हिजाब घालणारी बिकिनीतील मुलगी...


एकदा एका जाहिराती साठी स्पर्धेचे आयोजन केले होते. जाहिरात एका घरगुती वापरणाऱ्या वस्तुची करायची होती त्यासाठी जो चांगल्या जाहिरातीची संकल्पना मांडेल त्याला बक्षिस देऊन तीची चित्रीकरणासाठी निवड होणार होती. ठरल्याप्रमाणे पुण्या मुंबईतील जाहिरात कंपन्यांनी झुंबड केली स्पर्धेत. कारण सर्वाधिक इंटेलिजंट कंटेट पुण्या मुंबईतूनच तयार होतो असा त्यांचा फुकाचा अतिआत्मविश्वास आहे. मग इतर भागातील जाहिरात कंपनीच्या प्रतिनिधींना तुच्छतेने वागवणे वगैरे बाष्कळ प्रकार तिथे झाले. शंंभरहून अधिक संकल्पनांची एन्ट्री झाली. सगळ्यांनी आपापल्या बुद्धीमत्तेचा पिट्टा पाडून एकेक संकल्पना मांडली होती. जेव्हा परिक्षकांकडे सगळ्या कल्पना गेल्या तेव्हा प्रत्येक संकल्पनेवर चर्चा, छाननी, वाद झाले. मग किमान समान विषय अधिकृतरीत्या ठरवले गेले.


त्यापैकी एक होता भारतीय कुटुंबातील एकजूट दाखवून जाहिरातीत घरगुती वापराच्या वस्तूचे प्रमोशन करणे. दुसरा म्हणजे नेहमीचाच महिलांचे सबलीकरण आणि ती घरगुती वस्तू वापरून मिळणारे तिला तिचे हक्काचे स्वातंत्र्य. तिसरा विषय घरगुती वस्तू वापरल्याने देशातील सर्व गोरगरिबांना होणारा फायदा दाखवणे. असे विषय ठरले आणि तिचे उपयोगात आणण्यासाठीच्या संकल्पनांची चिरफाड केली गेली. एका संकल्पनेत एका कुटुंबातील गृहिणीचा सगळा वेळ दिवसभर कामात निघून जातो म्हणून घरगुती वस्तू वापरल्याने तिचा निम्मा वेळ वाचेल आणि मुलांच्या जडणघडणीत जास्त लक्ष देता येईल असे मांडले होते. त्यावर एका परिक्षक महिलेचा लागलीच आक्षेप आला. त्या स्वतः स्त्रीमुक्तीच्या समर्थक होत्या. तशा त्या ते दर्शवण्यासाठी स्लीव्हलेस कॉटनचा कुर्ता आणि ब्रँडेड जीन्स परिधान करूनच सार्वजनिक जीवनात वावरत असत. सोबत चेहऱ्याला साजेशा बॉबकट व कुर्त्याला मँचिंग अशी साधी ओढणी असा पेहराव नेहमीचाच. आक्षेपाचे मूळ कारण जाहिराती मध्ये महिला गृहिणी दाखवून स्त्रीला कुटुंबात जखडून ठेवण्याच्या प्रवृत्तीला प्रोत्साहन देत आहात असे होते. त्यांचा तात्विक संताप झाला. तसही त्यांची दिवसाची सुरूवातच अशा तात्त्विक संतापाने होते त्यामुळे त्या बऱ्यापैकी रुळल्या होत्या अशा प्रसंगांना तोंड देताना. काय काय असतात प्रतिपक्षाचे आक्षेप, आरोप आणि युक्तिवाद वगैरेंची त्यांना पुरेपूर जाणीव होती. त्यांच्या मते आजवर सगळ्या माध्यामातून महिला ही शोषित असतात हे भासवले गेले. तिला तिचे हक्क, अधिकार वगैरेंसाठी तमाम लोकांची आणि समजाची पुरुषसत्ताक संस्कृतीच जबाबदार आहे. अशा अनेक बुरसटलेल्या परंपरा, रुढी, प्रथा वगैरेंवर त्यांना फार चीड येत असे. त्यांचा आक्षेप आल्यानंतर परिक्षक मंडळींमध्ये तथाकथित पुरोगाम्यांचे प्रतिनिधित्व करणारे लोक होते . त्यांनी पण बाईंना दुजोरा दिला. 


एक परिक्षक मात्र या जाहिरात संकल्पनेला समर्थन देत होते. त्यांच्या मते भारतात बऱ्याचशा कुटुंबातील महिला ह्याच रिमोटकंट्रोल असतात खरेदीच्या बाबतीत. घर चालवण्यासाठी काय नको काय पाहिजे हे ठरवण्यासाठी महिलांचा हातखंडा असतो. अशा महिलांचा चलाखपणे जाहिरातीत वापर करून कंपन्यांना भरघोस फायदा झाल्याचे अनेक स्टँटिस्टिकल डेटा प्रस्तुत करून प्रेझेंटेशन दाखवले. ते एका मातब्बर जाहिरात कंपनीत कंटेट क्रीएटर म्हणून खूप वर्षे काम करत होते. यावर स्त्रीमुक्ती वादी बाईंनी लागलीच त्यांच्या मतावर त्वेषाने आक्षेप घेतला. 'महिलांचा चलाखपणे जाहिरातीत वापर करून' म्हणजे काय? महिला वस्तू नाहीत. वी आर ह्यूमन टू. वगैरे तावातावाने बडबडल्या. यावर लगेच तथाकथित पुरोगाम्यांचे प्रतिनिधित्व करणारे लोक प्रतिक्रिया वगैरे देऊ लागले. अशाच चर्चा, वादविवाद आणि आक्षेप झाल्यानंतर एक नवीन संकल्पना समोर आली. ज्या वस्तूसाठी जाहिरात करायची आहे तिला आधुनिक आणि जुना नेहमीचाच ग्राहकवर्ग भूलला पाहिजे. त्यासाठी एका महाशयांनी मुद्दा मांडला.  'नऊवारी साडी नेसलेली स्लीवलेस घालणारी बाई' आपण मॉडेल म्हणून जाहिरातीत दाखवू. म्हणजे ऑफबीट फँशन स्टाईल विथ क्लासिक टच वगैरे मसाला होईल. तशी ऑड ड्रेसकोड वाटेल अशीच संकल्पना होती आणि ती मांडणारे टेक्स्टाईल आणि फँशन ब्रँडिंग एक्सपर्ट होते. आतापर्यंत शांत बसून ऐकूण घेणारे व सहभागी असणारे एक तथाकथित संस्कृती रक्षक म्हणवून घेणारे थोडेसे उचकले. अशी नऊवारी साडी नेसून स्लीवलेस वगैरे मॉडेल नको म्हणून बोलू लागले. समाजात चांगला संदेश वगैरे जाणार नाही असा तर्कट देऊ लागले. मुख्य आक्षेप नऊवारी साडी व स्लीवलेस बद्दल होता. त्यांचे मत नऊवारी साडी एका जुन्या लिजंडरी पिढीचे प्रतिक आहे. त्याच्याशी छेडछाड करू नये. स्लीवलेस घालून अंगप्रदर्शन करणाऱ्या स्त्रीयांना समाजात फारच वेगळ्या पद्धतीने पाहिले जाते वगैरे वगैरे अजब तर्कट मांडले गेले. 


एकदोघांकडून समर्थन मिळतेय आणि आपल्या मताला अनुकूलता दिसल्यावर त्यांच्यातील अस्सल संस्कृती रक्षक जागा झाला आणि स्त्रीदाक्षिण्य, स्त्रीयांच्या तोकड्या कपड्यामुळे होणारे पतन वगैरे रटाळ विषय पटलावर येऊ लागले. यावर स्त्रीमुक्तीचा अंगिकार करणाऱ्या बाईंना हुरूप आला. त्यांनी लागलीच प्रतिप्रश्न केला. स्त्रीयांनी काय पद्धतीचा पहेराव करावा आपण सांगणारे आणि ठरवणारे कोण? आजची स्त्री पुढारलेली आहे तिला प्रोजेक्ट करण्यासाठी अशी फँशनमध्ये मोडतोड केली तर बिघडले कुठे? पुरुषसत्ताक समाजातील स्त्रीला सहन करावे लागलेले छळ वगैरेंचा त्यांचा दांडगा अभ्यास होता. त्यांनी त्यांचे मुद्दे मांडल्यानंतर तथाकथित पुरोगाम्यांचे प्रतिनिधित्व करणारे लोक लागलीच हिरिरीने मुद्दे मांडू लागले. परत वाद, प्रतिवाद, चर्चा वगैरे अखंडपणे सुरू झाल्या. येनकेनप्रकारेण सहिष्णुता असहिष्णुता वगैरे सोपस्कर आलेच सरतेशेवटी. असे सगळे वायफळ वगैरे बोलाचाली चालू असताना एकदम संस्कृती रक्षक वाले काका ओरडून म्हणाले, असे असेल तर 'हिजाब घालणारी बिकिनीतील मुलगी' मॉडेल म्हणून दाखवा. मग बघू कोण काय करेल.  कोण सहिष्णू असहिष्णू वगैरे ठरेल. त्यांच्या बोलण्यात एक बेरकी सूर होता. आता मात्र चर्चेचा सूर टिपेला पोचला होता. हिजाब, बिकीनी वगैरे विषय आल्यावर तथाकथित पुरोगाम्यांचे प्रतिनिधित्व करणारे लोक नाके मुरडायला लागले. उगाचंच द्वेषपूर्ण पद्धतीने मुस्लिम धर्मीयांच्या भावना दुखावल्या जातील वगैरे आक्षेप घेतले गेले. यावर स्त्रीमुक्तीचा गजर करणाऱ्या बाई मात्र मूग गिळून गप्प बसल्या होत्या. त्यांच्या स्त्रीमुक्तीच्या अभ्यासक्रमात मुस्लिम स्त्रीया वर्ज्य होत्या बहुतेक. आता संस्कृती रक्षक मंडळींना फारच चेव आला. पुरोगाम्यांचे आतापर्यंत मांडलेले मुद्दे घेऊन ही मंडळी त्यांना डिवचू लागली. मग नेहमीप्रमाणे तथाकथित पुरोगाम्यांचे प्रतिनिधित्व करणारे लोक मोघम सोयीस्करपणे बोलू लागले. रटाळ वादविवाद काही काळ चालूच होते. एकेका संकल्पनांची चिरफाड वगैरे करत लोकांचा उत्साह कमी होत गेला.


संकल्पनांची छाननी झाली होती मात्र दोनच मुद्दे ऐरणीवर होते. नऊवारी साडी स्लीवलेस घालणारी बाई की हिजाब आणि बिकीनी परिधान करणारी मॉडेल यावर सगळं घोडं अडलं. संभाव्य धोके लक्षात घेता आणि सणासुदीचे दिवसांत उगाचंच सोशल मेडियावर निगेटिव्ह ट्रोलिंग वगैरे नको म्हणून जाहिरात क्षेत्रातील आणि विपणन विभागाचे प्रमुख तज्ञांचा सल्ला घ्यावा असा ठराव एकमताने पास झाला. शेवटी तज्ञांच्या सल्ल्याने कोणत्याही धर्माच्या भावना दुखावल्या जातील अशा संकल्पना रद्दबातल ठरवल्या आणि पुन्हा एकदा त्याच जाहिराती साठी स्पर्धेचे आयोजन नव्या नियमावली नुसार करण्याचे ठरले.

- भूषण वर्धेकर, पुणे.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मराठा आरक्षण आणि वास्तव

मोदीस्तोमाची दशकपूर्ती

विवेकवादी हतबलता - पूर्वार्ध