गुरुवार, १३ नोव्हेंबर, २०२५

खरा तो एकची धर्म - विडंबन

खरा तो एकची धर्म - विडंबन 
(साने गुरुजी यांची क्षमा मागून)

खरा तो एकचि धर्म
जगाला जिहादी अर्पावे

जगी जे हीन अति धर्मभोळे
जगी जे दीन लुळे पांगळे 
तया जाऊन उसकावे
जगाला जिहादी अर्पावे

जयांना कोणि ना विचारी
सदा ते मनोमनी कुढती
तया जाऊन आरडीएक्स ने उडवावे
जगाला जिहादी अर्पावे

समस्ता शांतीसंदेश तो द्यावा 
शांतीदूतास फियादिन बनवावा
काफिरास असह्य वेदना द्यावे
जगाला जिहादी अर्पावे

सदा जे बोंबलति सर्वधर्म बंधुभाव
जयांना नदिखती म्लेच्छ मूलतत्त्ववाद
तया जाऊन सेक्यूलर मिरवावे
जगाला जिहादी अर्पावे

कुणा ना कुफ्र बोलावे
कुणा ना शिर्क सांगावे
समस्ता धर्म विचारू गोळ्या घालावे
जगाला जिहादी अर्पावे

तौहिद न मानणारे शोधावे
तयांना जहन्नूम धाडावे
हूरांसह जन्नत खेळावे 
जगाला जिहादी अर्पावे

जिथे अंधधर्मदास्य दिसावे
जिथे धर्मकट्टर शोधावे
तिथे व्हाईट कॉलर मॉड्यूल बनवावे
जगाला जिहादी अर्पावे

असे जे आपणापाशी 
जसे स्फोटके, आरडीएक्स
सदा ते देतची जावे
जगाला जिहादी अर्पावे

शोधावा दारूल हर्ब विश्वात
रूजवावा दहशतवाद जगतात 
सदा हे ध्येय पूजावे
जगाला जिहादी अर्पावे

असे हे सार धर्माचे
असे हे सार कट्टरतेचे
परार्था आत्मघातकी व्हावे 
जगाला जिहादी अर्पावे

जयाला धर्म तो लाभती 
तयाला हूर बोलाविती
तयाने जन्नतमय व्हावे
जगाला जिहादी अर्पावे

©भूषण वर्धेकर 
पुणे 
१३ नोव्हेंबर २०२५

लेखनविश्रांती.

मंगळवार, १४ ऑक्टोबर, २०२५

नास्तिकतेची वल्कलं

घेऊन निधर्मीवादाचा झेंडा
पेटवून इहवादाचा डंका
झालाय एकजण नवखा नास्तिक
बिथरला पाहून बहुसंख्य आस्तिक

कोणता सच्चा धार्मिक यावर
करू लागला गहन विचार
कोणती श्रद्धा कोणती अंधश्रद्धा
यातच मनस्थिती झाली द्विधा

जन्मतः असल्याने हिंदू 
जागरूकपणे प्रश्न विचारून
झिडकारल्या रुढी, प्रथा
नाकारल्या परंपरागत आस्था 

सोशिकपणे लागला वाचू
विचारवंतांची पुस्तके मिळवून 
धार्मिक समीक्षा कठोर करून 
विवेकाने निर्णय घेऊन 

मनाशी बांधून एकच तर्क
आपाल्याच विचारात होऊन गर्क
धार्मिक माणूस असतो मुर्ख
अंधश्रद्धाळू तर त्याहून शतमुर्ख

सश्रद्धांची करून टिंगल 
अध्यात्माची करी टवाळी
देवभोळ्यांना उगाच डिवचून
देवदेवतांची उडवी खिल्ली 

लिहून प्रहसन प्रसंगी विडंबने
कैक दिवस यातच लोटले
नाव छापून प्रसिद्ध पावला 
नास्तिकतेचा टेंभा मिरवला 

एक पुरस्कार चालुनी आला
सभा, भाषणे प्रसवू लागला
गावोगावी मागणी वाढली 
गोष्टी, किस्स्यांची महफिल सजली 

विचारवंतांचा शिक्का लागला
वृत्तवाहिन्यांवर लागली वर्णी 
तज्ञ म्हणून समाज पावला 
नास्तिकतेची तत्वे वरकरणी

पाहता पाहता सरली वर्षं 
व्याख्यानांतून दिसला दर्प
मानधनाचे वाढले आकडे
प्रतिस्पर्धींशी झाले वाकडे

उपाय म्हणून स्वतःच्या नावे
सुरु केला एक विचारमंच
कार्यकर्ते जमवून मनोभावे 
तयार केले अनुयायी संघ

समविचारी लोकांचे कोंडाळे 
स्वस्तुती मिरवून बळे बळे
साजरे झाले कौतुक सोहळे
निधर्मी विचारांचे उमाळे 

यातून उभं राहिलं एनजीओ ट्रस्ट 
काही कार्यकर्ते झाले विश्वस्त 
तर काही कारकुनी कामात व्यस्त
नवखा नास्तिक झाला अस्ताव्यस्त 

सुरु झाले दौरे अन् वैचारिक सत्संग 
तोच तो विचार नवनवीन श्रोतृवृंद
रोज नवं ठिकाण रटाळ विचार 
डबक्यात साचलेला बौद्धिक आकार 

अचानक मिळाले एका चॅनेलचे फुटेज
झाले फॉलोअर्स मिरवायला तरबेज 
वाढली गावोगावची मेळाव्यांची रेलचेल 
सोबत वाढता जमाखर्चाचा रोजमेळ

हळूहळू आले स्पॉन्सर्ड पुरस्कार दारी
नास्तिकाची सुरू झाली दुनियादारी 
केली ठशीव केशभूषा वेशभूषा 
विचारांची दैना, किर्ती झाली दशदिशा 

कालांतराने वाढत गेले अनुयायांचे स्टेक्स 
दिमाखात उभे कार्यक्रमांचे चकाचक फ्लेक्स 
वाढता संपर्क अन् गर्दीचा वाढता आलेख 
तयार झाले पंथ, संप्रदायाचे अभिलेख 

झाला नवखा नास्तिक पतित पावन 
कैक देशोदेशीचे झाले अनेकदा भ्रमण
अनुयायांनी केला सुरू वार्षिक महोत्सव 
अखेरीस गळून पडले विवेकी बौद्धिक सौष्ठव 

© भूषण वर्धेकर 
१०/४/२०२२
भुकूम 

बुधवार, १ ऑक्टोबर, २०२५

तुम्ही नास्तिक की सुधारक?

तुम्ही नास्तिक की सुधारक?

नास्तिक म्हणजे कोण तर जो कसल्याही ईश्वरीय, परमेश्वरी संकल्पना, आस्था आणि दैवतांना नाकारणारा. रुढी, परंपरा, प्रथा आणि पूर्वापार चालत आलेल्या चालीरीती याकडे तर्काधारित, वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहणारा. दैवी वगैरे घडणाऱ्या सगळ्या गोष्टींचा शास्त्रीय पद्धतीने अवलोकन करणारा. धर्म, जातपात, पंथ आणि संप्रदाय यांना न मानणारा. नास्तिक होण्यासाठी किमान तर्कशुद्ध पद्धतीने विचार करण्याची क्षमता असावी. काहींना ती उपजत असते काहींना मरेपर्यंत लाभत नाही. एकदा का विचार सुदृढ झाला की प्रश्न विचारून उत्तरं शोधून काही निष्कर्ष काढणं सोपं असतं. नास्तिक मनुष्य अशी उत्तरे वैज्ञानिक दृष्टिकोनातून मिळवतात. तर अज्ञेयवादी व्यवहारिक दृष्टीकोनातून. याचा अर्थ नास्तिक व्यवहारिक दृष्टीकोनातून पाहतच नाही असा होत नाही. नास्तिक मनुष्य एक भूमिका घेत प्रत्येक प्रश्नाला, समस्येला आणि आदळणाऱ्या घटनांना सामोरा जातो. तर आस्तिक शरण जाऊन पापभीरू होतो. त्यामुळे आस्तिक, नास्तिक, अज्ञेयवादी आणि विवेकी मनुष्य हे प्रकार उपप्रकार करणं सोप आहे. खूप लोकांचा गोड गैरसमज असतो की नास्तिक आहेस तर अमुक प्रबोधन कर, तमुक वर भाष्य कर, फलाना टिमका वर प्रतिक्रिया दे वगैरे... पण हे बैल बुद्धीचं लक्षण आहे. प्रबोधन करणे हे सुधारकांच्या भात्यातील धारदार अस्त्र. नास्तिक हा वैयक्तिक पातळीवर आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक घटनांची उकल करत घडतो. सुधारक त्यापुढील आवृत्ती. कारण सुधारकांनी नास्तिक होऊन इतरांना प्रबोधन करण्यासाठी तयारी केलेली असते. सुधारक हा विवेकीच असावा. नाहीतर झुंडीच्या जोरावर स्वतः ही फसतो झुंडीला पण फसवतो.

नास्तिक होण्यासाठी आयुष्यातला कोणताही टप्पा चालतो. आस्तिक असो वा अज्ञेयवादी आजूबाजूच्या वातावरणात जडणघडणीत घडत जातो. नंतर मग पापभीरू, दैववादी, श्रद्धाळू, अंधश्रद्धाळू वगैरे टप्पे नंतर येतात. कारण जन्मतः विचार स्वातंत्र्य खुंटलं की अशी फौज तयार होते. लहानपणापासून जर जडणघडणीत प्रश्न विचारला तर आहे हे असंच आहे ते असेच करावे लागते ही आसक्ती ओढवली की कळपातील मेंढ्या सारखं आयुष्य होतं. नास्तिक यातून सुटू शकतो. तो स्वतः सुटला सोबतच्या जवळच्या लोकांना परावृत्त केले तर विवेकी म्हणायला हरकत नाही. नंतर सुधारणा करण्यासाठी, प्रबोधन करण्यासाठी सुधारकांच्या पावलांवर पाऊल टाकले तरी नैराश्य आलं तरी समाधान लाभेल. आपण काहीतरी वेगळं झालो झुंडीतून सुटून यासाठी. सुधारक होणं सोपं नाही. कारण शतकानुशतके चालत आलेल्या परंपरा, प्रथा, रुढी आणि समज यांना समर्थपणे भिडून, प्रश्न विचारून प्रसंगी वैचारिक भूमिका घेत सर्वसामान्य जनतेला कन्व्हीन्स करणं परम अवघड काम आहे. नास्तिक असताना हे सोपे आहे कारण वैयक्तिक पातळीवर खूप मोठा समुदाय आजूबाजूला नसतो. सुधारकांना मात्र भव्य समुदायाच्या सुपीक डोक्यात वैचारिक पेरणी करावी लागते. यातून सर्वप्रथम अनुनायी घडतात. विवेकी अनुनायी तयार होणं फार जिकिरीचे आहे. अनुनय करणारा अनुनायी मात्र विवेकी अनुनायी होण्यासाठी सुधारक अस्सल मातीतला असावा लागतो. फेक विचार, दे भाषणं, छाप लेख की झाला सुधारक. ही सोपी गोष्ट नाही. स्वतः तावून सुलाखून बाधित समाजाला बाहेर काढून आपल्या विचारांचा बनवणं खूप मोठं दिव्य आहे. नास्तिक विचारांचा आहे म्हणून अमुकतमुक गोष्टींवर द्वेषमूलक टिप्पणी करणं जर मूलभूत हक्क वाटत असेल तर तीच ठाम भूमिका तोच भक्कम तर्क फलानाटिमका गोष्टींवर पण असू द्यावा. नाहीतर तुमच्या नास्तिकतेची कसोटी लागते. कारण अशा प्रसंगी जर तुमच्या भूमिका संशयास्पद वाटल्यास तुमच्या मौलिक विचारांची राखरांगोळी झाल्याशिवाय राहत नाही. कारण अति संहत माध्यमं टपलेली असतात चिरफाड करण्यासाठी. तुमच्या जाहीर भूमिकांमध्ये जर कद्रुपणा आढळला तर तुमची किंमत शून्य. एकदा का सुधारक होण्यासाठी जय्यत तयारी केली आहे तर मग स्वार होऊन लढाईत उतरल्यशिवाय रंग चढत नाही विचारांना. समोर जातपात धर्म वगैरे शुल्लक वाटणारे अडथळे सुद्धा निर्णायक ठरतात जर तयारी कमी पडली तर. जगाच्या पाठीवर कुठेही राहो पण आपण आपला विचार भक्कम आणि प्रवाही ठेवला पाहिजे. नाहीतर परिस्थितीनुरुप समोरच्या व्यक्तीनुसार जर विचार, तर्क, मांडणी आणि म्हणणं बदलत असेल तर रंग बदलणारी सरड्याची जमात आणि आपण काय तो फरक राहिला?

जगभरात किमान काही हजार धर्म, त्यांचे संप्रदाय आहेत. त्यातील जातीपाती आणि त्यांच्या वैचारिक मांडण्या भरपूर आहेत. लौकिकार्थाने सगळे धर्म मानवजातीच्या कल्याणासाठी तयार झाले असले तरी त्याचा प्रचार प्रसार करणारे विवेकी नसतात म्हणून सगळा बोऱ्या वाजतो. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे नंदीबैलासारखे मान डोलावणारे धर्मवाहक तयार झाले तर क्लिष्टता वाढणारे संप्रदायाचे जाळे वाढते. गुंतागुंत होते ती इथे. सुधारककांना धर्माचा जिर्णोद्धार करायचा नसतो तर मानवतेचा उद्धार करायचा असतो. होतं उलटं. धर्माचा उद्धार आणि मानवतेचा जिर्णोद्धार. मग समाज स्विकारण्याऐवजी झिडकारतो. सुधारक हे झिडकारण्यासाठीच असतात त्या त्या धर्माच्या ठेकेदारांसाठी. सुधारकांचा लढा ठेकेदारांशी नसतो. प्रबोधनाची आयुधे ही वहावत गेलेल्या जनतेसाठी असतात. नास्तिक मनुष्य सहजपणे प्रभावीत होईल. पापभीरू दैववादी श्रद्धाळू व अंधश्रद्धाळू जनता फार भावनिक असते. तिला सोदाहरण पटवून देण्यासाठी जंगजंग पछाडावा लागतो. समाजातील एका खूप मोठ्या गटाचा समज असतो की आमच्या मनासारखे बोलत-वागत असाल, आमच्या विचारांशी तुमचे विचार जुळले तरच तुम्ही आमचे. तरच डोक्यावर मिरवू तुम्हाला. नाहीतर तुम्ही कोण आम्हाला शिकवणारे? ह्या प्रमादाला पदोपदी तोंड द्यावे लागते. 

अज्ञेयवादी लोकांना माहिती सगळं असतं. पण सुधारक होण्याची खाज नसते. तुझं तू माझं मी. ही मनोवृत्ती मुरलेली असते. कोणाला शहाणं करायला जात नाहीत की सुधारकांच्या गळ्यातील हार पण होत नाहीत. ही मंडळी साधी भोळी भाबडी नसतात की धूर्त कावेबाज पण नसतात. ह्यांची एक वेगळीच दुनियादारी चालू असते. त्यामुळे यांची जीवनशैली प्रमाण मानून यांच्या सारखे आयुष्य जगलं पाहिजे मानणारी मंडळी नेहमीच उदयास येत असते. अर्थातच ही संक्रमणाची अवस्था असते. आर्थिक सुबत्ता आली की सुखवस्तू जीवनशैली उपभोगली जाते. अशी मंडळी सुशेगाद जगत असतात तिन्ही त्रिकाळ. रोजच्या जगण्याशी संघर्ष नसतो की मूलभूत गरजांसाठी झगडावे लागत नाही. मात्र ही अवस्था येण्यासाठी बऱ्याच वेळा खस्ता खाल्ल्या जातात. त्यामुळे अशा लोकांचं प्रबोधन करणे सोपे नसते. कदाचित त्यांनी खूप मोठा कालावधी बघितलेला असतो ज्यात राजकीय आणि सामाजिक बांधिलकीची फसवेगिरी अनुभवली असते. हेच कारण असतं की ज्या ज्या वर्गातील पिढ्यानपिढ्या संघर्ष करून स्थिरस्थावर झाल्यावर त्या त्या वर्गातील पिछाडीवर असलेल्या समाजाकडे सहसा दुर्लक्ष केले जाते. कारण त्यांना ठाऊक असतं की व्यवस्था कशी कुचकामी आहे आणि आपल्या संघर्षाचा फायदा कोणी कसा घेतला आहे ते. त्यामुळे अशी मंडळी चार हात लांब राहतात एकदा स्थैर्य प्राप्त झाले की. मूळ मुद्दा येतो प्रवाहात येण्यासाठी, सुधारणा, प्रबोधन करण्यासाठी नवनवीन पिढीला समाजात पुन्हा झगडावे का लागते? याचं कारण म्हणजे जनतेला कन्व्हीन्स करण्यासाठी ज्या अनुयायांनी राजकीय विचारसरणी अंगिकारली आहे तिला असलेला स्वार्थी राजकीय टेकू. हा टेकूच सर्वात घातक वैचारिक लढ्यासाठी. विचारधारेचा प्रसार, प्रचार जर राजकीय आशीर्वादाने होत असेल तर तोच राजकीय आदर्श वैचारिक अधोगतीला कारणीभूत ठरतो. विचारधारेचा आणि राजकीय प्रस्थापितांचा संसार सुखाचा होत नाही. कारण विचारधारेत तडजोडी करायची गरजच उरत नाही. तर राजकीयदृष्ट्या तडजोडीचे केविलवाणे स्वरूप दयनीय असते. अशावेळी सुधारकांच्या पावलांवर लोटांगण घालणारे धटिंगण कधी पायाला धरुन तोंडावर पाडतील याचा नेम नाही. त्यामुळे विचारसरणी आणि राजकीय प्रवाह हे वेगळेच असावेत. राजकीयदृष्ट्या जागरूक असणे आवश्यक आहे पण विचारांच्या खांद्यावरून अनुयायांनी समर्थकांमध्ये तेवढा गाढा विश्वास निर्माण केला पाहिजे. तसं झालं तरच वैचारिक आणि सामाजिक राजकीय ऋणानुबंध चिरकाल टिकतात. कुरबुरी चालू असतातच. पण त्याची व्याप्ती शेवटच्या स्तरापर्यंत येऊ लागली की पतन होणं स्वाभाविक आहे.

विचारसरणीला देदीप्यमान इतिहास असणं आणि तो तसाच पुढील पिढ्यांना मार्गदर्शक ठरणं यात खूप मोठी पोकळी असते. पूर्वजांनी भोगलेल्या यातना पुढच्या पिढीला सांगितल्या तरी त्याची जाणीव आणि नेणिव होत नाही. तिची व्यथा, व्याप्ती माहिती असणं वेगळं आणि ती दुर्दशा अनुभवणं वेगळं. त्यामुळे प्रत्येक पिढीत संक्रमित होणारी मूल्ये रुजली पाहिजेत. एकच औषध सगळ्यांनाच लागू होत नाही. त्यामुळे एकच अभ्यासक्रम सर्वाना शिकवून सुधारणा, प्रबोधन करणे कालांतराने रटाळ वाटते. परिस्थितीचे वास्तव आणि विचारसरणीची वास्तविकता नव्या पिढीला आपोआपच दिसते. त्यामुळे वैचारिक मंथन झाले पाहिजे. नवनवीन प्रयोग केले पाहिजेत. नवीन बदल स्वीकारले पाहिजेत. जुन्या कळकट्ट समजूतींना फाटा दिला पाहिजे. हे जर वेळोवेळी नाही झाले तर वैचारिक प्रवाह भरकटतो. एवढं सगळं व्यवस्थित पार पाडून जर संघटनेचे नेतृत्व जर कचखाऊ असेल तल अनुयायांना दोष देऊन काय होणार? नेतृत्व प्रामाणिक, अनुयायी निष्ठावंत आणि संघटन व्यापक ही त्रिसूत्री राबवली तरच नवीन येणाऱ्या लोकांना विचारांचे झेंडे मिरवावेसे वाटेल. अन्यथा पुरस्कार प्राप्त करण्यासाठी किंवा व्याख्यानांचा रतीब टाकण्यासाठी नेते उपनेते तयार होणारी मुर्दाड संघटना स्थापन होईल. तीची पाळंमुळं खोलवर रुजणारच नाहीत. त्यामुळे विचारांचे मूल्य आणि कृती करणे याची सांगड चालता येत नसेल तर सुधारकांची फौज सुद्धा निकामी होईल. युद्धभूमीवर जाताना जशी तयारी करावी लागते तशीच सखोल तयारी वैचारिक बैठक पक्की करण्यासाठी लागते. क्रिस्टल क्लिअर विचार आणि सुस्पष्ट भाष्यं फार महत्त्वाची. लिसनिंग स्किल पण तेवढंच जिकिरीचे. कारण समोरचा कोणत्या अडचणींतून जात आहे किंवा गेला आहे याची पुरेपूर समज असणं गरजेचं आहे. मी म्हणतो तेच खरं तेच झालं पाहिजे. ही हुकुमशाही झाली. आपलं म्हणणं मान्य नसेल, पटलं नसेल पण सगळ्या विचारांचे प्रवाह टिकेल ती लोकशाही.

विवेकी म्हणजे कोण? आस्तिक नास्तिक अज्ञेयवादी सगळे विवेकी असायला हवेत. मात्र अंधानुकरण करण्यामुळे विवेक शून्य होतो. अंधानुकरण कोणाचेही नको. मग ते आधीच्या पिढीतील सुधारणावादी धोरणी नेतृत्वाचे पण अंधानुकरण घातक. त्यांचा काळ, त्यांच्यावेळची परिस्थिती आणि तत्कालीन साधनं ही नक्कीच बदललेली असणार मग त्यांचेच आंधळे अनुकरण कशासाठी? विचारांच्या पालख्या वाहण्यासाठी आपण तेवढे पाईक आहोत का याची शहानिशा कोण करणार? केवळ पूर्व पुण्याई म्हणून लाभले म्हणून मिरवले असे चालत नाही की नवीन पिढी स्विकारतही नाही. नवीन पिढीला जुन्याच वैचारिक चळवळीत बळजबरीने आणणं आणि नवीन पिढीला वैचारिक चळवळीत जाण आपसुकच वाटण यात फरक आहे. कारण एखाद्या सुविधा उपलब्ध होण्यासाठी एका पिढीला घर्डेघाशी करावी लागते त्याच सुविधा नव्या दमाची पिढी जन्मजात उपभोगते. मग चळवळीत येण्यासाठी अशा नव्या पिढीला आश्वासक वातावरण निर्माण झाले तरच फायदा. नाहीतर तीच जूनी जीर्ण पीढी त्या समस्येसाठी कित्येक दशकं चळवळीत झगडत असेल तर चळवळीचा फायदा कोणाला झाला? जनतेला की प्रस्थापितांना? अशी सगळ्या बाबींचा उहापोह वेळोवेळी झाला पाहिजे. तरच विचारांची उत्पादकता वाढते. नाहीतर नीरसवाणं रहाटगाडगे चालू राहतं चर्चा, मोर्चे, निदर्शने, संघटना, नेते, उपनेते, उपक्रम आणि बैठका. यातून सुटणं शक्य होत नाही. वैचारिक बांधिलकी टिकावी म्हणून नेहमी नवीन पीढीचे प्रश्न, समस्या आणि त्यावर काथ्याकूट करून त्यांच्यासाठी आश्वासक किमान समान कार्यक्रम राबवले गेले पाहिजे. तरच सेंद्रिय संक्रमण होत राहील. नवनवीन विचारप्रवाह नांदतील. 

