शनिवार, ३१ ऑक्टोबर, २०१५

पत्र क्रमांक नऊ

आज मी असे लिहितोय या मागे केवळ एकच उद्देश आहे, तो म्हणजे माझ्या मनातील वेदना मोकळ्या होणे. तसेही ह्या बाबतीत कोणाशीच बोलू शकत नाही. गेले १५ दिवस मला कळत नाही कसली तरी अनामिक ओढ तुझ्याकडे खेचतेय. मी याला प्रेम म्हणून शकत नाही कारण ते दोन्ही बाजूने असेल तरच घडते. एरवी क्रश किंवा एकतर्फी गुंतणे असावे असे वाटते. मला नक्की आठवतेय गेले वर्षेभर मी कधीच तुला पाहून अशा पद्धतीने व्यक्त होत नसे. कारण तेव्हा तुझ्याकडे पाहून मला कसलीच हूर हूर वाटत नव्हती. मात्र जसे मी IPL सामना पाहून आलो आणि त्या नंतर एकूण माझ्या जगण्यात प्रवाहाचे वारे वेगळेच वाहू लागले. म्हणजे अगदी गेल्या १५ दिवसात  एकाएकी तुझ्याकडे आकर्षिले गेलोय. एरवी तू फोनवर कोणाशी बोललीस, ऑफिसमध्ये कोणासोबत बोललीस, अगदी मित्रत्वाच्या नात्याने तरी मला काहीच वाटत नसे. मात्र गेले १५ दिवस तुला पहिले की फारच हूर हुर ,धडधड आणि हात पाय कंप पावतात. तुला कोणासोबत बोलताना पाहून फार बेचैन होतोय. कदाचीत खूप खोलवर जाऊन तुझा असा लाईफ पार्टनर म्हणून मी विचार केलाय का? कळत नाही.  कारण मला अफेअर वगैरे आवडत नाहीत चिरकाल टिकणारी नाती आवडतात. आणि महत्वाचे म्हणजे माझ्या मनातील माझी बायको कशी असावी त्या फ्रेम मध्ये तू अगदी तंतोतत बसतेस. अजून गुंतून पडून  त्रास होऊ नये म्हणून लागलीच काही गोष्टी स्पष्ट करतोय. का कुणास ठाऊक तूच का ती मुलगी असावीस वाटते माझी लाईफ पार्टनर म्हणून.. असो मी जास्त लिहित नाही उगाच महाकाव्य वगैरे लिहायचो तुझ्यावर.... तू जर कमिटेड असलीस तर प्रश्नच येत नाही माझ्या या भावनिक गुंतागुंतीचा. मात्र तुला जर माझ्याबद्दल काही वाटत असेल तर नक्की सांग कृपया या पत्राचा गैरार्थ घेऊ नकोस. मला फारच त्रास होत आहे म्हणून हे पत्र तुला पाठवतोय. प्रत्यक्षात बोलायचे होते. पण  खूप घाबरतोय प्रत्यक्ष बोलायला. पण माझे असे लिखित का होईना तुला कळणे गरजेचे वाटले म्हणून हा पत्रप्रपंच.  तुझ्यात खूप गुंतून पडू नये यासाठीच हा प्रयत्न. नाहीतर उगाच त्रास होतो. तुझे जे उत्तर असेल ते स्वीकारायला माझे मन तयार आहे. कधीतरी वेळ मिळाला तर भेटून यावर सविस्तर बोलूच. पण काही म्हण कदाचित तुला माझा हा मूर्खपणा वाटेल पण मला तुझ्याशी बोलायला आवडेल. उगाच मनात एक भाव ठेऊन तुझ्याशी इतरांसारखे खोटे बोलता येत नाही. जे आहे ते स्पष्टपणे बोलणारा व लिहीणारा माणूस आहे मी. मग कोणाला राग येवो अथवा न येवो मला त्याचे काही देणंघेणं नाही. तुझ्यासोबत एक बोलायचं आणि तुझ्या मागाहून तुझ्याबद्दलच वेगळं बोलायचं असा तोंडपुजलेपणा मला जमत नाही आणि जमणं अशक्य आहे. अमुक कोणाला चांगलं वाटेल वाईट वाटेल म्हणून माझं अभिव्यक्त होणं मी सिमित करू ईच्छित नाही. तुला माझ्या या पत्राने काय वाटेल यापेक्षा माझं व्यक्त होणं मी महत्वाचे मानतो. तू याची दखलच घ्यावीस असा माझा अट्टहासदेखील नाही. एकूणच आजकाल तुला अमेरिकेतून फोन येतो आणि तो आल्यावर तुझं कामात दुर्लक्ष होतं यावर सध्या उगाच गॉसिप चालू आहे. तुझ्यासमोर एक बोलणारे माझ्यासमोर मात्र तुझ्याबद्दल वेगळंच बोलतात. याची मला चीड पण येते आणि अशा लोकांची किव पण येते. मनातून झूरत असल्याने कदाचित असा तुझ्याबद्दल त्रास होत असावा. एकूण मेंदूत अशा काही रासायनिक अभिक्रिया होतात ज्यामुळे आवडणाऱ्या व्यक्तीबद्दल अशी हूरहूर वाटणं सहाजिकच आहे. हे सगळं नैसर्गिक आहे. आकर्षण आहे की एकतर्फी प्रेम हे तुझ्याशी बोलूनच स्पष्ट होईल. अर्थातच तुझी इच्छा असेल तरच. तुझ्या नकाराधिकाराचा मी निश्चितच आदर करेन. होकार किंवा नकार हे निष्कर्ष माझ्या दृष्टीनं महत्त्वाचे नाहीत. आत्ता जे जगतोय, जे अनुभवतोय याची मला जमेची बाजू वाटते. मानवी संवेदना कधी उफाळून येतील याचा काही नेम नाही.  त्यात कळत नकळतपणे तुझ्याकडे ओढला गेलो याचं मला नवल वाटतं. एकाएकी कोणाविषयी तरी असं वाटणं स्वाभाविक आहे. पण तसंच मनात ठेवणं आणि नंतर बोलायला पाहिजे होत अन् तसं करायला पाहिजे होतं असं घुसमटीत अडकण्याला काही अर्थ नाही. तुझ्याबद्दल मला अत्यंत आदर आहेच. तटस्थपणे विचार करणारी तू मुलगी आहेस हे मी जाणतो. तुला माझ्याबद्दल काय वाटते हे जाणून घेण्यासाठी मी असं लिहीत नसून माझं आत्मगत तुजबद्दलचं लिहीत आहे. एक माणूस म्हणून व्यक्त होणं याला प्राध्यान्य मी देतो. चूक की बरोबर ज्याचं त्यानं ठरवावं हे माझ्या जगण्याचं तत्वज्ञान आहे. तू एक सुस्वभावी सून म्हणून माझ्या घरात नक्कीच सामावशील. मी कुटुंबव्यवस्थेवर निस्सीम श्रद्धा असलेला मनुष्य आहे. लग्नासाठी मन जुळावी लागतात त्यात तुझ्या लग्नाची बोलणी, मुलं पाहणं वगैरे घरी चालू आहे असे कळले म्हणून असा खटाटोप करतोय. माझ्याबाबतीत सकारात्मक जर विचार केलास तर माझी निवड करून चूक केली अशी खंत तू उभ्या आयुष्यात तुला होऊ देणार नाही याची हमी मी देतो. उगाच हिरोगिरी म्हणून मी हे बोलत नाही तर जे चांगले करेन ते केवळ तुझ्यासाठीच करेन आणि तुला कसलेही दुःख होणार नाही याची जीवापाड काळजी घेईन. असो हा जर तर चा मामला आहे. तसही या जर तर वरंच माणसाचं सगळं आयुष्य अवलंबून असतं. योग्य वेळी व्यक्त होऊन मन पाण्यासारखे स्वच्छ असावे. उगाच नंतर हुरहुर वाटून काय उपयोग?  एकूण मी जगण्याकडे प्रवाही पद्धतीने पाहतो. यथार्थपणे आस्तित्ववादाशी माझ्या जगण्याची नाळ जोडली गेली आहे. असो मी माझं जगण्याचं तत्वज्ञान सांगण्यासाठी हा पत्रप्रपंच करीत नाहीए. लौकिकार्थाने माझ्या मनातील माजलेलं काहूर शांत करण्यासाठी असं लिहू लागलोय. सर्वार्थाने तुझ्या बाबतीतच मला का असे वाटू लागलेय याचे मला कमालीचे आश्चर्य वाटते बुआ! वय जसं वाढत जातं पसं आपण एकाकी आहोत अशी उगाच एकल जाणीव होऊ लागते. अन् तसंही गद्यपंचवीशी उलटल्यावर संसार लगन याकडे नैसर्गिकपणे आकर्षिले जातोच मनुष्य! त्यात एक सामाजिक व कौटुंबिक जाणीव असतेच. अखेरीस तारूण्यसुलभभावना ह्या असताततच की? अशा मनस्थितीत तुझ्याकडे आकर्षित झालो एवढेच! यात