विवेकवादी हतबलता - पूर्वार्ध
एका राज्यात गुण्यागोविंदाने एकत्र नांदणारे लोक एकाएकी धर्म, प्रार्थना स्थळे यावरुन भांडू लागले. राजाला प्रश्न पडला असं अचानक एकदम कसं झालं. त्यानं तातडीने प्रधानास बोलावलं. प्रधानाने राजाला सांगितले की समाजकंटकांनी हे सगळं सुरू केले आहे. जर वेळीच यावर उपाय केला नाही तर धर्मावरुन जनक्षोभ उसळेल. राजाने विचारले ही समाजकंटक मंडळी आहेत तरी कीती. त्यांचाच बंदोबस्त करून टाका कायमस्वरूपी. प्रधानाने सांगितले ते शक्य नाही. जे समाजकंटक ज्या धर्मातील आहेत त्यांच्या मागे मोठी इकोसिस्टिम उभी आहे. त्यांना दडपून टाकलं तर त्या त्या धर्माच्या लोकांना काबूत ठेवणे शक्य नाही. त्यांची शक्ती खूप वाढलेली आहे. यावर काय उपाय करावेत या विचारात असतानाच राजा प्रधानाला सांगतो की उद्या आदेश काढा. आपल्या राज्यातील धार्मिक ध्रुवीकरण, समाजातील द्वेष लोकांमधील सलोखा बिघडवत आहे. तो थोपविण्यासाठी राज्य सात कलमी कायदा लागू करेल ज्यात सर्व धर्मातील अनिष्ट प्रथा, परंपरा, रुढी आणि चालीरिती यांचा बंदोबस्त केला जाईल. आणि जनता जुमानत नसेल तर हुकुमशाही प्रमाणे माझी राजवट आमलात आणून सगळ्या धर्मातील कट्टरपंथी संघटना कायमस्वरूपी बंद करण्यात येतील. प्रधान चलाखीने राजाला असं करू नका सांगून टप्प्याटप्प्याने लोकांमध्ये जनजागृती करू असे सुचवतो. मग
या राज्यातील सगळ्या धर्माची प्रार्थना स्थळे कायमस्वरूपी बंद करू असे राजा सांगतो. प्रधान राजाला सांगतो कायमस्वरूपी शब्द वापरू नका. त्या पेक्षा आपण पुढील आदेश येईपर्यंत बंद करण्यात येतील असा आदेश काढा. राजाला ते पटतं. तसा तो आदेश जनतेपर्यंत पोचवला जातो. सर्वसामान्य जनतेला या आदेशामुळे काही सुतराम फरक पडत नाही. मात्र ज्या लोकांची प्रार्थना स्थळांवर मक्तेदारी आणि दुकानदारी चालू असते त्यांची मात्र गोची होते. मात्र सर्वधर्मीय प्रार्थना स्थळे बंद करण्याचा आदेश असल्याने कोणीही रस्त्यावर उतरत नाही. पुढील आदेश येईपर्यंत वाट बघायची आणि ठरवावे असा विचार सर्व धर्मातील ठेकेदार करतात.
या आदेशाचे राज्यातील नास्तिक, विवेकवादी आणि अज्ञेयवादी लोक एकमुखाने स्वागत करतात. कारण हीच खरी मंडळी विचारांनी पुढारलेली असतात ज्यांना धर्म नाकारून माणूस म्हणून जगण्याचा अर्थ समजलेला असतो. ते सगळे ठरवतात की आपण प्रत्यक्ष राजाला भेटून त्यांचं अभिनंदन केले पाहिजे. ठरल्याप्रमाणे प्रधानाकडे राज्यातील नास्तिक, विवेकवादी आणि अज्ञेयवादी मंडळी राजाची भेट मागतात राजाचं अभिनंदन करण्यासाठी. तुम्हाला राजाची भेट लवकरच होईल तशी मी त्यांच्या कडे विनंती करेन. प्रधान राजाकडे जातो आणि सांगतो की राज्यातील सुधारणावादी लोकांना तुम्हाला भेटायची इच्छा आहे. त्यांनी तुमच्या निर्णयाचे स्वागत केले आणि तुमचं अभिनंदन करण्यात येणार आहेत. राजा परवानगी देतो आणि ठरल्याप्रमाणे भेट होते. सगळ्या मंडळींना राजाचं अभिनंदन करतात आणि सांगतात की सगळी धार्मिक प्रार्थना स्थळे कायमस्वरूपी बंद करावीत. त्याऐवजी शिक्षण, आरोग्य आणि रोजगाराच्या बाबतीत ती स्थळं वापरण्यात यावीत. आपणच हे काम करू शकता. राजा हसतो आणि म्हणतो हे कदापिही शक्य नाही. धर्माच्या बाबतीत राजाने हुकुमशाही लादू नये. त्यापेक्षा जनजागृतीचे कार्यक्रम हाती घेण्यात यावेत. कोणत्याही धर्माच्या नावाखाली जे जे ठेकेदार आपापली मक्तेदारी गाजवत आहेत आणि दुकानदारी वाढवत आहेत त्यांना थोपविण्यासाठी तुमच्या सारख्या लोकांची संख्या वाढणं गरजेचे आहे. जेवढे लोक विचारांनी पुढारतील तेवढा तोटा समाजकंटकांचा होईल. सगळी मंडळी एकदिलाने होकार देतात. राजा सगळ्यांना सांगतो की तुम्ही लोकांनी पुढं येऊन एकदिलाने काम सुरू केले पाहिजे जनजागृतीचे. तीच काळाची खरीखुरी गरज आहे. प्रत्येक धर्मात वाईट चालीरिती रुढी परंपरा आणि प्रथा ठाण मांडून बसल्या आहेत त्या आधी बंद कराव्यात. वेळ पडली तर आपण तसे कायदे करू. धर्मग्रथांचा प्रचंड बडगा लोकांवर असतो. तो मोडून काढण्यासाठी आम्हाला तुमच्या सारख्या लोकांची खूप गरज आहे. लोकांना विश्वासात घेऊन अशी कामे करता येतील. त्यासाठी तुम्हाला जमिनीवर उतरून कामं करावी लागतील. आपल्य राज्य सर्वतोपरी सहकार्य तुम्हाला करेल. सगळी नास्तिक, विवेकवादी आणि अज्ञेयवादी मंडळी खूश झाली. राजा कीती पुढारलेल्या विचारांचा आहे हे समजल्यावर त्यांचे तोळाभर मांस वाढले. मग त्यांनी पण लागलीच देवस्थानच्या अनागोंदी कारभारामुळे कशी भक्तांची लूट करतात, प्रार्थनास्थळे व्यवस्थापन समितीवाले कशी पैशासाठी हपापलेले आहेत वगैरे गोष्टी सांगितल्या. अशा संस्थांना पण चपराक बसली पाहिजे म्हणून राजाला गळ घातली. राजाने पण मान्य केले आणि सगळ्या प्रार्थना स्थळांची, देवस्थानांची, धर्मदाय संस्थांची माहिती प्रधानांकरवी मागवली. मनोमन जमलेल्या मंडळींना वाटले की आता खऱ्या अर्थाने आपलं राज्य आधुनिक होईल. नास्तिक, विवेकवादी आणि अज्ञेयवादी मंडळींनी निरोप घेतला आणि काही दिवसांनी मोठ्या संख्येने पुढारलेल्या विचारांच्या तरुणांना घेऊन परत भेटायला येऊ म्हणून आश्वासन दिले.
राजा खूष झाला. प्रधानांकडे ह्या मंडळींना कसल्याही सोयीसुविधांची गरज पडल्यास तातडीने पुरवा म्हणून सांगतो. प्रधान चतुर असतो. तो म्हणतो तुमचे विचार नक्कीच पुढारलेले आहेत. तुमची इच्छाशक्ती पण प्रचंड आहे. पण सगळ्या धर्मातून पुढारलेल्या विचारांचा तरुण वर्ग तीन कलमी कार्यक्रमात सामील होणार नाही. राजा अचंबित होतो. आणि असं कसं शक्य आहे. नास्तिक, विवेकवादी आणि अज्ञेयवादी लोक नक्कीच सर्व धर्मातील तरुणांना प्रभावीत करतील आणि त्यांचा तू हुरूप बघितला नव्हतास काय? प्रधान म्हणतो पुढच्या वेळी ते किती मोठा तरुण वर्गासोबत तुम्हाला भेटायला येतात ते तुम्ही बघा आणि मग बोला. इकडे नास्तिक, विवेकवादी आणि अज्ञेयवादी मंडळींनी समविचारी लोकांची जमवाजमव सुरू केली. राजाने सांगितलेला किमान समान कार्यक्रम सांगितला. सुधारणावादी नवीन तरुण वर्गासोबत आपल्याला भेटायला जायचं आहे त्यासाठी तुम्हाला जमिनीवर उतरून लोकांना विश्वासात घेऊन प्रसाद करावा लागेल हे ठरले. काही काळ लोटला मग सगळे नास्तिक, विवेकवादी आणि अज्ञेयवादी मंडळी मोठ्या संख्येने पुढारलेल्या विचारांच्या तरुणांना घेऊन परत एकदा राजाला भेटायला गेले. जमलेल्या गर्दीकडे पाहून राजाने प्रधानाकडे कटाक्ष टाकला आणि म्हणाला बघ बदल घडतोय. तू म्हणाला होतास की सगळ्या धर्मातून युवावर्ग सामील होणार नाही. बघ कीती तरुण वर्ग आला आहे. बदल घडवण्यासाठी. प्रधान म्हणतो की आता या गर्दीत जी नास्तिक, विवेकवादी आणि अज्ञेयवादी मंडळी आहेत ती फक्त बहुसंख्यांक धर्मातील आहेत. राजाला विश्वास बसत नाही. मग तो जमलेल्या सगळ्या तरूणांना विचारतो तुमचा धर्म कोणता त्यानुसार आपण त्या त्या धर्माचे गट करू आणि पुढची कार्यवाही सुरू करू. दूर्दैव या राज्याचे असे होते की अशी सगळी