भारत माता की जय!!!
पुर्वीच्या काळी फक्त आणि फक्त १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी या दोनच दिवशी राष्ट्राभिमान वगैरेंची जाणीव होत असे. मग सार्वभौम देशाचा सजग नागरिक म्हणून झेंडावंदन करून आल्यानंतर देशासाठी आगळं वेगळं कर्तव्य पार पाडल्यासारखे वाटायचं. मात्र आता अशी राष्ट्रभक्ती दाखवण्याची वेळ दैनंदिन व्यवहारात आली आहे. नोटबंदीनंतर बँकेच्या रांगेत तासनतास उभे राहून वीररसयुक्त देशभक्ती नँशनल ड्युटी केल्यासारखी वाटत होती. पण सरकारने दयाळू लोकांना असा फिल रोजच्या जगण्यात दिला. हल्ली तर दरवेळी पेट्रोल भरताना क्रांतिकारी कार्य केल्याचा अभिमान वाटतो. वाणसामानाची यादी घेऊन दुकानात गेलो तर गरजेपुरता किरणा घेण्यातच सगळा पैसा खर्च होतो. गोळ्या बिस्किटे चिक्की टाईमपास खाऊ साठी पैसेच शिल्लक राहत नाहीत. पुन्हा एकदा राष्ट्रीय कर्तव्य निभावल्याचा फिल येतो. मग मनाशीच विचार येतात की सरकारनेच ठरवलेलं दिसतंय लोकांनी फक्त गरजेप्रमाणे सकस व पौष्टिक खावं म्हणून महागाई केलीय. ससटरफटर खाल्याने वजन वाढतं मग आजार वाढतील म्हणून जंकफूड नकोच नको. अहाहा काय अद्वितीय सरकार आहे. गरीबातील गरीब जनतेसाठी किती तो कळवळा. याआधीचे सरकार कमी महागाई वाढवंत होते. आताचे सरकार सगळंच जास्तीतजास्त करतंय. विकासकामे पण जास्त करतंय महागाई पण जास्त करतंय जेणेकरून लोकांनी फक्त गरजेपुरतं आणि आवश्यक तेवढंच खाल्ले पाहिजे. म्हणूनच महागाई वाढत चाललीय. असं समजून अजून मोठ्ठं देशभक्तीपर कार्य करायचा फिल घेऊन घरी यायचे आणि काटकसरीने जगायचे. त्याशिवाय कसं कळणार आताच्या पिढीला आपल्या पूर्वजांनी कीती आणि काय हालापेष्टा भोगल्यात. खस्ता खाल्ल्यात. असा हा मास्टर स्ट्रोक.
आमच्या सौभाग्यवती लग्न झाल्यानंतर नवीन घरी आल्यापासून रोज सकाळ संध्याकाळ गरम दुधाचा अभिषेक गँसला घालत असे. त्यामुळे एक लीटर घरासाठी एक लिटर अभिषेकासाठी दूध घेत होतो. आता मात्र पैसा तेवढाच खर्च होतोय दूध मात्र एकच लिटर येतय हो. तसं यामुळे सौभाग्यवतींचे लक्ष केंद्रित होऊ लागलेय गेल्या काही वर्षापासून. पुर्वी फक्त गँस रोज धुतला जात होता. आता दुधाचा अभिषेक होत नसल्याने महिनोंमहिने साफसफाई होत नाही. तसंही घरची मंडळी महागाई वाढल्यामुळे अन्नपदार्थ अगदी कट्टानकट्टी करते. अजिबात नासाडी होत नाही. पॉकेटमनी वाढवला तरीही घरचे दिवटा आणि दिवटी गपगुमान घरीच सकाळचा नाष्टा, दुपारचे आणि रात्रीचे जेवण करतात बरेच वेळा. हौसमौज पॉकेटमनी मधून भागवा असा हिने निर्वाणीचा आदेश दिल्यानंतर मुलांच्या खर्चिक स्वभावात अमुलाग्र बदल झालाय. म्हणजे अगदी आटपाट नगरातील गरीब ब्राह्मणी कुटुंबातील गोष्टींमधल्या गृहकृतदक्ष पात्रांसारखी घरची मंडळी भासू लागली. अनंत उपकार आहेत हो सरकारचे. घरोघरी अगदी वैदिक काळातील संस्कृती अवतारावी असाच चंग बांधलेला दिसतोय विद्यमान सरकारने. मेरा भारत बदल रहा है। ये नया इंडिया है। असं उगाचंच नाही म्हणत?