संघटना स्थापन करणं आणि ती यथार्थपणे चालवणं हे महाकठीण काम आहे. त्यासाठी उर्जावान मनुष्यबळाची गरज असते. ते मनुष्यबळ तरुण रक्ताचं असेल तर संघटन बहरते, व्यापक होते. सकस, चौरस आणि चिकित्सक प्रवाही विचारांची शिकवण मुरते. त्यातून संघटनेचे अंतिम ध्येय, लक्ष्य ठरवणं सोप होतं त्यानंतर त्यासाठी योजनाबद्ध मार्गाक्रमण करणं सहजसाध्य होते. आमची प्रबोधनाची परंपरा फार जुनी आहे वगैरे इतिहासात रममाण होऊन संघटना वाढत नाही. तसा कार्यकर्ता घडवावा लागतो. सुधारकांचा अनुयायी आणि संघटनेचा कार्यकर्ता ह्या दोन वेगळ्या व्यक्ती आहेत. अनुयायी आचरणातून तयार होतो कार्यकर्ते कुशल संघटनेतून. कार्यकर्त्यांसाठी संघटनेचा शिस्तीचा उपक्रम असावा तर अनुयायासाठी सुधारणावाद्यांचा वैचारिक गाभा. ह्या दोन्ही गोष्टी समांतर पणे पुढे जात असतील तरच विचारधारेचा प्रभाव वाढत जातो. अशा परिस्थितीत चळवळ, संघटना, कार्यकर्ते, अनुयायी आणि सामाजिक बांधिलकी ह्या बाबींचा जर पारदर्शकपणे जनतेशी संबंध राहिला तरच सार्वजनिक जीवनात व्यापक प्रभाव राहतो. जेव्हा जनतेमध्ये विचारधारा स्विकारली जाते तेव्हा तीची व्यापकता एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे नकळतपणे संक्रमित होते. त्यासाठी फारसे कष्ट करावे लागत नाहीत ना संघटनेला ना कार्यकर्ते लोकांना ना सुधारणावादी नेतृत्वाला. अशा विचारांना वाहिलेल्या चळवळी मग त्या समतेच्या असो वा अध्यात्मिक, धार्मिक विचारांच्या. त्यांना मिळणारा अवकाश हा उत्तरोत्तर वाढत जातो. अशा संघटना स्थापन झाल्यानंतर त्याची कुशलतेने आखणी, मांडणी आणि प्रभावीपणे प्रसार करणारे समाजाभिमुख अनुयायी फार मोलाचे असतात. त्यांना राजकीय परिप्रेक्षात आणलं तर संघटनेचा वापर राजकीय स्थैर्यासाठी केला जातो. एकदा का राजकीय स्थैर्य प्राप्त झाले की संघटनेत येणारे राजकीय स्वार्थ साधण्यासाठी येतात. अशा लोकांची वैचारिक बांधिलकी तितकीशी तात्विक पातळीवर भक्कम राहत नाही. तर्क आणि कृती ह्या विचारधारेच्या प्रमुख बाजू असतात. राजकीय गंध दरवळला की कृती स्वार्थी अन् तर्क सोयीनुसार होत जातात.

सरतेशेवटी एकच महत्वाचे आहे की सुधारक म्हणून तुम्ही व्यक्तीगत आचरण जर विवेकी ठेवलं अन् संघटनेत राजकीयदृष्ट्या लवचिक वैचारिक पाया घडवला तर प्रभावाची व्याप्ती कालानुरुप आकुंचन पावते. अशा वेळी समविचारी लोकांचं कोंडाळे करून स्वतःच्या उदोउदो चा जाहीर कार्यक्रम साजरा केला जातो. प्रत्यक्षात सार्वजनिक जीवनात दुर्लक्षित राहतात. अशाप्रकारे कित्येक विवेकी चळवळीचा ऱ्हास झाला. काही तगून आहेत तर काही गटांगळ्या खात आहेत. अखेरीस एवढंच नमूद करावेसे वाटते की व्यक्तीगत पातळीवर नास्तिक विवेकी भूमिका घेत इतरांसमोर आदर्श वैचारिक बांधिलकी ठेवावी. भक्कम संघटना नसेल इतरांना आपल्यासारखे बनवण्यासाठी आटापिटा करण्यात काही हशील नाही. संघटनेचे पाठबळ असेल तर मग निष्ठावंत विवेकी अनुयायी तयार करणं आद्यकर्तव्य व्हावे.

लेखनविश्रांती!

© भूषण वर्धेकर 
४ एप्रिल २०२५
पुणे 


गुरुवार, ११ सप्टेंबर, २०२५

आरक्षण म्हणजे खिरापत नव्हे!

आरक्षण म्हणजे खिरापत नव्हे!


भारतीय राज्यघटना लिहिली जात असताना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी फार बारकाईने अभ्यास करून आरक्षणाच्या तरतुदी केल्या. सर्वार्थाने जो समाज सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि राजकीय प्रवाहापासून दूर होता त्याला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आरक्षणाच्या तरतुदी केल्या आहेत. यात प्रामुख्याने वंचित, शोषित जनतेला प्राधान्य द्यावे हे महत्त्वाचे. कारण वर्षानुवर्षे एकाच वर्गातील पिढ्यानपिढ्या लाभार्थी होत होत्या. बहुसंख्य सवर्ण हे संधी मिळवून आपापल्या परीने प्रगती करत. मात्र संधी न मिळालेला समाज किंवा संधी असूनही तीचा वापर कसा करावा याचा मागमूसही नसलेला समाज प्रामुख्याने शोषित, वंचित होता. दुर्लक्षित नव्हता फक्त शासनदरबारी, प्रशासकीय कारभारात अजिबातच नव्हता. अशा मंडळींची समाजातील धनाढ्य लोकांकडून पिळवणूक होत असे. नंतर अशा मंडळींना दलित, अस्पृश्य, मागास, भटकी जमात वा गावाच्या वेशीबाहेरची जमात वगैरे संबोधलं गेलं. अशा लोकांना समान संधी आणि सामाजिक न्याय देण्यासाठी आरक्षण महत्वाचे. मात्र आरक्षण हा हक्क नसतो. ती एक बेजमी असते सरकारी सबसिडी सारखी. त्यामुळे जे साध्य करायचे आहे त्यासाठी मागासलेल्या वर्गांना आरक्षण हे साधन म्हणून वापरणं गरजेचं होतं. मात्र चाणाक्षपणे आरक्षण हेच साध्य ठरवून हक्क सांगण्यासाठी राजकीय आणि सामाजिक व्यवस्था मजबूतीने उभी राहीली. स्वातंत्र्यानंतर किमान चार पिढ्या आरक्षणाचा लाभ घेऊन जर तळागाळातील लोकांपर्यंत आरक्षणाच्या संधी पोचल्या नसतील तर समान संधी आणि सामाजिक न्याय वगैरे ह्या फक्त भूलथापा राहतील. आरक्षणाचा लाभ घेऊन वंचित, शोषित समाजाच्या एका वर्गाने कायमस्वरूपी लाभार्थी असण्याचा फायदा घेतला. त्यांच्याकडे सवर्ण वर्गाशी स्पर्धा करण्यासाठी बरोबरीने समान संधी मिळाल्या तरीही त्या वर्गाने आरक्षणाचा लाभ सोडला नाही. हीच खरी मेख आहे तळागाळातील लोकांपर्यंत आरक्षणाच्या संधी न मिळाल्याच्या. 


आरक्षण मिळाल्याने समाजाचा विकास होतो ही एक सामाजिक अंधश्रद्धा आहे. आरक्षण हे साधन आहे संधी न मिळालेल्या वंचितांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी. पण राजकीयदृष्ट्या वापर करून लोकांनी आरक्षण हेच साध्य बनवलं आहे. कागदोपत्री आकडेवारी दिली की काहीतरी पुराव्यानिशी आपण युक्तिवाद करतोय असं वाटतं. प्रत्यक्षात मात्र आकडेवारी देऊन जेव्हा तुलना केली जाते तेव्हा लोकसंख्येच्या प्रमाण ही बाब फार महत्त्वाची. दुसरं तुलनेत कोणकोणत्या घटकांना प्राधान्य दिले आहे याचं. त्यामुळे आकडेवारी देऊन सांगितले की कोर्टात आपली बाजू भक्कमपणे उभी होईल आणि वेळ पडली तर संविधानाच्या चौकटीत राहून तरतूद करण्यासाठी दुरूस्ती विधेयक वगैरे आणण्यासाठी परत आंदोलनं, चर्चा, चिखलफेक हे निर्विवादपणे चालत राहणार आहे. समजा माणसाला आजार झाला असेल आणि त्यावर एखाद्या औषधाची मात्रा लागू होत नसेल तर औषध बदलायला हवं. किंवा आजार होऊ नये म्हणून जीवनशैली बदलणं गरजेची आहे. औषध तेच ठेवायचं आणि डॉक्टर बदलायचे. हेच तर कैक वर्षे चालू आहे. मुळातच संधी उपलब्ध करून देणे आणि संधी मिळवण्यासाठी आवश्यक असलेली अर्हता, कौशल्ये विकसित करण्यासाठी सेवा, सोयीसुविधा उपलब्ध करून देणे हे गरजेचे आहे. घटनात्मक आरक्षण हे मागासलेल्या लोकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी उत्कृष्ट 'मॉडेल' आहे. पण इम्प्लिमेंटेशन गंडवले गेले आहे. त्याला जबाबदार सामाजिक आणि राजकीय व्यवस्था.


गेल्या सात दशकांपासून आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या किती पिढ्या भारतात घडल्या? ज्यांनी आरक्षण घेऊन मुख्य प्रवाहात येऊन सक्षम होऊन आरक्षणाचे लाभ नको म्हणून किती घटकांनी सरकार दरबारी नोंद केली आहे? क्रिमी लेअर नॉन क्रिमी लेअर वगैरे नोंदणी फक्त जात प्रमाणपत्राची गरज आहे. प्रत्यक्षात आरक्षणाचे हत्यार म्हणून वापर सर्रासपणे सुरू आहे. आता तर संख्यात्मक बळ वाढतेय समजल्यावर हिंसक उग्र आंदोलने आणि व्यवस्थेला धाब्यावर बसवून वाट्टेल त्या मागण्यांसाठी लोकांना भडकावणं सुरू आहे. आरक्षण हे गरीबी दूर करण्यासाठी आणलेलं नाही. वंचित, शोषित आणि पिढ्यानपिढ्या मागासलेला वर्ग आणि मुख्य प्रवाहातील वर्ग यांच्यातील दरी कमी करण्यासाठी आणलेला उत्तम पर्याय म्हणजे घटनात्मक आरक्षण. ठराविक कालावधीनंतर ह्या पर्यायाने खरंच तळागाळापर्यंत लोकांना लाभ मिळत आहे का? ह्याच सिंहावलोकन करणं गरजेचं. म्हणजे व्यवस्था अजून सुदृढ कशी करता येईल याची चाचपणी करता येईल. मात्र हे करण्यासाठी धजावणार कोण? आरक्षणाचा प्रश्न राजकीय झाला आहे. राजकीय समस्या सुटत नसतात त्याचा वापर सत्ताकारणात कुटील डाव खेळण्यासाठी होतो. 


मराठा आरक्षणावर खूप बोलून झाले, लिहून झाले, चर्चा वादविवाद होत राहतील. याचं समाजाभिमुख निरसन व्हावं असं कोणत्याही राजकीय सामाजिक क्षेत्रातील धुरिणांना वाटत नाही. ज्यांना पोटतिडकीने काही तरी करायचे आहे अशांना सार्वजनिक जीवनात व्यापकपणे पाठींबा मिळत नाही. कारण राजकीय धोरणलकवे. मराठा समाजातील लोकांचे प्रबोधन करणे गरजेचे आहे. ते करण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती हवी. आपल्याकडे सत्ता मिळवण्यासाठी मराठा समाजाला वापरून दुर्लक्षित केले आहे. मराठा समाजाला संख्यात्मक पाठबळ जास्त आहे म्हणून त्यांचा राजकीय उपद्रव कोणत्याही राजकीय पक्षांना महागात पडतो. खरी गरज महाराष्ट्र स्थापन झाल्यापासून मराठा नेतृत्व राजकीय, आर्थिक क्षेत्रात आघाडीवर होते. मग सामाजिक शैक्षणिक दृष्ट्या मराठा समाजाला आरक्षण हवे असं का वाटू लागले? मराठा टक्केवारी जास्त असल्याने त्याच प्रमाणात राजकीय प्रतिनिधित्व पण जास्त असणार सहाजिकच आहे. मग एवढं सगळं सोशोइकोपॉलिटिकल प्रिव्हिलेजेस मिळून देखील मराठा समाजाला आरक्षणाची गरज भासते म्हणजे. खरी मेख व्यवस्थेतील त्रुटींची आहे. त्यानंतर सत्ताधारी लोकांची अनास्था. त्यामुळे सत्तेवर कोणीही असले तरी मराठा आरक्षणाचा प्रश्न तसाच लोंबकळत राहील. 


ज्या आंदोलनाचे उपद्रवमूल्य जास्त ती आंदोलन आपल्याला कशी फायदेशीर ठरतील हे बघणं विरोधकांचे पहिलं काम आहे. कारण सत्तेवर यायचं असेल तर सरकार विरोधात वातावरण निर्माण झाले पाहिजे तरच आपल्याला सत्तेवर येण्याची संधी उपलब्ध होईल हे राजकीय शहाणपण विरोधकांना असते. सत्ताधारी वेळकाढूपणा करत आपल्या पथ्यावर कसं पडेल याची काळजी घेत असतात. त्यामुळे आरक्षणाचा प्रश्न सोडविण्यासाठी ना सत्ताधारी लोकांना इंटरेस्ट असतो ना विरोधकांना. आंदोलनं हायजॅक होणं काही नवीन नाही. गेल्या दोन दशकांत अशी कितीतरी आंदोलनं फसलेली आहेत किंवा भरकटवली गेली आहेत. मराठा समाज कधीकाळी क्षत्रिय, लढवय्या म्हणून नावाजलेला होता तोच आज आरक्षणासाठी मागासलेला हे सिद्ध करण्यासाठी धडपडतोय. यावरून लक्षात घेतलं पाहिजे की, हीच पद्धत जर अंगवळणी पडली तर संख्यात्मक बळाच्या जोरावर व्यवस्थेला वेठीस धरेल. वेळ पडली तर संविधानाच्या दुरुस्तीसाठी दबावतंत्राचा वापर होईल. यावर उपाय म्हणून मूळ प्रश्न ज्यामुळे उद्भवले ते सोडवले पाहिजेत. खेडोपाड्यात मराठा समाजाला शेतीसाठी अतिरिक्त सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. आत्महत्याग्रस्त शेतकरी हा बहुतांश मराठा समाजातील आहे. खेडोपाड्यात शेतकऱ्यांची पिळवणूक कोणामुळे कशासाठी होते हे वेगळे सांगायला नको. शिक्षणासाठी मराठा तरुणांना तेवढ्याच संधी उपलब्ध आहेत जेवढ्या इतर समाजातील लोकांना असतात. फक्त आरक्षण मिळाल्याने सरकारी नोकरीत मराठा टक्का वाढेल. शिक्षणासाठी फीया कमी भराव्या लागतील हा बाळबोध समज आधी दूर केला पाहिजे. सरकारमध्ये नोकरीच्या संधी लोकसंख्येच्या प्रमाणात खूपच कमी होणार आहेत उत्तरोत्तर. मराठा समाजाला आरक्षण सामाजिक आणि शैक्षणिक हवे आहे. राजकीय हवंय पण स्थानिक स्वराज्य संस्था वगैरे निवडणुकीत पदे मिळवण्यासाठी. त्यात ओबीसींच्या आरक्षणातच मराठा समाजाला सामावून घेण्यासाठी धडपड चालू आहे. अशी त्रेधातिरपीट होणारी गुंतागुंतीची अवस्था झाली आहे. स्वतःला कधीकाळी सरंजाम, जहागिरदार, वतनदार, सावकार, जमीनदार, गावची पाटीलकी संभाळून, गावगाडा चालवणारा समाज आज आरक्षणासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करतो हे सामाजिक ऱ्हासाचे द्योतक आहे. भविष्यात आरक्षण मिळाले आणि समाजाचा अपेक्षित विकास झाला नाही तर एससी, एसटी, व्हीजेएनटी वगैरे मध्ये सामील करा म्हणून मागणी करणार का? कारण ओपन मधून ओबीसींच्या कोट्यात जाण्यासाठी आज आंदोलन होतंय. याचा अर्थ आंदोलनं भरकटलेली आहे. आरक्षण मिळाल्याने जर खरंच समाजाचा चौफेर विकास होत असता तर गेली सात दशके किमान एक तरी मागास समाज आरक्षण नको मुख्य प्रवाहात स्थिरस्थावर झालो आहोत म्हणून पुढे आला असता. तसे झाले नाही आणि दोन चार पिढ्या मुख्य प्रवाहात येऊन सधन झाल्यानंतरही आरक्षण सोडणार नाहीत. अशा बरबटलेल्या वातावरणात कोणीही विवेकी पद्धतीने प्रबोधन करणार नाही. याचं कारण आरक्षण हे हत्यार झाले आहे. व्यवस्थेला जेरीस आणून हवं ते साध्य करता येते ह्याचा पायंडा पडत आहे. 


शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांचा उल्लेख करणाऱ्या, पुरोगामी म्हणवून घेणाऱ्या लोकांना सत्य परिस्थिती काय आहे आणि घटनात्मक मर्यादा कशा आहेत हे समजले आहे. यात भरडला जातोय तो सर्वसामान्य गरीब कुटुंबातील मराठा तरुण. यावर एक उपाय म्हणजे सामुहिक पद्धतीने संविधानाचे पारायण व्हावे आणि संविधानाच्या चौकटीत राहून देश कसा चालतो ह्याचे प्रबोधन करणे गरजेचे आहे. पण हे प्रबोधन करणे सोपे आहे का? संविधानाविषयी सर्वसामान्य माणसाला माहिती असते. वाचन, अभ्यास मात्र नसतो. त्यामुळे अशा जनतेला घोळात घेणं सोपं असतं. उदाहरणार्थ अमुक तमुक मुळं आपण दुर्लक्षित राहिलो किंवा फलाना टिमका लोकांमुळेच आपलं नुकसान झालं. अशा अन्यायकारक गोष्टी ठासून सांगितल्या की बहुसंख्य भोळा समाज विश्वास ठेवतो कसलीही शहानिशा न करता. तसंही सामाजिक आणि राजकीय प्रश्नांमध्ये पुसटशी रेषा असते. ती समजणं खूप जिकिरीचे आहे. त्यासाठी जागरूक नागरिक म्हणून सर्वात मोठा आधार म्हणजे संविधानाचा मसुदा. संविधान वगैरे गोष्टींचा वापर व्यवस्था बळकट करण्यासाठी प्रामुख्यानं केला पाहिजे. पण व्यवस्थेतील लोक स्वतःला बळकट करण्यासाठी अशा आंदोलनाचा वापर करतात. मग अशी मंडळी सत्तेत असो वा नसो. व्यवस्था कशी राबवावी, झुकवावी किंवा विस्कळीत करावी याचं परिपूर्ण टूलकिट वापरण्यात वाकबगार असतात. यात फरफटतो तो गरीब समाज. बहुतांश बहुजन. सुस्थापित सवर्ण वर्गाचा रस्त्यावरील आंदोलन वगैरे यांचा तसा संबंध येत नाही. मात्र मेख अशी आहे की ह्यावर प्रबोधन करणे सोपे नाही. गमतीने म्हटले जाते की समाज हा किर्तनाने सुधारत नाही की तमाशाने बिघडत पण नाही. जो तो सभ्यतेचा आव आणून सांस्कृतिक किर्तन करतो किंवा सामाजिक जाणीवांची भोंगळ स्वप्न दाखवून राजकीय तमाशा करतो.


मागासलेल्या वर्गातील लाभार्थी जेव्हा सोयीसुविधांचा पुरेपूर वापर करून किमान दोन तीन पिढ्या आरक्षणाचा लाभ घेऊन जेव्हा तुल्यबळ होतात तेव्हा त्याच वर्गातील कायमस्वरूपी वंचित राहिलेले बाहेर फेकले जातात. उदाहरणार्थ एखाद्या जातीतीत मागासलेल्या कुटुंबातील पणजोबा, आजोबा, वडील जर सरकारी भरगच्च पगारदार नोकरीत असतील तर त्यांची पुढच्या पिढीला आरक्षणाचा लाभ देण्यासाठी धडपड चालू असते. खरंतर अशा मंडळींमुळेच त्याच जातीतील संधी उपलब्ध न झालेली पिढी उपेक्षित राहते. तुलना केली असता समजेल की मागासवर्गीय क्लास वन अधिकाऱ्याचा मुलगा किंवा मुलगी आणि त्याच मागासवर्गातील शेतमजूर, मोलमजुरी करणाऱ्याचा मुलगा किंवा मुलगी यात सर्वाधिक संधी कोणाला मिळणार? वंचित कोण राहणार? इथं समान संधी आणि सामाजिक न्याय वगैरे जिकरीनं लागू करणं गरजेचं आहे. त्यासाठी क्रिमी लेअर वगैरे तयार करण्यासाठी कायदेशीर रित्या कोर्टात ठरवलं जाईल. मात्र ते लागू करणं, अंगिकार करणं आणि स्विकारले जाणं या गोष्टी स्वयंप्रेरणेने येणं आवश्यक आहे. त्यासाठी कोर्टात, संसदेत मंजूरी होईल न होईल पण सार्वजनिक जीवनात ते स्विकारण्याची शक्यता कमीच. कारण आरक्षणाचा वापर हत्यार म्हणून झाला आहे. त्यासाठी सरकार दरबारी, राजकीय व्यवस्थेत लॉबिंग मजबूत केले जाते.  महाराष्ट्र राज्य स्थापन झाल्यानंतर अशीच व्यवस्था मजबूतीने उभी राहिली. त्यामुळे आधीच साधनसंपन्न असलेल्या मराठा समाजाला लौकिकार्थाने सामाजिक, राजकीय आणि आर्थिक स्थैर्य प्राप्त झाले. कालांतराने भाऊबंदकी जशी वाढली तसतशी संपत्ती विभागली गेली. सरासरी ३५% मराठा समाज महाराष्ट्रात जरी असला तरी ३०% च्या आसपास गरीब मराठा दशकांपासून वाढत गेला. त्यात याच दशकांत मागासवर्गीय आणि मराठेतर समाज बऱ्यापैकी आरक्षणाच्या लाभांमुळे सरकारी नोकरीत, राजकीय पटलावर स्थिरस्थावर झाला. अशा वेळी जेव्हा गावागावांत प्रबळ मराठा कुलीन घराण्याचे प्राबल्य कमी झाले आणि विखूरलेल्या मराठा कुटुंबातील आर्थिक आणि सामाजिक गोष्टींनी डोकं वर काढायला सुरुवात केली. अशा वेळी राजकीय धुरिणांनी आरक्षणाचा मुद्दा पेटवून आणि वरकरणी पटवून आपापले उपद्रवमूल्य किती आहे हे दाखवायला सुरुवात केली. महाराष्ट्रात रुढार्थाने भाजपा हा भटा-बामणांचा पक्ष म्हणून बाहेर पडून ओबीसीचा डीएनए असलेला पक्ष म्हणून उदयास आला तसतशी मराठांच्या शैक्षणिक, आर्थिक आणि सामाजिक प्रश्नांवर चर्चा केली जाऊ लागली. राजकीयदृष्ट्या अजूनही मराठा समाज प्रभावी आहे. कधीकाळी तो सत्ताधारी पुरोगामी विचारांचा पाईक होता आता हिंदुत्ववादी विचारांचा कित्ता गिरवतोय. अशा परिस्थितीत बहुसंख्य मराठांच्या रोषाला ट्रिगर मिळाला तो कोपर्डी येथील अन्याय्यकारक घटनेचा. तिथून मग मूक मोर्चे निदर्शने झाली आणि मुख्य प्रवाहात मराठा आरक्षणावर झाडाझडती सुरू झाली. आता तर आम्हाला ओबीसीत घ्या नाहीतर बघा वगैरे वगैरे धमकीची भाषा बोलली जाऊ लागली. अर्थात झुंडशाही जशी वाढते तसा विचार, विवेक शून्य होतो आणि हिंसेला खतपाणी घालून आपापली इप्सितं साध्य केली जातात.


आम्ही परिस्थितीने वंचित, दुर्लक्षित झालो म्हणून आम्हाला आरक्षण पाहिजे, ओबीसींच्या गटाचं पाहीजे, जमत नसेल तर संविधान बदला वगैरे मागण्या केल्या जातात. हे हास्यास्पद आहे. समजा भविष्यात ओबीसी मध्ये गेले आणि तरीही संधी मिळाली नाही तर काय एसटी एससी व्हीजेएनटी मध्ये घ्या म्हणून आंदोलन करणार का? दोन हाणा पण मागास म्हणा असं होत नसतं. संविधान अभ्यासलं पाहिजे. वाचून समजून आपण का त्यांच्या कक्षेत येऊ शकत नाही हे प्रबोधन करणे गरजेचे आहे. मुख्य प्रवाहात येण्यासाठी मराठेतर समाजाला खूप कालावधी लागला. मात्र या कालावधीत गरीब मराठा समाजाला हाती काहीच लागले नाही. सत्तापिपासू मराठा लॉबी ही फक्त आणि फक्त आपला कुटुंबकबिला, बगलबच्चे आणि कार्यकर्ते लोकांना संधी कशी मिळेल यातच व्यस्त राहिले. त्यामुळे प्रस्थापित मराठा अजून श्रीमंत झाला. तर सर्वसामान्य गरीब मराठा हा कालांतराने विस्थापित होऊ लागला. मराठा समाजाला ओबीसी मध्ये आणता येणार नाही. कारण संविधानाच्या चौकटीत ते होऊच शकत नाही. जेव्हा शक्य होते तेव्हा जाणूनबुजून दुर्लक्ष केले गेले. कारण तेव्हा मराठा समाज जर ओबीसी मध्ये आणला असता तर मराठा लॉबी ला राजकारणात मोठा पल्ला गाठाता आला नसता. सत्ता नसते तेव्हा बहुजन म्हणून मिरवायचे आणि सत्ता आल्यानंतर फक्त आणि फक्त मराठ्यांच्याच घराण्यात सत्ता टिकेल कशी हेच बघायचं. हेच काम आहे राजकारणातील सक्रिय मराठा लॉबीचे. आज कुणबी म्हणजे शेतकरी आहोत म्हणून ओबीसी आरक्षणासाठी पात्र आहे हे नियमाला धरून नाही. त्रिवार नाही. आज कुणबी मराठा म्हणून ओबीसी आरक्षण मिळवणारा समाज बऱ्यापैकी आस्तित्वात आहे. हाच समाज आज कागदोपत्री ओबीसी पण समाजात उजळमाथ्याने मराठा म्हणवून मिरवतो. ह्यांची संख्या लक्षणीय आहे. अर्थात ही कुणबी मराठा नोंद ब्रिटिशकालीन कागदोपत्रीच असल्याने राजकीय स्वार्थ साधण्यासाठी निवडणुकांमध्ये फायदेशीर झाली. मात्र ह्या नोंदी अपुऱ्या असल्याने मराठवाडा वंचित होता. मराठवाड्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये बऱ्यापैकी प्राबल्य वाढलं ते ओबीसी समाजाचे. त्यात जून २०२५ च्या अखेरीस सरपंच पदाच्या आरक्षणासंदर्भात एक जीआर काढला होता. तिथूनच मराठा आरक्षणासाठी पुन्हा मोर्चेबांधणी सुरू केली असावी. कारण आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना १०% आरक्षण राज्य सरकारने दिले आहे. त्याचा सर्वाधिक फायदा गरीब मराठा कुटुंबातील लोकांना झाला. हे असूनही आम्हाला गावपातळीवर प्रभाव पाडण्यासाठी काहीतरी कायदेशीर हक्काचे टूल हवे यासाठी तर हा आरक्षणाचा खेळखंडोबा केला नसावा? अर्थात हे प्रश्न आहेत उत्तरं ज्याने त्याने शोधावीत.


आरक्षणाचा आणि त्यासंदर्भातील तरतुदींचा पुनर्विचार करण्याची योग्य वेळ आलेली आहे. कारण मराठा आरक्षणावर आजवर जी आंदोलनं झाली ती एका तालुक्यातील एका खेडेगावात मर्यादित होती. नंतर हे आंदोलन जिल्ह्यात व्यापले गेले. आता ते डायरेक्ट राज्याच्या राजधानीत येऊन धडकले आहे. हे जर असेच चालू राहिले तर महाराष्ट्रात शेकडो जातीपातीच्या लोकांना स्फूरण चढेल. जो तो आम्हाला अमुक गटातून तमुक गटात घ्या नाहीतर तर बघा! अशी धमकीवजा आंदोलन होतील. आरक्षणाचा प्रश्न सामाजिक आहे. राजकीय नाही. आपल्याकडं एक बोगस व्यवस्था रुजली आहे जी राजकीय प्रश्न सामाजिक पद्धतीने सोडवण्यासाठी धडपडते, सामाजिक प्रश्न राजकीय पद्धतीने सोडवण्यासाठी धडपडते तर आपण आर्थिक प्रश्न भांडवलदारांच्या भरवशावर टाकून त्यावर काथ्याकूट करत बसतो. जर कोणत्याही असंविधानिक आरक्षणाच्या मागणीवर वेळीच योग्य ते उपाय केले नाहीत तर लिटमस टेस्ट म्हणून झुंडीच्या जोरावर हवं ते करवून घेऊ अशी नवीन कुचकामी संस्कृती जन्माला येईल. तीच लोकशाहीला घातक असेल. देशाचं सार्वभौमत्व फक्त कागदोपत्रीच राहील. जातीधारित आरक्षणाच्या कक्षेत अजून किती जाती वाढवणार? या देशात हजारोंच्या संख्येने जाती अस्तित्वात आहेत. त्यातील कित्येक प्रमुख जातसमुह एससी, एसटी, व्हीजेएनटी, ओबीसी मध्ये विभागले गेले आहेत. बरं एखादी जात आरक्षणाचा लाभ घेऊन मुख्य प्रवाहात आली म्हणून आरक्षण नको म्हणून बाहेर पडली आहे का? मुख्य प्रवाहात म्हणजे प्रतिनिधित्व कोणत्या कोणत्या क्षेत्रात वाढलं? किती प्रमाणात आहे? जातीची लोकसंख्या तुलनेसाठी घ्यावी की इतर जातसमुह संख्या? तुलनात्मक दृष्टीने कशाचा आधार घ्यावा? अशी कोणती फूटपट्टी आहे का मोजमाप करण्यासाठी? जर लोकसंख्या वाढतेय म्हटल्यावर आरक्षणाचे तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी अडचणी येणार त्या लाभार्थी लॉबीचीच. जसं सवर्ण लोकांनी सगळं कसं आपल्यालाच मिळालं पाहिजे अशी मांड भक्कम करून ठेवली होती तशीच मागासवर्गीय कायमस्वरूपी लाभार्थी लॉबीचीच मक्तेदारी गटातटापुरती भक्कम झाली आहे. नुकत्याच युपीएससीच्या संदर्भात पूजा खेडेकर केस संदर्भात ह्याची प्रचिती आली आहे. हा मागासवर्गीय लाभार्थी 'मवर्ण' जर सगळे लाभ गिळंकृत करत असेल तर तळागाळापर्यंत लाभ पोचत नाहीत याला जबाबदार कोणाला धरणार? नुकत्याच सुप्रीम कोर्टाने यावर मागासवर्गीय क्रिमी लेअर वगैरे बाबत सरकारला आदेश दिले आहेत एका केस संदर्भात. यावर कार्यवाही होईल न होईल ते राजकीय फायदा तोटा बघून होईल. थोडक्यात मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आरक्षणाच्या संधी पोचल्या आहेत तर सामाजिक, राजकीय, आर्थिक संधींची कशा पद्धतीने पडताळणी केलीय याची शासनदरबारी कोणतीही प्रक्रिया नाही. केवळ राजकीयदृष्ट्या अजूनही वापर केला जातोय आरक्षणाच्या मुद्द्यांचा. यामुळे एकेक नेतृत्व जातीपातीच्या लोकांना उद्युक्त करतं. नंतर झुंडीच्या जोरावर हवं ते मिळालं नाही तर व्यवस्थेला बेजार करते. म्हणजे जातीपातीच्या राजकारणात सर्वपक्षीय नेते आपापल्या परीने जातीचं लॉबिंग मजबूत करण्यासाठी प्रामुख्यानं धडपडत असतात. हीच व्यवस्था कुचकामी आहे. कारण जातीपाती घट्ट पकडून स्थानिक राजकारणात प्रभाव पाडता येतो. मग हीच प्रयोगशाळा धर्माच्या राजकारणासाठी पाया मजबूत करते. महाराष्ट्रातील पुरोगामी विचारांचे झेंडे मिरवणारे राजकीय नेते चाणाक्षपणे धर्माची पताका बेमालूमपणे फडकवू लागले. ही अधोगती झाली ही बाब लक्षात येत नसेल का? अर्थातच मनातून हतबलता असल्याने असे तडजोडीचे केविलवाणे निर्णय घेतले जातात. जनता भरडली जाते कारण जनतेला जातीपातीच्या विषाची मात्रा पचलेली असते. ह्या भेसूर भवतालामुळे संविधान, राज्यघटना वगैरे वर विश्वास वाढेल का कमी होईल? ह्या प्रश्नाचे गांभीर्य ओळखून योग्य ती प्रक्रिया, नियम, दुरुस्ती न्यायालयाच्या आदेशानुसार संविधानाच्या चौकटीत संसदेने आमलात आणली पाहिजे. 


आरक्षणाचा प्रश्न सामाजिक आहे. मग लोकसहभागातून, त्या त्या जातीपातीच्या गटातटाचे नेतृत्व आणि मुख्य मागासवर्गीय आयोग यांनी पुढाकार घेऊन जनतेला विश्वासात घेतले पाहिजे. आरक्षण हे हत्यार नाही, साध्य नाही फक्त साधन आहे कशासाठी तर समान संधी आणि सामाजिक न्याय मिळण्यासाठी. हे प्रबोधन करणं गरजेचं आहे. मेडिया प्रिंट असो वा इलेक्ट्रॉनिक वा सोशल मीडिया वरील फ्रीलान्सर, इंडिपेंडंट पत्रकार ह्या सर्वांनी किमान सामाईक कार्यक्रम आखून विश्वसनीय एकी दाखवणं गरजेचं आहे. जसं युध्दाच्या वेळी सगळे प्रश्न, समस्या बाजूला ठेवून आपण सर्वजण देशासाठी एकत्र येतो तशीच भावना संविधानाच्या कक्षेत आरक्षणाच्या बाबतीत दिसायला हवी. अशा वखवखलेल्या समस्या आजूबाजूला पेटलेल्या असताना सामाजिक बांधिलकी टिकावी हीच अपेक्षा.


© भूषण वर्धेकर 

पुणे 

४ सप्टेंबर २०२५


शुक्रवार, २० जून, २०२५

तू बोल मराठी

तू बोल मराठी, आवेशपूर्ण अस्मितेसाठी 
तू फोड डरकाळी, एकवटून शक्ती सगळी
तू कर राडा, एकीचा शिकवू चांगलाच धडा
तू हाण कानफटात, उमटू दे बोटं घराघरात 

तू उठव वादळ, होऊ दे त्यांची धावपळ
तू कर तोडफोड, जिरवू त्यांची चांगलीच खोड
तू कर आंदोलन, उधळून त्यांचं मनोमिलन 
तू टाक काड्या, उघडून त्यांच्या लबाड्या 

तू लिही पत्र, व्हायरल आम्ही करू सर्वत्र 
तू कर भाषणबाजी, आम्ही करू दमबाजी
तू मार पाचर, भांबावून सोडू स्थिर चराचर 
तू ठोक खिळा, मिरवू आम्ही रक्तरंजित टिळा

तू कर खलबतं, आम्ही खातो फटके हितं
तू उडव धुराळा, करू सुव्यवस्थेचा चोळामोळा
तू कर टोलबंदी, नाक्यावर करू तोडफोड नांदी
तू कर खेळखट्याक, तोडू पाट्या देतो सट्याक

तू पेटव मशाल, तापवून करू हाल बेहाल 
तू लाव जाळ, करू ठिकऱ्या उडवून राळ
तू मिरव टेंभा, पदाधिकाऱ्यांना पुरवून खंबा
तू मार पलटी, कार्यकर्त्यांना पाजून चपटी

© भूषण वर्धेकर 
पुणे 

(कधीकाळी राज ठाकरे, मनसेचा डाय हार्ट फॅन होतो. नंतर समज वाढली. मराठी भाषेचा बोलण्यासाठीचा लढा नंतर फक्त बडवण्यासाठी वापरला गेला आणि सगळं राजकीयदृष्ट्या वापरले गेले. काही वर्षांपूर्वी लिहिले होते. आजही लागू पडते. सदैव हीच परिस्थिती राहणार. हे बदलण्याची शक्यता कमीच. कारण दक्षिणेला आणि उत्तरेला जोडणारा मोठा भौगोलिकदृष्ट्या महाराष्ट्र उभा आडवा पसरलेला आहे. त्यातही सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि भाषिक आक्रमणं रिचवलेला महाराष्ट्र आहे.)


 


गुरुवार, २२ मे, २०२५

नारळीकर, मराठी विज्ञान साहित्य

नारळीकर गेल्याची बातमी समजली आणि एकदमच आपल्या जवळचं कोणीतरी गेले अशी भावना झाली. प्रत्यक्षात त्यांना मी कधीच भेटलो नाही. त्यांचं कोणतेही व्याख्यान मी ऐकले नाही. केवळ त्यांनी लिहिलेल्या पुस्तकातून, त्यांच्या मुलाखतीतून आणि त्यांनी आजवरच्या केलेल्या कामातून ते भेटत राहीले.  सर्वसाधारणपणे शालेय जीवनात उन्हाळा आणि दिवाळीच्या सुट्टीत पुस्तके वाचली पाहिजेत असा अघोषित नियम असतो. काही पाळतात काही पाळत नाहीत. नारळीकर भेटले पहिल्यांदा यक्षाची देणगी, वामन परतोनि न आला, प्रेषित आणि अंतराळीतील भस्मासूर वगैरे पुस्तकातून. नंतर आकाशाशी जडले नाते या पुस्तकामुळे तर विज्ञानाची गोडी अनेक पटीने वाढली. (ही पुस्तके माहित असण्याचे मुख्य कारण म्हणजे दौंडचे एस. एन. कुलकर्णी सरांची शिकवणी. त्यांच्यामुळेच पुणे विद्यापीठात आयुकात जाणं झालं.) या घटना एकदम आठवल्या कारण त्यानंतरच्या काळात आपण पण विज्ञानाच्या क्षेत्रात काहीतरी करावे हीच स्वप्न उराशी बाळगून अकरावीला विज्ञान शाखेत प्रवेश घेतला होता. पुढं सप महाविद्यालयात बीएस्सी आणि फर्ग्युसन महाविद्यालयात एमएस्सी करणं. फर्ग्युसन मध्ये जुन्नरचे जयंत विष्णू कुलकर्णी (जेव्हीके सर) यांच्या लेक्चर्स मुळं विषयाची व्याप्ती खोली समजणं आणि आवड वाढणं. (अर्थातच भरपूर शिक्षकांच्या नावांचा उल्लेख करणं शक्य नाही)  मात्र ठराविक शिक्षकांची मराठीतून शिकवण्याची एक हतौटी होती तीची आज प्रकर्षाने जाणीव होते. ह्या सगळ्या आठवणी एकाएकी दाटून आल्या कारण विज्ञानाकडे कसं बघायचं आणि त्याचं दैनंदिन जीवनात महत्व काय ह्याचे धडे मिळाले. अर्थात शाळेत विज्ञान विषय शिकवला जायचा पण तो पाठ्यपुस्तकी परिक्षेसाठी. एस. एन. कुलकर्णी यांच्या क्लासेस मध्ये विज्ञान आणि गणित हे विषय कसे, का व कशासाठी शिकावे हे समजलं. छोट्या छोट्या प्रयोगातून वैज्ञानिक संकल्पना शिकल्याने विज्ञान विषयात रुची वाढते गेली. त्याआधी विज्ञान हा रट्टा मारून, व्याख्या, सूत्रे, तोंडपाठ करून परिक्षेसाठी शिकणं हेच होत होतं. नारळीकर यांनी लिहिलेल्या साहित्यातून, मराठी विज्ञान परिषदेच्या मासिकातून (शीव चुनाभट्टी मुंबई हा पत्ता वाचताना जे फिलिंग असायचं ते अजूनही आहे), बाळ फोंडके, डॉ प्रकाश तुपे, मोहन आपटे, शाम मराठे, निरंजन घाटे, वगैरे मंडळींनी लिहिलेल्या पुस्तकातून विज्ञानाविषयी वेगळंच ग्लॅमर वाढत होतं. कालांतराने मराठी भाषेत अच्युत गोडबोले, नंदा खरे आणि सुबोध जावडेकर वगैरे आले. नंतर कॉलेजमध्ये असताना असिमोव्ह, हाईनलीन, क्लार्क वगैरे मंडळींच्या कादंबऱ्या विषयी माहिती मिळाली काही वाचल्या त्या कादंबऱ्या बद्दल मराठीत वाचलं. काही परिक्षणं इंग्रजीत वाचली ब्रिटिश लायब्ररीत. मग एकूणच मराठी भाषेत विज्ञानकथा किंवा विज्ञान साहित्य याकडे बघायचा दृष्टिकोन बदलला. अर्थातच जे जे आधी मराठी भाषेत वाचलं होते ते वाईट अजिबात नव्हतं. कारण ती पात्रं ते विषय डोक्यात घोळत असतानाच वय वाढत होतं. समज वाढत होती.

नारळीकरांच्या विज्ञानकथांविषयी वेगळी समीक्षा होईल. बरोबरी करताना आयझॅक असिमोव्ह सोबत करू नये हीच प्रांजळ अपेक्षा. हे मनात ठेवून जर कथा वाचल्या की त्यांच्या लेखणीतली ताकत कळते. मी आधी नारळीकर, सुबोध जावडेकर यांच्या कथा वाचल्या नंतर असिमोव्ह च्या कथा वाचल्या. म्हणून मराठी विज्ञानकथा त्याज्य होत नाहीत. ज्यांनी आधी असिमोव्ह च्या कथा वाचल्या आहेत त्यांना नारळीकर यांनी लिहिलेल्या कथा बाळबोधच वाटणार. ह्याविषयी निरंतर चर्चा सुरू राहील. मात्र मराठी भाषेत विज्ञानकथा लिहिणं, विज्ञान तंत्रज्ञान विषयक मराठीत माहितीपर लेख लिहिणं, मराठी भाषेतून विज्ञान विषयक चिंतन मनन करणारे लेख लिहिणं, विज्ञानवादी (वैचारिक, तात्विक अंगाने) लेख लिहिणं, विज्ञान मराठी भाषेत समजावे म्हणून लेख लिहिणे आणि वैज्ञानिक संशोधन, प्रबंध मराठी भाषेत लिहिणं या खूप वेगवेगळ्या गोष्टी आहेत. हे स्तर एकमेकांत गुंतलेले वाटतील पण जाणकार असाल तर फरक लागलीच समजेल. मूळ मुद्दा येतो की मराठी भाषेतून विज्ञान साहित्याचा प्रचार, प्रसार करताना विवेकवादी भूमिका घेत नारळीकरांनी जे कार्य केले ते फार मोलाचे आहे. योगदान दिले वगैरे ह्या शब्दच्छलात नको पडायला. त्यासाठी त्यांनी बहुमोल वेळ दिला. संशोधन क्षेत्रात काम करत, प्रशासकीय कारभार सांभाळत सामाजिक जाणीव ठेवून विज्ञान सर्वसामान्यांपर्यंत पोहोचायला पाहिजे यासाठी धडपड केली. आयुकात उपक्रम राबविले. विज्ञान म्हणजे पडणाऱ्या प्रश्नांचं उत्तर शोधण्यासाठी असलेली शाखा. जिथे वैज्ञानिक प्रयोगातून सिद्ध झालेले पुरावे ग्राह्य धरतात. नारळीकरांनी वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचार करणं आणि रुढी, प्रथा, परंपरा, चालीरीती, श्रद्धा, अंधश्रद्धा याकडे डोळसपणे विचारपूर्वक पाहणं कसं असावं आणि कृतीतून काय करावं हे दाखवून दिले आहे. अर्थातच त्यांनी पन्नास साठ वर्षे या क्षेत्रात ठशीव कामगिरी केली आहे तशीच समाजातील सर्व घटकांना समजेल अशा साध्या सोप्या विषयावर प्रश्न विचारून वैज्ञानिक उत्तरं मिळवा ही चळवळीची संकल्पना रुजवली हे खूप महत्त्वाचे. महाराष्ट्रात खेडोपाड्यात किंवा तालुक्यातील पोराटोरांना नारळीकरांनी कैक प्रश्नांची उत्तरं पाठवली ती साध्या पोस्टकार्ड पासून ते आयुकाच्या वर्तुळाकार लोगो असलेल्या पाकिटातून. यामुळे जो कनेक्ट तयार झाला तसा कनेक्ट कोणत्याही शास्त्रज्ञांनी महाराष्ट्रात तरी आजपर्यंत केला नव्हता. २७ फेब्रुवारीला राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आयुकात सायन्स टूर म्हणून जे जे कार्यक्रम आयोजित केले होते त्यामुळे जे एक ग्लॅमर तयार झाले ते मी स्वतः अनुभवलं आहे. ज्यांनी ज्यांनी ते शालेय जीवनात अनुभवले आहे त्यांच्या त्या आठवणी चिरकाल टिकणाऱ्या असतील.