मंडळी बहुसंख्यांक लोकांच्या धर्मातील होती. अल्पसंख्य धर्म असलेल्या लोकांमध्ये अशी पुढारलेली मंडळी नव्हतीच. प्रधान राजाला सांगतो की बहुसंख्यांक धर्मातील लोकांना धर्माला प्रश्न विचारायची सोय आहे. तो धर्म खऱ्या अर्थाने लिबरल आहे. त्या धर्मात धर्माचे अस्तित्व नाकारण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. त्या धर्मात कोणीही बळजबरी करत नाही धार्मिक प्रथा, परंपरा आणि रुढी पाळण्यासाठी. लहानपणापासून धार्मिक शिक्षणाची कसलीही सक्ती नसते. त्यामुळे धर्माविषयी प्रश्न विचारले जातात, बंडखोरी केली जाते. नास्तिक, विवेकवादी आणि अज्ञेयवादी मंडळींनी पण या बाबीला दुजोरा दिला. राजाने विचारले मग बहुसंख्य धर्म असलेल्या राज्यात एवढी धार्मिक कट्टरता आली कुठून? प्रधानाने सांगितले की अल्पसंख्याक धर्मातील लोकांना सेक्युलॅरिझम नावाखाली आजपर्यंत केवळ मतदानासाठी वापरले गेले. बहुसंख्य धर्मातील लोकांच्या सर्वांगीण विकासासोबत तुलना केली तर अल्पसंख्याक समाजातील खूप मोठा वर्ग मागासलेला आहे. अल्पसंख्य समाज हा धर्माला अंतर्बाह्य चिकटलेला आहे. या समाजात सुधारणावादी लोकांचा वाणवा आहे. हीच योग्य वेळ आहे आपण नास्तिक, विवेकवादी आणि अज्ञेयवादी मंडळींच्या साथीने बदल घडवून आणू.
मग राजाने विवेकवादी, नास्तिक आणि अज्ञेयवादी लोकांना किमान समान कार्यक्रम दिला जनजागृतीचा. त्यातला सर्वात पहिला होता सगळ्या धर्मांची परखडपणे चिकित्सा करा. याआधी कोणी केली असेल तर ती लोकांसमोर आणा. तिचा प्रचार, प्रसार करा. दुसरा होता धार्मिक शिक्षण बंद करण्याचा आणि तिसरा होता सगळ्या धर्मग्रंथांची काटेकोरपणे समीक्षा, टिका आणि कालबाह्य बुरसटलेल्या विचारांना तिलांजली देण्याचा. तीन कलमी कार्यक्रम सर्व मंडळींनी रस्त्यावर उतरून लोकांना विश्वासात घेऊन राबवावा आणि सगळ्या धर्मातून पुढारलेल्या विचारांचा खूप मोठा तरुण वर्ग यात सामील व्हावा अशी राजाची अपेक्षा होती. राजा आता जमलेल्या गर्दीकडे पाहून सांगतो की तुम्ही मंडळींनी आपल्या राज्यातील प्रत्येक धर्मासाठी तीन कलमी कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी कार्यक्रम तयार करा. सुरुवात अल्पसंख्याक समाजातील लोकांना त्यांच्या धर्मातील सुधारणांवर चर्चा करण्यासाठी तयार करा. त्यांच्या धर्मातील बुरसटलेल्या चालीरिती, रुढी, परंपरा, प्रथा आणि पायंडे कसे मागासलेले आहेत ते सांगा. त्यांच्यातील जे सुधारणा करण्यासाठी तयार आहेत त्यांना घेऊन मला भेटायला या. जमलेली सगळी मंडळी राज्यात परतली आणि प्रत्येक धर्मातील समविचारी लोकांची जमवाजमव करू लागली. राजाच्या तीन कलमी कार्यक्रमांतर्गत सगळ्या धर्माची चिकित्सा करण्याचे जाहीर कार्यक्रम आयोजित करण्यात आले. लहानपणापासून दिले जाणारे धार्मिक शिक्षण बंद करण्यासाठी आंदोलने होऊ लागली. सगळी धार्मिक प्रार्थना स्थळे आणि संस्था सरकारी नियंत्रणाखाली येण्यासाठी मोर्चे काढले जाऊ लागले. दूर्दैव हेच की बहुसंख्यांक लोकांना धर्माच्या बाबतीत सुधारणा व्हायला हवी असे वाटत होते. अल्पसंख्याक समाजातील लोकांनी तुम्ही आमच्या धर्मात ढवळाढवळ करू नका असा धमकीवजा संदेश दिला. काहींनी तर दिवसाढवळ्या विवेकवादी लोकांच्या गोळ्या घालून हत्या केल्या. बिचारे नास्तिक, विवेकवादी आणि अज्ञेयवादी मंडळी हवालदिल झाली.
© भूषण वर्धेकर
३० मे २०२३
पुणे
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा