पुरोगामी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
पुरोगामी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, २९ एप्रिल, २०२६

भाषिक अस्मिता आणि महाराष्ट्र

 भाषिक अस्मिता आणि महाराष्ट्र 

महाराष्ट्रात जर राजकीय विचार मराठी अस्मिता घेऊन पुढे आला असता तर आपलं महाराष्ट्र म्हणून देशात भाषिक गुरुत्व बहरलं असतं. जशा दक्षिणेत भाषिक अस्मिता कट्टर आहेत तशा. तसेच सामाजिक विचारधारा म्हणून जर पुरोगामी विचार पुढे आणला गेला असता तर सामाजिक विषमता वाढली नसती. कारण सामाजिक विषमता वाढीस लावली जाते ती राजकीय फायद्यासाठी. महाराष्ट्रात झालं नेमके उलटे! आपण राजकीय भूमिका पुरोगामी म्हणून स्वीकारली आणि राजकारणी मंडळींना आयतं चरायला कुरण दिलं आणि सामाजिक भूमिका म्हणून मराठी भाषेच्या अस्मितेचा डोस दिला गेला. याचा परिणाम असा झाला की पुरोगामी महाराष्ट्रात जातीयवादी राजकारण गावपातळीपर्यंत मुरले. भाषा टिकली तर आपण टिकून राहू एकसंध राहू ही जाणीव भाषिक अस्मिता जर रुजली तर एकछत्राखाली सर्व जातपात धर्म येतात. कारण भाषा ही संस्कृतीचा कणा असतो त्यासाठी भरभक्कमपणे राजकीय आशीर्वाद असायलाच पाहिजे. याच्या उलट जर सामाजिक विचार पुरोगामी सर्वधर्मसमभाव म्हणून स्वीकारला तर सर्वसमावेशक समाज म्हणून आपण एकत्र राहू जातपातधर्म न बघता. कारण सामाजिक प्रश्न समस्या या सामाजिक पद्धतीने एकमेकांशी संवाद साधून सोडवता येतात. राजकीय प्रश्न समस्या सोडवण्यासाठी राजकीय दृष्टीने योग्य ते निर्णय घेतले जातात. यात जे सत्ताधारी आहेत त्यांचाच वरचष्मा असतो. महाराष्ट्रात सामाजिक प्रश्न समस्या राजकीय नेत्यांनी सोडवल्या पाहिजेत ही आपली अपेक्षा असते. राजकीय प्रश्न समस्या सोडवण्यासाठी आपण सामाजिक पद्धतीने सोडवण्यासाठी धडपड करतो. दोन्ही बाजूंनी आपणच आपल्या पायावर धोंडा पाडून घेतो. अशाप्रकारे महाराष्ट्रात ना भाषिक अस्मिता कणखर झाली ना पुरोगामी विचार टिकून राहिला. अशी त्रेधातिरपीट झाल्यानंतर ना पुरोगामी विचार जनसामान्य जनतेत मुरला ना भाषिक अस्मिता सर्वदूर पसरल्या. याला सर्वस्वी जबाबदार मराठी माणूस जसा आहे तसाच आपली राजकीय विचारधारा. 


भौगोलिक आणि ऐतिहासिक दृष्ट्या महाराष्ट्र हा देखील काही प्रमाणात कारणीभूत आहे मराठी अस्मिता टोकदार न होण्यासाठी. भौगोलिक परिस्थिती नुसार आपण हिंदी पट्ट्याच्या अगदी जवळ आहोत. त्यामुळे हिंदी भाषिक संस्कृती आपण लगेच आत्मसात केली. या उलट हिंदी भाषिक लोकांनी मराठी संस्कृती लगेच आत्मसात केली का? का नाही केली? आज कामचलाऊ मराठी बोलणारे लोक असो वा मराठी अजिबात न बोलणारी मंडळी आपले दैनंदिन व्यवहार सुरळीत पार पाडत असतात. मराठी हिंदी लिहिण्यासाठी देवनागरी लिपीचे साधर्म्य आहे. त्यामुळे वाचन लेखन आणि बोलणे यासाठी विशेष कष्ट घ्यावे लागत नाहीत. हिंदी मुळात अनेक बोलीभाषा एकत्र करून तयार झालेली आहे. लिखाणाची भाषा आजही प्रमाणित शुद्ध हिंदी वापरली जाते. संस्कृत प्रचुर हिंदी असो उर्दू मिश्रित हिंदी असो दोन्ही व्हर्जन महाराष्ट्रात वापरले जातात. या व्यतिरिक्त बम्बैया हिंदी जी बॉलीवूड मुळे अनेकांच्या तोंडी रूळली. हिंदी भाषिक कधीकाळी महाराष्ट्रात केवळ मोठ्या शहरापुरते मर्यादित होते. कालांतराने नोकरी धंदा उद्योग करण्यासाठी स्थलांतरित कैक हिंदी भाषिक उत्तरेतून महाराष्ट्रात स्थायिक झाले. किमान तीन चार पिढ्या महाराष्ट्रात राहिल्या. त्यामुळे हिंदी आणि मराठीचे सख्य वाढत गेले. विशेषतः मुंबईत मराठी माणूस घाटी म्हणून कधीकाळी ओळखला जायचा. कारकुनी कामं करणारा मराठी माणूस. हीच प्रतिमा साहित्य चित्रपट वगैरे माध्यमात प्रचलित झाली. मराठी माणूस कारकून बनला याला महत्त्वाचं कारण म्हणजे ब्रिटिश. ब्रिटिश काळात विशेषतः १७ वं आणि १८ वं शतक हे बॉम्बे प्रेसिडन्सी मधलं कारखाने उद्योगात आघाडीवर होतं. तशी कारखानदी कलकत्ता आणि मद्रास प्रेसिडन्सी मध्ये पण होती. मात्र मराठी माणूस कारकून म्हणून बॉम्बे प्रेसिडेन्सी मध्ये आला स्थिरावला. अगदी स्वातंत्र्य मिळेपर्यंत मराठी माणसाची मुंबईत टक्केवारी बरीच वाढली होती. कापड गिरणी, जहाज बांधणी आणि इतर उद्योग हे मराठी माणसाच्या रोजीरोटीचे प्रमुख साधन होते. त्यामुळे मराठी सत्ता ही आर्थिक होण्यासाठी जी एक उद्योजक, कारखानदार आणि व्यवसाय पिढी मराठी माणूस वाढायला पाहीजे होती ती कधीच जोमाने वाढली नाही. शिक्षणाचा प्रचार प्रसार झाला तसा मराठी माणसांचा व्यवसाय उद्योग वगैरे वाढला नाही. कदाचित रिस्क न घेण्याचा विचार आणि नोकरशाही हीच सेफ साईड म्हणून बघितली गेली असेल. याचा परिणाम असा झाला की मराठी माणसाव्यतिरिक्त अन्य दक्षिणी आणि उत्तर भारतीय लोकांना जशा संधी उपलब्ध झाल्या तशा त्यांनी उपयोगात आणल्या. त्यामुळे आर्थिक केंद्र म्हणून उदयास आलेली मुंबईची गोची अशी होती की महाराष्ट्रात मुंबई पण आर्थिक राजधानीत प्रस्त वाढले अमराठी लोकांचे! काही काळ मराठी अस्मिता म्हणून राजकारण तापलं. मात्र या राजकारणात मोठा मराठी भूभाग आकुंचन पावत गेला याच्या उलट अमराठी भूभाग अजून प्रसरण पावत गेला. आज एकविसाव्या शतकात अडीच दशके उलटून गेली आहेत आणि फक्त मूळ मराठी टक्केवारी बघितली तर लक्षात येईल मूळ मुंबईतून मराठी माणूस उपनगरात फेकला गेला. गेल्या शतकभरात कॉस्मोपॉलिटिन शहर म्हणून मुंबई मध्ये मराठी भाषिक अस्मिता फक्त निवडणूक प्रचारात आघाडीवर राहिली. तशी वेळ ना कलकत्ता ना मद्रास मध्ये गेल्या शतकापासून आली नाही. दक्षिण भारतात पाच राज्यांमध्ये कन्नड तेलगू तमिळ मल्याळम भाषिक अस्मिता ह्या राजकीय पटलावर अधिक टोकदार झालेल्या आहेत. महाराष्ट्रात फक्त मुंबईत मराठी अस्मिता बाकीच्या महाराष्ट्रात का बरं राजकीय पटलावर टोकदार झाल्या नाहीत? कारण आपण राजकीय भूमिका घेतली ती पुरोगामी. बरं पुरोगामी विचार महाराष्ट्रात रूजला का? जोवर सोकॉल्ड पुरोगामी पक्ष सत्तेवर होते तोपर्यंत पुरोगामी विचार पुढे जात होता. मग सत्ताबदल झाला आणि पुरोगामी विचार का खुंटला? उजव्या विचारसरणीचा प्रभाव का वाढला? थोडक्यात हिंदुत्व हा सामाजिक विचार महाराष्ट्रात आला उत्तरेकडून आणि स्थिर झाला. आता हिंदुत्ववादी महाराष्ट्र म्हणून उदयास आला. मग पुरोगामी विचारधारा ही राजकीय आश्रयाला असल्याने खंगत चालली का? याचा विचार केला पाहिजे.


भाषा ही राजकीय साधन आहे वर्चस्व टिकवून ठेवण्यासाठी. जगभरात जे जे काही कांड झाले आहेत त्यांचे मूळ हे भाषा भूमी भय याच्याशी येनकेन प्रकारे निगडित असते. संस्कृती वरील आक्रमण भाषेची गळचेपी करूनच होते. उत्तर भारतात किमान पन्नास बोलीभाषा बोलल्या जात होत्या रोजच्या व्यवहारात. त्यांची जवळीक हिंदीशी जशी झाली तशी बोलीचालीच्या भाषा म्हणून बोलीभाषा खुंटल्या गेल्या. लिखाणात वापरल्या जाणाऱ्या भाषेचा सर्व लोकांना फायदा होतो म्हणून प्रमाण भाषेचा उदय झाला. महाराष्ट्रात तर प्रत्येक जिल्ह्यात बोलली जाणारी बोलीभाषा वेगळी आहे. मग अशी मराठी भाषेची व्याप्ती असलेल्या महाराष्ट्रात मराठी अस्मिता सहजपणे रूळली असती रूजली असती आणि टोकदारपण पुढे आली असती. मात्र तसे झाले नाही कारणं अनेक आहेत. मुख्य कारण मराठी माध्यमात शिक्षणाचा प्रसार झाला नाही. आधुनिक शिक्षण हे इंग्रजी माध्यमात मिळते हा भेकड समज तालुका तालुक्यात पोचला आणि इंग्रजी माध्यमाची शैक्षणिक व्यवसायिक मॉल उभे राहिले. सीबीएसई आयसीएसई माध्यमांमुळे तर गावागावांत मराठी शाळा ओस पडू लागल्या. मराठी शाळेतून बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांना जगात खूप स्ट्रगल करावा लाजतो ह्या न्यूनगंडाने कैक पिढ्यांना पछाडलेले आहे. असा करंटेपणा असेल तर मराठी भाषिक अस्मिता खोलवर रूजेल काय?  शिक्षणाचा दर्जा कसा आहे याचाही विचार केला पाहिजे. सरकारी शाळांमध्ये शिक्षण चांगले नाही म्हणून आम्ही खाजगी शाळांना प्रोत्साहन देतो असा एक गैरसमज आहे. दुसरा सरकारी शाळा म्हणजे लो स्टॅंडर्ड वाटणारी एक पिढी आहे. गंमत म्हणजे याच पिढीतले कित्येक लोक मराठी शाळेत शिकलेले असतात. अशी त्रेधातिरपीट असेल शालेय शिक्षणात तर मराठी भाषिक अस्मिता निर्माण होईल का? घरापासून जर मराठी ऐवजी इतर भाषेला प्राधान्यक्रम दिला गेला तर अस्मिता जगेल का मरेल? मराठी साहित्य देखील आपल्या भाषेचा अस्मितेचा गौरव करण्यात कमी पडले आहे. मराठी साहित्यात एक दळभद्री गोष्ट जगमान्य आहे की सामाजिक जाणीव नेणीव वेदना संवेदना वगैरे भावना व्यक्त केल्या असतील तर उत्तम साहित्य. नसेल तर मागास? मुळातच साहित्य हे रंजक आणि विचार मांडणारे असावे. भडिमार करणारे किंवा रडारडी करणारे नसावे. मराठी साहित्यातील लेखन हे प्रामाणिकपणे सामाजिक जीवनात जाणीवा कशा रूंदावत गेल्या आणि आम्ही समाजाभामुख कसे बदललो वगैरे वैचारिक फुशारक्या मारणारे असते. थोडी जातकुळी बदलण्याची भूमिका घेतली तर लगेचच अभिजन बहुजन विद्रोही दलित साठोत्तरी नव्वदोत्तरी वगैरे शेलकी विशेषणे लावून बेदखल केले जाते. वाचकप्रिय की रसिकप्रिय वगैरे शब्दच्छलात निर्ढावलेली किमान दोन तीन साहित्यिक लोकांच्या पिढ्या खपल्या. आमच्या मनाला पटणाऱ्या गोष्टी लिहिल्या तरच तुम्ही खरे सर्जनशील ही कुष्ठरोगी मानसिकता बदलायला हवी. यातून आपण बाहेर पडलो तरच मराठी अस्मितेचे बाळकडू मराठी साहित्यात रूजेल. गेलाबाजार आम्ही असू आधुनिक विचारांचे नवमतवादी वगैरे बंडखोरी मराठी साहित्य विश्वात पृथ्वीवर जीवसृष्टीच्या अंतापर्यंत चालत राहील यात शंका नाही.


मराठी अस्मिता हीच राजकीय भूमिका घेऊन जर सर्व प्रादेशिक राजकीय पक्ष वावरले असते तर महाराष्ट्रात आज जो वैचारिक आणि सामाजिक विचका झालेला आहे तसा तरी निश्चितपणे झाला नसता. दुसरा मुद्दा म्हणजे महाराष्ट्रेतर पक्ष महाराष्ट्रात टिकू शकले नसते. कारण मराठी अस्मिता ही बाहेरच्या पक्षांना मानवली नसती. आज राष्ट्रीय पक्ष जसे दक्षिणेत संघर्ष करीत आहेत तसेच महाराष्ट्रात खर्डेघाशी करत बसले असते. महाराष्ट्रात पुरोगामी हिंदुत्व आणि मराठी अस्मिता खोखो चालू आहे. सत्ताधारी आणि विरोधक हे मराठी अस्मितेसाठी एकत्र येत नाहीत. आर्थिक नाड्या अमराठी लोकांकडे आहेत आणि मराठी माणसाला आर्थिक पाठबळ वाढवण्याऐवजी जातीय पाठबळ वाढवण्यासाठी विशेष रस असतो. मराठी चित्रपट निर्मिती मध्ये आर्थिक पाठबळ अमराठी लोकांचे मिळावे मराठी चित्रपट मराठी अस्मिता निर्माण करण्यासाठी कधीही धडपडणार नाहीत. गंमत म्हणजे दादासाहेब फाळके हे भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक म्हणून ओळखले जातात. यातही दादासाहेब तोरणे की दादासाहेब फाळके यावर वाद घालत असतात . वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्रभावशाली घटक आहे गावपातळीवर पोचलेला. भव्य अशी संत परंपरा लाभलेल्या महाराष्ट्रात संत देखील जातीपातीच्या चौकटीत अडकवले गेले आहेत. थोडक्यात मराठी अस्मिता बळकट करण्यासाठी ज्या ज्या धष्टपुष्ट बाबी महाराष्ट्रात आहेत त्यांचा वापर करून जातीय अस्मिता बळकट झाल्या. भविष्यात धार्मिक अस्मिता मजबूत होतील. मराठी अस्मिता बिचारी वाऱ्यावर फडफडत बसणार! याउलट जर महाराष्ट्रात सामाजिक विचार म्हणून पुरोगामी विचार मुरला असता तर सामाजिक चळवळींची शकलं झाली नसती. गटतट पडून विषमता वाढली नसती. जरी जातीय भावना दुखावल्या गेल्या तरी मराठी अस्मितेच्या छायाछत्राखाली सगळे सामाजिक प्रवाह एकवटले असते. आज महाराष्ट्रात हिंदुत्वाखाली सगळे प्रवाह एकवटले जात आहेत. याला जबाबदार कोण?


महाराष्ट्रात आजपर्यंत वेगवेगळ्या राजकीय विचारधारा जेवढ्या प्रमाणात आल्या त्यापैकी कोणत्याही राजकीय विचारधारा मराठी अस्मितेचे समर्थन करत सत्तेत आल्या नाहीत. आंबेडकरी, दलित, समाजवादी, साम्यवादी, बहुजनवादी किंवा हिंदुत्ववादी वगैरे सगळे आपापले अजेंडे राबवत असतात. मात्र कोणत्याही राजकीय विचारसरणीच्या लोकांनी केवळ मराठी अस्मितेचे राजकारण करून एकहाती महाराष्ट्रात सत्ता स्थापन केली नाही. याचे प्रमुख कारण म्हणजे भाषिक अस्मिता ही सत्ता मिळविण्यासाठी गुरुकिल्ली नव्हे हे सगळ्यांना माहीत आहे. यासाठी ऐतिहासिक पार्शभूमी बघणं गरजेचे आहे. भाषावार प्रांत रचनेनुसार महाराष्ट्र स्थापन झाला १९६० साली. त्याआधी मराठी भाषिक वेगवेगळ्या भूभागात विखुरलेले होते. म्हैसूर, हैदराबादच्या संस्थानात मराठी भाषिक होते ते नंतर कर्नाटकात स्थिरावले. मध्य भारत, वऱ्हाड, नागपूर संस्थान मध्ये मराठी भाषिक होते मात्र त्यांना हिंदी भाषा जवळची वाटली होती रोजच्या व्यवहारात. मुंबई प्रांतांत मोठ्या प्रमाणात मराठी भाषिक होते अगदी कोकणातील किनारपट्टी सकट. मराठ्यांची गादी साताऱ्यात आणि कोल्हापूरात असली तरी या भागातील जहागिरी संभाळणारे मराठी संस्थानिकं ब्रिटिशांच्या वक्रदृष्टी मुळे पुन्हा एकदा वर्चस्व प्रस्थापित करू शकले नाहीत. हेच सर्व वेगवेगळ्या प्रांतांतील मराठी भाषिक म्हणून महाराष्ट्र राज्य स्थापन झाल्यानंतर एकत्र नांदू लागले. त्यानंतर मराठी भाषिक स्वायत्त राज्य म्हणून जरी प्रगतीशील झाले असले तरीही या उभ्या आडव्या पसरलेल्या महाराष्ट्रात मराठी भाषिक अस्मितेच्या नावाखाली कोकण मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र खानदेश माणदेश वगैरे भूभाग एक होत नाहीत. गंमत म्हणजे याच भूभागातून आपापल्या जातीसाठी मराठी माणूस एकत्र येतो व राजकरणात वापरून फेकला जातो. महाराष्ट्रात जातीय अस्मिता तिखट आणि भडक झाली याला जबाबदार पुरोगामी म्हणून वावरणारे राजकीय नेते. महाराष्ट्रात राजकीय चिखल झालाय तो केवळ राजकीय स्वार्थासाठी पुरोगामी विचारांचा जयघोष केला म्हणून. आता त्याच चिखलात पोषक वातावरणात कमळ उगवलंय तर दोष कोणाला देणार?



©️भूषण वर्धेकर

२७ एप्रिल २०२६

पुणे - ४१२११५


सोमवार, ३० मार्च, २०२६

महाराष्ट्र खरंच पुरोगामी आहे का?

 महाराष्ट्र खरंच पुरोगामी आहे का?


महाराष्ट्रात सध्या एकूण घडणाऱ्या घटना पाहता महाराष्ट्र खरोखरच पुरोगामी विचारांचा होता का यावर चर्चा करण्याची गरज आहे. आजपर्यंत आपण महाराष्ट्रात फक्त शाहू फुले आंबेडकर वगैरे विभूतींचा जयघोष करत पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र म्हणून मिरवले. महाराष्ट्राने देशाला फक्त शाहू फुले आंबेडकर हेच समाजसुधारक दिले आहेत काय? टिळक आगरकर, सावरकर, धोंडो केशव कर्वे, र धो कर्वे, जोशी, जांभेकर, डॉ लाड वगैरे कैक मंडळींना जातीमुळे जाणीवपूर्वक टाळले गेले असेल. मात्र जगन्नाथ शंकर शेट, विठ्ठल रामजी शिंदे कर्मवीर भाऊराव पाटील, अण्णा भाऊ साठे वगैरे मंडळी पण आहेत ना? अशा कितीतरी विद्वान विभूतींनी महाराष्ट्र घडवला आहे. सगळ्यांचीच नावे लिहिली नाहीत पण कित्येक पुढारलेल्या लोकांनी महाराष्ट्र धर्म परिपक्व केला. फक्त जयंत्या मयंत्यांसाठी अशी मंडळी राखून ठेवलेली आहेत का असा प्रश्न पडतो! महाराष्ट्रात वैचारिक मतभेद असणाऱ्या लोकांनी पण महाराष्ट्र घडवला आहे हे कायमस्वरूपी लक्षात ठेवावे. दर वीस वर्षांनी एक पिढी बदलते असं ढोबळमानाने सांगतात. मात्र वैचारिक अंगाने पिढी कधी आणि कशी बदलत जाते यावर चिकित्सा करणं गरजेचे आहे म्हणून हा लेखनप्रपंच!


महाराष्ट्र राज्य स्थापन झालं १९६० साली. भाषावार प्रांत रचनेनुसार. त्याआधी मराठी भाषिक भूभाग म्हणून म्हैसूर, हैदराबादच्या संस्थानात, मध्य भारत, वऱ्हाड, नागपूर संस्थान आणि मुंबई प्रांतांत मोठ्या प्रमाणात होते. हेच मराठी भाषिक महाराष्ट्र राज्य स्थापन झालं आणि एकत्र नांदू लागले. त्यानंतर मराठी भाषिक स्वायत्त राज्य म्हणून जे काही सामाजिक राजकीय आर्थिक दृष्ट्या बदल झाले ते लक्षात घेणे गरजेचे आहेत. सरसकट एकाच पुरोगामी ढाच्यात समस्त महाराष्ट्र पुरोगामी म्हणून राजकीय फायद्यासाठी लादला जातोय. ही पार्श्वभूमी लक्षात आल्यावर एक गोष्ट नक्की समजेल मराठी भाषिक एकजिनसी नाही. खानपान बोलीभाषा इतिहास भूगोल वगैरे विभागानुसार बदलत जाते. कोकण, मराठवाडा, खान्देश, विदर्भ, आणि पश्चिम महाराष्ट्र ह्या भागातील मराठी माणूस स्वतःची वैशिष्ट्ये राखून आणि जोपासत असतो. या सगळ्यांना एकजुटीने धरून ठेवण्यासाठी आस्था, व्रतवैकल्ये आणि सण, उत्सव वगैरे आघाडीवर आहेत. पुरोगामी विचार हा आघाडीवर आहे का अशा पद्धतीने सगळ्यांना एकजुटीने धरून ठेवण्यासाठी? असायला पाहिजे पण राजकीय परिप्रेक्ष्यातच पुरोगामी विचार खुंटला. तो सार्वजनिक जीवनात मोठ्या प्रमाणात बहरलाच नाही. तो जर अग्रभागी असता तर आज महाराष्ट्रात सामाजिक क्षेत्रात जातपातधर्म वगैरे टोकदार अस्मिता तयार झाल्या नसत्या. विवेकी महाराष्ट्रात प्रबोधनाची परंपरा आहे वगैरे गोष्टी छान वाटतात ऐकायला, वाचायला व लिहायला. प्रत्यक्षात जातीयवादी अस्मिता प्रखर झाल्या आहेत. 