नारळीकरांनी फ्रेड हॉईल यांच्या सोबत विश्वरचनाशास्त्र या विषयावर संशोधन केले. गुरुत्वाकर्षण, गणित आणि खगोलशास्त्र यावर त्यांनी केलेले संशोधन जगभरात मान्य केले आहे. सर्वसामान्य मराठी माणसाला या विषयावर फार जास्त माहिती नसणार मात्र नारळीकर यांनी विज्ञान विषयक चळवळीत, विज्ञानकथा, साहित्यात जे योगदान दिले ते नक्कीच माहिती असेल. आपल्याकडे शास्त्रज्ञ लोकांचे कार्य ठराविक वर्गातील लोकांपर्यंत मर्यादित आहे. याचं कारण म्हणजे कमी असलेली सामाजिक प्रगल्भता. विज्ञान आणि गणित विषयासाठी चौकस आणि उत्साही वातावरण तयार नसतं ही एक महाराष्ट्रातील शैक्षणिक शोकांतिका आहे. एका नावाजलेल्या शास्त्रज्ञाच्या प्रयत्नाने लागलीच बदल होणार नाही मात्र ठिणगी पडली हे महत्त्वाचे. राष्ट्रीय पातळीवर डॉ कलाम ह्यांना जशी प्रसिद्धी मिळाली तशी कैक वैज्ञानिकांना मिळाली नाही. त्यासाठी वैचारिक तात्विक अंगाने विचार केला पाहिजे. खूप लोकांचा गैरसमज असतो वैज्ञानिक असेल तो विवेकवादी भूमिका घेणारा चे पाहिजे. जर तो श्रद्धाळू किंवा अध्यात्मिक असेल तो बुवाबाजी करणाराच असतो. अर्थातच हे वैचारिक वायफळ बगिचे डोक्यात फुललेले असतात. प्रत्यक्षात मात्र वैज्ञानिक संशोधन करून एखाद्या क्षेत्रात प्रगती झाली हे बघून मापदंड ठरले पाहिजेत. भारतीय समाजमनात देवभोळ्या प्रवृत्ती आहेत. श्रद्धाळू, आस्था जपणारा मोठा समाज आहे. तसाच अंधश्रद्धा बाळगून वागणारी भली मोठी पिढीजात चालत आलेले बहुसंख्य लोक आहेत. अशा गुंतागुंतीच्या सामाजिक वातावरणात वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचार करणं आणि विवेकवादी भूमिका घेणं हे फार जिकिरीचं आहे. एखाद्या वैज्ञानिकाला सेवासुविधा पुरवल्या की त्याने सगळीकडे वैज्ञानिक क्रांती घडवून आणली पाहिजे हा हट्ट (किंवा समज) सहाजिकच बाळबोध आहे. भारतात वैज्ञानिक दृष्टिकोनातून विवेकवादी भूमिका घेणं सरळमार्गी नाही. त्यांचं एकमेव कारण म्हणजे आपण पुराणं, वेद, उपनिषदे, पोथ्या, संस्कृती, सभ्यता आणि विज्ञान वगैरे ची सरमिसळ खूपच जाहीरपणे करतो. त्यामुळे एखाद्या वैज्ञानिकाला जे अपेक्षित असते अनुमान काढता येईल असे वातावरण किंवा घटना त्याला आवश्यक असा अवकाश मिळत नाही. आमच्या कडे आधीपासूनच हे अस्तित्वात होते वगैरे वर छातीठोकपणे मान्य असलेल्या समाजांना आपण विज्ञानवादी ठरवतो. मग लागलीच पुरावे आहेत का विचारलं की आस्था, युगानुयुगे चालत आलेल्या प्रथा, रुढी, परंपरा, चालीरीती वगैरे वगैरे वर चर्चा ढकलली जाते. याकडे मी वेगळ्याच दृष्टीने बघतो. उदाहरणार्थ अणू केंद्राबाहेर घिरट्या घालणारा इलेक्ट्रॉन स्थिर रेणू होण्यासाठी उर्जा उत्सर्जित करतो, दुसऱ्या अणूंची कक्षेत उड्या मारतो किंवा भागीदारी करतो हे प्रयोगशाळेत सिद्ध झालेलं आहे. प्रमाणित आहे. मात्र या घटनेकडे अनेक विज्ञान शाखा वेगवेगळ्या स्तरातून दृष्टीकोनातून बघतात आणि तशी त्यांची थिअरी मांडली जाते. तसाच विचार प्रवाह गरजेचा आहे. विज्ञान जर विचारधारा असेल तर गणित ते सिद्ध करण्यासाठी भाषा असेल आणि तंत्रज्ञान हे प्रात्यक्षिकातून तयार झालेलं प्रचलित प्रमाण. मराठीत समजायला अवघड जाणार आहे हे लिहिलेले. मात्र विचार केला की पुष्टी होईल. वैज्ञानिक दृष्टिकोनातून जर सगळं बघून सप्रमाण दाखवून द्यायचं असेल किंवा मान्य करायचं असेल तर गुंतागुंतीचे कंगोरे दुर्लक्षित करता येणार नाहीत. उदाहरणार्थ पुरातन काळापासून चालत आलेल्या कैक गोष्टी छद्मविज्ञान म्हणून हेटाळल्या गेल्या तर जेव्हा केव्हा त्या सुरू झाल्या त्या आजतागायत टिकून आहेत हे दुर्लक्षित करता येणार नाही. जर त्याकाळी असं सांगितलं गेलं असेल किंवा मान्य केले गेले असेल ते आजच्या काळात विज्ञानाच्या कसोटीवर पडताळून घेणं गरजेचं आहे. दुसरं महत्त्वाचं उदाहरण म्हणजे विज्ञान तंत्रज्ञान पाश्चात्य देशातून आलेले खरेखुरे तर एत्तदेशीय पुरातन काळातील विज्ञान तंत्रज्ञान म्हणजे टाकाऊ. जर असे मानायचे ठरवलं तर हजारो वर्षांपासून दिमाखात उभे असलेल्या वास्तू (बहुसंख्य मंदिरे) कशी बांधली असतील? एखाद्या सिव्हिलायझेशनमध्ये जर स्थापत्यकलेचा विकास झालेला असेल तर त्यासाठी मूलभूत विज्ञान आणि आजूबाजूला उपलब्ध असलेल्या नैसर्गिक घटकांचा वापर करून बांधलेल्या वास्तू छद्मविज्ञान होतं म्हणून बांधल्या का? असो यावर वेगळी चर्चा होईल.

विज्ञान हे निसर्गाचे निरिक्षण, सूक्ष्म निरीक्षण आणि मनाला पडलेल्या प्रश्नांच्या उत्तरातून जन्माला येते. तसा विचार करण्याची पद्धत विकसित झाली की वैज्ञानिक दृष्टिकोन तयार होतो. मग तशी उपजतच भूमिका परिपक्व होते. नंतर प्रात्यक्षिके करून जर विकसित प्रारूप किंवा उपयोजित गोष्ट वापरात आली की तंत्रज्ञान जन्माला येते. हा वैज्ञानिक शोध म्हणून गणला जातो. ही एक कालातीत चालणारी प्रक्रिया आहे. निरंतर पुणे. जागतिक स्तरावर कैक संशोधन, तंत्रज्ञान हे निसर्गाच्या निरिक्षणातून तयार झाले आहे. भारतात ह्यावर निसर्गाच्या सानिध्यात राहून सभ्यतेचा विकास झाला या धर्तीवर बघायला पाहिजे. मग सभ्यतेत जे जे उभं राहिलं ते मूळ तत्कालीन मान्यताप्राप्त विज्ञान आणि विकसित तंत्रज्ञान, शोध याचं जोरावर असेल. ही मांडणी लक्षात घेतली पाहिजे. आपल्याकडे शिक्षणव्यवस्था जशी आणली तशी कारकून छाप पिढी तयार झाली. त्यातून वाचलेल्या पिढीतून उत्तमोत्तम शास्त्रज्ञ तयार झाले. कैक शास्त्रज्ञांनी संशोधन क्षेत्रात भरीव कामगिरी केली आणि जगभरात भारताचे नाव उज्ज्वल केले. असे कितीतरी वैज्ञानिक आहेत. कितीतरी वेगवेगळ्या विज्ञानाच्या शाखांमध्ये भारतीयांचं काम वाखाणले गेले आहे. हजारो शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ आज भारतात सरकारी संस्थांमध्ये खाजगी कंपन्यांमध्ये काम करीत आहेत. सीएसआर, डीआरडीओ, आणि कैक संरक्षण संस्थांमध्ये भारतीय तंत्रज्ञ मोलाचं योगदान देत आहेत. मात्र हाताच्या बोटावर मोजता येतील असेच शास्त्रज्ञ समाजातील विज्ञान विषयक समज, गैरसमज, वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचार, विवेकवादी भूमिका घेत जनजागृतीसाठी कार्य करतात. त्यापैकी जयंत विष्णू नारळीकर हे होत. त्यांनी केलेल्या कामाचा आवाका मोठा आहे.

भावपूर्ण श्रद्धांजली.

बातमी समजली अन् जे जे मनात येईल तसं लिहिलं आहे.

© भूषण वर्धेकर
२१ मे २०२५
पुणे ४१२११५

शुक्रवार, १६ मे, २०२५

भैरु पैलवान की जय!


गावातील भैरु पैलवान पंचक्रोशीत लय फेमस व्हता. कुणाच्या अध्यातमध्यात नसतंय म्हणून. गपगुमान आपआपली कामं करायची, सकाळ संध्याकाळ कसरत करायची, तालमीत येणाऱ्या पोराटोरांची काळजी घ्यायची. त्यांची तयारी करून घ्यायची. पंचक्रोशीत तालमी पण भरपूर व्हत्या. भैरु पैलवानच्या तालमीत येणाऱ्या पोराटोरांची संख्या दिवसेंदिवस लय वाढत होती. हे काय इतर तालमीच्या पैलवानांना पचत नव्हतं. गावातील पक्या पैलवानाची तालीम आणि चिनाप्पा पैलवानाची तालीम तर नेहमीच भैरु पैलवानाच्या तालमी वर जळायचे. डूख धरुन ठिवायचे. पक्या पैलवानाची तालीम नुसती फुसका बारच. चिनाप्पाची तालीम लय हायटेक व्हती तशी. तालमीतलं पैलवान भी लय तयारीचे व्हते. पण कुस्ती खेळायचा अनुभव कमी पडत व्हता. चिनाप्पा पैलवानाच्या तालीममास्तर ला डायरेक भैरु पैलवानच्या तालमीतल्या पैलवानांशी लढायला जमत नव्हतं. त्याला ठाव व्हतं आपण कसं बी करून भैरूच्या पैलवानांना निपटून काढून पण आपलं लय म्हंजी लय नुकसान करतील भैरू गडी. दुसरं लय म्हंजी लय महत्वाचं कारण जर आपण भैरु पैलवानांवर डायरेक कुस्ती खेळलो तर पंचक्रोशीबाहेरील आमऱ्या पैलवानाची तालीम झापुक झुपुक करतच कुस्तीत शिरंल. आमऱ्या पैलवानाची तालीम लय म्हंजी लय म्हंजी मोक्कार फेमस. चिनाप्पा पैलवानाच्या तालीमीपेक्षा फेमस. हायटेक अन् पैलवान गडी लय पट्टीचे. पंचक्रोशीबाहेरील आमऱ्या पैलवानाची तालीम फकस्त चानस बघायची कधी चिनाप्पाचे गडी कुस्ती खेळतात कधी आपण त्यांना नडतू. पण चिनाप्पा अन् आमऱ्या पैलवानाची तालीम समोरासमोर येऊन कधीही कुस्त्या खेळत नव्हत्या. दोघांनाही माहिती व्हतं. आपण कुस्त्या खेळायला लागलो तर दोघांचं लय म्हंजी लय म्हंजी नुसकान व्हणार. जर का चिनाप्पा अन् आमऱ्या पैलवानांची जुंपली तर नुसता जाळ अन् धूर संगंटच व्हणार गावात अन् पंचक्रोशीत. याचा सर्वात जास्त फायदा व्हणार तो रीशाप्पा पैलवान तालमीला. आमऱ्या पैलवानांच्या तालमीनं कधीकाळी रीशाप्पाची तालीम फोडली व्हती. तवापासून रीशाप्पा पैलवान तालमीत नुसत्या कसरती करून घेऊन गडी तयार करत व्हता. तसंही रीशाप्पा अन् भैरु पैलवान तालमीचे लय म्हंजी लय म्हंजी लय जूने संबंध. जिगरी दोस्त. चिनाप्पा, आमऱ्या, पक्या पैलवानांच्या तालमीतल्या सगळ्या पैलवान गड्यांना ठाव व्हतं की रीशाप्पाचं पैलवान गडी कधीबी भैरु पैलवानाच्या तालमीला मदतीला धावून येतात. पुराना याराना है वह!

पक्या पैलवानांच्या तालमीतल्या गड्यांना कुरापती काढायला भैरु पैलवानाची तालीम आवडायची. उगाचंच येऊन दगडं मार, हळूच खोड्या कर, उकसवा-उकसवी कर. असली थेरं सारखी व्हायची. भैरु पैलवानच्या तालमीतले पैलवान गडी पण लय वैतागायचे. ते तर फक्त वाटच बघत व्हते कधी तालीममास्तर छूट देतो अन् आम्ही पक्या पैलवानांच्या गड्यांना धूळ चारतो ते. पण आजपतूर सगळे तालीममास्तर नुसत्या कसरती करून घे, गावातल्या तालमींना सांगून पक्या पैलवानांना समज दे, उगाचंच आपण आपलं बरं कसरती बऱ्या. कशाला कुस्त्या खेळायला जायच्या? हेच लक्षात व्हतं. नवीन तालीममास्तर नरिंदर जवापासून आला व्हता तवापासून भैरु पैलवानाच्या तालमीचा नादच खुळा झाला व्हता. नरिंदर ने पैलवान गडी लोकांना डायरेक धडक कुस्ती खेळायची म्हणून ऍटॅकिंग डाव शिकवले व्हते. पंचक्रोशीतील आमऱ्या, पक्या, चिनाप्पा, रीशाप्पा वगैरे वगैरे पैलवानांच्या तालमींना ठाव व्हतं. नरिंदर सुमडीत डाव टाकायला लय भारी हाय ते. 

सगळं कसं गपगुमान गावगाडा चालू व्हता. एकदमच पक्या पैलवानांच्या तालमीतल्या गड्यांनी लय मोठी खोड काढली. भैरुचं पैलवान गडी लय खवळलं. पंचक्रोशीत सगळ्यांना ठाव व्हतं आता काय खरं नाय पक्याच्या पैलवान तालमीचं. पक्याच्या मागं लपून छपून चिनाप्पाची फुस व्हती. सगळ्यांना ठाव व्हतं. चिनाप्पाचं पैलवान डायरेक कुस्त्या खेळत नसतात पण उगीच दुसऱ्यांच्या कुस्तीत रसद पुरवायची कामं करायची नवी सवय लागली होती. तशी ही रसद पुरवायचा पिढीजात धंदा तर आमऱ्या पैलवानांच्या तालमीतल्या गड्यांचा व्हता. कुठंबी कुस्ती असू दे गावात, पंचक्रोशीत, तालुक्यात, जिल्ह्यात. कुणी आवताण दिलं नाय तरी उगाचंच चमकोगिरी करायची सवय लय बेकार व्हती आमऱ्या पैलवानांची. तशीच गेम आजकाल चिनाप्पाचे पैलवान गडी करायला बघत व्हते. त्यात पक्या पैलवानांच्या तालमीतल्या गड्यांना वापरायचं भैरु पैलवानांना कुस्त्या खेळायला भाग पाडायचं हेच धंदे पुन्हा पुन्हा सुरू व्हते. यंदा मात्र नरिंदर ने जे काय आडवेतिडवे डाव टाकले. पक्या पैलवानांच्या तालमीतल्या गड्यांना सळो की पळो करून सोडलं व्हतं. दिसला की हाण. उठला की तुडीव. वरडला की बडीव. कुस्ती खेळायचा सराव एवढी वर्षे केला होता पैलवानांनी. सगळी तालीम पक्या पैलवानांना दाखवून धूळ चारून मुका मार देत व्हती. चिनाप्पा नुसता रसद पुरवण्याचं काम करत व्हता. चिनाप्पाचं गडी काय कुस्तीत डायरेक खेळणार नाय हे भैरुंच्या गड्यांना ठाव व्हतं. रीशाप्पाच्या गड्यांनी भैरु पैलवानांना सांगितलं व्हतं. भावांनो तुम्ही फकस्त भीडा. हाय मी हिकडं. कमी जास्त लागंल तसं सगळं देतू. तुमी फकस्त डाव टाका. तुमच्या कुस्तीत कुणी तिसरा भिडू आला तर घेतू बघून आम्ही. मग काय पक्या पैलवानाच्या तालमीतल्या गड्यांना काय सुजवलं व्हतं. नुसता जाळ अन् धूर संगंटच. पक्या पैलवानांच्या मदतीला ना चिनाप्पा येत नव्हता ना आमऱ्या. पक्या पैलवानाची तालीम म्हणजे खाज खाज खाजवणारी खरूज. गावात, पंचक्रोशीत, तालुक्यात आणि जिल्ह्यात सगळीकडे ठाव व्हतं ही खरूज पसरणारी हाये. कशाला उगाचंच खाजवण्यासाठी पुढं जायचं. खरूज खाजवली की वाढतं जाती. सगळे गपगुमान तमाशा बघत व्हते. इकडं भैरुच्या गड्यांनी दाणादाण उडविली होती पक्याच्या पैलवानांची. मार खाऊन बेजार झाले होते. सुरुवातीला कांगावा केला की आम्ही भैरु पैलवानांना कुस्त्यात पलटवलं, मग त्यांना माती चारली वगैरे. पण दिसत तर वेगळंच होतं. कारण यंदा भैरु पैलवान सगळीकडे नाकाबंदी करून चोप चोप चोपत होते. वरुन भैरु पैलवानाच्या तालमीकडून अधिकृतपणे जाहीर केले होते की आग्यामोहोळ मध्ये ज्या माशा आम्हाला चावल्या त्यांनाच आम्ही पकडून पकडून वेचून मरत आहोत. ज्या माशा चावतात त्यांचाच बंदोबस्त करतोय. परिस्थिती तशी चिघळत होती तेवढ्यात आमऱ्या पैलवानांच्या तालमीनं डाव साधला. भैरु आणि पक्या पैलवानांच्या तालमीतल्या गड्यांशी चर्चा करुन, मध्यस्थी करून कुस्त्या थांबवल्या. अशा तऱ्हेने पंचक्रोशी बाहेरच्या तालमींना गावातल्या कुस्तीत मध्यस्थी केली. मांडवली बादशहा होण्याचा मान मिळवला. इकडं गावातल्या चिनाप्पा पैलवानाच्या तालमीला पक्या पैलवानांच्या मदतीला धावून जाण्याशिवाय पर्याय नव्हता. आमऱ्या पैलवानांच्या तालमीतल्या तालीममास्तर तात्या लय दलिंदर. भैरुचा नरिंदर. दोघांनी काय खलबती केल्या रातोरात कुणालाबी झेपल्या नाहीत. एकदम कुस्त्या मध्येच थांबल्या. गावातल्या तालमींना काय समजना? नेमकं काय झालंय? ज्यानं त्यानं नरिंदरला शिव्या दिल्या. तालीममास्तर बकवासय म्हणून बोंबाबोंब सुरू केली. खरं कारण भैरु पैलवानाच्या तालमीतल्या गड्यांना पक्कं ठाव होतं ते. कारण कुस्त्या खेळल्यानंतर पक्या पैलवानांच्या तालमीतल्या गड्यांंचे कमकुवत डाव, चांगलेच माहीत झाले व्हते. तिकडं चिनाप्पा अन् आमऱ्या पैलवानांच्या तालमीचा वेगळाच कार्यक्रम चालू होता. आता फकस्त आमऱ्याला पंचक्रोशीत डायरेक एंट्री भेटली होती मांडवली करण्यासाठी. 

सगळ्या तालमी, पैलवान गडी आणि गावातल्या कुस्तीप्रेमींना एक समजलं व्हतं की ही शांतता भविष्यात येणाऱ्या वादळाची सुरवात आहे ते.

® भूषण वर्धेकर 
११ मे २०२५
पुणे 

खरा तो एकची धर्म - विडंबन

खरा तो एकची धर्म - विडंबन  (साने गुरुजी यांची क्षमा मागून) खरा तो एकचि धर्म जगाला जिहादी अर्पावे जगी जे हीन अति धर्मभोळे जगी जे दीन लुळे पां...