड होण्यासाठी. मग गल्लीगुंड, गावगुंड शहरीगुंड ते सरकार पुरस्कृत राष्ट्रीय गुंड असा प्रवास करून अननोन मेन ला नेम धरून गोळ्या झाडण्यासाठी फ्री हॅंड मिळवतो. ही कसली दळभद्री कथा? या कथेत कुठेच समता बंधुता एकात्मता दिसत नाही. कोण तो सुक्काळीचा हमजा मारून गमजा “कराची की प्यारी ल्यारी” चा बाजार उठवतो हे सद्सद्विवेक बुद्धीला पटणारे तरी आहे काय? आपल्या देशात काय चालू आहे त्यावर चर्चा करायला नको म्हणून असे सरकारी आशीर्वादाने सिनेमे दाखवले जातात. बेरोजगारी, गरीबी असूनही असे सिनेमे हजारो करोड रुपयांची उलाढाल करतात म्हणजे काय? ही कसली नैतिकता? सामाजिक वीण टराटरा अन् फराफरा फाडली जाते असे सिनेमे पाहिल्यावर. कसला तो जल्लोष सुरु आहे धुरंधर वरून? अननोन मेन म्हणे! कोणत्याही भारतीय एजन्सी ने अननोन मेन आमचेच धुरंधर आहेत म्हणून अधिकृतपणे पुष्टी केलेली नाही. नरिंदर चा दलिंदर सिनेमा म्हणजे धुरंधर. एक नंबरचा वाह्यात सिनेमा आहे. कोण तो बिचारा आतिक अहमद युपीवाला आय एस आय चा हस्तक म्हणून दाखवलाय सिनेमात. मति भ्रष्ट झाली आहे की काय? सेक्युलर भारताचा कणा ताठ रहावा म्हणून धडपडणारा कुशल संघटक आतिक अहमद. गोरगरीब अशिक्षित कमी शिक्षित तरूणांना नशील्या पदार्थाच्या डिलिवरी बॉय म्हणून नोकऱ्या देणारा मसीहा म्हणजे आतिक अहमद. त्याला ऑन कॅमेरा मारल्याचे संदर्भ दाखवून धुरंधर ने नेमके काय साधले? नोव्हेंबर २००८ साली मुंबईतील हल्ला हा विश्वविद्यालयातून स्नातकोत्तर प्रमाणपत्र प्राप्त झाल्यावर शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेऊन अतिरेकी कारवायांच्या ॲपरेंटशीप साठी आलेले भटके हुए जवानांचा डिप्लॉयमेंट प्रोजेक्ट होता. बिचारी तरुण पोरंटोरं ड्रायफुट्स खाऊन एकेफोर्टी सेव्हन मधून गोळ्या झाडून भारतीयांवर टेस्टिंग करत होती. ते पाकिस्तानी प्रदीर्घ अनुभव असणारे प्रबंधक २४x७ डोळ्यात तेल घालून लक्षपूर्वक सगळ्या घडामोडींवर देखरेख ठेवत होते. गो लाईव्ह असा प्रशिक्षणार्थींच्या सी आय सी डी पाईप लाईन प्रोजेक्टला तुम्ही अतिरेकी कारवाई म्हणून पदाखवता? कुठे फेडाल ही पापे! असे पेरून ठेवलेले संदर्भ घेऊन धुरंधर अंगावर काटा येईल असा करण्याचा हेतू नक्कीच वाईट आहे. मुळात अतिरेकी हे प्रेमळ असतात. जिहाद म्हणून ते समोरच्या व्यक्तीवर गोळ्या झाडतात, बॉम्बने उडवतात. प्राणाची आहुती देतात. अशा निरागस लोकांना निस्वार्थी सेवाकार्य करण्यासाठी मदत केली पाहिजे. आपली न्यायव्यवस्था फासावर लटकवते? हे कोणत्या गुडबुक मध्ये बसतं?
धुरंधर हा धादांत विखारी सिनेमा आहे. याच्यावर कायमस्वरूपी बंदी घातली पाहिजे.
एक सटकलेला नवपुरोगामी