काही मला गैर वाटत नाही. आणि एक महत्वाचे मला सांगायचे आहे की आपण एकाच गावातील असल्याने तुझ्या कुटुंबियांना माझे घरातले बऱ्यापैकी ओळखतात. जर तुला माझ्याबद्दल खरंच काही वाटत असेल तर मी रीतसर लग्नाची मागणी घालायला तयार आहे. माझ्या घरातल्यांना तू पसंत पडणार हे नक्की! शिवाय सध्या माझ्या लगनासाठी मुली पाहणे वगैरे सुरु होईलच. तुझी हरकत नसेल तरच ह्या गोष्टी पुढं नेता येईल. एकंदरीत आयुष्याची गंमत आहे बघ एरवी लगनाचा विषय निघाला की मी टाळाटाळ करतो. पण तू जशी मला आवडू लागलीस तशी लग्नाळू स्वप्नं पडू लागलीत!तसा त्यात एकतर्फी रमलोय सुद्धा ! मजेशीर आहे बाबा हे आयुष्य ! कलाटणी देणाऱ्या घटना कधी घडतील याचा काही नेम नाही. कदाचित मी भावूक झालोय यामागे आपण गाववाले आहोत हेही कारण असू शकते. कारण एकाच गावाशी निगडीत असल्याने लाईफ पार्टनर बद्दल असणारी असुरक्षितपणाची भावना तुझ्याबाबतीत राहिली नाही.  नाहीतरी हल्ली जो तो असुरक्षित मानसिकतेचा बकरा बनलाय.  माझा जोडीदार कसा असेल, त्याच्या कसल्या भानगडी वगैरे तर नसतील ना, तो स्वभावाने कसा असेल असे एक ना अनेक मध्यमवर्गीय प्रश्न सगळ्यांनाच पडतात. त्यातून मी ही सुटलेलो नाही.  जेव्हा तुझा विचार करतो तेव्हा वेगळ्याच रोमॅन्टिसिझममध्ये असतो मी! का कुणास ठाऊक असे मी आजवर कधी अनुभवले नव्हते. तसा माझा भविष्यावर विश्वास नाहीए. पण हल्ली रोज भविष्य वाचण्याचे वेडगळ प्रकार चालू आहेत.  कुठेतरी मनपसंत जोडीदार मिळेल असं वाचलं की सातवे आसमानपर असतो मी!! तसा हा वेडपटपणाच आहे हा. पण शेवटी माणूस म्हटलं की असं होतं असतेच. कोणी याला नावे ठेवतो तर कोणी टाळत असतो. मी मात्र या जगण्याचा मनापासून आनंद घेतोय! रोज नवे कपडे घालून येतोय. पहिल्यांदाच असं प्रेझेंटेबल राहतोय. असो माझ्यात होणारे बदल हे मला चांगलेच लक्षात येऊ लागलेत. जगण्याची मौज अनुभवतोय ! नियतीने काय वाढून ठेवलंय हे काही कोणीच सांगू शकत नाही. मनासारखं घडलं तर आनंदाने जगायचं अन् नाही घडलं तर त्रयस्थपणे जगण्याकडे पाहत पुढं जायचं या पलीकडे जाऊन आपण काही करू शकत नाही. जे आहे ते तसंच आहे असं स्विकारून जगण्याचे मौलिक जाणणारा मी एक मितभाषी माणूस आहे. अशी माझ्या जगण्याची स्पंदनं आहेत असं म्हण हव तर ! काळाच्या पुढे नतमस्तक होऊन त्याच्यानुसार होणाऱ्या बदलांशी समन्वय साधून आजवर जगत आलोय. आयुष्याकडे खूप सकारात्मकतणे पाहतो मी. असो एवढेच सांगतो की एकदा विचार करून तर बघ  निराश तुला कधीच होऊ देणार नाही.  तुझ्यासाठी मी एक अखेरची संधी नक्कीच असेन. डिअर ईज अ पर्सन हू गिव्ह्स लास्ट चान्स अगेन ऍण्ड अगेन
तुझा होण्याची वाट पाहत बसलेला  एक...  एकटा... एकलकोंडा...
1 मे 2015 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

पवित्र कुराणातील काही निवडक आयातींची चिकित्सा

कुराण हा इस्लाम धर्माचा पवित्र ग्रंथ आहे. याला "अल्लाहचे शब्द" मानले जाते आणि ते अपरिवर्तनीय आहे अशी मुस्लिमांची श्रद्धा आहे. कुरा...