युद्ध नावडे सर्वांना

युद्ध नावडे सर्वांना...

© भूषण वर्धेकर
मे २०२१


आजकाल आंतरराष्ट्रीय युद्धाच्या घटनांचा भारतातील समाज माध्यमांवर सुळसुळाट जोरात चालू आहे. मग अशा वेळी मानवतावादी म्हणवून घेणाऱ्या विचारवंतांच्या फॉरवर्डेड लेख, स्फुटं, ऐतिहासिक नोंदी व्हायरल होत आहेत. तशाच गोष्टी कट्ट विचारसरणीतील मंडळीपण बिनधोक पणे पसरवतात. पीडीत कोण आवडता की नावडता हाच कळीचा मुद्दा आहे जणू! अशी युद्धे, जमीन बळकावून हस्तगत करणे हे परंपरागत चालत आलेल्या ऐतिहासिक घोडचूका आहेत. आंतरराष्ट्रीय घटनांमध्ये युद्धाचा आलेख बघितला तर पैसा, जमीन आणि सत्ता मिळवण्यासाठीच युद्धजन्य परिस्थिती तयार केली जाते. एखाद्याला गुलाम करणे ही जशी मानवी प्रवृत्ती आहे तसेच कमी शक्तीशाली देशाला किंवा समुहाला येनकेनप्रकारेण सोयी सवलती देऊन प्रसंगी धमकीवजा इशारे देवून काबूत ठेवले जाते. विस्तारवादी धोरणात हाच दुर्गुण आहे. वॉर मिनिस्टर किंवा डिफेन्स मिनिस्टर प्रत्येक देशात असतोच असतो. संरक्षण ही सामाजिक मुलभूत गरज आहे. मग ते संरक्षण देशाचे असो वा समुहाचे. मग अशावेळी जो आपला तारणहार असेल त्याचा उदोउदो ठरलेलाच. त्याच्या चुका, घोडचूका किंवा अनंत अपराध सगळे पोटात घेऊन समर्थन करणे हेच एकसुरी ठरलेले असते. युद्धे वाईटच कारण वित्तहानी आणि जीवितहानी ही सर्वांचीच होत असते. बलाढ्य पक्षाची कमी कमकुवत पक्षाची जास्त हाच तो काय फरक. 

युद्धाचा भडका उडाल्यावर रातोरात जागी झालेली मंडळी ही युद्ध होण्यासाठी जबाबदार गोष्टींवर काहीही बोलत नाहीत. कारण आंतरराष्ट्रीय अर्थचक्रावर युद्धांचा प्रचंड प्रभाव असतो. भीती ही एकमेव गोष्ट ज्याचा व्यापारासाठी सर्रासपणे उपयोग होतो. वैश्विक इतिहासात धर्मासाठी कत्तली ह्या वर्षानुवर्षे होत आलेल्या आहेत. पीडित धर्म वा देश कोणता यावर ज्याने त्याने निषेधाची किंवा पाठिंब्याची दुकाने थाटलेली आहेत. कोणताही देश शास्त्र आणि शस्त्र या दोहोंचा वापर करतोच. कारभार चालवण्यासाठी व स्वसंरक्षणासाठी. मग त्या त्या विचारसरणीचे पाईक गुणवंत हौशे नवशे आणि गवशे पराकोटीची मंद बौद्धिकं उथळ माथ्याने मिरवत असतात. 

मानवतावाद कसा चांगला हे पाठ्यपुस्तकी छान वाटते. बिइंग प्रँक्टीकल अँक्शन ला रिअँक्शन येतेच. प्रतिसाद द्यावा की प्रतिकार करावा हे त्यावेळची दाहक परिस्थिती ठरवते. एकाएकी जर हल्ले झाले तर कडी निंदा तीखी निंदा वगैरे करणारे पण असतात आणि जशास तसे प्रत्युत्तरादाखल प्रतिहल्ला करणारे पण असतात. एक नागरिक म्हणून देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने जो पाऊल टाकतो त्याला समर्थन दिलेच जाते. उदा. भारतात आतंकवादी हल्ले जेव्हा झाले तेव्हा मोदींच्या नेतृत्वावर टिका करणारे, नावे ठेवणारे लोकच एअर स्ट्राईक वगैरे झाला की तो सैन्याने केला मोदिंचे काय कौतुक वगैरे बोलू लागले. काही बहाद्दर नेत्यांनी पुरावे द्या म्हणून मागणी केली. काही बिनडोक लोकांनी तर आतंकवादी हल्ला हा मोदींनीच घडवून आणला निवडणुकीत जिंकण्यासाठी असा जावईशोध लावला. अशा घटना जर होत असतील तर त्या पथ्यावर कशा पडतील याची खबरदारी बरोबर घेतली गेली. भक्तलोक मुळात मर्कट. त्यांना अशा पद्धतीने डबल स्टँडर्ड लोकांनी आयतं कोलीतच दिले. मर्कट असल्याने त्यांनी त्यांच्या लीला लीलया पार पाडल्या ध्रुवीकरणासाठी. 

मानवतावादी संघटनेच्या बाबतीत पण गढूळ समज बऱ्यापैकी फोफावलाय. सैनिक मरतात तेव्हा मानवतावादी आवाज उठवत नाहीत मात्र हल्ल्यात अतिरेकी मरतात तेव्हा मानवतावादी खडबडून जागे होतात. मुळात अतिरेकी का तयार होतात, कोण तयार करतात यावर मानवतावादी कधीच काथ्याकुट करत नाहीत. याचाच वर्चस्वतावादी लोक पुरेपूर फायदा उचलतात. युद्धात नुकसान हे होतेच पण त्यात आर्थिकदृष्ट्या बरेच हितसंबंध लपलेले असतात. त्या हितसंबंधांना कोणीही आवाहन देत नाही. विचारवंत वगैरे एक दोन आंतरराष्ट्रीय नातेसंबंधांवर पुस्तके लिहून कोण कसा चुकतो किंवा अमुकच कसा बरोबर असे निष्कर्ष काढून चमकोगिरी करतात. बऱ्याचशा वेळेला अशा लोकांनी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे तर्क लावलेले आढळतात. असे विसंगत तर्क आजूबाजूच्या टपलेल्या टोळक्यांना आवडतात फे फे उडवण्यासाठी. जागतिक सत्य हेच आहे की जो बलाढ्य असतो तो इतरांनी शांतता पाळा म्हणून आग्रह धरतो. मात्र स्वतःच्या बाबतीत हिंसेचे, हल्ल्यांचे समर्थन करतो. सध्याच्या जागतिक परिस्थितीत चीन आणि अमेरिका ही दोन बलशाली राष्ट्रे म्हणून ओळखली जातात. त्यांनी केलेल्या अमानवी कृत्यांवर कोणीही चकार शब्द काढणार नाही. निषेधार्थ एकही आवई उठवणार नाही. मात्र इतर राष्ट्रीय घटनांमध्ये स्वतःची टिमकी वाजवणार. अशा लोकांच्या तर्कांचा हेतू ध्रुवीकरणासाठी जोरदारपणे वापरला जातो.

जगाच्या इतिहासात नरसंहार खूप झालेले आढळतील. भारतभूमीवर देखील बरेच नृशंस नरसंहार केले गेले. मुळात आपल्या देशाचा बराचसा इतिहास बायस्ड पद्धतीने लिहिला गेला. एकतर प्रतिमामंडन करण्यासाठी किंवा प्रतिमाभंजन करण्यासाठी. एखाद्या राष्ट्राची, राज्याची किंवा नेतृत्वाची स्तुती कवने गाणारे, खुशमस्कऱ्या करणारे, गौरवग्रंथ लिहिणारे, चरित्रांचे शब्दांकन करणारे आणि आताचे बायोपिक काढून छद्मप्रतिमा उभी करणारे समुह पुर्वीपण होते आजही आहेत भविष्यातही असतील. अशी मंडळी मोठ्या गटाला आवडेल असा ऐवज तयार करतात किंवा उपलब्धतेनुसार गोळा करतात. अस्सल निष्पक्षपणे वर्णन केले जाणारे साहित्य दुर्मिळच. त्यामुळे हिंसेचे समर्थन करणारे जिकडेतिकडे सापडतात.

पृथ्वीगोलार्धाचे पौर्वात्य आणि पाश्चिमात्त्य असे भाग जर केले तर एक भाग धर्माधिष्ठित तर दुसरा विज्ञानाधारित मुल्यांना कवटाळलेला दिसतो. सगळे धर्म जरी शांतीचा संदेश वगैरे देतो म्हणत असतील तरीही प्रत्येक धर्माचा काहीना काही हिंसक इतिहास आहेच आहे. जेवढा धर्म एकजूटीने वाढेल तेवढा कट्टर होत जातो. अल्पसंख्याक असू तेव्हा विशेषाधिकार बहुसंख्यांक होऊ तेव्हा सर्वाधिकार समान अधिकार वगैरे अंधश्रद्धा असतात. हे प्रत्येकांना लागू पडते. हिंदूंच्या बाबतीत थोडेफार वावगे आहे. एकतर विस्कटलेल्या जातपातपंथांत विभागलेला धर्म म्हणजे हिंदू. जगभरात ज्या काही चाळीसच्यावर सिव्हिलायझेशन नोंदणीकृत आहेत त्यापैकी टिकलेली सिव्हिलायझेशन म्हणजे हिंदू. सिंधू नदीशी निगडीत, सप्तसिंधूशी नाळ असलेली भारतीय उपखंडात पसरलेली, विखुरलेली आणि बहरलेली समृद्ध जमात म्हणजे हिंदू. हिंदुंनी इतर धर्मीयांवर आक्रमणे करून त्यांना गुलाम केले किंवा त्यांचा देशातील जागा बळकावली किंवा मोठ्या प्रमाणात धर्मांतर करायला भाग पाडले असा उल्लेख कुठे आजवर सापडला नाही. जाणकारांनी यावर कुठे वाचले, अभ्यासले असेल तर जरूर सांगावे. इतर धर्मीयांच्या इतिहासात डोकावले तर काहींचा इतिहास हा रक्तरंजित आहे तर काहींचा शोषित, वंचित आहे. धर्माच्या आधारवर हिंसा कोणी कधी आणि किती वेळा केलीय हे वाचणाऱ्या सगळ्यांना माहिती असते. फक्त जगजाहीर बोलता येत नाही. त्यातही काही दशकांपासून इतर धर्मीयांच्या कट्टर भूमिकेला जशासतसे उत्तर देण्यासाठी कट्टर हिंदूत्ववादी जहाल गट उदयास आले आहेत. मात्र ते सकल हिंदूंचे कधीही प्रतिनिधीत्व करू शकत नाहीत.

मूळ मुद्दा हाच की भारतात अशी आय स्टँड विथ समथिंग मंडळी आणि त्यांना पाठिंबा देणारे विचारवंत आपल्या मायभूमीत ज्या गोष्टी झाल्या होत्या घडत आहेत त्यावर सोयीनुसार भुमिका घेतात. अशा ढोंगीपणाला सामान्य जनता कंटाळते. सामान्य जनतेला हिंसा ही हिंसाच दिसते मरणारा माणूसच दिसतो. पण हल्ली भारतात मरणारा कोणत्या धर्माचा आहे कोणत्या पक्षाचा आहे कोणत्या जातीचा आहे पाहून निषेध वगैरे नोंदवला जातो.  मुळात स्वसंरक्षणासाठी जर हत्यार उचलले तर तर जो बलवान असतो तोच जिंकतो. हा जगत्मान्य इतिहास आहे. इतिहासात जो ताकदवान जो सक्षम तोच टिकतो अन् लक्षात ठेवला जातो. विजय पराजय हे नंतरचे पैलू आहेत.

देशावर हल्ला झाला तर प्रतिहल्ला होणारच. २०२१ चालूय. अहिंसेची शिकवण फक्त एकतर्फी असून चालत नाही. व्यक्तीगत आयुष्यात पण अहिंसा कोणीही पाळत नाही मात्र दुसऱ्याला अहिंसेची शिकवण द्यायला पुढे सरसावतात विचारवंत वगैरे मंडळी. मुद्दा हाच आहे की पँलेस्टाईन मधल्या मुस्लिमांवर हल्ले होतात तेव्हा जेवढा राग, निषेध किंवा प्रखर टिका हल्ले करणाऱ्यांवर होते तशी टिका चीनमधील ऊईगीर मुस्लिम समाजातील लोकांवर हल्ले करणाऱ्यांवर होत नाही. इकडचा मुस्लिम तिकडचा मुस्लिम असे काय वेगवेगळे असतात का?  अशावेळी आपल्याकडे वावरणाऱ्या पुरोगामी, विचारवंत आणि मानवतावादी लोकांच्या ढोंगीपणाची किव येते. पीडीतांचा धर्म, देश पाहून गळे काढणारे वाढत चाललेत सध्या. अशा लोकांमुळे कट्टर विचारसरणीतील लोक चेकाळतात आणि धष्टपुष्ट आयुधांचा वापर करून ध्रुवीकरण करतात. हल्ली हे भारतात सर्रासपणे होत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गडबडलेलं राजकारण

विवेकवादी हतबलता - पूर्वार्ध

उठ भक्ता जागा हो