स्वातंत्र्यपूर्व काळात महाराष्ट्रात आणि दक्षिणेकडील काही राज्यात ब्राह्मण ब्राह्मणेतर चळवळ सुरू झाली होती. सनातनी विचार विरुद्ध पुढारलेला नवमतवादी विचार हा एक कालखंड होता. नंतर प्रतिगामी विरुद्ध पुरोगामी विचार सुटसुटीत होऊन पुढे आला. या सगळ्यात अस्पृश्यतेविरोधात लढा, दलित, दलितेतर, बहुजन अभिजन वगैरे वैचारिक द्वंद्व चालू होते. अशा परिस्थितीत जर राजकीय विचार मराठी भाषिक अस्मिता घेऊन पुढे आला असता तर आपलं महाराष्ट्र म्हणून देशात भाषिक गुरुत्व बहरलं असतं. तसेच सामाजिक विचारधारा म्हणून जर पुरोगामी विचार पुढे आणला गेला असता तर सामाजिक विषमता वाढली नसती. झालं नेमके उलटे! आपण राजकीय भूमिका पुरोगामी म्हणून स्वीकारली आणि राजकारणी मंडळींना आयतं चरायला कुरण दिलं आणि सामाजिक भूमिका म्हणून मराठी भाषेच्या अस्मितेचा डोस दिला गेला. अशी त्रेधातिरपीट झाल्यानंतर ना पुरोगामी विचार जनसामान्य जनतेत मुरला ना भाषिक अस्मिता सर्वदूर पसरल्या. अशी वैचारिक परिस्थिती असताना पुरोगामी विचार, विवेकी सामाजिक भान आणि जातिविरहीत ऐक्य महाराष्ट्रात मुरायला किती वर्षे, दशके, शतके लागतील? तशी टिकाऊ व्यवस्था उभी जरी राहिली तर तग धरेल काय? अशावेळी विवेकी जागर म्हणून खंडन मंडन चिकित्सा मीमांसा करणं एवढेच उरतं! ही वैचारिक हतबलता आली ती पुरोगामी चळवळ राजकीय टेकूवर उभी राहिली म्हणून. पुरोगामी विचार हा सर्वसमावेशक आणि सामाजिक समरसतेसाठी आवश्यक असतो. मात्र महाराष्ट्रात हिंदुत्ववादी विचार सर्वसमावेशक आणि सामाजिक समरसतेसाठी पुढे सरसावला आणि प्रबळ झाला. 


भारतात महाराष्ट्र भौगोलिकदृष्ट्या जर मध्य पकडला तर दक्षिण भारत आणि उत्तर भारत असे प्रामुख्याने राज्यांचे समुह दिसतात. दक्षिणेकडील राज्यांमध्ये भाषिक अस्मिता टोकदार आहेत आणि उत्तरेकडील राज्यांमध्ये हिंदी भाषिक अग्रेसर आहेत. मुळातच हिंदी ही अनेक बोलीभाषांमुळे बहरली जोपासली आणि वाढली. राजकीय वरचढ ठरली ती देशाची राजधानी हिंदी पट्ट्यात येत असल्याने. अशा परिस्थितीत दक्षिणेकडील राज्यात भाषिक अस्मितेचे राजकारण हिंदी भाषिक राजकारणात वरचढ ठरते. तसे महाराष्ट्राच्या बाबतीत घडत नाही. आपल्या महाराष्ट्रात कॉस्मोपॉलिटिन कल्चर मुरलेलं आहे. त्यामुळे मराठी भाषिक अस्मिता कधीच टोकदार होऊ शकत नाहीत. उलटपक्षी टोकदार काय झाल्या तर जातीय अस्मिता! कारणं काय तर चुकीच्या व्यवस्थेला पुरोगामी म्हणून रेखाटलं गेलं. उदाहरणार्थ, आजवर महाराष्ट्रात ज्या राजकीयदृष्ट्या व्यक्ती, संस्था आणि पंथ प्रभावशाली होते त्यांनी एक गोड गैरसमज काय पसरवला? दिसला बामन की करतो शोषण, दिसला वंचित की कर शोषित, दिसला दलित की कर पिडीत! असं भ्रमित व्हिज्युअल तयार केलं. पण प्रत्यक्षात काय होतं तर बहुजनांकडेच राजकीय प्राबल्य महाराष्ट्र स्थापन झाल्यापासून होतं. १९६० ते १९९० हा कालखंड बघितला तर महाराष्ट्रात संस्थानिकं, जहागीरदार, वतनदार, सरंजामी लोकांचा राजकीय दबदबा दिसतो. १९९० नंतर जागतिकीकरण, अस्ताव्यस्त वाढलेलं शहरीकरण आणि विस्कटलेलं ग्रामीण कृषीक्षेत्र दिसतं. अशा साठ पासष्ठ वर्षांत किमान तीन मराठी भाषिक पिढ्या झाल्या आहेत. त्यांना दिसलेला पुरोगामी विचार एकसंध दिसला असेल काय? ह्या मूळ बाबींकडे लक्ष दिले तर समजेल की महाराष्ट्र पुरोगामी म्हणून अग्रेसर का नाही राहिला राजकारणात. 


तमिळी, मल्याळी, तेलुगू आणि कानडी लोकांसारखा सामाजिक, भाषिक एकात्मता म्हणून मराठी माणूस पुढे आला नाही याचे विवेचन केले पाहिजे. याला सर्वात मोठी खोडा महाराष्ट्रात घातला तो म्हणजे जातीयवाद्यांनी. उदाहरणार्थ जातीय दृष्टी एवढी मुरलेली आहे पुरोगामी महाराष्ट्रात जातीने ब्राह्मण असलेल्या पुरोगामी विचारांच्या लोकांना पण पुरोगामी लोकांनी लक्ष्य केलं आहे बरेचदा. म्हणजे सदासर्वदा ब्राह्मणद्वेष करणारा सोकॉल्ड पुरोगामी कंटाळा आला की पुरोगम्यांमधील कोण कोण ब्राह्मण आहेत हे शोधून उखाळ्यापाखाळ्या काढत बसतात. अशी जर मंडळी असतील तर महाराष्ट्रात पुरोगामी विचार बहरेल की हसं होईल त्याचं? जातीपातीत महाराष्ट्र बरबटलेला आहे हे जगजाहीर आहे मग शाहू फुले आंबेडकर यांच्या नावाने कंठशोष करून महाराष्ट्र पुरोगामी आहे म्हणून नेमके काय साधले जाते? सरकार दफ्तरी कागदपत्रे जर तपासली तर समजेल की महाराष्ट्रात ओबीसी कॅटेगरी मध्ये किमान अडीचशे पेक्षा जास्त जाती उल्लेखलेल्या आहे. एससी एसटी एनटी वगैरे कॅटेगरी मध्ये दिडशेच्या आसपास जाती आढळतात. खुल्या वर्गातील वीस पंचवीस जाती आहेत. म्हणजे सव्वाचारशे जातसमुह महाराष्ट्रात आहेत. ही सगळी माहिती आपल्याला सरकारी कागदोपत्री उपलब्ध आहे. यातील उपजाती आणि त्यांच्या निरनिराळ्या शाखा वेगळ्याच. मग एवढा मोठा जातिसमूह पुरोगामी विचाराखाली का आला नाही हा यक्षप्रश्न आहे. 


खरंतर जातपात आणि अस्पृश्यता यावर हिमालया एवढे काम डॉ आंबेडकरांनी केलं आहे. आज मात्र तुम्ही आंबेडकरांना मानत असाल आणि आंबेडकरवादी नसाल तर तुम्हाला परिघाबाहेर केलं जातं. अशाच विस्कळीत परिस्थितीत दलितांच्या चळवळींची गटगतटात शकलं झाली. महाराष्ट्रात कधीकाळी गावगाडा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बलुतेदार (१२ जातसमुह) आणि अलुतेदार (१८ जातसमुह) व्यवस्था कुशल कारागीर लोकांची होती. तीच अर्थव्यवस्थेची खरीखुरी वाहक होती. मात्र सरंजामी, वतनदार, जहागीरदार आणि संस्थानिकांच्या व्यवस्थेत शोषित व्यवस्था तयार झाली. मूळ पुरोगामी विचार पुढारलेला होता जो ब्राम्हणी व्यवस्थेविरोधातील वैचारिक लढाई होती. राजकीय धुरिणांनी शिताफीने ब्राम्हणद्वेषाचा कौल दिला. याच दरम्यान ब्राम्हणेतर समाजात सरकारी सोयीसुविधा आणि शैक्षणिक सवलती वापरून किमान दोन तीन पिढ्या ठाण मांडून बसलेल्या आहेत. त्यांची दुसरी ब्राह्मणी व्यवस्था त्यांनी तयार केलेली आहे. जिच्याविरोधात खऱ्या अर्थाने सामाजिक लढा उभा राहिला पाहिजे पण राजकीय पुरोगामी लोकांना ब्राह्मणद्वेष प्रिय. प्रस्थापित ब्राह्मणेतर लोकांना मिळालेल्या नव्या अवकाशात त्यांचीच पुढची पिढी सुस्थापित होत राहिली. त्यामुळे खऱ्या अर्थाने वंचित, शोषित आणि पिडीत प्रवाहाबाहेरील समुह तसेच राहिले. त्यामुळे सवर्णाविरोधात जंग जंग पछाडून “नवा प्रस्थापित मवर्ण” वर्ग उभा राहिला. अशा सामाजिक रचनेत अस्सल पुरोगामी विचारांच्या एकछत्राखाली एकजुटीने महाराष्ट्र एकत्र येऊ शकतो का? गेल्या साठ पासष्ट वर्षात नाही आला. आता येणं शक्य नाहीये. वारकरी संप्रदाय हा एकमेव पर्याय होता जिथे सर्व जातीपाती बाजला सारून लोक एकत्र येत असत. पण आजकाल वारकरी संप्रदाय हिंदुत्ववादी विचारधारेकडे झुकला आहे. कारण हिंदुत्व आणि अध्यात्मिक क्षेत्रातील अनेक संघटना एकत्र येऊन महाराष्ट्रात सर्व जातसमुहांना एकछत्राखाली आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. काही अंशी ते सफल झाले आणि राजकीय पटलावर भक्कम झाले. 


एक उदाहरण पाहू. जर दुर्धर आजार पसरला तर आजार पसरवणारे विषाणू बलवान असतात. किंवा रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत झाली तर थातुरमातुर आजार पण लवकर बळावतात. त्याप्रमाणे समाज धष्टपुष्ट असेल तर विखारी विकार टिकू शकत नाहीत. जर टिकले तर समाजाचा विवेक हरवलेला आहे समजावे. त्यामुळे महाराष्ट्रात सध्याच्या काळात जे काही घडत आहे त्याला जबाबदार हिंदुत्ववादी तर आहेच आहेत आणि तेवढेच पुरोगामी पण आहेत. महाराष्ट्रात वैचारिक बकालपणा पुरोगाम्यांनी सुरू केला तर कळस हिंदुत्ववाद्यांनी चढवला आहे. महाराष्ट्रात मराठी माणूस हा मूलतः सोशिक आणि श्रद्धाळू आहे. प्रत्येक भारतीय व्यक्तीपूजक असतो तसा मराठी माणूस पण कमी नाही. श्रद्धा, आस्था, अध्यात्म आणि रूढी परंपरा प्रथा या गोष्टी मराठी माणसाला नेहमीच आकर्षित करतात. वहावत जात व्यक्तीपूजा करून डोक्यावर मिरवण्यासाठी बहुतांश मराठी मने नेहमीच तयार असतात. अशा सुपीक जमिनीत अनेक चांगली पिके पण येतात आणि भरमसाठ वाढणारी निरुपयोगी तण, गवत, खुरटी झुडपे येत राहतात. योग्य मशागत, खते आणि औषध फवारणी जर वेळोवेळी केली तर ठिक नाहीतर येणाऱ्या भरघोस पिकाचा बाजार उठल्याशिवाय राहणार नाही. त्यासाठी फक्त शिक्षण झालेय म्हणून सुशिक्षित आहोत असे होत नाही. विवेक जागरूक असावा लागतो. अशा विवेकी समाजाची महाराष्ट्रात गरज आहे. पुरोगाम्यांनी ती संधी ढिगभर चुका करून घालवली. सध्या महाराष्ट्रात हिंदुत्ववादी विचारांचा प्रभाव आहे पण ही मंडळी फक्त राजकीय स्वार्थासाठी आसुसलेली आहेत. विवेकी प्रगल्भ समाज तयार करण्याची जबाबदारी ही राजकीय नसून सामाजिक आहे. ही प्रत्येक मराठी माणसाची वैयक्तिक जबाबदारी आहे. सारासार विचार, सद्‌सद्विवेक बुद्धी आणि विवेकाचे समाजभान अखंडित राहो!



©️भूषण वर्धेकर, पुणे 

३० मार्च २०२६

भाषिक अस्मिता आणि महाराष्ट्र

  भाषिक अस्मिता आणि महाराष्ट्र   महाराष्ट्रात जर राजकीय विचार मराठी अस्मिता घेऊन पुढे आला असता तर आपलं महाराष्ट्र म्हणून देशात भाषिक गुरुत्व...