एवढी महागाई वाढलीय तरीसुद्धा जनता बिचारी गपचूप सहन करतेय. म्हणजे आकस्मिक युद्धजन्य परिस्थिती उद्भवली तर लोकांना अशा प्रचंड दबावाखाली जगण्याची रंगीत तालीमच चाललीय जणू. पहा किती ते आमचे सरकार दुरदृष्टी ठेऊन कारभार करतंय. कडक हेडमास्तर जसे वांड पोरांना वठणीवर आणण्यासाठी यत्न यत्न पछाडलेले असतात. कडक शिस्तीचे डोस अधूनमधून देत असतात त्यामुळे विद्यार्थी दशेतच प्रबळ राष्ट्रप्रेमाची भावना बळावते तसाच काहीसा कयास चालू आहे वाटते. म्हणून उगाचंच 'व्हॉईस रेझ' करणाऱ्यांना टवाळांना लागलीच जेरबंद केले जातेय. स्वातंत्र्यानंतर असं कधीही घडलं नव्हते. म्हणजे हे आधीच घडायला हवे होते. तसे झाले असते तर आज आमच्यावर ही वेळ आलीच नसती. सारांश काय याहून भयावह वेळ पुढच्या पिढीवर येऊन भावी पिढी होरपळून जाऊ नये म्हणून आम्हाला मुस्कटदाबी वगैरे काय म्हणतात ते सहन करावे लागतेय. मग आम्ही नाही का लहानपणी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आमच्या आधीच्या कैक पिढीने सोसले त्यामुळे त्यांचा आम्हाला दुराभिमान आहे. तसाच आमच्या पिढीचा दैदिप्य अभिमान भावी पिढीला होण्यासाठी विद्यमान सरकारच कावेबाज डाव खेळत आहे. ये है असली मास्टर स्ट्रोक।
बऱ्याचशा सरकारी व्यवहारात ऑनलाइन संस्कृती आल्यामुळे मधल्या साखळीला खिसा गरम करण्यासाठी द्यावा लागणारा पैसा वाचला म्हणून खूष होतो. वाटलं सेव्हींग करू एफ.डी. काढू. पण मनकवडे सरकार ऐकतंय सगळं बहुतेक? बँका बुडून पैसा अडकू नये म्हणून वाचलेला पैसा महागाई मार्फतच सरकारने वापरायचा ठरवलाय. ह्याला म्हणतात डायरेक्ट पॉकेटवरचा सर्जिकल स्ट्राईक. भारीच. काय ती अद्भूत विचाररम्य स्ट्रँटेजी. वाचलेल्या पैशात लोकांनी व्यसने करू नये म्हणून पण महागाई वाढत असावी. ज्यांना व्यसनांशिवाय रहावत नाही त्यांना वाढीव दरानं खरेदी करावी लागते म्हणजे मिळणारा अतिरिक्त पैसा पण सरकारी कामांसाठी वापरणार. उगाच अतिरिक्त पैशांसाठी गरीबांना कर भरावा लागू नये म्हणून सरकारची छुपी रणनीती आहे ही.
सात वर्षापूर्वी पगार बेताचाच होता. महिन्याच्या पगारात सगळे कौटुंबिक खर्च भागवून एखादा ग्रँम सोनं घ्यायला नाकी नऊ येत असत. आता म्हटलं पगार चांगला वाढलाय तरी तीच परिस्थिती सगळा खर्च होऊन एखादा ग्रँम सोन्याच्या खरेदीसाठी भंबेरी उडते. म्हणजेच सरकारने लोकांनी पैसा वाढल्यामुळे श्रीमंतांची बरोबरी करू नये व पैशाच्या मुजोर-मस्तीची हवा डोक्यात जाऊ नये म्हणून किती काळजी घ्यावी गोरगरीब जनतेची? सोबत कर्जे स्वस्त करून, पगारवाढ करून खरेदी करण्याची क्षमता वाढवली. कर्जे सहज मिळू लागली बुडणाऱ्या बँका, डबघाईला आलेल्या वित्तसंस्थांना चालना देण्यासाठी सरकारने असे केले असावे. म्हणून पुन्हा आदिम राष्ट्रकर्तव्य पार पाडण्यासाठी कर्जे काढून सरकारला प्रगतीसाठी हातभार लावलाच पाहिजे ना! असं रोजच्या जगण्यात राष्ट्राभिमानामुळे उर भरून येण्याची वारंवारता वाढली. पूर्वीच्या काळी वर्षातून दोन दिवस असायचे. हल्ली रोज रोज देशसेवा करण्याचे सौभाग्य मिळतंय. जन-आंदोलनात उभे ठाकलेले दीन-सैनिक होण्याचे अहोभाग्य लाभत नाही नशीबवान लोकांना सुद्धा. खरंखुरं राष्ट्रप्रेम ते हेच बहुधा. भारत माता की जय!!!
- भूषण वर्धेकर , पुणे
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा